प्रस्तावना:
१९५२
साली गुन्हेगारी जमाती कायदा रद्द करण्यात आला. गुन्हेगार म्हणून भटक्या जातींना वासाहतिक
सत्तेने १८७१ साली सूचीबद्ध (Notified) केले होते, त्या जातींना भारत स्वतंत्र झाल्यावर विमुक्त (De-Notified) करण्यात आले.
कायद्याच्या कचाट्यातून भटक्या जातींची सुटका झाली. परंतू अजूनही ‘वासाहतिक कलंक’ (Colonial Stigma) या जातींचा पिच्छा सोडत नाही असेच दिसते. त्यांना आजही दररोज ‘मानखंडने’ला (Humiliation) सामोरे जावे
लागते. वसाहतोत्तर समाजात सुद्धा वासाहतीक मानसिकतेचा पगडा खूपच प्रभावी राहिलेला
दिसतो. तसेच, आजही आपण वासाहतिक मानसिकतेचाच वारसा पुढे चालवत आहोत.
माणसांनी कोणत्या जाती जमातीत जन्म घ्यावा हे
त्यांच्या हातात नाही तरी आपल्या देशात ज्या गोष्टी माणसाच्या हातात नाही त्याला
आधार मानून आपल्या देशात प्रतिष्ठा मिळते. अस्पृश्यत: जन्मावर आधारित आहे.
त्याचप्रमाणे गुन्हेगार माणूस असो किंवा नसो, एखाद्या माणसाचा जन्म गुन्हेगार
जमातीत झाला की तो गुन्हेगारच. याचा अर्थ गुन्हे केल्यानी गुन्हेगार जमातीची
लोकसंख्या वाढत नसून जन्मानी गुन्हेगारांची लोकसंख्या वाढते.[1] अशी मानसिकता आजही समाजात अस्तित्वात असलेली
दिसून येईल. अव्वल इंग्रजी काळात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काही मोजके
लढे वासाहतिक सत्तेच्या विरोधात झाले. त्यासर्व लढयांमध्ये सर्वात महत्वाचा लढा
उमाजी नाईकांचा होता. वासाहतिक सत्तेच्या विरोधात नुसते सैनिकी उठाव करून उमाजी
नाईक थांबले नाहीत तर त्यांनी पर्यायी राज्याची कल्पना सुद्धा मांडली होती. पण, तरीही समाजामध्ये उमाजी
नाईकांच्या जाती बांधवांची ओळख वासाहतिक सरकारने जी रुजवली आहे. रामोशींची
वसाहतपूर्व काळातील राखणदार, जागले म्हणूनची ओळख मागे पडून ब्रिटीश सरकारने रुजवलेली
गुन्हेगार हीच ओळख समाजात रुजलेली दिसते. त्यामुळे आपणास मनाच्या, विचारांच्या आणि
राजकरणाच्या निर्वासाहतीकरणाची अत्यंत गरज आहे.
रामोशी समाजाची ऐतिहासिक आणि मानवशास्त्रीय समाजस्थिती:
रामोशी समूहाला भटके, आदिवासी की अस्पृश्य म्हणावे हा
प्रश्नच आहे. सध्या रामोशी समूहाला भटके म्हटले जाते परंतू रूढ अर्थाने रामोशी
समूह हा भटका नाही आहे. इतर भटक्यांसारखा भटकंती
करत नाही. वासाहतिक काळात वासाहतिक ज्ञानप्रकल्पाचा भाग म्हणून जे जाती, जमातींचे
संशोधन झाले त्याची सुद्धा ही मर्यादा आहे. रामोशी जातीचे सामाजिक-आर्थिक स्थान
समजून घेण्यासाठी आपणास वसाहतपूर्व सामाजिक रचनांचा आणि या समूहाच्या व्यवहाराचा
मानवशास्त्रीय (Anthropology) पद्धतीने विचार करावा लागेल. या पद्धतीला
ऐतिहासिक-मानवशास्त्रीय पद्धती (Historic-Anthropological
method) असे म्हणता येवू शकते.
रामोशी हे डोंगराळ प्रदेशातील समूह आहे.
पुणे, सातारा हे जिल्हे रामोशींचे
बालेकिल्ले आहेत.[2] रामोशी हा समूह एकाचवेळी लष्करी अर्थव्यवस्था, कृषी
अर्थव्यवस्था आणि वन अर्थव्यवस्था यांच्यावर अवलंबून होता त्यामुळे त्याचे सामाजिक
स्थान निश्चिती करणे हे जिकरीचे काम बनते. “...रामोशी लोकांचा मुख्य धंदा म्हणजे
गावाची राखण करणे. या कामाबद्दल त्यांना जमिनीही मिळाल्या आहेत...मराठ्यांच्या
राज्यात डोंगरी किल्यांच्या रक्षणाची जबाबदारी रामोश्यांकडे होती.”[3] किल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी
रामोशी जातींच्या लोकांकडे असल्यामुळे त्यांना त्यासाठी ‘नाईक’ आणि ‘सरनाईक’ हे
वतन मिळत असे म्हणूनच ‘वतन’ हे मध्ययुगीन समाजाचा कणा होते.” रामोशी हे जागले
असतात. जागल्या म्हणजे गावचा पोलीस शिपाई.”[4] अशाप्रकारे
डोंगरी किल्यांच्या रक्षणापासून ते गावच्या रक्षणापर्यंतच्या लष्करीव्यवस्थेत
म्हणजेच लष्कर अर्थव्यवस्थेत रामोशी जात काम करत. यामुळेच रामोश्यांची म्हणजेच
“...बेरडांची स्वामिनिष्टा व धाडस पाहून हैदरअलीने त्यांना मुसलमान धर्माची दीक्षा
देवून आपल्या सैन्यात भरती केली होती. त्याच्या सैन्यात बेरडांची स्वतंत्र पथके
होती.”[5]
लष्कर
अर्थव्यवस्थेसोबत रामोशी लोक कृषीअर्थव्यवस्थेवर सुद्धा अवलंबून होते म्हणून
म्हटले जाते की, “...काही बेरड शेती करतात, काही तलवार (गावाचे रखवालदार) असून
त्याबद्दल त्यास इनाम जमिनी आहेत, काही पाटील आहेत, काही मजुरी करतात.”[6] इनाम मिळालेल्या जमिनी पिकवत असत
त्यामुळे “...रामोशी जवळ स्थावर मिळकती असते. त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत,
त्यांच्या रयाताऊ जमिनी आहेत. ते शेती व इतर कामे करून पोटे भरतात.”[7] असेही म्हटले जाते. गावगाड्याच्या पारंपारिक
रचनेत जागल्या म्हणून महार आणि रामोशी जातीचे लोक काम करत असत. त्यामुळे
कुणब्याच्या शेतात पिकणाऱ्या बहुतेक वस्तूंवर त्यांचा हक्क होता. “... जिराईत
पिकाच्या सर्व्याला जिराईत सर्वा आणि बागाईत पिकाच्या सर्व्याला बागाईत सर्वा
म्हणतात. महार, मांग, भिल्ल, रामोशी हे सर्वा हक्काने काढून नेतात.”[8] तसेच
...रामोशी वगैरे जातींचे पुरुष, स्त्रिया आणि मुले गवत, सरपण, तरवड बेलाशक
कुणब्यादेखत त्यांच्या शेतातून काढतात...”[9] वरील उदाहरणांवरून गावचा जागल्या, राखणदार म्हणून
किंवा वतनदार म्हनून कृषीअर्थव्यवस्थेशी कसा संबंधित होता हे स्पष्ट होते.
रामोशी ही जात डोंगरी प्रदेशातील आहे असे आपण वर
चर्चा केलीच आहे. रामोशी या नावाचा ऐतिहासिक तर्क लावतांना असे म्हटले जाते
की, “...रामोशी हा शब्द रामवंशी ह्या
शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. तो रानवासी म्हणजे ‘रानात राहणारा’ ह्या
शब्दापासून झाला आहे अशीही त्याची व्युत्पत्ती लावतात. रामोशी मुख्यत: गावाच्या
सीमेवर राहत असल्यामुळे, ही दुसरी व्युत्पत्ती विशेष अन्वर्थक दिसते.”[10] वरील दोन्ही अर्थांपैकी दुसरा अर्थ अधिक भौतिक
आणि वास्तववादी आहे. रामोशी हे डोंगराच्या आत राहत नाहीत तर डोंगर उताराच्या
ठिकाणी राहतात त्यामुळे गाव आणि डोंगर यांच्यामधील दुवा म्हणून सुद्धा रामोशी काम करतात. म्हणून
“रामोशी, महार, चांभार हे अस्पृश्य...”[11] असे
जरी म्हटले असले तरी रूढार्थाने ते अस्पृश्य ठरत नाहीत आणि त्याचप्रमाणे ते
आदिवासी सुद्धा ठरत नाहीत. डोंगराळ प्रदेशात राहत असल्यामुळे चराई, शिकार, जंगली
जडीबुटी आणि वनउत्पादने गोळा करणे आणि झूम शेती (Shifting Cultivation) करणे अशा
सगळ्या वन प्रक्रियांशी म्हणजेच वनअर्थव्यवस्थेशी रामोशी जात ही जैविकरित्या जोडली
गेलेली होती.
१८ व्या शतकाच्या शेवटापर्यंत
आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकांपर्यंत वरील तिन्ही प्रकारच्या
अर्थव्यवस्थांमध्ये रामोशी जात ही जातउत्पाधन व्यवस्थेत कार्यरत होती. वासाहतिक सरकारच्या धोरणांमुळे या जातीचे पारंपारिक काम
नष्ट झाले होते. तसेच, बदलत्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थित्यंतरामुळे रामोशींना पेशवे, जमीनदार, वतनदार आणि शेवटी इंग्रजी सत्ता यांच्या
विरोधात सुद्धा आपल्या हक्क, अधिकारांसाठी लढावे लागलेले दिसते.
वासाहतिक दडपणूकीचे
तंत्र आणि रामोश्यांचा स्वातंत्र्य लढा:
नव्या
इंग्रजी राजसत्येच्या उगम जरी एका व्यापारी संस्थेमध्ये आजपर्यंत असला तरी तिचे
स्वरूप केवळ व्यापारी नव्हते, किंवा आजपर्यंतच्या येथील देशी विदेशी सत्ताप्रमाणे
केवळ राजकीयही नव्हते, नवीन शासनव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, मुद्रणालये,
ग्रंथप्रसार, वृतपत्रे, ख्रिस्तीधर्मोपदेशक आणि एतदेशियलोक यांनी या अनुसंधाने
केलेल्या सामुदायिक व व्यक्तिगत हालचाली या सर्वांच्या क्रिया–प्रतिक्रियेतून नव्या
संस्कृतीमूल्यांचे येथे संवर्धन होत गेले. जीवनाच्या राजकीय, धार्मिक, आर्थिक व
सांस्कृतिक अंगाने पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन त्यामुळे येथील लोकांना प्राप्त
झाला. राजकीय क्रांतीबरोबर एक प्रचंड मानसिक क्रांती येथे घडून येत होती.[12] धोरण
आणि प्रशासन यावर या सगळ्या प्रक्रीयेंचा मोठा परिणाम झाला आहे म्हणूनच वसाहवाद हा
ज्याप्रमाणे प्रशासकीय प्रकल्प होता तसाच तो नियंत्रणासाठीचा प्रकल्प होता.[13] असे म्हटले जाते.
इंग्रजी सत्तेने १८१८ मध्ये पेशवाईचा चा शेवट
केल्यावर येथील राज्यव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणाखाली घेण्यासाठी अनेकप्रकारचे
प्रयत्न केले. पोलीसयंत्रणा, महसूल यंत्रणा, इनाम कमिशन, वन धोरण, कृषी धोरण या
सारख्या अनेक गोष्टी घडवून आणल्यात त्याचा परिणाम रामोशी जातीवर झाला. एकोणिसाव्या
शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश राष्ट्रीय वन धोरण[14] आले
आणि या धोरणामुळे असंख्य
रामोशी त्यांच्या चराई, शिकार, जंगली जडीबुटी आणि वनउत्पादने गोळा करणे आणि झूम
शेती (Shifting Cultivation) करणे या पारंपारिक अधिकारांपासून वंचित झाले तसेच
राज्यसत्तेवर पकड मिळताच इंग्रज सरकारने उपयोगाच्या दृष्टीने त्यांचे तीन वर्ग
केले आहेत. सरकारउपयोगी, रयतउपयोगी आणि सरकार व रयत ह्या दोघांनाही निरुपयोगी[15] आणि अनुभवाअंती सरकारने जे कारुनारू
निरुपयोगी ठरवून सरकारच्या व गावच्या नोकरीतून वजा केले, त्यांना काळी पांढरीत
काहीएक हक्क देवू नये. कालमानाप्रमाणे सर्व नारू व तिसऱ्या ओळीचे कारू भट, गुरव,
कोळी, सोनार, रामोशी, जंगम, मुलाना ह्यांच्या गावकीचे काम बहुतेक नाहीसे
झाल्यासारखे आहे.[16]
तसेच वसाहतपूर्व काळात डोंगरी किल्यांच्या रक्षणाची जबाबदारी रामोश्यांकडे
होती आणि त्यासाठी त्यांना ‘वतन’ करमुक्त जमिनी मिळत होत्या परंतू , ब्रिटिशांनी सत्ता हस्तगत केल्यावर मात्र
त्यांना या कामावरून काढून टाकून त्यांच्या जमिनीही काढून घेतल्या.[17] या
इंग्रजांच्या धोरणामुळे रामोशी जात ही गावसंरक्षण व जागल्याच्या सेवेला, डोंगराळ प्रदेशातील मुक्त
वावरला आणि पारंपारिक हक्क - अधिकारांना मुकली आणि जगण्यामरण्याच्या संकटात सापडली
त्यामुळे वासाहतिक सत्तेविरुद्ध लढा
उभारायला सुरुवात झाली.
उमाजी नाईकांच्या रूपाने
पहिला रामोशी प्रतिरोध वासाहतिक सत्तेच्या विरोधात उभा निर्माण झाला. वासाहतिक काळात झालेल्या प्रतीरोधांचे सिद्धांकन करतांना
सुमित सरकार म्हणतात कि, “…in
constructing a typology of popular movements under colonialism, it is
convenient to start with distinction between ‘Primary’ resistance and ‘Secondary’
resistance…primary resistance refers to the opposition of pre- colonial, as yet
largely unchanged, socio-political structures to foreign intrusion, headed by
traditional elements…and having in the main a restorative aim. Secondary
resistance develops somewhat later, with deeper colonial penetration; it is characterized by new
types of leadership and aims going beyond simple restoration of the past.”[18] ही मांडणी खूपच महत्वाची आहे परंतू उमाजी
नाईक यांच्या प्रतिरोध समजून घेण्यास ती साह्यभूत होत नाही कारण लष्करी सेवा दिली
म्हणून मराठ्यांच्या काळात मिळालेल्या जमिनी इंग्रजांचे पूर्वसुरी पेशवे सरकार आणि
इंग्रज काढून घेत आहेत म्हणून उमाजीने या दोहोंच्या विरोधात प्रतिरोध
सुरु केला होता.[19]२०
इंग्रजांच्या आणि पेशव्यांच्या विरोधात लढतांनाच उमाजी
नाईकांनी जमीनदार, वतनदार आणि संस्थानिक यांच्याही विरोधात भूमिका घेतलेली दिसते.[20] त्यासाठी
“...रामोशी समाजाच्या तरुणांना क्रांतिकारक, शौर्यवान बनविण्यासाठी उमाजी नाईक
त्यांना दांडपट्टा, तलवारी आणि गोफण शिकवत असत.”[21]१८२०
पूर्वीच्या काळात उमाजीने मराठी वतनदार, जमीनदार आणि संस्थानिक यांच्या विरोधात दंगेधोपे केलेले
दिसतात. त्यानंतरच्या काळात म्हणजे १८२२ ते १८३२ या दशकभर उमाजीने इंग्रजांच्या
विरोधात उमाजीने लढा दिला. १८२४ साली उमाजी नाईकांनी भांबुर्ड्यातील ब्रिटीशांचा
सरकारी खजिना लुटला. या लुटीमध्ये सहा हजार दोनशे रुपये एवढी रक्कम हाती लागली.[22] १८२५ आणि १८२६ मध्ये ठिकठिकाणी दरोडे टाकून इंग्रज सरकार आणि ठिकठीकाणचे पाटील, मामलेदार, वतनदार आणि
सरदार या सगळ्यांना उमाजी नाईकाने आणि त्यांच्या साथीदारांनी जेरीस आणले. त्यामुळे
१८२६ मध्ये २८ ऑक्टोबर रोजी इंग्रज सरकारने उमाजी नाईकविरोधी दोन जाहीरनामे काढले.
पहिल्यातला आशय असा होता की, उमाजी व
पांडूजी ह्या दोघांना धरून देणारास दर असामीबरहुकूम शंभर रुपये बक्षीस मिळणार
होते. उपयुक्त माहिती पुरविणारास माहिती पडताळून योग्य तितके बक्षीस मिळणार होते.
तसेच उमजीच्या बंडात सामील असलेला कोणीही माणूस धरून दिल्यास दर इसमामागे पन्नास
रुपये बक्षीस मिळवायचे होते. दुसऱ्या जाहीरनाम्याने तमाम रयतेस बंडवाल्यांविरुद्ध
मोहिमेस हरप्रकारे सहाय्य करावे, असे आवाहन करून, तसे न केल्यास व करण्याचे नाकारणारास बंडवाल्यांचेच
साथीदार समजून ठार मारले जाईल, अशी धमकी दिली होती.[23]
१८२७ साली इंग्रजांनी साम, दाम, दंड आणि भेद अशा सगळ्या डावपेचांचा वापर
केला तरीही, उमाजी नाईक त्यांना सापडत नव्हता.
डिसेंबर १८२७ मध्ये उमाजी नाईक कोकणात गेले आणि
त्यांनी रत्नागिरी आणि ठाणे सुभ्यांसाठी एक स्वतंत्र जाहीरनामा काढला. त्यात ते
म्हणतात की, “ ह्या भागातील पाटील, मामलेदार वगैरेंनी इंग्रजांच्या अधिकाऱ्यांकडे महसूल भरू नयेत,
ते आम्ही घेणार आहोत. आम्ही केव्हाही येऊ, पैसे तयार असले पाहिजेत; नसल्यास त्याचे परिणाम
भोगावे लागतील.”[24]
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, उमाजी नाईक इंग्रजी राज्याला पूर्णत नाकारत होते आणि
स्वतःचा मुलकी अधिकार या सुभ्यांवर प्रस्थापित करू पाहत होते. या संदर्भात भाष्य करतांना सदाशिव आठवले म्हणतात
की, “
उमाजीला राजा मानले जाऊ लागले होते, त्याच्या नावे गावोगाव रोखे होत होते. गावोगावची खंडणी
वसूल करणे हा राजा म्हणून उमाजींचा अधिकारच होता. उमाजीने गोळा केलेल्या अनुयायांत
फक्त रामोशीच होते असे नाही. त्यांच्याखेरीज मांग, बेरड, मराठे व मुसलमानही होते. उमाजींच्या
लोकांच्या तुकड्या केलेल्या असून प्रत्येक तुकडीकडे एक एक मुलुख सोपविलेला
असे...त्याच्या लोकांकडे तीरकमठे, ढालतलवारी, आणि बंदुका असत. लुट वाटून घेण्याचा प्रकार
बंद करून उमाजीने शिपाई, जासूद वगैरे सर्वांना रोख ठराविक मासिक वेतन देण्याची
पध्दत चालू केली होती. ह्या सर्व गोष्टींचा सरळ अर्थ असा की, उमाजीला आता लुटारूंचा
नाईक म्हणून राहायचे नव्हते, राज्यकर्ता, राजा म्हणून सत्ता हाती घ्यावयाची होती.”[25]
१८२८ मध्ये उमाजी नाईकांना
मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी इंग्रजांशी चालू असलेली
मारामारी थांबवण्याचे ठरविले. मे महिन्यात इंग्रजांशी बोलणी झाली आणि कंपनीची
नोकरी करण्याचे उमाजीने ठरविले. बदल्यात कंपनीने उमाजीसाठी ठेवलेली सर्व बक्षिसे
रद्द केली. तसेच, चोऱ्या- दरोड्यांचे, जाळपोळीचे सर्व गुन्हे माफ केले. उमाजीने इंग्रजांच्या
शर्तीवर तह आणि नोकरी पत्करली.[26] उमाजीला
इंग्रजांनी दिलेल्या नोकरीच्या विरोधात भोरच्या पंतसचिवांनी नापसंती व्यक्त केली
होती. पंतसचिव आणि उमाजी यांच्यामध्ये भोरमधील काही गावांच्या वतनी हक्कांवरून वाद
होता. त्यामुळेच, पंतसचिवांनी सातत्याने उमाजी नाईक आणि रामोश्यांच्या विरोधात इंग्रजांकडे
तक्रारी केल्या. म्हणूनच, १८३० मध्ये उमाजी नाईक आणि इंग्रज सरकार यांच्यात तणाव
निर्माण झाला आणि पुन्हा उमाजी नाईकांनी इंग्रजांच्या विरोधात कारवाया करायला
सुरुवात केली.
१६ फेब्रुवारी १८३१ मध्ये इंग्रजांविरुद्ध
लढत असतांना उमाजी नाईकांनी हिंदुस्थानातील राजे, जहागीरदार, इनामदार व रयत तसेच हिंदू व मुसलमान आदी
सर्वांना उद्देशून जाहीरनामा काढला. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ माझे सरकार
हिंदुस्थानातील तमाम जनतेला उद्देशून हा जाहीरनामा काढत आहे. १. सर्व राजे, जहागीरदार, सरदार आणि इतर सर्व
लोकांनी, जे जे इंग्रज युरोपियन भेटतील त्यांचा नाश करावा, त्यांची हत्या करावी. २. वरील हत्याकांडात
प्रामुख्याने भाग घेणाऱ्या लोकांस माझे सरकार जहागिरी, इनामे व रोख बक्षिसे देईल. ३. ज्यांची
वंशपरंपरागत वतने, हक्क नष्ट केलेले असतील अशा लोकांस विशेषकरून कळविण्यात येते की त्यांनी या
प्रसंगी आम्हास मदत केल्यास त्यांची नष्ट केलेली वतने, हक्क व बंद केलेले तनखे हे नवीन सरकार
पुन्हा त्यांना बहाल करील. ४. भारतातील सर्व रहिवाशांनी सर्वत्र एकदम उठाव करून
सर्व देशात गोंधळ व अराजक माजेल अशी दंगल उडवून द्यावी. ५. ब्रिटीश पायदळातील
सैनिकांनी व घोडदळातील स्वारांनी सर्व युरोपियन अधिकाऱ्यावरील निष्ठा टाकून देऊन
त्यांची धरपकड करावी, व जाहिरनाम्याविरुध्द वर्तन करणारास नवीन सरकार योग्य ते कडक शासन करील. ६.
सर्व युरोपियन लोकांची मालमत्ता लुटावी, अथवा नाश करावा; त्यांचे सर्व खजिने लुटावेत, अशा लुटीत ज्याला जो हिस्सा मिळेल तो
त्याने स्वतःच्या मालकीचा समजून स्वतःजवळ ठेवावा. त्याबद्दल त्याला कोणत्याही
प्रकारची जाब विचारला जाणार नाही. ७. हल्ली जी खेडी जमिनीचा शेतसारा इंग्रजांना
देतात; तो त्यांनी देण्याचा तत्काळ बंद करावा. या हुकुमाविरुद्ध वर्तन करणाऱ्या
खेड्यांना बेचिराख केले जाईल. ८. जे हिंदू किंवा मुसलमान या जाहिरनाम्याविरुध्द
वागतील. ते आपण होऊन आपल्यावर मोठे संकट, दैवी आपत्ती ओढवून घेतील. ९. (शास्त्रात असा आधार निघालेला
आहे की) आता असे भविष्य वर्तविण्यात आले आहे की, इंग्रजांचे राज्य नष्ट होण्याची वेळ समीप
आलेली आहे. ते सर्व लोक या देशातून काळे करतील व नवीन न्यायी राज्याची स्थापना
होईल.”[27]
उमाजी नाईकांनी प्रत्येक
गावच्या पोलीसपाटलांकडून गावचावडीवर जाहीरनामा लावला. त्यामुळे इंग्रज सरकार आणि
सातारा छत्रपती यांनी उमाजी नाईकांच्या विरोधात चाळीस- चाळीस शिपायांच्या तुकड्या
सर्वत्र पाठवायला सुरुवात केली. कॅप्टन मॅकिंटॉश या नव्या अधिकाऱ्याकडे संपूर्ण
मोहिमेची जबबदारी टाकण्यात आली होती.[28] २६
जानेवारी १८३१ रोजी इंग्रज सरकारच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने एक
जाहीरनामा काढला. त्याप्रमाणे उमाजी, भुजाजी, येसाजी व कृष्णाजी नाईक रामोसी ह्या चौघांपैकी
प्रत्येकासाठी रोख ५ हजार रुपये व इनाम जमीन दोनशे बिघे एवढे पारितोषिक जाहीर
करण्यात आले होते.[29] १८२७
-२८ मध्ये जाहीर केलेली बक्षिसे १८३१ च्या बक्षिसांच्या तुलनेत फारच किरकोळ होती. १८३२
साली इंग्रजांनी उमाजी नाईकांना फितुरीने पकडले. पुणे येथील तुरुंगात दीड-दोन
महिने उमाजी नाईक तुरुंगात होते. त्यांच्यावर खटला चालवला गेला. त्यांच्यावर अनेक
आरोप केले गेले. त्यांची त्यांची कबुली सुद्धा दिली. दिनांक ३ फेब्रुवारी १८३२
रोजी त्यांना फाशी देण्यात आली[30] आणि
रामोशींच्या प्रतीरोधाचा एक अध्याय संपला.
पुढील काळात महाराष्ट्रात हरी
माकाजी आणि तात्या माकाजी या दोन्ही रामोशी बंधूंनी वासाहतिक सत्तेच्या विरोधात
लढा दिला आहे. त्यांनी उमाजी नाईकांचा इंग्रज सरकारविरोधाचा वारसा चालवला आहे. रामोशी हे आपल्या जिवापेक्षा
शब्दाला महत्व देतात म्हणून त्यांची ही प्रामाणिकता राष्ट्रीय उदिष्टासाठी वापरावी
या हेतूने १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी त्यांना संघटीत केले.[31] असे
वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्रकार व्ही. एस. जोशी यांनी लिहून ठेवले आहे. १८७९
च्याच काळात साताऱ्यात हरी आणि तात्या माकजी यांना उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे किती मोलाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरी च्या
गाठीभेटी घेतल्या आणि इंग्रजी सत्तेच्या विरोधात सोबत लढण्यास
तयार केले. १३ मार्च १८७९ रोजी हरी मकाजीला अटक झाली आणि यापुढे कोणीही इंग्रज
सरकारच्या विरोधात प्रतिरोध करू नये म्हणून त्याला जाहीर फाशी देण्यात आली. हरी
मकाजीच्या फाशीची आठवण आजही लोकगीतातून केली जाते.
ऐक सांगतो इथेच गेला हरीमकाजी फाशी
रामोश्यांचे नगर जेजुरी हिच आयोध्याकाशी
सोमवतीची रामोश्यांची वारी पूर्वापार
म्हणुनी निवडला फाशीसाठी सोमवतीचा वार
जुनेपुराने झाड वडाचे डाक बंगल्यापाठी
तेच निवडले हरीमकाजी फाशी देण्यासाठी
दिली दवंडी यात्रे मध्ये फिरून चौफेर
आज नाईक हरी मकाजी फासावर जाणार
अथांग जनसमुदाय लोटला गर्दी अपरंपार
आणि उडाला रामोशांच्या डोळ्यातून अंगार
सहस्त्रमुखांनी एकच केला प्रचंड जयजयकार
हरीमकाजी फाशी गेला गर्जत जयमल्हार
लटकत होता देह अचेतन हरीमकाजीचा
खडा पहारा आणि भोवती गो-यासोजिरांचा
कळंबीगावच्या रामोश्याचा वंश धान्य झाला
भारतमाते तुझ्याचसाठी हरी हुतात्मा झाला
- यशवंतराव सावंत, जेजुरी[32]
वासाहतिक सत्तेला मोठ्याप्रमाणात रामोशी
जातीने प्रतिरोध केल्यामुळे इतरांप्रमाणे ‘भटका’ समूह नसतांनाही इंग्रजांनी १८७१
च्या गुन्हेगारी जमाती कायद्याच्या माध्यमातून रामोशी जातीला गुन्हेगार ठरवून
टाकले. “...ज्या समूहांनी प्रतिरोध केला त्यांना गुन्हेगारी जमाती म्हणून जाहीर
केले गेले.”[33] या
कायद्याच्या अंतर्गत अनेक भटक्यासमूहांना सूचीबद्ध करण्यात आले. हा कायदा बनवण्यात
महत्वाची भूमिका असणारा टी. व्ही. स्टीफन म्हणतो की, “चोरी करणे, गुन्हे करणे हे
या जमातींचा धर्म आहे. तो बदलता येत नाही.”[34]
म्हणजे भटके हे जन्मजातच गुन्हेगार
असतात. मीना राधाकृष्णन यांच्यामते, “ मानववंशशास्त्र, शरीररचनाशास्त्र आणि मिथ्या
सुप्रजनन विज्ञान या विकसित होणाऱ्या ज्ञानाशाखांनी ‘जन्मजात गुन्हेगार’ ही कल्पना
जन्माला घातली. वासाहतिक प्रशासनाची सेवा
म्हणून त्याकाळी ज्ञानशाखांना वापरण्यात आले.”[35]
जन्मजात गुन्हेगार म्हणून जाहीर केल्यामुळे या जातींना ‘सुसंस्कृत’ करण्याच्या
नावाखाली वसाहतींमध्ये बंद करण्यात आले. अव्वल इंग्रजी काळात उमाजी नाईकांच्या
नेतृत्वाखाली वासाहतिक सत्तेला अनेक धक्के रामोश्यांच्या प्रतीरोधाने दिले.
त्याचाच वारसा नंतरच्याही मंडळीनी केला. त्यामुळे वासाहतिक सत्तेने आणि इंग्रज
सरकारने रामोश्यांची अनैतिहासिक प्रतिमा निर्माण केली.
समारोप:
वसाहतपूर्व काळात महाराष्ट्राच्या
गावगाड्यात आणि प्रशासकीय रचनेत रामोश्यांचे अत्यंत महत्वाचे स्थान होते. गावाचे
जागले, राखणदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांना काही पारंपारिक हक्क,
अधिकार आणि वतने ही दिलेली होती. मराठी सत्तेच्या उत्तरार्धात राजकीय गोंधळ
निर्माण झाल्यामुळे त्यात रामोशांना पेशव्यांच्या आणि काही संस्थानिक, वतनदार आणि
जमीनदार यांच्याही विरोधात भूमिका घ्यावी लागलेली दिसते. वासाहतिक सत्तेने राजकीय, लष्करी, आर्थिक अशा
वेगवेगळ्या स्तरांवर केलेल्या बदलांचे बळी रामोशी झालेले दिसतात. त्यामुळे उमाजी
नाईकांच्या नेतृत्वाखाली प्रथम आपल्या हक्कांसाठी आणि नंतर स्वतःच्या न्यायी
राज्यासाठी रामोश्यांनी प्रतिरोध केलेला दिसतो. उमाजी नाईकांचाच कित्ता पुढे हरी
माकाजी आणि तात्या माकाजींनी गिरवलेला दिसतो.
अव्वल इंग्रजी काळात देशभरात वेगवेगळ्या
ठिकाणी लोकांनी वासाहतिक सत्तेला विरोध केलेला दिसतो. पण, उमाजी नाईकांचा
प्रतिरोध हा सर्वार्थाने वेगळा ठरतो कारण, त्यांनी अव्वल इंग्रजी
काळातच इंग्रजांच्या अन्यायी राज्याचे रूप ओळखले होते आणि पर्यायी न्यायी राज्याचे
स्वप्न पाहिले होते. इतिहासकारांच्या लेखणीने अनेक वर्ष उमाजी नाईकांच्या
इतिहासाला दुर्लक्षित जरी केलेले असले तरी लोकस्मृतीत उमाजी नाईकांच्या पराक्रमाची
आणि शौर्याची गाथा ही अजरामर झालेली आहे.
[1] मोतीराम राठोड, एक्स
गुन्हेगारी जाती, भटक्या विमुक्त अधिवेशन, सोलापूर, १९८४, पृ. २१
[2] M. Kennedy, Notes on Criminal classes in the
Bombay presidency, Govt.
Central Press, 1908, पृ. १४३
[3] पंढरीनाथ पाटील, भटके भाईबंद, सुरेश एजेन्सी, पुणे, १९९०, पृ. १०७
[4] त्रिंबक नारायण अत्रे,
गावगाडा, वरदा प्रकाशन, पुणे, ४ पुनर्मुद्रन २०१३ (१९१५), पृ. ५२
[5] पूर्वोक्त, पंढरीनाथ
पाटील, पान क्र. ११३
[6] गोविंद मंगेश कालेलकर, मुंबई इलाख्यातील जाती, वरदा प्रकाशन, पुणे, दुसरी
आवृत्ती, १९९९, पृ. १०९
[7] सावित्रीबाई रोडे यांचा
‘नेक नामदार गव्हर्नर साहेब बहादूर, मुंबई यांना अर्ज’, क्षत्रिय रामोशी
(रामवंशीय), वर्ष पहिले, अंक २ रा , मार्च १९२३
[8] पूर्वोक्त, त्रिंबक
नारायण अत्रे, पृ. १०५
[9] कित्ता, पान क्र. १०६
[10] पूर्वोक्त, गोविंद मंगेश
कालेलकर, पृ. १९५
[11] Harold H. Mann, Land and labour in a Deccan
village, Oxford University
Press, 1921, पृ. १०८
[12] व्ही. बा. प्रभूदेसाई,
अर्वाचीन महाराष्ट्राची जडण घडण –प्रा.अ.का.प्रियोळकर: व्यक्ती आणि कार्य, राज्य
मराठी विकास संस्था, मुंबई, २०१०, पृ. ७०-७१
[13] Dirks Nicholas B, forward
in Bernard Cohn’s Colonialism and it’s forms of knowledge: The British Indi, OUP, Delhi, 1997, पृ. १
[14] Prabhakar B.
Draxe, Failed revolt against the raj: the rebellion of
berad, a criminal tribe, under the
leadership of Umaji naik, Social Change: June
2005: Vol. 35 No. 2, पृ. १२७
[15] पूर्वोक्त, त्रिंबक
नारायण अत्रे, पृ. ४५
[16] कित्ता, पृ. २७५
[17] पूर्वोक्त, पंढरीनाथ
पाटील, पृ. १०७
[18] Sumit sarkar, Popular
movement and middle-class leadership in late colonial India, Aakar, 1983
(republished 2015), Delhi, पृ. १४
[19] पूर्वोक्त, Prabhakar B. Draxe, पृ. १२७
[20] पी. डब्लू. ब्राडबीर, द
रोल ऑफ द किंग्डम ऑफ सातारा इन सप्रेसिंग डेक्कन बंड्स, १८१२-१८३१, रिजीन, नॅशनॅलिटी अँड
रिलीजन, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९९, पृ. ६५-६६
[21] लक्ष्मण गायकवाड, रामोशी
समाजाला कधी मिळेल न्याय?, १ डिसें २०१३, सकाळ
[22] सदाशिव आठवले, उमाजी राजे, मुक्काम डोंगर, कॉन्टिनेन्टल
प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती, २०१२, पृ. २५
[23] कित्ता, पृ. २७
[24] कित्ता, पृ. ४५
[25] कित्ता, पृ. ४८
[26] कित्ता, पृ. ५०
[27] बाबासाहेब जाधव, ‘फास’ उमाजी नाईकांचा, निर्मल प्रकाशन, पुणे, १९९५, पृ. ५८-५९
[28] पूर्वोक्त, सदाशिव आठवले, उमाजी राजे, मुक्काम डोंगर, पृ. ७७
[29] कित्ता, पृ. ७८
[30] कित्ता, पृ. १०१
[31] V. S. Joshi, Vasudeo
Balvant Phadake; First Indian Rebel against British Rule, D. S.
Marathe Vidya Bhuvan, Mumbai, 959, पृ. ३६
[32] http://www.ramoshi.com/ramoshi/history ( २८-०९- २०२१
रोजी, ११: ३० रात्री पाहिले.)
[33] Meena Radhakrishnan, Invented pasts and fabricated
presents: Indian nomadic and denotified communities, Gokhale Institute of politics and
economics, 2009, पृ. ३
[34] पूर्वोक्त, मोतीराम
राठोड, पृ. ७