शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

वेगळेपणा, विविधता, विषमता आणि समाजवाद


           वेगळेपणा समजून न घेतल्यामुळे अनेक गैरसमज होतात असे दिसते किंबहुना बहुतेकवेळा वेगळेपणा नेमकं कसा समजून घ्यायचा हा प्रश्नच आहे!  काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन बुद्धिस्ट अभ्यासकासोबत काम करत होतो. त्यावेळी तिबेटीयन बुद्धिझम पासून ते आफ्रो-अमेरिकन लोकांच्या प्रश्नांपर्यंत चर्चा केली. तो  मुळात ख्रिस्चन पण नंतर बौद्ध झाला आणि भारतीय कर्मठ मुस्लीम घरातील मुलीशी लग्न केले. काळ्या लोकांविषयी सहानुभूती असलेला व्यक्ती आहे तो. काळ्यांच्या मानवी अधिकार हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांसोबत त्याची जवळीक सुद्धा आहे. आम्ही माल्कम एक्स, मार्टिन ल्युथर किंग, दुबोईसीस अशा अनेक काळ्यांच्या क्रांतिकारी, सुधारणावादी आणि अभ्यासक नेत्यांविषयी गप्पा मारल्या. अमेरिकन नेशन स्टेट ने काळ्यांचे कशाप्रकारे पद्धतशीर वंशसंहार केला हे तो सांगत होता. 

          चर्चा हिंसा, पूर्वग्रह, तिरस्कार, सामाजिकीकरण यांच्याकडे वळली त्यावेळी तो म्हणाला," मी गोरा म्हणून जन्मलो यात माझी काय चूक. पुढे तो म्हणाला कि, मला हे मान्य आहे की, आपण कोठे जन्मतो त्यावरून आपल्याला काही संधी, अधिकार, सुविधा मिळतात आणि काहींना त्या नाकारल्या जातात. पण तरीही मी ज्या समुहात जन्मलो ते वास्तव नाकारले जात नाही. मी काळ्यांच्या नागरी हक्कांविषयी बोलत असलो तरी मी  काळा होवू शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे.  नैसर्गिक रंगाचा जो वेगळापणा आमच्यात आहे तो असणारच आहे. माझ्या मित्राने माझ्या मनातील काही गोष्टी सांगितल्या म्हणून मला आनंद झाला. अमेरिकेसारखी  भारताची काही बाबतीत परिस्थिती आहे आणि काही बाबतीत पूर्ण वेगळेपणा आहे. दलित-भटके-आदिवासी यांच्यावरील अत्याचार आणि काळे, नेटिव अमेरिकन यांच्यावरील अत्याचार यात काही साम्य आहे असे आपण म्हणू शकतो. पण अमेरिकेसारखा नैसर्गिक रंगीय वेगळेपणा भारतात तसा नाही. 

         आपल्याकडे जातीय-धर्मीय वेगळेपणा आहे  त्यामुळे तो वांशिक वेगळेपणा पेक्षा काहीसा वेगळा आहे. तो  कसा समजून घ्यायचा हा मोठाच प्रश्न आहे. आपल्याकडे सुद्धा ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीला दलितांच्या किंवा भटक्यांच्या बाजूने बोलत असला तरी दलित, किंवा भटका होता येत नाही कारण लोक त्याला ब्राह्मण म्हणूनच पाहतात त्याचप्रमाणे दलित व्यक्तीने किती ब्राह्मण होण्याचा प्रयत्न केला तरी त्याला दलित म्हणूनच पहिले जाते. रंगीय भेदासारखी नैसर्गिक भेदरेषा भारतीय लोकांमध्ये दिसत नाही. दक्षिणेत दलित, ब्राह्मण सगळेच काळे आहेत तर उत्तरेत दलित, ब्राह्मण आणि बाकी सगळेच सावळे दिसतात. नैसर्गिक भेदरेषा नसली तरी आपल्याकडे वेगळेपणा खूपच पद्धतीशीर संस्काराच्या नावाखाली जपला जातो, पोसला जातो. आपल्या  सारख्या बहुधर्मीय, बहुभाषीय, बहुजातीय देशात कधी कधी वेगळेपणा, विविधता आणि विषमता ह्या गोष्टी परस्परपूरक आणि परस्पर सहाय्यक होतांना दिसतात त्यामुळे वेगळेपणा समजून घेणे  खूपच कठीण जाते आणि काहीवेळा अशक्य होते. गुंतागुंतीचे समाज वास्तव असल्यामुळे समजून घेणे अवघड बनते त्यामुळे मैत्रीभाव, भावंडभाव, स्नेह, प्रेम, एकमयता या गोष्टींकडे सहजच दुर्लक्ष करता येते.   

        ब्राह्मणजातीत कोणी जन्माला आला म्हणून ब्राह्मण्यवादी होत नाही त्याच प्रमाणे एखादा व्यक्ती दलित जातीत जन्माला आला म्हणून ब्राह्मण्यविरोधी बनत नाही. दलित जाती, शेतकरी जाती, ओबीसी जाती, भटक्या जाती, पुरोहित जाती अशा कोणत्याही जातीत किंवा हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन कोणत्याही धर्मात आपण कोणतेही कष्ट न करता जन्माला आलेलो असतो. आपल्यासारखेच इतरांचे आहे. मग एवढा माज, गर्व आणि तिरस्कार का ?बहुसांस्कृतिक देशात समाजवादापेक्षा  फासिवादाला जास्त सुपीक जमीन असते. कारण,  सहजच लोकांच्या डोक्यात इतरांविषयी द्वेष, तिरस्कार, असूया निर्माण करता येते. जाती समाजामुळे तर भारतात हे खूपच सोयीस्करपणे करता येवू शकते कारण, जातीच आपल्यावर वेगळेपणाचा संस्कार करत असते. त्यामुळे सगळ्यांना एकसाची करू पाहणाऱ्या फासिवादा पर्याय म्हणून वेगळेपणा, विविधता आणि विषमता समजून घेण्याची दृष्टी समाजवाद दिशा देवू शकतो. कारण, तुम्ही दलित, ब्राह्मण, भटका  असा किंवा हिंदू, मुस्लीम, बौद्ध असा किंवा स्त्री,पुरुष, तृतीयपंथी असा, सगळेच एकमेकांचे कॉम्रेड असतात.

अभिव्यक्तीचा प्रश्न!!

अभिव्यक्त कसे व्हायला हवे ? साचेबध्द पध्दतीत 'अभिव्यक्त' झाले तर अभिव्यक्तीमधील नैसर्गिकता हरवते आणि मग, लोक बनावटपणे अभिव्यक्त होतात. त्याला अनुकरण, माकडचेष्टा, माकडचाळे, मिमिक्री असेही म्हटले जावू शकते. 


कोणी कोणासारखे अभिव्यक्त व्हावे? की, ज्याला वाटेल तसे त्याने अभिव्यक्त व्हावे? असेही  प्रश्न निर्माण होवू शकतात. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यात आणि स्वांतत्र्याच्या अभिव्यक्तीत कशावर बंधन असावे? तसेच त्यात काय नैतिक, कायदेशीर आणि योग्य हे बहुतेकवेळा सापेक्ष असते पण, तरीही व्यापक राजकीय-सामाजिक पातळीवर अभिव्यक्तीला आणि स्वातंत्र्याला निती (बंधन नव्हे) असतेच!


अभिव्यक्तीमध्ये 'व्यक्त' येत असल्यामुळे फक्त व्यक्त होण्याला अभिव्यक्ती म्हणता येईपर्यंल का? स्पर्श आणि नजर सुध्दा अभिव्यक्त होण्यात खूपच महत्वाची भूमिका निभावते. मग, बहुतेकवेळा अभिव्यक्ती फक्त 'शब्दकेंद्री'च चर्चिली जाते. शाब्दिक खेळ  आणि कसरत करण्यात पटाईत असणारे लोक अक्षरशत्रू असलेल्या लोकांपेक्षा अधिक जोरदारपणे अभिव्यक्तीची चर्चा करतात. तसेच, त्यातून अभिव्यक्तीचे सिध्दांत, नियम, साचे, चिन्ह आणि प्रतिमा निर्माण करून ठेवतात. मग, ज्यावेळी अक्षरशत्रू लोक ज्यावेळी या क्षेत्रात येतात त्यावेळी ते एकतर अनुकरण करतात किंवा आपले संचित सगळंच 'मागास' ठरवून हे नविन आत्मसात करतात यातून त्यांचा वेगळाच आयडेंटिटी क्रायसिस निर्माण होतो. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यात 'कलमकसाई' लोकांचा महत्वाचा रोल राहिला आहे. 


अक्षरशत्रू, कलमकसाई, शब्दब्रम्ह यातून आपल्याला आपल्या समाजातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समाजशास्त्राची आणि राजकारणाची वस्तुस्थिती कळून येईल. सामाजिक पर्यावरण ऐवढे बधीर झाले आहे की, शोषित-अंकीतजनांना अभिव्यक्तीसाठी कधी 'मूकनायक' बनावे लागते तर कधी हाती 'आसूड' घ्यावा लागतो. 


अभिव्यक्तीची कितीही चर्चा केली तरी ऐका संकुचित अवकाशातच ती संपते. बहुसंख्य लोकांना साचेबध्द रचनेत अभिव्यक्त होत येत नाही त्यामुळे ते कधीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगतच नाहीत. ते सत्तेला आणि समाजालाही बरं असत अन्यथा सगळ्यांच्या अभिव्यक्तीने दांभिकपणा, बनावटपणा आणि फसवेगिरी बाहेर येईल.

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...