रविवार, २४ जानेवारी, २०२१

आधुनिक काळातील बौध्द विचारविश्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन


                  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून 'पुन्हा एकदा' बुद्धाला या मातीतील तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम केले. परंतू बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या मागे  हिंदुत्ववादी म्हणतात त्याप्रमाणे 'राष्ट्रांतर होवू नये म्हणून बौध्द धर्म स्वीकारला असे  कारण नसून तर त्यांच्या व्यापक धर्मचिंतनाची व्यापक दार्शनिक बैठक होती.  बौध्द धर्म भारतातून नष्ट झाला असे सहज म्हटले जाते. वरलक्षणी हे काहीप्रमाणात सत्य दिसत असले तरी पूर्णसत्य नाहीये कारण सिद्ध, नाथ, भक्ती, वारकरी या सगळ्या प्रवाहांमध्ये बुद्धदर्शन आपणास दिसते. कधी त्याचे सांस्कृतिक संमिलीकरण झालेले दिसते तर कधी याचे सांस्कृतिक अपहरण झालेले दिसते. कोणत्यही मार्गाने का होईना पण बुद्ध दर्शन आपणास भारतात नेहमीच अस्तित्वात असलेले दिसते.  बौध्द दार्शनिक अश्वघोषाची जातीविरोधी 'वज्रासुची' कधी नाथांच्या मांडणीत, तर कधी शक्तांच्या तंत्रात, तर कधी वारकरी तुकोबाच्या अभंगात तर कधी निर्गुण कबीराच्या दोह्यात सापडते. वसाहतीक काळात ती फुल्यांच्या अखंडातसुद्धा येते. 

                 डॉ. आंबेडकरांच्या आधी अनेकांनी अनेक विद्वानांनी वैयक्तिक पातळीवर बौद्धधर्म स्वीकारला, परंतू तमिळनाडूतील अयोथिदास त्यांचा अपवाद वगळता कोणीही त्याला सामाजिक चळवळीचे रूप दिले नाही. आंबेडकरांच्या किमान ५०-६० वर्ष आधी पंडित आयोथिदास या तत्कालीन अस्पृश्य समाजातील व्यक्तीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि तामिळनाडूच्या अस्पृश्यांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. श्रीलंकेसारख्या बौद्ध बहुसंख्याक देशातील महाबोधी समितीची त्यांचा संबध होता. महाराष्ट्रात आधुनिक काळात अनेकांना तुकारामाप्रमाणेच बुद्धविषयी सुद्धा एक कुतूहल असल्याचे दिसून येते. वसाहतीक महाराष्ट्रातील बुद्ध दर्शन आणि चिंतन (डॉ. आंबेडकरपूर्व) यावर संशोधनाची खूपच गरज आहे.   

                आचार्य धर्मानंद कोसंबी आणि  महापंडित राहुल सांकृत्यायन या दोन्हीचे नाव घेतल्याशिवाय आधुनिक काळातील बौध्द विचारविश्व पूर्णच होवू शकत नाही. या चर्चेत आपणास महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंना सुद्धा घ्यावे लागेल.  महाराष्ट्रातील नवबौद्ध चळवळीने धर्मांतराची पन्नाशी उलटल्यामुळे वरील तिन्ही लोकांना आत्ता थोर गंभीरपणे घ्यायला हवे. बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे बौद्ध धर्माचा सामाजिक वारसा पुढे चालवण्यासाठीची दिशा दिली त्याचप्रमाणे आचार्य  धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन संशोधन आणि दार्शनिक मांडणीत बौद्ध दर्शनाला आधुनिक काळात लोकांपर्यंत आणले. 

                बाबासाहेबांच्या नवयानी बौध्द मांडणीचा सध्याच्या महाराष्ट्रीय बौद्ध  समाजावर मोठा प्रभाव दिसून येतो. त्याला आजकाल Socially engaged Buddhism  असेही म्हटले जाते. ही संकल्पना व्हियतनामी भिक्खू  तिक न्यात हन यांनी विकसित केली आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणी जातीवर्चस्वाचा आणि धुरीणत्वचा इतिहास मोठा राहिला आहे. त्यामुळे त्याचा विरोध करता करता एक ब्राह्मण विरोधाची भूमिकासुद्धा सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेत्तर चळवळ ते दलित चळवळ यातील काही गटांमध्ये प्रभावी राहिलेली आहे. त्याचा  कधी कधी किबहुना बर्याचवेळा सुद्धा नवबौद्ध चळवळीवर सुद्धा काहीवेळा प्रभाव पडलेला दिसतो त्यातूनच आचार्य धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन यांची पूर्वाश्रमीची जात काढली जाते.  दोघांची जात काढण्याचे अजून काही कारणे आहेत १) म्हणजे त्यांची वैचारिक बांधिलकी आणि २) त्यांचा बाबासाहेबांशी असलेले सबंध.

                 आचार्य धर्मानंद कोसंबी हे गांधीवादी होते नंतर त्यांचा प्रवास गांधी-मार्क्सवादी असा झाला. परंतू शेवटपर्यंत त्यांनी आपले आयुष्य बौद्धधर्माच्या आणि दर्शनाच्या संशोधनातच घालविले कारण ते स्वतः बौद्धधर्मभिमानी होते.  महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा प्रवास आर्य समाज कडून बौध्द धर्म असा झाला त्यातून पुढे त्यांचा प्रवास मार्क्सवादाकडे झाला. याचा अर्थ जे अधार्मिक झाले असे नव्हे कारण ते शेवटपर्यंत बौध्दच होते.  आचार्य कोसंबी आणि महापंडित सांकृत्यायन या दोघांना 'मार्क्स दर्शन' महत्वाचे वाटत असले तरी गांधीविषयी मात्र ते दोन्ही धृवांना दिसतात. गांधीवरूनच नव्हे तर बौद्ध धर्म-दर्शनातील काही मुद्द्यांना घेवून सुद्धा आचार्य कोसंबी आणि महापंडित सांकृत्यायन काहीबाबातीत वेगळे दिसतात. त्यांच्या द्वंद्वातूनच बौध्द धर्म-दर्शनाचा अभ्यास विकसित झाला आहे. कारण दोघांनी खूपच मेहनत घेवून बौद्ध साहित्य अनेक देशांतून मिळवले, त्यासाठी दोघांनी श्रीलंका, नेपाल, ब्रम्हदेश, तिबेट या देशांच्या यात्रा केल्या. तसेच अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशामध्ये जावून दोघांनी काही काळ बौद्ध दर्शन आणि साहित्य लोकांना शिकवले.

                      आचार्य कोसंबी यांचा जास्त भर हीनयान (अर्ली बुद्धिझम) यावर दिसतो तर महापंडित यांचा जास्त भर महायान (लेटर बुद्धिझम) यावर दिसतो. परंतू दोघांना ऐवढे मर्यादितसुद्धा करू नये असे मला वाटते. दोघांच्या संशोधनातून आणि बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीतून बौद्ध धर्माचे 'धर्म चक्र' पुन्हा जोरदारपणे गतिमान झाले आहे. अशा काळात आचार्य धर्मानंद कोसंबींचा आणि महापंडित राहुल संकृत्यायानांचा संशोधनाचा आणि वैचारिकतेचा वारसा आपलासा मानला पाहिजे कारण आज देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्यासाठी हे खूपच आवश्यक झाले आहे. बुद्ध म्हणतो माझेही म्हणणे सत्य मानू नकोस, तुझ्या सदविवेकबुद्धीला पटले आणि त्याचा कार्यकारणभाव स्पष्ट झाला तर स्वीकार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...