प्रसिद्ध
इतिहासकार के. एन. पण्णीकर यांचे 9 मार्च रोजी तिरूअनंतपूरम येथे वयाच्या
एकोणनव्वदव्या वर्षी निधन झाले. भारताच्या
आधुनिक इतिहासाच्या क्षेत्रात ज्या लोकांनी काही मूलभूत संशोधन केले आहे.
त्यांच्यापैकी एक महत्वाचे इतिहासकार म्हणजे के. एन. पण्णीकर होते. त्यांनी श्री शंकराचार्य संस्कृत
विद्यापीठ, कलाडी येथे कुलगुरू म्हणून काम केले होते. तसेच, शिक्षण आणि इतिहास
संशोधन क्षेत्रात केरळ मध्ये महत्वाचे काम करणाऱ्या संस्थांमध्येही महत्वाची पदे
भूषवली होती. त्यामध्ये केरळ उच्च शिक्षण परिषद आणि केरळ इतिहास संशोधन परिषद
यांचा समावेश होतो.
पण्णीकर यांचा जन्म सव्वीस एप्रिल एकोणिसशे छत्तीस
(26/4/1936) रोजी गुरुवायुर, केरळ येथे झाला होता. त्यांचे पदवीचे शिक्षण पलक्कड
येथील विकटोरिया कॉलेज आणि पदवीव्युत्तर शिक्षण आणि पीएचडीचे शिक्षण राजस्थान
विद्यापीठात पूर्ण केले. पण्णीकर यांची
ज्या परिसरात वाढ होत होती. त्याच परिसरात वसाहतवादविरोधी शेतकऱ्यांचा लढा उभा
राहिलेला होता. तसेच, यातून पुढे कम्युनिस्ट चळवळीचाही प्रभाव वाढला होता. या
सगळ्यांचा प्रभाव जीवनभर पण्णीकर यांच्यावर राहिला. मात्र, व्यवसायिक, वैज्ञानिक
दृष्टी असलेले इतिहासकार असल्यामुळे त्यांची कोणत्याही संकुचित गोष्टींना थारा
दिला नाही. मार्क्सवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असला तरी त्यांची
मार्क्सवादी विचारपद्धतीतील अर्थ निर्धारणवादाला स्वीकारले नव्हते. आर्थिक
घडामोडी, गोष्टी महत्वाच्या असतात मात्र त्या सर्वच गोष्टी ठरवत नाही. त्यांच्या
सोबत सांस्कृतिक गोष्टीही अनेक गोष्टी घडवत असतात असे त्यांनी त्यांच्या लिखणात
म्हटलेले आहे. सांस्कृतिक मुद्दे आणि विचार याकडे डाव्या चळवळीनी म्हणावे तेवढे
लक्ष दिले नाही असेही त्यांनी म्हटलेले आहे.
आधुनिक भारताच्या
संशोधनातही त्यांनी ‘सांस्कृतिक’
मुद्यांचा शोध घेतला आणि संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीतील संस्कृती, धर्म, विचारसरणी,
वर्चस्व या गोष्टींची चर्चा केलेली आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत सांस्कृतिक आणि
बौद्धिक चर्चा झाल्या. त्यातून अनेक वैचारिक कल्पना जन्माला आल्या. या सगळ्या
गोष्टी सांस्कृतिक उत्पादन होत्या आणि सगळ्यांचा संबंध राजकीय सत्तेशी होता असे
के. एन. पण्णीकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांची पुढील पुस्तके अत्यंत
महत्वाची आहेत. १. ‘कल्चर अँड कॉन्सीयसनेन्स इन मॉडर्न इंडिया’
२. कल्चर, आयडिओलॉजी अँड हेजेमनी – इंटेलेक्चुअल अँड सोशल कॉन्सीयसनेन्स,
‘अगनेस्ट लॉर्ड अँड
स्टेट : रिलीजन अँड पीझंट अपरायझिंग’ हा के. एन. पण्णीकर यांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे. ज्यामध्ये
त्यांनी शेतकरी चळवळीचा सूक्ष्म अभ्यास करून शेतकरी चळवळीविषयीच्या सुलभीकरणाला
नाकारून सामाजिक स्थिती, आर्थिक संरचना आणि सांस्कृतिक प्रक्रियांच्या आधारे
शेतकरी चळवळीचा गुंतागुंतीच्या समाजामध्ये कसा उदय होता याची चर्चा केली होती. शेतकरी
चळवळींच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा ग्रंथ अजूनही दिशादर्शक आहे.
के. एन. पण्णीकर यांनी इतिहासकार म्हणून जमातवादी चलवळींच्या
इतिहासाचा अभ्यास केला. मात्र, नुसता अभ्यास करून चालणार नाही तर जमातवादविरोधी
ठोस कृतीकार्यक्रम ही ठरवला पाहिजे अशी भूमिका त्यांनी एक सजग नागरिक म्हणून घेतली
होती. जमातवाद हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांना मोठा धोका आहे अशी त्यांची
भूमिका होती. लोकशाही ही समतेच्या तत्वावर आधारित असते मात्र जमातवाद हा समतेलाच
मानत नाही. पर्यायाने तो लोकशाहीविरोधी बनतो. म्हणूनच लोकशाही बळकट करायची असेल तर
जमातवादविरोधी ठोस भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी समाजमन तयार केले पाहिजे असेही
त्यांनी अनेक भाषणांमध्ये म्हटले होते. या संदर्भात त्यांची पुढील ग्रंथ महत्वाची
आहेत. १. ‘अ कन्सरन इंडियन्स गाईड टु कम्युन्यालिझम’ २. ‘कम्युन्यालिझम इन इंडिया:
हिस्ट्री, पॉलिटिक्स अँड कल्चर’
पण्णीकरांनी संपूर्ण आयुष्यात संशोधन कार्यात ‘संस्कृती’ या
या गोष्टीचा मागोवा घेतला होता. त्यामुळेच त्यांचे भारतीय संस्कृतीविषयी एक ठोस
असे मत बनले होते. त्यांच्यानुसार भारतीय संस्कृती ही काही साचेबद्ध नाहीये. ती
अनेकवचनी आहे. बाहेरून आलेल्या अनेकांनी भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत हातभार लावलेला
आहे. त्यामुळे तिला एकसाची करणे किंवा त्याकडे एक दृष्टिकोनातून पाहणे हे योग्य
नसून भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अन्यायकारक होईल. सांस्कृतिकतेच्या नावाखाली जमातवादी संस्था, संघटना एक प्रकारची
संस्कृती लोकांवर लादू पाहत आहे हेही सांगितलेले आहे आणि त्यातून निर्माण धोकयांची
शक्यताही त्यांनी वर्तविली होती.
आयुष्यात शेवटच्या टप्यात इतिहासाची होणारी मोडतोड,
ऐतिहासिक घटना आणि व्यक्ति यांच्यावरील राजकारण, या गोष्टी समाजाचे बौद्धिक आणि
सामाजिक आरोग्य बिघडवत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये ऐतिहासिक साक्षरता वाढवली पहिजे
असे त्यांना वाटत होते. त्यानीही आयुष्यभर ऐतिहासिक साक्षरता लोकांमध्ये
वाढविण्यासाठी कार्य केले होते. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक
साक्षरतेच्या लोकशिक्षण आणि समाजप्रबोधन केले पाहिजे असे त्यांना वाटत होते.
त्यासाठी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी ‘हिस्ट्री वीक’
आयोजित केला पाहिजे. त्यामध्ये इतिहासाचा अभ्यास कसा केला जातो? ऐतिहासिक संशोधन
पद्धती म्हणजे काय? इतिहासाची साधने कोणती असतात आणि ती कशी वापरली जातात? अशा
अनेक मुद्यांवर आठवडाभर कार्यक्रम, चर्चा आणि गप्पा केल्या पाहिजेत. यातूनच
लोकमानस जागृत होईल आणि लोकशाही बळकट होईल अशी त्यांची धारणा होती. आजच्या काळात
त्यांच्या या सूचना खूपच महत्वाच्या आहे असे इतिहास अभ्यासक म्हणून मला वाटते.
पूर्वप्रसिध्दी, १५ मार्च २०२६, महाराष्ट्र टाईम्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा