रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

३ फेब्रुवारी, उमाजी नाईक स्मृती दिनानिमित्ताने थोडे काही...!


३ फेब्रुवारी, उमाजी नाईक स्मृती दिनानिमित्ताने थोडे काही...!

          ३ फेब्रुवारी १८३२ साली उमाजी नाईकांना ब्रिटीश सत्तेने फाशी शिक्षा दिली. आजही अनेक दंतकथा, लोककथा, पोवाडे, स्मृती, गाणी यांच्या माध्यमातून उमाजी नाईकांची स्मृती जपली जात आहे. इतिहास ह्या विषयात इतरांच्या मानाने खूपच उशीरा अभ्यासकांचे लक्ष उमाजी नाईकांकडे गेलेले दिसते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेवढे लोकलढे, बंड झालेत त्यांचे सिद्धांतीकरण करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध इतिहासकार सुमित सरकार यांनी करायचा खूपच सुंदर प्रयत्न त्यांच्या “उत्तर वसाहतीक भारतातील ‘लोक’ चळवळ आणि मध्यम वर्गीय नेतृत्व (१९८३)” या पुस्तकात केला आहे परंतू उमाजी नाईकांच्या लढ्याचे सिद्धांतीकरण करण्यास त्यांच्या मांडणीनुसार मर्यादा येतात कारण, त्यांच्या मांडणीमध्ये प्रथम प्रतिरोध (Primary Resistance) आणि दुसरा प्रतिरोध (Secondary Resistanace) अशी विभागणी केली आहे. इंग्रजी सत्तेचा अवैध प्रवेश झालेल्या वर सुद्धा न बदलेल्या सामाजिक-राजकीय रचनांचा जीर्णोद्धार करण्याची मनीषा बाळगणाऱ्या आणि मुख्यत्वे: पारंपारिक घटकांनी केलेला प्रतिरोध म्हणजे प्रथम प्रतिरोध आणि वसाहतीक सत्तेने खोलवर परिणाम केल्यानंतर भूतकाळाच्या जीर्णोद्धाराच्या पलीकडे विचार करणाऱ्या लोकांनी केलेला प्रतिरोध म्हणजे दुसरा प्रतिरोध. उमाजी नाईकाच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. कारण, १८०३ नंतर पेशव्यांनी रामोश्यांची वतने काढून घेतल्यावर आणि पुढे ब्रिटिशांनी हीच धोरण पुढे अवलंबिल्यामुळे उमाजी नाईकांनी दोन्ही सत्तेंच्या विरोधात आपला लढा उभारलेला दिसतो. १८१८ मध्ये पेशवाई संपल्यामुळे उमाजीचा लढा मोठ्याप्रमाणात ब्रिटीश सत्तेसोबत झाला.
शोषित-अंकित (Subaltern)बोलू शकत नाहीत-
           शोषित-अंकितजन[1] बोलू शकत नाही अशी मांडणी गायत्री चक्रवर्ती-स्पिवाक यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. त्यांची मांडणी तात्विक स्वरुपाची होती पण, ऐतिहासिक धांडोळा घेतला तर आपणास दिसून येईल की, शोषित-अंकितजन इतिहासाच्या टप्प्यांवर नेहमीच बोलत होते, प्रतिकार करत होते आणि प्रतिरोध सुद्धा करत होते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, शोषित-अंकिताविषयी खूपच गंभीरपणे मांडणी करणाऱ्या शोषित-अंकित अभ्यासस्कूल मधून अशी मांडणी कशी झाली असेल तर येथे काही प्रमाणात ‘भद्र’ पूर्वग्रह आड आला असावा असा तर्क आपण लावू शकतो. ब्रिटीश सत्तेच्या विरोधात लढणारा भटक्या जातीतील रामोशी उमाजी नाईक स्वतःचा ‘जाहीरनामा’ काढतो याला आपण काय म्हणणार! स्वत:ला पुरंदर परिसराचा राजा म्हणून जाहीर करतो हे काही लहान गोष्ट नाही. त्याकाळी राष्ट्र, राष्ट्रवाद नावाच्या गोष्टींचा विकास झालेला नव्हता त्यामुळे उमाजीला ‘आधुनिक’ स्वरूपातील राज्य निर्माण करायचे होते असे आपण म्हणू शकत नाही. ज्याप्रमाणे काही लोक शिवशाहीत “लोकशाही” शोधण्याचा प्रयत्न करतात. तसा विचार सुद्धा करून चालायचा नाही. हल्लीचे राष्ट्रवादाचे ओझे आपण उमाजीवर टाकू शकत नाही. ब्रिटीश सत्तेला पर्याय देण्यापेक्षा प्रतिरोध उभा करणे हेच उमाजीचे ऐतिहासिक काम आहे कारण, ब्रिटीशसत्ता ही भांडवलशाहीला वाहक होणाऱ्या साम्राज्यवादातून आली होती. तीला संपूर्ण जग पादाक्रांत करायचे होते म्हणून ती १८३२ च्या आधी संपणारी नव्हती.
आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक  की, वासुदेव फडके –
           ‘आद्यक्रांतिकारक’ कोणाला आपण म्हणू शकतो का? हा मोठा प्रश्न आहे. अव्वल ब्रिटीशकाळात एकाचवेळी अनेकठिकाणी ब्रिटीशसत्तेविरोधात भिल, कोळी, मुंडा, संथाल, रामोशी, युसुफजाई अशा अनेक आदिवासी आणि भटक्या जमातींनी लढे, बंड उभारले होते. मग वासुदेव फडकेंना आद्यक्रांतिकारक का म्हटले गेले हा प्रश्नच आहे?  पाठ्यपुस्तकात सुद्धा फडकेंनाच आद्यक्रांतिकारक म्हटले गेले. ‘आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके’ नावाचा मराठी चित्रपट सुद्धा येवून गेला. अनेकांनी आद्यक्रांतिकारक म्हणून मराठी आणि इंग्रजीत वासुदेव फडकेंवर पुस्तके लिहिली. वासुदेव फडकेंनी ब्रिटीशसत्तेविरोधात बंड केले हे सत्यच आहे. त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट काढायला किंवा पुस्तके लिहिल्यामुळे कोणालाच आक्षेप असण्याचे कारण सुद्धा नाही पण, तरीही आक्षेप घेतले जातात हे सुद्धा वास्तव आहे. इतिहासलेखनाचे समाजशास्त्र समजून घेतल्यावर कळते की, मोठ्याप्रमाणात ब्राह्मण जातीच्या लोकांनी इतिहासलेखन केले आहे त्यामुळे कळत-नकळत पूर्वग्रह किंवा स्वजात प्रेम जागे झाले असण्याची शक्यता आहे. इतिहासाचे पुनर्लेखन नवीन संदर्भात, नवीन काळात नेहमी झाले पाहिजे. इतिहासलेखन करणारे सुद्धा व्यक्तीच असतात त्यामुळे त्यांच्या जातीय, धार्मिक, वैचारिक, प्रादेशिक, लैंगिक धारणांना काहीवेळा न कळत आणि काही वेळा जाणीवपूर्वक सुद्धा इतिहासलेखनात येतात. यांची आपण गंभीरपणे नोंद करून घ्यायला हवी. उमाजी नाईकांना तरी आद्यक्रांतीकारक का म्हणावे? असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो आणि पडायला सुद्धा हवा. उमाजीच्या काळात सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळे जनसमूह ब्रिटीशसत्तेविरोधात लढत होते. अनेकजण लढलीत पण उमाजी नाईक नुसता लढला नाही तर त्याने  स्वतःचा जाहीरनामा काढला आणि त्यानुसार कारवाया करायला सुरुवात केली म्हणून उमाजीला आद्यक्रांतिकारक म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते.
कॅप्टन अलेक्झांडर मेकिंगटोश- जीव घेणारा की, स्मृती जागवणारा-
                    उमाजी नाईकांनी ब्रिटीशसत्तेला अनेक अडथळे आणलेत. ब्रिटीशांचा खजिना लुटून नेला. उमाजीला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न ब्रिटीशसत्तेच्या वतीने कॅप्टन अलेक्झांडर मेकिंगटोश याने केले पण, बहुतेक वेळी उमाजी नाईक गनिमी कावा करून निसटून गेला. अनेक प्रयत्नांच्याअंती उमजीला पकडण्यात सरकार यशस्वी झाले. अनेक रुपयांचे बक्षीस सुद्धा त्याच्या नावावर सरकार ने ठेवलेले होते. पुण्यात उमाजीला पकडून आणल्यावर सलग महिने-दोन महिने कॅप्टन अलेक्झांडर मेकिंगटोशने उमाजीला अनेक प्रश्न करत त्याच्याकडून माहिती काढून घेतली. स्वत: उमाजीने माहिती सांगितली असल्यामुळे ही माहिती विश्वसनीय आहे. याच माहितीच्या आधारावर  कॅप्टन अलेक्झांडर मेकिंगटोशने “रामोशी जमातीची उत्त्पती आणि समकालीन परिस्थिती आणि उमाजी नाईकांचे जीवन” हा ग्रंथ लिहून ठेवला आहे. आज ज्या व्यक्तीने उमाजीला पकडले आणि फाशी दिली त्याच व्यक्तीच्या ग्रंथामुळे उमाजीचा नाईकांचा इतिहास तुमच्या-आमच्यात जीवंत आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे. कॅप्टन अलेक्झांडर मेकिंगटोश माध्यमातून वसाहतीक सत्तेची ज्ञाननिर्मिती प्रक्रिया आणि नियंत्रण प्रक्रिया कशी हातात हात घालून चालत होती हे सुद्धा स्पष्ट होते. भारतात इंग्रजीसत्तेचे मुल्यांकन कसे करायचे यावरून हल्लीच्या काळात तर खूपच वाद होतांना दिसत आहे. मनाचे निर्वासाहतीकरण करण्याची प्रक्रिया एकीकडे वसाहतीक काळात जन्माला आलेल्या आधुनिक शिक्षणसंस्था- संशोधन संस्थांमधून होतांना दिसत आहे. आत्मग्लानीत आणि आत्मगौरवात न जाता वसाहतवादाचे मुल्यांकन झाले पाहिजे असे प्रामाणिकपणे वाटते पण, हल्ली स्वदेशी राष्ट्रवादी आणि देशीवादी जाणीवा (मुळात यांच्या प्रेरणा सुद्धा वसाहतिकच आहेत) टोकदार झाल्यामुळे हे तटस्थपणे होईल असे वाटत नाही.
उमाजीच्या इतिहासात जगायचे नसून पुढे जायचे आहे-
          हल्लीच्या काळात सगळ्याच जातीय अस्मिता टोकदार झाल्या आहेत असे अभ्यासक म्हणत आहेत. संसदीय राजकारण, वोट बँक, आर्थिक-सामाजिक विषमता अशा अनेक गोष्टींमुळे ‘जातीय अस्मिता’ नव्याने घडविल्या जात आहे त्यालाच जात्योन्नती असे म्हटले जात आहे. जात्योन्नती म्हणून सगळ्याच जाती आपआपलाच्या जातींच्या इतिहासाचे पुनर्लेखन (बहुतेक वेळा विकृतीकरण) करत आहेत. क्षत्रियकरण होण्याची शक्यता आहे. उमाजीच्या निमित्ताने सुद्धा हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून उमाजीच्या इतिहासात जगण्यापेक्षा उमाजीच्या इतिहासासोबत जगायला शिकायला हवे. उमाजीच्या इतिहासाचा आधार घेवून भटक्या जमातींनी विशेषत: रामोशींनी आपल्या समकालीन शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्नाच्या विरोधात लढायला शिकले पाहिजे. उमाजीकडून अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे, जातीय न्यूनगंड किंवा अहंगंड नाकारला पाहिजे. उमाजी नाईक यांच्याच समाजात “विद्यादेवी सावित्रीबाई रोडें”चा जन्म झाला आहे. त्यांनी आयुष्यभर शिक्षण प्रसारासाठी काम केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा सत्यशोधक वारसा पुढे चालवत सावित्रीबाईंनी समाजाच्या उन्नतीसाठी होस्टेल काढले, शिक्षण परिषद , मासिक काढले.
            उमाजीपासून प्रेरणा घेवून विद्यादेवी सावित्रीबाईंच्या मार्गाने पुढे चालण्यातच समाजाचे भले आहे. 

उमाजी नाईकविषयी अधिक माहितीसाठी १) सदाशिव आठवले, २) आ. ह. साळुंखे ३) बाळासाहेब जाधव यांची पुस्तके पहावीत!


[1] Subaltern ह्या इंग्रजी शब्दासाठी काही लोक वंचित हा शब्द वापरतात पण तो शब्द योग्य नाही आहे.  Subaltern हा शब्द प्रथम ग्रामची ह्या मार्क्सवादी विचारवंताने वापरला आहे. Coersion म्हणजे बळजबरी आणि Consent म्हणजे समंती ह्या दोन गोष्टींच्या माध्यमातून सत्ताधारी समूह ‘वर्चस्व’ आणि ‘प्रभुत्व’ टिकवत असतो म्हणून बळजबरी आणि समंतीच्या आधारे लोकांना वंचित नव्हे तर शोषित-अंकित केले जाते म्हणून शोषित-अंकित हा शब्दच अधिक योग्य आहे. ह्यासाठी डॉ. उमेश बगाडेंनी यासंदर्भात केलेली मांडणी पहावी.

1 टिप्पणी:

Aakash Chowkase म्हणाले...

सुंदर लेखन. धन्यवाद. सत्ताधीश आणि प्रस्थापितांनी लिहिलेल्या इतिहासापलीकडे जाणे कमालीचे अवघड आहे. या लेखनाने त्याला हातभार लागतो आहे. 👍

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...