गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

फुले- आंबेडकरांचे धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा


1. “धर्मासंबंधाने पूर्वी अनेक वेळा विद्वान लोकांत चांगले कडाक्याचे वादविवाद झाले

आहेत. आमच्या धर्मातील देव अमूक होते व तमक्या धर्मातील देव तमुक होते अशा

बद्दल सध्या अनमान करण्याचे काहीच प्रयोजन नाही. जो धर्म मनुष्यास मनुष्यपण

देतो किंवा ज्या धर्माचे लोक किंवा धर्मगुरू आपल्या एकंदर स्वधर्मीय बांधवांच्या

हितास्तव काळजी बाळगतात तोच धर्म चांगला आहे आणि हेच आंता दाखविण्या

करिता प्रत्येक धर्माच्या मनुष्याने व धर्मगुरूने झटले पाहिजे. निरर्थक बाचा बाच

करण्यात व कोटिक्रम लढविण्यात काही एक फायदा नाही. धर्म चांगला आहे परंतु त्या

धर्माचे स्वरूप खरे रहस्य काय आहे हे जर त्या त्या धर्मातील लोकांस समजत नाही

तर त्या धर्माच्या चांगलेपणाचा उपयोग काहीच नाही.”, दीनबंधू, ४ ऑगस्ट १८९५ 


2. "आधीच धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. जेव्हा खऱ्या धर्माची पायमल्ली होते

तेव्हाच धार्मिक कलह माजतात. जे हिंदू व जे मुसलमान सध्या धर्माच्या नावावर

एकमेकांशी भांडत आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या धार्मिक वृत्तीची माणसे चार-दोन तरी

सापडतील किंवा नाही याची आम्हाला शंका आहे. धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच

धर्माचा आवेश दाखवून दुसऱ्या धर्माच्या लोकांचे प्राण घेऊ पाहतात. धर्माने माणसाला

देवदूत बनविले पाहिजे; परंतु तसे न होता धार्मिक कलहामुळे धर्माच्या योगाने

माणसाचे माणूसपण जाऊन त्याला पशूपणा येत आहे. अशा स्थितीत अशिक्षित गुंड

मारामाऱ्या करतात. एकमेकांची टाळकी सडकतात व खून करतात आणि सुशिक्षित गुंड

अल्पायासाने आपापल्या समाजात लोकप्रिय होण्याची पर्वणी साधून घेतात. अशिक्षित

गुंडाच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असता सुशिक्षित गुंडांवरच आहे.

कारण त्यांच्या चिथावणीमुळेच अशिक्षित लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात.

सुशिक्षित गुंड जसे हिंदूंत आहेत तसे मुसलमानांत आहेत. पंडितांत आहेत तसे

मौलानांमध्ये आहेत. खरे पाहिल्यास धर्माचा सूक्ष्म विचार कोणीच करीत नाही,

धर्माच्या आद्य तत्त्वांची कोणालाच पर्वा नाही. दुराग्रह व दुरभिमान यांचेच उभय

समाजांमध्ये प्राबल्य झालेले आहे.” बहिष्कृत भारत, १२ आगस्ट १९२७


धर्मांधता आणि धार्मिकता यामध्ये फरक केला पाहिजे अशी चर्चा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या

प्रमाणात सुरु झालेली दिसते. मात्र, ही चर्चा काही नवीन नाही. म्हणूनच, लेखाच्या सुरुवातीला दोन

उदाहरणे दिली आहे. अलीकडच्या काळात इहवादी/ धर्मनिरपेक्षतावादी राजकारणाच्या प्रभावामुळे

धर्माची मानव कल्याणाची बाजू दुर्लक्षिली गेली होती आणि त्यामुळेच धर्मांधतेचे राजकारण आव्हान

म्हणून उभे राहिलेले आहे असेही काहीसे म्हटले जात आहे. यातून बाहेर पाडायचे असेल तर धर्माचा

सकारात्मक उपयोग करून धर्मांध राजकारणाला आव्हान देता येवू शकते असेही काहींचे मत आहे.

जगभरात धर्माचा संकुचित अर्थ लावून धर्मांध, दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे धार्मिक कट्टरतावादी

राजकारण जगातील बहुतेक कानाकोपऱ्यात आकारास येत आहे. भारतात आणि नेपाळमध्ये हिंदुत्व,

हिंदूराष्ट्र, सनातन यांच्या माध्यमातून जे धर्मांधतेचे राजकारण खेळले जात आहे. ब्रह्मदेशात हेच बौध्द

राष्ट्रवादाच्या नावाखाली चालू आहे. बांग्लादेशात इस्लामी कट्टरतावादाचे वळण घ्यायला सुरुवात केलेली

दिसते. संपूर्ण दक्षिण आशियाई देशांमध्ये धार्मिक बहुसंख्याकवाद आक्रमक स्वरूप धारण करून

लोकशाहीसमोर अनेक प्रकारचे अडथळेही निर्माण करत आहे. धर्मांध राजकारणामुळे भारताचे सामाजिक,

बौध्दिक, मानसिक आरोग्य खालावत आहे. धार्मिक भावना एवढ्या नाजूक झाल्या आहेत की, त्या

व्यंगचित्र, सोशलमिडिया पोस्ट, कॉमेडी, भाषण यासारख्या कोणत्याही गोष्टींमुळे दुखावल्या जात आहेत.

भारताप्रमाणेच जगभरात धर्माचा आधार घेवून धार्मिक उजव्या शक्ती लोकशाही, मानवी हक्क, लैंगीक

समता आणि उदारमतवाद या सगळ्यांचा मूल्यांना आव्हान उभे करत आहेत अशा काळात धर्माचा

साकल्यांना विचार करण्याची अत्यंत गरज आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. एकोणिसाव्या आणि

विसाव्या शतकात भारतात आणि महाराष्ट्रात गंभीर धर्मचिकित्सा आणि धर्मचर्चा झाली आहे. आज मात्र,

धर्मचर्चा आणि धर्मचिकित्सेचा प्रांत काहीसा शांत आहे. म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हे आधुनिक महाराष्ट्राच्या समाजचिंतन, धर्मचिकित्सेच्या प्रक्रियेचे अपत्य आहेत. सोबतच, त्यांनीही

धर्मचिकित्सेचा भूप्रदेश विस्तारलाही आहे. त्यांचे विचार आजही आपणास या बाबतीत दिशादर्शक आणि

मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणून, म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मचिंतन आणि

धर्मचिकित्सेची चर्चा प्रस्तुत लेखात करण्यात येणार आहे.

धर्म : सर्वंकष व्यवस्था

धर्मचिकित्सेच्या बाबतीत म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जास्त मर्मभेदक आणि

छिद्रान्वेशी आहे. धर्म हा माणसांचे नुसते आध्यात्मिक जीवन घडवत नाही तर सामाजिक, आर्थिक,

कौटुंबिक, राजकीय आणि लैंगिक जीवनही नियंत्रित करतो याची दोघांना होती. कारण, भारतीय संदर्भात

धर्माचे अनेक अर्थ होतात. आधुनिकपूर्व काळात महाराष्ट्रात प्रत्येक पुरुषाला तीन धर्मांचे पालन करावे

लागत असे. त्यामध्ये स्वधर्म, जातिधर्म आणि गोतधर्माचा समावेश होता. स्त्रियांसाठी अधिकचे दोन धर्म

होते. त्यामध्ये एक स्त्रीधर्म होता तर दुसरा पतिव्रता धर्म होता. धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथामध्ये पा. वा.

काणेंनी प्राचीन भारतात धर्माचे अनेक अर्थ होत होते याची चर्चा केलेली आहे. धर्म म्हणजे निती, कायदा,

आज्ञा, देव, संपद्राय असे अनेक अर्थही धर्माचे होतात. म्हणूनच, भारतीय संदर्भात धर्म हा संपूर्ण मानवी

जीवन व्यापून टाकतो असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही असे मला वाटते. प्रदीप गोखले यांनीही

मनुस्मृतीविषयी भाष्य करतांना म्हटलेले आहे की, धर्म या शब्दाची चर्चा ही दोन अर्थांच्या संदर्भात

बहुतेकवेळा होते. त्यापैकी पहिला म्हणजे विशेष धर्म म्हणजेच वर्णाश्रम धर्म आणि दुसरा म्हणजे साधारण

धर्म किंवा सामान्य धर्म. सामन्य किंवा साधारण धर्म यामध्ये बंधूधर्म, मित्रधर्म, निसर्गधर्म अशा गोष्टींचा

समावेश होतो. गोखलेंच्या मते, धर्म म्हणाला की विशेषत: वर्णाश्रमधर्मच अपेक्षित राहत असे.

धर्म ही एक नुसती उपासनापध्दती नसून एक मूल्यव्यवस्था आहे. त्यासोबतच, ईश्वर आणि भक्त

यांच्यातील एक सत्तासंबंधही आहे. मंदिर, दान-दक्षिणा, लोकाश्रय आणि राजाश्रय या माध्यमातून एक

अर्थव्यवस्थाही धर्मासोबत विकसित होत असते. स्त्री-पुरुषांमधील आणि पुरुष-पुरुषांमधील संबंधी

धर्मानुसार ठरतात त्यामुळे तिला एक सामाजिक अंगही आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘धार्मिक’

या संकल्पनेमध्ये ‘राजकीय, आर्थिक, सामाजिक’ हे सगळेच एकत्र सामावले जाते. म्हणून, धर्माचा

उपासनापद्धती म्हणून विचार करणे पुरेसे नसून धर्माचा एक व्यवस्था म्हणूनच विचार केला पाहिजे. फुले-

आंबेडकरांना धर्म हा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टी नियंत्रित करतो याची जाणीव होती.

त्यामुळेच, त्यांच्या लिखाणात धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक यांना वेगळे करून पाहिले जात

नसून एकत्रितपणेच पाहिले जाते.

फुले- आंबेडकरी धर्मविषयक दृष्टीकोन:

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघांच्या आयुष्यात धर्माला अत्यंत महत्वाचे स्थान.

दोघांनी संपूर्ण आयुष्य धर्माची चिकित्सा जरी केली असली तरी त्यांनी धर्माला नाकारलेले नाही. धर्माच्या

माध्यमातूनच एक व्यापक समाजपरिवर्तन होऊ शकते अशी त्यांची समज दिसते. म्हणूनच, व्यापक अर्थाने

फुले आणि आंबेडकर दोन्हीही नास्तिक नसून धार्मिक होते. व्यक्तीचे आणि एकूण समाजाचे कल्याण ज्यात

सामावलेले आहे, अशी जीवनपद्धती म्हणजे धर्म. या व्यापक अर्थाने दोघे धार्मिक होते. मात्र, धर्म म्हणजे

जीवनपद्धतीत विशिष्ट श्रद्धांचा, समजुतींचा, कर्मकांडाचा अटळ म्हणून समावेश केला की,

धर्माची संकुचित, सांप्रदायिक कल्पना तयार होते. अशा संकुचित अर्थाने ते धार्मिक नव्हते.

कारण, फुले आणि आंबेडकर दोघांनी त्यांनी बुद्धीची आणि विवेकाची दारे खुली ठेवली होती.

दोघांच्याही लेखनात ‘धार्मिक’ हे नुसते धार्मिक नसून सामाजिक, आर्थिक, राजकीय, लैंगीक असे

सगळेच असते म्हणून त्यांनी धर्माकडे व्यावहारिक दृष्टीकोनातूनही पाहिलेले आहे. धर्माला

समाजाची गरज असते असे त्यांनी स्वीकारलेले जरी असले तरी धर्माच्या आधारे लोकांचे शोषण,

पिडण आणि दमन केले जाते. त्यांच्यावर मानसिक गुलामगिरी लादली जाते याची चर्चा फुल्यांच्या

‘गुलामगिरी’पासून आंबेडकरांच्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ पर्यंत सगळीकडे केली गेलेली दिसते.

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोन्हींच्या सार्वजनिक चर्चांमध्ये नीतीला

अनन्यसाधारण महत्व आहे. समाजाला नैतिक बनवायचे असेल तर धर्माची गरज आहे. तसेच,

धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषणही होते. त्यामुळे धर्माची चिकित्साही केली पाहिजे. लोकांना

पर्यायही उपलब्ध करून दिले. धर्म हा माणसांसाठी आहे माणूस हा धर्मासाठी नाही असे म्हणत

धर्माचे मानवीकरण करण्याची दोघांची भूमिका दिसते. दोघांच्या धर्मविषयक दृष्टीकोनात बरेच

साम्य जसे आहे. तसेच, काही मुलभूत फरकही आहेत. त्यांची चर्चा केल्याशिवाय आपणास त्यांचे

धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा पूर्णपणे समजू शकत नाही.

धर्मचिकित्सा, सर्वधर्मसमभाव आणि धर्मांतर

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर धार्मिकसोबत धर्मचिकित्सकही आहेत.

दोघांनी कठोर धर्मचिकित्सा केली आहे. त्यांची धर्मचिकित्सा ही एकाचवेळी उपयुक्ततावादी आणि

बुध्दीप्रामाण्यवादी अशी होती. समाजाला काय उपयुक्त आहे आणि बुध्दीला काय पटते याच्या

आधारावर त्यांनी धर्मचिकित्सा केलेली दिसते. मनुग्रंथ जाळून टाका असे म. जोतीराव फुलेंनी

म्हटले आहे. त्यांच्याप्रमाणेच, श्रुती आणि स्मृतींचा धर्म नष्ट करावाच लागेल असे डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांनी म्हंटले आहे. दोघांनी अशी कठोर भूमिका घेण्याचे कारण, त्यांच्या अभ्यासानुसार

धर्मशास्त्रांमध्ये विवेक आणि नैतिकता नाही. त्यामध्ये पक्षपात आणि भेदभाव आहे.

धर्मशास्त्रांमध्ये येणारा धर्म हा वर्णाश्रम धर्म आहे. त्यामध्ये समानता नाही. बंधुत्व नाही. फक्त

नियम आहेत आणि ते भेदभाव करणारे आहेत ही गोष्ट दोघांना मान्य नाही. दोघांचाही जन्म हिंदू


समाजातील तथाकथित कनिष्ट मानलेल्या जातींमध्ये झालेला असल्यामुळे त्यांनी हिंदू धर्म ग्रंथांची

कठोर चिकित्सा केलेली आहे. कारण, हिंदू समाज वर्तन हे विषम आणि भेद्भावात्मक होते.

धर्मचिकित्सेत बरेच साम्य असले तरी त्या पुढचा प्रवास मात्र दोघांचा काहीसा वेगळा झालेला आहे.

म. जोतीराव फुल्यांनी धर्मांतर न करता नवीन धर्माला ‘सार्वजनिक सत्यधर्म’च्या माध्यमातून नवीन

अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. काहींच्या मते, प्रचलित धर्म सोडून नवीन प्रयत्न फुल्यांनी केला

होता. काहींचे म्हणणे आहे की, फुल्यांनी नवीन धर्मच स्थापन केला. एक मात्र निश्चित आहे की,

प्रचलित धर्मव्यवहार फुल्यांना मान्य नव्हता आणि म्हणून आपण नवीन पर्याय दिले पाहिजे अशी

त्यांची धारणा होती. सर्वधर्मसमभाव आणि धर्मांतर या दोन मुद्द्यांच्या संदर्भात आपल्या समकालीन वातावरणात

बरीच चर्चा चालू आहे. म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले चिंतन

आजच्या संदर्भातही म्हणूनच महत्वाचे ठरते. म. जोतीराव फुलेंच्या धार्मिक चिंतनातून असे दिसते

की, फुले हे सर्वधर्म समभाव मानणारे होते. मात्र, त्यांचा सर्वधर्मसमभाव हा म. गांधींसारखा नव्हता

हेही आपण स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. गांधींच्या दृष्टीने सर्व धर्म ही ईश्वराने निर्माण केलेली

आहे. त्यामुळे सगळेच समान आहेत. त्यामुळे धार्मिक भेदभाव करू नये. या प्रकारच्या धार्मिक

चिंतनामुळेच गांधींनी कठोर धर्मचिकित्सा केलेली दिसत नाही. म. जोतीराव फुले एकीकडे सर्व

धर्मांमध्ये सत्य आहे असे म्हणत सर्वसमभाव मानतात मात्र त्याचवेळी कोणत्याच धर्मात पूर्ण सत्य

नाही म्हणून आपण सत्यशोधक बनले पाहिजे असेही म्हणतात. सर्वधर्म समभाव मानत

असल्यामुळे ते धर्मांतरवादी नाहीत मात्र व्यक्तीला त्याच्या मर्जीनुसार धर्म बदलायचा असेल तर

त्याने तो बदलावा असेही ते म्हणतात. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातच बहुधर्मीय कुटुंबाची चर्चा

आली आहे. ही चर्चा आजच्या काळालाही मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरू शकते. गणपतराव

नामक पात्राने सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात पुढील प्रश्न विचारला आहे. – एकंदर सर्व

जगातील स्त्रीपुरुष मानवांनी कोणत्या धर्माचा स्वीकार करावा? प्रश्नाचे उत्तर देतांना म.

जोतीराव फुल्यांनी अत्यंत मार्मिक आणि प्रबुद्ध करणारे उत्तर दिले आहे. ते म्हणतात कि, “या

भूमंडळावर महासत्पुरुषांनी जेवढी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत, त्या सर्वांत त्या वेळेस

अनुसरून त्यांच्या समजुतीप्रमाणे काहींना काही सत्य आहे, यास्तव कोणत्याहि कुटुंबातील एका

मानव स्त्रीने बौध्द धर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तीने तो धर्म

स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे

पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्यांच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून

तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिनं महमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्या

पुत्राने सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने

सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे; आणि या सर्व मातापित्यासह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत

असतां प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून व्देष करू नये आणि त्या सर्वांनी आपण

सर्व निर्माणकर्त्याने निर्माण केलेली लेकरे असून त्याच्याच (निर्मिकाच्या) कुटुंबातील आहोत,

असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकाशी वर्तन करावे, म्हणजे ते आपल्या सर्वांच्या

निर्माणकर्त्याच्या राज्यांत धन्य होतील.” या बहुधर्मीय कुटुंबाच्या कल्पनेतून त्यांनी

सर्वधर्मसमभाव आणि धर्मांतर या दोन्ही मुद्यांना स्पर्श केला आहे असे मला वाटते.

म. जोतीराव फुल्यांप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मचिंतन केलेले असले तरी ते

मात्र सर्वधर्म समभाव मानत नाहीत. त्यांनी हिंदू धर्माप्रमाणेच इस्लाम, ख्रिस्ती, बौध्द अशा विविध

धर्मांची चिकित्सा केली आहे. म्हणून, त्यांना नुसते हिंदूधर्म चिकित्सक म्हणून चालणार नाही तर

त्यांना ‘सर्वधर्मचिकित्सावादी’ म्हटले पाहिजे अशी डॉ. प्रदीप गोखलेंची भूमिका आहे. डॉ.

बाबासाहेब आंबेडकर धर्मचिकित्सावादी असल्यामुळे त्यांचा सर्वधर्मसमभावाला विरोध होता.

कारण सर्वधर्मसमभाव या तत्वामध्ये सर्व धर्मांचा कर्ता एकच आहे फक्त मार्ग वेगवेगळे

आहेत अशी मान्यता आहे. त्यामुळे सर्व धर्म समान आहेत. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे नीट

आचरण करावे. म्हणजेच माणसाने इतर धर्मांबद्दल आदर बाळगावा पण स्वतःचा धर्म सोडू

नये अशी भूमिका सर्वधर्मसमभाव या तत्वामागे आहे. डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा

अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांचा सर्वधर्म सारखे आहेत आणि ईश्वरनिर्मित आहे यावर


विश्वास नव्हता. तसेच, धर्म हा ईश्वरनिर्मित नसून तर मानवनिर्मित आहे अशी त्यांची

भूमिका होती. सर्वधर्मसमभाव हे तत्व नाकारल्यावर धर्मांमध्ये तरतमभाव करता येतो.

त्याआधारेच एखाद्या धर्माचा त्याग, धर्मांतर आणि नव्या धर्माची स्थापना या साऱ्यांचे समर्थन

शक्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरवादी भूमिका घेवून धर्मचिकित्सेच्या माध्यमातून

कोणता धर्म मानवाला सन्मान देवू शकतो आणि कोणता धर्म गुलामी लादतो याचीही चर्चा

केलेली आहे. ‘धर्म’ आणि ‘धम्म’ यांच्या संदर्भात केलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची

धर्मचिकित्सा अत्यंत महत्वाची आहे. तसेच, बुध्द आणि त्याच्या धर्माचे भवितव्य’ या

निबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘प्रचलित धर्म’ आणि ‘आदर्श धर्म’ या कल्पना मांडल्या

आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचलित धर्म कल्पनेत ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक या

कल्पना आहेत. पोथीनिष्ठा आहे. कर्मकांड आहे. श्रद्धेचे प्राबल्य आहे. माणसाचा ईश्वराशी

असलेला संबंध मुख्य मानला आहे व त्या तुलनेत माणसामाणसांमधील संबंध व त्याला

व्यापणारी निती गौण किंवा उपरी ठरवलेली आहे आणि दुसरीकडे आदर्श धर्म कल्पनेत

अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वर, आत्मा यांसारख्या बुध्दीच्या कसोटीवर न टिकणाऱ्या कल्पनांना

मुळीच स्थान नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाशी जे सुसंगत असेल आणि नितीमूल्यांना ज्यात

स्वयंभू आणि मध्यवर्ती स्थान असेल, ज्यात सामाजिक दु:खावर तोडगा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श धर्माच्या संदर्भात तीन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. १.

धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. २. धर्माने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुलभूत

सिध्दांतांना मान्यता दिली पाहिजे आणि ३. धर्माने दारिद्र्याचे उदात्तीकरण करता कामा नये.

बौध्द धर्माच्या अभ्यासाने डॉ. आंबेडकरांना बौध्द तत्वज्ञानात आदर्श धर्माची तत्वे दिसली

म्हणून त्यांनी जाहीरपणे सार्वजनिक पातळीवर आपल्या अनुयायांसह बौध्द धर्माशी दीक्षा

घेतली आणि बौध्द धर्माचा नवा अर्थ लावला. त्यालाच अलीकडच्या काळात ‘ नवयान

बौध्दधर्म/ आंबेडकरी बौध्दधर्म’ असेही म्हणतात. बौध्द राष्ट्रांमधील काही सनातनी बौध्द

भिखूंनी ‘बुध्द आणि त्याचा धम्म’ या डॉ. आंबेडकरकृत ग्रंथाच्या प्रती जाळल्या होत्या. हिंदू


धर्म आणि बौध्द धर्म यांची तुलना करतांना डॉ. आंबेडकर धर्म आणि धम्म यामध्ये फरक

करतात आणि बुद्धाने सांगितलेला धर्म नसून धम्म असे एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे

बौध्द धर्म हा प्रचलित धर्म नसून आदर्श धर्म आहे असेही म्हणतात. तसेच, बौध्द धम्म आणि

मार्क्सवाद यांची तुलना करतांनाही त्यांनी बौध्द धम्माला त्यांनी धर्मच म्हटले आहे. ही एक

त्यांची विचारातील विसंगती दिसते.

समारोपीय नोंदी

म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा याचा

बारकाईने अभ्यास केल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, त्यांनी धर्माची सामाजिक, व्यावहारिक, वैज्ञानिक

अशा वेगवेगळ्या पातळीवर चिकित्सा केली ती मानवी जीवन समृध्द करण्यासाठी. धर्माच्या नावावर

होणारे शोषण, दमण यांना त्यांनी विरोध केला आहे. तसेच, नियम आणि कायद्यांनी लादलेला धर्म हा

मानवी जीवनात अडथळे उत्पन्न करत आहे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नांदू देत नाही अशी त्यांनी टीका

केली आहे. म्हणूनच, सार्वजनिक सत्यधर्म आणि बौध्द धर्म यांच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक

व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करून धार्मिक वर्तनव्यवहार बदलण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या नावाने शोषण केले

जात असेल तर धर्माच्या माध्यमातूनच पर्याय देता येवू शकतो आणि मानवी जीवन उन्नत करता येवू शकते

असा संदेश म. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. धर्माला मानवकेंद्री आणि

समाजाभिमुख करण्याचे काम त्यांनी केले आहे. यालाच आपण मुक्तीवादी धर्मशास्त्र (Liberation

Theology) म्हणू शकतो. काही दशकांपूर्वी दक्षिण अमेरिकेत धर्मांध राजसत्ता उलथवून टाकण्यामध्ये

तिकडच्या मुक्तीवादी धर्मशास्त्र चळवळींचा मोठा वाटा होता. त्याचीच गरज आज संपूर्ण जगाला आहे.

समकालीन भारतात वाढत्या धर्मांध, धार्मिक संकुचितता आणि धार्मिक कट्टरतेच्या काळात सर्वधर्म

समभाव हा शब्दच बदनाम केला गेला आहे. तसेच, धर्मांतरविरोधी अनेक कायदे आणून लोकांच्या धार्मिक

स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कावर गदा आणला जात आहे. अशावेळी, धर्मचिकित्सा, सर्वधर्मसमभाव आणि

धर्मांतर अशा सगळयांचा वारसा सांगणारा फुले- आंबेडकरांचा धर्माचे मानवीकरण करणारा धार्मिक

मानवतावाद आपणास मार्ग आणि दिशा दाखवू शकतो असे मला ठामपणे वाटते.


पूर्वप्रसिध्दी - मिळून साऱ्याजणी डिसेंबर २०२५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पुरोगामी कोणास म्हणावे? मराठी विचारविश्वातील काही नोंदी

पुरोगामी कोण आहे? १९४१ मध्ये पुरोगामी वाड्मय म्हणजे काय? याविषयी आचार्य जावडेकरांनी मुंबईमध्ये भाषण दिले होते. त्या भाषणाची चिकित्सा ना. सी....