४ ऑगस्ट १८९५ च्या दीनबंधू या सत्यशोधक वृत्तपत्रात ‘ख्रिस्ती व हिंदू लोकांतील चर्चमिशन व आर्यधर्म रक्षक वाद’ या शीर्षकाची बातमी छापलेली आहे. त्याकाळी विविध धर्मीय लोकांशी धार्मिक विवादांचे सार्वजनिक आयोजन केले जात होते. त्यावर भाष्य करतांना दीनबंधूचे संपादक आणि महात्मा जोतीराव फुल्यांची अनुयायी नारायण मेघाजी लोखंडे यांनी धर्मविषयक अत्यंत महत्वाची भूमिका लिहिली आहे. लोखंडे लिहितात कि, “धर्मासंबंधाने पूर्वी अनेक वेळा विद्वान लोकांत चांगले कडाक्याचे वादविवाद झाले आहेत. आमच्या धर्मातील देव अमूक होते व तमक्या धर्मातील देव तमुक होते अशा बद्दल सध्या अनमान करण्याचे काहीच प्रयोजन नाही. जो धर्म मनुष्यास मनुष्यपण देतो किंवा ज्या धर्माचे लोक किंवा धर्मगुरू आपल्या एकंदर स्वधर्मीय बांधवांच्या हितास्तव काळजी बाळगतात तोच धर्म चांगला आहे आणि हेच आंता दाखविण्या करिता प्रत्येक धर्माच्या मनुष्याने व धर्मगुरूने झटले पाहिजे. निरर्थक बाचा बाच करण्यात व कोटिक्रम लढविण्यात काही एक फायदा नाही. धर्म चांगला आहे परंतु त्या धर्माचे स्वरूप खरे रहस्य काय आहे हे जर त्या त्या धर्मातील लोकांस समजत नाही तर त्या धर्माच्या चांगलेपणाचा उपयोग काहीच नाही.” १८९३ मध्ये मुंबईत हिंदू – मुस्लिमांमध्ये दंगा झाला होता. त्यामध्ये हिंदूंची आणि मुस्लिमांची मोठी वित्तहानी आणि मानवहानीही झाली होती. सोबतच, हिंदू- मुस्लिमांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी दंगा शमवण्याचे आणि दंग्यानंतर लोकांची मने जुळवण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे, पंडित धोंडीराम कुंभार यांच्या सारख्या जोतीराव फुल्यांच्या अनुयायांनी इतरांना सोबत घेवून ‘हिंदू-मुस्लिमांचा प्रीती मेळावा’ भरवला होता. त्यात ६०,००० हजारांवर मनुष्ये हजर झाली होती असे आपणास ८ ऑक्टोबर १८९३ च्या दीनबंधूच्या वृत्तांकनावरून दिसते. महात्मा जोतीराव फुल्यांच्या निधनानंतरही त्यांचा वारसा आणि त्यांचे धर्मविषयक चिंतन हे त्यांच्या अनुयायांना कसे दिशा देत होते. याची स्पष्टता यावी म्हणून लेखाची सुरुवात वरील दोन उदाहरणांनी केली आहे. महात्मा फुल्यांचे धर्मविषयक चिंतन समजून घ्यायचे असेल तर आपणास एकोणिसाव्या शतकात झालेल्या धर्मसुधारणेचा इतिहास समजून घ्यावा लागेल.
एकोणिसाव्या शतकातील धर्मचिंतन
एकोणिसाव्या शतकात इंग्रजी सत्तेच्या स्थापनेसोबतच ख्रिस्ती मिशनरींचा वावर वाढला. मुद्रण तंत्राचे आगमन झाले. व्यापारी हितसंबंधासाठी आलेले इंग्रज, युरोपात झालेल्या प्रबोधन, ज्ञानोदय, धार्मिक सुधारणा आणि वैज्ञानिक क्रांतीने जन्माला घातलेले मूल्य आणि कल्पनाविश्व ( उदा. उदारमतवाद, व्यक्तिवाद, मानवतावाद, विवेकवाद, उपयुक्ततावाद, मानवी हक्क इत्यादी) सोबत आले होते. त्यातून एकोणिसाव्या शतकात भारतामध्ये धर्मचिंतन घडवून आले. धर्मचिंतनात वैचारिक घुसळण झाली आणि वैचारिक घुसळणीतूनच एकोणिसाव्या शतकात समाज आणि धर्म सुधारणा करणाऱ्या संस्था, मंडळ आणि संघटना स्थापन झाल्या. धर्मसुधारणा करणाऱ्या व्यक्ती, संस्थांमध्येही फरक होता. म्हणूनच, असेही म्हटले गेले आहे की, एकोणिसाव्या शतकात जे धर्मचिंतन झाले. त्यामध्ये तीन प्रकार होते. १. पुनरुज्जीवनवादी धर्मसुधारणा (Revivalist Reformism)- यामध्ये आर्य समाजाचा समावेश होता. आर्य समाजानुसार वैदिक काळात सगळे चांगले होते. त्याच्यानंतर जे निर्माण झाले त्यामुळे समाजात समस्या निर्माण झाल्या. पुरोहितगिरी, बालविवाह, स्त्रीशिक्षणविरोध, विधवाविवाह विरोध या सगळ्यांना आर्य समाजाने विरोध केला आहे. त्यांच्यानुसार हे सगळे वैदिक काळनंतर निर्माण झाले आहे. त्यामुळेच, आर्य समाजात फक्त वेदांना महत्वाचे स्थान आहे. धर्म, समाज आणि कुटुंबविषयक सुधारणा करायच्या असतील तर वेदांकडे गेले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. वेगळ्या शब्दांमध्ये आपण असेही म्हणून शकतो की, आर्य समाजाला असे वाटत होते की, वैदिक काळाचे पुनरुज्जीवन केल्यशिवाय सुधारणांना भविष्य नाही म्हणून आर्य समाजाला आपण पुनरुज्जीवनवादी धर्मसुधारणा या प्रकारात टाकतो. २. उदारमतवादी सुधारणा (Liberal Reformism) – यामध्ये प्रार्थना समाजाचा समावेश होतो. सामाजिक सुधारणा बाजू घ्यायची परंतु कोणताही सामाजिक रोषही ओढावला नाही पाहिजे अशी काहीशी भूमिका प्रार्थना समाजाची होती. समाजाच्या कलाकलाने म्हणजेच हळुवारपणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करायचा. धर्म, परंपरेची कठोर चिकित्साही करायची नाही. मात्र, धर्माला काळसुसंगत करण्याचा प्रयत्न करायचा. वेगळ्या शब्दात आपण असेही म्हणू शकतो की, समाज आणि धर्माच्या म्हणजेच कोणाच्याच भावना न दुखावता समाजसुधारणा घडवून आणणे. ३. जहाल सुधारणा ( Radical Reformism)- यामध्ये सत्यशोधक समाजाचा समावेश होतो. सामाजिक समस्या ह्या सामाजिक रचनेच्या भाग असतात त्यामुळे समाजात संरचनात्मक बदल (structural change) केल्यशिवाय सुधारणा होणार नाही अशी भूमिका सत्यशोधक समाजाची दिसते. सामाजिक आजारपणाचे निर्मूलन करायचे असेल तर फांद्या छाटून उपयोग नाही तर मुळांवरच घाव घातला पाहिजे अशी ठाम भूमिका सत्यशोधक समाजाची होती. त्यामुळेच, सत्यशोधक समाजाने धर्माच्यानावावर लोकांचे जे आर्थिक, सामाजिक, मानसिक शोषण होते त्याची पोलखोल करत धर्माच्या मर्यादित व्याख्येची चिकित्सा करत व्यापक मानवधर्माची मांडणी केली आहे. वेगळ्या शब्दात आपण असेही म्हणू शकतो की, समाजात आणि धर्मात संरचनात्मक हस्तकक्षेप केल्यावरच सुधारणा होईल.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात आणि देशात ढोबळमानाने याच प्रकारची धर्मसुधारणेची चर्चा होती असे आपण म्हणू शकतो. प्रदेशागणिक काहीसा तपशीलात्मक फरक नक्कीच होता हेही मात्र तेवढेच खरे आहे. वरील तिन्ही प्रकारच्या सुधारणा प्रवाहांमध्ये वैचारिक आणि तात्विक मतभेद असले तरी अनेक समान दुवेही होते. जसेकी, स्त्रीशिक्षणाला पाठींबा, बालविवाहाला विरोध, विधवाविवाहाला पाठींबा, ब्राह्मणवाद आणि पुरोहितगिरीला विरोध, भेदभावाला विरोध, या सारख्या अनेक मुद्यांच्या संदर्भात तिन्ही सुधारणाप्रवाहांचे एकमत होते. असे असले तरी सत्यशोधक समाज आणि आर्य समाज आणि प्रार्थना समाज यांच्यात काही महत्वाचे फरकही होते. त्यामुळेच, सत्यशोधक समाज आणि महात्मा जोतीराव फुलेंची धर्मसुधारणा ही काहीशी वेगळ्या धाटणीची आहे.
महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज
एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेला सत्यशोधक समाज हा एकमेव असा समाज आहे की, शुद्र वर्णातील सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी निर्माण केलेला आहे आणि चालवलेला आहे. तत्कालीन, इतर अनेक समाज बहुतेक तथाकथित उच्च वर्णीय लोकांनी स्थापन केलेले होते. त्यांच्या बऱ्याच मर्यादा होत्या. एक म्हणजे बहुतेक समाज हे शहरी होते, तथाकथित उच्च जातीय, वर्णीय आणि पांढरपेशी लोकांचे समाज होते. त्यामुळेच, या समाजांचा संस्थात्मक समाजशास्त्रीय अभ्यास केला तर हे स्पष्टपणे दिसते की, या समाजांमध्ये विशिष्ट जातींचे, वर्गांचे आणि भागातील लोकच होते. याउलट, सत्यशोधक समाजाची स्थिती होती. सत्यशोधक समाजामध्ये भिन्नजातीय, बहुधर्मीय आणि विविध भागातील लोकांचा समावेश होता. उदा. सामाजिक पार्श्वभूमी म्हणून माळी, कुणबी, मांग, महार, रामोशी, कुंभार, मराठा, धनगर, ब्राह्मण, ज्यू, पारशी, मुस्लीम अशा विविध जातीय-धार्मिक मंडळींचा सहभाग होता. त्यासोबतच, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील लोकही सत्यशोधक समाजात होती. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील कष्टकरी मंडळीही सत्यशोधक समाजात होती. अशी विविध प्रकारची मंडळी सत्यशोधक समाजात असल्यामुळे सत्यशोधक समाज सर्वसमावेश आणि विविध लोकांचे प्रतिनिधित्व असलेली संघटना होती. या सगळ्या गोष्टींमुळेच सत्यशोधक समाजाची सामाजिक, धार्मिक, आर्थिक समज आणि दृष्टी ही इतरांच्यापेक्षा भिन्न दिसते.
धर्म आणि सार्वजनिक सत्यधर्म
धर्मचिकित्सेच्या बाबतीत सत्यशोधक समाज जास्त मर्मभेदक आणि छिद्रान्वेशी आहे. धर्म हा माणसांचे नुसते आध्यात्मिक जीवन घडवत नाही तर सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, राजकीय आणि लैंगिक जीवनही नियंत्रित करतो याची जाणीव महात्मा जोतीराव फुल्यांना होती. कारण, भारतीय संदर्भात धर्माचे अनेक अर्थ होतात. आधुनिकपूर्व काळात महाराष्ट्रात प्रत्येक पुरुषाला तीन धर्मांचे पालन करावे लागत असे. त्यामध्ये स्वधर्म, जातिधर्म आणि गोतधर्माचा समावेश होता. स्त्रियांसाठी अधिकचे दोन धर्म होते. त्यामध्ये एक स्त्रीधर्म होता तर दुसरा पतिव्रता धर्म होता. धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथामध्ये पा. वा. काणेंनी प्राचीन भारतात धर्माचे अनेक अर्थ होत होते याची चर्चा केलेली आहे. धर्म म्हणजे निती, कायदा, आज्ञा, देव, संपद्राय असे अनेक अर्थही धर्माचे होतात. म्हणूनच, भारतीय संदर्भात धर्म हा संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकतो असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही असे मला वाटते. प्रदीप गोखले यांनीही मनुस्मृतीविषयी भाष्य करतांना म्हटलेले आहे की, धर्म या शब्दाची चर्चा ही दोन अर्थांच्या संदर्भात बहुतेकवेळा होते. त्यापैकी पहिला म्हणजे विशेष धर्म म्हणजेच वर्णाश्रम धर्म आणि दुसरा म्हणजे साधारण धर्म किंवा सामान्य धर्म. सामन्य किंवा साधारण धर्म यामध्ये बंधूधर्म, मित्रधर्म, निसर्गधर्म अशा गोष्टींचा समावेश होतो. गोखलेंच्या मते, धर्म म्हणाला की विशेषत: वर्णाश्रमधर्मच अपेक्षित राहत असे.
धर्म ही एक नुसती उपासनापध्दती नसून एक मूल्यव्यवस्था आहे. त्यासोबतच, ईश्वर आणि भक्त यांच्यातील एक सत्तासंबंधही आहे. मंदिर, दान-दक्षिणा, लोकाश्रय आणि राजाश्रय या माध्यमातून एक अर्थव्यवस्थाही धर्मासोबत विकसित होत असते. स्त्री-पुरुषांमधील आणि पुरुष-पुरुषांमधील संबंधी धर्मानुसार ठरतात त्यामुळे तिला एक सामाजिक अंगही आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘धार्मिक’ या संकल्पनेमध्ये ‘राजकीय, आर्थिक, सामाजिक’ हे सगळेच एकत्र सामावले जाते. म्हणून, धर्माचा उपासनापद्धती म्हणून विचार करणे पुरेसे नसून धर्माचा एक व्यवस्था म्हणूनच विचार केला पाहिजे. महात्मा जोतीराव फुल्यांना धर्म हा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टी नियंत्रित करतो याची जाणीव होती. त्यामुळेच, त्यांच्या लिखाणात धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक यांना वेगळे करून पाहिले जात नसून एकत्रितपणेच पाहिले जाते. उदा. गुलामगिरी या ग्रंथांमध्ये धार्मिक गोष्टींची चिकित्सा केलेली दिसत असली तरी धार्मिकतेच्या आड राजकीय वर्चस्व आणि सामाजिक शोषक कसे केले जात होते याचीही चर्चा त्यामध्ये येते. तसेच, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ प्रामुख्याने आर्थिक स्थितीविषयी भाष्य करत असला तरी शेतकऱ्याला धर्माच्या नावाखाली कसे लुबाडले जाते याचीही चर्चा त्यात आहे. इशारा या ग्रंथात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला आर्थिक स्थितीच जबाबदार नसून त्यांचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचा फायदा घेणारे लोकही जबाबदार आहेत अशी भूमिका त्यामध्ये आलेली आहे.
धर्म ही एक व्यवस्था म्हणून समाजजीवनामध्ये महत्वाची भूमिका निभावते म्हणूनच महात्मा जोतीराव फुल्यांनी शोषण, भेदभाव आणि गुलामगिरी यांच्यावर आधारलेल्या पारंपारिक धर्माला नाकारत एक नवीन मानवधर्माची म्हणजेच सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना केली आहे. त्यामध्ये कोणत्याही शोषणाला आणि भेदभावाला स्थान नाही. नैतिक आचरण, सदाचार आणि सत्यवर्तन यावर महात्मा जोतीराव फुल्यांचा जास्त भर होता. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात एका संवादाची कल्पना महात्मा जोतीराव फुल्यांनी केली आहे. त्यामध्ये गणपतराव थोरात यांनी, सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावे? असा प्रश्न फुल्यांना केला आहे. त्यावर पुढीलप्रकारचे उत्तर दिले आहे. “ फुले म्हणतात, सत्यवर्तन करणाऱ्यांविषयी नियम देतो, ते पुढील प्रमाणे-
१. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले. त्यापैकी स्त्रीपुरुष हे उभयता जन्मतांच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र केले आहेत, असे कबूल करणारे, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२. स्त्री असो अथवा पुरुष असो, ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने या विस्तीर्ण पोकळीतील निर्माण केलेल्या अनंतर सूर्यमंडळासह त्यांचे ग्रहोपग्रहास अथवा एखाद्या विचित्र ताऱ्यास अथवा एखाद्या धातू दगडाच्या मूर्तीस निर्मिकाच्या ऐवजी मान देत नसल्यास, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व वस्तूंचा यच्यावत प्राणीमात्रांस उपभोग घेऊ न देता, निरर्थक निर्मिकास अर्पण करून त्यांचे पोकळ नामस्मरण जे करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
४. आपणां सर्वाच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व प्राणीमात्रांस समस्त वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेऊन त्यांस निर्मिकाचा आभार मानून त्याचे गौरव करू देतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
५. विश्वकर्त्याने निर्माण केलेल्या प्राणीमात्रांस जे कोणी कोणत्याहि प्रकारचा निरर्थक त्रास देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
६. आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्रीपुरुषांस सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहेत. त्यांतून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही व त्याप्रमाणे जबरी न करणारांस, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
७. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे, ज्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याहि तऱ्हेचे नुकसान करिता येत नाही, अथवा जे कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजून इतरांस पीडा देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
८. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस निर्माण केले आहे. त्यापैकी रएक स्त्रीने एका पुरुषास मात्र आपला भ्रतार करण्याकरिता वजा करून व तसेच हरएक पुरुषाने एका स्त्रीस मात्र आपली भार्या करण्याकरिता वजा करून, एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष एकमेकांबरोबर मोठ्या आवडीने बहिण भावंडाप्रमाणे आचरण करतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
९. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व स्त्रियांस अथवा पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्कांविषयी आपले पाहिजेल तसे विचार, आपली पाहिजेल तशी मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यांस स्वतंत्रता दिली आहे; परंतु ज्या विचारांपासून व मतांपासून कोणत्याहि व्यक्तीचे कोणत्याच तऱ्हेचे नुकसान मात्र होऊ नये म्हणून जे खबरदारी ठेवितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१०. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने व्यवस्थेवरून एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष दुसऱ्याच्या धर्मासंबंधी मतांवरून अथवा राजकीयसंबंधी मतांवरून त्यांस कोणत्याहि प्रकारे नीच मानून त्यांचा छळ करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
११. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस एकंदर धर्मसंबंधी गावकी अथवा मुलकी अधिकाराच्या जागा त्यांच्या योग्यतेनुरूप व सामर्थ्यानुरूप मिळाव्यात, म्हणून त्यांस समर्थ केले आहेत, असे कबूल करणारे, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१२. आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याच्या नियमास अनुसरून एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुष धर्म, गावकी व मुलकी यासंबंधीची प्रत्येक मानवाची स्वतंत्रता, मालमत्ता, संरक्षण आणि त्याचा जुलुमापासून बचाव करण्याविषयी जे कोणी बाध आणीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१३. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या मात्यापित्याचा वृध्दापकाळी परामर्ष करून इतर मानववृध्द शिष्टांस सन्मान देतात अथवा मातापित्याचा परामर्ष करून इतर मानववृध्द शिष्टांस सन्मान देणारांस बहुमान देतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१४. स्त्री अथवा पुरुष, जे वैद्यांच्या आज्ञेवांचून अफू, भांग, मद्य वगैरे अमली पदार्थाचे सेवन करून नाना तऱ्हेचे अन्याय करण्यास प्रवृत्त होत नाहीत अथवा ते सेवन करणारास आश्रय देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१५. स्त्री अथवा पुरुष, जे पिसू, ढेकूण, ऊं वगैरे किटक, विंचू, सरपटणारे सर्प, सिंह, वाघ, लांडगे वगैरे आणि त्याचप्रमाणे लोभी मानव दुसऱ्या मानवप्राण्यांचा वध करणारे किंवा आत्महत्या करणारे खेरीजकरून, जे स्त्री अथवा पुरुष, दुसऱ्या मानवप्राण्यांची हत्या करीत नाहीत अथवा हत्या करणारास मदत देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१६. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या हितासाठी दुसऱ्याचे नुकसान करण्याकरिता लबाड बोलत नाहीत अथवा लबाड बोलणारास मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत,
१७. स्त्री अथवा पुरुष जे व्याभिचार करीत नाहीत अथवा व्याभिचारांचा सन्मान ठेवीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१८. स्त्री अथवा पुरुष, जे हरएक प्रकारची चोरी करीत नाहीत अथवा चोरास मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१९. स्त्री अथवा पुरुष, जे व्देषाने दुसऱ्याच्या घरास व त्यांच्या पदार्थास आग लावीत नाहीत अथवा आग लावणाऱ्यांचा स्नेह करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२०. स्त्री अथवा पुरुष, जे स्वत:च्या हितासाठी न्यायाने राज्य करणाऱ्या संस्थानिकांवर अथवा राज्यावर अथवा एकंदर सर्व प्रजेने मुख्य केलेल्या प्रतिनिधींवर बंड करून लक्षावधी लोकांची कुटुंबे उघडी पाडीत नाहीत अथवा बंड करणारांस मदत देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२१. स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व जगाच्या हितासाठी धर्मपुस्तक तयार केले आहे, म्हणून मोठ्या बढाईने वाचाळपणा करितात; परंतु ते धर्मपुस्तक आपल्या बगलेत मारून इतर मानवांस दाखवीत नाहीत, अशा कपटी बढाईखोरांवर जे विश्वास ठेवीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२२. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदासह, आपल्या सोयऱ्या-धायरयांसह आणि आपल्या इष्टमित्र साथ्यांस मोठ्या तोऱ्याने पिढीजादा श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यांस पिढीजाजा कपटीने अपवित्र मानून त्यांस नीच मानीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२३. स्त्री अथवा पुरुष, जे पूर्वी कपटाने लिहिलेल्या ग्रंथाच्या वहिवाटीवरून काही मानवांस पिढीजादा दास मानीत नाहीत अथवा दास मानणाऱ्यांचा बोज ठेवीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२४. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या लोकांचे वर्चस्व मुद्दाम राहण्याकरिता शाळेमध्ये शिकवतांना इतर लोकांच्या मुलांबरोबर दुजाभाव करीत नाहीत अथवा शाळेत शिकवितांना दुजाभाव करण्याचा धिकार करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२५. स्त्री अथवा पुरुष, जे न्यायाधीशाचा हुद्दा चालवितांना अन्यायी लोकांना, त्यांच्या अन्यायाप्रमाणे त्यांस योग्य शिक्षा देण्यास कधीही, पक्षपात करीत नाहीत अथवा अन्यायाने पक्षपात करणाऱ्यांचा धिकार करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२६. स्त्री अथवा पुरुष, जे शेतकी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरणारांस श्रेष्ठ मानितात; परंतु शेतकरी वगैरयांस मदत करणारांचा आदरसत्कार करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२७. स्त्री अथवा पुरुष, जे चांभाराच्या घरी का होईना, बिगारयांचा धंदा करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांस तुच्छ मानीत नाहीत; परंतु त्या कामी मदत करणारांची वहावा करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२८. स्त्री अथवा पुरुष, जे स्वतः काही उद्योगधंदा न करता निरर्थक धार्मिकपणाचा डौल घालून अज्ञानी जनांस नवग्रहांची पीडा दाखवून त्यांस भोंदाडून खात नाहीत अथवा तत्संबंधी पुस्तके करून आपली पोटे जाळीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२९. स्त्री अथवा पुरुषास, जे भावीक मूढांस फसवून खाण्याकरिता ब्रह्मर्षीचे सोंग घेऊन त्यांस आंगाराधुपारा देत नाहीत, अथवा तत्संबंधी मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३०. स्त्री अथवा पुरुष, जे कल्पित देवाची शांती करण्याचे निमित्ताने अनुष्ठानी बनून अज्ञानी जनांस भोंदाडून खाण्याकरिता जपजाप करून आपली पोटे जाळीत नाहीत अथवा तत्संबंधी मदत करणारांचा बोज ठेवीत नाहींत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३१. स्त्री अथवा पुरुष, जे आपली पोटे जाळण्याकरिता अज्ञानी जनात कलह उपस्थित करीत नाहीत अथवा तत्संबंधी मदत करणाऱ्यांच्या सावलीसदेखील उभे राहत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३२. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या सर्वांच्या निर्मिकाने निर्माण केलेल्या प्राणिमात्रांपैकी मानव स्त्रीपुरुषांमध्ये कोणत्याच तऱ्हेची आवडनिवड न करतां त्यांचे खाणेपिणे व लेणेनेसणे याविषयी कोणत्याच प्रकारचा विधीनिषेध न करिता त्यांच्याबरोबर शुद्ध अंतकरणाने आचरण करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३३. स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांपैकी कोणाची आवडनिवड न करितां त्यांतील महारोग्यांस, पंगूस व पोरक्या मुलांस आपल्या शक्तीनुसार मदत करतात अथवा त्याला मदत करणाऱ्यांस सन्मान देतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.(समग्र महात्मा फुले, कीर, मालशे, फडके (संपा.), २००६, पृ. ४४३-४४७)
वरील सत्यवर्तनाच्या ३३ नियमांच्या आधारे एक माणुसकीला केंद्रस्थानी धार्मिकता महात्मा जोतीराव फुले निर्माण घडवत होते. ज्यामध्ये स्त्री-पुरुष संबंध, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनापासून तर सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक जीवनापर्यंत बहुतेक मानवीजीवनातील सर्वच घटकांमध्ये एक आमुलाग्र बदल घडवू पाहत होते असे आपणास स्पष्टपणे दिसते.
फुल्यांचा ‘सर्वधर्मसमभाव’ आणि ‘बहुधर्मीय कुटुंब’
महात्मा जोतीराव फुल्यांनी पारंपारिक धर्माची मुलभूत चिकित्सा केलेली असली तरी त्यांनी धर्माला मात्र नाकारले नव्हते. म्हणूनच, फुले हे निधर्मी नव्हते. फुल्यांना धर्माचे महत्व माहिती होते. म्हणूनच, त्यांनी सर्व धर्मांत सत्य आहे अशी भूमिका घेतली आहे. मात्र, कोणताही धर्म परिपूर्ण सत्य सांगत नाही याचीही त्यांना जाणीव होती हे त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते. ख्रिस्ती धर्म, इस्लाम धर्म यांच्यातील महत्वाच्या गोष्टींचे त्यांनी उघडपणे समर्थन जरी केले असले तरी हिंदू धर्माप्रमाणे ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माच्याही काही उणीवा त्यांना माहिती होत्या. म्हणूनच, धर्मांतर न करता धर्मचिकित्सा करत त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली होती. महाराष्ट्रात आणि भारतात अनेकांनी सर्वधर्मसमभावाविषयी लिहिले आहे. गांधी, गाडगेबाबा यांनीही सर्वधर्मसमभाव मानला आहे. मात्र, फुल्यांचा सर्वधर्मसमभाव मात्र काहीसा वेगळा आहे. सर्व धर्म सारखे आहेत म्हणून कोणत्याही धर्माची चिकित्सा न करता सर्व धर्मांचा आधार करणारा सर्वधर्मसमभाव आणि धर्मांचे तत्वे वेगवेगळे आहेत हे मान्य करून धर्मचिकित्सा करूंनही कोणत्याही धर्माचा पक्षपाती न बनता विकसित झालेला सर्वधर्मसमभाव हा काहीसा वेगळा आहे. महात्मा जोतीराव फुल्यांचा सर्वधर्म समभाव हा दुसऱ्या प्रकारचा होता. त्याला आपण ‘क्रिटीकल सर्वधर्मसमभाव’ असेही म्हणू शकतो. कारण, त्यामध्ये चिकित्सक असूनही सहअस्तित्व राहू शकते यावर विश्वास आहे.
धर्माच्या नावाखाली शोषण आणि भेदभाव होतो म्हणून एकीकडे ‘धर्म राज्य भेद मानवा नसावे’, ‘मानवाचे धर्म नसावे अनेक’, ‘मानवाचा धर्म एकच असावा’ असे अनेक वाक्य म. जोतीराव फुल्यांच्या अखंडांमध्ये येतात तर दुसरीकडे लोकांमध्ये द्वेष आणि भेदभाव नसावा म्हणून ‘खिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी, मानव भावंडे सर्व एक सहा त्याजमध्ये आहां तुम्ही सर्व’ असेही वाक्य येतात. या सगळ्यांमधून असेच दिसते कि, सर्व मानव जातीला जसा एकच निसर्ग आहे. तो सूर्य, चंद्र, वायु, वृक्ष यांच्यामाध्यामातून जगातील सर्व माणसांना उपयोगी पडतो. तसेच, जगभरातील लोकांना वेगवेगळ्या धर्मांची गरज नाही. एकच धर्म माणसांना उपयोगाचा आहे आणि तो आहे मानवधर्म अशी मानवतावादी भूमिका म. जोतीराव फुल्यांची होती. मात्र, व्यवहारात प्रचलित असलेल्या विविध धर्मसंप्रदायांचे मग काय करायचे असा प्रश्न निर्माण होईल म्हणूनच त्यांनी सगळ्या धर्मसंप्रदायांमध्ये सत्य आहे मात्र कोणत्याच धर्मसंप्रदायात पूर्ण सत्य नाही अशी भूमिका घेतली असावी असे मला वाटते.
सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातच बहुधर्मीय कुटुंबाची चर्चा आली आहे. ही चर्चा आजच्या काळालाही मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरू शकते. गणपतराव नामक पात्राने सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात पुढील प्रश्न विचारला आहे. – एकंदर सर्व जगातील स्त्रीपुरुष मानवांनी कोणत्या धर्माचा स्वीकार करावा? प्रश्नाचे उत्तर देतांना म. जोतीराव फुल्यांनी अत्यंत मार्मिक आणि प्रबुद्ध करणारे उत्तर दिले आहे. ते म्हणतात कि, “या भूमंडळावर महासत्पुरुषांनी जेवढी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत, त्या सर्वांत त्या वेळेस अनुसरून त्यांच्या समजुतीप्रमाणे काहींना काही सत्य आहे, यास्तव कोणत्याहि कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौध्द धर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तीने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्यांच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिनं महमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्या पुत्राने सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे; आणि या सर्व मातापित्यासह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत असतां प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून व्देष करू नये आणि त्या सर्वांनी आपण सर्व निर्माणकर्त्याने निर्माण केलेली लेकरे असून त्याच्याच (निर्मिकाच्या) कुटुंबातील आहोत, असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकाशी वर्तन करावे, म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यांत धन्य होतील.”
बहुधर्मीय कुटुंबविषयी कोणत्या शंकाकुशंका म. जोतीराव फुल्यांच्या मनात नव्हत्या असेच आपणास वरील उदाहरणावरून स्पष्टपणे दिसते. याचाच अर्थ असाही आहे कि, म. फुल्यांचा सर्वधर्मसमभाव हा बहुधर्मीय कुटुंबाच्या माध्यमातूनच चांगल्या प्रमाणात अस्तित्वात येवू शकतो. कारण, म. जोतीराव फुल्यांना कोणीही कोणताही धर्म स्वीकारावा याविषयी आक्षेप नाहीये मात्र त्यांची अट एकच आहे कि, प्रत्येकाने त्या त्या धर्माचे पुस्तक वाचून आपल्या मर्जीप्रमाणे तो धर्म स्वीकारायचा आहे. धर्मपुस्तक वाचून आणि आपल्या मर्जीप्रमाणे या शब्दांवर विशेष जोर देणे गरजेचे आहे. याचा अर्थ कोणीही सक्तीने, आमिषाने, अज्ञानातून धर्म स्वीकारणे त्यांना अपेक्षित नाही आणि मान्यही नाही. तसेच, प्रत्येकाला आपल्या मर्जीने धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे असेही त्यांना मान्य आहे. तसेच, प्रेमाने आणि गोडीगुलाबीने एकमेकांशी वर्तन केले तर एकाच कुटुंबात कोणत्याही धर्माचा द्वेष न करता भिन्नधर्मीय लोक बहुधर्मीय कुटुंब म्हणून एकत्रित राहू शकतात अशी ठाम भूमिका म. जोतीराव फुल्यांची दिसते. आजकाल धार्मिक ध्रुवीकरण करून आंतरधर्मीय प्रेम आणि विवाह करणाऱ्या लोकांना ‘ लव जिहाद’ नावाखाली सगळीकडेच त्रास दिला जात अशा काळात म. जोतीराव फुल्यांची ही बहुधर्मीय कुटुंबाची कल्पना काहीशी दिलासा देणारी आहे. म्हणूनच, म. जोतीराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचा आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या सगळ्या मंडळींनी आंतरधर्मीय प्रेमविवाहांना पाठींबा दिला पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. तसेच, बहुधर्मीय कुटुंब जास्तीत जास्त कसे वाढतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण, या प्रयत्नांच्या माध्यमातूनच सर्वधर्मीय धर्मांधतेला आणि धार्मिक कट्टरतावादाला आळा घालता येईल.
समारोपीय मुद्दा
अलीकडच्या काळात महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगभरात धार्मिक कट्टरतावादाने उचलखाल्ली आहे. त्याला विरोध त्या त्या धर्मातील धार्मिक सुधारणावादी आणि धार्मिक मानवतावादी मंडळी इतरांच्या मदतीने विरोध करत आहेत. अशा काळात सत्यशोधक धर्मचिंतनाचा आणि धर्मचिकित्सेचा धागा पुढे घेवून जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. धार्मिकतेला संकुचित बनविणाऱ्या सनातनी प्रवृत्तींची कठोर चिकित्सा करत धर्माला मानवमुक्तीच्या, दु:खमुक्तीच्या, लोककल्याणाच्या, समतेच्या चळवळींशी जोडून घेवून व्यापक बनविणाऱ्या सत्यशोधक धार्मिक मानवतावादाची गरज आहे. कारण, त्यातूनच एक नैतिक, सदाचारयुक्त आणि भेदभावविरहीत आणि मैत्रीवर आधारलेला समाज निर्माण होवू शकतो. म्हणूनच, सगळ्यांनी सत्यशोधक बनले पाहिजे.
पूर्वप्रसिध्दी - अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र, नोव्हेंबर- डिसेंबर २०२५
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा