बुधवार, ३० मार्च, २०२२

लैंगिक हिंसा आणि समकालीन चर्चाविश्व : काही निरीक्षणे

               

      माघील काही वर्षांमध्ये भारतीय समाजात ज्या काही घडामोडी घडल्या. त्या मग न्यायपालिकेने दिलेले समलैंगिक लोकांसंबधीचा निर्णय असो कि, मग बाहेरख्यालीपणा संबधीचा निर्णय असो, अनेक क्षेत्रातील स्त्रियांनी पुढे येवून सुरु केलेली मिटूची मोहीम असो, किंवा सरकारने पोर्नसाईटबंदीचा निर्णय असो.   या सर्वांच्या संदर्भात समाजात मोठ्याप्रमाणात घुसळण झाली आणि अजूनही चालू आहे. समाजात चर्चा चालू असणे हे कधीही चांगलेच पण, चर्चा जर उथळ, सोपी, सुटसुटीत आणि वरवरची होत असेल तर पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होतात. या चारही गोष्टींच्या संदर्भात म्हणावी तशी खोलतील आणि बुडाला भिडणारी चर्चा सर्वसामन्यांच्या पातळीवर समाजात झालेली दिसत नाही. काही लोकांनी त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न केलाही असेल पण, जनमानसाला प्रश्नाकिंत आणि प्रभावित करेल काही झालेले दिसले नाही.

        या चारही मुद्द्यांचे/ मोहिमांचे/ निर्णयाचे समाजात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पातळीवर स्वागत झाले. समलैंगिक संबंध, बाहेरख्यालीपणा आणि पोर्न साईटची बंदी या संबंधात नैतिक-अनैतिक, चांगले-वाईट आणि नैसर्गिक-अनैसर्गिक अशा अनेक पातळीवर समाजात चर्चा झाली. सोबतच, मिटू मोहिमेने उपस्थित केलेल्या स्त्रीशोषणाचा मुद्दा बहुतेकांनी मान्य केला पण, त्यात स्त्रीसुद्धा तेवढीच सहभागी आहे पासून स्वतःच्या फायद्यासाठी संबंधित पुरुषाचा उपयोग करून घ्यायचा आणि मग माझे शोषण झाले असे म्हणायचे असा सूर पुरुषांच्यावतीने आणि मुलत: मिटू मोहिमेच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी लावलेला दिसतो. काहींनी मिटू मोहिमेच्या संदर्भात जातीचा प्रश्न उपस्थित करून वेगळ्या अर्थाने मिटू मोहिमेला प्रश्नांकित केले. येथे राया सरकारच्या यादीपासून ते तनुश्री दत्ताच्या प्रकरणापर्यंतची चर्चा वेगेवेगळ्या अर्थाने केली गेली. बहुतेक दिवस किंबहुंना अजूनही मिटू मोहिमेवर विडंबनात्मक भाष्य करणारे Whats Up संदेश, फेसबुक पोस्टी आणि लोकांच्या कुजबुजी वाचण्यात, पाहण्यात आणि ऐकण्यात येत आहेत. समलैंगिक संबंध, बाहेरख्यालीपणा आणि पोर्नसाईट बंदी यांच्या निर्णयाचे समर्थन करणारे लोक एकाचवेळी तिन्ही मुद्द्यांचे समर्थन करतीलच असे नाही. काहींना फक्त समलैंगिक संबंधाच्या निर्णयालाच समर्थन आहे. काहींचा फक्त पोर्न साईटच्या बंदीलाच विरोध आहे आणि काहींचे फक्त बाहेरख्यालीपणा संबंधितच काही मत आहे.    

      सामाजिक व्यवहारात लोकांचे समलैंगिक संबंध, बाहेरख्यालीपणा, पोर्नसाईट आणि स्त्रीशोषण/छळ यांच्याविषयी काहीही मते (नैतिक-अनैतिक, नैसर्गिक –अनैसर्गिक, चांगले-वाईट) असली तरी ह्या गोष्टी ऐतिहासिक वास्तव आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही. समलैंगिक संबंध, बाहेरख्यालीपणा यांच्या संदर्भात न्यायव्यवस्थेचे, समाजाचे काहीही मत असो पण, ह्या लैंगिक व्यवहाराचा दीर्घ इतिहास आहे. समलैंगिक संबंध आणि बाहेरख्यालीपणा हे दोन्ही ऐतिहासिक सामाजिक व्यवहार (पर्यायाने लैंगिक व्यवहार) आहेत. पोर्नसाईट हा जरी आधुनिक प्रकार असला तरी आधुनिक तंत्रज्ञानपूर्व, पारंपारिक समाजात लैंगिक शिक्षणासाठी दंतकथेच्या माध्यमातून, मौखिक पातळीवर, सामाजिक व्यवहारातून आणि कर्मकांडातून विशिष्ट प्रकारची व्यवस्था होती. त्या संबंधी गावगप्पा हे चांगलेच उदाहरण आहे. स्त्रीशोषणाचा/छळाचा सुद्धा दीर्घ इतिहास असला तरी त्याला आपण फक्त लैंगिक दमन (sexual repression) आणि लैंगिक स्वातंत्र्य (sexual liberation) अशा बायनरी[१]त समजू शकत नाही. तसे केले तर मध्ययुगीन मराठी समाजात कुणबी स्त्रीचे मांग पुरुषाशी असलेले बाहेरख्यालीपणा/प्रेमाचे संबंध कसे निर्माण झाले? हे आपण समजून घेवू शकत नाही.

       एका उदाहरणा[२]च्या साह्याने वरील गोष्टींचा गुंता आणि गोंधळ समाजात कशा प्रकारे दिसून येतो ते पाहू. काही दिवसांपूर्वी समलैंगिक व्यवहारासंबंधी कोर्टाचा निर्णय आल्यावर आमचा एक गे मित्र खूपच जल्लोषात होता पण, त्याच्यासोबत असणार दुसऱ्या व्यक्तीला संबंधित निर्णयाचे काहीही नवल नव्हते. म्हणून दोन्हींचे फेसबुकवर आणि समोरासमोर सुद्धा जोरदार मतभेद झाले. त्यात दुसऱ्या व्यक्तीचे आग्रहाचे प्रतिपादन असे होते की, “कोर्टाने निर्णय दिला हे बरे केले पण म्हणून त्याला डोक्यावर घेवू नये कारण व्यवहारात त्याचा जास्त फरक पडत नाही. कोर्टाच्या निर्णयाच्या आधीही समलैंगिक लोक खाजगीत संबंध करत होते आणि कोर्टाच्या निर्णयाच्यानंतरही ते खाजगीतच संबंध करणार आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संबंध करता येणार आहेत काय? किंबहुना लैंगिक व्यवहार हे खाजगीतच केले जातात त्यामुळे या निर्णयाने खूप काही बदल होणार नाहीत.” पोर्नसाईटच्या बंदीमुळे आमच्या ‘मानवी हक्कां’चे हनन होत आहेत. संस्कृतीच्या नावाखाली आम्हाला काय पहावे आणि काय पाहू नये हे ठरवून आमच्या मानवी हक्कांवर आक्रमण केले जात आहे असेही म्हटले गेले. पण, सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे समलैंगिक संबंधाचे समर्थन करणारा, आणि पोर्नसाईट पाहणे हा मानवी हक्क मानणारा गे मित्र बाहेरख्यालीपणाबाबत मात्र विरोधी भूमिका घेतो. एकदा तो माझ्या मैत्रिणीला म्हणाला की, तुझ्या प्रियकराच्या अनेक मैत्रिणी आहेत. त्यावर ती म्हणाली कि, मला माहिती आहे. त्यावर तो गे मित्र म्हणाला की, मला माझा पार्टनर/ प्रियकर कोणासोबत शेअर अजिबात आडवत नाही. 

        या एका उदाहरणाच्या आधारावरून आपण सामान्यीकरण करू शकत नाही याची मला तीव्र जाणीव आहे पण सोबत, समाजातील एक उदाहरण आपणास सामाजिक-लैंगिक-वैचारिक प्रक्रिया समजून घेण्यास साह्यकारी ठरतात. त्यामुळे मी संबंधित उदाहरणाची चर्चा केली आहे.  या तिन्ही-चारही मुद्द्याप्रमाणेच ‘लैंगिक हिंसा’ या गोष्टीसंदर्भातील चर्चा सुद्धा नैतिक, सामाजिक, जैविक, राजकीय, लष्करी, आंतरराष्ट्रीय, मानवी हक्कांच्याच्या संदर्भात नेहमीच केली जाते. त्यामुळे लैंगिक हिंसेतील गुंतागुंत, व्यामिश्रता, परस्परपूरकता आणि परस्परविरोध सुद्धा आपण खोलात आणि त्याच्या बुडाशी जावून समजून घेतला पाहिजे हा माझ्या मांडणीचा विषय आहे.

लैंगिक हिंसा

      ‘लैंगिक हिंसा’ ही व्यापक संकल्पना आहे. त्याअंतर्गत लैंगिक हल्ला, बलात्कार आणि लैंगिक छळ अशा वेगवेगळ्या स्वतंत्र संकल्पना येतात आणि या संकल्पनांचे देशागणिक आणि त्या देशातील कायद्यांच्याप्रमाणे वेगवेगळे असू शकते.[३] असे असले तरी, जगभर लैंगिक हिंसा घडून येते[४] आणि सोबतच, जागतिक समुदायाने युद्ध, लढाईतील लैंगिक हिंसा ही जागतिक सुरक्षा समस्या आहे असे मान्य केले आहे.[५] लैंगिक हिंसा जगभर सामाजिक, राजकीय, वांशिक, जागतिक, लैंगिक, मानसिक आणि जैविक समस्या म्हणून पुढे येत आहे. पण, या संबंधित म्हणावे तसे मोठ्याप्रमाणात अभ्यास झालेले नाहीत. या संदर्भात अभ्यास न होण्याला अनेक मर्यादा आहेत. त्या मर्यादांची चर्चा जागतिक आरोग्य संघटनेने चर्चिली आहे. देशागणिक लैंगिक हिंसेची व्याख्या वेगवेगळी असली तर जागतिक आरोग्य संघटनेने एक व्यापक आणि समावेशक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात जागतिक आरोग्य संघटना म्हणते कि, “ sexual violence means any sexual act, attempt to obtain a sexual act, unwanted sexual comments or advances or acts to traffic or otherwise directed, against a person’s sexuality using coercion, by any person regardless of their relationships to the victim, in any setting, including but not limited to home and work.”[६] या सोबतच, लैंगिक हिंसेचे शारीरिक आणि मानसिक परिणाम असतात असेही जागतिक आरोग्य संघटना म्हणते.

       लैंगिक हिंसेची चर्चा सुटसुटीत पातळीवर उत्क्रांत मानसशास्त्र, उत्क्रांत जीवशास्त्र, समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या पातळीवर तपासलीही जात आहे पण, सुटसुटीत पाहत असल्यामुळे त्याच्या मुळापर्यंत जाता येत नाही आणि बलात्कार नेमका जैविक रासायनिक बदलामुळे घडून येतो कि, सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात घडतो अशी बायनरीत चर्चा घडते. बलात्काराच नव्हे तर लैंगिक छळ, शोषण, पिळवणूक जगभर आणि बहुतेक सगळ्याच सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात घडून येतात. त्यामुळे याकडे समग्रतेच्या द्वंददृष्टीनेच (Dialectics of totality) पाहावे लागेल. मानसिक आरोग्याच्या आणि सामाजिक मानसशास्त्राच्या वाढत्या आवाक्यामुळे माणूस हा नुसता ‘सामाजिक प्राणी’ कधीच नव्हता. तो आधीपासूनच ‘जैविक (bio), मानसिक (psycho) आणि सामाजिक (social) प्राणी’ आहे आणि आता हल्लीच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे तो डिजिटल (digital) प्राणी सुद्धा झालेला आहे. म्हणूनच समकालीन लैगिंक हिंसेचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपणास ‘जैविक, मानसिक, सामाजिक आणि डीजिटल’चे  स्वरूप समजून घ्यावे लागेल असे मला वाटते.

लैंगिक हिंसेचे प्रकार:

       जागतिक आरोग्य संघटनेने लैंगिक हिंसेचे काही प्रकार आणि स्वरूप सांगतांना ११ प्रकारे लैंगिक हिंसेला चिन्हित केले आहे. १) विवाह किंवा डेटिंग नात्यातील बलात्कार २) अनोळखी व्यक्तीकडून बलात्कार ३) लष्करी/युद्ध कारवाईत पद्धतशीरपणे झालेले बलात्कार ४) इच्छा नसतांना घेतलेला लैंगिक पुढाकार किंवा लैंगिक छळ ५) मानसिक आणि शारीरक अपंग व्यक्तीचा केलेला लैंगिक दुरुपयोग ६) मुलांचा लैंगिक दुरुपयोग, ७) सक्तीचे लग्न त्यात बालविवाहाचा समावेश, ८) गर्भनिरोधक आणि लैंगिक आजारांपासून वाचण्यासाठी साहित्य वापरण्याचा अधिकार नाकारणे ९) सक्तीचा गर्भपात करवणे, १०) स्त्रियांच्या लैंगिक अवयवांवर सक्तीची कृती उदा. खतना करणे, कौमार्याची बंधनकारक चाचणी, ११)  सक्तीची वैश्यावृत्ती आणि लैंगिक शोषणासाठी लोकांची तस्करी करणे.[७] या प्रकारांची लैंगिक हिंसेत समावेश केला जातो. या सर्व प्रकारांचा बारकाईने विचार केला तर आपणास असे दिसेल की, बहुतेक सगळेच लोक कमी-अधिक प्रमाणात आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लैंगिक हिंसेत सहभागी होतांना दिसतात.

       लैंगिक हिंसेच्या प्रकाराची चर्चा करतांना ‘हिंसा’ नावाच्या संकल्पनेची सुद्धा गांभीर्याने चर्चा करावी लागेल. सोबतच, सर्व हिंसा या लैंगिक असतात का? किंवा सर्व हिंसा ह्या लैंगिकतेच्या संदर्भात समजून घेता येईल का? असेही प्रश्न निर्माण होतात. ज्याप्रमाणे सर्वकाही राजकीय आहे असे म्हटले जाते तसेच सर्वकाही लैंगिक आहे असे म्हणत ‘हिंसा’ ह्या संकल्पनेला प्रश्नांकित करता येईल का? आणि यामुळे जगभर निर्माण झालेले राष्ट्रीय सुरक्षा विरुद्ध मानवी हक्क हे द्वैत तोडता येईल का? यासंदर्भात हल्ली, कठुआ केसच्या संदर्भात मधु किश्वर ज्याप्रमाणे रोहिंग्या मुस्लीमांना त्या घटनेशी जोडून राष्ट्रीय सुरक्षा विरुद्ध मानवी हक्क असे रूप कशाप्रकारे आणि का देत आहेत हेही समजून घेता येईल. लैंगिक हिंसेचा इतिहास पहिला तर आपणास त्यामध्ये साम्राज्यवादी युद्धांमध्ये जपानी अतिरेकी राष्ट्रवाद्यांच्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी स्त्रियांना ‘comfort women’ म्हणून ‘लैंगिक गुलाम’ बनविल्याचे जसे उदाहरणे आहेत तसेच जगभरात यादवी युद्धात, वांशिक राष्ट्रीयतेंच्या मुक्ती लढ्यात, फाळणीत बलात्कार हे एक व्यापक राजकीय धोरणाचा भाग म्हणून घडवून आणले जातात. युगांडा, बोस्निया-हर्जेगोनिया, कांगो, बांग्लादेश, भारत-पाकीस्थान फाळणीपासून ते आताच्या काश्मिरी, बलुची, कुर्दीस्थानच्या मुक्ती लढ्यात, रोहिंग्याच्या स्थलांतरात अनेक स्त्रियांना लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागले आहे आणि अजूनही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लैंगिक हिंसेचा प्रश्न हा नुसता लैंगिक प्रश्न राहत नाही तर तो जागतिक शांतता, मानवी हक्क, लोकशाही हक्क आणि नागरी हक्कांचा प्रश्न बनला आहे.

    जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था  यांच्या अंतर्गत आणि बाहेर होणारी लैंगिक हिंसा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि अधिक गुंतागुंतीचा विषय आहे. जातीभेद, रंगभेद, धार्मिक भेद यांच्या असंख्य केसेस आपल्याला पाहायला मिळतील. जातिव्यवस्थेच्या संदर्भात लैंगिक हिंसेची चर्चा करायची झाली तर खैरलांजी हत्याकांडाच्या माध्यमातून आपणास व्यवस्थितरित्या समजून घेता येते. अशाच असंख्य केसेस दलित, आदिवासी, मुस्लीम स्त्रियांच्या आहेत की, ज्या माध्यमातून आपण दंगे, जातीय अत्याचार, जमातवाद आणि संस्कृतीकरण यांच्यामार्फत लैंगिक हिंसा कशी घडून येते हे स्पष्ट करतात. जात, रंग आणि धर्माच्यासोबतच, वय आणि शारीरिक दुर्बलता यांच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागते. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या अनुभव तर आपणास घरागणिक, कुटुंबागणिक सापडू शकतील अशी परिस्थिती आहे. लहान मुले आणि अपंग लोकांच्या लैंगिक हिंसेला स्वतंत्र पातळीवर आणि विशेषकरून पाहायला हवे कारण लैंगिक हिंसेच्या अनुभवामुळे ह्या लोकांना आयुष्यभर वेगवेगळ्या सामाजिक-मानसिक धक्यांना सामोरे जावे लागते.  

     लैंगिक हिंसेची अनेक बाजूंनी चर्चा केली जावू शकते पण पुढील भागात ‘हिंसा’ आणि ‘संभोग’ या दोन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवूनच प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे.

 ‘बलात्कारात्मक  हिंसा’ (sexed violence) आणि ‘हिंस्र संभोग’ (violent sex):

      ‘लैंगिक हिंसा’ (sexual violence) ह्या संकल्पनेची आणि त्यातील प्रकारांची आपण वर चर्चा केली आहे पण, त्यात ‘कोठडीतील बलात्कार’ (custodial rape) आणि ‘विवाहांतर्गत बलात्कार’ (marriage rape) या दोन्हींना लैंगिक हिंसा असे म्हटले आहे. पण, त्या दोन्हींमध्ये फरक, वेगळेपणा आणि गुंतागुंत व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय लैंगिक हिंसा नावाची गोष्ट आपणास व्यवस्थितपणे समजून घेता येणार नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे लैंगिक हिंसेची चर्चा करण्यासाठी पुढील दोन संकल्पनेच्या आधारे करायला हवी असे मला वाटते. त्यापुढील प्रमाणे आहेत. १) बलात्कारात्मक  हिंसा आणि २) हिंस्र संभोग. ‘बलात्कारात्मक हिंसा’ ह्यामध्ये हिंसा करण्यासाठी संभोग हा एक हत्यार/ धोरणात्मक भूमिका वापरली जाते आणि हिंसा करत असतांना बलात्कार केले जातात किंबहुना बलात्कार हा हिंसा करायची आहे म्हणून केला जातो.  यामध्ये युद्धकैदी असलेल्या स्त्रियांवर केलेले बलात्कार, दंगे, जातीय अत्याचारातील बलात्कार, लष्करी कारवाईतील बलात्कार, गृहकहलातील किंवा यादवी युद्धातील बलात्कार यांचा समावेश करता येईल. वर आपण या प्रकारच्या अनेक लैंगिक हिंसेच्या प्रकारांची चर्चा केली आहे त्यामुळे ती चर्चा करणे येथे योग्य होणार नाही.

     लैंगिक हिंसेच्या अंतर्गत येणाऱ्या ‘विवाहांतर्गत बलात्कार’ आणि ‘हिंस्र संभोग’ यांच्यातील फरकाची आणि साधर्म्याची चर्चा केल्याशिवाय आपणास लैंगिक हिंसा ह्या संकल्पनेतील गुंतागुंत आणि व्यामिश्रता स्पष्ट होणार नाही. ‘लैंगिक व्यवहार’ हा दोन व्यक्तींमधील खाजगी व्यवहार जरी असला तरी तो व्यापक सामाजिकीकरणातून घडतो त्यामुळे त्याची चर्चा केल्याशिवाय आपणास लैंगिक हिंसा ह्या प्रकाराला भिडता येत नाही. विवाहांतर्गत स्त्रीच्या संमतीशिवाय केलेली लैंगिक कृती ही बलात्कार म्हणून पाहिली जाते. ती महत्वाची आहेच पण, आपल्याकडे संमती घ्यायची असते किंवा द्यायची असते असे बहुतेक लोकांना कळतच नाही. समंती म्हणजे नेमकं काय? ती कशी घडते? कुठल्या गोष्टींमुळे संमती घडते? काही वेळा इच्छा नसतांना सुद्धा सामाजिक बंधन म्हणून संमती दिली जाते का? आपला विवाह टिकावा म्हणून संमती घडवून आणली जाते का? तसेच, संमती लादली जाते का?  संमती उत्कटपणे घडते की, विचारपूर्वक घडते? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.

       मी नवीन लग्न झालेल्या लोकांशी लैंगिक संबंधाविषयी बोलल्यावर असे अनुभवास आले की, विवाहित तरुणानांना संमती घ्यायची असते असे काही माहितच नसते. बहुतेकवेळा लोकांच्या डोक्यांमध्ये भयानक लैंगिक कल्पना असतात, लैंगिक संबंधांविषयी, लैंगिक व्यवहाराविषयी आणि एकमेकांच्या लैंगिक अवयवांविषयी एकाचवेळी अज्ञान आणि कुतूहल असते. विशेषत: पुरुष पहिल्या संबंधाविषयी खूपच रंगवून सांगतात. उदा. एका झटक्यात रडायला लागली. एका रात्री तीन-चार शॉट मारले, पहिल्याच झटक्यात रक्त निघाले इत्यादी इत्यादी...जिथे लोकांना आपल्याच शरीराची व्यवस्थित ओळख नसते किंवा सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात त्याविषयी बोलायचे नसते असा संस्कार असतो अशावेळी लैंगिक व्यवहारात संमतीविषयक चर्चा घडणे हे मोठे कठीण काम आहे. सोबतच, ‘इच्छा’ आणि ‘संमती’ या दोन्ही गोष्टींचा लैंगिक व्यवहारात टकराव सुद्धा होतो. लैंगिक तृप्ती आणि समाधानाच्या सुद्धा अनेक भन्नाट कल्पना समाजात आहेत. त्यामध्ये ‘आक्रमकता’, ‘बळ’ याचीही चर्चा आहे. आपल्याकडील कामशास्त्रीय साहित्यात ‘दंतक्षत’, ‘नखक्षत’ यांचे अनेक वर्णने मिळतात. सोबतच, पुराण कथा, धर्मग्रंथ, मौखिक परंपरा यांच्यामाध्यमातून आपले लैंगिक शिक्षण होते. यामुळे समाजात आपल्या काही लैंगिक धारणा बनतात. म्हणून ‘हिंस्त्र’ संभोग आणि ‘बलात्कारात्मक हिंसा’ यांच्यातील फरक विशेषत्वाने समजून घेतला पाहिजे. ‘हिंस्र संभोग’मध्ये हिंसा ही समोरच्या दुखावण्यासाठी नव्हे तर आनंद घेण्यासाठी असते. पण, बलात्कारात्मक हिंसेत संभोग (भोग) हा आनंदासाठी नव्हे तर दुसऱ्याची मानखंडना करण्यासाठी असतो.  

           ‘संमती’ आणि ‘इच्छा’ या दोन्ही गोष्टींच्या गुंतागुंतीचा, मानसिक, राजकीय आणि सामजिक बाबींचा उलगडा केल्याशिवाय आपणास विवाहांतर्गत घडत असलेली हिंसा विशेषत: लैंगिक संबंधासंदर्भातील ही समजून घेता येत नाही. शेवटी, एखाद्या स्त्रीने संभोगासाठी समंती दिली म्हणजे नेमकं कशासाठी संमती दिलेली असते हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. उदा. एकदाच दिलेली संभोगासाठीची संमती ही योनीद्वारे संभोग करायला असू शकते पण, गुदद्वाराद्वारे करायला नसू शकते. ती फक्त लिंग योनीत घालायला असेल पण, वीर्य योनीत सोडायला नसेलही. तसेच, संमती ही हळुवार हेपल्या (टोके) मारायला असेल पण, जोरदार हेपल्या (टोके) मारायला असेलच असे नव्हे. संमतीपूर्वक संबंध हे कायदेशीर, नैतिक आणि संमती नसलेले संबंध हे बेकायदेशीर आणि अनैतिक अशी जी चर्चा न्याय आणि सामाजिक  पातळीवर घडून येते. त्यामुळे ‘कायदेशीर’, ‘नैतिक’ ह्या गोष्टींना नकळत महत्व येते पण, त्याचवेळी कशाला ‘कायदेशीर’ आणि ‘नैतिक’ म्हणावे असे प्रश्न निर्माण होतात. कायदेशीर आणि नैतिक यांची चर्चा विस्तारली तर ती ‘कायदेशीर विरुद्ध नैतिक’ अशी सुद्धा होवू शकते. तसेच, कशाला कायदेशीर आणि नैतिक म्हणायचे हे सुद्धा सामाजिक-न्यायिक इतिहासक्रमात सातत्याने बदलत आले आहे.

 

                         

          



[१]  Anup Dhar, what if there is violence in pleasure? Seminar, March- 2017

[२] संबधित उदाहरण आमच्या जवळच्या एका मित्राचे आहे. त्याच्या फेसबुकपोस्टी आणि त्याच्याशी झालेली चर्चेचा इथे आधार घेतला आहे.

[५] Maria Erikson Baaz, Maria Stern, Sexual Violence as Weapon of War? Zed Books, London, 2013, प्रस्तावना, पृ. १

[७] कित्ता 


प्रस्तुत निबंध हा २०१८ साली लिहिला होता आणि स्त्री अभ्यास केंद्राच्या चर्चासत्रात वाचला होता. 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...