विद्यार्थी चळवळ: संभ्रम, संकट आणि संघर्ष
- देवकुमार अहिरे
प्रस्तावना:
रोहित वेमुलाच्या संस्थागत राजकीय दबावाला
कंटाळून केलेल्या आत्महत्या प्रकरणाने आणि
जे.एन.यु विद्यापीठाच्या
विध्यार्थ्यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्याने पुन्हा एकदा विध्यार्थी चळवळही राष्ट्रीय
चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आलेली दिसून येत आहे. विध्यार्थ्यांवर आणि एकूणच विध्यार्थी चळवळीवर होणार्या
सकारात्मक आणि नकारात्मक टीकेतून पुन्हा एकदा विध्यार्थी चळवळीचे भविष्य ठरणार आहे. जे.एन.यु.प्रकरणाच्या दरम्यानच्या
काळातच “झोळीवाल्यांना” बदनाम करण्यासाठी काही
विशेषप्रकारचे संदेश फेसबुक आणि WhatsUp वर वाचायला मिळाले. जे.एन.यु.मधील मार्क्सवादी
विचारांच्या विध्यार्थी कार्यकर्त्यांच्या चरित्राचे नैतिकदृष्ट्या हनन करणे हे या
प्रचारामागील सूत्र होते हे आपणास स्पष्टपणे दिसून येते. यावेळी असा प्रश्न उपस्थित होतो कि झोळी
हि काही मार्क्सवादी लोकांची मक्तेदारी नाही मग तरीही झोळीवाल्यांना बदनाम का
करण्याचा प्रयत्न करण्यात झाला?. असा ज्यावेळी प्रतीप्रश्न आपणच आपणास विचारायला लागतो त्यावेळी आपणास यासर्व
आरोपामागील मूल्यात्मक आणि विचारात्मक राजकारणाचा बोध होतो. गांधीवादी,समाजवादी,मार्क्सवादी, फुले-आंबेडकरवादी
आणि स्त्रीवादी चळवळीतील बहुतांश कार्यकर्ते झोळी वापरतात. हे लोक सातत्याने गरीबीविरोध, जातीय अन्याय- अत्याचार विरोध, भांडवली विकास (भकास करणारा विकास) विरोध, शोषणविरोध करतात सोबतच दलित, आदिवासी,भटके-विमुक्त, अल्पसंख्याक, शेतकरी,कामगार,ग्रामीण समूह आणि
स्त्रिया यांच्या हक्कासाठी लढतात सामाजिक आणि मानवी विकासाची गोष्ट करतात
त्यामुळे झोळीच्या नावाखाली यासर्व लोकांना बदनाम करण्याचे षडयंत्र
भांडवलशाहीसमर्थक संघ करणारच हे स्पष्ट आहे. सध्या शिक्षणाचे ध्येयच मनुष्यबळ निर्मिती असल्याने कॉलेज-विद्यापीठात बाजाराला
हवे असे येस-नो म्हणणारे
मानवी मशीनच निर्माण केले जातात. सुठ-बूट घालत
असल्याने आमचे शोषणाच होत नाही असा समकालीन तंत्र-आर्थिक वातावरणात सगळ्यांचा भ्रम झाला आहे. त्यामुळे अश्या भ्रमित
सूट-बूटवाल्यांना
सुद्धा हे झोळीवाले मागास, पारंपारिक,विकासविरोधी आणि बदलविरोधी वाटायला लागतात.
तंत्रज्ञान हे
समतावादी असते असा जर अजूनही कोणाचा भ्रम असेल तर त्याने जे.एन.यु. मधील बनावट
विडीयो प्रकरण समजून घेणे गरजेचे आहे. बनावट विडीयो बनवून विध्यार्थ्यांना अडकवण्याचा प्रयत्न
होता. जगभरातील
अतिरेकी हल्ले, मुलतत्ववादी दंगली, जाती-धर्मांध
राजकारणाचा जर आढावा घेतला तर आपणास असे दिसून येत आहे कि तंत्रज्ञानाची संबधित
शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांचा किंवा
घेतलेल्या लोकांचा यामध्ये सहभाग वाढत जात आहे. बहुतांश या सर्व संस्था खाजगी किंवा अभिजनवादी
असल्याकारणाने तेथे विध्यार्थी चळवळ निर्माण होवू शकत नाही आणि समजा काही लोकांनी
प्रयत्न करून तेथे विध्यार्थी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला तर चळवळ करणाऱ्या
विध्यार्थ्यांना वैयक्तितपणे टार्गेट केले जाते किंवा सहभाग घेणाऱ्या
विध्यार्थ्यांना परीक्षाच्यावेळी टार्गेट केले जाते. असे अनेक प्रकार खाजगी आणि अभिजनवादी
संस्था, कॉलेज मध्ये
सर्रास होतांना दिसतात. कॉलेज,संस्था,विद्यापीठ हे देशाचे
भावी नागरिक घडवणारे ठिकाण असल्यामुळे तिथे खरे तर विध्यार्थ्यांचे नागरी(Civil) शिक्षण होणे
गरजेचे आहे परंतु शिक्षण मंत्रालयाच
मनुष्यबळ मंत्रालय झाल्यामुळे तसे होणे शक्य नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये जर मूल्य म्हणून
लोकशाही जिवंत नसेल तर मग तेथून शिक्षण घेवून बाहेर पडलेला विध्यार्थी लोकशाही
मूल्य घेवून कसा जगेल हा गंभीर प्रश्न आहे. देश टिकवायचा असेल तर देशात लोकशाही टिकायला हवी. देश नुसता देशप्रेमाच्या
घोषणा दिल्याने टिकत नाही किंवा देशविरोधी घोषणा दिल्याने संपत नाही. देश्यातील लोकांचे
नागरिकीकरण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी देशभरतील संस्था, कॉलेज आणि विद्यापीठ यांचे लोकशाहीकरण होणे आणि त्यात शैक्षणिक लोकशाही असणे गरजेचे
आहे. सध्याच्या काळात
विध्यापीठातील आणि कॉलेजमधील आहे ती लोकशाही स्पेस मारली जात असतांना हि संपत जाणारी लोकशाही
स्पेस वाचवण्यासाठीच जाधवपूर, एफ.टी.आय,आय आय टी-मद्रास,पोन्डेचेरी,जे.एन.यु.च्या विध्यार्थ्यानी
लढा दिला आणि रोहित वेमुलाने आपला जीव देवून प्रतिरोध केला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर
विध्यार्थी चळवळीचा आढावा घ्यायचा ठरवला आहे.
विद्यार्थी चळवळीचा इतिहास
विध्यार्थी चळवळीचा इतिहास,विध्यार्थ्यांचा
इतिहास आणि चळवळीचां इतिहास या वेगवेगळ्या गोष्टी आहे. विध्यार्थी चळवळीचा इतिहास हि संकल्पना
विध्यार्थ्यांचा इतिहास आणि चळवळीचां इतिहास यापेक्ष्या बरीच वेगळी आहे. विध्यार्थी चळवळीच्या
इतिहासाचा विचार करतांना आपणास १९६० नंतर जगभर आणि भारतभर झालेल्या विध्यार्थी
आंदोलनाचा विचार करावा लागतो. जगात आणि भारतात झालेल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवरच आपणास विध्यार्थी
चळवळीचा विचार करावा लागेल. तत्पूर्वी जगभरात आणि भारतातसुद्धा अनेक चळवळीमध्ये विध्यार्थी तरुणांचा सहभाग
मोठ्या प्रमाणात होता. तिसर्या जगातील सर्वच स्वतंत्र आंदोलनात त्या त्या देशातील विद्यार्थ्यांचा
सहभाग आपणास दिसतो. भारतातील स्वतंत्र आंदोलनात अनेक विध्यार्थ्यानी आपल्या जीवाची होळी केली आहे. बाळ शिरीषकुमार पासून
ते तरुण भगतसिंगपर्यंत असे कितीतरी
विध्यार्थी शहीद झाले आहेत. तरुणाई हि सातत्याने प्रस्थापित सत्तेच्या विरोधी राहिली आहे. मार्क्स विचारही
प्रस्थापित सत्तेच्या विरोधी असल्याने मार्क्स हा नेहमीच तरुणाईच्या गळ्यातील ताईत
राहिला आहे. रशियामध्ये
झारविरोधी क्रांती यशस्वी झाल्याने जगभर त्याचा प्रभाव पडला त्याप्रभावातून भारतात
भगतसिंग, जवाहरलाल
नेहरू,सुभाष बाबू, जयप्रकाश नारायण असे
कितीतरी स्वतंत्र आंदोलनातील विध्यार्थी-तरुण प्रभावित झालेत.
भारतातील मार्क्सवादी
आंदोलनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्यार्थी-तरुणांचा सहभाग होता. तेलंगाना,तेभागा येथील सशस्त्र आंदोलनातही विध्यार्थी सहभागी होते. कॉंग्रेसने तर असंख्य तरुणांना स्वतंत्र
आंदोलनात सहभागी करून घेतले. जवाहरलाल नेहरू आणि सुभाष बाबू हे कॉंग्रेस च्या विध्यार्थी-तरुणाईचे चेहरे होते. स्वदेशी आंदोलनात
अनेकांनी आपले शिक्षण सोडले. त्याचकाळात अनेक विध्यार्थी-तरुण दहशतिच्या मार्गाने इंग्रजांना घालवायचे म्हणून काही अराजकतावादी झालेत त्यामध्ये विनायक सावरकर, चापेकर बंधू अश्यांचा
समावेश होतो तर काहि क्रांतिकारक झालेत त्यामध्ये भगतसिंग, सन यत सेन यांच्या टीमचा समावेश होतो. अश्या प्रकारे
वेगवेगळ्या मार्गांनी विध्यार्थ्यानी स्वतंत्र आंदोलनात, जमिनदारीविरोधी आंदोलनात, आंबेडकर आणि पेरियार
यांच्या नेतृत्वाखाली जातीविरोधी आंदोलनात
सहभाग नोंदवलेला होता. तरीही या कालखंडाला आपण विध्यार्थी चळवळीचा कालखंड म्हणत नाही कारण या
आंदोलनाच्या केंद्रस्थानी विध्यार्थी नव्हता.
१९६० च्या
दशकानंतर जागतिक आणि भारतीय पातळीवर तरुणांच्या अनेक आंदोलनाचा
उदय झाला. फ्रांसमधील सबोर्न
विद्यापीठातील विद्यार्थ्यानी गॉल या हुकुमशहाच्या विरोधात बंड पुकारले. विद्यार्थी आंदोलनातील
हि महत्वाची घटना होती. जगभरातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर याचा प्रभाव पडला. व्हियतनामयुध्याच्या
पार्श्वभूमीवर भांडवलशाहीचा म्होरक्या असणारा अमेरिका देशातील विद्यार्थ्यांनी
अमेरिकन सरकारचा युद्धविरोधी धोरणांचा निषेध करत हिप्पी चळवळ उभी केली. हिप्पी चळवळीचा जागतिक
पातळीवर प्रभाव झाला.संगीत,कला,चित्रपट आणि साहित्य
अश्या वेगवेगळ्या माध्यमातून अमेरिकन धोरणांची टिंगलटवाळी विद्यार्थ्यानी केली. चीनमध्ये
क्रांतीत्तोर समाजामध्ये ज्यावेळी कम्युनिस्ट पार्टी हि कम्युनिस्ट
मुल्यांपेक्ष्या वरचढ होवू लागली त्यावेळी माओ च्या नेतृत्वाखाली हजारो
विद्यार्थ्यानी पार्टीच्या मोठमोठ्या नेत्यांना सांस्कृतिक क्रांतीच्या काळात भर
रस्त्यात टोकून काढले. तुर्कस्तानमधील इस्तंबूल विद्यापीठातील कुर्दिश विद्यार्थ्यानी स्वतंत्र
कुर्दीशस्थान लढा उभा
केला. आजही हा लढा तेवढ्याच ताकतीने उभा आहे. स्त्रियांचा मोठा कृतीशील सहभाग या लढ्यामध्ये आहे. एकीकडे अमेरिका-तुर्की आघाडी तर
दुसरीकडे इसिस अश्या दोन्ही पातळीवर हे लोक लढत आहेत.
जागतिक
पातळीवर वेगवेगळे विद्यार्थी आंदोलन चालू असतानांच भारतातही अनेक विद्यार्थ्यांचे
लढे उभे राहिले. स्वतंत्र आंदोलनात शोषणविरहीत,समताधीष्टीत, स्वयंपूर्ण समाजवादी भारताचे स्वप्न अनेकांनी पाहिले होते परंतु भारताला
स्वतंत्र मिळून एक-दोन दशक झालीत तरीहि स्वप्नांची पूर्ती होत नाही म्हणून
अनेक जन निराश झालेत. साने गुरुजी सारख्या माणसाचे उदाहरण यासाठी खूपच योग्य आहे. याच पार्श्वभूमीवर “प्यासा” सारखे सिनेमे येवून
गेलेत त्यांनी त्याकाळातील एकूणच परिस्थितीचे चित्र आपल्या समोर उभे केले आहे. याच काळात आपणास
कॉंग्रेस ने स्वातंत्र्यातील वारसा संपवत घराणेशाही रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याला पर्याय म्हणून
कॉंग्रेस आणि इंदिरा हठाव चे नारे दिले गेले.गरिबी,शिक्षण,बेरोजगारी
अश्या अनेक प्रश्नांमुळे याच काळात अनेक अनेक तरुण अस्वस्थ झाले होते. गुजरात येथील
विध्यार्थी आंदोलनाचे नुसते कारण झाले आणि भारतभर विध्यार्थी आंदोलनाचे आगडोंब उभे
राहिले. या सर्व
विध्यार्थी आंदोलनाला ज्याप्रमाणे जागतिक आशय होते त्याचप्रमाणे किंबहुना
त्याहूनही अधिक स्थानिक कारणे जास्त जबाबदार होती. छात्र युवा संघर्षवाहिनी, शांती सेना, अश्या कितीतरी
विध्यार्थी चळवळी उभ्या राहिल्यात. काही काळाने नक्षलबाडी च्या संघर्षाने अनेक तरुणांना आकर्षित केले अनेक तरुण
आपले शिक्षण सोडून त्यामध्ये सहभागी झालेत. आसाम गण विध्यार्थी परिषदेने तर विध्यार्थीच्या प्रश्नांनी
सुरुवात करून आसामचे विधान मंडळच लोकशाही मार्गाने ताब्यात घेतले. खालीस्थांनच्या
मागणीला पंजाबमधील शीख तरुणांनी अखिल भारतीय शीख विध्यार्थी फेडरेशनने जोरदारपणे पाठींबा देवून जागतिक पातळीवर
खालीस्थानची मागणी रेटली.
भारतभर
विध्यार्थी तरुणांच्या चळवळी उभ्या राहत असतांना महाराष्ट्र त्यामध्ये कसा मागे
राहील हा प्रश्नच आहे.महाराष्ट्राने सातत्याने भारतातील चळवळीनां वैचारिक किंवा राजकीय स्थान
निर्माण करून दिले आहे म्हणून तर गांधी महाराष्ट्राला “कार्यकर्त्यांचे मोहोळ” म्हणायचे. जागतिक पातळीवरच्या आणि भारतीय पातळीवर
होणार्या विध्यार्थी आंदोलनाचा महाराष्ट्रातील विध्यार्थी आंदोलनावर मोठा परिणाम
झाला होता,कारण देशभरतील
विध्यार्थी छात्र युवा संघर्षवाहिनीत सहभागी होत होते. अमेरीकेतील गोर्या लोकांच्या जुलुमा
विरोधात अनेक पातळीवर काळ्या लोकांनी संघर्ष उभा केला होता. साहित्य,संगीत,नाटक आणि आंदोलन यांच्या माध्यमातून गोर्यांना धक्के देण्याचे काम सुरु झाले
होते. त्याच्या
प्रभावातून महाराष्ट्रात दलित तरुणांनी दलित पंथर ची स्थापना केली.दलित पंथर च्या
स्थापणे मागे ज्या प्रमाणे काळ्यांच्या संघर्षाची प्रेरणा होती त्याचप्रमाणे
नक्षलवादी विचारधारेचा आधारही होता.माओ ने विध्यार्थी आणि तरुणांना घेवून ज्या प्रकारे सांस्कृतिक क्रांती
चीनमध्ये केली त्याप्रकारच्या क्रांतीचा प्रभाव भारतातील नक्षलवादी विचारांच्या
कार्यकर्त्यांवर होता. मुंबईमध्ये त्याकाळात अनेक लोक कृतीशिलपणे क्रियाशील असल्यामुळे दलित मुलांवर
त्याचा प्रभाव पडला होता. माओच्या सांस्कृतिक क्रांतीचा हिंसा वगळता जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण
क्रांतीवरही काहीसा प्रभाव आपणास दिसतो.याच सर्व प्रक्रियेतून गांधीवादी आणि समाजवादी विचारांचा
आधार घेवून संसदीय राजकारणाच्या पुढचा विचार करून युवक क्रांती दलाची स्थापना झाली. पारंपारिक संसदीय
राजकरणाच्या पलीकडे जावून अनेक छोटे-छोटे विथ्यार्थी आणि तरुणांचे गट तयार झालेत. विशेतः आय आय टी मध्ये शिक्षण घेणाऱ्या
अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रमाणपत्र फाडून टाकले किंवा जाळून टाकले. या सगळ्या प्रक्रियेने
प्रचलित राजकारणाला खूप मोठे धक्के दिलेत. सर्वात मोठे म्हणजे यातून देशपातळीवर कॉंग्रेस विरोध उभा राहिला. त्यातून आणिबाणी सारखी
गोष्ट आली. इंदिरा
गांधीचा पराभव झाला. भविष्यातील अनेक राजकीय नेते याकाळातील विध्यार्थी चळवळीने जन्माला घातले. राजकीय पक्ष्यांना आप
आपल्या विध्यार्थी किंवा युवा आघाड्या निर्माण कराव्या लागल्यात. हे सर्व या काळातील
विध्यार्थी चळवळीचे योगदान आहे. याच प्रकारे विध्यार्थी चळवळ १९८० च्या दशकापर्यंत काहीप्रमाणात चालू होती. राजीव गांधीचा भारतीय
राजकारणाच्या पटलावरील उदय आणि खा.ऊ.जा.च्या प्राथमिक
पातळीवरील टप्पा आणि तांत्रिक क्रांतीने विध्यार्थी आणि तरुणांच्या मनो-विश्वावर अनेक परिणाम
करायला सुरुवात झाली. २००० चे वर्ष येयीपर्यंत तर एक वेगळ्याच प्रकारची विध्यार्थी-तरुणांची पिढी निर्माण
झाली. मधल्या काळात
अनेक घडामोडी झाल्या. धर्मांध राजकारण, गुंन्हेगारी राजकारण, राजकीय अर्थकारण,जागतिकीकरण आणि खाजगीकरण यांने एकूण विध्यार्थी चळवळीचे स्वरूपाचे बदलून गेले.२००० ते आतापर्यंतच्या
विध्यार्थी चळवळीला आपण समकालीन विध्यार्थी चळवळ असे म्हणूयात. पुढील भागात आपण
महाराष्ट्रातील समकालीन विध्यार्थी चळवळीला तिच्या संभ्रम,संकट आणि संघर्षासह समजून घेऊयात.
विद्यार्थी चळवळ आणि संभ्रम
समकालीन विद्यार्थीचळवळीला
अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.काही समस्या व्यवस्थात्मक आहेत तर काही वैचारिक पातळीवरच्या
आहेत. विद्यार्थी
चळवळी कोंडी झालेली आहे. एकूणच शिक्षणाचे होणारे बाजारीकरण,राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण आणि नव –उदारमतवादी काळात होत
असलेले वैचारिक खच्चीकरण आणि वाढणारे वैचारिक सपाटीकरण यामुळे अनेक संभ्रमांनी
विद्यार्थी चळवळग्रस्थ आहे. बरेच लोक आमची विद्यार्थी-कार्यकर्ता संख्या दिवसेंदिवस वाढत
आहे, असे कोणी
म्हणत असेल तर, ते काही खरे दिसत नाही. कारण सगळ्यांकडे हा प्रश्न आहे कि कार्यकर्ते कुटून आणायचे.
वैचारिक संभ्रमता : विचारसरणीचा अंत कि
पर्याय
प्रत्येक
विद्यार्थी संघटनेचे स्वतःचे राजकारण आणि वैचारिक बैठक असते. कॉलेजात किंवा विध्यापीठात ह्या विद्यार्थी संघठना,जरी विद्यार्थी प्रश्नाशी
आम्ही लढतो असे म्हणत असल्या तरी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे राजकारण करत असतात. विध्यार्थ्यांचे
सामाजिक स्थान शोधले कि मग आपणास त्यांच्या राजकारणाची दिशा काय असेल याची
स्पष्टता येते. विद्यार्थी हा काही एकजिनसी समूह नाही त्यामुळे त्यांच्यात्तील स्तर समजून
घेणे आणि तसे राजकारण करणे हे सुद्धा विद्यार्थी संघटने समोर मोठे आव्हान असते, ते करत असतांना
विद्यार्थी एकता तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा विशिष्ट समूहाचे विद्यार्थी
विशिष्ठ संघटनांचे सदस्य होतात आणि विध्यार्थी प्रश्नांकडे दुर्लक्ष होते.
महाराष्ट्रातील
विध्यापीठात आणि कॉलेज मध्ये एस.एफ.आय, ए.आय.एस.एफ., आईसा, छात्र भारती,भारतीय विद्यार्थी
मोर्चा,अ.भा.वी.प,बहुजन विद्यार्थी परिषद,पुरोगामी विद्यार्थी
संघटना, वीर भगतसिंग
विद्यार्थी परिषद,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस,एन.एस.यु.आय,विद्यार्थी सेना,म.न.वि, से.,सम्यक विद्यार्थी
आंदोलन,प्रहार
विध्यार्थी संघटना आहेत. सोबत काही अश्या संघटना आहेत कि ज्यांचे मूळ विशिष्ट विध्यापीठाच्या बाहेर
नाही किंवा विशिष्ठ जिल्ह्याच्या बाहेर नाही.काही संघटना अश्या आहेत कि, ज्यांना फक्त विध्यार्थ्यांसाठी संघटना
काढावी हि कल्पना जुनी वाटते परंतु विध्यार्थ्यांमध्ये काम तर करायलाच पाहिजे असेही
वाटते अश्याही अनेक संघटना आहेत. युवा भारत, युवक क्रांती दल, श्रमिक मुक्ती दल,सत्यशोधक जनआंदोलन इत्यादींचा त्यामध्ये समावेश करता येयील.सोबतच अनेक छोट्या
मोठ्या ब्रिग्रेड,सेना,पंथर,छावा दिवसागणिक आणि
कॉलेजगणिक निर्माण होतात. सोवियत रशियाच्या विघटनाने जागतिक पातळीवर भांडवलशाही समर्थक नवउदारमतवादी
अभ्यासकांनी इतिहासाचा अंत,विचारसरणीचा अंत अशी मांडणी करायला सुरुवात केली. सोबतच उत्तर आधुनिकतावादी आणि उत्तर
संरचानावादी विचारप्रवाहांना विध्यापीठीय पातळीवर मोठ्या प्रमाणात शिकवण्यास
सुरुवात झाली. यासर्व गोष्टींचा विद्यार्थी चळवळीवर मोठा प्रभाव पडला.विचार म्हणून हे सगळे समजून घेणे हे महत्वाचे आहे परंतु
ज्यावेळी शोषणाला आणि विषमतेलाच “विविधता” म्हणून साजरे
केले जावू लागले त्यावेळी विद्यार्थी चळवळीवर याचा गंभीर परिणाम झाला.
आर्थिक उदारीकरणाने
आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाने विद्यार्थी संघटनांची मोठी कोंडी केली आहे. खाजगी शिक्षण
संस्थांमध्ये आणि विशेषतः खाजगी व्यावसायिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारे
विद्यार्थी संघटनांना विध्यार्थ्यांना संघटीत करता येत नाही. अश्या वेळी पुरोगामी,डाव्या,आंबेडकरवादी विचारांवर काम करणाऱ्या संघटना “ सर्वांना शिक्षण,मोफत शिक्षण”, अश्या घोषणा देवूनच आपला रोष व्यक्त करतात परंतू त्यातून काहीही बदल होत नाही. एका डाव्या विध्यार्थी
संघटनेच्या कार्यकर्त्याला यासंदर्भात विचारले असता. तो म्हणाला, “ सर्वांना मोफत शिक्षण हि घोषणा देतांना
मलाच माझे हासू येते कारण,कित्येक दिवसांपासून आम्ही हि घोषणा देत आहोत परंतू परिस्थिती बलण्यापेक्ष्या
परिस्थिती जास्तच चिघळत जात आहे.” तसेच दलित आणि मागासवर्गीय ओ.बी.सी
विध्यार्थ्यांचे स्कौलरशीप चे प्रश्नच बिकट झाले आहे. आरक्षण आणि स्कौलरशीप यांच्या भोवती
फिरणारी चळवळ नॉन ग्रंटेड विभागांनी आणि कॉलेज ने संपती कि काय असा प्रश्न उभा
राहिला आहे. लोकशाही, समाजवाद असे नारे
देणारे समाजवादी विद्यार्थी चेष्टेचा विषय बनत आहेत. या अश्या काळात विचाराधीष्टीत काम करणारे
विध्यार्थी प्रामाणिकपणे काम करत असतांनाही अनेक प्रकारच्या वैचारिक गोंधळात आहेत. अश्या काळात विचारांचा
अंत, एकच विचारसरणी
खरी नसते, काय विचार
घेवून बसलात असे बोलले जाते त्यावेळी आपल्या संघटनेच्या विचारांविषयी
विध्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. बर्याच वेळा संघटनेत काम करणाऱ्या विध्यार्थ्याला संघटनेचे
विचार स्पष्टपणे कळतातच असे काही नाही. विध्यार्थी संघटनेचे अभ्यास वर्ग नाहिसे होत जाने हे सुद्धा
त्याचे एक कारण आहे.
विचार कि कृती: द्वंद्व
अभ्यास
वर्गांची परंपरा जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात संपत आली आहे. कधी तरी किंवा कधी-कधी कुठल्यातरी विद्यापीठात अभ्यास वर्ग होतांना दिसतात. त्यामुळे समकालीन
वैचारिक घडामोडी आप आपल्या विचारधारेनुसार कसे समजून घ्यायचे हे सध्या खूपच कमी
पातळीवर होतांना दिसते. प्राध्यापकांच्या शैक्षणिक आणि व्यावहारिक वर्तुनुकीत नव उदारमतवादी धोरणांमुळे
मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो.दि .के.बेडेकर, गं.बा.सरदार, नलिनी पंडित,बा.ह.कल्याणकर,ज,रा,शिंदे,भा.ल.भोळे,राम बापट यशवंत सुमंत,शर्मिला रेगे,जयदेव डोळे, उमेश बागडे, रणजीत परदेशी, गोपाल गुरु, अनिकेत जावरे,सुहास पळशीकर,नीरज हातेकर यांच्या
सारखे विद्यार्थीभिमुक प्राध्यापक कमी होतांना दिसत आहेत. विध्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर आणि
अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या वैचारिक गोष्टींचे मार्गदर्शन करणारे आणि
विध्यार्थ्यांच्या अभ्यास वर्गात जावून मांडणी करणारे प्राध्यापक विध्यापीठातून
नाहीसे होतांना दिसत आहेत. दुसरीकडे सेमिस्टर पद्धतीमुळे विध्यार्थ्यांना इतर वाचायला वेळच मिळत नाही
त्यामुळेहि विद्यार्थी आणि विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते या कोंडीत सापडले आहेत.
विचार आणि कृती हि एकमेकास पूरक असते. दिवसेंदिवस प्रश्नांचे स्वरूप जठील आणि व्यामिश्र होतांना
दिसत आहे आणि विद्यार्थी संघटनेची रचना एकसाची असल्यामुळे अनेक प्रश्न समजून
घेण्यात विद्यार्थी चळवळ कमी पडत आहे. डाव्या विद्यार्थी चळवळींचे ट्रेड युनियन झाले कि काय ? आणि विध्यार्थ्यांच्या
सगळ्या प्रश्नांना परप्रांतीय किंवा मुस्लीम किंवा पाकिस्थानच जबाबदार आहेत कि काय
असा प्रश्न हिंदुत्ववादी विद्यार्थी संघटनांमुळे निर्माण होता आहे. एफ.टी.टी.आय च्या संघर्षाच्या
वेळी याची त्रीवता मोठ्या प्रमाणात जाणवली. विद्यार्थी संघटनांचे राजकीय पक्ष्यांच्या दावणीला बटिक
असणे हे विद्यार्थी हितासाठी किती धोकादायक आहे याची जाणीवसुद्धा या
संघर्ष्याच्यावेळी झाली. विध्यार्थांसाठी काम करण्याचा दावा करणारी अ.भा.वी.प. जाहीरपणे
विध्यार्थ्यांविरोधी भुमिका घेवून सरकारचे समर्थन करीत होती. याच प्रकारचे राजकारण राष्ट्रवादी
विध्यार्थी कॉंग्रेस, एन.एस.यु.आय यांनी कॉग्रेस आणि
राष्ट्रवादीचे सरकार असतांना घेतलेली दिसून येते.
शैक्षणिक क्षेत्र हे राजकीय सत्तेला सांस्कृतिक अधिमान्यता मान्यता मिळवण्याचे
स्थान आहे.त्यामुळे बरेच
लोक विध्यार्थ्यांच्या नावाने राजकारण करत असतात परंतु त्यांना प्रत्यक्ष्यात
विध्यार्थ्यांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नसते. सध्या महाराष्टात एक खूप मोठी विरोधाभासी
चित्र दिसत आहे. ज्या लोकांना शैक्षणिक राजकारण आणि अर्थकारण कळते असे लोक विद्यापीठ आणि कॉलेज
च्या परिसरातून संपतांना दिसत आहेत आणि ज्यांना शिक्षणातील काहीही कळत नाही असे
लोक आता विध्यार्थ्यांचे संघटन करतांना दिसत आहेत. उदा. पतित पावन संघटना, छावा, हिंदू राष्ट्र
सेना, भीम टायगर. या संघटनांना
विध्यार्थ्यांचे प्रश्नांपेक्ष्या इतर गोष्टींमधेच जास्त रस असल्याने हि लोक
वेगळ्याच प्रकारे विध्यापीठात किंवा कॉलेजात राजकारण करतांना दिसतात. यासारख्या लोकांना शैक्षणिक
परिसरात प्रवेश मिळाला याचे कारण पारंपारिकपणे विद्यार्थी राजकारण आणि विध्यार्थी
संघटन करणाऱ्या लोकांनी काही मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे सोबतच नव
उदारमतवादी आर्थिक धोरणांनी आणि जात-धर्मवादाने समकालीन विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. हे आपणास आधी मान्य
करावे लागेल. तरच आपण
विद्यार्थी संघटनांची विचार आणि कृतीच्या पातळीवर संभ्रमता का निर्माण झाली हे
समजून घेता येईल.
संघर्ष आणि सेवा
बहुतेक
विद्यार्थी संघटना समस्याग्रस्त झालेल्या आहेत. स्कॉलरशिप, फी वाढ, नोकर भरती आणि असे काहीतरी प्रश्न निर्माण झाले कि मगच
विद्यार्थी संघटना आक्रमक भुमिका घेतात. आक्रमक भुमिका सुद्धा घ्यायला हव्यात परंतु ज्यावेळी
संघर्ष्यात्मक कामे कमी असतात त्यावेळी संघटनेनी काय करायला हवे यासंदर्भात डाव्या-पुरोगामी संघटना जास्त
उदासीन दिसतात. नेहमी संघर्ष्यात्म्क भूमिकेत असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांची
विद्यार्थी संघटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच बनतो. ज्यावेळी विध्यार्थ्यांना काही समस्याना
सामोरे जावे लागते तेंव्हाच ते संघटनांकडे येतात. समस्येचे निराकरण झाले कि पाठ दाखवतात
म्हणजे विद्यार्थी आपल्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थी संघटनांना वापरून घेतात. असा प्रकार व्यावसायिक
शिक्षण संस्थेमध्ये जास्त होतात. यामध्ये वापरून घेणारे विद्यार्थी कारणीभूत नाहीत तर विद्यार्थी संघटना जास्त
कारणीभूत आहेत कारण आपणच स्वतःचे नेहमी संघर्षशील अशी प्रतिमा सर्व सामान्य
विध्यार्थांमध्ये निर्माण केली आहे. संघर्ष्यासोबत बरेच काही आपण करतो याची जाणसुद्धा विध्यार्थ्यांना होत नसेल तर
आपण कुठेतरी कमी पडतो याची जाणीवसुद्धा आपणास जर होत नसेल तर मग आपण एन.जी.ओ. संस्कृतीच्या आहारी
गेलो आहोत.अभ्यास वर्ग,प्रबोधन कार्यशाळा,क्षेत्र अभ्यास,वैचारिक शिबीर अश्या
अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याची जडणघडण होत
होती परंतु समकालीन अभासी जगात कार्यकर्तेसुद्धा अभासी वास्तवात जगतांना दिसतात. मागील वर्षभराचा
देशातील आणि महाराष्ट्रातील आढावा जरी घेतला तरी आपणास स्पष्टपणे दिसून येईल कि,चळवळीचे आणि
संघर्ष्याचे सुद्धा अभासीकरण होत आहे. उदा. अण्णा हजारेंचे लोकपाल आंदोलन, एफ.टी.टी.आय चे आंदोलन. तरुण आणि विद्रोह, संघर्ष यांचे समीकरणच
असते. प्रत्येक जन
आपल्या तारुण्याच्या वयात विद्रोही होत असतो. प्रत्येक तरुण संघर्ष्याची भाषा करीत असतो
असे वाचत आम्ही लहानाचे मोठे झालो परंतू आमच्या समकालीन तरुणांकडे पहिले कि हे
तेवढेसे खरे वाटत नाही. कारण आजचा तरुण सेवा करायची म्हणतो आणि त्यासाठी एन.जी.ओ.काढायची
म्हणतो. मी स्वतः अनेक
तरुणांना भेटलो आहे. ज्या ज्या वेळी समाज बदलायची, व्यवस्था बदलायची गोष्ट येते तेंव्हा
असंख्य तरुण एक तर व्यवस्थेत जावून बदलायया हवे म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी
करत आहेत असे म्हणतात तर काही तरुण म्हणतात कि,आहे ती व्यवस्था चांगली आहे. फक्त ती चांगल्या प्रकारे चालत नाही. या अश्या तरुणांमध्ये
काम करण्यासाठी विद्यार्थी संघटनांकडे ज्या पद्धतीचे भान असायला हवे ते दिसत नाही
म्हणून समजासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवणाऱ्या तरुणांना आणि विध्यार्थ्यांना
आपल्या संघर्ष्यात जोडून घेण्यात विद्यार्थी संघटना कमी पडत आहेत. नव उदारमतवादी
राजकारणाचे आपत्य असलेल्या व्यावसायिक समाज सेवा, एन जी ओ. यांच्या आणि धर्मांध राजकारणाचे आपत्य
असलेल्या धार्मिक आणि आध्यात्मिक सेवा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-तरुण आडकतांना दिसत
आहेत. महाराष्ट्रात
अनेकांना बाबा आमटे, अण्णा हजारे,पोपटराव पवार, सिंधुताई सपकाळ आणि आता नाना पाटेकर होण्याचे स्वप्न पडत आहे.
शिक्षण,बेरोजगारी आणि राजकारण
आधुनिक
महाराष्ट्रात शिक्षण या विषयावर मोठ्या प्रमाणात चिंतन झाले आहे. महात्मा ज्योतिबा फुले,लोकहितवादी,टिळक,आगरकर,न्या.रानडे,म.कर्वे,म.शिंदे,कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.आंबेडकर,गाडगे बाबा, पंजाबराव देशमुख,बापुजी साळुंखे अश्या
अनेक कर्त्या लोकांनी शिक्षणाविषयी गांभीर्याने विचार केलेले दिसून येतात. वसाहतीक काळात आधुनिक
प्रकारचे शिक्षण देण्याचे काम सुरु झाले तत्पूर्वी ब्राह्मण जातीलाच शिक्षण
घेण्याचा अधिकार होता. समाजातील अनेक प्रकारच्या विषमतेला,कर्मकांडाला आणि शोषणाला अविद्या कारणीभूत असल्यामुळे
शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा समज झाला आणि तो बरोबरही होता. इंग्रजी लोकांचा येथे आधुनिक प्रकारचे
शिक्षण सुरु करण्यामागे शुध्द व्यापारी उद्देश होता. कारकून निर्माण करण्यासाठी शिक्षण द्यावे
हाच मुळात ब्रिटीशांचा हेतू होता.
स्त्रियांना, शूद्रातिशूद्र लोकांना शिक्षण द्यावे कि न द्यावे यावर खूप मोठे सांस्कृतिक
राजकारण झाल्याचे दिसते. वसाहतीक शिक्षणाचे राजकारण खूप गंभीर पातळीवर समजून घ्यायला हवे, कारण आधुनिक काळातील
अनेक समस्यांचे मूळ त्यामध्ये आहे. महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांनी
मोठ्या प्रमाणात आधुनिक शिक्षणाचे महत्व ओळखून बहुजन समाजाला शिक्षित होण्याचा
सल्ला दिला. अनेक टिकाणी
शाळा, कॉलेज काढले. स्वातंत्र्यानंतर
अनेकांनी या लोकांपासून प्रेरणा घेवून शिक्षण संस्था काढल्या. खेड्या पाड्यापर्यंत शिक्षण संस्था उभ्या
केल्या गेल्या. ध्यास फक्त एकच होता कि समाजाला शिक्षित करायचे. मध्यंतरी प्रौढ निरंतर शिक्षण सुद्धा सुरु
झाले. परंतु जेंव्हा
कल्याणकारी राज्याचे आणि व्यापारी भांडवलशाहीचे स्थित्यंतर नव उदारमतवादी राज्यात
आणि वित्तीय भांडवलशाहीत झाले तेंव्हा शेअर मार्केट कोसळते तश्या सरकारी शिक्षण
संस्था खाजगी होवू लागल्या. ज्यांच्या पूर्वजांनी बहुजन समाजाला शिक्षित करण्याच्या एकमेव हेतूने शिक्षण
संस्था काढल्या होत्या. ते लोक कधी शिक्षणमहर्षींचे शिक्षणसम्राट हे कोणालाच कळले नाही. वाईट याचे वाटते कि, शिक्षणाचा धंदा
करणाऱ्या या संस्था अजूनही “बहुजन हिताय,बहुजन सुखाय” सारखे सत्यशोधकीय पार्श्वभूमी असलेले ब्रीद वाक्य वापरतात.
शिक्षणाचे एक
स्वतःचे राजकारण, अर्थकारण आणि संस्कृतीकरण असते. म्हणून बर्याचवेळा शिक्षण हेच सांस्कृतिक युद्धभूमी बनते.समकालीन राजकारणाचा विचार केला कि आपणास ते स्पष्ट होईल. फुले-आंबेडकरांना शिक्षणाच्या
राजकारणाची जाण असूनही त्यांनी शिक्षणावर भर दिला. शिक्षणाच्या माध्यमातून मानवमुक्तीची संधी शोधता येते. आज आपण बघू शकतो कि, शिक्षणामुळे समाजात
किती बदल होवू शकतो.वसाहतीक भारताला आणि स्वातंत्र उत्तर भारताला कल्याणकारी स्वरूप होते कारण ती
व्यापारी भांडवलशाहीची गरज होती. परंतू सगळे जग पादाक्रांत केल्यानंतर आणि अनेक तंत्रज्ञानाचा शोध लागल्यानंतर
याची गरज त्यांना राहिली नाही. म्हणून आजच्या काळात आपणास सुशिक्षित बेकारांचा प्रश्न निर्माण झालेला दिसतो. सुशिक्षित बेकारांचा
प्रश्न हा नुसता आर्थिक प्रश्न नाही तर तो मानसिक आणि सामाजिक सुद्धा आहे. समाजात झालेल्या
आर्थिक,सामाजिक आणि
सांस्कृतिक बदलांमुळे बहुजन समाजाने शिक्षणाचे महत्व ओळखून अनेकांनी शिक्षण घेतले. मोठ्याप्रमाणात
ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी शिक्षणासाठी शहरांमध्ये येवून स्थिरावले आहेत. शिक्षणाचा साक्षरता
आलेख वाढला परंतू रोजगाराचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे बेरोजगारीचा आलेखसुद्धा
दिवसेंदिवस वाढत जात आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला तर आपणास दिसून येईल कि,विद्यार्थी संघटनांना
कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल. या प्रश्नावर गांभीर्याने काम करणाऱ्या विध्यार्थी संघटना
कमी आहे. जाती-धर्माच्या आधारावर काम
करणाऱ्या विद्यार्थी संघटनांना हा आपला विषयच वाटत नाही. काही लोकांना विद्यार्थी म्हणजे राष्ट्रीय
सत्व जागृत करण्याचे माध्यम आहेत म्हणून ते फक्त त्यावरच लक्ष्य देतात. बेकारी, बेरोजगारी हे आर्थिक
विषमतेमुळे निर्माण होते, त्याला भांडवलशाही कारणीभूत आहे असे म्हटले कि त्यांना मार्क्सवाद आठवतो आणि
मग भारतीय संस्कृतीला ते घातक आहे असे काहीतरी ते बोलतात आणि मग बेकारी,बेरोजगारीचा प्रश्न
पुन्हा बाजूला पडतो. भांडवलशाहीचे स्वरूप बदलले परंतू डाव्या विद्यार्थी संघटनेची भाषा काही
बदललेली नाही. अजूनही “सर्वांना मोफत
शिक्षण, सर्वांना काम” मिळालेच पाहिजे अशी
घोषणा देत नवउदारमतवादी काळात कल्याणकारी राज्याची आठवण करून देतात. डाव्यांची एकूणच
वैचारिक कोंडी झालेली आहे. आधी कल्याणकारी राज्याला भांडवलशाहीचे अपत्य म्हणून विरोध केला आणि आता त्याच
कल्याणकारी राज्याच्या सुविधांचा पाठपुरावा करावा लागतो आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांनी आणि
पक्ष्यांसाठी हा झिझेक म्हणतो त्याप्रमाणे हा वैचारिक आणि तत्वज्ञानात्मक
पेचप्रसंग आहे. कल्याणकारी राज्याच्या शेवटासोबतच महाराष्ट्रातील समाजवादी विद्यार्थी चळवळ
संपली आहे. आंबेडकर
विचारांना घेवून राजकारण करणाऱ्या विध्यार्थ्यांमध्ये दोन गट पडलेले दिसत आहे. एक व्यापक पातळीवर
विध्यार्थी प्रश्नाची चर्चा करतोय तर दुसरा जो संख्येने मोठा आहे तो अजूनही
संकुचित पातळीवरच विचार करतांना दिसत आहे.
शिक्षणामुळे स्वाभिमान येतो. आपले स्वत्व आकारास
येते असे म्हटले जात होते. काही अंशी ते खरे सुद्धा आहे. परंतु नव उदारमतवादी काळात शिक्षण एक वस्तू बनले आहे.आजकाल शिक्षणाच्या माध्यमातून माणूस किंवा नागरिक घडवला जात
नाही तर उपभोक्ता घडवला जातो आहे. शिक्षणाचे बाजारीकरण होणे म्हणजे माणसाचे माणूसपण हरवन्यासारखे आहे.यातून बाहेर
पाडण्यासाठी ज्याप्रकारची वाद-संवाद प्रक्रिया विद्यार्थी संघटनांमध्ये असायला हवी ती कुठेही दिसत नाही
त्यामुळे येणाऱ्या काळात संभ्रम जास्त वाढतील.
विद्यार्थी चळवळ आणि संकट
विद्यार्थी आणि
विद्यार्थी चळवळ चहुबाजूनी संकटग्रस्त झालेली आहे. येत्या वर्ष्यापासून महाराष्ट्रात
विद्यार्थी निवडणूका होणार आहेत त्यामुळे विद्यार्थी चळवळ संकटातून बाहेर येईल अशी
भाबडी आशा अनेक जन बाळगून आहे. विद्यार्थी निवडणुका बंद करण्याचा काळ आणि आजचा काळ याचा विचार जरी केला तरी
मधल्या काळात काय काय बदल झालेत, काय संपले, काय नवीन आले याचा विचार केला तर आपणास परिस्थितीमध्ये काय बदल झाला आहे याचा
अंदाज येईल. ज्या
कारणांमुळे विद्यार्थी निवडणुका बंद केल्या होत्या. त्या कारणांचे निवारण झाले का? पुन्हा तसे होणार नाही
याची शाश्वती कोण देणार? मधल्या काळात मोठ्या प्रमाणात राजकारणाचे जे गुन्हेगारीकरण झाले आहे त्याचा या
विद्यार्थी राजकारणाशी संबंध येणार नाही का? देशभरात सध्या सुरु असलेला विध्यापीठ्मधील राजकीय हस्तक्षेप
विद्यार्थी निवडणुकांवर होणार नाही याची काय खात्री?
आभासी जगात
रमलेले विद्यार्थी पुन्हा ७० -८० च्या दशकातील विध्यार्थ्यांसारखे रात्र रात्र बसून भिंती पत्र रंगवतील, विध्यापीठ्याच्या
किंवा कॉलेजच्या भिंतीवर पोस्टर्स लावतील, जाहीर वाद विवाद करतील असा कोणी विचार करत असेल तर ते
भूतकाळरम्यता आहे असे माझे मत आहे. जे.एन.यु. हे अश्याच प्रकारची
पार्श्वभूमी असलेले विद्यापीठ आहे. कन्हेया कुमारच्या प्रकरणानंतर या विध्यापीठावर ज्या पद्धतीने आरोप करण्यात
आलेत त्यावरून आपणास हे समजायला हवे कि, समाजात काहीतरी बदल झालेले आहेत. नवउदारमतवादी
काळात आणि तंत्र-आर्थिक वातावरणात जन्माला आलेल्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारचे विचार करावी
लागतील तर आपण विध्यार्थ्यांसामोरील संकट समजू शकलो असे म्हणता येईल.
चळवळीचे एन.जी.ओकरण
एन.जी.ओंचा इतिहास पाहिला तर
आपणास स्पष्टपणे दिसते कि चळवळींचा ऱ्हास करण्यासाठीच एन.जी.ओ. निर्माण
करण्यात आल्या आहेत. जागतिक भांडवलशाहीला ज्यावेळी राज्य संस्था अडथळा वाटत होती त्यावेळी बिगर
शासकीय आणि बिगर राजकीय हा चेहरा घेऊन एन.जी.ओंनी भारतात प्रवेश केला. एन्.जी.ओ चे खरे रूप कळायला
पुढची वीस वर्ष जावी लागली तोपर्यंत एन.जी.ओनी पूर्णपणे चळवळींचे इश्यू पळविले होते. अनेक लोकांना एन.जी.ओनी आपला वापर केला हे अजूनही काळात नाही.चळवळीच्या घोषणा, चळवळीचे लढाईचे मुद्दे सगळेच एन.जी.ओ ने हायज्याक केलेत.चळवळीत जे लोक पूर्णवेळ काम करत होते त्यांना तेच काम आमच्या संस्थेच्या
माध्यमातून करायचे असे सांगून त्याला मासिक पगार हि दिला जावू लागला.कार्यकर्त्यालाही वाटू
लागले कि,आपण चळवळीचेच
काम करतोय. बर्याच
लोकांनी स्वतःच्याच एन.जी.ओसुद्धा
काढल्या. ज्या चळवळीतील
लोकांनी एन.जी.ओत जाऊन काम करायला
सुरुवात केली त्यांच्या कमिटमेंट विषयी प्रश्न नाही परंतू त्या लोकांना
भांडवलशाहीने एन.जी.ओच्या माध्यमातून जे राजकारण केले ते त्यांना ओळखता आले नाही याचे वाईट वाटते. एन.जी.ओ.ने एका नवीन
संस्कृतीलाच जन्म दिला. त्या संस्कृतीने चळवळीची भाषा वापर चळवळच संपवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रातसुद्धा काही एन.जी.ओ. घुसल्या आहेत. त्याआधीच एन.जी.ओ. संस्कृती विध्यापीठात,कॉलेजात शिरली आहे. सोशल वर्क चे कॉलेज
आणि विध्यापीठातील समाजशास्त्र विभाग यांनी अमेरिकन सामाजिक शास्त्रांच्या
प्रभावाखाली येवून एन.जी.ओ संस्कृतीला
अधिमान्यता मिळवून दिली. विद्यार्थी चळवळीचा आणि एन.जी.ओ. संस्कृतीचा काय संबंध
आहे. यावर संशोधनच
व्हायला हवे अशी परिस्थिती आहे. चळवळीचे एन.जी.ओकरण असे
ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी त्याचा व्यापक राजकारणाच्या संदभार्त विचार करत असतो. कारण सध्या विध्यापीठात
किंवा कॉलेज मध्ये काही समस्या जरी निर्माण झाल्या तरी सर्व सामान्य विद्यार्थी
विद्यार्थी संघटनेशी चर्चा न करता आपापल्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे म्हणणे असते
कि विद्यार्थी संघटनेचे लोक नुसते शिक्षणात राजकारण करतात. अराजकीयकरण हे सर्वात महत्वाचे एन.जी.ओ संस्कृतीचे लक्षण
आहे.
व्यावहारिक पातळीवर ( व्यावसायिक नव्हे) चळवळींनी नेहमी हात वर
केले त्यामुळे सुद्धा एन.जी.ओ.संस्कृतीला सहज प्रभाव
टाकता आला. विशेतः डाव्या
चळवळीमध्ये व्यवहारीकतेला नेहमी व्यावसायीकता म्हणूनच पहिले गेले त्यामुळे हे
प्रश्न निर्माण झालेत.विद्यार्थी दशेत जो व्यक्ती सर्व विध्यार्थ्यांचा आदर्श होता तोच पुढे
स्थिरस्थावर होण्यासाठी जर एन.जी.ओ.मध्ये जावून करियर करत
असेल तर त्याच्या संघटनेतील नवीन लोक त्याच्यापासून काय आदर्श घेतील. हि परिस्थिती बर्याच
विद्यार्थी संघटनेच्या विध्यार्थ्यांना लागू होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आणि
कोर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या वतीने अनेक विध्यापीठात आणि कॉलेजात व्यसन बंदी,पर्यावरण बचाव,जेंडर सेन्सिटीविटी
कार्यक्रम,व्यक्तीमत्व
विकास कार्यक्रम, योगा, मानसिक ताण-तणाव यावर कार्यक्रम
घेतले जातात.
भांडवलशाहीचे सांस्कृतिक
आक्रमण आणि तंत्र-आर्थिक
वातावरण
भांडवलशाहीच्या विरोधात जगात जेवढे
आंदोलने झालीत त्यांच्या मध्ये विध्यार्थ्यांचा आणि तरुणाईचा मोठा सहभाग राहिला
आहे.भांडवलशाहीला
नेहमी गतिमान राहिल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा तिच्यातील विरोधाभासानीच तिचा शेवट
होईल. म्हणून जगातील
सर्वच बाजारपेठ काबीज केल्यानंतर भांडवलशाहीने व्यापारी भांडवलशाहीतून वित्तीय
भांडवलशाहीत प्रवेश केला. दरम्यानच संस्कृती,कला,धार्मिकता,संगीत,सौंदर्य,खेळ,आहार,मनोरंजन या मानवी जीवनात महत्वाच्या असणाऱ्या
गोष्टींमध्येच भांडवलशाहीने बाजार निर्माण केला.कॉ. शशी सोनवणे नेहमी म्हणत असतात कि, आजच्या काळात भांडवलशाहीशी राजकीयदृष्ट्या लडणे आधीपेक्ष्या
तुलनेने खूप सोपे झाले कारण भांडवलशाहीने निर्माण केलेली आर्थिक विषमता आणि
निसर्गाचा विध्ववंस आपल्या डोळ्यासमोर आहे पण भांडवलशाहीने निर्माण केलेल्या
संस्कृतीच्या विरोधात लडणे खूप अवघड झाले आहे कारण आपल्यापैकी प्रत्येकजन त्याने
ग्रस्थ झाला आहे.
आपण सध्या तंत्र-आर्थिक वातावरण जगत
आहोत. तुमच्या कडे
जर नवीन तंत्रज्ञान असेल तर तुम्हाला मित्रांच्या बाजारात काहीच स्थान नाही किंवा
त्यांच्यात तुम्हाला काहीच भाव नाही. नफा आणि तोटा हे मानवी जीवनाचे मूल्य बनले आहे. विध्यापीठीय वातावरणाचा विचार केल्यास आपण
स्पष्ट दिसेल कि, तंत्र-आर्थिक वातावरण
किती झपाट्याने हावी होत आहे. एकूणच शिक्षणाचा विचारसुद्धा नफा-तोटा या शब्दात केला जात आहे. कोणते शिक्षण घेतले कि, कितीचे पकेज मिळते? कोणता कोर्स केला कि
कोणती नोकरी मिळते, हा विषय घेतला तर काय फायदा होईल. तंत्र-आर्थिक वातावरणाचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे लोकांचे भौतिक संवाद कमी होणे व
अभासी जगात २४ तास चालू राहणे. महाराष्ट्रातील मेट्रो पोलीटन शहरात असे वातावरण मोठ्या प्रमाणात दिसून येईल. छोट्या शहरात असे
वातावरण नाही परंतू तेथील विध्यार्थ्यांना आणि तरुणांना मोठ्या शहरांची ओढ लागली
आहे. म्हणून मोठ्या
शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विध्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.
तंत्र-आर्थिक वातावरणाचा आणि
भांडवलशाहीच्या सांस्कृतिक मुल्यांचा जोरदार मारा विद्यार्थी आणि विद्यार्थी
संघटनांवर होत आहे. जाहिराती, टीवी, एफ,एम.,रेडीओ तसेच सरकारी
धोरणाच्या माध्यमातून तुमच्या दैनंदिन जीवनात त्यांचा सहभाग वाढला आहे. एखादा निषेध मोर्चा
जरी काढायचा असेल तर आधी त्याचा फायदा-तोट्याचा विचार केला जात आहे. विध्यापीठात ज्यालोकांना जी.आर.एफ, राजीव गांधी, मौलाना आझाद, आणि इतर मोठ्या
रक्कमेच्या फेलोशिप मिळतात त्यांचा विचार केला तर त्यापैकी बहुतेक जन तंत्र-आर्थिक वातावरणाचे बळी
ठरत आहे. याचा अर्थ
फेलोशिप देवू नये असा त्याचा अर्थ कोणी घेवू नये. यातून मला हे दाखवायचे आहे कि, अतिरेकी पैसा आला कि
तुम्ही बाजाराचे ग्राहक कसे बनतात. या सर्व तंत्र-आर्थिक वातावरणात सामाजिक शास्त्र ( अर्थशास्त्र वगळता त्यामध्येही कृषी अर्थशास्त्राची चर्चा
नाही) हे नवीन
प्रकारचे एकविसाव्या शतकातील शुद्र ठरत आहेत आणि व्यावसायिक-तंत्राविज्ञानाचे शिक्षण घेणारे ब्राह्मण ठरत आहेत. पारंपारिक
जातीव्यवस्थेचे सातत्य या नवीन जातीव्यवस्थेतसुद्धा दिसून येत आहे. महाराष्टातील
विध्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागातील विद्यार्थी संख्येचा जर जातवार अभ्यास
केला तर एक वेगळेच चित्र बाहेर येईल.व्यावसायिक आणि तंत्र-विज्ञानातील विभागांमध्ये क्वचितच डाव्या,पुरोगामी, आंबेडकरी विचारांचे विद्यार्थी असतात. महाराष्ट्रातील बहुतेक विध्यापीठात सामाजिक शास्त्रामध्येच
विद्यार्थी संघटना कृतीशील असतात. अश्या ठिकाणी अ.भा.वी.प.ला प्रतिसाद म्हणावा
तसा कधीच मिळत नाही. मिळाला तरी तो खूपच अल्पसा असतो परंतू विज्ञान,तंत्रज्ञान या शाखेंमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.
तंत्र-आर्थिक वातावरणात
सामाजिक शास्त्रांची गरज आता राहिलेली नाही म्हणून सामाजिक शास्त्र बंद करण्याचा
नवउदारमतवादी डाव चालू आहे. कारण शिक्षणाच्या खाजगीकरणाला, व्यापारीकारणाला विद्यार्थी संघटना विरोध करतात आणि बहुतेक विद्यार्थी सामाजिक
शास्त्रातील असतात. परंतू येणाऱ्या काळात विज्ञान-तंत्रज्ञान या शाखेतील विद्यार्थी भांडवलशाहीच्या सांस्कृतिक आक्रमणाविरुद्ध
उभे राहण्याची शक्यात आहे. रोहित वेमुलाचे उदाहरण यासाठी योग्य ठरेल.कारण मानवी भाव भावनांचाही बाजार झाला आहे, माणुसकीच राहिली नाही.
स्पर्धा आणि असुरक्षितता
आजच्या
विच्यार्थ्यांचा स्पर्धा आणि असुरक्षितता हा स्थायीभावच बनला कि काय ? असा प्रश्न पडावा
येवडा हा प्रश्न तीव्र झाला आहे. खा.ऊ.जा.च्या नंतर जन्माला
आलेली पिढी “शेती-माती-नाती आणि संस्कृती”च्या अरिष्टात सापडली
आहे. नवउदारमतवादी
अर्थकारणाने आणि तंत्र-विज्ञानाच्या क्रांतीने मानवी जीवनातच हस्तक्षेप करायला सुरुवात केली. यातून अनेक सोयीसुविधा
जश्या निर्माण झाल्यात तसेच किंवा त्याहूनही जास्त गंभीर समस्या त्यातून निर्माण
झाल्यात. भांडवलशाहीने
तंत्रज्ञानाचाही आपल्या बाजाराच्या हेतूने वापर करून घेतला. आजच्या विध्यार्थ्यांना नाते-संबंध म्हणून
सुरक्षितता नाही, आरोग्य म्हणून सुरक्षितता नाही,जीवन म्हणून सुरक्षितता नाही,नोकरी म्हणून सुरक्षितता नाही. अश्या प्रकारच्या असुरक्षिततेतून अनेक प्रकारचे मानसिक ताण-तणाव
विध्यार्थ्यांमध्ये निर्माण होतांना दिसत आहे. असुरक्षिततेसोबत स्पर्धा हि नवीन समस्या
मानवी जीवनावर परिणाम करत आहे. विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवनच स्पर्धेने व्यापून टाकले आहे. भांडवलशाहीने
स्पर्धेचे हिंसक तत्वज्ञान सुद्धा निर्माण केले आहे. काहीही करून स्पर्धेत जिंकायचे आहे
त्यामुळे अनेक जन वेगवेगळे प्रयोग करतांना दिसतात. काही जन लैंगिक दमन करतात तर काही लोक
योगा, आर्ट ऑफ
लिविंग, विपश्यना असे
कितीतरी प्रयोग आहेत. शेवटी ज्यावेळी वय संपून जाते त्यावेळी अनेक जन मानसिक रुग्ण झालेले आहेत. कित्येकानी आत्महत्या
करून घेतली.
स्पर्धा आणि
असुरक्षितताग्रस्त विध्यार्थ्यांसाठी विद्यार्थी चळवळीकडे काहीच मार्ग नाही.म्हणून बर्याच वेळा
स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते यांचे
जमतही नाही. स्पर्धा
परीक्षा करणारे लोक विद्यार्थी चळवळीतील लोकांना टाईम पास करत बसतात असे म्हणतात
तर विद्यार्थी चळवळीतील लोक अश्या लोकांवर हसतात. माघील काही वर्षापासून स्पर्धा परीक्षा
करण्याकडे विध्यार्थ्यांचा मोठा कल झाला म्हणून अनेक राजकीय पक्ष्यांनी आणि
त्यांच्या विद्यार्थी आघाडीनी मोफत स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरु केलेत. अनेकांनी
त्यांच्यासाठी खानावळ सुरु केली. काहींनी पैसा दिला. माघील वर्षी तर एम.पी.एस.सी ने वयोमर्यादा
वाढावी यासाठी आंदोलन करण्यात आले. परंतू वय वाढले कि नोकरी मिळेल का? प्रश्न तसाच शिल्लक
राहतो.
वर्तमानपत्राच्या
बातम्यावर व संपादकीयावर पोसणारी हि स्पर्धा परीक्षेची पिढी चिकित्सक विचार खूप
कमी करताना दिसते. कोणता प्रश्न परीक्षेसाठी विचारला जावू शकतो त्यामुळे काय वाचायला पाहिजे हे
ठरवणारी लोक आंबेडकर,गांधी,फुले,मार्क्स हे वाचायला
वेळ नाही म्हणतात. वयाच्या ३०-३५ शी पर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे लोक वयाची ७-८ वर्ष फक्त स्पर्धा
परीक्षेचाच अभ्यास करतात. यादरम्यान अनेक असुरक्षितता आणि मानसिक ताण-तणावांच्या आहारी हि लोक जातात. मानसिक, लैंगिक,शारीरिक अनेक विकृत्या निर्माण होतात. याचा सविस्तर अभ्यास होणे गरजेचे आहे.
विद्यार्थी चळवळ आणि संघर्ष
विद्यार्थी
चळवळीत अनेक संभ्रम आणि संकट निर्माण झालेले असले तरी विद्यार्थी चळवळ काही
थांबलेली नाही. वेगवेगळ्या पातळीवरचे विद्यार्थी चळवळीचे संघर्ष चालूच आहेत. वैचारिक मतभेदांमुळे
बर्याच वेळा विद्यार्थी चळवळ आपआपसातच भांडताना दिसते. विशेषत: डाव्या विद्यार्थी संघटना आणि उजव्या
विद्यार्थी संघटना यांचा नेहमी संघर्ष होत आहे. विध्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून
विद्यार्थी संघटनांमध्ये मतभेद होणे हि वेगळी गोष्ट आणि आपल्या राजकीय
अजेंड्यासाठी मतभेद होणे हि वेगळी गोष्ट. सध्या केंद्रात आणि महाराष्ट्रात उजव्या विचारांचे सरकार
आले असल्यामुळे अ.भ.वी.प. हि सरकारी यंत्रनेसारखी
वागत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार
असताना त्यांच्या विद्यार्थी संघटना आहेत कि नाही असाच प्रश्न निर्माण झाला होता. देश्यातील मोठमोठ्या
विध्यापीठांमध्ये उजव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना म्हणावा तसा कधीच
पाठींबा मिळालेला नाही त्यामुळे सध्या सरकारच्या पाठींब्यावर अ.भा.वी.प. आता अश्या
विध्यापीठांमध्ये प्रवेश करत आहे.
देशभरात सरकार विरोधात
विध्यार्थ्यांमध्ये प्रतिरोध उभा राहत असतांना अ.भा.वी.प. विध्यार्थ्यांच्याच
विरोधात रस्त्यावर आहे. अण्णा हजारे आंदोलनाच्या काळात हेच अ.भा.वी.प. वाले कॉंग्रेस
सरकारच्या विरोधात रसत्यावर होते त्यावेळी एन.एस.यु.आय चे
कार्यकर्ते तेंव्हा सरकारची बाजू मांडत होते. या अश्या काळात डाव्या विद्यार्थी
संघटनांनीच विध्यार्थ्यांचे प्रश्न खर्या अर्थाने मांडले.
जल,जंगल,जमीन आणि विद्यार्थी आंदोलन
पारंपारिक पद्धतीचे
लढे आता कालबाह्य होत आहेत. संघर्ष्यांच्या पारंपारिक रचनेचा नव्याने विचार केला जात आहे. सुठे-सुठे प्रश्न घेऊन होणत्याही प्रकारचे यश येत नाही याची जाणीव चळवळीना होत आहेत. नवउदारमतवादी
अर्थव्यवस्थेच्या विरोधात नवीन “जागतिक सामान्यजन”उभे राहतांना दिसत आहे. या नवीन प्रकारच्या चळवळी देश, धर्म, प्रांत, भाषा, जात, रंग,वर्ण याच्यापलीकडे (दुर्लक्ष करून नये तर
गंभीरपणे विचार करत) जात नवीन प्रकारचा जागतिक पातळीवर पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जगभरात जल,जंगल आणि जमीन
बचावासाठी संघर्ष उभे राहिले आहेत. आफ्रिका, दक्षिण
अमेरिका, आशिया या
सारख्या पूर्व वसाहतीक देशांमध्ये नवीन प्रकारे विकासाचे नाव घेत साम्राज्यवाद येत
आहे.भारतात
निलगिरी डोंगर बचाव समिती स्थापन झाली आहे, गंगा मैया बचाव समिती आहे, समन्यायी पाणी वाटप चळवळ आहे, जंगल बचाव समिती, मानव-निसर्ग केंद्रित चळवळ
अश्या अनेक संस्था,संघटना जल,जंगल आणि जमिनीला घेवून काम करीत आहे. पारंपारिक विद्यार्थी आंदोलनाचे ट्रेड युनिअन प्रमाणेच
संस्थानीकरण झाल्यामुळे नव विद्यार्थी चळवळ उभी राहत आहे. मारुती सुझुकीच्या आंदोलनात हजारो
विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्यामुळे जे.एन.यु च्या आंदोलनालाही मारुती सुझुकीच्या कामगारानी पाठींबा दिला.
महाराष्ट्रात
नवीन प्रकारच्या या विद्यार्थी आंदोलनाची चळवळ धीम्या गतीने उभी राहतांना दिसत आहे. डाऊ केमिकल कंपनीच्या
विरोधात विध्यार्थ्यांचाही युवा भारत संघटनेच्या माध्यमातून सहभाग होता. समन्यायी पाणी
वाटपाच्या लढाईत श्रमिक मुक्ती दलच्या वतीने विद्यार्थी सहभागी झाले होते. मान च्या शेतकरी
आंदोलनात आणि चाकणच्या सेझ विरोधी आंदोलनात सत्यशोधक जन आंदोलनच्या माध्यमातून
विद्यार्थी सहभागी झाले होते. लोकायत, नव समाजवादी
पर्याय, आदिवासी
विद्यार्थी आघाडी, दलित आदिवासी अधिकार आंदोलनच्या वतीने व्यापक प्रश्नावर काम उभे केले जात आहे. मुंबई-दिल्ली औद्योगिक
कॅर्रीडोर, मुंबई-बंगळूरू औद्योगिक
कॅरीडोर विरोधात विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहेत. बर्याच शेतकऱ्यांच्या जमिनी या कॅर्रीडोर
मध्ये जाणार आहे. आधीच शेतीच्या संकटाने ग्रस्त असलेला शेतकरी पुन्हा संकटात संपण्याची वेळ आली
आहे. अश्या वेळेला
देशोधडीला लागणारा शेतकरी पार्श्वभूमी असलेला विद्यार्थी या विरोधात मोठ्या
प्रमाणात उभा राहण्याची शक्यता आहे कारण हा फक्त शेतीवर घाला नसून संस्कृतीवरच
घाला आहे. संस्कृतीच्या
रक्षणासाठी वारकर्यांच्या माध्यमातून व्यसन मुक्ती संघ, महानुभावांच्या वतीने महानुभाव चिंतन
परिषद, लिंगायतांच्या
वतीन बसव ब्रिग्रेड अश्या अनेक संघटना उभ्या राहतांना दिसत आहे. भौतिक प्रश्नांवर
भुमिका घेण्यासाठीच सर्व धर्मीय-सर्व पंथीय सामाजिक परिषदेची स्थापना झाली त्याचे कार्यक्रम व्हावे म्हणून
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कष्ट घेतलेले दिसून येतात. विद्यार्थी चळवळ एका अश्या टप्प्यावर येवून उभी राहिली आहे.कि, तिला व्यापक झाल्याशिवाय
पर्याय नाही. म्हणून
महाराष्ट्रातील सर्वच विध्यापीठांमध्ये व्यापक पातळीवर सामाजिक प्रश्नाची चर्चा
होतांना दिसत आहे.
प्रेम,अभिव्यक्ती,लैंगिकता आणि विद्यार्थी
माघील वर्षी
केरळमध्ये पबमध्ये बसलेल्या तरुण-तरूंनीना काही तथाकथित संस्कृतीरक्षकांनी मारहाण केली होती. त्याच्याविरोधात
देशभरात “किस ऑफ लव्ह” हे आंदोलन तरुणाईच्या
उस्पुर्त प्रतिसादाने निर्माण झाले. तसेच देशतील अनेक विध्यापीठात “बीफ बंदी” करून सरकारने विध्यार्थ्यांचा खाण्याचा अधिकारच नाकारला, सुरक्षिततेच्या नावाखाली विध्यापीठांमध्ये
पोलीस चौक्या उभ्या केल्यात यासर्वांच्या विरोधात विध्यार्थ्यानी निषेध नोंदवला
आहे.
महाराष्ट्रात
आधीपासूनच संस्कृतीच्या नावाखाली प्रेम करणाऱ्या विध्यार्थ्यांना मारहाण करण्याचे
प्रयत्न शिवसेनेच्या विद्यार्थी आघाडीकडून नेहमी झालेले आहेत. सध्या महाराष्ट्रात छोट्या-छोट्या संस्कृतीरक्षक
संघटना गल्लीबोळात उभ्या राहतांना दिसत आहेत. अश्याच एका संघटनेने लातुरातील एका
युगुलाला मारहाण केली त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्याचा निषेध झाला. लातुरात
त्याच्याविरोधात जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये मोठ्याप्रमाणात मुलींचे प्रमाण
होते. समलैंगिक
समूहांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. संस्कृतीरक्षकाकडून त्यांना मानसिक रुग्ण आणि पाश्चिमात्य ठरविले जात आहे. या सर्वांच्या विरोधात
महाराष्ट्रात right to love ही अनेक विद्यार्थी-तरुणांनी एकत्र येवून चळवळ सुरु केली आहे.
विध्यार्थ्यांमध्ये
प्रेम,लैंगिकता,आणि अभिव्यक्ती याला
घेवून दोन गट पडले आहेत. काही तरुण याला विरोध करतात तर काही लोक याचे समर्थन करत आहेत. विशेषतः उजव्या
विचारांशी बांधिलकी मानणारे तरुण याला विरोध करतांना दिसतात. यामध्ये तरुणीचे प्रमाण कमी असते. एकीकडे सामाजिक स्थित्यांतरामुळे
आधीची सामाजिक, लैंगिक पकड कमी होत आहे तर त्याचवेळी दुसरीकडे अंध संस्कृती प्रेमाचा उमाळा
येत आहे. अश्या काळात
आंतरधर्मीय प्रेम करणाऱ्या तरुणी-तरुणाला टार्गेट केले जात आहे आणि नवीन प्रकारे मुलींवर जातीचे-धर्माचे बंधन टाकण्याचा
प्रयत्न केला जात आहे परंतू काळच बदलला असल्यामुळे “लव आझाद आहे” चा नारा देत प्रेम करणार्यांना पाठींबा देणाऱ्या संघटना वाढत आहेत. विद्यार्थी संघटनाकडून
किंवा विध्यार्थ्यांकडून अंतरजातीय-धर्मीय विवाह मेळावे आयोजित केले जात आहेत.येणाऱ्या पुढच्या काळात प्रेमाचे राजकीयीकरण मोठ्या
प्रमाणात होणार आहे कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध जाती-धर्माशी आहे.
Occupy wallstreet ते occupy UGC: प्रतीरोधाचे ग्लोबल-लोकल प्रतिरूप
विद्यापीठ अनुदान आयोगाने नॉन नेट फेलोशिप
बंद करण्याचे जाहीर करताच केंद्रीय विध्यापीठांमध्ये त्याविरोधात मोठा निषेधाचा
सूर उभा राहिला. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी (ज्यांना हल्ली मनुस्मृती इराणी म्हटले जाते ) यांनी शिक्षण
विकण्याचा धंदा सुरु केला अशी भाषा करत विद्यार्थ्यांनी WTO च्या करारावर भारत सरकारने स्वाक्षरी करू
नये यासाठी आंदोलन सुरु केले. occupy wallsteet च्या धर्तीवर occupy UGC हे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी दिल्ली च्या बाहेर या आंदोलनाला
पाठींबा मिळाला नाही कारण नॉन नेट फेलोशिप केंदीय विध्यापीठांना आणि एक-दोन राज्य
विध्यापीठांनाच मिळते. WTO च्या मुद्द्याला व्यापक बनवून महाराष्ट्रातही यासंदर्भात अनेक प्रकारचे आंदोलन
करण्यात आले. केंद्रीय
पातळीवर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्रात त्या
धर्तीवर समितीचे गठन करण्याचा प्रयत्न चालू आहे. पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर याठिकाणी आंदोलन करण्यात आलीत. या सर्व आंदोलनात
डाव्या विद्यार्थी संघटना व फुले-आंबेडकरी विद्यार्थी संघटनाचा सहभाग होता.
महाराष्ट्रात
दलित, ओबीसी,भटके-विमुक्त,आणि आदीवासी
विध्यार्थ्यांच्या शिष्य्वृतीचा गंभीर प्रश्न आहे. व्यावसायिक शाख्येंमध्येतर भरमसाट फिस
आकारली जात आहे. विध्यार्थ्यांच्या सरकारी वसतीगृहांच्या कारभारात अनेक प्रकारचे भष्ट्राचार
होत आहे. दुष्काळग्रस्त
भागातील विध्यार्थ्यांचे प्रश्न तर सरकार दरबारी पडून आहेत. हि सर्व प्रश्न आजही आपला पिच्छा सोडत
नाही. डी.एड आणि बी.एडग्रस्त लाखो
विद्यार्थी आजही आशा ठेवून आहेत. काहींनी आशा सोडून स्पर्धा परीक्षेचा आभ्यास करायला सुरुवात केली आहे. शिक्षणसम्राट लोक प्राध्यापकाच्या
नोकरीसाठी विध्यार्थ्यांकडून २५-३० लाख रुपयांची मागणी करतात. तासिका तत्वावर शिकवणाऱ्या तरुण प्राध्यापकांना योग्य मोबदला दिला जात नाही. अश्या अनेक समस्यांनी
आजही महाराष्ट्रातील विद्यार्थी समस्याग्रस्त आहे म्हणून occupy UGC आंदोलन हे त्या
अर्थाने खूप महत्वाचे आहे कारण त्याने विद्यार्थी लढ्यात नवीन प्राण ओतला आहे.
सत्तेचे राजकारण आणि विद्यार्थी स्वायत्ततेचा प्रश्न
प्रत्येक
विद्यार्थी संघटनेची स्वत:ची विचारधारा असते. तसेच स्वतःचे राजकारण असते हे जरी मान्य केले तरी विद्यार्थी म्हणून
विद्यार्थी संघटनेला काही स्वायत्ता असायला हवी. अन्यथा सत्तेच्या राजकारणात
विध्यार्थ्यांचा वापर होतो. बर्याच विध्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लागते. सध्याची देशातील परिस्थिती पहिली कि
विद्यार्थी स्वायत्तता धोक्यात आहे असे दिसते. जे.एन.यु. च्या
विध्यार्थ्यांच्या विरोधात ज्याप्रकारे संघ-भाजपने प्रचार केला त्यातून भयानक चित्र रंगविले गेले. सर्व सामान्य
नागरिकांच्या भावनेशी खेळून लोकांना विध्यार्थ्यांच्या विरोधात उभे केले.
विद्यार्थी संघटनेचे
राजकारण आजकाल विद्यार्थी कमी करतात आणि संबंधित राजकीय पक्षच त्यांची ध्येय धोरणे
जास्त ठरवतात. डाव्या पक्ष्यांमध्ये आणि विद्यार्थी संघटनांमध्ये थोड्याफार प्रमाणात लोकशाही
आहे अन्यथा सगळीकडे लोकशाहीच्या नावाने अंधकारच आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रात होवू घातलेल्या
विद्यार्थी निवडणुका जर खरच लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी होत असतील तर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, राजकीय पक्ष्यांनी
विद्यार्थी स्वायत्ततेचा प्रश्न लावून धरला पाहिजे तरच विद्यार्थी चळवळीला भविष्य
आहे अन्यथा राजकारणाचे गुन्हेगारीकरण आधीच झाले आहे. एखाद्याच्या जीवाची किंमत आजकाल २-४ हजार रुपये झाली आहे. कोणीही –कुठेही खून करू शकतो. त्याचा पत्ता लागत
नाही हे आपणास माघील वर्षभरातील खुनाच्या घटनेतून समजलेच असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा