उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे. राजकरण, भाषा, संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये वसाहतवादाचा काय परिणाम झाला याची चर्चा अनेक विद्वानांनी केली होती. फेनन यांनी मात्र आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे वसाहतवादाची मानसशास्त्रीय चिकित्सा विकसित केली. राजकीय आणि आर्थिक परिणामासोबतच वसाहतवादाचे मानसशास्त्रीय परिणाम लोकांवर झालेले आहेत असे त्यांनी दाखवून दिले होते. म्हणूनच, या घटकामध्ये आपण फेनन यांच्या वसाहतवादाच्या मनोचिकित्सेची चर्चा करणार आहोत. वसाहतवादाने वासाहतिक प्रजेमध्ये दुभंगलेपण आणि मानसिक गोंधळ कसा निर्माण केला आणि त्यासोबतच, त्यांच्या अस्मितेचा गुंता कसा वाढवला हेही त्यांनी दाखवून दिले आहे.
फ्रेंच वसाहतवादाने वसाहतींमध्ये फ्रेंचीकरणाची चळवळ राबवली. त्यातून स्थानिक लोकांच्या प्रथा, परंपरा, संस्कृती ही कशी मागास, कनिष्ठ आहे हे त्यांच्यावर बिंबवले. त्यातून स्थानिक लोकांमध्ये सांस्कृतिक तुटलेपणा निर्माण झाला. बरेच वासाहतिक लोक फ्रेंचीकरणाच्या प्रक्रियेमुळे स्वतःच्या समाजापासून तुटले तरीही फ्रेंच समाजाचा भाग होवू शकले नाहीत. हेही फेनन यांनी दाखवले आहे. वसाहतवादाने जगाची कप्पेबंद पध्दतीने मांडणी केली आहे. निर्वसाहतीकरण करायचे असेल तर वसाहतवादाचा मनीचियन तर्क नाकारावा लागेल. युरोपसाठी, आपल्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी नवीन माणूस घडवावा लागेल. त्यासाठी नवा मानवतावाद आणि आंतरराष्ट्रीयवादाची आवश्यकता असेल असे फेनन यांनी म्हटले आहे.
फ्रांत्ज फेनन – व्यक्तित्व आणि कार्य
उत्तरवासाहतिक समाजांमध्ये अलीकडच्या काळात जगभरात फेनन यांच्या कामाची दखल घेतली जात आहे. वंशवाद, वसाहतवाद, साम्राज्यवाद याचे कट्टर चिकित्सक म्हणूनही फ्रांत्ज फेनन ओळखले जात आहेत. फेनन यांचा जन्म २० जुलै १९२५ रोजी मार्टीनीक्यूमधील फोर्ट द फ्रांस या शहरात झाला. मार्टीनीक्यू हा फ्रेंच प्रजासत्ताकाचा पूर्व कॅरेबियन बेटांमधील एक प्रदेश होता. मार्टीनीक्यूच्या सर्व नागरिकांना फ्रेंच प्रजासत्ताकाचे नागरिकत्व होते. फेनन यांचे कुटुंब हे मध्यमवर्गीय कुटुंब होते. त्याकाळी, मार्टीनीक्यू मधील सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबे ही फ्रेंचांच्या संमिलीकरणाच्या धोरणांच्या अंमलबजावणी करत होती. फेनन यांचे शालेय शिक्षण हे फ्रेंच संमिलीकरणाच्या धोरणानुसारच झाले. मार्टीनीक्यूच्या शाळांमध्ये अशीच सरकारी पाठ्यपुस्तके होती की, ज्यामध्ये फ्रेंच साम्राज्य आणि फ्रेंचाची सत्ता याचे गौरवीकरण केलेले असायचे. फ्रेंच सरकारची शिक्षणव्यवस्था अशी होती की, ज्यामध्ये फ्रेंचकरणावर भर होता. फेनन यांना शाळेत फ्रेंच समाजाचा इतिहास हा त्यांचा इतिहास म्हणूनच शिकवले जात होते. तसेच, शाळेतील सजावटीही फ्रेंचमधील चित्रे लावली जात होती.
फेनन आणि त्यांचे सगळे भावंडे ही शाळेतच फ्रेंच राष्ट्रीय गाणे शिकली. फ्रेंच भाषा, संस्कृती, इतिहास, वर्तनव्यवहार हा सगळ्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. यातूनच मुलांमध्ये आफ्रिकन जीवनपद्धतीपेक्षा फ्रेंचजीवन पद्धती ही कशी चांगली हे शिकवले जात होते. शाळेतच नव्हे तर घरातही मुलांना ‘फ्रेंच’ बनवण्यावर अधिक भर दिला जात होता. फेनन यांना शाळेत नेहमी आठवण करून दिली जायची की, निगर लोकांसारखे वागू नका. या काळातच मार्टीनीयन लोक ही अमेरिकन काळ्याप्रमाणे स्वतःला आफ्रिकन काळ्या लोकांपेक्षा स्वतःला वेगळी समजत होती. तसेच, आफ्रिकन काळी लोक ही कशी रानटी आहेत. ते स्वतःचा विचारही कसा करत नाही असेच विचार अमेरिकन काळ्या आणि मार्टीनीयन लोकांचे होते. गोऱ्या लोकांमध्ये जसे आफ्रिकन काळ्या लोकांविषयी पूर्वग्रह होते तसेच पूर्वग्रह मार्टीनीयन लोकांमध्येही होते. फेनन आणि त्यांचे कुटुंब हेही अशा समाजाचा भाग होते. त्यामुळे ही सगळे संस्कार फेननवरही शालेयजीवनात होत होते. एक मध्यमवर्गीय म्हणून फेनन शालेयजीवनात मार्टीनीयन गरीब मुलांशी बोलत नसे आणि शिक्षित श्रीमंत मुलांशीच बोलत असे. फ्रेंच वसाहतवादी शिक्षणव्यवस्थेने मार्टीनीक्यू मधील मुलांना आपल्या पारंपारिक संस्कृतीपासून तोडून टाकले होते. त्यामुळेच, आफ्रिकन संस्कृतीचे अवमूल्यन करून फ्रेंच संस्कृतीचे गौरवीकरण करत फ्रेंच मूल्यव्यवस्था आणि संस्कृतीशी स्वतःला जोडून घेतले जात होते. आयुष्यात अनेकवर्षांनी फेनन यांनी म्हटले आहे की, मी गोरा माणूस आहे. अजाणतेपणे मी माझ्यातील ‘काळेपण’ नाकारत होतो आणि माझं सगळं असणंच अशाप्रकारचे होते. त्यावेळी, फ्रेंच वसाहतीमधील काळ्या लोकांना
हे माहिती नव्हते की, त्यांनी कितीही फ्रेंच युरोपियन शैली, वैचारिक पद्धती आत्मसात केल्या आणि कितीही मोठे यश मिळवले. तरीही, त्यांना गोऱ्या फ्रेंचांपेक्षा वेगळे असलेला ‘काळा’ म्हणूनच पाहिले जाईल. त्यांना फक्त डॉक्टर म्हणून ओळखले जाणार नाही तर
काळा डॉक्टर म्हणून ओळखले जाईल. फक्त विदयार्थी म्हणून ओळखले जाणार नाही तर काळा विदयार्थी म्हणून ओळखले जाईल. त्यांनी कितीही त्यांचा रंग विसरण्याचा प्रयत्न केला आणि फ्रेंच किंवा युरोपियन बनण्याचा प्रयत्न केला तरी युरोप त्यांचा रंग कधीही विसरत नाही.
१९३९ मध्ये दुसरे महायुध्द सुरु झाले. त्यावेळी, फ्रेंच साम्राज्याचा नागरिक म्हणून फेनन यांनी ‘फ्री फ्रेंच आर्मी’मध्ये भरती झाले आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला. १९४० मध्ये फ्रांसने महायुद्धात शरणागती स्वीकारली. त्यामुळे फेनन पुन्हा मार्टीनीक्यूला परतले. १९४० मध्ये फ्रांसच्या राजकारणात दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. जर्मन प्रभावामुळे पूर्वीचे प्रधानमंत्री पॉल रेनौड यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी मार्शल फिलीप पेटैन हे फ्रांसचे नवीन प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी सर्व कारभार विची या शहरातून चालवला म्हणूनच त्याला विची राजवट म्हटले जाते. १० जुलै १९४० ते ९ ऑगस्ट १९४४ असा या राजवटीचा कालखंड होता. या काळात फ्रांस मध्ये आणि फ्रेंच वसाहतींमध्ये अनेक बदल झाले. मार्टीनीक्यूमध्ये फ्रेंच गव्हर्नरने लष्करी हुकुमशाही स्थापन केली. तसेच, वंशवादी धोरणे राबवायला सुरुवात केली. गोऱ्या आणि काळ्या लोकांच्या एकत्रित येण्यावर बंधने आणली. लोकांची आर्थिक लुट केली. मार्टीनीक्यूच्या सगळ्याच स्त्रिया या वेश्या आहेत असे म्हणून अनेक स्त्रियांवर फ्रेंच सैन्याने बलात्कार केले. विची कालखंड हा बलात्कार, वंशवाद आणि दंगे यासाठी ओळखला जातो. पूर्वी, फ्रेंच साम्राज्याचा एक प्रदेश असलेला मार्टीनीक्यू बेट विची राजवटी एक वसाहत बनले. पूर्वी मार्टीनीक्यूचे लोक फ्रेंच नागरिकत्वाचे पूर्ण अधिकार उपभोगत होते परंतु याकाळात मार्टीनीक्यूचे काळे लोक दुय्यम नागरिक समजले जात होते. त्यांना वंशवादी अत्याचारांना सामोरे जावे लागत होते. या सगळ्या, काळात फेननचे
मार्टीनीक्यूमध्ये शालेय शिक्षण चालू होते. विची राजवट ही वंशवादी धोरणे राबवूनही फेननला संपूर्ण फ्रेंच लोक वंशवादी नाहीत असेच वाटत होते. म्हणूनच, विची राजवट ही फ्रेंच जरी असली तरी फेनन तीला जर्मनीशी जास्त जोडत होते.
१९४३ मध्ये फेनन आपल्या मित्रांसह मार्टीनीक्यू सोडून डोमिनिकन प्रजासत्ताक येथे गेले आणि तेथे त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले. पुढे काही काळासाठी फेनन
आपल्या मित्रांसोबत मोरोक्को आणि अल्जेरियामध्ये फ्रेंच लष्कराचे अधिकारी म्हणून काही काळ राहिले.
फ्रेंच लष्कराचा भाग म्हणून उत्तर आफ्रिकेत काम करतांना फेनन यांना अनेक अनुभव आले. त्याची, त्यांनी मार्टीनीक्यू मध्ये विदयार्थी असतांना कधीही कल्पना केली नव्हती. फेनन यांनी नेहमी स्वतःला फ्रेंच माणूस म्हणूनच पाहिले होते. उत्तर आफ्रिकेत मात्र त्यांना गोरे फ्रेंच लोक आपल्याला फ्रेंच माणूस म्हणून पाहत नाही याची जाणीव झाली. फ्रान्सच्या हितसंबंधासाठी लढणारे मार्टीनीक्यूचे काळे स्वतःला फ्रेंच समजणारे लोक हे वेगळे आहेत अशी वागवणूक त्यांना फ्रांसमधून आलेल्या गोऱ्या फ्रेंच अधिकारी आणि सैनिकांकडून मिळत होती. फेनन यांच्या हेही लक्षात आले की, अनेकवेळा काळ्यांच्या लष्करी तुकडीलाच नेहमी युद्धातील अत्यंत हलाखीच्या आणि अवघड ठिकाणी पाठवले जाते. मोरोक्को आणि अल्जेरियामध्ये फेनन यांच्या हेही लक्षात आले की, गोरे फ्रेंच हे अरब लोकांना कमी समजतात, अरब हे काळ्यांना कमी लेखतात आणि कॅरेबीअन काळे हे आफ्रिकन काळ्यांना आपल्याही पेक्षा तुच्छ समजतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वंशवाद आहेत. याची जाणीव उत्तरआफ्रिकेतील वास्तवात जाणवले होते. मात्र, तरीही त्यांनी फ्रेंच वंशवाद आणि अरब वंशवाद यांना एकाच मापात मोजलेले नाही. कारण, त्यांना मार्टीनीक्यू मधील काळ्या लोकांमध्ये आफ्रिकन काळ्या लोकांविषयी वंशवादी पूर्वग्रह आहेत याची जाणीव होती. म्हणूनच, त्यांनी अरब वंशवादाला फ्रेंच वसाहतवादी वंशवादाचे अपत्य मानले आहे. फ्रेंच लष्करासोबत काळे फ्रेंच सैनिकही फ्रांसला गेल्यावर. त्यांना कोठे ठेवावे यावर फ्रेंचांमध्ये बरीच चर्चा झालेली दिसते. ज्या काळ्या लोकांचे फ्रेंचीकरण जास्त झालेले आहे. त्यांना उत्तरेच्या थंड हवेच्या ठिकाणी ठेवण्यात आले. कारण, त्याठिकाणी गोरे फ्रेंच राहत होते आणि ज्यांचे फ्रेंचीकरण झालेले नाही. त्यांना दक्षिणेत उष्ण प्रदेशात ठेवण्यात आले. यामध्ये काळ्या फ्रेंच मंडळीमध्ये पर्यावरणीय भेद करण्यात आला होता आणि त्याला आधार म्हणून त्यांचे फ्रेंचीकरण पाहण्यात आले होते. फ्रान्सच्या वास्तवात फेनन यांना फ्रेंच लोकांच्या वंशवादाचा अनुभव जास्त आला. एका पार्टीमध्ये गोऱ्या फ्रेंच स्त्रीने काळ्या फ्रेंच अधिकाऱ्यासोबतच नाचायला नकार दिला आणि ती इटालियन पुरुषासोबत नाचत होती. इटालियन आणि जर्मन लोकांपासून फ्रेंच लोकांचे जीव वाचण्यासाठी काळ्या सैनिकांनी आपले स्वतःचे आयुष्य धोक्यात घातले होते. मात्र, तरीही गोरे फ्रेंच लोक काळ्यांना फ्रेंच मानत नव्हते. अशा गोष्टी फेनन यांनी फ्रांसमध्ये पाहिल्या आणि त्यामुळेच फेनन यांनी फ्रांस आणि फ्रेंच मूल्ये यांची निंदा करायला सुरुवात केली. दुसरे महायुद्ध संपल्यावर १९४६ मध्ये फेनन यांनी लष्करी नोकरी सोडली,
१९४६ मध्येच मार्टीनीक्यू मधून कॅमी केसैरे यांनी फ्रेंच पार्लमेंटच्या निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. फेनन यांनी केसैरे यांचा प्रचार केला. त्यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि निग्रोविषयक तत्वज्ञानाने फेनन यांना आकर्षित केले होते. निवडणुकीचा प्रचार संपल्यावर फेनन यांनी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नित्शे, कार्ल जास्पर, केकीगार्ड, हेगेल यांच्या कामांचा अभ्यास करायला सुरुवात केली. ज्या पॉल सार्त्र आणि केसैरे यांच्या साहित्यामध्ये फेनन यांना अधिक रस होता.
१९४७ मध्ये वडिलांच्या निधनानंतर फेनन यांनी मार्टीनीक्यू सोडले आणि
वैद्यकीय उच्च शिक्षण घेण्यासाठी पॅरीस गाठले. वैद्यकीय शिक्षण घेता असतांना ‘ ब्लॅक स्कीन, व्हाईट मास्क’ लेखसंग्रहातील लेख लिहायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यामध्ये वासाहतिक राजवटीमध्ये
काळ्या लोकांमध्ये तुटलेपणा, दुय्यमीकरण आणि शोषण कशाप्रकारे लादले जाते. याची चर्चा त्यांनी केली आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे
गोऱ्या लोकांचे वर्चस्व असलेल्या जगामध्ये काळ्या लोकांचे अस्तित्व कसे असते याची चर्चा वरील पुस्तकात आहे. हुशार विदयार्थी म्हणून फेनन वावरत असतांना त्यांनी विदयार्थी चळवळ, वादविवाद, चर्चा यांच्यामध्येही भरपूर सहभाग घेतला. याच काळात त्यांनी तीन नाटके ही लिहिले होती. ती अप्रकाशित असावी अशीच फेननची इच्छा होती असे त्यांच्या बायकोनंतर सांगितलेलं आहे. १९५१ मध्ये फेनन यांनी त्यांचा वैद्यकीय शोधप्रबंध सादर केला. याच वर्षी, प्राध्यापक फ्रांसकोइस टोस्क्यूलेस यांनी ‘सोसीओथेरपी’ मध्ये महत्वाचे प्रयोग करण्याचे ठरवले होते. फेनन यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्ष काम केले. या दोन वर्षात दोघांनी मिळून शोधनिबंध प्रकाशित केले. अल्जेरिया आणि ट्युनिशियामध्ये मानसोपचारमध्ये केलेल्या महत्वाच्या कामांवर प्राध्यापक फ्रांसकोइस टोस्क्यूलेस यांच्यासोबत केलेल्या कामाचा प्रभाव आहे.
फ्रांसमधील असतांना फेनन यांनी फ्रेंच डाव्या विचारवंतांचे लेखन वाचले आणि त्यांच्या सानिध्यात राहिले. मात्र, डाव्या फ्रेंच विचारवंतांच्या सहवासातही त्यांना अपमानला सामोरे जावे लागले होते. म्हणूनच, त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘काळा माणूस कधीही फ्रेंच राष्ट्राचा भाग बनू शकत नाही.’ फ्रांसमधील कम्युनिस्ट डावेही फ्रेंच दांभिकपणातून सुटलेले नव्हते. तसेच, काळे श्रीमंतही प्रत्येकवेळी आपण जास्तीत जास्त फ्रेंच कसे दिसू असाच वावर करत होते. फ्रांसमध्ये फेनन यांना जाणवले की, आपल्याला माणूस म्हणून न पाहता काळा माणूस म्हणून पाहिले जाते. माणसाने माणसाचे वंशावादमाध्यमातून केलेले शोषण आणि अमानवीकरणम फेनन यांना मान्य नव्हते. फ्रांस आणि युरोप जगाला जे तत्व शिकवतात तेच तत्व मात्र पाळत नाहीत म्हणून फेनन यांचा मोठा भ्रमनिरास झाला होता. त्यामुळे, त्यांनी फ्रांस सोडला आणि आपली मूळ शोधण्यासाठी नव्या जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली.
१९५३ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्वाची परीक्षा पास झाल्यामुळे फेनन यांना त्यांच्या मार्टीनीक्यूमध्ये वैद्यकीय दवाखान्याचे संचालकपद मिळत होते. परंतु त्यांनी अल्जेरियामध्ये नोकरी मिळवली. त्यांनी मार्टीनीक्यू सोडून अल्जेरियामध्ये का नोकरी केली याविषयी अनेक चर्चा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने असे म्हटले जाते की, फेनन यांना आपल्या आफ्रिकन मूळाचा शोध घ्यायचा होता. त्यासंदर्भात त्यांना संशोधन करायचे होते. खरतर त्यांना सेनेगल येथे नोकरी करायची होती. कारण शालेयजीवनापासून त्यांनी सेनेगलमधील काळ्या लोकांविषयी ऐकले होते. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही आणि याच काळात आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये स्वातंत्र्यासाठीच्या लढाया चालू होत्या. फेनन यांना या सगळ्यांचा भाग व्हायचे होते आणि म्हणूनच त्यांनी मार्टीनीक्यू मध्ये न जाता अल्जेरियामध्ये वास्तव्य स्वीकारले. याच काळात अल्जेरियामध्ये क्रांतिकारी चळवळ सुरु झाली होती. वसाहवादी फ्रेंच राजवटीच्या विरुद्ध हिंसक हल्ले अल्जेरियन क्रांतिकारी करत होते. फ्रंट फॉर नॅशनल लिबरेशन या संघटनेचे फेनन सदस्य झाले. फ्रेंच सरकारच्या दवाखान्यात काम करत असल्यामुळे दिवसा फेनन जखमी फ्रेंच सैनिकांना उपचार देत होते आणि क्रांतिकारी चळवळीशी बांधीलकी असल्यामुळे रात्री क्रांतीकारी लोकांची वैद्यकीय सेवा करत होते. १९५६ मध्ये त्यांना असे दुहेरी जीवन जगणे अत्यंत अशक्य झाले आणि कारण त्यांच्या सर्व बाजूला हिंसाच हिंसा होती आणि त्यांना परिणामकारकरित्या काम करणे अशक्य बनत चालले होते.
वैद्यकीय सेवा देत असतांना फेनन यांना हे कळून आले की, आर्थिक शोषण, राजकीय हिंसा, वंशवाद, अत्याचार, हिंसा आणि अमानवी अधोगती यामुळेच लोकांना अनेक मानसिक आजार उद्भवत आहेत. लोकांच्या सामाजिक स्थितीमुळे मानसिक आजार उद्भवत आहेत म्हणून त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा तशाच वातावरणात परिस्थिती बदलत नाही. म्हणूनच, लोकांना बदलण्यापेक्षा अल्जेरियामधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बदलणे अधिक महत्वाचे आहे. १९५७ मध्ये फ्रंट फॉर नॅशनल लिबरेशनच्या समर्थनात डॉक्टरांनी संप केल्यामुळे फ्रेंच राजवटीने फेनन यांना अल्जेरियामधून हद्दपार केले. काहीकाळ, फ्रांसमध्ये कुटुंबासोबत राहिल्यावर फेनन पुन्हा आफ्रिकेत आले. यावेळी त्यांनी अल्जेरियन स्वातंत्र्यासाठी
ट्युनिशियामध्ये राहून क्रांतिकारी कार्य करायला सुरुवात केली. अल मुदजाहिद या अल्जेरियन क्रांतिकारी चळवळीच्या मुखपत्राचे संपादक मंडळात त्यांनी काम केले. आफ्रिकन ऐक्य आणि काळ्यांचे ऐक्य यावर त्यांनी बरेच लिखाण केले. क्रांतिकारी चळवळीत काम करत असतांनाच ट्युनिस विद्यापीठात शिकवले आणि सरकारी दवाखान्यात मानसोपचाराची सेवा दिली. १९५८ मध्ये भरलेल्या ‘ अखिल आफ्रिकन लोकांची परिषदे’मध्ये फेनन हे फ्रंट फॉर नॅशनल लिबरेशनच्या वतीने अल्जेरीयाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले, या परिषदेमध्ये फेनन यांची क्वामे एनक्रुम्हा, पॅट्रिस लुमुम्बा, फेलिक्स मौमे यांच्या सारख्या आफ्रिकन स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या क्रांतिकारी विचारवंतांशी भेट झाली. याच परिषदेमध्ये फेनन यांनी निर्वासाहतीकरणासाठी हिंसेची आवश्यकता यावर भाष्य केले.
१९५९ मध्ये फेनन यांनी रोममध्ये भरलेल्या काळ्या लेखकांची दुसऱ्या परिषदेमध्ये सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीयवादाविषयी मांडणी केली. जानेवारी १९६० मध्ये अल्जेरियन प्रतिनिधी म्हणून त्यांनी ट्युनिस येथे भरलेल्या आफ्रिकन लोकांच्या दुसऱ्या परिषदेमध्ये सहभाग घेतला. फेनन यांच्याकडे याकाळात अरब उत्तर आफ्रिका आणि सहारा वाळवंट प्रदेशातील काळ्या लोकांची आफ्रिका यांच्यामधील दुवा म्हणून पाहिले जात होते. मार्च १९६० मध्ये अल्जेरियाच्या हंगामी सरकारने फेनन यांची आक्रा येथे राजदूत म्हणून नेमणूक केली. याकाळात, फेनन यांनी अनेक परिषदांमध्ये सहभाग घेतला- उदा. आफ्रिकेमधील शांतता आणि सुरक्षेवरील आंतराष्ट्रीय परिषद, ग्युयाना मधील आफ्रो- आशियाई मैत्री परिषद, आदीस अबाबा येथील नव्याने स्वतंत्र झालेल्या आफ्रिकी राष्ट्रांची परिषद. आक्रा येथे राजदूत म्हणून काम करत असतांना आफ्रिकेतील राष्ट्रीय मुक्ती लढ्यांना पाठींबा देण्यासाठी फेनन कार्य करत होते. १९६१ मध्ये फेनन यांची नेमणूक झाली. आक्रा (घाना) सोडून फेनन क्युबामध्ये का गेले याविषयी बरीच चर्चा आहे. काहींना वाटते की, त्यांना पुन्हा मार्टीनीक्युला जायचे होते. काहींना वाटते त्यांना क्युबन मॉडेलचा अभ्यास करायचा होता. तर काहींना वाटते की, घानामधील सरकार आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीच्या हातातील बाहुले बनले होते. तसेच, घानामधील लोकशाहीचा अवकाश संकुचित करून एकाधिकारशाही राबवली जात होती हे फेनन यांना पाहवले नाही म्हणूनच त्यांनी आक्रा सोडले आणि क्युबाला गेले.
फेनन यांना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यामध्ये फ्रेंच सरकारचा सहभाग होता असेही दिसून येते. परंतु, फेनन यांचे शत्रू त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. १९६० च्या शेवटी फेनन ल्युकेमियाने ग्रस्त होते. सुरुवातीला त्यांनी सोव्हीएत रशियामध्ये जाऊन त्यांनी उपचार घेतले परंतु त्यांचा आजार पूर्ण बरा होऊ शकला नाही. म्हणून अमेरिकेत जाऊन उपचार घेत असतांना त्यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९६१ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अल मुदजाहिद मध्ये लिहिलेल्या लेखांना एकत्रित करून ‘ टूवर्डस आफ्रिकन रीव्होल्युशन’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. तसेच, त्यांनी आधीच लिहून ठेवलेला द व्रेच्ड ऑफ द अर्थ’ हा ग्रंथही प्रकाशित केला गेला. फेनन यांनी वसाहवादाची जी गंभीर मानसशास्त्रीय चिकित्सा केली आहे. ती आपणास त्यांच्या ब्लॅक स्कीन, व्हाईट मास्क’ आणि ‘द व्रेच्ड ऑफ द अर्थ’ या दोन्ही ग्रंथांमध्ये वाचायला मिळते.
फेननकृत वसाहतवादाची मानसशास्त्रीय चिकित्सा
उत्तरवासाहतिक समाजांमध्ये वसाहतवादाची विविध पद्धतीने चिकित्सा झाली आहे. त्यामध्ये आपण वसाहतवादाची आर्थिक चिकित्सा, राजकीय चिकित्सा आणि ज्ञानशास्त्रीय चिकित्साचे यांचा सहभाग करू शकतो. अलीकडच्या काळात, निर्वासाहतीकरणाच्या प्रक्रियेत मनाचे निर्वासाहतीकरण कसे करायचे या प्रश्नाची चर्चा केली जाते. त्यामुळेच, वसाहतवादाचे मानसिक परिणाम काय झाले होते? वासाहतिक समाजातील व्यक्तींच्या विचारपद्धतीवर आणि वर्तनव्यवहारावर वासाहतिक सत्तेचा कसा आणि काय परिणाम झाला याचीही चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. वसाहतवादाची मानसशास्त्रीय चिकित्सा करण्याची सुरुवात फेनन यांनी सर्वात आधी पद्धतशीरपणे केली. वासाहतिक अल्जेरियामध्ये मानसोपचारतज्ञ म्हणून काम करत असतांना फेनन यांना अनुभवले की, अल्जेरियन जनतेचे अनेक मानसिक आजार हे वासाहतिक सत्तेच्या मूळाशी होते. किंबहुना, वासाहतिक राजवटीमुळेच अनेक मानसशास्त्रीय समस्या अल्जेरियामध्ये उद्भवल्या होत्या.
ब्लॅक स्कीन, व्हाईट मास्क
फेनन यांनी त्यांच्या ‘ब्लॅक स्कीन, व्हाईट मास्क’ या पुस्तकामध्ये कॅरेबिअन बेटांवर काळ्या लोकांना फ्रेंच वसाहवादाने कसे घडवले याची चर्चा केली आहे. फ्रेंच वसाहवादामुळे या बेटांवरील काळ्या लोकांची स्वविषयी कल्पना कशी विकसित झाली. त्या कल्पनेचा काळ्या लोकांवर एकूण काय परिणाम झाला याचीही चर्चा फेनन यांनी केली आहे. फ्रेंच वसाहवादाने कॅरेबिअन बेटांमधील काळ्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विश्व बिघडवून टाकले आणि त्यामुळेच त्या समाजामध्ये काळ्या अस्मितेचे पेच निर्माण झाले आणि अस्मितेचा संघर्ष निर्माण झाला. म्हणूनच, फेनन यांनी
‘काळ्या चेहऱ्यावरील गोरा मुखवटा’ हे रूपक पुस्तकाच्या शीर्षकात वारले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत फेनन यांनी म्हटले आहे की, “ हे पुस्तक हे वैद्यकीय अभ्यासावर आधारित आहे आणि माझा स्वतःचा जन्म हा कॅरेबिअन बेटांवर झालेला असल्यामुळे या पुस्तकातील निरीक्षणे आणि निष्कर्ष हे कॅरेबिअन काळ्यांविषयीच आहेत. कॅरेबिअन काळे आणि आफ्रिकन काळे यांना कोणत्या गोष्टी वेगळ्या करतात त्या भेदांचे विश्लेषण करणारे एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येवू शकते.” याचाच अर्थ असा की, फेनन यांनी या पुस्तकामध्ये फ्रेंच वसाहवादाने कॅरेबिअन काळ्यांवर काय परिणाम केला याविषयी चर्चा केली आहे. त्याच काळात, आफ्रिकेतही फ्रेंचांच्या काही वसाहती होत्या. त्याचा मात्र या पुस्तकामध्ये याचा सहभाग नाही.
मार्टीनीक्यूमध्ये काळ्यांच्या लहान मुलांना ‘फ्रेंच’ कसे बनवले जाते. याची त्यांनी चर्चा केली आहे. तसेच, स्थानिक भाषा बोलण्यापेक्षा फ्रेंच भाषा मुलांना बोलावी यासाठी त्यांच्या कुटुंबांमध्ये संस्कार कसे होतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे. काळ्या लोकांना कोणतीही संस्कृती, सभ्यता आणि इतिहास नाही असेही फ्रेंच वसाहतवादाने लोकांवर लादलेले असल्यामुळे मार्टीनीक्यूमधील लोक फ्रेंच संस्कृती, सभ्यता, इतिहास आणि भाषा आत्मसात करतात. फ्रेंच चालीरीती, शैली, सवयी आत्मसात करतात. या सगळ्यांमुळे काळ्या लोकांमध्ये अनेक मानसशास्त्रीय समस्या निर्माण होतात असे फेनन यांनी दाखवून दिले आहे.
काळ्या आणि गोऱ्या लोकांविषयी भाष्य करतांना फेनन असे म्हणतात की, काळे लोक ‘काळेपणा’च्या आणि गोरे लोक ‘गोरेपणा’च्या साच्यात अडकून पडले आहेत आणि त्याचा आधार पूर्वग्रह हाच आहे.
फ्रेंच वसाहवादाने काळे लोक रानटी, असंस्कृत असतात असेच शिक्षणाच्या माध्यमातून लोकांवर बिंबवले आहे. तसेच, फ्रेंच शाळांमध्ये आणि लष्करामध्ये काळ्या लोकांना ‘निग्गर’ म्हणून हिणवले जात होते. त्यामुळेच, आपण निगर नाहीत, आपण वेगळे आहोत अशी भावना काळ्या लोकांना मध्ये उत्पन्न केली गेली. त्याचा परिणाम काळ्या लोकांचे ‘व्यक्तित्व’ घडण्यावर झाला. मार्टीनीक्यूमधील काळे लोकांच्या दोन प्रकारचे व्यवहार असायचे. एक म्हणजे काळा माणूस काळ्या माणसांसोबतचे वर्तन आणि दुसरा म्हणजे तो गोऱ्या माणसांसोबतचे वर्तन. काळामाणूस हा गोऱ्या माणसांसोबत वेगळा वागतो आणि काळयासोबत वेगळा वागतो. मार्टीनीक्यूच्या काळ्या व्यक्तींचे हे स्वविभाजन हे वसाहतवादी वर्चस्वाचे प्रत्यक्ष परिणाम आहे असे फेनन यांनी म्हटले आहे. फ्रेंच जगामध्ये काळ्या लोकांविषयी कशा साचेबद्ध कल्पना असतात आणि त्यांचा आधार हा वंशवादी पूर्वग्रह कसे असतात याची अनेक उदाहरणे फेनन यांनी दिली आहे. वसाहतवादाचा प्रभावामुळे मार्टीनीक्यूमधील काळ्यांना फ्रेंच बनायचे आहे आणि फ्रेंच भाषा ही त्यांचे फ्रेंचीकरण करते. म्हणूनच, फेनन यांनी फ्रेंच भाषेला ‘सांस्कृतिक अवजार’ म्हटले आहे. काळे लोक फ्रेंच भाषा शिकून फ्रेंच जरी बनत असले तरी गोऱ्या फ्रेंचांच्या दृष्टीने ते अस्सल फ्रेंच नसून दुय्यम फ्रेंच होते.
फ्रेंच बनलेल्या काळ्या स्त्रिया आणि काळे पुरुष अनेक समस्यांनी ग्रस्त होते असेही फेनन यांनी या पुस्तकात दाखवून दिले आहे. प्रामुख्याने फ्रांस मध्ये गेलेल्या काळ्या स्त्रियांची स्वप्नसृष्टी कशी आकारास येत होती. तसेच, त्या काळ्या स्त्रिया स्वतःला फ्रेंच कशा समजत होत्या हेही फेनन दाखवतात. फ्रेंचीकरण झाल्यामुळेच मार्टीनीक्यूमधील काळ्या स्त्रियांना काळ्या पुरुषांची लग्ने करू वाटत नव्हती. त्यांना फ्रेंच पुरुष आवडत होते मात्र, फ्रेंच पुरुषांच्या दृष्टीने या काळ्या स्त्रिया फ्रेंच नव्हत्या. काळ्या स्त्रियांप्रमाणेच, फ्रेंचीकरण झालेल्या काळ्या पुरुषांचीही स्थिती होती. फ्रेंच संस्कृती, भाषा आत्मसात करूनही काळ्या स्त्री-पुरुषांना वेगवेगळ्या व्यवस्थात्मक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळेच, आत्मकल्पनेच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आणि याच्या मूळाशी फ्रेंच वसाहतवाद होता. फ्रेंच वसाहतवादामुळे काळ्यांमध्ये अनेक मनोविकृती आणि मानसिक आजार निर्माण झाले असेही फेनन यांनी दाखवून दिले. फ्रेंच वसाहतवादी वंशवादामुळे काळ्या लोकांमध्ये तुटलेपणा (परात्मभाव) निर्माण झाला. फ्रेंच भाषा, साहित्य, संस्कृती आत्मसात करूनही फ्रेंच गोऱ्या मंडळींप्रमाणे आपण बनत नाही. म्हणून, काळ्या लोकांमध्ये न्यूनगंडही निर्माण झाले. निग्रो आणि मनोविकार (psychopathology) या लेखामध्ये फेनन यांनी काही पेशंटच्या उदाहरणावरून दाखवून दिले की, फ्रेंच वसाहतवादी राजवटीने निर्माण केलेल्या मूल्यव्यवस्थेने आणि संस्कृतीने काळ्यांवर एक मानसिक हिंसा लादली आणि त्यातून मनोविकृत्ती निर्माण झाल्या.
द व्रेच्ड ऑफ द अर्थ
निर्वसाहतीकरणाविषयी या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भाष्य करतांना फेनन म्हटले आहे की, वसाहतवादी (colonist) आणि वासाहतिक (colonized) हे जुने ओळखीचे आहेत. वसाहतवादी ज्यावेळी म्हणतात की, आम्ही त्यांना ( वासाहतिक) ओळखतो. याचाच अर्थ असा की वसाहतवाद्यांनी वासाहतिक जनतेला बनावटी गोष्टी उभारून फसवले आणि अजूनही फसवत आहेत. त्यामुळेच निर्वासाहतीकरण म्हणजे नवा माणूस निर्मितीची कृती आहे. म्हणूनच, निर्वासाहतीकरणाने आवर्जून वसाहतवादाच्या विरोधात मोठे आव्हान निर्माण केले पाहिजे. वासाहतिक जग कप्पेबंद आहे आणि ते दोन जगात विभागले आहे. पहिले म्हणजे वसाहतींमध्ये शोषक सत्तेचे आणि वसाहतवादींचे प्रवक्ते, सरकारी अधिकारी म्हणून
पोलीस अधिकारी आणि सैनिक असतात आणि दुसरे म्हणजे भांडवली समाजांमध्ये शिक्षण (इहवादी, धार्मिक), कुटुंबामधील वडिलांकडून मुलाला होणारे नैतिक उपदेश, जैसे थे वादी स्थितीची आदर शिकवणारी सौंदर्यदृष्टी यातून आज्ञाधारकपणा रुजवला जातो आणि हीच मंडळी मग कायदा आणि सुव्यवस्थेचे वाहक बनतात. या पद्धतीने वासाहतिक जग बनते. त्यामुळेच, कोणालाही अन्याय काहीही वाटत नाही. या विभागलेल्या जगा दोन वेगवेगळ्या वंशांनी बनलेलं आहे. आर्थिक स्थिती ही वंशानुसार वेगवेगळी दिसते आणि म्हणूनच फेनन म्हणतात की, वसाहतींमध्ये आर्थिक संरचना ही मार्क्सवादाप्रमाणे पायाचा भाग नसून इमाल्याचा भाग आहे. कारण, वसाहतींमध्ये तुम्ही गोरे आहात म्हणून श्रीमंत आहात आणि श्रीमंत आहात कारण तुम्ही गोरे आहात अशी स्थिती दिसते. त्यामुळेच, फेनन म्हणतात की, वसाहतवादाचा मुद्दा येतो त्यावेळी मार्क्सवादाचे प्रतिपादन काहीसे ताणले पाहिजे. संकुचित अर्थाने ते घेवू नये.
वसाहतवादी जग हे हिंसेच्या आधारे सत्ता टिकवते. सत्ता दृढ करण्याच्या प्रक्रीयेमध्ये स्थानिक सामाजिक समतोल वसाहतवाद्यांनी संपवून टाकला आहे. वासाहतिक देशाची अर्थव्यवस्था, जीवनशैली, पेहराव पद्धती नष्ट केली आहे. वसाहतवादी सत्तेने वासाहतिक प्रजेच्या घरात आणि मनात हिंसा बसवते. त्यामुळेच, वासाहतिक जगाला विस्थापित करणे आवश्यक बनते. मात्र, वासाहतिक जगाला विस्थापित करणे म्हणजे नुसत्या सीमा नष्ट करणे नव्हे तर वासाहतिक जग ज्यावर आधारित आहे. ती व्यवस्थाच नष्ट करणे आणि त्यासाठी हिंसेचा वापर करायची आवश्यकता निर्माण झाली तर तेही केले पाहिजे असे फेनन म्हणतात.
निर्वासाहतीकरणाची चळवळ ही फक्त अहिंसेच्या मार्गाने होवू शकत नाही. कारण, वासाहतिक सत्ता ही हिंसेवर अवलंबून आहे. हिंसेचा सातत्याने आणि नियमित वापर करूनच वासाहतिक सत्ता टिकली आहे. त्यामुळेच, वासाहतिक हिंसेला विरोध म्हणून हिंसेचाच आधार घ्यावा लागेल असे फेनन म्हणतात.
‘वासाहतिक युध्दे आणि मानसिक आजार’ या प्रकरणामध्ये फेनन दाखवून दिले आहे की, अल्जेरियामध्ये जे अनेक मानसिक आजार आणि मनोविकृती निर्माण झाल्या आहेत. त्या थेटपणे वसाहतवादी युद्धांचा परिणाम आहेत. तरीही, फ्रेंच मानसोपचारतज्ञ हे लोकांनी
वासाहतिक सामाजिक वातावरणाशी जुळवून घ्यावे असेच आपल्या अभ्यासातून सांगत आहेत असे फेनन यांनी म्हटले आहे. वास्तवात अल्जेरियन लोकांच्या मनोविकृतींचे मूळ हे सामाजिक, राजकीय रचनांमध्ये आहे आणि म्हणून वसाहतवादी व्यवस्था नष्ट केली पाहिजे अशी फेनन यांची भूमिका होती.
वसाहतवादी सत्ता ही नेमकी वासाहतिक प्रजेला ‘मी वास्तवात नक्की कोण आहे?’ असाच प्रश्न त्यांनी विचारा अशी स्थिती निर्माण करत आहे असे फेनन म्हणतात. कारण, वसाहतवादी फ्रेंच सत्तेने अल्जेरियन लोकांची बंडखोरी आणि विद्रोही स्वभाव आपल्या सत्तेच्या बळाने नियंत्रणखाली आणला. सशस्त्र लढा देवूनही वसाहतवादाला कोणतेही कोणतेही आव्हान उभे करता येत नाही याची वासाहतिक लोकांना जाणीव झाल्यामुळे अनेकांना मनोविकृतींनी ग्रासले असे फेनन यांनी म्हटले आहे. फेनन यांनी काळ्या आणि गोऱ्या पार्श्वभूमीच्या अनेक मनोविकृती असलेल्या रुग्णांचा अभ्यास करून फ्रेंच वासाहतिक युध्दामुळे विविध प्रकारचे मानसिक आजार काळ्या आणि गोऱ्या लोकांना झाले. लैंगिक निरुत्साह, झोप न लागणे, चीड चीड होणे, संताप आणि राग नियंत्रणात न राहणे असे अनेक मानसिक आजार होत होते आणि त्याचे
मानसिक – शारीरिक परिणामही दिसत होते.
फ्रेंच वसाहतवादाने अल्जेरियन लोक हे जन्मत: गुन्हेगार असतात असेच बिंबवले. वकील, पत्रकार, पोलीस, न्यायाधीश आणि वैद्यकीय परीक्षक असे सगळेच लोक फ्रेंच वसाहतवादाचे वाहक होते. हे सगळे लोकही अल्जेरियन लोकांच्या गुन्हेगारीचा विचार करतांना वासाहतिक पूर्वग्रह बाळगत होते. या वासाहतिक पूर्वग्रहाला वैज्ञानिक आधार पुरावे निर्माण करण्याचेही काम वसाहतवादी सत्ता करत होती.
विद्यापीठांमध्ये हाच पूर्वग्रह सिद्धांत म्हणून अनेक वर्ष शिकवला जात होता. अल्जेरियन वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी हेच शिक्षण घेत असल्यामुळे त्यांनी वसाहतवादी पूर्वग्रहांना संमती देतात. सोबतच, अल्जेरीयन हे जन्मत: आळशी, खोटारडे, चोर आणि गुन्हेगार आहे या पूर्वग्रहांना ही ते संमती देतात. पुस्तकाच्या समारोपीय प्रकरणात फेनन म्हणतात की, आता आपण बदलाची बाजू घेतली पाहिजे. म्हणूनच, युरोपचे अनुकरण करणे थांबवले पाहिजे. जगाच्या वेगवेगळ्या रस्त्यावर आणि भागामध्ये जनसंहार करणाऱ्या युरोपला आपण सोडले पाहिजे. युरोपने लोकांना गुलाम करणारी प्रगती केली आहे. म्हणूनच, आपण आपली बुध्दी आणि शक्ती नवीन दिशेने जाण्यासाठी वापरली पाहिजे. युरोपसाठी, आपल्यासाठी आणि मानवतेसाठी आपण नवीन सुरुवात केलीच पाहिजे आणि नवीन विचार करून नवीन माणूस निर्माण केला पाहिजे.
वसाहतवादी मनीचियन जग
वसाहतवादी जग हे मनीचियन जग आहे हा मुद्दा फेनन यांनी ‘ब्लॅक स्कीन, व्हाईट मास्क’ आणि ‘द व्रेच्ड ऑफ द अर्थ’ या दोन्ही पुस्तकांमध्ये आग्रहाने मांडला आहे. म्हणूनच, मनीचियनीझम हा संकल्पना फेनन यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहे असेही म्हटले जाते. मनीचियनीझम ही संकल्पना इ. स. तिसऱ्या शतकात पर्शियामध्ये
मनीने स्थापन केलेल्या धर्मातून आलेली आहे. काहींच्या मते मनी याने स्थापन केलेला धर्म ख्रिस्ती धर्मातीलच एक वेगळा विचार करणारा पंथ आहे. काहींच्या मते, त्याला स्वतंत्र वेगळा धर्म म्हणता येईल. मनीने वेगवेगळया धर्मातील तत्वे एकत्रित करून स्वतःचा एक स्वतंत्र विचार विकसित केला होता. ज्यामध्ये, जग हे द्वैती आहे. चांगलं आणि वाईट हे प्रतीकात्मक पद्धतीने उजेड (light) आणि अंधार यापद्धतीने सादर केले जाते. म्हणजेच, उजेड म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि अंधार ही वाईट गोष्ट आहे असे मनीचियनीझम मानतो. तसेच, मनी संपूर्ण जग हे उजेड आणि अंधार या दोन्हीमध्ये विभागलेले आहे. उजेड हा सत्य, सुंदर, स्वच्छ, आरोग्यदायी आणि समृध्द असतो. याउलट, अंधार हा खोटा, कुरूप, घाण, कुपोषित असतो असे मनीचे विचारदर्शन मानते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, मनीचियनीझम जगाची कप्पेबंद विभागणी करून टाकते. ज्यामुळे दोन्ही गोष्टी कशीही एकत्र येवू शकत नाही. दोन्ही गोष्टी एकमेकांच्या पूर्णपणे विरोधी आहेत.
फेनन यांचा इतिहास आणि तत्वज्ञान याचाही व्यासंग होता. त्यामुळेच, त्यांना फ्रेंच वसाहतवादाचा अभ्यास करतांना हे जाणवले की, वसाहवादी राजवट ही मनीचियनीझम राजवट आहे. वसाहवादी राजवट ज्यापद्धतीने राज्य करते. त्यामध्ये मनीचियन तर्क होता. कारण, फ्रेंच वसाहतवादी समाजातही गोरे लोक हे चांगले, सुसंस्कृत, बुद्धीवान, देखणे आहेत आणि काळे लोक वाईट, रानटी, कुरूप आहेत असेच समजले जात होते. त्यामुळेच, अनेकवेळा मार्टीनीक्यूमधील आणि अल्जेरियामधील काळे लोक हे माणूस नसून पशू आहेत असेही फ्रेंच वसाहतवादी म्हणत होते. या मनीचियन तर्काचा मोठा प्रभाव जनतेवर वसाहतवादी सत्तेने पाडला होता. त्यामुळेच, काळे लोकही काळ्या लोकांच्या म्हणून ठरवलेल्या गोष्टी नाकारतांना दिसतात आणि फ्रेंच बनू पाहतात. काळ्यांनी फ्रेंच आणि गोरे बनण्याचा कितीही प्रयत्न केला तरी फ्रेंच गोऱ्या लोकांसाठी काळे हे काळेच राहत होते.
मनीचियनीझम जशी जगाची कप्पेबंद विभागणी केली होती तशीच कप्पेबंद विभागणी वसाहतवादी राजवटीनेही समाजाची केली होती. त्यामुळेच, सामाजिक घुसळण घडत नव्हती. तसेच, काळे आणि गोरे दोघेही साचेबद्ध प्रतिमांमध्ये अडकले होते. त्यातून अनेक मानसशास्त्रीय समस्या उद्भवल्या होत्या. काळेपणाची आणि गोरेपणाची चौकट फ्रेंच वसाहवादी राजवटीने मनीचियन तर्काच्या साह्याने बळकट आणि दृढ केली होती. त्यामुळेच, द्वैती विचारांच्या चौकटीच्या पलीकडे विचार केला पाहिजे असे फेनन यांना वाटते. त्यांनी फ्रेंच वसाहतवाद आणि युरोपियन साम्राज्यवाद या दोन्हींची मोठी चिकित्सा केली परंतु त्याला पर्याय म्हणून ते फक्त राष्ट्रीय चौकटीत अडकले नाहीत. त्यांनी आंतरराष्ट्रीयवाद आणि नवीन मानवतावाद हाच आपली आणि युरोपची यातून सुटका करेल अशी अपेक्षा बाळगली होती.
सारांश
फेनन यांचा जन्म हा फ्रेंच वसाहत मार्टीनीक्यू येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण फ्रेंच शाळांमध्ये झाले. त्याकाळी, शाळा आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये फ्रेंच संस्कृती, मूल्ये, भाषा, इतिहास शिकवण्यावर भर दिला जात असे. दुसरे महायुद्ध सुरु झाल्यामुळे काहीवेळ फेनन हे युद्धात सहभागी झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रांसमध्ये विची राजवट स्थापन झाली. त्या राजवटीच्या काळात फ्रेंच वसाहतीमध्ये वंशवादी धोरणे राबवली गेली. शोषण, बलात्कार आणि दंगे हे विची राजवटीचे वैशिष्ट्ये बनले होते. युदधावरून परत आल्यावर फेनन काही काळातच
मार्टीनीक्यू सोडून आफ्रिकेत फ्रेंच लष्करी सैनिक म्हणून गेला. आफ्रिकेत फेनन यांना जाणवले की, आपण स्वतःला फ्रेंच समजतो मात्र फ्रेंच गोरे अधिकारी हे आपल्याला फ्रेंच समजत नाही. मोरोक्को आणि अल्जेरिया येथे त्याने बरेच अनुभव घेतले. फ्रेंच अधिकारी सगळ्यांना कनिष्ठ समजतात. अरब लोक काळ्यांना कनिष्ठ समजतात आणि कॅरेबियन काळे लोक हे अफ्रीकन काळ्यांना कनिष्ठ समाजात हे फेनन यांनी आफ्रिकेत पाहिले. वसाहतवाद आणि वंशवाद हा एकमेकांना कसा घडवतो हेही त्यांना दिसले. काळया सैनिकांचे फ्रांसमध्ये फ्रेंच अधिकाऱ्यानी
भाषेच्या आधारावर भौगोलिक विभाजन केले होते. ज्यांना फ्रेंच येते त्यांना उत्तर फ्रांसच्या थंड ठिकाणी ठेवले आणि ज्यांना येत नाही त्यांना दक्षिणेत उष्ण प्रदेशात ठेवले होते.
लष्कर सोडल्यावर फेनन यांनी फ्रांसमध्ये जावून वैद्यकीय शिक्षण घेतले, त्याच काळात त्यांनी त्यांचा प्रसिध्द ग्रंथ ब्लॅक स्कीन, व्हाईट मास्क लिहिला. त्यामध्ये त्यांनी काळ्या लोकांच्या अस्मितेच्या प्रश्नाची अनेक बाजूंनी चर्चा केली आहे. फ्रेंच लोकांचे अनुकरण केल्यामुळे काळ्या लोकांचे प्रश्न कसे बिकट बनले आहेत याची चर्चा त्यांनी त्यात केली. आहे. द व्रेच्ड ऑफ द अर्थ हा त्यांचा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला आहे. हा ग्रंथात त्यांनी अल्जेरीयात मानसोपचारतज्ञ आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून जे काम केले. त्यातील अनुभवांवर आधारित आहे. वसाहतवादी जग हे हिंसेवर चालते. त्यामुळे निर्वासाहतीकरणाच्या चळवळीतही हिंसेचा वापर करणे अपरिहार्य बनते असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, वसाहतवादाने मानसिक हिंसाचार केलेला आहे आणि त्यामुळेच अनेक मानिसक आजार हे अल्जेरियामध्ये निर्माण झालेले आहेत असेही त्यांनी अभ्यासाच्या आधारे दाखवून दिले आहे.
वसाहतवादी जग हे, मनीचियन तर्कानुसार चालते असेही त्यांनी म्हटलेले आहे. कारण, मनीचयन तत्वज्ञानात जसे जगाचे दोन कप्पे आहेत तसेच वसाहवादानेही जगाची विभागणी दोन कप्प्यात केली आहे. एक गोऱ्यांचा आणि एक काळ्यांचा. मनीचियन तर्कानुसार उजेड हा सत्य, सुंदर, स्वच्छ, आरोग्यदायी आणि समृध्द असतो. याउलट, अंधार हा खोटा, कुरूप, घाण, कुपोषित असतो म्हणजेच गोरे हे उच्च आणि काळे हे कनिष्ठ आहेत. वसाहतवादाची चिकित्सा करतांना फेनन हे द्वैती चौकटीत अडकत नाहीत कारण द्वैती चौकट ही मनीचियन तर्काचा भाग आहे. म्हणूनच, निर्वासाहतीकरणाची चळवळ संकुचित राष्ट्रावादात न अडकता मानवतावादी आणि आंतरराष्ट्रीयतावादी झाली पाहिजे अशी फेनन यांची भूमिका होती.
संदर्भसूची
१. Frantz Fanon, Black
Skin White Masks, Pluto Press, 1986
2. Frantz
Fanon, The Wretched of the Earth, Grove Press, 1963
3. Fanon,
Frantz. Toward the African Revolution. Grove Press, 1967
3. Hugh F.
Butts, Frantz Fanon’s Contribution to Psychiatry: The Psychology of Racism and
Colonialism, Journal of The National Medical Association, Vol 71 No. 10, 1979
4. Firat
Mollaer, Frantz Fanon’s Psycho-Politics: From Psychiatry to Revolution,
International Journal of Social Inquiry, 16(1), 75-93, 2023
5. Frantz
Fanon: The Brightness of Mertal, Tricontinental: Institute for Social Research,
March 2020