अभिव्यक्त कसे व्हायला हवे ? साचेबध्द पध्दतीत 'अभिव्यक्त' झाले तर अभिव्यक्तीमधील नैसर्गिकता हरवते आणि मग, लोक बनावटपणे अभिव्यक्त होतात. त्याला अनुकरण, माकडचेष्टा, माकडचाळे, मिमिक्री असेही म्हटले जावू शकते.
कोणी कोणासारखे अभिव्यक्त व्हावे? की, ज्याला वाटेल तसे त्याने अभिव्यक्त व्हावे? असेही प्रश्न निर्माण होवू शकतात. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यात आणि स्वांतत्र्याच्या अभिव्यक्तीत कशावर बंधन असावे? तसेच त्यात काय नैतिक, कायदेशीर आणि योग्य हे बहुतेकवेळा सापेक्ष असते पण, तरीही व्यापक राजकीय-सामाजिक पातळीवर अभिव्यक्तीला आणि स्वातंत्र्याला निती (बंधन नव्हे) असतेच!
अभिव्यक्तीमध्ये 'व्यक्त' येत असल्यामुळे फक्त व्यक्त होण्याला अभिव्यक्ती म्हणता येईपर्यंल का? स्पर्श आणि नजर सुध्दा अभिव्यक्त होण्यात खूपच महत्वाची भूमिका निभावते. मग, बहुतेकवेळा अभिव्यक्ती फक्त 'शब्दकेंद्री'च चर्चिली जाते. शाब्दिक खेळ आणि कसरत करण्यात पटाईत असणारे लोक अक्षरशत्रू असलेल्या लोकांपेक्षा अधिक जोरदारपणे अभिव्यक्तीची चर्चा करतात. तसेच, त्यातून अभिव्यक्तीचे सिध्दांत, नियम, साचे, चिन्ह आणि प्रतिमा निर्माण करून ठेवतात. मग, ज्यावेळी अक्षरशत्रू लोक ज्यावेळी या क्षेत्रात येतात त्यावेळी ते एकतर अनुकरण करतात किंवा आपले संचित सगळंच 'मागास' ठरवून हे नविन आत्मसात करतात यातून त्यांचा वेगळाच आयडेंटिटी क्रायसिस निर्माण होतो. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यात 'कलमकसाई' लोकांचा महत्वाचा रोल राहिला आहे.
अक्षरशत्रू, कलमकसाई, शब्दब्रम्ह यातून आपल्याला आपल्या समाजातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समाजशास्त्राची आणि राजकारणाची वस्तुस्थिती कळून येईल. सामाजिक पर्यावरण ऐवढे बधीर झाले आहे की, शोषित-अंकीतजनांना अभिव्यक्तीसाठी कधी 'मूकनायक' बनावे लागते तर कधी हाती 'आसूड' घ्यावा लागतो.
अभिव्यक्तीची कितीही चर्चा केली तरी ऐका संकुचित अवकाशातच ती संपते. बहुसंख्य लोकांना साचेबध्द रचनेत अभिव्यक्त होत येत नाही त्यामुळे ते कधीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगतच नाहीत. ते सत्तेला आणि समाजालाही बरं असत अन्यथा सगळ्यांच्या अभिव्यक्तीने दांभिकपणा, बनावटपणा आणि फसवेगिरी बाहेर येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा