शनिवार, २७ जानेवारी, २०१८

आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट (वंशविच्छेद) स्मृती दिन


आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट (वंशविच्छेद) स्मृती दिन, २७ जनेवारी २०१८
           
          
                                                 

                                                                देवकुमार अहिरे






टीप-  
      कालच मोठ्या उत्साहात भारताचा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला आहे. अनेकांनी मला शुभेच्छ्या पाठविल्या. मी मात्र कोणालाही शुभेच्छ्या पाठविल्या नाहीत कारण, भारतासारख्या प्रजासत्ताक देशात जातीय विद्वेष, धार्मिक तिरस्कार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण वाढतांना दिसत आहे आणि त्यातून अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते असे दिसत आहे. गृहयुद्ध, वंशविच्छेद, वंशसंहार झाल्यामुळे जगाचे आणि मानवजातीचे काय नुकसान झाले आहे हे इतिहासाने आपल्याला अनेक टप्प्यांवर दाखवून दिले आहे. त्यामुळे कालच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यापेक्षा ( लहानपणापासून प्रजासत्ताक दिन ‘झेंडावंदन’ म्हणून साजरा करतच आलो आहे पण प्रजासत्ताक भारत काही दिसत नाही.) आंतरराष्ट्रीय  ‘होलोकॉस्ट (वंशविच्छेद) स्मृती दिन’ साजरा करावा असे वाटले म्हणून, तुम्हा सगळ्यांना जागतिक होलोकॉस्ट (वंशविच्छेद) स्मृती दिनाच्या खूप साऱ्या शुभेछ्या! ह्या शुभेछ्या पुन्हा एका ‘होलोकॉस्ट’ होवू नये म्हणून आहेत.




            १ नोव्हेंबर २००५ पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने २७ जानेवारी हा आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन म्हणून पाळण्याचा ठराव केला आहे. २०१७ च्या  होलोकॉस्ट (वंशविच्छेद ) स्मृती दिनाची संकल्पना Holocaust Remembrance: educating for a better future (वंशविच्छेद आठवण- चांगल्या भविष्यासाठी एक शिकवण)  अशी होती. या संकल्पनेमधून मानवाधिकारांसाठी आदर वाढविणे, सहिष्णुता वाढवणे आणि माणुसकीचे संरक्षण करणे या भर देण्यात आला.
            नाझी अतिकर्मठ- अतिरेकी राष्ट्रवाद्यांनी ६ वर्षाच्या काळात अंदाजे ६ दशलक्ष ज्यू, २ दशलक्ष रोमानी लोक, २,५०.००० मानसिक आणि शारीरिक अपंग लोक आणि ९,००० समलिंगी लोकांची नाझी सैन्याने आणि त्यांच्या सहयोगी लोकांनी क्रूरपणे हत्या केली. वेगवेगळ्या जैविक आणि रासायनिक प्रयोग करून अनेक लोकांना कर्मठ –अतिरेकी राष्ट्रवादी नाझी डॉक्टरांनी मानसिक आणि शारीरिक अपंग केले. अनेकांची जाणीवपूर्वक नसबंदी केली होती. अनेकांना छळ छावणीत डांबून मारून टाकण्यात आले होते. नाझींच्या एस.एस., एस.डी., गेस्टापो, एस.ए., यांच्या सारख्या गुप्तचर, अर्ध सैनिकी आणि हिटलरच्या विशेष मर्जीच्या संस्था- संघटनानी अनेक सामुहिक हत्याकांडे घडून आणलीत. आउश्वीक ही सगळ्यात मोठी छळ छावणी होती. सगळ्यात जास्त लोकांची सामूहिक हत्या येथे केली गेली. रशियन रेड आर्मीने २७ जानेवारी १९४५ रोजी ही छावणी ताब्यात घेतली आणि तेथील शिल्लक राहिलेल्या लोकांची मुक्तता केली म्हणून २७ जानेवारी हा ‘होलोकॉस्ट (वंशविच्छेद) स्मृती दिन’ साजरा करण्यात येत आहे. या छळ छावण्यांच्या स्मारकांमध्ये आजही “ राजकीय हिंसेच्या वस्तू’ उदा. कपडे, जोडे, खोपडी इ. अशा अनेक गोष्टी पहायास मिळतात.
            आज जर्मनीच्या वंशविच्छेदाच्या स्मृतीबरोबरच, रवांडा, युगांडा, झेकोस्लोवाकीया, जपान, चीन, रशिया, भारत-पाकीस्थान फाळणी, सुदान, नायझेरिया आणि अलीकडचे भारतातील शीख सामुहिक हत्याकांड, काश्मिरी पंडित बळाने लादलेले हिंसक विस्थापन आणि गोध्रा वंशसंहार या सगळ्यांसोबतच वसाहतवाद आणि मुलतत्ववादी धर्माध शक्तींनी केलेला जगभराचा वंशसंहार, जमातवादी दंगे, जात-जमातीय दंगे आणि हिंसा यांच्या सांस्कृतिक राजकारणाचा आणि इतिहासाचा शोध घेतला गेला पाहिजे.  १) जगभराचा इतिहास हा हिंसेच्या इतिहासाने भरून पडला आहे. त्यामुळे हिंसेच्या प्राचीन इतिहासापासून ते आधुनिक इतिहासापर्यंत शोध घेतला पाहिजे आणि त्यात बदल- सातत्य या विकासक्रम शोधला पाहिजे. हिंसेचे अनेक प्रकार करता येतात. त्यामध्ये प्राथमिक स्थरावर आपण हिंसा- प्रतिक्रियात्मक हिंसा अशी विभागणी आपल्या समजूतीसाठी करू शकतो.  राजकीय हिंसा, सांस्कृतिक हिंसा, जमातीय हिंसा , धार्मिक हिंसा, वांशिक हिंसा, राज्यपुरस्कृत हिंसा, प्रशासकीय हिंसा, घरगुती हिंसा असे अनेक प्रकार आपण दाखवू शकतो. हिंसेची एक रचना आणि पध्दतीशास्त्र असते आणि सोबतच हिंसेला एकीकडे वैयक्तिक आणि दुसरीकडे सामुहिक आधार सुद्धा असतो. २) जगभरात इतिहास हा अस्मितांच्या हिंसेचा इतिहास सुद्धा आहे. अनेक प्रकारच्या अस्मिता असतात. त्यामध्ये सामाजिक, राजकीय, भौतिक, लैंगिक, धार्मिक, सांस्कृतिक अस्मिता असतात. प्रत्येक अस्मिताचेचा एक इतिहास असतो म्हणून अस्मितेंमधील संघर्ष, झगडा समजून घेण्यासाठी त्यांचा इतिहास शोधला पाहिजे. बहुतेक वेळा एकाच अस्मितेचा इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर किंवा एकाच काळात पण वेगवेगळ्या संदर्भात वेगळाच अर्थ होत असतो. म्हणून अस्मितेंच्या राजकीय, सामाजिक, सास्कृतिक, धार्मिक आणि लैंगिक बाबींचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. अस्मितींची निर्मिती समजून घेण्यासाठी अस्मितेंचा इतिहास समजून घ्यावा लागतो.    
           वंशविच्छेद (Holocaust), वंशसंहार (genocide), नरसंहार (Massacre) यांच्यामध्ये काहीसा फरक आहे. वंशविच्छेदाचा इतिहास, वंशविच्छेदाची कृती, वंशविच्छेदाचा भूगोल  समजून घेतल्यावर जगभरातील वंशविच्छेदांमध्ये, वंशसंहारांमध्ये काय साम्य आणि फरक आहे हे स्पष्ट होते. त्यातून वंशविच्छेदाचे तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान आपणास कळते. जर्मनीच्या वंशविच्छेदात तंत्रज्ञान खूपच विकसित असल्यामुळे एकेएका व्यक्तीने शेकडो लोक मारलेत तर रवांडात वंशसंहाराचे तंत्रज्ञान जर्मनीच्या तुलनेत खूपच मागास दिसते कारण येथे शेकडोंच्या झुंडीने एकेएका व्यक्तीला गाठून मारले. गोध्रासारखीच युगांडामध्ये सुद्धा गर्भार स्त्रियांची पोट फाडून बाळ मारण्यात आलेली दिसतात. मारण्यात खूपच विकृतपणा-हिंसकता असल्यामुळे काही ठिकाणी मरणाऱ्याने आपल्याला लवकर मारून टाकावे म्हणून मारणाऱ्याला पैसे सुद्धा देण्याचे उदाहरणे युगांडात समोर आली आहेत.
          भारतात हिंदू सनातनी गोरक्षकांनी धर्माच्या नावाखाली हाल हाल करून मारलेले लोक, पाकिस्थानात इस्लामी सनातन्यांनी धर्माच्या नावाखाली शाळेवर बॉम्ब टाकून मारलेली मुले आणि ब्रह्मदेशात बौद्ध सनातन्यांनी धर्माच्या नावाखाली सक्तीने मारलेली लोक, ही सगळीच धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय हिंसेची बळी ठरत आहेत. अशावेळी आपण हिंसेच्या इतिहासापासून काहीतरी धडा घेणार आहोत की, नाही हा प्रश्न आज निर्माण झाला आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...