काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बैलगाडा
शर्यतीवरील बंदी उठवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वपक्षीय
स्वागत करण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कधी नव्हे ते यावेळी एकच भूमिका घेतांना
दिसले. समाजातील प्राणीमित्रांनी बैलगाडा शर्यतीवर निर्बंध असावेच अशीच भूमिका
घेतली. समाजमाध्यमात काहींनी बैलगाडा शर्यतीला क्रूरखेळ म्हटले, काहींनी सामंती खेळ म्हटले आणि
काहींनी फक्त पश्चिम महाराष्ट्राचा खेळ असेही म्हटले. न्यायालयच्या निर्णयाचे
समर्थन करणाऱ्या काही मंडळीनी बैलगाडा शर्यत ही प्राचीन संस्कृती आहे असे म्हटले, काहींनी चारशे वर्षे जुनी संस्कृती, काहींनी अतिशय पारंपारिक तर काहींनी
वर्षानुवर्षे चालू असलेली परंपरा आहे असेही म्हटले. या सगळ्या गोष्टींतून एक
मुद्दा स्पष्ट होतो की, बैलगाडा शर्यतीकडे अनेक लोक
वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. कोणी त्याला प्राणीहक्कांच्या दृष्टीने पाहते तर
कोणी त्याला परंपरेच्या दृष्टीने पाहते. कोणी त्याला संस्कृती म्हणते, तर कोणी त्याला विकृती म्हणते. म्हणूनच, काळ्या-पांढऱ्या
चौकटीच्या पलीकडे जावून बैलगाडा शर्यतीचा इतिहास आणि गुंतागुंत समजून घ्यायला हवी
असे मला प्रामाणिकपणे वाटते.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या
राज्यात आणि जगातील अनेक देशात बैलांच्या शर्यती, बैलांच्या झुंजी, बैलगाड्यांच्या
शर्यती लावल्या जातात. त्यांना सांस्कृतिक, सामाजिक, कर्मकांडीय महत्व
असते. त्यामुळेच लोकसंग्रह, लोकमत आणि लोकबळ अशा शर्यती आणि
झुंजीच्या मागे असे दिसते. लोकसंग्रह आणि लोकपाठींबा असल्यामुळेच हा राजकारणाचा
सुद्धा मुद्दा बनतो. म्हणूनच, २०१४ मध्ये बंदी आल्यावर
कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र मधील सर्वपक्षीय मंडळी
आपसातील भेद विसरून या मुद्यावर एकत्र आलेले होते. महाराष्ट्रातील २०१७ मधील युती
सरकारने आणि २०२१ मधील महाविकास आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतीला पाठींबाच दिला
होता. कारण, बैलगाडा शर्यत हा नुसता खेळ नसून लोकसंग्रह
करण्याचा राजकीय आखाडा सुद्धा आहे. तसेच, या शर्यतीच्या
खेळाचे एक अर्थकारण, संस्कृतीकारण सुद्धा आहे.
मानवशास्त्रीयदृष्ट्या
अशा शर्यती,
झुंजी यांचा अभ्यास केला तर खूपच मजेशीर गोष्टी समोर येतात. बैलांच्या झुंजी आणि
शर्यतीप्रमाणेच ‘कोंबड्यांची झुंड’ हाही देशात आणि जगभरात
अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेला खेळ आहे. इंडोनेशिया देशातील बाली बेटावरील
लोकांमध्ये कोंबड्यांची झुंज हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ
क्लिफोर्ड ग्रीत्ज याने बरीच वर्ष इंडोनेशियात राहून या खेळाचा अभ्यास केला.
त्यातून या खेळाची स्वतंत्र एक अर्थव्यवस्था आहे असे त्यांना दिसून आले. तसेच, या खेळाच्या माध्यमातून त्यांनी बालीमधील राजकारण,
पितृसत्ता, कुटुंब, बाजार आणि लैंगिकता
अशा अनेक मुद्यांचा अभ्यास केला. इंडोनेशियावर पोर्तुगीज साम्राज्यवादाची सत्ता
होती. त्यावेळी, कोंबड्याच्या झुंजीचा लोकांमध्ये
राष्ट्रवादाचा प्रसार करण्यासाठीही उपयोग करण्यात आला होता. कारण, या खेळाच्या माध्यमातून लोकसंग्रह होत होता. लोक एकत्र येवून संघटीत होत
होते म्हणून पोर्तुगीज सत्ताधीशांनी या खेळावर बंदी आणली होती असेही क्लिफोर्ड
ग्रीत्ज यांनी आपल्या अभ्यासातून मांडले आहे. तमिळनाडूतील जल्लीकट्टू बंदी आणल्यामुळे केंद्र
सरकार विरोधात मोठी प्रतिक्रिया आली होती. काहींनी त्याला उत्तर भारताचे दक्षिण
भारतावरील सांस्कृतिक आक्रमण म्हणून पाहिले तर काहींनी त्याला हिंदुत्वाचा तमिळ
संस्कृतीवरील हल्ला म्हणूनही पाहिले. जल्लीकट्टू ही आमची संस्कृती आहे अशीच भूमिका
त्यावेळी घेण्यात आली होती. आधीच तमिळनाडूला उत्तरभारत विरोधी चळवळीचा दीर्घकालीन
इतिहास आहे. जल्लीकट्टूमुळे त्याला अजून गती मिळाली. म्हणूनच, लोकमताच्या प्रभावामुळे तमिळनाडूमधील सर्व
पक्षांनी सहमतीने प्राणी हिंसाचार संरक्षण कायद्यात दुरुस्ती घडवून आणली.
कोंबड्यांची झुंज आणि जल्लीकट्टू प्रमाणेच
बैलगाडा शर्यतीचे समर्थन करतांना लोकांनी संस्कृतीचा मुद्दा पुढे केला आहे. पण, तो
फक्त संस्कृतीचा मुद्दा नाहीये. बैलगाडा शर्यत आणि पितृसत्ता याचाही जवळचा संबंध
आहे. कारण, हा खेळ मर्दानी खेळ म्हणून ओळखला
जातो. पुरुषमंडळी यामध्ये प्रामुख्याने सहभागी असतात. त्यामुळे समाजजीवनात
पुरुषत्वाच्या कल्पना घडवण्यात या खेळाची मोठी भूमिका आहे. वेगवेगळे राजकीय नेते
मंडळी या शर्यती आयोजित करतात. त्यामुळे राजकीय प्रचार, प्रसार आणि प्रभावाचे क्षेत्र म्हणूनही
बैलगाडा शर्यतीचे कार्यक्रम ओळखले जातात. त्यामुळेच सर्वपक्षीय पाठींबा सहज
बैलगाडा शर्यतीला मिळतो. समाजजीवनात उत्सव,
कर्मकांड आणि खेळ यांना अत्यंत महत्व असते. त्यामुळे समूह मानसिकता आकारास येते.
त्यातून सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक संबंध प्रस्तापित होतात. म्हणून, अशा शर्यतींना लोकबळ आणि लोकपाठींबा मिळतो.
प्राणीमित्रांची तळमळ आणि कळकळ कितीही महत्वाची असली तरी त्यांनी या बाबींचा विचार
केलेला नसतो. त्यामुळे त्यांची नैतिक चर्चा ही सामाजिक शक्तीपुढे टिकत नाही.
शेवटी, कोणत्याही गोष्टीचा काळ्या-पांढऱ्या चौकटीत
किंवा संकुचितपणे विचार करण्यापेक्षा समग्रतेत विचार करायला तर आपणास गोष्टींची, शर्यतींची आणि खेळांची गुंतागुंत समजून घेता
येते असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा