वारकरी चर्चाविश्व समजून घेतांना...!
१)
वारकरी चळवळ\धर्म\संप्रदाय याविषयी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,
राजारामशास्त्री भागवत यांनी केलेले लिखाण आपण आधी वाचायला हवे.
नास्त्रिक, पुरोगामी, समाजवादी,
आंबेडकरवादी आणि कम्यूनिस्ट
लोकांनी चळवळ म्हणून विचार आणि व्यवहार करायला हवा होता. तो काहींचा अपवाद सोडला
तर झालेला दिसत नाही.
२) वसाहवाद या संदर्भात विशेषत: समजून घेतला पाहिजे, कारण हल्ली अस्तित्वात असलेले वारकरी चळवळीतील बहुतेक विचार आणि व्यवहार
हे वसाहतीक वळणाने निर्माण झाले आहेत. जोग महाराज, दांडेकर
महाराज यांच्या वसाहतीक काळातील प्रयत्नांनी वेगळेच वारकरी स्वरूप जन्मला आले आहे.
३) फुले- मुकुंदराव पाटील यांचा वारकरी चळवळीशी चिकित्सक आरोग्यदायी संवाद चालू
होता, त्यामुळे बहुजन समाजातील वारकरी लोक वसाहतीक काळात
सत्यशोधक आणि वारकरी जास्त वेगळे नाहीत असा विचार करत होते. यामध्ये शेती, शेतकरी प्रश्न, समस्या ह्यांची महत्वाची भुमिका
होती.
४) पूर्वीच अस्तित्वात असलेला परंतू वसाहवादाने राजकीयदृष्ट्या अधिक गतिशील
केलेला ब्राह्मण-ब्राह्मणेत्तरवाद सुद्धा वारकरी चळवळ/धर्माच्या निमित्ताने समजून
घेतला पाहिजे कारण, वारकरींमध्ये असंख्य ब्राह्मणवादी आणि ब्राह्मणेत्तरवादी
लोक दिसतात.
५) आंबेडकरी आंबेडकरी चळवळीने वारकरी परंपरा यांच्या विषयी मांडणी
करतांना चोखोबाचे काय करायचे हा प्रश्न उरतोच. इतरांनी 'महार'
आहे म्हणून स्वीकारला नाही आणि महार बौद्ध झाले म्हणून चोखोबा आता
'आपला' नाही अशी भुमिका सुद्धा काही
शुद्धबुद्धवादी लोक घेतात तेंव्हा परंपरा म्हणजे नेमकं काय? असे प्रश्न निर्माण होतात. काही लोक चोखोबाशी
नाते न सांगता डायरेक्ट विठ्ठल हाच बुद्ध आहे, त्यामुळे आम्ही
डायरेक्ट त्याच्याशीच नाते सांगू अशी भुमिका घेतात. काहींना चोखोबा चालत नाही पण
बुद्धरुपी विठ्ठल चालतो. वारकरी चळवळीच्या इतिहासात चोखोबांचे एकमेव असे घर आहे कि,
ज्यांनी सगळ्यांनी वारकरी धर्माच्या/ संप्रदायाच्या तत्वज्ञानाला,
साहित्याला आणि विचारला विकसित केले.
६) विठ्ठल ही लोकपरंपरा आहे
आणि तो लोकदेवता आहे...त्याचे वैदिकीकरण आणि अवैदिकीकरण करण्याचे असंख्य प्रयत्न
होतात...पण तो बिचारा विठ्ठल महासमन्वयक असल्याने सगळ्यांनांच सामावून घेतो...आणि
त्यांची गोची करतो....भेदाभेद अमंगळ मानणाऱ्या आणि हरिहरेश्वर भेद मिटवणारया
विठ्ठलाला वैदिक-अवैदिक, शैव-वैष्णव, ब्राह्मणी-अब्राह्मनी
असे म्हणून त्याची सकलता आणि समग्रता काही लोक संपवू पाहत आहेत. जनाधार असलेला
लोकदेवता असल्यामुळे अनेकमार्गानी विठ्ठलाचे अपहरण चालू आहे.
७) फाटक, बेडेकर, सरदार, कोलते
यांच्यापासून ते पाटील,
मोरे, ढेरे, कसबे, सोनवणी
यांच्यापर्यंत पांगारकर,
आजगावकर, भावे, राजवाडे,
रानडे, भागवत, शिंदे
यांच्यामाध्यामातून झालेली चर्चा आणि त्यातून विकसित झालेले "वारकरी चर्चाविश्व" हे सगळ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.
८) विठ्ठल
हा सिद्धांत ( Theory) आणि व्यवहार (Practice) अशा दोन्ही बाबींचा विषय आहे. म्हणून तर त्याच्या प्रभावातून "...जे
खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिर्ती वाढो, भूता परस्पर
घडो मैत्र जीवांचे." असे ज्ञानोबा माऊली म्हणतात आणि "...भले तर देवू गांडीची
लंगोटी , नाठाळांच्या माथी हाणू काठी." असे जगतगुरू
तुकोबाराय म्हणतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा