रशियन
राज्यक्रांती ही विसाव्या शतकातील एक महत्तम घटना आहे. रशियन राज्यक्रांती ही अमेरिकन आणि
फ्रेंच राज्यक्रांतीसारखी फक्त राजकीय क्रांती नसून वि. दा. सावरकरांच्या मते, ती एक नुसती
राज्यक्रांती, एक नुसती
धर्मक्रांती, एक नुसती
अर्थक्रांती किंवा एक नुसती समाजक्रांतीच काय ती नव्हती, तर ती रशियन क्रांती होती एक
जीवनक्रांती!.’[१] मालतीबाई
बेडेकरांनी तर रशियन राज्यक्रांतीला ‘सेक्स क्रांती’[२] असे संबोधले आहे. रशियन क्रांती सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि सेक्स क्रांती होती. त्यामुळेच क्रांतीने संपूर्ण जगावर
प्रभाव टाकला होता. विसाव्या शतकात
जगभरातील अनेक चळवळी, व्यक्तींसाठी
रशियन क्रांती ‘जग बदलण्याची
प्रेरणा’ आणि ‘नवसमाज घडवण्याची उर्मी’ होती. संपूर्ण जगाप्रमाणेच भारतातही अनेक
राजकीय क्रांतिकारक, सुधारक आणि
विद्वान रशियन क्रांतीच्या प्रभावाखाली आले होते. तसेच, भारतातही रशियाप्रमाणेच वेगवेगळे प्रयोग
व्हावेत अशी मांडणी काहींनी केली होती. राजकीय प्रयोगाप्रमाणेच रशियाने स्त्री सुधारणेच्या संदर्भात जे प्रयोग केलेत. त्याकडे जगाप्रमाणेच भारतातील लोक पाहतच
होते. संपूर्ण जगाला
नवीन अशा स्त्री-सुधारणेच्या
प्रयोगाला रशियाने सुरुवात केली होती. याप्रकारच्या सुधारणामुळे पारंपारिक समजांना खूपच तडे आणि धक्के बसत होते. त्यामुळेच जगातील सगळे लोक रशियातील प्रयोगांकडे डोळे लावून बसले होते. रशियन स्त्री- सुधारणेच्या प्रयोगाने ज्याप्रमाणे
संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले त्याचप्रमाणे संपूर्ण जगाला स्त्री-सुधारणेच्या संदर्भात क्रिया-प्रतिक्रिया देण्यातही गुंतवले होते असे दिसून येते.
जगाप्रमाणेच महाराष्ट्राने सुद्धा
रशियन राज्यक्रांतीला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या दिसतात. प्रस्तुत शोधनिबंधात ‘महाराष्ट्रातील उजव्याविचारविश्वात रशियन स्त्री स्त्री
सुधारणेची चिकित्से’ची चर्चा
करण्याचा हेतू आहे.
महाराष्ट्रातील ‘उजवे विचारविश्व’ आणि ‘रशियन स्त्रीसुधारणेचा प्रयोग’
आधुनिक
महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाचा विकासक्रम पहिला तर आपणास ठळकपणे आणि
सुलभपणे ‘उजवे’ आणि ‘डावे’ असे विभाजन करता येत नाही. परंतु, प्रस्तुत विषयाची चर्चा करता यावी
म्हणून ‘उजवे विचारविश्व’ अशी परिभाषा वापरली आहे. वैचारिक, समाजिक, राजकीय आणि धार्मिक बाबींच्या बाबतीत
काही साम्य, काही भेद
असलेल्या वैचारिक परंपरांना ‘उजव्या विचारविश्वा’त समाविष्ट
केलेले आहे. त्यामध्ये
हिंदुत्ववादी, सनातनी, आधुनिक धार्मिक असलेली मंडळी आणि
मार्क्सवाद आणि स्त्री-सुधारणा यांना
विरोध करणाऱ्या मंडळींचा समावेश आहे.
वासाहतिक छत्रछायेखाली फुले, आगरकर, पंडिता रमाबाई
पासून ते मलबारी, कर्वे यांच्या
सारख्या मंडळींनी महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात स्त्री सुधारणेच्या चळवळीला बहर
यावी म्हणून महाराष्ट्राच्या समाजभूमीची आणि मनोभूमीची अत्यंत कष्टाने मशागत केली. त्यामुळे महाराष्ट्रात ‘स्त्री प्रश्न’ आणि ‘स्त्री सुधारणे’कडे चिकित्सक पाहण्याची, चर्चा करण्याची परंपरा रशियन
क्रांतीपुर्वीच विकसित झालेली होती. एकोणिसाव्या शतकात स्त्री शिक्षण, स्त्री सुधारणेला कठोर विरोध करत पण, तरीही सरकारी स्त्रीसंबंधी कायद्यांना पाहत सनातनी मंडळींनी आपल्या स्त्री
सुधारणा विरोधाच्या क्लुप्त्या आणि युक्त्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीला
शोधलेल्या दिसतात. परंतु, एकोणिसाव्या शतकात असलेली सुधारक–सनातनी दुरंगी वैचारिक लढाई विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच
बहुरंगी झालेली दिसते. सनातनी
मंडळींपेक्षा हिंदुत्ववादी लोकांनी घेतलेली वेगळी वैचारिक भूमिका आणि रशियन
क्रांतीनंतर समाजसत्तावादी (मार्क्सवादी) विचारांच्या
महाराष्ट्रातील प्रवेशाने महाराष्ट्रातील चर्चेच्या आणि चिकित्सेच्या दिशाच बदलून
टाकल्या. त्यामुळेच, महाराष्ट्रातील उजव्या विचारविश्वात
झालेली रशियन सुधारणेची चिकित्सेची चर्चा करणे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे
ठरते.
आधी म्हटल्याप्रमाणे रशियन क्रांती
आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक क्रांतीच नव्हती तर सामाजिक, कौटुंबिक आणि सेक्स क्रांतीसुद्धा होती. त्यामुळेच विवाहस्वातंत्र्य, घटस्फोट स्वातंत्र्य आणि
संभोगस्वातंत्र्य या स्वातंत्र्याच्या कल्पनेने आणि विचारांनी लग्न, संभोग, घटस्फोट, अपत्य आणि कुटुंब या गोष्टी रशियन
स्त्री सुधारणेच्या प्रयोगाच्या केंद्रबिंदू बनल्या. नवीन समाजवादी समाज घडवायचा असेल तर नवीन लैंगिक नीती आणि
समाजनीतीशी आवश्यकता आहे असे म्हणत डाव्या विचारविश्वाने रशियन स्त्रीसुधारणेच्या
प्रयोगाचे समर्थन केलेले दिसते तर लग्न, कुटुंब, धर्म यांना धक्का
देवून अनिर्बंध प्रेम, संभोगस्वातंत्र्याने
समाजात स्वैराचार आणि राष्ट्रात अनागोंदी निर्माण होईल अशी भीती व्यक्त करत उजव्या
विचारविश्वाने रशियन स्त्रीसुधारणेच्या प्रयोगावर टीका केलेली दिसते. उजव्या विचारविश्वातील काहींनी सरधोपट रशियन
प्रयोगाला विरोध केलेला आहे तर काहींनी त्यातील काही गोष्टींचे समर्थनसुद्धा केले
आहे.
ल. रा. पांगारकर व गोविंद महादेव जोशी
उजव्या
विचारविश्वातील सनातनी मंडळींच्या मांदियाळीत महत्वाचे नावलौकिक असलेले पांगारकर
आणि जोशींनी १९२० ते १९४० च्या काळात स्त्रीप्रश्नाची वृत्तपत्र, मासिकांच्या माध्यमातून चर्चा घडवून
आणलेली दिसते. १९१७ मध्ये
क्रांती झाल्यानंतर पुढील दोन- तीन वर्षातच महाराष्ट्रातील वैचारिक वातावरणात समाजसत्तावादाची चर्चा सुरु झाली. लोकमान्य टिळकांच्या पश्चात
समाजसत्तावादाकडे कसे पाहावे यावरून टिळकवाद्यांमध्ये पुढील दोन दशके वैचारिक झगडा
चालू राहिलेला दिसतो. रशियन स्त्री-सुधारणेमुळे धर्म, कुटुंब आणि विवाहसंस्था धोक्यात येत अशी समज सनातनी मंडळींमध्ये विकसित झालेली
दिसते. त्यामुळेच, कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्थेला नष्ट
करू पाहणाऱ्या स्त्री सुधारणेला सनातनी मंडळी विरोध करतांना दिसते. कुटुंबसंस्थेचे महत्व प्रतिपादित
करतांना पांगारकर लिहितात कि, “ कुटुंब हे एक ऑफिस आहे, राज्य आहे. ऑफिसचे काम नीट चालावे म्हणून सुपरिटेडंट, हेडक्लार्क इत्यादी. व्यवस्था जशी इष्ट आहे किंबहुना अशा
उच्चनीचपणाच्या पायऱ्या लावल्याशिवाय ऑफिसचे काम सुनियंत्रित चालत नाही; त्याचप्रमाणे कुटुंबव्यवस्थेत स्त्रीने
पुरुषाच्या अंकित राहिले पाहिजे एवढाच आमच्या धर्मशास्त्राकारांचा मुद्दा आहे. घरांत स्त्रियांना मुबलक स्वातंत्र्य आहे
व सौख्यही आहे.”[३]
कुटुंबांची महत्व
विशद केल्यावर प्रौढविवाहाचा विरोध आणि बालविवाहाचे समर्थन सुद्धा पांगारकर करतात. रशियन
क्रांतीपूर्वी बालविवाहाचे प्रमाण अधिक होते. क्रांतीनंतर झपाट्याने बालविवाहाचे
प्रमाण घटलेले दिसून आले. महाराष्ट्रात बालविवाहाच्या
विरोधात रशियन क्रांतींच्या आधीपासूनच काही सुधारक मंडळी काम करीत होती पण, तरीही बालविवाह हे समाजवास्तव होतेच. या समाजवास्तवाला समाजसत्तावादी लोक
धक्का देवू शकतात असे वाटल्यामुळेच विसाव्या शतकातही बालविवाहांचे
मिथ्याविज्ञानाच्या आणि धर्माच्या आधारे
सनातनी मंडळी समर्थन करत होती. पांगारकर लिहितात, “ बारा, चवदा वर्षापर्यंत सामन्यात: मुली अविवाहित स्थितीत ठेवण्याची
मुलींच्या पालकांना दिक्कत वाटेनाशी झाली आहे, पण ही कालमर्यादा याच्याही पुढे जाऊ
दिल्यास आपल्या समाजावर अनेक अरिष्ट्ये ओढवण्याचा संभव आहे म्हणून लोकांनी वेळीच
सावध राहणे अवश्य आहे. मुलींचे विवाह
रजोदर्शनापुर्वीच तरी अवश्य झाले पाहिजेत. रजोदर्शनाची मर्यादा उल्लंघून जाणे हिंदूधर्मशास्त्राप्रमाणे चालणाऱ्या माणसास
अत्यंत अनुचित आहे. रजोदर्शनानंतर
मुलीचा विवाह झाल्यास तिचे आईबाप किंवा पालक नरकांत पडतात असे आपल्या सर्व
धर्मग्रंथाचे एकमत आहे. हिंदुस्थानच्या
हवेत मुलींची लग्ने १२ वर्षापर्यंत व मुलांची लग्ने २० वर्षापर्यंत करणेच अनेक
दृष्टीनी हितावह आहे.”[४]
‘समाजशास्त्री’ या टोपणनावाने गोविंद महादेव जोशीने
स्त्रीसुधारणेची आणि रशियन क्रांतीने निर्माण केलेल्या नवीन समाजनीतीची चिकित्सा
केलेली दिसते. पांगारकरांचाच
वैचारिक वारसा काहीसा उद्यावत आणि धारदार करत महादेव गोविंद जोशींनी पुढे
चालविलेला दिसतो. ‘झारशाहीच्या सोविएत व्यवस्थेत एक नव समताधीष्टीत राष्ट्र उभारण्याचा
जगभरातील पहिलावहिला प्रयत्न झाला. त्यात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समतेबरोबरच अर्थातच लिंगभाव
समताही प्रत्यक्षात आणणं अभिप्रेत होत’[५] असे सोविएत क्रांती आणि स्त्रिया अशी चर्चा रशियन क्रांतीची
सकारात्मक बाजू मांडतांना काही अभ्यासकांनी मांडली आहे. नवा समाजवादी समाज घडवायचा आहे म्हणून
प्रचलित आणि पारंपारिक नीती सोडून नवी समाजनीती घडविण्याचे काम रशियन क्रांतीने
केलेले दिसते. मालतीबाई बेडेकर
रशियन क्रांतीचे महत्व सांगतांना लिहितात कि, “...विषमता समूळ नाहीशी करण्यासाठी रशियात
जी क्रांती झाली. त्या क्रांतीत
स्त्री- पुरुषातील विषमता
नाहीशी करण्यासाठी उभयतांनाही ‘सेक्स’चे स्वातंत्र्य
दिले. स्त्रियांच्या
मार्गात मुले असतात. त्यांची काळजी
सरकारने घेण्याचे ठरविले.”[६] सेक्सच्या स्वातंत्र्यामुळे क्रांतीतोत्तर
समाजामध्ये ‘अनौरस’ मुले
जन्माला आली पण, रशियाने ‘अनौरस’ मुलांना ‘औरस’ मुलांप्रमाणेच मान देवून जगातील विद्यमान
सर्व राष्ट्रांस लाजविले.[७] या अशाप्रकारच्या नवनीतीची मांडणी रशियात होत
होती. या मांडणीचा महाराष्ट्रीयन वर्तुळात
प्रभाव वाढत होता. म्हणून, गोविंद महादेव जोशींनी ‘सुधारकपुरुस्कृत आचारांचे समीक्षण’ नावाचा लेख लिहून नवनीतीवर टीका केली. ते लिहितात, “...नव्या नीतीचे स्वरूप...पत्नीने पतीजवळ नेहमी राहिले पाहिजे असे
नाही; किती अपत्ये
व्हावी हे ठरविण्याचा पतीप्रमाणेच पत्नीला हक्क असावा; दोघांनीही संततीप्रतिबंधक उपाय वाटेल
तेव्हा योजावे; द्रव्य
मिळविण्याकरिता स्त्रीने वाट्टेल तो धंदा करावा व पुरुषाने तिला प्रतिबंध करू नये; प्रयोगविवाह करण्यास प्रत्येकास हक्क
असावा; अशा विवाहांत
अपत्य झाल्यास टे बेकायदेशीर मानू नये; समाजाने अशा स्त्रीला दुर्गुणी समजू नये; आजन्म विवाहबंधन हे प्राचीन धर्मानी
माजविलेले थोतांड आहे; कारण प्रेम नष्ट
झाल्यास विवाह ‘रजिस्टर’ जावून मोडावा हेच युक्त आहे; ‘व्यभिचार’ हा कायद्याने गुन्हा समजू नये; विवाह व धर्म यांचा काही संबंध नाही
म्हणून धर्माने यांत हात घालू नये; विवाह ही खाजगी बाब आहे, तीत समाजाने तटस्थ राहावे; लैंगिक गोष्टींचे विवेचन करण्यास ग्रंथकारास पूर्ण स्वातंत्र्य असावे व
त्यांनी आपली मते प्रसृत करावी; शिक्षणसंस्थातून कामशास्त्रावर व्याख्याने द्यावी; स्त्रियांनी विनय दाखविला पाहिजे या
प्राचीन कल्पनेचा त्याग केला पाहिजे; गुप्तरोगांची व्यवस्था आणि चिकित्सा उघड करावी व त्याकरींता रुग्णालये स्थापन
करावी; या रोगांविषयी
शिक्षण संस्थांमधून दिले जावे.”[८] या प्रकारची ही
नवनीती असल्यामुळे तीचा ते विरोध करतात. तसेच, ‘कुटुंबसंस्था
नाहीशी केल्यावर सर्व मुलांचे संगोपन सरकारास करावे लागेल अर्थात सरकारच्या
ताब्यात सर्व कौटुंबिक व्यवस्था जाईल. मग स्वातंत्र्यवाद्यांचे स्वातंत्र्य राहिले कोठे ?’[९] असा प्रश्न उपस्थित करत रशियातील कौटुंबिक आणि
वैवाहिक स्वातंत्र्याची चिकित्सा करतात.
पांगारकर आणि
जोशी या दोघांनी नव्यानीतीची चिकित्सा करत पारंपारिक नीतीची पाठराखण केलेली दिसते. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था आणि धर्म यांच्या
मुळांना रशियन स्त्री- सुधारणेच्या नव्या नीतीने धक्का बसेल
अशी धास्ती महाराष्ट्रातील सनातनी मंडळींना होती असेच त्यांच्या लिखाणातून
स्पष्टपणे दिसते.
न. चिं. केळकर व वि. दा. सावरकर
महाराष्ट्रातील टिळकोत्तर युगात उजव्या विचारविश्वातील आणि टिळक अनुयायांच्या हिंदुत्ववादी वर्तुळातील केळकर आणि सावरकर हे प्रभावी नेते
होते. केळकर आणि सावरकर या दोघांनी टिळकोत्तर काळात हिंदुत्ववादी
दृष्टीने राजकीय आणि साहित्यिक क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. मराठी भाषेतून दोघांनीही विपुल प्रमाणात
राजकीय साहित्य निर्माण केले. दोन्ही जरी हिंदुत्ववादी चळवळीचे नेते
असले तरी त्यांच्याही दृष्टीत काही मुलभूत फरक आपणास दिसून येतो. हिंदुत्वाचे क्षेत्र विस्तारण्यात जातीव्यवस्था, अस्पृश्यता, बालविवाह, विधवाविवाह आणि तत्सम कर्मकांड अडथळा
ठरते म्हणून सावरकरांनी या गोष्टींची चिकित्सा केली तर केळकरांनी या गोष्टींवर
स्पष्ट आणि भेदक भाष्य कधीही केले नाही. हिंदुत्वाच्या राजकारणाला आकार देण्यासाठी ज्या गोष्टी योग्य वाटतात. त्या गोष्टी केळकर आणि सावरकरांनी
केल्या. पण, दोघांनी आपापले वेगळेपण शाबूत ठेवलेले
दिसते.
१९३०
नंतर राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात समाजसत्तावादी मंडळी
आपला प्रभाव वाढवत होती. तसेच, महाराष्ट्राच्या सुधारणा चळवळीशी आपले
नाते जोडू पाहत होती. अशा काळात
कम्युनिस्ट विचारसरणीची आणि समाजसत्तावादी लोकांची चिकित्सा करणारे पुस्तक ‘तिरंगी नवमतवाद’ या नावाने केळकरांनी प्रकाशित केले. सदरील पुस्तकात कम्युनिस्ट विचारसरणी, पक्षपद्धती, अर्थव्यवस्था, समाजस्थिती या सगळ्यांची चिकित्सा
आपल्या वैचारिक निष्ठेप्रमाणे केळकरांनी केली आहे. तसेच, समाजसत्तावादी मंडळींना ते सुधारक न
म्हणता ‘नवमतवादी’ म्हणतात आणि सुधारक आणि नवमतवादी असा
भेद करतात. ते लिहितात, “ महाराष्ट्रांत सामाजिक बाबतीत प्रगतीपर
विचार आज पन्नास वर्ष मांडले जात आहेत. हे विचार मांडतांना ‘सुधारक’ असे एक रूढ नाव होते व अजूनही तेच चालते. परंतु या लोकांना नवमतवादी असे नाव कोणी
दिले नव्हते. याचे कारण असे की, सुधारक ज्या सुधारणा म्हणून सुचवित त्या, विद्यमान स्थितीच्या पुढे एक पाउल
टाकणाऱ्या असल्या तरी, तिला सर्वस्वी
सोडून नव्हत्या. पण नवमत या
नावाखाली हल्ली वावरणाऱ्या पुष्कळशा कल्पना इतक्या मूलग्राही व विद्यमान
समाजस्थितीला इतक्या सोडून आहेत की, त्यांना सुधारणा हा सौम्य शब्द लावणे बरोबर होणार नाही.”[१०]
रशियन
क्रांतीच्या प्रभावाखाली असलेले नवमतवादी आणि सुधारक यांच्यातील फरक स्पष्ट
करतांना केळकर लिहितात, “गेल्या पन्नास
वर्षातील समाजसुधारकांनी असमंत वैधव्य नसावे असे म्हटले; प्रौढ विवाह व्हावा म्हटले; पोटजातीत विवाह व्हावा असे म्हटले किंवा
कोणत्याही हिंदू जातीजातीत विवाह व्हावा म्हटले; किंवा काही विशेष परिस्थितीत घटस्फोट
मिळावा असेही म्हटले, तरी विवाहसंस्था
ही राहावी असेच त्यांनी गृहीत धरले होते. पण, विवाहसंस्थाच
अजिबात नष्ट व्हावी, किंवा
विवाहापूर्वीही स्त्री-पुरुषांनी एकत्र
राहून संसार करावा ही हिंदू समाजाची ‘सुधारणा’ न म्हणता त्याला
नवमत हेच नाव देणे योग्य होईल.”[११] महाराष्ट्रातील समाजसत्तावादी मंडळींवर तर ते टीका करतातच पण, त्यासोबतच नवमतवाद्यांचे आदर्श असलेल्या
सोविएत रशियातील नवनीतीला मॉरीस हिडीस
यांच्या काही विधानांचा सोयीस्कर आधार घेवून ‘स्वैराचार’ ठरविण्याचा प्रयत्न करतात.[१२] केळकरांनी सोविएत
रशियाच्या बहुतेक प्रयोगांची चिकित्सा
केलेली आहे. तसेच, ‘धार्मिक भावना’ आणि ‘कौटुंबिक संसार’ या दोन मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सोविएत प्रयोगांकडे पाहिले आहे.
केळकरांपेक्षा
सावरकरांनी सोविएत संदर्भात कमी केले आहे
पण, घटस्फोट
स्वातंत्र्याची अत्यंत महत्वपूर्ण चर्चा सावरकरांनी त्यांच्या ‘रशियातील घटस्फोट –स्वातंत्र्याचा प्रयोग’ या लेखात केली आहे. ते लिहितात, “विवाहसंबंधातील सुधारणांमध्ये सगळ्यात
धाडसाची आणि कोणत्याही राष्ट्राने आजवर अशा प्रमाणात प्रयोजून न पाहिलेली सुधारणा
म्हणजे घटस्फोट स्वातंत्र्य हीच होती. क्रांतीपूर्वी रशियातील लग्नबंधने अगदी करकच्च आणि घटस्फोटाची अनुज्ञा
अपवादात्मक असे. क्रांती होताच
स्त्री- पुरुषांची ही
करकच्च विवाहबंधने अकस्मात गळून पडल्यासारखीच झाली! पक्का बंधारा घालून अगदी थेंबही न वाहू
देता तुंबवून ठेवलेला तुंबळ प्रवाह, तो बंधारा एकदम फुटताच त्याच्याच उखळलेल्या भिंती, पायाच्या दगडांना सुद्धा लाटांवर
भिरकावीत धो धो करीत अस्तावस्त दाटीने जसा वाहू लागतो. तशीच स्थिती रशियांमध्ये क्रांती होताच
स्त्री-पुरुषसंबंधांमध्ये
झाली.”[१३]
उजव्या
विचारविश्वातील सनातनी आणि इतर हिंदुत्ववादी मंडळींपेक्षा विवाह, विवाहपूर्व संबंध आणि स्त्री-पुरुष संबंध या विषयांवर सावरकर वेगळी भूमिका घेतात. महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात
सावरकरांच्या या मतांची म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. रशियन क्रांतीने घटस्फोटाचे सुलभीकरण
खूपच क्रांतिकारक बदल स्त्री-पुरुष संबंधांमध्ये झाला असे सावरकर सांगतात. ते लिहितात, “समता दुथडी भरभरून वाहत चालली! नातेगोते, जातपात, वय- वशिला, मुहूर्त- मध्यस्थी, टिपणी- टिका, धर-बंध तेवढा सोडून वाटेल त्या स्त्रीने वाटेल त्या पुरुषाशी
वाटेल तेव्हा ‘संबंध’ ठेवावा, सरकारी नोंदवहीत तो संबंध नोंदविण्याची
लहर जर कोणास आली तर त्याच संबधाला लग्न म्हणायचे! संपले. हाच विवाह आणि ज्यावेळी ज्यास वाटेल
त्या स्त्रीने व पुरुषाने तो संबंध अथवा विवाह संपला असे सरकारी नोंदवहीत लिहावे
कि झाला घटस्फोट.”[१४] लग्न आणि घटस्फोट यांच्यात क्रांतिकारक
बदल केल्याने एकूणच रशियन स्त्री- सुधारणेच्या प्रयोगाचे नेमके काय झाले यासंबंधी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात, “रशियाने चालविलेल्या स्त्री-पुरुष संबंधाविषयक क्रांतिकारक प्रयोगाचे काय परिणाम झाले
आहेत? लग्न, संभोग, संबंध, घटस्फोट, अपत्य नि कुटुंब या अत्यंत गंभीर
विषयासंबंधीच्या आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची हेळसांड इतक्या मोठ्या जनसंख्येकडून
होत आहे की, ते रशियन
समाजाचेच एक सांघिक व्यंग समजणे भाग पडावे?”[१५] लग्न, घटस्फोट, संबंध आणि इतर मुद्यांच्या संदर्भात
महत्वाचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर रशियन प्रयोगाने मानवी जीवनात काय बदल घडवून
आणले. त्याची
घटस्फोटाच्या संदर्भात महत्व नोंदवतात. ते लिहितात, “प्रत्येक
मनुष्यास प्रामाणिकपणे आपले जीवन सुधारण्याची संधी दिली पाहिजे. कौटुंबिक अतातायीपणा, कलह, हत्या, नि असह्य दु:ख टाळणारा सोविएत चा घटस्फोट स्वातंत्र्याचा निर्बंध हा अशाच प्रसंगी मनुष्यास
एखाद्या वरदानासारखा उपयोगी पडतो. जीवनाचा पुनरुद्धार करतो.”[१६] उजव्या विचारविश्वातील सनातनी मंडळी आणि इतर
हिंदुत्ववादी मंडळींपेक्षा सावरकर बालविवाह, प्रौढविवाह, विवाहपूर्व परिचय
अशा सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात म्हणुनच त्यांना इतरांप्रमाणे रशियन प्रयोगाच्या मर्यादाच नव्हे
तर महत्व सुद्धा स्पष्टपणे दिसते.
विष्णू महादेव भट
जगभरातील
लोकांना रशियन स्त्री- सुधारणेच्या
प्रयोगानी धक्का दिला होता. त्यामुळे यावर कशी आणि काय प्रतिक्रिया द्यायची हेही अनेकांना स्पष्टपणे कळत
नव्हते कारण, त्यांच्या
प्रतिक्रियेत परस्परविरोधी मते आपणास दिसतात. महाराष्ट्राच्या उजव्या विचारविश्वात
असेच झालेले दिसते. विष्णू महादेव भट
हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. ‘रशियातील स्त्रीजीवनाची उत्क्रांती’ हा
विष्णू महादेव भट यांचा लेख त्यादृष्टीने विशेष अभ्यासणे महत्वाचे आहे. रशियन स्त्री-सुधारणा प्रयोगाचे महत्व सांगतांना ते लिहितात, “...आजवर कोणत्याही देशाने कोणत्याही काळांत
(असे) प्रयोग केलेले आढळत नाही आणि म्हणूनच या अभिनव प्रयत्नाकडे सर्व जगाचे डोळे
लागले आहेत. रशियाने असा जणू
काही चंगच बांधला आहे की ज्ञानाचे, व्यवसायाचे, असे एकही क्षेत्र ठेवायचे नाही की ज्यांत
स्त्रियांना प्रवेश नाही आणी म्हणून हा स्त्रीजीवनाचा अभिनव इतिहास जितका मनोरंजक
तितकाच बोधप्रदही झाला आहे. स्त्रियांच्या उन्नतीचा काळ फारसा मोठा नाही. सारा २० वर्षातला हा कारभार पण हा २०
वर्षांचा क्रांतीकाळ इतिहासातल्या अनंत वर्षांच्या रखडत चालणाऱ्या
उत्क्रांतीकाळाला लाजवणार, रडवून सोडणार असे दिसते.”[१७] आर्थिक
क्षेत्रात स्त्रियांना मोकळीक मिळाली. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढली. स्त्रिया गृहकृत्याची क्षेत्र ओलांडून सर्वच क्षेत्रात गेल्या हे विष्णू
भटांना महात्वाचे वाटते. त्यामुळेच, त्यांनी सार्वजनिक शिंपीखाते, धोबीखाते आणि कपडेदुरुस्ती यांची चर्चा
केली आहे पण, घराचे दार
ओलांडून स्त्रियांनी सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे पारंपारिक नीतीधर्माचा
जो विध्वंस झाला त्याविषयी त्यांनी रशियन प्रयोगावर कठोर टीका केली आहे. ते लिहितात, “आर्थिक समतेला बुद्धीमतेची अशी जोड
मिळाल्यानंतर स्त्रियांचे जीवन अधिक सुसंस्कृत व्हावे अशी अपेक्षा होती. पण, ज्ञानाला नीतीधर्माची जोड हवी हे मजूर सरकारला
प्रारंभी पटले नव्हते. त्यामुळे
आजपर्यंत कोणत्याही देशाने कोणत्याही काळात जो मूर्खपणा केला नाही तो रशियाने या
बाबतीत केला. या नवनीतीच्या
प्रयोगात रशियन समाजवाद्यांच्या हातून काही बाबतीत, व काही वर्ष शहारे आणण्यासारख्या
अक्षम्य व अत्यंत निंद्य अशा घोडचुका झाल्या....स्त्री स्वातंत्र्याच्या मर्यादा
कोणत्या हे या ठोंब्याना (समाजवाद्यांना) काय कळणार? त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार
समजून प्रारंभी सर्व कौटुंबिक नितीमत्तेला धाब्यावर बसवले आणि अक्षरश: नंगा नाच घातला. मुलांचे बहुपितृकत्व सिद्ध होवू लागले! नवरा बायको या नात्याऐवजी नरमादी एवढीच
जाणीव शिल्लक राहिली.”[१८]
रशियन
क्रांतीने आर्थिक बाबतीत जे काही केले त्याला विष्णू भट जगातील कधीही आणि कोणीही न केलेला ‘अभिनव प्रयत्न’ म्हणतात आणि नीतीच्या बाबतीत जे केले त्याला जगातील कधीही आणि कोणीही न केलेला
‘मूर्खपणा’ म्हणतात. अशा अनेक क्रिया-प्रतिक्रिया रशियन स्त्री-सुधारणेच्या प्रयोगाला आलेल्या दिसतात. त्यात काहींनी आर्थिक स्वातंत्र्याचे
समर्थन केले पण विवाह, संभोग
स्वातंत्र्यावर टीका केली. तसेच, या काळात रशियन
क्रांतीच्या विरोधी मोठा प्रपोगंडा पाश्चिमात्य जगात चालू होते. त्या प्रपोगंड्याचे अनेक जन बळी ठरलेले
दिसतात. ‘नव्या लैंगिक
नीतीच्या उत्पत्तीविषयी जितके गैरसमज आहेत, त्याहीपेक्षा जास्त गैरसमज तिच्या स्वरूपाविषयी
आहेत. विशेषत: या नव्या नीतीची अंमलबजावणी जीविताच्या
प्रत्येक अंगाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहणाऱ्या रशियांतील साम्यवादी सरकारनेच
प्रथम केल्यामुळे क्रांतीच्या काळात जी अंधाधुंदी तेथे साहजिकच काही दिवस बोकाळली
होती, तिच्याकडे बोट
दाखवून साम्राज्यवादी ब्रिटीश ग्रंथकारांनी रशियाला स्वैराचारी ठराविले. त्याचबरोबर नव्या लैंगिक नीतीसाठी ‘स्वैराचार’ हा पर्याय त्यांनी रूढ केला.’[१९] असे
माडखोलकरांनी नोंदविले आहे. रशियाला बदमान करण्यासाठी साम्राज्यवादी ब्रिटिशांनी जो प्रपोगंडा वापरला. त्याचच आधार घेवून भारतातील आणि
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी मंडळींनी रशियन स्त्री- सुधारणेच्या नवनीतीला स्वैराचार ठरविण्याचा
प्रयत्न केलेला दिसतो.
महाराष्ट्रातील उजव्या विचारविश्वातील सनातनी आणि हिंदुत्ववादी मंडळी
राष्ट्रवादी चळवळीचा सुद्धा भाग होती. दोन्ही वर्तुळातील मंडळींची प्रेरणास्थान लोकमान्य टिळक होते आणि टिळकांनी
आयुष्याच्या शेवटी समाजसत्तावाद, रशियन क्रांती आणि लेनिन याविषयी लेखन केल्यामुळे टिळक अनुयायांचा एक गट पुढील
काळात समाजवाद, मार्क्सवादाकडे
झुकलेला दिसतो. पण, टिळकवाद्यांमधील मोठा गट हा हिंदू
महासभेच्या नेतृत्व करतांना दिसतो. १९२० नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या सार्वजनिक क्षेत्रात तसेच, राजकीय आणि साहित्यिक क्षेत्रात रशियन
क्रांतीने प्रभावित लोकांचा उदय झाला. याच काळात रशियात हा स्त्री- सुधारणेचा प्रयोग चालू होता. अशा सर्वच बाबींवर प्रतिक्रिया म्हणून उजव्या विचारविश्वातील मंडळी रशियातील
स्त्री-सुधारणेच्या
प्रयोगाला भिडलेली दिसतात. त्यामुळेच, हे सर्व लिखाण
वाचतांना महाराष्ट्रात आणि रशियात एकाचवेळी काय चालू होते हे समजून घेणे अत्यंत
महत्वाचे ठरते.
टीप- सदरील शोधनिबंध इतिहास व परकीय भाषा (रशियन) विभाग, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि
रशियन स्टेट युनिव्हर्सिटी मास्को आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये २८-३०
जानेवारी २०२० वाचण्यात आला होता.
[१]
सावरकर वि. दा., रशियातील घटस्फोट –स्वातंत्र्याचा प्रयोग, समग्र सावरकर वाड्मय – खंड ३ - निबंध, महाराष्ट्र प्रांतिक हिंदुमहासभा, पुणे, पृ. २०६
[२]
बेडेकर मालतीबाई, समाजरचनेत स्त्रीचे स्थान, भारतीय स्त्री, हिंगणे-स्त्री शिक्षण संस्था, पुणे, १९६७, पृ. २५९
[३] पांगारकर ल. रा. पतीपत्नी संबंध, मुमुक्षूचे
सिंहावलोकन: मुमुक्षुतील निवडक निबंध – भाग २, मुमुक्षु कचेरी, पुणे, १९२३ पृ. ७८
[४]
पांगारकर ल. रा.बालविवाह आणि प्रौढविवाह, मुमुक्षूचे सिंहावलोकन: मुमुक्षुतील निवडक निबंध – भाग २, मुमुक्षु कचेरी, पुणे, १९२३ पृ. ७८
[५]
पानसरे मेघा, रशियन स्त्रीचा बदलता दर्जा (सोविएतपूर्व, सोविएत व उत्तर सोविएत काळाच्या
संदर्भात), स्त्रीविकासाचे
नवे क्षितीज, संपा- स्वाती कर्वे, प्रतिमा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती -२००८, पृ. ४८५
[६]
उपरोक्त, बेडेकर मालतीबाई, १९६७ पृ. २५७-५८
[७]
गोरे श्रीनिवास विनायक, रशियांतील सांप्रतची समाजव्यवस्था, चित्रमय जगत (खास रशिया अंक) जून १९२८, पृ. २८६
[८]
समाजशास्त्री, ‘सुधारकपुरुस्कृत आचारांचे समीक्षण’, सह्याद्री, एप्रिल १९४० खंड- ११ अंक- ४ पृ. ३२०
[९] कित्ता, पृ. ३२१
[१०] केळकर न. चिं., तिरंगी नवमतवाद, मनोहर ग्रंथमाला, पुणे, १९३७, पृ. ११८
[११] कित्ता, पृ. ११९
[१२]
माडखोलकर ग. त्र्य., साम्यवाद आणि नवी लैंगिक नीती, सह्याद्री, मे १९३८, पृ. ४०८
[१३] उपरोक्त, सावरकर वि. दा. पृ. २०६-२०७
[१४] कित्ता, पृ. २०७
[१५] कित्ता, पृ. २०९
[१६] कित्ता, पृ. २१२
[१७] भट, वि. म. रशियातील
स्त्रीजीवनाची उत्क्रांती, सह्याद्री, जून १९४० पृ. ५१३
[१८] कित्ता, पृ. ५१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा