रविवार, २८ मे, २०२३

आदर्शवाद, आदर्श आणि वगैरे वगैरेची चर्चा

 

 ज्यावेळी आदर्श मानवाच्या डोक्यात स्थानांतरीत आणि भाषांतरित होते, त्यावेळी ते भौतिक बनते.”                                                            - मार्क्स

 

 

       २०२२ हे वर्ष अनेक अर्थांनी अत्यंत महत्वाचे आहे. कारण, या वर्षी आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे साजरा करत आहोत आणि दुसरीकडे दलित पँथरचा सुवर्ण महोत्सवही साजरा करत आहोत. तसेच, पहिल्यांदा आपल्या देशाच्या राष्ट्रपती ( राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष हे योग्य शब्द आहेत) आदिवासी माहिला झाली आहे आणि दुसरीकडे अजूनही आदिवासी लहान – मुले वेठबिगार म्हणून विकली जात आहेत, आदिवासींची जमीन बळकावली जात आहे. त्यामुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना स्वातंत्र्याच्या चळवळीत, समतेच्या चळवळीत पाहिलेल्या आदर्शांचे काय झाले? आदर्शवादी स्वप्ने कुठे गेली हेही तपासून पाहिले पाहिजे. तसेच, ‘आदर्श ही काय भानगड आहे? समाजात एकदाच वेगवेगळे आदर्श असतात का? आदर्शवादी असणे म्हणजे काय? आदर्शवादी असणे म्हणजे वास्तवापासून पळ काढणे आहे का? आदर्श असण्याचे निकष कोणते आहेत? वगैरे वगैरे प्रश्नांची काहीशी चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

आदर्श म्हणजे काय?

       आदर्श हे वस्तूनिष्ठ वास्तवाची व्यक्तीनिष्ठ प्रतिमा आहे. उदा. माणसाच्या कृती, जाणीव आणि इच्छा अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब.  आदर्श हे व्यक्तीगत, मानसिक वस्तुस्थिती नाहीते पण सामाजिक-ऐतिहासिक परिपाक आहे. तसेच, एक प्रकारचे मानसिक उत्पादनही आहे. आदर्श माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक जाणिवांमध्ये असते आणि भौतिक – आध्यात्मिक जीवनाच्या भाग म्हणून इच्छेमध्येही असते. म्हणूनच, मार्क्सने वर्णन केले आहे की, “ज्यावेळी आदर्श मानवाच्या डोक्यात स्थानांतरीत आणि भाषांतरित होते, त्यावेळी ते भौतिक बनते.” ( ई. व्ही. इलेनकोव्ह, २०१५, पृ. २५२) आदर्श एक मानवी कृतीचा भाग म्हणून त्या कृतीमध्येच असते, त्याच्या परिणामात नसते. कारण, कृती ही अविरत आणि सतत वास्तवाला दिलेला नकार असते, कृती ही संवेदनक्षमतेने गोष्टी ज्ञात करते आणि त्यातून वास्तवात आणि प्रचलित असलेल्या गोष्टी बदलतात किंवा त्यातून नवीन रूप घेतात. हे सगळ सामान्यपणे व्यक्त केलेल्या आदर्शांच्या आकृतीबंधात आकारास येते. ज्यावेळी समाजाच्या गरजेचे साठी एखादे गोष्ट आदर्शरुपात निर्माण केलेली असते आणि कृतीतून ती साध्य केली जाते त्यावेळी आदर्श संपून जाते. संक्षिप्तपणे सांगायचे म्हणजे, आदर्श हे आदर्शात नसून माणसाच्या कृतीत आहे. आदर्शापर्यंत जाण्यासाठी माणसाला कृती करावी लागते. त्यावेळी वास्तव आणि आदर्श यांच्यातील अंतर कापले जाते. उदा. हिंदूराष्ट्राची कल्पना. हिंदूराष्ट्र हे हिंदुत्ववादी मंडळींसाठी दीर्घकाळापासून आदर्श आहे. हिंदूराष्ट्राची आदर्श कल्पना वास्तवात उतरवण्यासाठी हिंदुत्ववादी मंडळी अहोरात्र मेहनत घेतात. त्यासाठीची सातत्याने कृती करतात. त्यांनी त्यासाठीचे दैनंदिनीचे राजकारण आणि समाजकारण विकसित केले आहे. त्यांच्या संस्था आणि संघटनांच्या प्रर्थानांमध्ये हिंदूराष्ट्र स्थापन करण्याची शपथ घेतात. त्यासाठी मरण्याची आणि मारण्यासाठीचीही शपथ घेतात. भारतात दीर्घकाळ हिंदुत्ववादी चळवळीस पूरक वातावरण नव्हते. तरीही, त्यांनी ठीकाव धरला कारण आदर्शाविषयीची कटिबद्धता. प्रतिकूल  राजकीय पर्यावरणातून अनुकूल राजकीय वातावरणापर्यंत त्यांनी प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांनी राजकीय, सामाजिक आणि वैचारिक धोरणे आणि डावपेच खेळली पण आदर्शवाद सोडला नाही. म्हणून कधी नव्हे एवढी अनुकूल वातावरणनिर्मिती हिंदूराष्ट्र निर्मितीला झाली आहे. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला हिंदूराष्ट्राच्या चर्चांनी समाजातील सर्व कान्याकोपऱ्यात जनमत तयार करायला सुरुवात केली आहे. वास्तवाला कृतीच्या माध्यमातून सतत नकार देत राहणे हाच आदर्शाकडे जाण्याचा राजमार्ग आहे. हिंदुत्ववादी मंडळींनी हे नेहमीच केले भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. हे वास्तव त्यांनी नेहमी नाकारले आणि हिंदू राष्ट्राच्या चर्चा चालू ठेवल्या. धर्मनिरपेक्ष भारतामध्ये हिंदूराष्ट्रासाठीचा कृतीकार्यक्रम चालू ठेवला. प्रचार, प्रसार आणि प्रपोगंडाच्या कृतीने त्यांनी समाज पोखरला. वास्तव आणि आदर्श यांच्यातील अंतर कृतीमुळे कमी झाले तर आदर्श साध्य होते म्हणजेच आदर्श संपुष्टात येते. कारण, आदर्श हे वास्तव बनते. म्हणूनच, कृती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आदर्श हे वास्तवात रुपांतरीत होते का? असाही प्रश्न पडतो. जर आदर्श वास्तव बनत असेल तर ‘आदर्श हे आदर्श कसे ठरेल. जे साध्य करता येत नाही, ज्यापर्यंत पोहचता येत नाही. ज्याकडे पाहता येते. त्याची कल्पना करता येते पण ते वास्तवात उतरू शकत नाही. म्हणूनच, काहीजण आदर्श हे वास्तवात उतरवता येवू शकत नाही अशी भूमिका घेतात. यामुळेच, आदर्शासंदर्भात काही नवे प्रश्न निर्माण होतात. त्याची चर्चा पुढे करूयात.

समाज आदर्श असतो का?

       समाजात अनेक आदर्श असतात का? आणि काळानुसार आदर्श बदलतात का? या प्रश्नांचीही चर्चा करणे अगत्याचे ठरते. कारण, त्याशिवाय एकूणच आदर्शाची कल्पना करता येत नाही. भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ चालू असतांना अनेकांनी ‘आदर्श’ निर्माण केले. गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंह, सावरकर या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी आपल्या दृष्टीकोनातून आदर्शांची निर्मिती केली. ते आदर्श वास्तवात रुपांतरीत करण्यासाठी त्यांचे अनुयायी वेगवेगळ्या पद्धतीने झटत होते आणि अजूनही झटत आहे. ग्रामस्वराज असलेला भारत, जातीमुक्तभारत, समाजवादीभारत आणि हिंदूराष्ट्र ही आदर्श वरील मंडळींची होती. परंतु, ही आदर्श एकमेकांच्या  काहीबाबतीत विरोधी, काहीबाबतीत समांतर आणि काही बाबतीत पूर्णत: भिन्न आहेत. कारण, या आदर्शांच्या मागे असलेले वैचारिक आणि तात्विक अधिष्ठाने वेगवेगळी आहेत. समाजात वेगवेगळे समूह, वर्ग, सामाजिक स्तर आणि गट असतात. त्यांची वैचारिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न असते. त्यामुळेच आदर्शांना वर्गीय संदर्भ जसे असतात तसेच आदर्शांचेही समाजशास्त्र असते. श्रीमंतांचे आदर्श आणि गरिबांचे आदर्श, शहरी लोकांचे आदर्श आणि ग्रामीण लोकांचे आदर्श, स्थिर समूहांचे आदर्श आणि भटक्या समूहाचे आदर्श ही वेगवेगळी असतात आणि आहेत. आदर्श मूल्यांच्या बाबतीतही अनेकप्रकारचे  वैविध्य आपल्या समाजात दिसून येते. आदर्श जसे वेगवेगळे असतात तसेच काळानुसार आदर्शाची कल्पनाही बदलते. त्या बदलण्याला काळाचा जसा संदर्भ असतो. तसाच, स्थळाचाही संदर्भ असतो. उदा. आदर्श स्त्री- पुरुषाची कल्पना, आदर्श कुटुंब. आदर्श स्त्री कोण आहे? आदर्श पुरुष कोण आहे? किंवा आदर्श कुटुंब कोणते आहे? हे प्रश्न नुसते तात्विक प्रश्न नाहीत तर सामाजिक-ऐतिहासिक प्रश्न आहेत. कारण, काळाच्या वेगवेगळ्या टप्यांवर आदर्श स्त्री व पुरुष आणि कुटुंब या कल्पना बदलल्या आहेत.

      आदर्श समाज कशाला म्हणावे? प्राचीन भारतात वर्णव्यवस्था हीच आदर्श समाजव्यवस्था मानली जात होती. मध्ययुगातही व्यक्तीने स्वधर्म, जातीधर्म आणि गोतधर्म पाळणे बंधनकारक होते. आजही अनेक मंडळी सोईस्करपणे प्राचीन काळाला किंवा मध्ययुगीन काळाला आदर्श समाज म्हणून चित्रित करतात. त्याकाळामध्ये गुलामगिरी होती. वेठबिगारी होती. स्त्रियांना आणि शूद्रांना कोणत्याही प्रकारचे हक्क नव्हते. पण, तरीही काहींना ती समाजव्यवस्था आदर्श वाटते. वर्णव्यवस्थेचे चिकित्सेला अराजक म्हणून पाहिले गेले आहे. समाजात जर वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था नसली तर अराजक निर्माण होईल. कोणीही काहीही करेल अशी भीती दाखवण्यात आलेली आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन समाजात आदर्श समाज आणि अराजक समाज अशी काहीशी चर्चा दिसते. वर्ण-जातीव्यवस्थेमध्ये निर्माण झालेले बंडे, प्रतिरोध, मतभेद राज्याच्या मदतीने मोडून काढण्यात आले. आधुनिक काळात व्यक्तिवाद, उदारमतवाद, विवेकवाद, स्त्रीवाद या सारख्या गोष्टींमुळे समाजात अनेक बदल झाले. कौटुंबिक संबंध बदलले, स्त्री-पुरुष नातेसंबंधात बदल झाले. प्राचीन आणि मध्ययुगीन समाजांच्या तुलनेने आजच्या समाजात स्त्रियांना गुणात्मक दृष्ट्या सन्मानाची वागणूक मिळते. पण, म्हणून आजचा समाज आदर्श आहे असे आपण म्हणू शकत नाही. कारण, जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात अजूनही स्त्रियांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, मागील काही शतकांमध्ये स्त्रियांनी जी सामाजिक, राजकीय आणि वैचारिक कृती केली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही बदल झाले.

म्हणूनच, कोणताही समाज स्त्रियांच्या दृष्टीने आदर्श नव्हता आणि नाही. स्त्रियांनी वेगवेगळ्या टप्यावर काही आदर्श ठरवली. ती वास्तवात रुपांतरीत केली आणि मग पुन्हा नवीन आदर्श निश्चित केली. असा हा प्रवास चालू आहे. मतदानाच्या हक्कापासून सुरु झालेली ही चळवळ माझ शरीर, माझी निवड आणि माझा हक्क येथपर्यंत आली आहे.  प्रत्येकवेळी आदर्श समाजाची चर्चा करतांना त्या समाजातील परिघावरील शोषित-वंचित समूहांच्या दृष्टीकोनातून त्या आदर्श समाजाचा धांडोळा घेतला पाहिजे.

आदर्शवादाचे महत्व आणि मर्यादा!

      ‘आयड्यालीझम’ (Idealism) या इंग्रजी शब्दाचे मराठीमध्ये दोन प्रकारे भाषांतर केले जाते. एक म्हणजे ‘चैतन्यवाद’ आणि दुसरे म्हणजे ‘आदर्शवाद’. चैतन्यवाद ही आधीभौतिक जगाविषयी चर्चा करणारा हा दृष्टीकोन आहे आणि आदर्शवाद ही भौतिक जगामध्ये मार्ग शोधणारा दृष्टीकोन आहे. या लेखामध्ये प्रामुख्याने आदर्शवादाचीच चर्चा करण्यात येणार आहे. आदर्शवाद म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर तत्वज्ञानात वेगवेगळ्या पद्धतीने देता देईल. तसेच, आदर्शवादाचा ऐतिहासिक मागोवा दीर्घकाळापर्यंत मागे खेचता येवू शकतो. समाजामध्ये आदर्शवादाची गरज असते. कारण, आदर्शवाद लोकांना, समूहांना आणि व्यक्तींना लढण्याचे बळ देतो, नवे स्वप्ने पहायला शिकवतो, बदल घडविण्यास साह्यभूत ठरतो. तसेच, पुढे जाण्याची, दिशा ठरवण्याची आणि मार्ग दाखवण्याची भूमिका निभावतो. यामुळेच, जगभरात लोक जागतिक शांततेची चळवळ, युद्धविरोधी चळवळ, तापमानवाढ आणि हवामान संकटविरोधी चळवळ करत आहेत. या सगळ्या लोकांना संपूर्ण मानवजातीचे भविष्यविषयक चिंता वाटते. त्यांना लोकांचे भविष्य सुरक्षित करावयाचे आहे आणि त्यामुळे ते जगाच्या कान्याकोपऱ्यात झगडत आहे. आदर्शवादी असल्यामुळेच ते दीर्घपल्याच्या लढाईचे साथीदार आणि भागीदार होवू शकतात.

       आदर्शवादाची अत्यंत मोठी मर्यादा म्हणजे वर्तमानापेक्षा भविष्याकडे जास्त लक्ष असणे. जे आहे ते महत्वपूर्ण नाही आणि जे पाहिजे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे अशी भूमिका आदर्शवादात असते. त्यामुळे आदर्शवादी मनामध्ये जे आहे. त्याला काही किंमत नसते आणि जे नाहीये त्याला किमंत असते. पण, वास्तवात तर जे नाही ते नाहीच मग त्याला किमंत देवून काय अर्थ असा प्रश्न वास्तववादी लोक विचारतात. म्हणून, आदर्शवाद विरुद्ध वास्तववाद असा तात्विक पेचप्रसंग उद्भवू शकतो. ओशो यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘जो समाज आदर्शवादी बनेल, तो समाज सडून जाईल, मरून जाईल. समाज हा वास्तववादी असला पाहिजे. प्रतिभेचा विकास हा वास्तववादाने होतो. आदर्शवादाच्या मार्गाने नाही. जो आदर्शवादी असतो तो आकाशाच्या गोष्टी करतो, परंतु समस्या या जमिनीवरच्या आहेत.” त्यांनी ‘नये भारत की खोज या ग्रंथामध्ये ‘आत्मघाती आदर्शवाद नावाचा एक लेख लिहिला आहे. आत्मघातकी आदर्शवादामुळे भारताची वैचारिक प्रगती आणि ज्ञानात्मक प्रगती खुंटली असे त्यांनी म्हटले आहे. आदर्शवादामुळे मनुष्य हा आपल्यातील पशुत्वाला ‘सैद्धांतिक मुलामा, वैचारिक झालर घालतो. संक्षिप्तपणे असे म्हणू शकतो की, आदर्शवादाच्या नावाखाली मनुष्य अनेक गप्पा मारतो परंतु व्यवहारात त्याचे आचरण करत नाही कारण वास्तव पूर्णपणे वेगळे आहे.

      आदर्शवाद म्हणून जागतिक शांतता निर्माण झाली पाहिजे असे आपण म्हणतो. परंतु, जो युद्ध बाजार आहे तो थांबवण्यासाठी व्यवहारात बहुतेकवेळा काहीच करता येत नाही. काहीवेळा तर राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली जगभरात लोक मानवी हक्कांचेही बळी द्यायला तयार होतात. म्हणून, कधी कधी आदर्शवाद हा मानवी हक्कांचे संवर्धन आणि राष्ट्रीय सुरक्षा यामध्ये संकुचित होवून जातो. मात्र, आजही जगात, भारतात आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशा अनेक गोष्टी घडत आहे की, ज्या आजच्या वर्तमान स्थितीत नुसती वास्तववादी भूमिका घेतल्याने सुटणार नाहीत. त्यासाठी आदर्शवादी भूमिका घ्याव्याच लागतील. त्याशिवाय वर्तमानातील कोंडी फुटू शकत नाही. बाजारवाद आणि उपभोगवादामुळे संकुचित आणि स्वार्थी  व्यक्तिवाद वाढल्याने सुद्धा आदर्शवाद आज अनेकांना काल्पनिक वाटतो. परंतु, वर आदर्शाची चर्चा करतांना आपण पाहिले आहे की, समाजातील वर्ग, समूह, वेगवेगळे गट आणि स्तर यांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. तसेच, आदर्शवादाच्या बाबतीतही आपण म्हणू शकतो. उदा. नफाकेंद्री तंत्रज्ञान विकसित करणे आणि लोककेंद्री तंत्रज्ञान विकसित करणे, आरोग्याचे खाजगीकरण करणे आणि सार्वजनिक आरोग्याची मागणी करणे इत्यादी. अनेकांना हवामान बदल आणि पर्यावरणीय संकट हे काल्पनिक वाटत होते. परंतु, असे अनेक आदर्शवादी लोक पर्यावरण आणि हवामान यांचेही संतुलन आपण बिघडवत आहोत. त्यामुळे मानवी जीवन संकटात येईल म्हणून पर्यावरणीय न्याय आणि निसर्ग-मानवकेंद्री जगाचा आदर्शवाद बाळगून आहेत. मानवी जीवनाला सुखकर बनविण्यासाठी व्यवहारवाद आणि वास्तववाद पुरेसा नाही. समकालीन समस्या आणि प्रश्नांच्या जंजाळात माणूस भांबावून जातो. अडकून जाऊ शकतो म्हणून त्यातून बाहेर पाडण्यासाठी दिशांची आणि मार्गांची गरज असते. ती मात्र आदर्शवादच पुरवू शकतो.

आदर्शवादाची गरज

       आदर्शवादाच्या मर्यादांची आणि महत्वाची काहीशी चर्चा आपण वर केली आहे. आदर्शवादाला मर्यादा असल्या तरी आजच्या काळात आपल्या समाजाला आदर्श आणि आदर्शवादाची गरज आहे. पण, सातत्याने बदलत जाणाऱ्या आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या आदर्शांची आणि आदर्शवादाची गरज आहे. आपल्याकडे काही साचेबध्द, संकुचित आदर्श आहेत. स्त्री- पुरुष नातेसंबंध, लैंगिकता आणि लैंगिक संबंध या बाबत असलेले आपले जुने आदर्श मूल्ये आज दिशादर्शक नव्हे तर अडथळा बनत आहेत. कारण, त्यामध्ये प्रामुख्याने विभिन्न लिंगी आणि एकपती- एकपत्नी अशाच नात्यांचा विचार केला गेला आहे. क्वीर म्हणून घेणाऱ्या सगळ्यांना पारंपारिक आदर्शांच्या साच्यात बसवता येत नाही आणि त्यांना बसायाचेही नाही. म्हणून, जुन्या लैंगिक आणि नातेसंबंधांच्या आदर्शाला प्रश्नांकित करत नवीन आदर्श निर्माण केले पाहिजेत. त्यासाठी नवीन आदर्शवादाची गरज आहे. तसेच, आपल्या आजूबाजूला आणि जगभरात सर्वरंगीय आणि सर्वधर्मीय धर्मांधता डोके वर काढत आहे. तसेही, आपण वेगवेगळ्या धर्मभय आणि धर्मद्वेषाच्या वातावरणात राहतो. अशी वस्तुस्थिती असली तरी सर्व धर्मांमध्ये काही आदर्श सांगितले आहेत. त्यामध्ये वैश्विक बंधुत्व, प्रेम, द्या, करुणा, अपरिग्रह, दान, लोकसेवा अशा गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच, धर्म हा नैतिक शिकवण आणि आदर्शवादही देतो. धर्मांना धर्मांधतेच्या आणि धर्मद्वेषाच्या तावडीतून सोडवून मानवी कल्याणासाठी वापरता आले पाहिजे. या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर आपणास काही दिग्दर्शन करू शकतात. डॉ. आंबेडकर हे एका बाजूने पक्के धार्मिक होते आणि दुसऱ्या बाजूने सर्वधर्मचिकित्सकही होते. त्यांनी ‘प्रचलित धर्म आणि आदर्श धर्म अशी धर्माची विभागणी केली आहे. त्यांच्यामते प्रचलित धर्मात ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, या कल्पना असतात. पोथीनिष्ठा आहे, कर्मकांड आहे, श्रद्धेचे प्राबल्य आहे. माणसाचा ईश्वराशी संबंध आहे पण माणसा-माणसाचा संबंध गौण आहे. आदर्श धर्मात मात्र अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वर, आत्मा या बुद्धीच्या बळावर न टिकणाऱ्या गोष्टींना मुळीच स्थान नसेल. वैज्ञानिक दृष्टीकोनाशी सुसंगत असेल आणि नितीमूल्यांना ज्यात स्वयंभू आणि मध्यवर्ती स्थान असेल, ज्यात सामाजिक दु:खावर तोडगा असेल अशी आंबेडकरांची भूमिका होती. समाजाला धर्माची गरज आहे पण धर्मात जी अंधश्रद्धा आणि धर्मांधता घुसली आहे ती काढून धर्मातील मानवतावाद आणि नैतिक मूल्यांचा विस्तार झाला पाहिजे. समकालीन धर्मांच्या धर्मांध वास्तववादाला पर्याय म्हणून आदर्श धार्मिक मानवतावादाची कधी नव्हे एवढी आजच्या काळात निर्माण झाली आहे. आदर्शवादातूनच कृती करण्यास प्रेरणा आणि बळ मिळते आणि त्यातूनच बदल होतो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मर्ती वाढो|| भूता परस्पर जडो, मैत्र जीवांचे||  असा आदर्शवाद बाळगतो.


पूर्वप्रसिध्दी- पुरुषउवाच, दिवाळीअंक - २०२२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...