सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

चला, आपण स्वप्ने पाहूयात, देशाचे भविष्य घडवूयात !


       स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकांनी नव्या भारताचे स्वप्न पहिले होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त करण्यासोबत एक नवा भारत घडवणे हे सुद्धा स्वातंत्र्य चळवळीतील अनेकांचे उद्दिष्ट होते. स्वातंत्र्यसैनिकांनी, क्रांतिकारकांनी पाहिलेले स्वप्न आपण इतक्या वर्षात पूर्ण केले आहे का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. गांधींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य भारत, आंबेडकरांच्या स्वप्नातील जातिमुक्त भारत, भगतसिंहाच्या स्वप्नातील समाजवादी भारत, रवींद्रनाथांच्या स्वप्नातील भयमुक्त भारत कुठे आहे? असे अनेक प्रश्न आपण एकमेकांना विचारायला हवे. भांडवलशाहीच्या माध्यमातून गोष्टींचे बाजारीकरण, वस्तूकरण झाल्यामुळे सगळ्यांचेच इवेंटीकरण झाले आहे. ते तुमचे प्रियकर-प्रियसीचे प्रेम असो किंवा मग देशप्रेम असो. हल्ली स्वातंत्र्यदिनाचाही इवेंट झाला आहे. आरोग्या व्यवस्थेची किती बिकट परिस्थिती आहे हे तर आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे पाहताच आहोत. आरोग्य व्यवस्थेचा बाजार मांडणारे धंदेवाईक लोक कोरोना संकटाच्या काळात काहीच उपयोगी पडलेले नाहीत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचाच फायदा गरिबांना, मध्यमवर्गीयांना आणि सगळ्यांनाच झाला आहे. त्यामुळे पुढील काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच जास्त वाढवली आणि टिकवली पाहिजे.

       लोकांचे, सरकारचे, सरकारी संस्थांचे, कार्यक्रमांचे, घोषणांचे, भाषणांचे एकदातरी मुल्यांकन झाले म्हणजे कळेल की, नेमकं गेल्या ७वर्षात आपण देश म्हणून, समाज म्हणून आणि स्वातंत्र्य भारताचे नागरिक म्हणून कसे वागलो आणि वागत आहोत हे एकदाचे स्पष्ट होईल. माघील  काही वर्षांमध्ये ‘स्वातंत्र्य’ आणि ‘देशप्रेम’ या संदर्भात ज्या चर्चा सार्वजनिक विश्वात आणि प्रसारमाध्यमात घडून आल्या.  त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, अजूनही स्वातंत्र्य चळवळीचा वारसा नेमका कोणता आहे हे आपणास कळालेले नाही. गेल्या ७५ वर्षात स्वातंत्र्यसैनिकांनी, क्रांतिकारकांनी दिलेला विविधतेत एकतेचा, सांप्रदायिक एकतेचा, जातिवाद विरोधाचा, बहुजिनसी परंपरेचा वारसा आपण पुढे घेवून न जाता धार्मिक, जातीय आणि भाषिक द्वेष, गैरसमजच पुढे घेवून जात आहोत. एकाच देशातील लोकांविषयीच्या द्वेषातून आणि गैरसमजातून अनेक खोटे भ्रम जन्माला येतांना दिसत आहेत आणि हे भारतीय समाजाला आणि देशाच्या भविष्याला खूपच घातक आहे.

       एकाच देशातील नागरिक एकमेकांविषयी जात, धर्म, भाषा, लैंगिकता यांच्यामुळे जर तिरस्कार करत असतील तर देश एकसंघ आणि अखंड राहूच शकत नाही. जिथे लोकांची मने जुळत नाहीत तेथे कायदा, दडपण, दमन आणि सक्तीचा काहीच उपयोग होत नाही. हे चीगळलेल्या काश्मीरच्या परिस्थितीतून आपण समजून घ्यालला हवे.  पाच- सहा वर्षात लव जिहाद, राष्ट्रद्रोही, मॉब लिंचिंग, गोरक्षकांचा हैदोस या मुद्द्यांनी देशाच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे?  याचा गांभीर्याने विचार करावा लागत आहे. एकीकडे भरमसाठ वाढणारी आर्थिक विषमता, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी आणि कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या यांच्यामुळे तणावग्रस्त होत जाणारी तरुणाई, तर दुसरीकडे समाजाचे होत जाणारे झुंडीकरण, वाढती धर्मांधता, जातीयवाद, आध्यात्मिक बाजार, असुरक्षिता, ढासळलेले सामाजिक-मानसिक आरोग्य आणि हिंसा. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे किंबहुना या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

      स्वातंत्र्याची  शंभरी जर पहायची असेल आणि लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर  पुढील काही गोष्टी देश आणि समाज यांना केंद्रस्थानी ठेवून अगत्याने आणि अग्रक्रमाने करणे गरजेचे आहे. खालील गोष्टी मला अत्यंत महत्वाच्या वाटतात. त्यासाठी विशेष उपक्रम शाळा, कॉलेज, समाज आणि सरकारी – सार्वजनिक स्थळांमध्ये त्यावर जाहीर किंवा मर्यादित स्वरुपात विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये, सरकारी नोकरदारांमध्ये, राजकीय –सामाजिक पक्ष, संघटनांच्या पातळीवर त्यावर चर्चा, संवाद झाली पाहिजे. त्यांची चर्चा मी पुढे करत आहे.

चला सुरक्षित कप्पे आणि घेटो तोडूयात:

       आजकाल समाजात झपाट्याने घेटोकरण होत आहे. जात, धर्माच्या आधारावर विशिष्ट लोकांना लोकांनाच घरे विकत किंवा भाड्याने दिली जातात म्हणून शहरांमध्ये सुद्धा कोणत्या भागात कोणत्या जातीची आणि धर्माची लोकं राहतात हे स्पष्ट कळते. नोकरी म्हणून, नातेसंबंध म्हणून किंवा जीवन म्हणून सुरक्षितता नाही त्यामुळे जातीला आणि धर्माला लोकं सुरक्षित झोन म्हणून सुद्धा पाहत आहेत. बहुतेक वेळा आपल्याच लोकांमध्ये आपल्याला घरं घ्यायचे आहे किंवा द्यायचे आहे असे लोक सहज बोलून जातात. मिश्र वस्ती असल्यामुळे वेगवेगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांचा एकमेकांशी संपर्क येतो त्यामुळे एकमेकांपासून असुरक्षित वाटत नाही आणि जात, धर्माच्या नावाखाली घेटोकरण सुद्धा होत नाही. घेटोकरणाची प्रक्रिया फक्त घरं आणि वस्तीपूर्ती मर्यादित नाही. आज कॉलेज, सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा बहुतेक वेळा जात, धर्म आणि विचारधारांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे घेटो होत आहेत. त्यांच्यामध्ये चांगला संवाद  नसल्यामुळे ते नेहमी एकमेकांविषयी संशयी असतात. सोशल मिडीयावर असे अनेक घेटो आपणास दिसून येतात. चांगला समाज आणि देशासाठी आपणास देशातील हे घेटो आणि सुरक्षित कप्पे लवकरात लवकर तोडले पाहिजे.  

चला एक होवूयात :

      जात, धर्म, भाषा, वांशिकता यांच्यामध्ये विभागलेल्या समाजाला एक करणे म्हणजे अवघड काम आहे. द्वेष, गैरसमज झपाट्याने वाढत असलेल्या समाजात हे तर अत्यंत जिकरीचे काम ठरते. लोकशाही समाजात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि वैचारिक वैविध्य नेहमी असणारच आहे आणि त्यामुळे लोकशाही विकसितच होते. राजकीय पक्ष आणि संघटना आपापल्या पातळीवर लोकांना वेगवेगळ्या (जात, धर्म, भाषा, विचार) पातळीवर संघटीत करत असतात परंतू त्याच्याही पुढे जावून आपण या देशाचे सुजाण नागरिक म्हणून, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, अभ्यासक, विचारवंत म्हणून व्यापक देशहितासाठी, समाजहितासाठी आणि माणुसकीसाठी एक झाले पाहिजे.  नेहमी सत्ताधारी पक्ष लोकांच्या विरोधाला विरोधी पक्षाचा विरोध म्हणून पचवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. उदा. सध्या देशभरात अखिल भरतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटना म्हणून कमी आणि सत्ताधारी पक्षाची एक विद्यार्थी शाखा म्हणून अधिक काम करत आहे. सरकारने शैक्षणिक क्षेत्रात घेतलेले सर्व निर्णय कसे बरोबर आहेत हे सांगण्यात त्यांची शक्ती खर्ची होत आहे. अशीच काहीशी भूमिका इतर पक्षांच्या विदयार्थी संघटना ज्यावेळी त्यांच्या पक्षांची सरकारे केंद्रात आणि राज्यात होती तेंव्हा घेत होती. त्यामुळे विदयार्थी संघटनांनी राजकीय पक्षांचे बटिक बनू नये. त्यांनी त्यांचे स्वतंत्र किंवा स्वायत्त अस्तित्व ठेवावे. म्हणून, अराजकीय न होता. व्यापक पातळीवर विद्यार्थी म्हणून एक होवून शैक्षणिक धोरणावर राजकीय भाष्य करणे गरजेचे आहे. सरकारची शिक्षण क्षेत्रातील कमी होत जाणारी गुतंवणूक, शिक्षणाचे होणारे खाजगीकरण, वाढणारी भरमसाठ फिस हे सर्व विद्यार्थ्यांचे कळीचे मुद्दे आहेत. देशातील कामगार आणि शेतकरी तर एकीकडे देशोधडीला लागले आहेत आणि दुसरीकडे राजकीय पक्षांच्या हातातील बाहुले बनले आहे त्यामुळे एक झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही.

चला प्रश्न विचारुयात:

      सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला विचारला होता. त्याची चर्चा अनेक जन भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये नेहमी करतात. काही लोक आपल्या सरकारला प्रश्न विचारायला सुद्धा घाबरतात. सरकारसुद्धा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करते आणि सरकारी भाट तर पाकिस्थानाचे तिकीट काढून देणेच बाकी ठेवतात. समाजात आणि देशात द्वेष, गैरसमज, तिरस्कार, जातिवाद, धर्मांधता आणि हिंसा सुद्धा संस्काराच्या, धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली शिकवली जाते त्यामुळे अशा शिकवणीला प्रश्न विचारत राहणे खूपच महत्वाचे असते. प्रश्न विचारणाऱ्याला सत्ताधीश, धर्माचे ठेकेदार घाबरतात हा आपल्या देशाचा इतिहास आहे. हल्ली सोशल मिडीयावर पसरवल्या जाणाऱ्या महीतीची विश्वसनीयता आणि अचूकता न तपासताच अनेक लोक त्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे अनेक हिंसक कारवाया होतात. मोहसीन शेख या पुण्यातील मुलाचा खून अशाच प्रकारे झाला. जात, धर्म, संस्कृती, राष्ट्र आणि राष्ट्रवाद यांचा आधार घेवून बहुतेकवेळा लोकांचा आवाज दाबला जातो. त्यांनी आमच्या जातीच्या, धर्माच्या आणि राष्ट्राच्या भावना दुखावल्या म्हनून प्रश्नकर्त्यावर दडपण आणले जाते, धमकी दिली जाते आणि वेळप्रसंगी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गीसारखी प्रश्न पडणाऱ्या डोक्यात गोळ्या घातल्या जातात. ग्रामसभेपासून ते लोकसभेपर्यंत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजेत कारण तुमच्या वतीने निवडून गेलेले  देशाचा विकास आणि प्रगती करायची असेल तर देशात शांतता, सहिष्णुता, मैत्रभाव आणि एकमेकांवर विश्वास पाहिजे यासाठी प्रश्न विचारत राहणे ही काळाची गरज आहे. 

चला वेगळा आवाज ऐकूयात:

    आपल्याला बोलायला जास्त आवडते.  ऐकायचे म्हटले की, कंटाळा येतो आणि त्यातही आपल्यापेक्षा कोणी वेगळे बोलतो ते तर आपण अजिबात ऐकतच नाही. वेगळा आवाज, वेगळे अनुभव आपल्याला माहितच नसल्यामुळे वेगळेपणाची आपल्याला ओळखच होत नाही. त्यामुळे वेगळ्या जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, वांशिकतेच्या आणि लैंगिकतेच्या लोकांविषयी आपण सहजच गैरसमजाला बळी बडतो. कधी कधी तर गैरसमजामुळे वेगळ्या लोकांचा तिरस्कार आणि द्वेष सुद्धा करतो. उदा. महाराष्ट्रातील हिंदुनी मुस्लिमांचा वेगळा आवाज कधीच ऐकलेला नसल्यामुळे हिंदुत्ववादी लोक मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात सहज यशस्वी होतात तसेच मुस्लीम जमातवाद्यांकडून सुद्धा घडते. जातींविषयी तर हे अधिक लागू होते. प्रत्येक जातीला वाटते की, आमचेच वाईट आहे. इतर जातींचे सगळे काही आनंदात चालले आहे. समाजात सध्या आपल्याला आवडेल तोच आवाज लोकांना आवडतो पण त्यामुळे सगळ्यांचा एकच आवाज आहे असे होत नाही. नेहमी उच्च जातीयांचा, बहुसंख्यांकांचा आवाज हा देशाचा आवाज म्हणून सादर किंवा चित्रित केला जातो पण त्याचवेळी असंख्य परिघावरील दलितांचे, भटक्यांचे, अल्पसंख्यांचे (धार्मिक, भाषिक, वांशिक आणि लैंगिक) आवाज नाकारले जातात किंबहुना दाबले जातात हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. परिघावरील समूहांना अभिव्यक्त होता येईल अशी आपण अपेक्षा करूयात की, ज्यामुळे त्यांचे आवाज लोकांपर्यंत पोहचतील.

चला इतरांशी बोलूयात:

     तंत्रज्ञानाच्या  विकासाने संवाद हरवत आहे अशी चर्चा आपण बहुतेक वेळा ऐकली असेल. या चर्चेत बहुतांश सत्य सुद्धा आहे पण तंत्रज्ञानाच्या विकासाच्या आधी लोकांमध्ये सर्रास संवाद होता हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. इतरांशी आपण नेहमी बोलत होतो का? का फक्त गरज असेल तेंव्हाच बोलत होतो? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे काय बोलत होतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली तर वेगळेच सत्य बाहेर येईल. जातीय संघर्षात, धार्मिक संघर्षात आपल्या जातीला किंवा धर्माला संघटीत करण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ‘इतर’ ठरवणे.  इतरांविषयी भन्नाट कल्पना आपण करून घेत असतो किंवा आपल्या डोक्यात जातीचे, धर्माचे किंवा संस्कृतीचे रक्षक भरत असतात. भारतासारख्या बहु जातीय, धर्मीय आणि भाषिक समाजात तर सहजच ‘इतर’ ठरवले जातात. इतरांच्या नको त्या प्रतिमा निर्माण केल्या जातात, नको त्या प्रकारे चित्रित केले जाते. हे सर्व जाणीवपूर्वकच होत नाही. जाती- धर्माच्या आधारावर धृवीकरण करणारे लोक ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करतात पण सर्वसामान्य लोक न कळत काहीवेळा अशा गोष्टी करत असतात. त्यामुळे इतरांशी बोलायला हवे. जाती-धर्माच्या आधारावर धृवीकरण करणारे लोक पूर्वग्रहदुषित असल्यामुळे ते इतरांशी बोलणार नाहीत किंवा बोलणे टाळतील पण सर्वसाधारण लोकांना योग्य संधी, दिशा आणि समज मिळाली तर ते इतरांशी बोलू शकतील. हल्ली लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न ऐवढे तीव्र झाले आहेत की, लोकांना मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेळच मिळत नाही असे नेहमी म्हटले जाते म्हणून चला इतरांशी बोलूयात असे म्हणत वेगवेगळ्या जात, धर्म, भाषा आणि लैंगिकता असलेल्या लोकांचे सार्वजनिक कार्यक्रम घडवून आणले गेले पाहिजे, वेगवेगळी सामाजिक- धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे अनुभवकथन ऐकले पाहिजे आणि त्यांच्यात चर्चा, संवाद घडवून आणल्या पाहिजेत. तरच आपल्याच देशातील नागरिकांना ‘इतर’ समजून करून घेतलेले गैरसमज, भ्रम आणि त्यातून निर्माण होणारा द्वेष, तिरस्कार दूर होईल.   

      सद्याची देशाची परिस्थिती पाहतात स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आपण किती जपून ठेवला आहे हे स्पष्ट होईल. स्वातंत्र्य चळवळीचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा सांगतांना देशातील समकालीन गंभीर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नाची चर्चा करणे  हे विद्यार्थी, तरुण आणि नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. तसेच, ती आपली मुलभूत जबाबदारी सुद्धा आहे. समकालीन परिस्थिती अशीच राहिली तर लोकशाही, स्वातंत्र्य राहणार नाही. फुले, आगरकर,  विवेकांनद, सुभासचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, पेरियार, मौलाना आझाद, नरेंद्र देव, कमलादेवी चटोपाध्याय, भगतसिंह, क्रांतीसिंह नाना पाटील, लोहिया, जयप्रकाश आणि यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि समाजक्रांतिकारकांचे स्वप्ने वास्तवात येणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी अनेक स्वप्ने पाहिली पाहिजेत. स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी लढले पाहिजे.

                                                                                            

 

 

 

 

 

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

ब्राह्मणेत्तर चळवळ आणि स्त्रिया!

     महाराष्ट्राच्या इतिहासाची चर्चा ब्राह्मणेत्तर चळवळीचा संदर्भ घेतल्याशिवाय पूर्ण होवूच शकत नाही. कारण, विसाव्या शतकाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा सगळ्याच बाजूंना ब्राह्मणेत्तर चळवळीने प्रभावित केलेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्राह्मणेत्तर चळवळीला ‘जातीय चळवळ म्हणून हिणवले जात होते. परंतु, सत्तरच्या दशकापासून आजपर्यंत ब्राह्मणेत्तर चळवळीवर विपुल आणि विविधांगी पद्धतीने संशोधन झाले आहे. तसेच, अभ्यासकांचे समाजशास्त्रसुद्धा बदलले आहे. त्यामुळेच असे दिसते की, ब्राह्मणेत्तर चळवळ ही आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय  चळवळ होती. आज बऱ्यापैकी ब्राह्मणेत्तर चळवळीच्या समग्रतेला मान्यता मिळालेली आहे. परंतु, अजूनही ब्राह्मणेत्तर चळवळ आणि स्त्रिया अशी सखोल चर्चा झालेली दिसत नाही. ब्राह्मणेत्तर चळवळीवर ‘पितृसत्ताक प्रभाव दिसून येतो असेही काहींनी म्हटलेले आहे. परंतु, ब्राह्मणेत्तर चळवळीतील स्त्रियांची चर्चा मात्र सखोल झालेली दिसत नाही. ब्राह्मणेत्तर चळवळीने स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. तसेच, स्त्रियांचे अधिकार आणि निर्णय स्वातंत्र्य सुद्धा मान्य केलेले दिसते. पण, तरीही ब्राह्मणेत्तर चळवळ ही ‘पुरुषकेंद्री चळवळ म्हणून काहीशी चित्रित झालेली दिसते.

      विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात कोल्हापूर संस्थानात वेदोक्त प्रकरणामुळे ब्राह्मण विरुद्ध इतर जाती असे वातावरण निर्माण झाले होते. या वातावरण निर्मितीला अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात ब्राह्मणाच्या हाती ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्तेचे झालेले केंद्रीकरण आणि दृढीकरण कारणीभूत होते म्हणून विसाव्या शतकात आक्रमक स्वरूपाची ब्राह्मणेत्तर प्रतिक्रिया आलेली दिसते. वेदोक्त प्रकरण हे फक्त निमित्तमात्र ठरले आणि ब्राह्मण – ब्राह्मणेत्तर वादाला तोंड फुटले. शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक असे महाराष्ट्राच्या राजकारणात धृवीकरण झाले. शाहू महाराजांनी ब्राह्मणेत्तर लोकांसाठी नोकऱ्या देणे, त्यांच्यासाठी वसतिगृह उघडणे, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे हे धोरण आखले व त्याची अंमलबजावणी केली. १९११ नंतर महाराष्ट्रातील लहान- मोठ्या शहरांमध्ये सत्यशोधक समाजाच्या परिषदा घेण्यात आल्या. तसेच, ब्राह्मणेत्तर जातीमध्ये निर्माण झालेल्या सुशिक्षित वर्गाने जातीपरिषदा घेण्यात सुरुवात केली. परिषदांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांची चर्चा होवू लागली. त्यामुळे ब्राह्मणेत्तर जातींमध्ये जागृती होवू लागली. सामाजिक- राजकीय जागृतीसोबतच शैक्षणिक जागृती होवू लागली होती. त्यामुळे कौटुंबिक बदल झाले. सार्वजनिक आणि खाजगी अवकाश विस्तारला. म्हणूनच, या सर्व प्रक्रियेचा ब्राह्मणेत्तर स्त्रियांवर कसा झाला हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. तसेच, ब्राह्मणेत्तर स्त्रियांनी या प्रक्रियेला कसा प्रतिसाद दिला हेही पडताळून पाहिले पाहिजे. सावित्रीबाई रोडे, तानुबाई बिर्जे आणि गंगुबाई खेडकर यांच्या उदाहरणांच्या संदर्भात ब्राह्मणेत्तर चळवळ आणि स्त्रिया हा संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी, एक गोष्ट स्पष्टपणे नमूद केली पाहिजे की, सर्व सत्यशोधक हे ब्राह्मणेत्तर असले तरी सर्व ब्राह्मणेत्तर हे सत्यशोधक नव्हते. म्हणूनच, ब्राह्मणेत्तर चळवळ आणि त्यातील स्त्रियांची चर्चा करतांना सत्यशोधक नसलेल्या अनेक गोष्टी आणि संदर्भ सुद्धा सहज येवू शकतात.

१.    सावित्रीबाई रोडे:

       सावित्रीबाई रोडे म्हणजे धोंडीबा रोडेंच्या सुनबाई. विवाहापूर्वीची कोणत्याही प्रकारची त्यांची माहिती मिळत नाही. १८५६ साली सनातनी ब्राह्मणांच्या कटकारस्थानाला बळी पडून धोंडीराम नामदेव कुंभार आणि धोंडीबा रोडे  हे दोघे जोतीबा फुल्यांना मारण्यासाठी आले होते. फुलेंनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे त्यांचे हृदयपरिवर्तन झाले.  पुढील काळा .धोंडीबा रोडे हे महात्मा फुले यांचे एकनिष्ठ अनुयायी झालेत. प्रसंगी जोतीरावांच्या अंगरक्षकाचे कामही ते करत. अशा या धोंडीबांकडे, जोतीरावांचे अधूनमधून जाणे येणेही होते. विसाव्या शतकाच्या आरंभापासून सत्यशोधक विचारांच्या विविध परिषदा भरू लागल्या. धोरण म्हणून पुढील काळात ब्राह्मणेत्तर जातींच्या स्वतंत्र परिषदाही भरू लागल्या होत्या असे आपण वर पाहिले आहे. या परिषदांमधून बहुजन समाजाच्या उन्नतीविषयी चर्चाही होवू लागली. सावित्रीबाई रोडे या हाडाच्या सत्यशोधक कार्यकर्तीला स्वजन रामोशी बांधवांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी संघटीत प्रयत्नाची गरज होती म्हणून रामोशी संघाची स्थापना ता ५-१२-१९१६ रोजी झाली. समाज स्थापन करण्याचे कारण कोणते असेल तर ते रामोशी जातीवर ओढलेला अत्यंत अडचणीचा काल हा होय. रामोशी बंधूंची दिवसेंदिवस अतिशय बिकट स्थिती होत चालली आहे. जीवनकलहामुळे मध्यम स्थितींतील लोकांना केवळ उदरनिर्वाहाची देखील पंचाईत पडत असून कनिष्ट स्थितीतील लोकांना फार त्रास होत आहे. एका व्यक्तीस सर्वस्वी ज्ञातीकार्यास वाहून घेणे कठीण पडते. अशा स्थितीत संघशक्तीचा एकच मार्ग दिसतो म्हणूनच संघशक्तीच्या जोरावर ज्ञाती शिक्षणाचे, ज्ञाती जागृतीचे, ज्ञाती सेवेचे व ज्ञाती दु:ख निवारणाचे काम आपल्या हातून शक्य तितके व्हावे या उद्देशाने संस्थेची स्थापना झाली आहे. हाच या संघाचा उद्देश आहे. व ज्ञाती बांधवाचे कल्याणाचे उपाय योजिले जातील. ज्यांना आपल्या रोजच्या व्यवसायातून थोडासा फुरसतीचा वेळ ज्ञातीसेवेत खर्चावयाची इच्छा असेल, त्यांनी अवश्य या संस्थेस येवून मिळावे व आपल्या बुद्धी, ज्ञान, द्रव्य, अनुभव उत्साहादिकांचा लाभ संस्थेस द्यावा ही नम्र विनंती आहे.

     सावित्रीबाई रोडे रामोशी संघाच्या संस्थापक सचिव होत्या. रामोशी संघ स्थापन करते प्रसंगी इंग्रज प्रशासनाशी राजनिष्ठ, शिक्षण सक्तीचे आणि विनामुल्य असावे, सनातनी मंडळींच्या राज्यकारभारापेक्षा इंग्रजीसत्ता रामोशी समाजाच्या हिताची, रामोशी समाजाचे गुन्हेगारी दाखले बंद करावेत, धर्मगुरुंचे धार्मिक वर्चस्व संपुष्टात आणून आपले धार्मिकविधी आपण करावेत आदी ठराव याप्रसंगी पारित करण्यात आले आहे. रामोशी संघाच्या स्थापनेवेळीच इंग्रज प्रशासनाशी राजनिष्ठ असल्याची शपथ त्यांनी घेतलेली दिसते कारण आधीच्या रामोशींच्या संघटीत प्रतीरोधांना वसाहतिक सत्तेने चिरडून टाकले होते याचा इतिहास ताजा होता. भटशाई पेक्षा आंग्लांई बरी हा सत्याशोधकीय विचारांचा संस्कार असल्यामुळे इंग्रजी सरकारमुळेच आम्हला इंग्रजी विद्या मिळत आहे अशी धारणा झाली असावी.

         क्षत्रिय रामोशी संघाच्या माध्यमातून रामोशी शिक्षण परिषदा भरविण्यात आल्या. १५ एप्रिल १९१९ रोजी मुक्काम देवराष्ट्र, तालुका खानापूर, जिल्हा सातारा येथे नानाभाऊ नाईक, सालरू नाईक आदींच्या सहकार्याने पहिली रामोशी शिक्षण परिषद आयोजित केली होती. सन १९२० सालच्या मे महिन्यात दुसरी प्रांतिक रामोशी शिक्षण परिषद चिंचवड भरली होती. या परिषदेसाठी सावित्रीबाईंनी अथक परिश्रम घेतले. त्यांची शिक्षणावरील अढळ निष्ठा पाहून त्यांना या परिषदेने एकमुखाने ‘विद्यादेवी’ म्हणून गौरविले. एकूण नऊ रामोशी शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. शेवटची म्हणजे नववी शिक्षण परिषद मोजे महिमागड, तालुका माण,जि. सातारा येथे मोठ्या उत्साहात १७ मार्च १९२५ रोजी भरली. या परिषदेत तात्यासाहेबांचे व सावित्रीबाई रोडे यांचा नऊवर्षीय चिरंजीव शंकरराव रोडे यांनी निबंध सादर केला.  या शिक्षण परिषदांमध्ये रामोशींच्या शिक्षणाची, गुन्हेगारी जमाती कायद्याची, रामोशींच्या इतिहासाची,  सामाजिक, धार्मिक आणि नैतिक सुधारणांची चर्चा करण्यात येत असे. अहमदनगर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यातील रामोशींचा या शिक्षण परिषदेत मोठा सहभाग होता. वसाहतिक काळात प्रत्येक चळवळीची भूमिका मांडण्यासाठी वर्तमानपत्र किंवा मासिक असत. क्षत्रिय रामोशी संघाने सुद्धा आपली भूमिका लोकांपर्यंत जायला हवी आणि आपल्या जातसमूहातील लोकांची जोडून घेता यावे म्हणून ‘क्षत्रिय रामोशी (रामवंशीय)’ हे मासिक १९२३ मध्ये सुरु केले. या मासिकामध्ये क्षत्रिय रामोशी संघाच्या बैठकींचा अहवाल, रामोशी शिक्षण परिषदेचे वृत्तांकन, जुने लेख, रामोशी जातीचा क्रमश: इतिवृत्तांत आणि सत्यशोधक, ब्राह्मणेत्तर चळवळीच्या काही बातम्या येत असत.

      सत्यशोधक समाजाच्या एकूण चर्चाविश्वात ‘विद्येला’ खूपच महत्व असल्याने सावित्रीबाई रोडे आणि क्षत्रिय रामोशी संघात सुद्धा विद्येला अत्यंत महत्व दिलेले दिसून येते. सावित्रीबाईंनी शिक्षण, विद्येचे फायदे असे निबंध सत्यशोधक समाजाच्या आणि रामोशी शिक्षण परिषदेत सादर केलेले दिसतात. एका ठिकाणी सावित्रीबाई म्हणतात की, “विद्या हे मानवविकासाचे धन आहे. ते इतरांना वाटले तर विकसित होते.  विद्येच्या मार्गातूनच रामोशी जातीचे प्रश्न सुटू शकतात असे त्यांना वाटत होते. ‘रामोशी अनाथ बोर्डिंग’ बांधून रामोशी जातीतील मुलांसाठी निवासीगृह त्यांनी सुरु करण्याचा प्रयत्न होता. सावित्रीबाई रोडेंनी क्षत्रिय रामोशी संघ, रामोशी शिक्षण परिषद आणि क्षत्रिय रामोशी (रामवंशीय) मासिक यांच्या माध्यामातून रामोशी जातीची उन्नती करण्यासाठी शिक्षण आणि विचारांचा प्रचार, प्रसार केला, श्री. शाहू महाराज लायब्ररी हे फिरते आणि मोफत ग्रंथालय सुरु केले. गुन्हेगारीच्या जाचातून सुटका करण्यासाठी सरकारदरबारी अर्ज, विनंत्या केल्या आणि सोबतच सत्यशोधक समाजासोबत सामाजिक, धार्मिक आणि नैतिक बदल रामोश्यांमध्ये घडून यावेत यासाठी प्रयत्न केले. सत्यशोधक आणि ब्राह्मणेत्तर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई रोडेंना पाठींबा दिला होता. तसेच, वेळोवेळी रामोशी जातीच्या शिक्षण परिषदांमध्येही सहभाग नोंदवला.

२.    तानुबाई बिर्जे

      तानुबाई बिर्जे या सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते रावसाहेब देवराव कृष्णाजी ठोसर यांच्या कन्या होत्या. देवराव ठोसर हे पोलीस खात्यात नोकरीस होते. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील वेताळपेठेत तानुबाईंचा जन्म झाला. वडील सत्यशोधक असल्याने तानुबाईंना सत्यशोधक विचारांचे बाळकडू घरीच मिळाले. तसेच, तानुबाई या जोतीबा आणि सावित्रीबाईंच्या शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा होत्या. तानुबाईंचा विवाह सत्यशोधक असलेल्या वासुदेवराव बिर्जेंच्या सोबत झाला. या विवाहाला डॉ. विश्राम रामजी घोले, डॉ. हनुमंतराव घोरपडे, राजन्ना लिंगू, सरदार धोंडीबा धावरे, नारायणराव लोखंडे, पंडिता रमाबाई उपस्थित होत्या असे शेतकऱ्याचा कैवारी या वृत्तपत्रात नोंदवले आहे.

       वासुदेवराव बिर्जे कृष्णराव भालेकरांच्या ‘शेतकऱ्याचा कैवारी या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाची जबाबदारी सांभाळत होते. पुढे, काही काळ त्यांनी नारायणराव लोखंडेंच्या दीनबंधूमध्येही कार्यरत होते. १८९४ मध्ये बडोदा सरकारच्या राजवाड्यात ग्रंथपाल म्हणून गेले. १९०८ मध्ये मराठा शिक्षण परिषदेची तयारी करण्यासाठी नाशिक येथे गेले असता त्यांना साथीचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वासुदेवरावांच्या अकस्मात निधन झाल्यामुळे जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी ती जबाबदारी निष्ठेने पार पाडली. इ. स. १९०८ ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जेंनी दीनबंधू वृत्तपत्राच्या संपादिका म्हणून कार्ये केले. त्यामुळेच त्या सत्यशोधकीय पत्रकारितेच्या पहिल्या महिला संपादिका ठरल्या आहेत. श्रीराम गुंदेकर यांच्यामते, “ तानुबाई या पहिल्या ब्राह्मणेत्तर स्त्री संपादक होत्या. तसेंच, कदाचित मराठी पत्रकारीतेतील पहिलेपणाचा मानही त्यांच्याकडेच जावू शकेल.”

     तानुबाईंनी दीनबंधूंच्या संपादिका म्हणून सत्यशोधक विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. तसेच, ठिकठिकाणी होणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या परिषदांच्या बातम्या छापल्या. त्याबद्दल गणपतराव बिरमल म्हणतात की, “ या वृक्षास कै. जोतीरावांसारखा पाणी घालणारा माळी मिळाल्या कारणाने त्याच्या फांद्या चोहोकडे पसरल्या; परंतु त्या नंतर उत्तम माळ्याच्या अभावी हा समाजरुपी वृक्ष दिवसानुदिवस सुकत जाऊन काही काळ अगदी नाहीसा होतो की काय असे वाटू लागले होते. पण त्या समाजवृक्षाची वरवर अशी स्थिती दिसत होती. त्याची मुळे जमिनीत लांबवर पसरल्याने ‘दीनबंधू’ वृत्तपत्राने चालविलेल्या प्रयत्नास ‘दीनमित्र ही मिळाल्या कारणाने सत्यशोधक समाजबंधुत बरीच जागृती उत्पन्न झाली व हा समाज काही काळापूर्वी अगदी नष्ट होतो की काय अशी भीती होती. ती नाहीशी होऊन आजचा सुदिन प्राप्त झाला.” यातून आपणास तानुबाई बिर्जेंनी सत्यशोधक चळवळीसाठी केलेल्या योगदानाचे महत्व दिसून येते.

      तानुबाईंनी आपल्या वृत्तपत्रीय कार्यकाळात राजकीय भाष्य करणारे लिखाणही बरेच केले आहे. ‘बहुमत लोकानुसारी राज्यपद्धतीस हिंदुस्थान डेश लायक आहे काय? या शीर्षकाची अग्रलेखांची मालिका लिहिली. त्यामध्ये त्यांनी चार अग्रलेख या विषयावर लिहिले. बळीराजापासून ते इंग्रजी राज्यापर्यंतच्या अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले. तसेच, या लेखामध्ये सामाजिक विषमता, वर्णभेद, जहाल-मवाळ मतभेद आणि धार्मिक- प्रादेशिक विविधता अशा मुद्यांचीही चर्चा केली. ‘लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज हाही त्यांचा अत्यंत महत्वाचा अग्रलेख आहे. या लेखात त्यांनी मुंबई इलाख्यात संख्येने बहुसंख्य असलेल्या बहुजन समाजाच्या कुचंबनेचे चित्रण केले आहे. तसेच, त्यांना विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळत नाही. कौन्सिलातील प्रतिनिधी बहुजन समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीत उदासीन असतात. तसेच, ते अनास्था बाळगतात अशी टीका तानुबाई बिर्जेनी केली आहे.  त्या म्हणतात की, बहुजन समाजाच्या दुखांनी हल्लीच्या कौन्सिलातील लोकनियुक्त अथवा सरकारी सभासदांचे पोट दुखत नाही, कारण बहुजन समाजाचा आणि कौन्सिलातील सभासदांचा एवढा निकटचा संबंध नाही.” तानुबाईंनी कौस्निलातील बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, त्याकाळी प्रामुख्याने ब्राह्मण आणि तत्सम वर्गाची लोकच प्रतिनिधी होती. म्हणून, पुढील काळात ब्राह्मणेत्तर पक्षाच्या वतीने कौन्सिलात राखीव जागांची मागणी केली. १९१९ च्या कायद्याने ‘मराठा आणि तत्सम वर्गा’ला काही जागा विधिमंडळात राखीव झाल्या. ‘राष्ट्रीय सभेचे एकेरी धोरण असा अग्रलेख लिहून कॉंग्रेसच्या धोरणांची चिकित्सा केली.

       राजकीय प्रश्नांच्या सोबतच तानुबाई बिर्जेंनी सामाजिक प्रश्नांवर सुद्धा विपुल प्रमाणात लिहिले आहे. समाजातील अंधश्रद्धा, रूढी, खुळचट कल्पना आणि कालबाह्य कल्पना यांचीही चिकित्सा केली आहे. स्त्री दास्यामागील पुरुषी मानसिकतेवर टीका करतांना त्या लिहितात की, “स्त्रीने एकच पती करावा, परंतु पुरुषाने एकापेक्षा अधिक स्त्रिया करून स्वत:च्या विषयासक्तीचे प्रदर्शन करावयाचे, स्त्रियांनी पुरुषांच्या सेवेत तत्पर रहावे म्हणून ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिची अवहेलना करून ‘स्त्री स्वातंत्र्य नहर्ती’ या सारखी अनुदार वचने शास्त्रातून प्रतिपादन करावयाची हा सर्वप्रकार रुढीचा परिणाम आहे.”

 

३.    गंगुबाई खेडकर

      गंगुबाई खेडकर या डॉ. विश्राम घोले यांच्या कन्या होत्या. डॉ. घोलेंच्या घराला लोकप्रियता होती. त्या काळातील मोठमोठी माणसे घरी ये-जा करीत असत. त्यामध्ये महात्मा जोतीराव फुले, गंगाधरभाऊ म्हस्के, मारुतराव नवले अशी ब्राह्मणेत्तर आणि लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे अशी ब्राह्मण मंडळीही असे. सोबतच, युरोपियन डॉक्टर आणि पारशी स्नेहीही असत. त्यामुळे गंगुबाईंना एका मोठ्या सामाजिक विश्वाची ओळख लहानपणीच झाली. हुजूरपागा शाळेच्या संस्थापकांपैकी एक संस्थापक डॉ. घोले होते म्हणून गंगुबाईंच्या शिक्षणाची सुरुवात हुजूरपागा शाळेतून झाली. १८९४ साली वयाच्या सोळाव्या वर्षी डॉ. खेडकर यांच्याशी गंगुबाईचा विवाह झाला.

       डॉ. रघुनाथ खेडकर यांचे कुटुंब हे प्रार्थना समाजी होते. पुढील आयुष्यात डॉ. खेडकर वेदांताचे अभिमानी बनले आणि वैदिक धर्माचे प्रचारक बनले. त्यांनी ब्राह्मणेत्तर पक्ष, अखिल भारतीय यादव महासभा यांच्या कार्यामध्ये सहभाग घेतला आणि भारतभरात आणि जगातही भ्रमंती केली. डॉ. खेडकरांच्यासोबतच गंगुबाईंच्या विद्वत्तेला बहर आलेला दिसतो. डॉ. रघुनाथरावांच्या सोबत त्यांनी हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी काही काळ पार्थना समाजाचा अनुभव घेतला होता. तसेच, त्यांना वडिलांकडून सत्यशोधक समाजाची पार्श्वभूमी होतीच. धर्मातली विकृती कोणती, याचा विचार त्या करीत गेल्या. गंगुबाईंनी त्यांच्या आयुष्यात धर्म आणि शिक्षण याविषयवार अधिक भर दिलेला दिसतो.

    मुलांसाठी, स्त्रियांसाठी, सर्वसाधारण माणसांसाठी आणि जाणकारांसाठी धर्मपुस्तके निर्माण व्हावीत, सर्व धर्मांची एकवाक्यता करणाऱ्या पुस्तकांची निर्मिती व्हावी, श्रीमंतांनी आपला पैसा ज्ञानप्रसारासाठी खर्च करावा. संस्थानिकांनी अशी कामे आवर्जून करवून घ्यावीत, मोफत फिरती वाचनालये निर्माण व्हावीत, वृत्तपत्रांनी लोकांना विविध विषयांवर मतप्रदर्शन करण्यास उद्युत करावे, अशा अनेक गोष्टी गंगुबाई आपल्या भाषणांमध्ये बोलून दाखवत असत. १९११ साली  डॉ. खेडकरांच्यासोबत परदेशात गेल्यावर तिकडेही त्यांनी परदेशी लोकांच्या समोर जाहिरे भाषणे दिले आणि वेदांताचा प्रचार केला. गोपाल\गोपाळ या डॉ. खेडकरांच्या जातीमध्ये विसाव्या शतकाच्या आरंभीच्या दशकामध्ये आमुलाग्र सामाजिक बदल झाला. एकीकडे क्षत्रियीकरण आणि दुसरीकडे कृष्णभक्तीचा प्रभाव यामुळे गोपाल जातीचे लोक स्वतःला भागवत गीता आणि पर्यायाने वैदिक धर्माची स्वतःला जोडून घेवू लागले. म्हणूनच, गंगुबाईंवर ही भागवत गीतेचा प्रभाव दिसतो.

    स्त्रीशिक्षण हे राष्ट्रहिताच्या विरोधी आहे अशी भूमिका घेणाऱ्या टिळक आणि टिळकपंथीय लोकांच्या विरोधात मवाळांनी स्त्रीशिक्षणाला पाठींबा दिला. त्यासाठी परिषद आयोजित केल्या. त्यामध्ये स्त्री शिक्षणावर मत मांडण्याचे काम गंगुबाईंनी केले. सोबतच, १९१४ मध्ये मराठा भातृभाव मंडळ आयोजित वार्षिक समारंभात ‘विद्यार्थ्यांची कर्तव्ये या विषयवार गंगुबाई बोलल्या. गंगुबाईंची वकृत्वशैली आणि प्रतिभा उत्कृष्ठ होती. म्हणून, प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या वकृत्वशास्त्र या पुस्तकात गंगुबाई या उत्तम वक्त्या होत्या असे म्हणत सचित्र परिचय दिला आहे.

       सावित्रीबाई रोडे, तानुबाई बिर्जे आणि गंगुबाई खेडकर यांनी सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात जे कार्य केले आणि व्यक्तीगत आणि सार्वजनिक अवकाशात ज्या भूमिका घेतल्या. त्याची वातावरण निर्मिती ही सत्यशोधक – ब्राह्मणेत्तर चळवळीने केलेली दिसते. म्हणून, तिन्ही स्त्रियांच्या भूमिका, विचार आणि कृती समजून घ्यायची असेल तर व्यापक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रक्रिया आणि चळवळींच्या संदर्भात पहायला हवे असे मला वाटते.  

 


पूर्वप्रसिद्धी - मिळून साऱ्याजणी, एप्रिल २०२२ 

   

 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...