गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

पुरोगामी कोणास म्हणावे? मराठी विचारविश्वातील काही नोंदी


पुरोगामी कोण आहे?

१९४१ मध्ये पुरोगामी वाड्मय म्हणजे काय? याविषयी आचार्य जावडेकरांनी मुंबईमध्ये भाषण दिले

होते. त्या भाषणाची चिकित्सा ना. सी. फडके यांनी केली होती आणि पुरोगामी वाड्मय निश्चित काय हे

आचार्य जावडेकरांनी सांगितलेच नाही असा आरोप केला होता. चिकित्सेची चिकित्सा करतांना आचार्य

जावडेकरांनी म्हटले होते कि, प्रो. फडके यांच्या पुरोगामी वाड्मयविषयीच्या कल्पना आणि माझ्या

पुरोगामी वाड्मयविषयीच्या कल्पना या भिन्न आहेत.’ या उदाहरणापासून लेखाची सुरुवात करण्याचे कारण

आहे – समकालीन काळात पुरोगामी या शब्दाविषयीच्या गैरसमजुती आणि गोंधळ. काही महिन्यांपूर्वी

महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध साहित्य समीक्षक व्यक्तीशी बोलत असतांना जाणवले, कि ते जातीअंतक विचार

करणाऱ्या मंडळीला पुरोगामी हा संकल्पनेत समाविष्ट करत नाही. अधिक विचारले असता ते म्हणाले, कि

माझ्या समजेनुसार पुरोगामी म्हणजे समाजवादी, डावे आणि प्रामुख्याने मार्क्सवादी आहेत. मागील एक

दशकात समाज माध्यामावरही ‘ यांना पुरोगामी म्हणावे का?’ किंवा ‘यांना पुरोगामी कसे म्हणावे?’ किंवा

‘ खरे पुरोगामी आहेत का?’ अशा मुद्यांवर बऱ्याचवेळा तात्कालिक चर्चा होतांना पाहिली आहे. मात्र, या

चर्चेमध्ये कोणी मुद्द्याच्या तळाशी गेलेले दिसत नाही. हिंदुत्ववादी चर्चाविश्वात तर पुरोगामी शब्दाला

‘फुरोगामी’ म्हणून हिणवले जाते. या मागे दोन उद्देश असण्याची शक्यता आहे असे मला वाटते. त्यातील

पाहिला म्हणजे पुरोगामी म्हणून जे काही मांडले जाते, सांगितले जाते. त्या सगळ्यांची टिंगलटवाळी करणे

आणि दुसरा काहीसा गंभीर आहे. तो म्हणजे हिंदुत्ववादी मंडळींच्या दृष्टीने तथाकथित पुरोगामी हे खरे

पुरोगामी नाहीतच. म्हणून, त्यांना फुरोगामी म्हणत असावेत. मात्र, फुरोगामी म्हणजे नेमकं याचीही चर्चा

हिंदुत्ववादी मंडळींनी कधी केलेली दिसत नाही.

आपण वरील चर्चेत पाहिले आहे, कि पुरोगामी म्हणजे नेमकं कोण याविषयी निश्चित असे ठोकताळे

आपल्याकडे नाहीत. त्यामुळे कोणीही स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वैचारिक

गोंधळ होण्याचीही दाट शक्यता आहे असे आपणास दिसते. कोणीही स्वतःला पुरोगामी म्हणून घेत असेल

तर मग त्याचा अर्थ पातळ होण्याचीही शक्यता आहे. अलीकडे माझ्या निरीक्षणात असे आले आहे, कि

सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी असलेली काही मंडळी ही लैंगिक बाबतीत पुरोगामी नसते.

तसेच, हे उलटेही होते. काही मंडळी असेही असतात, कि ते सार्वजनिक ठिकाणी पुरोगामी असतात मात्र

खाजगी आणि कौटुंबिक स्तरावर पुरोगामी नसतात. हेही उलटे असते. एकाच कुटुंबात किंवा समाजात

वेगवेगळ्या पिढ्यांमधील पुरोगामीपणाही वेगवेगळा असतो. या सगळ्या चर्चेतून एकच गोष्ट स्पष्ट होते. ती

म्हणजे पुरोगामी असणं किंवा पुरोगामित्व/ पुरोगामीपणा हा एकरंगीय, एकरेषीय आणि एकसाची नाहीये.

व्यक्ती, समाज, काळ, आर्थिक स्थिती, संस्कृती आणि वैचारिकता या नुसार पुरोगामित्वाच्या कल्पना आणि

धारणा बदलतात. म्हणूनच, आपण एकच एक निकष सरसकट सगळ्यांना लावू शकत नाही. असे असले

तरी, सगळ्यांना सामावून घेतील असे पुरोगामी असण्याचे निकष काहींनी करण्याचा प्रयत्न केला आहे.

संदीप ताम्हणकर यांनी अक्षरनामा या वेबपोर्टलवर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, कि “पुरोगामी म्हणजे

वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी,

सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून

चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी,

मनुवादी, धर्मवादी, कर्मविपाकसिद्धान्तवादी, शब्दप्रामाण्यवादी आणि कट्टर धार्मिक नसतात. अखिल

मानवजातीचं अधिक भलं कसं होईल, या दृष्टीने पुरोगामी लोक विचार करतात. त्यांना हे माहीत असतं

की, या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.” पुरोगामी म्हणजे कोण हे सांगण्याचा चांगला प्रयत्न

आहे. मात्र, यावरून एक ठोस अशी पुरोगामी असण्याची व्याख्या करता येत नाही. पुरोगामी शब्दाच्या

अति व्याप्त धारणेमुळेही निश्चितपणे पुरोगामी म्हणजे नक्की कोण यावरून मतभेद आणि वैचारिक गोंधळ

होण्याची शक्यता असते. काहीवेळा जो प्रतिगामी नाही तो पुरोगामी असेही म्हटले जाते. मात्र, प्रतिगामी

म्हणजे नेमकं काय? सामाजिक प्रतिगामी, धार्मिक प्रतिगामी आणि लैंगिक प्रतिगामी यांच्यामध्ये काही

फरक असतो का? हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

आधुनिक मराठी विचारविश्व सुधारक, सत्यशोधक, राष्ट्रवादी, समाजसत्तावादी, नवमतवादी,

बुद्धिवादी, हिंदुत्ववादी, जातीअंतक अशा अनेक प्रवाहांनी घडवले आहे. त्यातील अनेक मुद्दे समकालीन

पुरोगामी चर्चाविश्वाशी संबंधित होते असेही म्हणण्यास बराच वाव आहे. किंबहुना, आपण असेही म्हणू

शकतो कि, समकालीन पुरोगामी चर्चाविश्व हे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात घडलेल्या मराठी

विचारविश्वाच्या गुणदोषांचे अपत्य आहे. म्हणूनच, आधुनिक मराठी विचारविश्व आणि पुरोगामी संज्ञा-

संकल्पना संबंध तपासणे आवश्यक ठरते.

समाजसुधारक पुरोगामी होते का?

महाराष्ट्राला समाजसुधारणेची एक दीर्घ परंपरा आहे. पेशवाई अस्तामुळे आणि इंग्रजी सत्तेची

स्थापनेमुळे मोठे स्थित्यंतर मराठी समाजजीवनात घडले. या स्थित्यंतराने धर्मजीवन, समाजजीवन,

अर्थजीवन, कौटुंबिकजीवन, दैनदिन जीवन अशा सगळ्याच जीवनअंगांवर प्रभाव टाकला. त्यामुळेच,

इतिहासकार ज्ञानेंद्र पांडे यांनी इंग्रजी राजवटीने वर्तन आणि विचार पद्धतीच बदलून टाकली असे म्हटले

आहे. इंग्रजी सत्तेने, ख्रिस्ती मिशनरींनी एक मोठे नैतिक आव्हानही मराठी समाजापुढे उभारले होते.

त्यातूनच एकोणिसाव्या शतकात धर्मचिंतनाला सुरुवात झाली आणि त्यातून समाजसुधारणेला प्रारंभ

झाला. देव आणि धर्मकेंद्रित समाजाची चिकित्सा करत विकसित झालेल्या प्रबोधन, ज्ञानोदय आणि

वैज्ञानिक क्रांतीचीही एकोणिसाव्या शतकातच मराठी समाजाला ओळख झाली. त्या प्रभावाखालीच

महाराष्ट्रात अनेकांनी धर्मचिकित्सा करायला सुरुवात केली. कारण, तत्कालीन समाजात रूढ असलेल्या

प्रथा, रूढी या सगळ्या धर्माचाच भाग म्हणून पाहिल्या जात होत्या. मग तो स्त्रीधर्म असो किंवा

वर्णजातीधर्म असो. बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, सक्तीचे वैधव्य या स्त्रीकेंद्री जुनाट प्रथा असो किंवा अस्पृश्यता, जातीय भेदभाव अशा अमानवी प्रथा असो. या सगळ्यांच्या विरोधात समाजसुधारकांनी लढा दिला आहे. त्या

अर्थाने सगळेच सुधारक पुरोगामी ठरतात. एक गोष्ट मात्र येथे स्पष्ट करण्याची गरज आहे. ती म्हणजे सर्व

समाजसुधारक हे तत्कालीन सामाजिक प्रथा आणि समस्या यांची चिकित्सा करत होते. मात्र, त्यांचे त्यांच्या

समाजसुधारणेच्या दिशाही आणि वैचारिक दृष्टीकोनही वेगवेगळे होते. माझ्या मते, आधुनिक महाराष्ट्रात

तीन प्रकारे समाजसुधारणेचा विचार विकसित झाला. १. आर्य समाजाच्या नेतृत्वाखालील सुधारणावादी

पुनरुज्जीवनवाद (Reformist Revivalism) २. प्रार्थना समाजाच्या प्रभावाखालील उदारमतवादी

सुधारणावाद (Liberal Reformism) ३. सत्यशोधक समाजप्रेरित जहाल सुधारणावाद (Radical

Reformism). तिन्ही सुधारणावादी प्रवाहांनी धर्माच्या नावावर जे शोषण चालते, भेदभाव केला जातो

आणि रूढी, प्रथा आणि कर्मकांड यांना पाठींबा दिला जातो. त्यांची चिकित्सा केली आहे आणि धर्माचा

वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. पुरोहितगिरी, ब्राह्मणवाद याला विरोध केला आहे आणि

स्त्रीशिक्षणाला पाठींबा दिला आहे. जातीच्या मुद्द्यावर आणि धर्माच्या स्वरूपावर या प्रवाहांमध्येही

काहीवेळा तात्पुरते आणि काहीवेळा टोकाचे मदभेद होते. काही प्रवाहांमध्ये परंपरेचे गौरवीकरण,

काहींमध्ये सुलभीकरण असले तरीही तत्कालीन प्रथांना आणि रूढींना मानवहिताच्या दृष्टीने दिलेली ती

प्रतिक्रिया होती म्हणून त्यास प्रतिगामी म्हणता येत नाही. म्हणूनच, माझ्या दृष्टीने समाजसुधारकांमध्ये

बोलते आणि कर्ते सुधारक असा फरक असला तरी किंवा समाजसुधारणेच्या नावाखाली काही मंडळी कुटुंब

सुधारणाच करत असले तरीही सगळेच पुरोगामी होते. त्यांच्यातील पुरोगामित्व हे वेगवेगळ्या

स्वरूपातील होते असे मात्र आपण निश्चित म्हणू शकतो.

सत्यशोधकीय पुरोगामित्व

१९३६ मध्ये महाराष्ट्र शाहीर संमेलनामध्ये शाहीर पिलाजीराव सरनाईक यांनी सत्यशोधक

समाजाचा पोवाडा सादर केला होता. त्या पोवाड्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही सामाजिक,

आर्थिक धार्मिक शिक्षण देण्याला झाली आहे असे संपूर्ण पोवाड्यात जवळपास पंधरा ते वीस वेळा म्हटले

आहे. यावरूनच, आपणास सत्यशोधक समाजाचे महत्व लक्षात येते. एकोणिसाव्या शतकात संपूर्ण भारतात

समाजसुधारणा चळवळीला चालू होत्या. मात्र, बहुतेक सुधारणा चळवळी या अभिजन, शहरकेंद्रित

चळवळी होत्या. सत्यशोधक समाज हा एकमेव असा समाज होता, कि जो एकाचवेळी शहरातील कष्टकरी,

कामगार वर्गात आणि ग्रामीण भागात शेतकरी वर्गात कार्यरत होता. म्हणूनच, सत्यशोधक समाजाला

बहुजनाची चळवळ आणि ग्रामीण भागात झपाट्याने पसरलेला समाज म्हणूनही पाहिले जाते. सत्यशोधक

समाजाचे समाजशास्त्र हेही बहुजातीय आणि बहुधर्मीय होते. काही लोक अज्ञानामुळे आणि काही लोक

जाणीवपूर्वक सत्यशोधक समाजाने ब्राह्मणद्वेष पसरवला असे म्हणतात. मात्र, वस्तुस्थिती काहीशी वेगळी

आहे. सत्यशोधक समाजाने ब्राह्मणशाहीची चिकित्सा केली आहे. ब्राह्मण आहे म्हणून व्यक्तीची नाही.

‘ख्रिस्ती, महमद, मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी’ अशी भूमिका सत्यशोधक समाजाची होती.

व्यक्ती विशिष्ट जाती आणि धर्मात जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ही भूमिका सत्यशोधक

समाजाला मान्य नाही. म्हणूनच, सत्यशोधक समाजात मानवी हक्क, अधिकार आणि सन्मान यांची चर्चा

आहे. स्त्री-पुरुष हे दोघेही जन्मत: स्वतंत्र आहेत अशी ठोस भूमिका जोतीराव फुल्यांनी घेतली होती.

सत्यशोधकांनी समाजातील शोषणाची मूलगामी चिकित्सा केली आहे. शोषणाचे अनेक कंगोरे

सत्यशोधकांनी त्यातही प्रामुख्याने जोतीराव फुल्यांनी उलघडून दाखविले आहेत. शोषण हे फक्त आर्थिक

नसते याचीही चर्चा त्यांनी केली आहे. धार्मिक शोषण, मानसिक शोषण आणि सामाजिक शोषण हे

समाजात घडते आणि बऱ्याचवेळा या वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाचा एकमेकांशीही संबंध असतो असेही

जोतीराव फुल्यांनी दाखविले आहे. उदा. जोतीराव फुलेकृत शेतकऱ्याचा आसूड आणि इशारा ही दोन ग्रंथ.

जोतीराव फुल्यांची चर्चा करतांना अनेकजण त्यांनी मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या.

घराचा हौद खुला केला याच गोष्टी सांगतात. मात्र, त्यासोबतच त्यांनी विधवा स्त्रियांची लैंगिकता या

सारख्या आजही दुर्लक्षित असलेल्या प्रश्नाला हात घातला होता आणि त्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह

काढले होते याची चर्चा अनेकजन टाळतात. जोतीराव फुल्यांनी गरोदर विधवा स्त्रियांसाठी हक्काची जागाच

निर्माण केली नाही तर विधवा स्त्रियांच्या परिस्थितीस कारणीभूत असलेल्या समाजस्थितीही चिकित्सा

केली आणि विधवा स्त्रियांवर गरोदरपण लादणाऱ्या पुरुषांचीही चिकित्सा केली आहे. तसेच, एका

विधवेच्या मुलाला दत्तकही घेतले.

सत्यशोधकांनी धर्माची कठोर चिकित्सा केली आहे. मात्र, त्यासोबतच, त्यांना धर्म हा मानवी जीवनात

अत्यंत महत्वाचा आहे याचीही जाणीव होती. म्हणूनच, जोतीराव फुल्यांनी मानवधर्माची चर्चा करणारा

सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथही लिहिलेला आहे. सगळेच धर्म हे सत्य सांगतात. मात्र, कोणत्याही एकाच धर्मात

संपूर्ण सत्य नाही अशी भूमिका सत्यशोधकांनी घेतली आहे. म्हणूनच, एकाच कुटुंबात वडील ख्रिस्ती, आई

मुस्लीम, मुलगी बौद्ध आणि मुलगा हा सत्यधर्मी असू शकतो. फक्त त्यांनी आपापला धर्मग्रंथ वाचून त्यातील

विचार पटला तर धर्मविषय निर्णय घ्यायचा आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक एकाच कुटुंबात गोडीगुलाबीने

एकत्र राहू असा विचार सत्यशोधकांनी केला आहे. १८९५ मध्ये ख्रिस्ती आणि आर्य समाजी मंडळींमध्ये

कोणाचा धर्म श्रेष्ठ यावरून एकदा वादविवाद चालू असतांना त्यावर सत्यशोधकांच्या दीनबंधु वृत्तपत्राने

‘कोणता धर्म श्रेष्ठ आणि कोणता धर्म कनिष्ठ यापेक्षा कोणताचा धर्म मानवाचा विचार करतो आणि कोणत्या

धर्मातील पुरोहित लोकांच्या हिताचा विचार करतात हे जास्त महत्वाचे आहे’ या आशयाचे भाष्य केले

होते. यावरूनच आपणास सत्यशोधकांची धर्मविषयक दृष्टी दिसून येते. सत्यशोधकांच्या विचारसृष्टीत

सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक याची फारकत नाही. म्हणूनच, सत्यशोधकीय

पुरोगामित्व एकरेषीय नाहीये.

पुरोगामी राष्ट्रवाद

आधुनिक महाराष्ट्राच्या विचारविश्वाला ब्राह्मण-ब्राह्मणेत्तरवादाने जसे घडवले आहे. तसेच, संकुचितही

बनवले आहे. कारण, बहुतेकवेळा साचेबद्ध चौकटीत महाराष्ट्राच्या विचारविश्वाची चर्चा त्यामुळे केली आहे.

मात्र, महाराष्ट्राचा बौद्धिक इतिहास हा काही एकरेषीय पद्धतीने घडलेला नाही. किंबहुना कुठलाच इतिहास

असा घडत नाही. इतिहासाचे एकसाचीकरण, मग ते कुठल्याही अर्थाने असो, पुरोगामी असो, प्रतिगामी

असो किंवा डावे-उजवे असो हे घातक आहे.

टिळक आणि छत्रपती शाहू या दोन्हींच्या संबंधीने अजूनही एकरेषीय चर्चा केली जाते. दबक्या

आवाजात अजूनही टिळकांची बाजू घेणारे छत्रपती शाहूंना आणि छत्रपती शाहूंची बाजूने घेणारे टिळकांना

नावे ठेवत असतात. टिळकांना वर्ण-जातीव्यवस्था समर्थक आणि शाहूंना इंग्रज समर्थक ठरवत असतात.

मात्र, तत्कालीन वासाहतिक आणि सामाजिक स्थितीचा आढावा घेतला तर आपणास स्पष्टपणे असे दिसते,

कि दोघांनी आपल्या क्षमतेप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार पुरोगामीत्व घडवले आहे. इतर बाबींमध्ये त्या

पुरोगामित्वाच्या मर्यादाही आहेत हेही तेवढेच खरे आहे. या सगळ्यांची चर्चा करतांना टिळक हे कोकणस्थ

आणि खोत पार्श्वभूमीचे ब्राह्मण होते आणि छत्रपती शाहू हे संस्थानाचे राजे होते या सामाजिक – राजकीय

स्थानाचा संदर्भ लक्षात ठेवला पाहिजे. टिळकांनी स्वराज्याची मागणी केली तर छत्रपतींनी सुराज्याची

मागणी लावून धरली. तत्कालीन संदर्भात दोन्ही मागण्यांना त्यांच्या अनुयायांनी एकमेकांच्या विरोधी

म्हणून पाहिले आहे मात्र आज त्यांच्या इतिहासाचा धांडोळा घेतांना हे स्पष्टपणे दिसून येते, कि

स्वराज्याशिवाय सुराज्य मिळणार नव्हते आणि सुराज्याशिवाय स्वराज्याला अर्थ राहणार नव्हता.

म्हणूनच, टिळक-शाहू हा ताणलेला वाद आपण पुरोगामी राष्ट्रवाद आणि जहाल सुधारणावाद यांच्या

संदर्भात समजून घेतला तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेण्यास सोपे होतात.

राष्ट्रवादविषयक विपुलप्रमाणात चांगली- वाईट चर्चा जगभरात झालेली आहे. समकालीन जगात

पुन्हा ‘राष्ट्रवादी’ विचारांच्या चर्चा चालू झाल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी भूमिका

ही व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. राष्ट्रवादाच्या अभ्यासकांनी राष्ट्रवादाला विविध प्रवाहांमध्ये समजून

घेतले आहे. साम्राज्यवादी सत्ताधीशांना विरोध करण्यासाठी निर्माण झालेला पुरोगामी राष्ट्रवाद

(Progressive Nationalism) आणि परकीय सत्ताधीशांच्या जोखडातून मुक्त होईन स्वतःच्या राजकीय

हितसंबंधासाठी जोपासलेला प्रतिगामी राष्ट्रवाद (Repressive Nationalism) अशी काहींनी चर्चा केली

आहे. काहींनी समावेशी राष्ट्रवाद (Inclusive Nationalism) आणि वगळणारा राष्ट्रवाद (Exclusive

Nationalism) असे प्रकार केले आहेत. काहींनी धार्मिक राष्ट्रवाद (Religious Nationalism) आणि

निधर्मी/धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद ( Secular Nationalism) असेही प्रकार केले आहेत. टिळक हे राष्ट्रावादी नेते

आणि विचारवंत होते. त्यांच्या राष्ट्रवादाला कसे समजून घ्यायचे हा प्रश्न अलीकडे अनेकांसमोर उभा

राहिला आहे. काहींनी टिळकांना ‘हिंदू राष्ट्रवादी’ ठरविण्याचाही प्रयत्न केला आहे. तसेच, काहींनी त्यांना

‘हिंदू जमातवादी’ ठसविण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र, टिळकांच्या एकूण सगळ्या राजकीय आयुष्याची

वाटचाल पाहिली तर ‘ हिंदू राष्ट्रवादी ‘ आणि ‘ हिंदू जमातवादी’ ही बिरुदावली त्यांना चिटकवाने योग्य

होईल का असाही प्रश्न निर्माण होतो. ब्रिटीश साम्राज्यवादविरोधी निर्माण केलेला असंतोष आणि १९१६

मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लीम लीगच्या लखनऊ कराराच्या माध्यमातून घडवून आणलेले हिंदू-मुस्लीम ऐक्य

ही दोन उदाहरणे टिळकांच्या पुरोगामी राष्ट्रवादाची लक्षणे आहेत. तसेच, हा पुरोगामी राष्ट्रवाद समावेशक

आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादही होता. टिळकांच्या राजकीय पूर्वायुष्यात सुरुवातीला ब्राह्मणांचे नेते म्हणून

ब्राह्मणेत्तरविरोधी आणि हिंदूंचे नेते म्हणून मुस्लीम विरोध भूमिकाही घेतली होती. मात्र, म्हणून त्यांना

ब्राह्मण्यवादी आणि हिंदुत्ववादी म्हणता येत नाही. कारण, ब्राह्मण्यवादी, सनातनी आणि हिंदुत्ववादी

कल्पनासृष्टीपेक्षा त्यांचे कल्पनाविश्व हे काहीसे वेगळे होते. म्हणूनच, त्यांचा राष्ट्रवाद हा पुरोगामी राष्ट्रवाद

होता अशीच माझी भूमिका आहे. परंतु, त्यांच्या पुरोगामी राष्ट्रवादाला त्यांच्या सामाजिक जतनवादी

(सनातनी किंवा पुनरुज्जीवनवादी नव्हे) भूमिकांमुळे काहीशा मर्यादा होत्या. हेही तेवढेच खरे आहे.

विसाव्या शतकातील मराठी विचारविश्व आणि पुरोगामित्वाच्या विविध छटा

विसाव्या शतकात मराठी चर्चाविश्वाची वैचारिक रंगभूमी ही बहुरंगी झाली. कारण, पूर्वीचा म्हणजे

एकोणिसाव्या शतकातील सामाजिक विरुद्ध राजकीय हा वाद काहीसा मिटला होता आणि सामाजिक

आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात एकदाच सुधारणा कराव्या लागतील अशी समज विकसित होवू लागली

होती. टिळकांचे निधन झाल्यामुळे कॉंग्रेसच्या रंगमंचावर जननायक म्हणून उदय झाला होता. त्यामुळेच,

महाराष्टातील कॉंग्रेसचे समाजशास्त्रही पूर्णत: बदलायला सुरुवात झाली होती. दुसरीकडे, रशियातील

क्रांतीमुळे समाजवादी विचारांची पाळेमुळे महाराष्ट्रात पसरू लागली होती. त्यामुळेच, इंग्रजी सत्ता

बोल्शेव्हिझिम बागुलबुवा ही पसरवू लागली होती. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांनी काही

मुलभूत प्रश्न हिंदू समाजव्यवस्थेपुढे निर्माण केले होते आणि त्यामुळे एकीकडे साने गुरुजी, आचार्य जावडेकर

यांच्या सारखी मंडळी समाजवादी चष्म्यातून हिंदू धर्म आणि संस्कृती अर्थ लावत होती तर दुसरीकडे

महादेवशास्त्री दिवेकर, रघुनाथशास्त्री कोकजे ही मंडळी हिंदू समाजाला कालसुसंगत आणि अद्ययावत

करण्यासाठी प्रयत्न करत होती. हिंदू समाजाच्या एकीमध्ये जात आणि अस्पृश्यता अडथळा येतात म्हणून

हिंदुत्ववादी वर्तुळात सावरकर आणि शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनेसाठी

सामाजिक पुरोगामी प्रयत्नही होत होते. याचकाळात, एकीकडे स्त्री-पुरुष संबंधाच्या संदर्भात रवीकिरण

मंडळ साहित्यविश्वात पुरोगामी भूमिका घेवून पारंपारिक चौकटींना धक्के दिले. दुसरीकडे, र. धो. कर्वेंनी

लैंगिक शिक्षण, स्त्री आरोग्य आणि समाजस्वास्थ्य या संदर्भात विज्ञानवादी, बुद्धिवादी भूमिका घेतली. अशा

विविध प्रवाहांच्या माध्यमातून विसाव्या शतकातील मराठी विचारविश्वात पुरोगामी विचार विकसित

झालेला दिसतो. यातील बहुतेकवेळा प्रवाहांनी पुरोगामी हा शब्दप्रयोग वापरलेला नाही. मात्र, समकालीन

संदर्भात पुरोगामी या शब्दाला जो आशय आणि अर्थ आहे त्याचे मुळे वर उल्लेख केलेल्या वैचारिक

प्रवाहांमध्ये आहेत असे मला वाटते.

1. नवमतवाद आणि मार्क्सवादी पुरोगामीपणा

रशियन क्रांतीच्या प्रभावातून विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात समाजवादी/मार्क्सवादी

विचारांचा प्रभाव मराठी विचारविश्वाला पडायला सुरुवात झाली होती. त्याचे प्रतिबिंब साहित्यिक

जीवनात आणि सामाजिक-राजकीय जीवनात पडायला सुरुवात झाली आणि त्यातून कामगारकेंद्री साहित्य

निर्मिती होवून साहित्य, कथा आणि कविता यांच्यामध्ये कामगारवर्गीय जीवन चित्रित होवू लागले होते.

पांढरपेशी, मध्यमवर्गीय साहित्याची मर्यादा दाखवत कामगार वर्गीय साहित्य हे खरे साहित्य आहे अशी

चर्चा होवू लागली. साहित्याची कलावादी भूमिका ही अभिजनवादी आहे. तीचा लोकजीवनाशी संबंध नाही

अशी भूमिका घेत कला हे फक्त कलेसाठी नसून समाजासाठी आहे, साहित्य फक्त मनोरंजनासाठी नसून

जीवनासाठी आहे अशी भूमिका घेतली गेली. मार्क्सवादी साहित्यात आर्थिक विषमता, धार्मिक कर्मकांड,

सामाजिक विषमता आणि भेदभाव अशा अनेक समस्यांची चर्चा केली आहे. मामा वरेकर, अनंत काणेकर

आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा या संदर्भात विचार आपण करू शकतो.

रशियन क्रांतीनंतर रशियन समाजामध्ये समाजवादी विचारांच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले गेले.

त्यातून एक नवीन नितीमुल्ये निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. स्त्री-पुरुष नातेसंबंध, कुटुंब, घटस्फोट,

पालकत्व, लैंगिकता, नैतिकता या संदर्भातही रशियामध्ये खूप मोठी घुसळण झाली. त्यामुळेच,

सावरकरांच्या दृष्टीने ‘रशियन क्रांती ही नुसती राज्यक्रांती नसून तर धर्मक्रांती, अर्थक्रांती, समाजक्रांती

म्हणजेच एक जीवनक्रांतीच होती.’ मालतीबाई बेडेकरांनी तर रशियन क्रांतीला ‘सेक्सक्रांती’ असे संबोधले

आहे. रशियामध्ये होणाऱ्या या वैचारिक घुसळणीचा महाराष्ट्रातील लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांवर

पडला. त्यातील काहीजण हे राजकीयदृष्ट्या मार्क्सवादी राजकारणाशी संबंधितही होते. मात्र, बहुसंख्य

मंडळी ही साहित्यिक होती. अशा सगळ्या मंडळींना ‘तिरंगी नवमतवाद’ या ग्रंथामध्ये न. चिं. केळकर

यांनी ‘सुधारक’ न म्हणता नवमतवादी म्हटले आहे. त्यांच्यामते सुधारक हे कुटुंब आणि विवाह या संस्थांना

सुधारू पाहत होते. नवमतवादी मंडळी मात्र ते उधवस्त करू पाहत आहेत असा त्यांचा आरोप होता.

नवमतवादी मंडळींपैकी असलेल्या आणि रवीकिरण मंडळाशी संबंध असलेल्या ग. त्र्य. माडखोलकरांनी

सह्याद्री मासिकात १९३० च्या दशकात ‘नव्या लैंगिक नीतीची गरज’ अशा आशयाचा लेख लिहिला होता.

पारंपारिक नितीमुल्ये ही व्यक्तिवाद, व्यक्तीस्वातंत्र्य यामध्ये बाधा आणतात म्हणून नवीन नितीमुल्ये

निर्माण केली पाहिजे अशी भूमिका या प्रवाहातील अनेक मंडळींनी घेतलेली होती.

2. पुरोगामी मात्र हिंदुत्ववादी

समकालीन हिंदुत्ववादी चर्चाविश्वात पुरोगामी या शब्दाची निंदानालस्ती केली जाते. पुरोगामी मंडळी

ही हिंदुधर्म, हिंदुत्व आणि हिंदू समाज यांच्याविरोधी आहेत असाही समज समकालीन हिंदुत्ववादी

बाळगतात. मात्र, असे करत असतांना हिंदुत्ववादी चळवळीचा बौद्धिक इतिहासही ते सोईस्करपणे दुर्लक्षित

करतात किंवा विसरतात. अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी चळवळीचे सनातनीकरण होते आहे असेही

दिसते. त्यामुळेच, हिंदुत्ववादी चळवळीतील लोकांनीच धर्मचिकित्सा केली आहे. अस्पृश्यता आणि

जातीभेद नाकारले आहेत. ग्रंथप्रामाण्य नाकारले आहे, धर्माला कालसुसंगत आणि अद्ययावत करण्याची

भूमिका घेतली होती हे काहीसे विसरले जाते.

१९३५ मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेचे अधिवेशन पुणे शहरात झाले होते. त्यादरम्यानच, डॉ.

कुर्तकोटी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेतील ‘परिवर्तनवादी गटा’ची स्वतंत्र बैठकही झाली होती.

त्यामध्ये अस्पृश्यता निवारण केले पाहिजे. अस्पृश्यांसाठी मंदिरे खुले केली पाहिजे. आपण आपल्या

आयुष्यात अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे अशी भूमिका घेतली होती. अस्पृश्यता ही हिंदू संघटनेमधील

सर्वात मोठी अडचण ठरत होती म्हणून त्यांनी अशी परिवर्तनवादी भूमिका घेतली होती. मात्र, या

भूमिकेला हिंदू महासभेतील सनातनी, जातीभेद समर्थक मंडळींचा मोठा विरोधही होता. अशाच चर्चांमुळे

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये परिवर्तनवादी हिंदुत्ववादी आणि सनातनी हिंदुत्ववादी

यांच्या झटापट आणि मारामारी झाल्याचेही उदाहरणे आहेत.

सावरकरांनीही हिंदुत्ववादी विचारप्रवाहाला परिवर्तनवादी आणि आधुनिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला

आहे. बुद्धिवाद, विवेकवाद, उदारमतवाद, उपयुक्तात्वाद, मानवतावाद आणि राष्ट्रवाद अशा वेगवेगळ्या

विचारप्रवाहांचा आधार घेवून त्यांचा डावपेचात्मक अज्ञेयवाद ( Strategic Agnosticism) आणि

हिंदुत्ववादी पुरोगामीपणा विकसित झाला होता. त्यालाच काहींनी बुद्धिवादी हिंदुत्व असेही नाव दिले

आहे. ग्रंथप्रामाण्य सोडून तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञान याची कास धरा अशी त्यांनी भूमिका घेतली

होती. तसेच, जातीभेद आणि अस्पृश्यता ही हिंदू संघटनेतील मोठा अडथळा आहे म्हणून तीचा उच्छेद केला

पाहिजे. त्यासाठी सहभोजने, आंतरजातीय लग्ने यांचेही त्यांनी समर्थन केले आहे. सावरकरांच्याप्रमाणेच म.

श्री. माटे आणि पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचा हिंदुत्ववाद पुरोगामी वळणाने विकसित झाला आहे. मात्र, पुरोगामी

वळणाच्या हिंदुत्वावादाने मुस्लीम एकसाचीकरण केले आहे ही त्याची मोठी मर्यादा आहे. अजूनही,

प्रामुख्याने महाराष्ट्रात विज्ञानवाद, बुद्धिवाद याचा आधार घेऊन मांडणी करणरे सावरकरी हिंदुत्ववादी

मंडळी बरीच दिसतात आणि संघाच्या हिंदुत्ववादापेक्षा आम्ही वेगळे आहोत असेही म्हटले जाते. राष्ट्रीय

स्वयंसेवक संघाने राष्ट्रीय मुल्सिम मंचाच्या माध्यमातून मुस्लिमांना सामावून घेण्याचा प्रयत्न चालवला

आहे. तो सावरकरवादी हिंदुत्ववादी मंडळींनी पटतोच असे नाही.

3. र. धो. कर्वे आणि पुरोगामी बुद्धिवाद

विवेकवादाचा आणि बुद्धिवादाचा महाराष्ट्रात र. धो. कर्वेंच्या आधी अनेकांनी आपल्या मांडणीत

आधार घेतला होता. सावरकरांनी हिंदुत्वावादाच्या मांडणीसाठी बुद्धिवादाचा उपयोग कसा केला याची

काहीशी चर्चा आपण वर केली आहे. र. धो. कर्वेंनी मात्र स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता, कामजीवन या

मुद्यांनाच बुद्धिवादाच्या माध्यमातून हात घातला होता. तत्पूर्वी बहुतेकांनी सामाजिक, धार्मिक बाबतीत

बुद्धिवादी आणि विवेकवादी भूमिका घेतली होती, मात्र लैंगिकजीवन, कामजीवन आणि खाजगीजीवन

त्यापासून लांबच ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धिवादाला आणि विवेकवादाला मर्यादा होत्या. म्हणूनच,

जे. व्ही. नाईक यांनी महाराष्ट्रातील ‘ खरा बुद्धिवादी’ म्हणून र. धो. कर्वेंची ओळख केली आहे. कर्वेंच्या

सोबत, शकुंतलाबाई परांजपे यांनी लैंगिक शिक्षण परिषदा आयोजित करून लैंगिक साक्षरता करण्याचा

प्रयत्न केला. काहींना ही व्यक्तिगत किंवा काही विशिष्ट समाज गटांचे प्रयोग असे वाटू शकते. मात्र, लैंगिक

शिक्षण, लैंगिक आरोग्य आणि कामजीवनविषयक चर्चांनी तत्कालीन मराठी समाजात बरीच चर्चा घडवून

आणली होती. त्यामुळेच, कर्वे हे समाजात अश्लीलता आणि अनैतिकता पसरवत आहेत असेही आरोप झाले.

र. धो. कर्वेंनी त्यांच्या पारंपारिक सामाजिक, सांस्कृतिक धारणांना अनेक धक्के दिले. म्हणूनच, र. धो.

कर्वेंचा लैंगिक चिंतनाच्या माध्यमातून विकसित झालेला बुद्धिवाद हा वेगळाच धाटणीचा होता.

4. धर्मनिर्णय मंडळाचे धार्मिक पुरोगामित्व

१९३० च्या दशकात महाराष्ट्रात धार्मिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अनेक

महत्वाच्या घडामोडी झाल्या. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहानंतर डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची

भूमिका जाहीर केली. या भूमिकेचा अस्पृश्य समाजावर जसा परिणाम झाला तसाच मोठा परिणाम सवर्ण

हिंदुवरही झाला. हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी डॉ. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे खडबडून

जागे झालेली दिसतात. धर्माला अद्ययावत केले पाहिजे तसेच, समकालीन संदर्भात काही गोष्टी अनिष्ट

असतील त्यांना कालसुसंगत केले पाहिजे अशी भूमिका असलेल्या शास्त्री मंडळींनी १९३६ मध्ये तत्वनिष्ठ

परिवर्तनवादी परिषद, लोणावळा येथे स्थापन केली. पुढे याच परिषदेचे धर्म निर्णय मंडळात रुपांतर झाले.

रघुनाथशास्त्री कोकजे हे या परिषदेचे/ मंडळाचे कार्यवाह होते. त्यांनी १९३० च्या दशकात प्राचीन

दर्शने आणि जातीभेद, धर्मशास्त्र आणि जातीभेद अशा मुद्यांवर लेख लिहिले आहे. अशा लेखांच्या

माध्यमातून त्यांनी धर्मशास्त्र, प्राचीन दर्शने यांचा सनातनी अर्थ नाकारून परिवर्तनवादी अर्थ लावण्याचा

प्रयत्न केला आहे. तसेच, वेद हे मानवनिर्मितीच आहेत. जातीभेद नैसर्गिक नाही अशाही भूमिका या मंडळाने

घेतल्या. एकीकडे, डॉ. आंबेडकरांनी हिंदू समाज, दर्शने आणि शास्त्रे यांची जी चिकित्सा करायला सुरुवात

केली होती. दुसरीकडे, अखिल भारतीय वर्णाश्रम स्वराज्य संघवाली मंडळी जो सनातनी अर्थ लावत होती.

या दोन्हीमधून मार्ग काढून हिंदू समाजाला अद्ययावत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याच प्रयत्नाचा भाग

म्हणून महादेवशास्त्री दिवेकरांनी ‘ नवा हिंदू धर्म’ असा ग्रंथच लिहिला आणि हिंदू धर्मातील आणि

समाजातील कालविसंगत गोष्टींची चिकित्सा केली होती. धर्म निर्णय मंडळाच्या कार्यात केवलानंद

सरस्वती, श्रीधरशास्त्री पाठक, लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे आणि

पुरोगामी दृष्टी असलेली धार्मिकता विकसित करण्याचा प्रयत्न केला होता.

5. आंबेडकरी जातीअंतक पुरोगामित्व

डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संघटीत बहिष्कृत वर्गाच्या चळवळीने अनेक

मुलभूत प्रश्न तत्कालीन समाजाच्या सामोरे निर्माण केले होते. तत्कालीन समाजात प्रभावी असलेल्या

ब्राह्मण-ब्राह्मणेत्तरवादाचीही चिकित्सा त्यांनी केली होती. १९२७ महाड सत्याग्रहात ब्राह्मणांना घेवू नका

अशी सूचना ब्राह्मणेत्तर नेत्यांनी केली, त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी आम्ही ब्राह्मणविरोधी नसून

‘ब्राह्मण्यविरोधी’ आहोत अशी भूमिका घेतली आणि ब्राह्मण्यविरहीत ब्राह्मण आम्हाला चालतो मात्र

ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेत्तर फक्त ब्राह्मणेत्तर आहे म्हणून आम्हास चालत नाही. याच काळात, बहिष्कृत

भारतात ब्राह्मण्य म्हणजे काय? यावर डॉ. आंबेडकरांनी लेखन केले आहे आणि त्यात स्पष्ट म्हटले आहे, कि

‘ब्राह्मण्य म्हणजे जन्मजात: उच्चनीच हा भेदभाव मानणे’ ब्राह्मण्य हे ब्राह्मणांमध्ये, ब्राह्मणेत्तरांमध्ये आणि

बहिष्कृतांमध्येही आहे अशी ठोस भूमिका याच काळात घेतलेली दिसते.

जाती व्यवस्था हीच संपूर्ण भारतीय अधोगतीला कारणीभूत आहे. त्यामुळेच, राष्ट्रीय जाणीव निर्माण

होत नाही. लोकांमध्ये बंधुभाव नाही. त्यामुळेच जातीचे निर्मुलन केल्याशिवाय कोणतेही मूलगामी

परिवर्तन भारतीय समाजात शक्य नाही अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. तत्पूर्वी, काहींनी अस्पृश्यता

निर्मुलन, सामाजिक भेदभाव याविषयी चर्चा केली होती. मात्र, जातीच्या निर्मूलनाचा मुद्दा डॉ.

आंबेडकरांनी प्रथम मुख्यप्रवाही चर्चेचा मुद्दा बनवला.


जातीचा अंत केल्याशिवाय हिंदू संघटनही होवू शकत नाही आणि समाजबादही येवू शकत नाही.

तसेच, आपण स्वातंत्र्य उपभोगण्यास पात्रही होवू शकत नाही अशी भूमिका घेत त्यांनी एकाच वेळी,

हिंदुत्ववादी, समाजवादी, मार्क्सवादी आणि कॉंग्रेसी विचारांची चिकित्सा केली. जातीच्या मुद्द्याला

वगळून होणाऱ्या सुधारणा आणि चर्चा या म्हणाव्या तशा परिणामकारक नाहीत अशीच भूमिका

आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायींनी घेतली आहे. पुढील काळात दलित साहित्य चळवळीने शहरी,

मध्यमवर्गीय आणि अभिजन साहित्याची कठोर चिकित्सा केली. जातीमुळे होणारे फायदे, मिळणारे

विशेषाधिकार तसेच ठेवून कोणीही पुरोगामी होवू शकत नाही. तसेच, जातीअंतक झाल्याशिवाय खरा

पुरोगामीही होता येत नाही अशी भूमिका आंबेडकरवादी विचारविश्वात घेतली जाते. जाती अंताची

भूमिका न घेता पुरोगामी म्हणून घेणाऱ्या मंडळींची आंबेडकवादी जातीअंतक पुरोगामी चर्चाविश्वात कठोर

चिकित्सा केली जाते.

पुरोगामित्वाचा वारसा आणि काही प्रश्न

आज आपण पुरोगामी म्हणजे कोण ? ही चर्चा करतांना मराठी विचारविश्वातील पुरोगामित्वाचा

वारसा लक्षात घेत नाही असे मला वाटते. तसेच, पुरोगामी म्हणजे नेमकं आणि निश्चित काय हेही समजून

घेत नाही. समाजसुधारणा, धर्मसुधारणा, धर्मचिकित्सा, ग्रंथप्रामाण्य आणि शब्द प्रामाण्याला विरोध,

व्यक्तिवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य यांची पाठराखण, सामजिक-आर्थिक आणि धार्मिक शोषणाची

चिकित्सा, भेदभावाला नकार, स्त्री-पुरुष समता, बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विवेकी श्रद्धा

आणि जातीनिर्मुलन या सगळाच मराठी समाजाचा पुरोगामी वारसा आहे. मात्र, या अशा विविध कल्पना,

विचार आणि संकल्पनांमुळे हा पुरोगामित्वाचा वारसा काहीसा गुंतागुंतीचा आणि जटिलही झाला आहे.

त्यामुळेच, दोन पुरोगामी एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका घेतांना दिसतात आणि त्यामुळेच पुरोगामी

म्हणजे नक्की काय? पुरोगामी विचार म्हणजे नक्की काय आणि पुरोगामी व्यवहार निश्चित कसा करायचा

असतो याविषयी अजूनही आपल्या समाजात चर्चा चालूच आहेत. त्याची मुळे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि

बौद्धिक इतिहासात आहेत. तो आपण व्यवस्थित समजून घेतला तर आपण पुरोगामित्वाच्या चर्चेला

काळ्या-पांढऱ्या चौकटीत न अडकवता चर्चा करू शकतो आणि एकाचवेळी विविध प्रकारचे पुरोगामी लोक

अस्तित्वात असू शकतात आणि त्यांच्यामध्ये अनेक मुद्यांवर मतभेदही असू शकतात हे आपण मान्य करू

शकतो 


पूर्वप्रसिध्दी - नवभारत ऑक्टोबर २०२५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पुरोगामी कोणास म्हणावे? मराठी विचारविश्वातील काही नोंदी

पुरोगामी कोण आहे? १९४१ मध्ये पुरोगामी वाड्मय म्हणजे काय? याविषयी आचार्य जावडेकरांनी मुंबईमध्ये भाषण दिले होते. त्या भाषणाची चिकित्सा ना. सी....