सोमवार, ३ जानेवारी, २०२२

अंतर्विरोधांची संस्कृती!


भारताची संस्कृती कशी आहे? त्यातही विशेषत: प्राचीन भारतीय संस्कृतीचे नेमकं स्वरूप काय होते? याविषयी अनेकवेळा समाजात एका विशिष्ट चौकटीत आणि झापडबंद पद्धतीने चर्चा होतांना दिसते. काहींचा भारतीय संकृतीत काहीच नव्हते असा ‘आत्मग्लानी सूर लागतो तर काहींचा भारतीय संकृतीत सर्वच चांगले होते असा ‘आत्मगौरव करणारी भूमिका असते. त्यामुळे भारतीय संस्कृती म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो तसाच प्रसिद्ध इतिहासकार उपिंदर सिंह यांना अशोका विद्यापीठासाठी ‘भारतीय सभ्यता ह्या विषयाचा अभ्यासक्रम बनवतांना पडला आणि त्यातून या पुस्तकाचा जन्म झालेला आहे.

समकालीन परिस्थितीची गरज म्हणून बऱ्याचवेळा गतकाळाची मोडतोड करून वर्तमानाचा अजेंडा चालविण्यासाठी इतिहासाचा वापर केला जातो. म्हणूनच, सामाजिक-धार्मिक सहिष्णुता आणि अहिंसा असलेले प्राचीन भारताचे आदर्श कल्पनाचित्र उभे करणे जसे चुकीचे आहे तसेच प्राचीन भारत म्हणजे नुसते असमानता, संघर्ष आणि झगडा असे भयावह कल्पनाचित्र उभे करणेही तेवढेच चुकीचे आणि अनैतिहासिक आहे अशी भूमिका घेत उपिंदर सिंह यांनी आत्मगौरवीकरण आणि आत्मग्लानी यांच्या पलीकडे जात भारताच्या संस्कृतीची व्यामिश्रता, गुंतागुंत, संमिश्रता, अनेकवचनी इतिहास आणि बहुविविधता समग्रपद्धतीने मांडण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न या पुस्तकात केला आहे. त्यांनी घेतलेली उदाराहारणे, वापरलेली वेगवेगळी साधने आणि चर्चिलेल्या व्यक्ती, घटना आणि प्रक्रियांमुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे असे म्हणावे लागते. इतके उत्तम दर्जाचे सदरील पुस्तक झालेले आहे.

       पुस्तकामध्ये पाच प्रकरणांसोबत प्रस्तावना आणि समारोप आहे. पुस्तक जरी प्राचीन भारताविषयी असले तरी ते समकालीन भारताला समजून घेण्यासाठीही तेवढेच उपयुक्त आहे कारण, प्रस्तावना आणि समारोपामध्ये लेखिकेने पुस्तकाच्या प्राचीन भारताच्या आशयाला समकालीन भारताशी जोडण्याचाही प्रयत्न केला आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीला ‘मी कोण आहे?’ या अस्तित्ववादी प्रश्नासोबतच त्यांनी ‘आपण कोण आहोत?’ हा सामाजिक प्रश्नही विचारला आहे. आफ्रिकेतूनच सर्वांचे पूर्वज संपूर्ण पृथ्वीवर स्थलांतरित झाले असे म्हणतात. आजच्या काळात संपूर्ण माणसांची जैविक वंशावळ ही डी. एन. ए. च्या माध्यमातून शोधता येते पण माणसांची सांस्कृतिक वंशावळ अजूनही शोधता येवू शकत नाही, कारण ती खूपच गुंतागुंतीची, अनेकवचनी आणि बहुविविध आहे. असे त्यांनी मांडले आहे. भारतीय इतिहास अभ्यासवर्तुळातील चर्चा नेहमीच दोन वैचारिक टोकांमध्ये गटांगळ्या घेत असल्यामुळे इतिहासाला आणि इतिहासकारांना  ‘डावे आणि ‘उजवे अशा दृष्टीने पाहण्यात आले. तसेच, बऱ्याचवेळा भारताच्या इतिहासाच्या चर्चा या ‘उत्तरभारतकेंद्री किंवा ‘संस्कृतभाषाकेंद्री राहिलेल्या दिसतात. त्यामुळेही संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक जीवनाचे समग्रपणे चित्रण होतांना दिसत नाही. पण, उपिंदर सिहांचे सदरील पुस्तक याला अपवाद आहे. कारण, पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी वापरलेल्या वेगवेगळ्या साधनांची नावे दिली आहेत. धार्मिक ग्रंथ, पुरातत्वीय अवशेष, शिलालेख, नाणे आणि सोबतच, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश, तमिळ, कन्नड, तेलगु भाषेतील साधनांचा त्यांनी वापर केला आहे. साधनांच्या वैविध्यामुळे त्यांच्या लिखणात विविध भोगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक भूप्रदेशांना आपल्या सांस्कृतिक मांडणीत समाविष्ट करता आले आहे. त्यामुळे पुस्तकाचा आशय समृद्ध झाला आहे.

      ‘असमानता आणि मोक्ष हे पुस्तकातील पाहिले प्रकरण आहे. रोहित वेमुलाचे उदाहरण घेवून प्रकरणाची सुरुवात करत त्यांनी भारतीय राज्यघटनेने अस्पृश्यता बेकादेशीर ठरवलेली असूनही आजही देशात, विद्यापीठात आणि समाजात जातीची क्रूरता आणि जातीय भेदभाव हे वास्तव आहे असे त्यांनी नोंदवले आहे. असमानता ही भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे असे म्हणत त्या इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात कोणकोणत्या प्रकारच्या असमानता होत्या? कोणत्या संस्थांनी असमानातेला आत्मसात केले? वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये असमानातेला मान्यता कशी मिळाली? कोण त्याचे बळी ठरले आणि कोणाला फायदा झाला? असमानतेचे रूपे वेगवेगळ्या काळात कशी बदलली? असमानतेच्या विरोधात कोणी आणि कधी आव्हान दिले आणि त्यातून अस्तित्वात असलेल्या परिस्थिती मध्ये काही बदल झाले का? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपणास समाज आणि संस्कृतीच्या केंद्रस्थानी घेवून जातो आणि त्यामुळेच आपणास माणसाविषयी त्यांच्या कल्पना काय आहेत हे कळते असे उपिंदर सिंह म्हणतात. या प्रश्नांचा शोध त्यांनी या प्रकरणात घेतला आहे. भारतातील वर्णीय-जातीय भेदभाव आणि असमानता कशी आकारास आली याची चर्चा त्यांनी केली आहे. प्राचीन भारतातील गुलामगिरी, अस्पृश्यता यांचा विकासक्रम त्यांनी मांडला आहे. सोबतच, जैन, बौद्ध, भक्ती परंपरेने वर्ण, जाती याकडे कसे पाहिले. त्या साम्य आणि वेगळेपणा काय याची चर्चा त्यांनी केली आहे.

      ‘वासना आणि वैराग्य हे दुसरे प्रकरण आहे. वासना आणि वैराग्याचे विविध विश्व त्यांनी उलघडले आहेत. छत्तीसगडमधील सर्वात जुना प्रेमाचा संदर्भ असलेल्या लेणीचे उदाहरण देवून वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या काळखंडात ‘आय लव यू असे प्रेमी वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणतात तेंव्हा नेमका त्याचा काय अर्थ होतो? असा प्रश्न उपिंदर सिंह यांनी उपस्थित केला आहे. प्रेम आणि सेक्सची कल्पना वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या संस्कृतीत ही एकसारखी आणि निश्चित स्वरुपाची नाहीये असे त्या म्हणतात. या प्रकरणात तमिळ प्रेमकथा, प्राकृत गाथा सत्तसई आणि संस्कृत ग्रंथातील प्रेमकल्पनापासून ते कामसूत्र, तंत्रातील मैथुनापर्यंत शिल्प, कला, साहित्य आणि धर्माच्या माध्यमातून चर्चा केली आहे. स्त्रीदेवता आणि स्त्रीद्वेष हे तिसरे प्रकरण आहे. पूरब और पश्चिम या चित्रपटात स्त्रीची पाश्चिमात्य आणि भारतीय मुल्यांची चर्चा आहे. त्याचे उदाहरण घेवून या प्रकरणाची सुरुवात केली आहे. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली बरेच साचेबद्ध टोकताळे समाजात रुजलेले दिसतात. भारतीय समाजात एकीकडे देवीपूजा आणि दुसरीकडे स्त्रीदास्य एकदाच आहे. या सर्व प्रक्रियेची चर्चा या प्रकरणात आहे. सामान्य स्त्री, साध्वी स्त्री पासून ते राजघराण्यातील स्त्रियांची चर्चा आहे. सोबतच, वेगवेगळ्या धर्मात साम्यभेद काय आहे हीही चर्चा आहे. त्यामुळे भारतात असणारी विरोधाभासी परिस्थिती समजून घेण्यास अत्यंत मदत होते. ‘हिंसा आणि अहिंसा हे चौथे प्रकरण आहे. असा एक लोकसमज आहे की, ‘मुस्लीम सत्ताधीश येण्याआधी भारत हा अहिंसक होता परंतु चौथ्या प्रकरणात उपिंदर सिहांनी हा लोकसमज गैरसमज कसा आहे हे पद्धतशीर आणि अभ्यासाच्या आधारे सिद्ध केला आहे. त्यांनी प्राचीन भारतातील राजकीय, धार्मिक आणि लैंगिक हिंसेचे दर्शन आपणास घडवले आहे. तसेच, अहिंसेचे दर्शन म्हणजेच तत्वज्ञान कसे विकसित झाले हेही दाखवले आहे. शेवटच्या प्रकरण ‘वादविवाद आणि संघर्ष आहे.  यामध्ये प्राचीन भारतातील धार्मिक वादविवाद परंपरा तसेच, आस्तिक- नास्तिक झगडा, वेगवेगळ्या धर्मांतर्गत आणि बाहेरील वाद, संघर्ष त्यांनी मांडला आहे. वैदिक सनातनी, शैव, शाक्त आणि वैष्णव यांच्यातील वाद आणि संघर्ष जसा त्यांनी चर्चिला आहे. तसेच, ब्राह्मण-श्रमण हाडवैर आणि बौद्ध, शैव आणि वैष्णव यांचा संयोगही दाखवला आहे. विनोदबुद्धी आणि उपहासवृत्ती ही धर्मचिकित्सेत कशी वापरली गेली हेही आपणास या पुस्तकात दिसते. म्हणूनच, आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. 


पुस्तकाचे नाव- एंसियंट इंडिया – कल्चर ऑफ काँट्र्याडिक्शन

लेखक - उपिंदर सिंह

प्रकाशन- अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली

पृ. २६३

किंमत- ७९९

पूर्वप्रसिद्धी- पुण्यनगरी, २ जानेवारी २०२२ 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...