देवकुमार अहिरे
इतिहास संशोधक विद्यार्थी, इतिहास विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मो. ९९२३७७७२३२
प्रस्तावना
१८१८
मध्ये इंग्रजी सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. इंग्रजी सत्तेला लोकांची मान्यता
मिळावी म्हणून इंग्रजी ज्ञानरचनेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवून लोकसमंती
मिळवण्यात आलेली दिसते. मिशनरी लोकांच्या शिक्षण आणि धर्मप्रचाराच्या कार्यामुळे
एक नैतिक आव्हान महाराष्ट्रात निर्माण झाले त्यातून मानवधर्म सभा, परमहंस मंडळी,
प्रार्थना समाज, आर्य समाज यांच्या सारख्या संस्था निर्माण झाल्या त्यातून
धर्मसुधारणा, स्त्रीसुधारणा, शिक्षण या संबंधी कार्य सुरु झाले. ब्राह्मण आणि
तत्सम जातींमधून आलेल्या लोकांनी ह्या संस्था चालविल्या असल्यामुळे त्यांच्या
कामाला विशिष्ट पातळीची मर्यादा होती.
म्हणून यापैकी कोणतीही संस्था खऱ्याअर्थाने शूद्रातिशूद्र लोकांचे प्रतिनिधित्व
करत नव्हती. महात्मा जोतीराव फुले यांनी
पहिल्यांदा परिघाच्या बाहेरच्या लोकांचा आवाज स्पष्टपणे इंग्रजीसत्तेला आणि
ब्राह्मणीधर्माच्या ठेकेदारांना ऐकवला. ब्राह्मण समाजसुधारकांच्या ‘कौटुंबिक
सुधारणे’त अडकलेला स्त्रीप्रश्न फुल्यांनी
व्यापक पातळीवर नेला म्हणूनच मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे यांच्या
सारख्या शोषित-अंकित समूहातील स्त्रिया लिहू लागल्या. सावित्रीबाई रोडे या सुद्धा
स्त्रियांच्याच परंपरेतील आहेत. जोतीरावांचा शिक्षणाचा वैचारिक वारसा असल्यामुळे
सावित्रीबाई रोडे यांच्या सारखी भटक्या समाजातील बाई ‘विद्यादेवी’ होती ही काही
साधारण गोष्ट नाही. सावित्रीबाईंनी आपले
संपूर्ण आयुष्य शिक्षणप्रसार करण्यासाठी खर्ची घातले. त्यांनी स्वतःच्या रामोशी समाजाची उन्नती
व्हावी म्हणून केलेल्या कार्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत.
सावित्रीबाई रोडेंचे कार्य आणि कर्तृत्व
महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाला अव्वल इंग्रजीत पाश्चात्य विद्येच्या संस्कारांमधून प्रारंभ झाला.[३] इंग्रजी विद्या, इंग्रजी विचार आणि इंग्रजी आचाराने एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि तात्विक क्षेत्रात मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली त्यातून अनेक संस्था आणि संघटनांची स्थापना या काळात झाली आणि ज्या धार्मिक व सामाजिक चळवळी झाल्या, त्या सर्वांचा जातिभेदाला तत्वत: विरोध होता परंतू त्यांचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी अवलंबिलेल्या मार्गात पुष्कळच फरक होता...जातीसंस्थेतील अन्याय आणि विषमता यांचा ज्यांना पिढ्यानपिढ्या सहन करावा लागत होता, अशा शूद्रातिशुद्रांवर महात्मा फुले यांनी आपल्या चळवळीची भिस्त ठेवली होती[४] आणि म्हणूनच महार, मांग, कुंभार, माळी, कुणबी, रामोशी अशा शूद्रातिशूद्र जातींचा फुलेंच्या सत्यशोधक समाज चळवळीत महत्वाचे स्थान होते. सत्यशोधक चळवळीच्या मार्गदर्शनाखाली किंवा सोबतच पुढील काळात विद्यादेवी सावित्रीबाई रोडे यांनी रामोशी जातीच्या उन्नतीसाठी भरीव कामगिरी केली. सावित्रीबाई रोडे म्हणजे धोंडीबा रोडेंच्या सुनबाई. १८५६ साली सनातनी ब्राह्मणांच्या कटकारस्थानाला बळी पडून धोंडीराम नामदेव कुंभार आणि धोंडीबा रोडे हे दोघे जोतीबा फुल्यांना मारण्यासाठी आले होते...फुलेंनी त्यांच्याशी संवाद साधला ह्यातून त्यांचे हृदयपरिवर्तन झाले.[५] पुढील काळात धोंडीबा रोडे हे महात्मा फुले यांचे एकनिष्ठ अनुयायी झालेत. प्रसंगी जोतीरावांच्या अंगरक्षकाचे कामही ते करत. अशा या धोंडीबांकडे, जोतीरावांचे अधूनमधून जाणे येणेही होते...सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपूर्वी जोतीरावांनी गुलामगिरी ग्रंथाचे लेखन पूर्ण केले होते. जोतीबा-धोंडीबा या दोहों व्यक्तिरेखांच्या माध्यमातून संवादात्मक शैलीत हा ग्रंथ साकारला आहे. जोतीबा ही व्यक्तीरेखा दस्तूरखुद्द जोतीराव फुले यांनीच साकारली. शेष धोंडीबा ही व्यक्तिरेखा धोंडीबा रोडे यांना समोर ठेवून त्यांनी उभी केली असावी. या व्यक्तिरेखेतून जोतिबांचे आणि धोंडीबा रोडे यांच्या अनुषंगाने स्नेहाचे दर्शन वाचकांना होत राहते.[६]
विसाव्या शतकाच्या आरंभापासून सत्यशोधक विचारांच्या विविध परिषदा भरू लागल्या.
या परिषदांमधून बहुजन समाजाच्या उन्नतीविषयी चर्चाही होवू लागली. सावित्रीबाई रोडे
या हाडाच्या सत्यशोधक कार्यकर्त्याला स्वजन रामोशी सर्वाहारा बांधवांच्या
उन्नतीसाठी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला.[७]
त्यासाठी संघटीत प्रयत्नाची गरज होती म्हणून रामोशी संघाची स्थापना ता ५-१२-१९१६ रोजी
झाली. समाज स्थापन करण्याचे कारण कोणते असेल तर ते रामोशी जातीवर ओढलेला अत्यंत
अडचणीचा काल हा होय. रामोशी बंधूंची दिवसेंदिवस अतिशय बिकट स्थिती होत चालली आहे.
जीवनकलहामुळे मध्यम स्थितींतील लोकांना
केवळ उदरनिर्वाहाची देखील पंचाईत पडत असून कनिष्ट स्थितीतील लोकांना फार
त्रास होत आहे... एका व्यक्तीस सर्वस्वी ज्ञातीकार्यास वाहून घेणे कठीण पडते. अशा
स्थितीत संघशक्तीचा एकच मार्ग दिसतो म्हणूनच संघशक्तीच्या जोरावर ज्ञाती
शिक्षणाचे, ज्ञाती जागृतीचे, ज्ञाती सेवेचे व ज्ञाती दु:ख निवारणाचे काम आपल्या
हातून शक्य तितके व्हावे या उद्देशाने संस्थेची स्थापना झाली आहे. हाच या संघाचा
उद्देश आहे. व ज्ञाती बांधवाचे कल्याणाचे उपाय योजिले जातील...ज्यांना आपल्या
रोजच्या व्यवसायातून थोडासा फुरसतीचा वेळ ज्ञातीसेवेत खर्चावयाची इच्छा असेल,
त्यांनी अवश्य या संस्थेस येवून मिळावे व आपल्या बुद्धी, ज्ञान, द्रव्य, अनुभव
उत्साहादिकांचा लाभ संस्थेस द्यावा ही नम्र विनंती आहे.[८]
सावित्रीबाई रोडे रामोशी संघाच्या
संस्थापक सचिव होत्या. रामोशी संघ स्थापन करते प्रसंगी इंग्रज प्रशासनाशी
राजनिष्ठ, शिक्षण सक्तीचे आणि विनामुल्य असावे, सनातनी मंडळींच्या राज्यकारभारापेक्षा
इंग्रजीसत्ता रामोशी समाजाच्या हिताची, रामोशी समाजाचे गुन्हेगारी दाखले बंद
करावेत, धर्मगुरुंचे धार्मिक वर्चस्व संपुष्टात आणून आपले धार्मिकविधी आपण करावेत
आदी ठराव याप्रसंगी पारित करण्यात आले आहे.[९]
रामोशी संघाच्या स्थापनेवेळीच
इंग्रज प्रशासनाशी राजनिष्ठ असल्याची शपथ त्यांनी घेतलेली दिसते कारण आधीच्या
रामोशींच्या संघटीत प्रतीरोधांना वसाहतिक
सत्तेने चिरडून टाकले होते याचा इतिहास ताजा होता. हे एक कारण असावे किंवा
मग भटशाई पेक्षा आंग्लांई बरी हा सत्याशोधाकीय विचारांचा संस्कार असल्यामुळे इंग्रजी
सरकारमुळेच आम्हला इंग्रजी विद्या मिळत आहे अशी धारणा झाली असावी.
क्षत्रिय रामोशी संघाच्या माध्यमातून रामोशी
शिक्षण परिषदा भरविण्यात आल्या. १५ एप्रिल १९१९ रोजी मुक्काम देवराष्ट्र, तालुका
खानापूर, जिल्हा सातारा येथे नानाभाऊ नाईक, सालरू नाईक आदींच्या सहकार्याने पहिली
रामोशी शिक्षण परिषद आयोजित केली होती.[१०]
सन १९२० सालच्या मे महिन्यात दुसरी
प्रांतिक रामोशी शिक्षण परिषद चिंचवड भरली होती. या परिषदेसाठी सावित्रीबाईंनी अथक
परिश्रम घेतले. त्यांची शिक्षणावरील अढळ निष्ठा पाहून त्यांना या परिषदेने
एकमुखाने ‘विद्यादेवी’ म्हणून गौरविले.[११]
एकूण नऊ रामोशी शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. शेवटची म्हणजे
नववी शिक्षण परिषद मोजे महिमागड, तालुका माण,जि. सातारा येथे मोठ्या उत्साहात १७
मार्च १९२५ रोजी भरली. या परिषदेत तात्यासाहेबांचे (तात्यासाहेब रोडे व
सावित्रीबाई रोडे यांचा) नऊवर्षीय चिरंजीव शंकरराव रोडे यांनी निबंध सादर केला.[१२]
या शिक्षण परिषदांमध्ये रामोशींच्या
शिक्षणाची, गुन्हेगारी जमाती कायद्याची, रामोशींच्या इतिहासाची, सामाजिक, धार्मिक आणि नैतिक सुधारणांची चर्चा
करण्यात येत असे. अहमदनगर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यातील रामोशींचा या शिक्षण
परिषदेत मोठा सहभाग होता. वसाहतीक काळात प्रत्येक
चळवळीची भूमिका मांडण्यासाठी वर्तमानपत्र किंवा मासिक असत. क्षत्रिय रामोशी संघाने
सुद्धा आपली भूमिका लोकांपर्यंत जायला हवी आणि आपल्या जातसमूहातील लोकांची जोडून
घेता यावे म्हणून ‘क्षत्रिय रामोशी (रामवंशीय)’ हे मासिक १९२३ मध्ये सुरु केले.
फेब्रुवारी १९२३ मध्ये या मासिकाचा पहिला अंक छापून आला. आर्थिक परिस्थिती खूप
स्थिरस्थावर नसल्यामुळे मासिक काढणे त्यांना परवडत नसावे म्हणून मे-जून, १९२३ चा
४-५ संयुक्त अंक त्यांनी काढलेला दिसतो. पुढील अंक नाहीत यावरून हे मासिक बंद पडले
असावे असा तर्क आपण लावू शकतो. या मासिकामध्ये क्षत्रिय रामोशी संघाच्या बैठकींचा
अहवाल, रामोशी शिक्षण परिषदेचे वृत्तांकन, जुने लेख, रामोशी जातीचा क्रमश:
इतिवृत्तांत आणि सत्यशोधक, ब्राह्मणेत्तर चळवळीच्या काही बातम्या येत असत.
सत्यशोधक समाजाच्या एकूण चर्चाविश्वात
‘विद्येला’ खूपच महत्व असल्याने सावित्रीबाई रोडे आणि क्षत्रिय रामोशी संघात
सुद्धा विद्येला अत्यंत महत्व दिलेले दिसून येते. सावित्रीबाईंनी शिक्षण, विद्येचे
फायदे असे निबंध सत्यशोधक समाजाच्या आणि रामोशी शिक्षण परिषदेत सादर केलेले
दिसतात. एका ठिकाणी सावित्रीबाई म्हणतात की, “ विद्या हे मानवविकासाचे धन आहे.
ते इतरांना वाटले तर विकसित होते.”[१३] विद्येच्या
मार्गातूनच रामोशी जातीचे प्रश्न सुटू शकतात असे त्यांना वाटत होते. ‘रामोशी अनाथ
बोर्डिंग’ बांधून रामोशी जातीतील मुलांसाठी निवासीगृह त्यांनी सुरु करण्याचा
प्रयत्न होता.[१४] सावित्रीबाई रोडेंनी क्षत्रिय रामोशी संघ,
रामोशी शिक्षण परिषद आणि क्षत्रिय रामोशी (रामवंशीय) मासिक यांच्या माध्यामातून
रामोशी जातीची उन्नती करण्यासाठी शिक्षण आणि विचारांचा प्रचार, प्रसार केला, गुन्हेगारीच्या जाचातून सुटका करण्यासाठी
सरकारदरबारी अर्ज, विनंत्या केल्या आणि सोबतच सत्यशोधक समाजासोबत सामाजिक, धार्मिक
आणि नैतिक बदल रामोश्यांमध्ये घडून यावेत यासाठी प्रयत्न केले. हे सर्व करत
असतांना वेगळ्या प्रकारे रामोशी जातीचे पुनरुत्पादन होतांना दिसते.
समारोप
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनात
सावित्रीबाई रोडेंना योग्य न्याय मिळालेला नाही. इतिहासलेखनाचे समाजशास्त्र हे
अभिजनवादी असल्यामुळे म्हणा किंवा शोषित-अंकीतांची इतिहास अनास्था म्हणा पण,
सावित्रीबाई रोडेंकडे दुर्लक्ष झाले ते झालेच. भटक्या रामोशी जातीतील एक स्त्री
शिक्षण, विद्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव काम करते हे तरच महाराष्ट्रात आदर्श
म्हणून पाहिले गेले पाहिजे होते पण, जातिव्यवस्थेमुळे सावित्रीबाई रोडे दुर्लक्षित
राहिलेल्या दिसतात. वसाहतिक काळात इंग्रजी सत्तेशी पत्र, विनवण्या करून आपल्या जातीचे
प्रश्न सोडणावारी, वेळप्रसंगी रामोशी
शिक्षण परिषद भरवणारी, रामोशी बोर्डिंग काढणारी आणि रामोशी मासिक चालवणारी ही
कर्तृत्ववान स्त्री रामोशी जातीच्या स्मृतीतून सुद्धा नामशेष झाली की काय असाच
प्रश्न उपस्थित होतो कारण, उमाजी नाईक यांची आठवण काढणाऱ्या आणि त्यांची जयंती
उत्साहाने साजरी करणाऱ्या या जातीला आपल्या जातीतील विद्यादेवीचा पुनर्शोध
घेतल्याशिवाय पर्याय नाही.
[१] सावित्रीबाईंच्या शिक्षणक्षेत्रातील कामाचे महत्व
ओळखून मे १९२० च्या रामोशी शिक्षण परिषदेत लोकांनी त्यांना ‘विद्यादेवी’ ही पदवी
दिली.
[२] इंग्रजीतील Subaltern ह्या शब्दाचा लोक ‘वंचित’
असे भाषांतर करतात पण, ते भाषांतर योग्य नाही.
हा शब्द सर्वप्रथम इटालियन मार्क्सवादी विचारवंत ग्रामची याने वापरला. त्याच्यामते
सत्ताधारी वर्ग संमती (consent) आणि बळजबरी (coerction) च्या माध्यमातून लोकांवर
वर्चस्व आणि प्रभुत्व निर्माण करत असतो म्हणून Subaltern या शब्दासाठी वंचित या
शब्दापेक्षा शोषित-अंकितजन हा शब्द योग्य आहे.
[३] निर्मलकुमार फडकुले, पाउलखुणा: गं. बा. सरदार
यांचे निवडक लेख, कॉनटीनेटल प्रकाशन, पुणे,
पुनर्मुद्रण ११९७, पान क्र. ७३
[४] कित्ता, पान क्र. ८४
[५] जी.ए.उगले,विद्यादेवी सावित्रीबाई रोडे,
दिग्नाग प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती २०१६, पान क्र. १
[७] कित्ता, पान क्र. ७
[१०] कित्ता, पान क्र. ९
[११] कित्ता, पान क्र. १०
[१२] कित्ता, पान क्र. ११
[१३] कित्ता, पान क्र. ४ अधिक
पहा, दीनमित्र , ११ नोव्हेंबर १९१४
[१४] सावित्रीबाईंचे शाहू छत्रपतींना पत्र, १०- ०६ -
१९२१
1 टिप्पणी:
माहितीबद्दल धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा