आधुनिक भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये महाराष्ट्रातील
ब्राह्मणेत्तर चळवळीने संपूर्ण देशभरात
प्रभाव पाडून अत्यंत महत्वाची भूमिका निभावली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला
राजकीय सवलतींचे हप्ते इंग्रजी सरकारने भारतीय जनतेला दिले. म्हणूनच, भारतातील राजकीय आणि सामाजिक चळवळींचे आणि नेतृत्वाचे समाजशास्त्र बदललेले
दिसते. महाराष्ट्रातील ब्राह्मणेत्तर चळवळीच्या पायाभरणीत आणि उभारणीत छत्रपती
शाहू महाराजांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. प्रस्तुत लेखामध्ये या दोन्ही
चळवळींच्या उभारणीत, जडघडणीत आणि विस्तारात छत्रपती शाहूंची
भूमिका कशी होती? या प्रश्नाची चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, तत्कालीन संदर्भ, वादविवाद
आणि परिस्थिती याचीही चर्चा करण्यात येणार आहे.
ब्राह्मणेत्तर चळवळीचा
अनेकवचनी इतिहास
महाराष्ट्रात बराच काळ सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेत्तर चळवळ वेगवेगळ्या
होत्या असे मानले जात होते. तसेच,
ब्राह्मणेत्तर चळवळ जातीयवादी चळवळ होती असेही जाणीवपूर्वक पसरवले गेले होते.
परंतु, मागील काही दशकांमध्ये सत्यशोधक आणि
ब्राह्मणेत्तर चळवळीवर इंग्रजी आणि मराठी भाषेत विपुलप्रमाणात संशोधन झाले आहे.
तसेच, वेगवेगळ्या भागातील सत्यशोधक आणि
ब्राह्मणेत्तर चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांचे साहित्य उपलब्ध होत आहे.
त्यामुळे सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेत्तर चळवळ या वेगवेगळ्या चळवळी नसून सत्यशोधक
चळवळ ही ब्राह्मणेत्तर चळवळीची जननी आहे[1] असे
स्पष्टपणे दिसून येते. सर्व सत्यशोधक ब्राह्मणेत्तर असले तरी सगळे ब्राह्मणेत्तर
हे सत्यशोधक नव्हते हेही आपणास दिसते.[2] कारण, काही ब्राह्मणेत्तर मंडळींच्या दृष्टीने सत्यशोधक चळवळ ही धार्मिक सुधारणा
चळवळ असून ब्राह्मणेत्तर चळवळ ही राजकीय हक्कांची चळवळ आहे. पण, ब्राह्मणेत्तर चळवळीचे प्रमुख नेतृत्व हे सत्यशोधकीयच होते.[3] १९५६
साली ‘महाराष्ट्रातील जातीभेदाचे स्वरूप’ या विषयावर
चर्चा झाली होती. त्यामध्ये काहींनी ब्राह्मणेत्तर चळवळ ही जातीयवादी चळवळ होती
असा काहीसा निष्कर्ष काढला होता. तत्पूर्वीही काहींनी असाच आरोप ब्राह्मणेत्तर
चळवळीवर केला होता. हा आरोप करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण पार्श्वभूमी
असलेले नेते आणि अभ्यासकच दिसतात. पु. ग. सहस्त्रबुदधेंनी तर असे म्हटले आहे की, “महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यापासून...महाराष्ट्रांत
हा वाद धुमसत आहे. कोल्हापुरास शाहू छत्रपती यांना अधिकारसूत्रे प्राप्त
झाल्यापासून...या वादाला जास्तच तीव्रता येऊ लागली.”[4] म. फुले
आणि छ. शाहू महाराजांच्या विचारांमुळे आणि ब्राह्मणेत्तर चळवळीमुळे ‘ब्राह्मण-
ब्राह्मणेत्तरवाद’ निर्माण झाला असा काहीसा निष्कर्ष
सहस्त्रबुद्धेंनी काढलेला आहे. म. फुले- छ. शाहू महाराज अशी भूमिका कोणत्या सामाजिक आणि ऐतिहासिक
स्थितीमुळे घेत होते याची मात्र त्यांनी चर्चा केलेली नाही. १९२१ साली झालेल्या
बेळगावच्या तिसऱ्या ब्राह्मणेत्तर परिषदेमध्ये धारच्या भाऊसाहेब पवार यांनी मात्र
ब्राह्मणेत्तर चळवळीच्या उद्याची पार्श्वभूमी आपल्या भाषणात मात्र वेगळीच सांगितली
आहे. त्यांनी म्हटले होते की, “ ब्राह्मणेत्तरांची
चळवळ अलीकडील दहापाच वर्षात सुरु झालेली नसून तिची मुळे मध्ययुगीन हिंदुस्थानच्या
काळापर्यंत खोल गेलेली आहेत. इंग्रजी शिक्षणाचा परिणाम आमच्या चळवळीस पोषक झाला.
जातीभेदाची शकले उडवून ब्राह्मणेत्तर लोकांना मानसिक व नैतिक गुलामगिरीतून मुक्त
करणे हेच सत्यशोधक समाजाचे आणि ब्राह्मणेत्तर चळवळीचे घ्येय आहे.”[5] ब्राह्मणेत्तर चळवळीमुळे जातीयवाद निर्माण झाला
असे काही ब्राह्मण विद्वान म्हणतात तर जातीभेदांचे उच्चाटन करण्यासाठी
ब्राह्मणेत्तर चळवळ निर्माण झाली असे ब्राह्मणेत्तर अभ्यासक म्हणतांना दिसतात.
सत्यशोधक-
ब्राह्मणेत्तर चळवळीने सामाजिक- राजकीय प्रतिक्रिया का दिली हे समजावून घ्यायचे
असेल तर आपणास अठराव्या शतकात धार्मिक सत्तेसोबत राजकीय आणि आर्थिक सत्तेचे
केंद्रीकरण ब्राह्मण वर्गाकडे झाल्यामुळे ब्राह्मणी वर्चस्वाचे दृढीकरण झाले कसे
झाले हे पहावे लागेल. अव्वल इंग्रजी काळातही ब्रिटीश भारतातच नव्हे तर देशी
संस्थांमध्येही ‘ब्राह्मण ब्युरोक्रसी’चे प्रभुत्व
होते. त्यामध्ये कोल्हापूर संस्थानही अपवाद नव्हते. १९१७ मध्ये शाहू महाराजांनी
मोंटेग्यू- चेम्सफर्ड समितीला जे निवेदन सादर केले होते. त्यामध्ये त्यांनी लिहिले
आहे की, ‘बहुसंख्यांकांच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात
खोडसाळपणा करणारे पाच बलाढ्य अक्राळविक्राळ राक्षस आपल्या भोवताली वावरतात याची
पुरेशी जाणीव या इलाख्यातील जनतेला झालेली आहे.’ ते पाच राक्षस पुढील प्रमाणे
होते- १. गावचा वतनदार कुलकर्णी २. गावातला ब्राह्मण सावकार ३. गावचा ब्राह्मण
शाळामास्तर आणि शहरातील त्यांचे प्राध्यापक बंधू ४. ब्राह्मणी नोकरशाही आणि शेवटी
म्हणजे ५. गावचा भटजी.[6] धार्मिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, आर्थिक आणि शैक्षणिक
सर्वच क्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रभर ब्राह्मणांचे वर्चस्व आणि प्रभुत्व
होते. त्याला प्रतिक्रिया म्हणून सामाजिक – धार्मिक क्षेत्रात सत्यशोधक चळवळ आणि राजकीय-
आर्थिक क्षेत्रात ब्राह्मणेत्तर चळवळ उदयाला आली. त्यामुळे ब्राह्मणेत्तर चळवळ
जातीयवादी चळवळ होती असे म्हणणे अनैतिहासिक ठरते.
ब्राह्मणेत्तर
चळवळीने नुसते फक्त जातींच्या प्रश्नाला प्राधान्य दिले नाही तर शिक्षण, सहकार, शेती, कला अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरीव काम केले आहे. काहींनी तर ब्राह्मणेत्तर
चळवळ ही शेतकऱ्यांची चळवळ होती असेही म्हटले आहे आणि म्हणूनच दिनकरराव जवळकरांनी
ब्राह्मणेत्तर पक्षाचे नाव शेतकरी पक्ष करावे असेही सुचविले होते.[7] ब्राह्मणेत्तर
चळवळीने सांस्कृतिक आणि आर्थिक मुद्दे हे वेगवेगळे असतात असे कधीही मानले नाही
उलटपक्षी दोन्हीमधील परस्परसंबंध आणि त्यातील गुंतागुंतच पुढे आणली. सत्यनारायण, धार्मिक अंधश्रद्धा, अडाणीपणा, निरक्षरता आणि दारिद्र्य यातून कर्जबाजारीपणा वाढतो अशीच भूमिका
ब्राह्मणेत्तर चळवळीने घेतली. आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्यांचे परस्परसंबंध आणि
त्यातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी सातारा दंगा (१९१९-२१) ही घटना अत्यंत
महत्वाची आहे[8].
विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात छ. शाहू महाराज आणि इतर सत्यशोधकांनी सातारा
जिल्ह्याचे दौरे काढले. त्यामुळे खेड्यामधून सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन
झाल्या आणि अनेक ब्राह्मणेत्तर परिषदा झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये
जागृती झाली आणि १९१९ च्या एप्रिल पासून दोनवर्षापर्यंत अराजकी पद्धतीने दंगा सुरु
राहिला.[9]
दंग्याविषयी तत्कालीन जिल्हाधिकारी मॉयसे याने असे म्हटले आहे की, “ ब्राह्मणांच्या विरुद्ध गुन्हे केले आहेत हे नाकारण्याची माझी अजिबात
तयारी नाही. परंतु चौकशीमधून मिळालेल्या अनुभवातून असे दिसते की, जे हिंसाचार झाले ते त्यांच्याविरुद्ध ब्राह्मण म्हणून केले नसून, बदनाम
जमीनदार किंवा सावकार म्हणून केले गेले आणि गावातील ज्या ब्राह्मणांच्या विरुद्ध
काही तक्रारी नव्हत्या अशांना शांततेने राहू देण्यात आले. यापूर्वी असलेल्या
रीतीनुसार एकूण उत्पन्न २/३ अथवा ३/४ भाग खंड देण्याऐवजी १/२ पेक्षा जास्त खंड
द्यावयाचा नाही, अशी चळवळ वाढत आहे. बहुतेक जमीन न कसणारे
जमीनदार ब्राह्मण असल्याने त्यांना असे वाटते की, ही चळवळ आणि त्यामुळे तयार होणारा बहिष्कार हा त्यांच्याविरुध्द वापरला
जाईल.”[10]
बेळगाव
प्रांतात श्यामराव देसाईंनी ग्रामीण भागात शेतकरी सभेसोबत प्रत्येक खेड्यात
‘पंचमंडळी’ नावाची न्यायदान करणारी समिती स्थापन केले.
सोबतच, ‘श्री. तुकाराम महाराज परस्पर साह्यकारी
मंडळी लि.’ आणि ‘दि मराठा को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.’ स्थापन केल्या.[11] विदर्भात
आनंद स्वामी आणि पंढरीनाथ पाटील यांनी ब्राह्मणेत्तर पक्षाच्या माध्यमातून लाखो
शेतकऱ्यांच्या सभा घेतली आणि सावकारांच्या शोषणाला वाचा फोडली.[12]
इतिहासाचा हा सर्व पट पाहिला तर ब्राह्मणेत्तर चळवळीने जातीयवाद वाढवला असे
म्हणण्याला काहीही अर्थ राहत नाही. उलटपक्षी असे म्हणावे वाटते की, ब्राह्मणेत्तर चळवळीने मागास जाती, शेतकरी वर्ग यांचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्न हाती घेवून राजकारणाचे लोकशाहीकरण केले. यामध्ये छत्रपती
शाहू महाराज यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे.
ब्राह्मणेत्तर
चळवळीची मोर्चेबांधणी: १. शैक्षणिक-सामाजिक जागृती आणि ब्राह्मण ब्युरोक्रसीशी झगडा
बहुतेकवेळा
अभ्यासकांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन करतांना दोन कालखंड
कल्पिलेले दिसतात. त्यामध्ये १८९४ ते १९०१-०२ हा पाहिला आणि १९०२ ते १९२२ हा दुसरा
कालखंड. अशा प्रकारच्या विभाजन कल्पनेमागे असाही एक तर्क आहे की, जर वेदोक्त प्रकरण उद्भवले नसते तर छ. शाहू महाराज सत्यशोधक, ब्राह्मणेत्तर चळवळीकडे वळले नसते. तसेच, त्यांनी सामाजिक कार्यही केले नसते. परंतु, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. कारण, कोल्हापूर संस्थानाच्या गादीवर त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर एक- दोन
वर्षातच त्यांनी आपल्या शासनव्यवस्थेतील अभिजनांच्या वर्चस्वाला शह देण्यास आरंभ
केला होता. त्यामधूनच भास्करराव जाधव, दाजीराव
अमृतराव विचारे, रघुनाथ सबनीस इत्यादी ब्राह्मणेत्तर
व्यक्तींना त्यांनी महत्वाची पदे दिली होती.[13] यातून
एकच गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे वेदोक्तपूर्वीच छ. शाहू महाराजांनी आपल्या
संस्थानात काही सामाजिक बदल करायला सुरुवात केली होती. त्याला वेदोक्त प्रकरणाने
मोठी गती दिली.
वेदोक्त
प्रकरणाने सामाजिक घुसळण झाली आणि कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात छ.
शाहू विरुद्ध लो. टिळक असे नवे राजकारणही आकारास आले. दुसरीकडे शाहू महाराजांनी
अनेक महत्वाची कामे केली. त्यामध्ये आपल्या संस्थानात नोकरीसाठी ५०% राखीव जागा मागासलेल्या
जातींसाठी ठेवण्याचा आदेश काढला. निरनिराळ्या जातींसाठी विद्यावृद्धी आणि
ज्ञानार्जनासाठी वसतिगृह काढली. त्यामध्ये मराठा बोर्डिंग, जैन बोर्डिंग, प्रिन्स शिवाजी अनाथ बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, प्रभू
बोर्डिंग, नामदेव बोर्डिंग, अस्पृश्यांचे मिस क्लार्क होस्टेल, मांगांचे बोर्डिंग, रोहिदास
बोर्डिंग[14],
मुस्लीम बोर्डिंग[15]
अशा जवळपास 20 वसतिगृहे होती. त्यासाठी इमारती, खुल्या जागा, कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून
देऊन गरीब विद्यार्थ्यांची चोख व्यवस्था केली. वसतिगृह ही लोकचळवळ उदयास आली.
महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, कला आदी क्षेत्रांतील चळवळीचे नेतृत्व कोल्हापूरच्या वसतिगृहांनी घडवल्या.
तसेच, ब्राह्मणेत्तरांची उच्च शिक्षणाने विभूषित
पहिली पिढी घडविण्यात या वसतिगृहांचा वाटा मोलाचा ठरला.[16]
वसतिगृह
चळवळीप्रमाणेच सत्यशोधक समाज आणि आर्य समाजाला प्रोत्साहन देणे, मागासलेल्या जातींसाठी नोकऱ्या आणि शिक्षणाची व्यवस्था करणे, जाचक कायदे घालवून नवीन कायदे करणे या सगळ्यांमुळे छ. शाहू महाराजांची
प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर समाजाचा उद्धारक राजा अशी बनली. परंतु, यामुळे ब्राह्मण वर्गाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक वर्चस्वाला आणि हितसंबंधांना धक्का
बसत असल्यामुळे ‘ब्राह्मण ब्युरोक्रसी’ने शाहू महाराजांची बदनामी करायला सुरुवात केली. महाराजांनी ब्राह्मणी
जुलूमशाही मोडून काढण्यासाठीच सत्यशोधक समाज (१९११) आणि आर्य समाज (१९१८) राजाश्रय
दिलेला दिसतो. छ. शाहू महाराज हे सत्यशोधक होते की, आर्य समाजी होते, या मुद्यांवर बरीच चर्चा आणि वादविवाद झालेले आहेत.
दोन्ही बाजूंचे अभ्यासक आपल्या मताच्या समर्थनार्थ अनेक पुरावे सादर करून आपली
बाजू बळकट करतात.[17]
महाराजांनी जाहीरपणे मी आर्य समाजी आहे आणि सत्यशोधक नाही असे म्हटले असले तरी हा
त्यांचा राजकीय चाणाक्षपणा होता असेही म्हटले जाते. कारण, सत्यशोधक जलाशांमधून ब्राह्मणशाहीचे दंभस्फोट करणारे जहाल कार्यक्रम सादर
केले जात होते. याचा थेट परिणाम ब्राह्मणेत्तर समाजावर होत होता. खेड्यापाड्यांतून
ब्राह्मणविरोधी वातावरण तयार होत होते. ब्राह्मणांच्या जमिनी खंडाने कसण्यास नकार
देणे, कोणास त्या करू न देणे, ब्राह्मण भटास धार्मिक विधीस न बोलावणे अशा अनेक घटना घडू लागल्या. अशा
प्रसंगांच्या बातम्या ब्राह्मणी वृत्तपत्रात ‘ सत्याशोधाकांचे अत्याचार’ अशा भडक शब्दांत प्रसिद्ध केल्या जाऊ लागल्या... हे जेथे जेथे घडत होते, तेथे तेथे कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा या सत्याशोधकांना पाठींबा
असल्यामुळे हे घडत आहे, असा एकाच गिल्ला महाराष्ट्रातील ब्राह्मणी वृत्तपत्रे
सातत्याने करीत होती.[18]
ब्राह्मणेत्तर चळवळीची मोर्चेबांधणी: २. जलसे
आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ‘ब्राह्मणेत्तरी संभाषिता’ची निर्मिती
शाहू
महाराजांनी साताऱ्यात दौरे काढून सत्यशोधक समाजाच्या शाखा गावोगावी काढण्यासाठीची
वातावरण निर्मिती केली होती असे आपण वर पाहिले आहे. सातारा दंग्याची पार्श्वभूमी
निर्माण करण्यात सत्यशोधक जलश्यांनी केलेली शेतकरी जागृती महत्वाची होती. भाऊराव
पाटलांनी सत्यशोधक जलशाचे ५/६ संच उभे केले. आज या तर उद्या त्या संचाबरोबर
त्यांनी काम करत आख्खा महाराष्ट्र पालथा घातला. दक्षिणेकडील बेळगाव ते उत्तरेकडील
नागपूर पादाक्रांत केले.[19] सत्यशोधक
जलशांनी फार मोठ्या प्रमाणात रान उठवले. खरेखुरे लोकशिक्षण या जलशांनी केले. सर्व
जलशांमधून सामाजिक सुधारणांवर भर देणाऱ्या लावण्या, पोवाडे व कवने म्हटली जात.[20] तसेच, या जलशांनी भटभिक्षुकशाहीवर हल्ला केला. सावकार, वतनदार या वर्गावर प्रखर हल्ले चढविले, अंधश्रद्धा आणि अनिष्ट सामाजिक प्रथा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले.
सर्व प्रकारच्या सामाजिक भेदभावाला विरोध केला.[21]
म्हणून, ठिकठिकाणी ब्राह्मण मंडळीनी सत्यशोधक-
ब्राह्मणेत्तर कार्यकर्त्यांवर खोटेनाटे खटले भरले. अशावेळी छत्रपती शाहू
महाराजांनी सत्यशोधक- ब्राह्मणेत्तर जलसाकारांना मदती केल्या. सत्यशोधक प्रचार
जलशांचा जोर वाढला होता. त्यामधून ब्राह्मण- ब्राह्मणेत्तर दंगली वाढत होत्या. या
सर्व घटनांमुळे उच्चवर्णीय नेते आणि वृत्तपत्रे अस्वस्थ आणि असहाय झाली होती. या
दंगली थांबविण्यासाठी त्यांनी ब्रिटीश सरकार खूप दडपण आणले होते. नोकरशाहीत
ब्राह्मणांचे वर्चस्व असल्यामुळे ब्रिटीश सरकार छत्रपती शाहूंना सत्यशोधक चळवळीवर
कारवाई करण्यासंबंधी दबाव आणि दडपण आणत होते. त्यामुळे छ. शाहू महाराज आपण
सत्यशोधक नाही; आपला चळवळीशी काडीचाही संबंध नाही असे सांगत
होते.[22]
ब्राह्मण मंडळी आपल्या विरोधात प्रचार
करण्यासाठी वृत्तपत्रांचा जोरदारपणे वापर करत आहेत याची जाणीव छ. शाहू महाराजांना
झाली होती. परंतु, १९१५-१६ नंतरच्या काळखंडात महाराजांनी
टिळकांच्या होमरूल चळवळीला जाहीरपणे विरोध करायला सुरुवात केली. तसेच, मागासवर्गीयांसाठी कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी स्वतंत्र
मतदारसंघाच्या मागणीची चळवळ उभारली आणि बहुजन समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी
म्हणून जातींच्या परिषदांमध्ये उघडपणे भाग घ्यायला सुरुवात केल्यावर ब्राह्मणी
टिळकपंथीय वृत्तपत्रांनी सत्यशोधक, ब्राह्मणेत्तर चळवळींवर आणि महाराज व त्यांच्या
राजपरिवारावर कडाडून हल्ला करायला सुरुवात केली. महाराजांची वैयक्तिक
निंदानालस्तीची मोहीमच या वृत्तपत्रांनी उघडली. या पार्श्वभूमीवर ब्राह्मणेत्तर
समाजाची बाजू मांडणाऱ्या आणि ब्राह्मण ब्युरोक्रसीच्या विरोधात बहुजन समाजाला
जागृत करणाऱ्या ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रांची निकड अधिक भासू लागली. वृत्तपत्र हे
समाजप्रबोधनाचे तसेच जनमत तयार करण्याचे एक प्रभावी साधन आहे याची जाणीव
महाराजांना झालेली होती. म्हणूनच, त्यांनी
बहुजन समाजातील अनेक व्यक्तींना वृत्तपत्रे काढण्यासाठी प्रोत्साहन दिले.[23]
सत्यशोधक मताचा आणि ब्राह्मणेत्तर पक्षाचा पुरस्कार करणाऱ्या डेक्कन रयत, विजयी मराठा, राष्ट्रवीर, जागरूक, दीनमित्र, विश्वबंधु, सत्यप्रकाश, शिवछत्रपती, संजीवन, मूकनायक, दीनबंधू, जागृती, मजूर, जस्टीस, तरुण मराठा, कैवारी वगैरे वृत्तपत्रांना त्यांनी वेळोवेळी पैशांची मदत केली.[24]
यासंबंधी भाष्य करतांना य. दि. फडके म्हणतात की, ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रांच्या अर्थकारणाचा विचार करतांना राजर्षी शाहू
छत्रपतींनी त्यांच्या संस्थानचे उत्पन्न मर्यादित असतांनाही ब्राह्मणेत्तर मालक-
संपादकांना उदार हस्ते जी पैशाची मदत केली ती बहुमोल ठरली.[25] छ.
शाहू महाराजांनी वेळप्रसंगी ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रांमध्ये (जागरूक आणि विजयी
मराठा) सुरु झालेल्या यादवी युद्धात हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांना आपापल्या
तलवारी म्यान करण्यासही सांगितल्या. कारण, त्यांना वाटत होते की,
ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रांच्या अंतर्गत झगड्यामुळे ब्राह्मणेत्तर चळवळीलाच धोका
निर्माण होईल.[26]
विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी वृत्तपत्र सृष्टीवर ब्राह्मणांची मक्तेदारी
होती. ती छ. शाहू महाराजांनी संपुष्टात आणून वृत्तपत्र सृष्टीत ब्राह्मणेत्तरी
दृष्टीकोन निर्माण केला. त्यामुळेच, संपूर्ण
मराठी प्रदेशात सत्यशोधक – ब्राह्मणेत्तरी संभाषिताचा प्रसार झाला.
ब्राह्मणेत्तर चळवळीची मोर्चेबांधणी: ३.
राजकीय सुधारणा, होमरूल आणि मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वाचा लढा
१९१४
मध्ये पाहिले जागतिक महायुद्ध सुरु झाले होते. त्यावेळी कॉंग्रेसवर मवाळ नेत्यांचे
वर्चस्व होते. याचवर्षी लो. टिळकांची सुटका झाली आणि त्यांचे देशभर स्वागत झाले.
कॉंग्रेस अंतर्गत जहाल आणि मवाळ गटांचा समेट व्हावा म्हणून डॉ. अॅनी बेझंट प्रयत्न
करत होत्या. दरम्यान, १९१५ साली मवाळ नेते गोपाळकृष्ण गोखले आणि
फिरोजशहा मेहता हे कालवश झाले. लो. टिळकांनी मग कॉंग्रेसवर जहालांचे वर्चस्व
स्थापन केले. १९१६ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लीम लीगने साम्राज्यवादी सरकारविरोधात
युती करून राजकीय सुधारणांची एकमुखी मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुंबई इलाख्यात
लो. टिळकांनी होमरूल चळवळ सुरु केली. या चळवळीमुळे सर्व देशभरात ब्रिटीश सरकार
विरोधात असंतोष वाढत होता म्हणून ऑगस्ट १९१७ मध्ये भारतमंत्री माँटेग्यू यांनी राजकीय सुधारणांची घोषणा केली. राजकीय
सुधारणांमुळे साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्य देण्यात येणार होते म्हणूनच भारतीय
समाजातील सर्वच स्तरांनी याकडे गांभीर्याने पहायला सुरुवात केली. कारण, राजकीय सुधारणेमुळे मिळणारे हक्क हे भारतातील gaveप्रमुख राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेसला मिळतील आणि कॉंग्रेसमध्ये
ब्राह्मणांचा भरणा आहे म्हणून राजकीय हक्क ब्राह्मणांना मिळतील. त्यामुळे ब्राह्मणशाही
अधिक प्रबळ बनेल आणि ब्राह्मणेत्तर समाजाच्या प्रगतीस अडथळा ठरेल. तसेच, होलरूल चळवळ ही ब्राह्मणांचे प्राबल्य कायम ठेवण्यासाठीच सुरु करण्यात आली
आहे, असे ब्राह्मणेत्तरांना वाटू लागले. या सर्वांचा परिणाम
म्हणून १९१६ साली महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तरी राजकीय चळवळ सुरु झाली.[27] याच
वर्षी अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, वालचंद
कोठारी, सी. के. बोले इत्यादी पुढाऱ्यांनी ‘डेक्कन रयत असोशिएशन’ या संघटनेची स्थापना केली होती.[28] ब्रिटीश
सरकारशी निष्ठा कायम ठेवून मागासलेल्या वर्गांच्या हक्कांचे व हितसंबंधांचे
संरक्षण करण्याकरिता आणि त्या योगाने देशहित साधण्याकरिता प्रयत्न करणे हे या
संघटनेचे जाहीर धोरण होते. पुढे लवकरच भास्करराव जाधव, श्रीपतराव शिंदे यांनी ‘ऑल इंडिया मराठा लीग’ ही एक संघटना स्थापन झाली. भारताच्या भावी कायदेमंडळात ब्राह्मण प्रतिनिधींचे
प्राबल्य न राहता ब्राह्मणेत्तर समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्थान
मिळावे यासाठी लोकजागृतीची मोहीम सुरु केली होती.[29]
हप्त्याहप्त्याने स्वराज्य देण्याची योजना आखण्यासाठी भारतमंत्री भारतात
नोव्हेंबर-डिसेंबर, १९१७ मध्ये आले तेव्हा ‘डेक्कन रयत समाजा’च्या वतीने कोठारी, लठ्ठे, भास्करराव जाधव, बोले असे चौघे नेते
भारतमंत्री माँटेग्यू व व्हाईसरॉय चेम्सफर्ड यांना भेटण्यास मुंबईस गेले होते.
प्रांताचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती असावा व मागासलेल्या वर्गांना स्वतंत्र
प्रतिनिधी द्यावेत असे त्यांनी निवेदन सादर केले.[30] याच
महिन्यात छ. शाहू महाराजांनीही भारतमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत अस्पृश्य
वर्गासह सर्व ब्राह्मणेत्तर समाजास स्वतंत्र मतदार संघ दिले गेले पाहिजेत ही मागणी
असता त्यांनी म्हटले होते,
“हिंदुस्थानात सक्तीचे प्राथमिक शिक्षण अग्रक्रमाने देणे आवश्यक आहे. जर स्वराज्य
यशस्वी व्हावयाचे असेल तर जातीभेद नष्ट झाले पाहिजेत. एवढेच नव्हे तर आंतरजातीय
विवाह झाले पाहिजेत. नाहीपेक्षा स्वराज्य ही मूठभर लोकांची मिरास होईल, अशी भीती वाटते.”[31]
भेटीत महाराजांनी एक निवेदनही दिले. त्यात शाहू महाराज लिहितात की, “...आगामी निवडणुकांसाठी होणारी मतदानाची व्यवस्था एखाद्या युरोपियन
संस्थेच्या नियंत्रणाखाली असावी. तिनेच त्यासंदर्भातील देखरेख करावी...मतदानावर
पडणारा ब्राह्मणी प्रभाव इतका मोठा असतो की आपले मत ब्राह्मणेत्तरांना देऊ
इच्छिणाऱ्या अनेकांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणे खरोखर खूपच अवघड होऊन बसते.
त्यांच्या डोक्यावर अनेक मार्गांनी आघात केले जातात. सूडबुद्धीचा अनुभव भरपूर
येतो. तिच्या भयाखाली दडपून जाणारे मतदार नक्कीच बिचकतात आणि प्रामाणिकपणे, निर्भयपणे होणाऱ्या मतदानाचा गळा घोटाळा जातो... आज ब्राह्मणांच्या हातात
सारी वृत्तपत्रे, सारी व्यासपीठे आहेत. हरिदास व पुराणिक
निव्वळ त्यांची स्वतःचीच माणसे आहेत. त्यांना हवा असलेला सर्व प्रचार या अतिशय
प्रभावखाली घटकांमार्फत होत असतो. मागसाकडे तसे एखादे हत्यार नाही.”[32]
भारतमंत्रीच
नव्हे तर गव्हर्नर जनरल, गव्हर्नर
आणि इतर वरिष्ठ इंग्रज अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सर्व मागासवर्गांना स्वतंत्र
मतदार संघ दिले गेले पाहिजेत, या मागणीचा
शाहू महाराज सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्याचबरोबर ब्राह्मणेत्तरांच्या सभा-
परिषदांमधून आपली भूमिका ते समाजासमोर मांडत होते. अखिल भारतीय मराठा शिक्षण
परिषदेच्या अधिवेशनात ते म्हणाले की, “जर हल्लीची
जातीव्यवस्था कायम राहिली तर ज्या रीतीने हल्ली स्वराज्याचा अर्थ समजला जातो, ते स्वराज्य मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाणे हे होय! याचा अर्थ मी
स्वराज्याच्या चळवळीच्या विरुद्ध आहे असे समजावयाचा नाही, हे पुन्हा मी एकवार सांगतो. आम्हाला स्वराज्य पाहिजेच. जातीभेदापासून
होणारे अनिष्ट परिणाम नाहीसे होईतोपर्यंत, हल्लीच्या प्रंसगी आपणास ब्रिटीश
सरकारचा आश्रय व मार्गदर्शकता यांची जरुरी आहे. सत्ता केवळ अल्पसंख्याक
उच्चवर्गीयांच्या हातात जाण्यास स्वराज्याचे पर्यवसान होऊ नये, म्हणून निदान दहावर्षापर्यंत तरी आम्हाला जातवार प्रतिनिधित्व निवडून
देण्याचा हक्क असला पाहिजे. यामुळे आमचे हक्क काय आहेत, याचे आम्हाला शिक्षण मिळेल. एकवार ते आम्हाला समजले, म्हणजे जातवार प्रतिनिधित्वाची जरुरी राहणार नाही.”[33]
ब्रिटीश
संसद राजकीय सुधारणा विषयक काही भूमिका घेणार आहे म्हणून इंग्लंडमधील विरोधी पक्ष
असलेल्या मजूर पक्षाने १९१७ मध्येच एक परिषद आयोजित केली होती.[34]
त्यावेळी, राजकीय सुधारणेच्या प्रक्रियेत मागासवर्गीय
जनतेच्या हिताचे आणि हक्कांचे नुकसान होवू नये म्हणून छ. शाहू महाराजांनी आपली
बाजू ब्रिटीश संसदेपुढे मांडण्यासाठी भास्करराव जाधवांना इंग्लंडला पाठवले.[35]
ब्रिटीश संसदेतील विरोधी पक्षांच्या माध्यमातून भारतातील मागासवर्गीयांच्या
हक्कांचे आणि हितसंबंधांचे रक्षण प्रयत्न त्यावेळी केला गेला असावा असे दिसते. सगळ्या
बाजूंनी छ. शाहू महाराजांनी तयारी केली होती असे आपण म्हणू शकतो. तरीही, २३ डिसेंबर १९१९ मध्ये ‘गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट’ पास करतांना ब्रिटीश
सरकारने ब्राह्मणेत्तरांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी स्वीकारली नाही. परंतु, कायदेमंडळात काही जागा राखीव ठेवण्याची तरतूद मात्र केली. त्यामूळेच, १९२०
च्या कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या. सी. के. बोले, आनंदराव सुर्वे,
कीर्तिवानराव निंबाळकर, गंगाजी
काळभोर, पांडुरंग जाधव, दाजीराव विचारे इत्यादी ब्राह्मणेत्तर मंडळी मुंबई कायदेमंडळात गेली तर
आण्णासाहेब लठ्ठे व केशवराव बागडे केंद्रीय कायदेमंडळावर निवडून आले.[36]
बहुतेक ठिकाणची जिल्हाबोर्डे आणि म्युनिसिपालिट्या ब्राह्मणेत्तर प्रतिनिधींच्या
हातात आल्या. जिल्हा स्कूल बोर्डाचा कारभारही सरकारी अधिकाऱ्यांच्या हातून
लोकप्रतिनिधींच्या हातात आला. त्यामुळे लायक ब्राह्मणेत्तर शिक्षकांना स्कूल
बोर्डात नोकऱ्या मिळाल्या व ट्रेनिंग कॉलेजात प्रवेश मिळाला[37]
यामुळे कायदेमंडळातील आणि प्रशासनातील ब्राह्मणी मक्तेदारीला काहीसा धक्का बसला.
१९१९ ते
१९२१ या कालखंडात छ. शाहू महाराजांचे मद्रासच्या ब्राह्मणेत्तर चळवळीचे नेते डॉ.
माधवन नायर, सर पी. त्यागराज चेटी, सी. नटेश मुदलियार, सर शंकरन
नायर आदी नेत्यांशी घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले होते.[38] कर्नाटकात
१९१९ ते १९२१ या काळखंडात तीन ब्राह्मणेत्तर परिषदा भरल्या.[39]
हुबळी येथील पहिल्या कर्नाटक ब्राह्मणेत्तर परिषदेत अखिल भारतीय पातळीवर
ब्राह्मणेत्तरांना जागृत आणि संघटीत करण्याचा मानस या निमित्ताने जाहीर करण्यात
आला. म्हणूनच, काशीनाथ कावळेकर म्हणतात की, “ शाहू महाराजांच्या सक्रीय सहाय्यामुळे साऱ्या भारतात ब्राह्मणेत्तर
चळवळीचा झेंडा फडकू लागला. तिचा झालेला प्रसार हे महाराजांचे एक लक्षणीय योगदानाच
ठरते. त्याला जोडूनच मॉन्टफर्ड सुधारणांच्या
संदर्भातील त्यांच्या योगदानाला तितकेच महत्व द्यायला हवे. भारतातील ब्राह्मणेत्तर
चळवळीला वगळून, तिच्याकडे डोळेझाक करून मॉन्टफर्ड सुधारणांबद्दल खल करता येणार
नाही. कारण ब्राह्मणेत्तर चळवळीने जोर धरला म्हणूनच जातवार प्रतिनिधित्वाला
प्राधान्य मिळून त्याने आकार घेतला.”[40]
निष्कर्षात्मक नोंदी
आधुनिक महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाच्या
स्थापनेपासूनच ब्राह्मणेत्तरी चळवळ सुरु झालेली असली तरी तिची मुळे ही मध्ययुगीन
इतिहासात आणि सामाजिक, धार्मिक व आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणात
आहेत. म. जोतीराव फुल्यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णराव
भालेकर, धोंडीराम कुंभार इत्यादी मंडळींनी सत्यशोधक
चळवळ चळवळी पण पुढील काळात ही चळवळ काहीशी कमकुवत आणि असंघटीत झालेली होती. तीला
पुन्हा संघटीत, प्रभावी आणि आक्रमक बनविण्यात छ. शाहू
महाराजांची भूमिका आहे. सामाजिक-धार्मिक असलेल्या सत्यशोधक चळवळीला छ. शाहू
महाराजांनी काहीसे राजकीय रूपही दिले. त्यामुळेच पुढे त्यातून ब्राह्मणेत्तर
चळवळीचा आणि पक्षाचा उदय झाला. छ. शाहू महाराजांनी ब्राह्मणेत्तर चळवळीला आर्थिक, राजकीय आणि नैतिक बळ पुरविले म्हणूनच ही चळवळ बळकट आणि प्रभावी होवू शकली.
त्यामुळेच असेही म्हटले जाते की, छ. शाहू
महाराजांनी महराष्ट्रातील ब्राह्मणेत्तर चळवळीलाच आधार दिला नाही तर त्यांनी अखिल
भारतीय ब्राह्मणेत्तर चळवळीला गतिमान केले. उत्तरभारत आणि दक्षिण भारतातील लोकांना
ब्राह्मणेत्तर चळवळीशी जोडून घेतले. स्वराज्यामध्ये मागासवर्गीय जनतेला प्रतिनिधित्व
नसले तर त्याला स्वराज्यच म्हणता येत नाही अशी भूमिका घेवून त्यांनी राष्ट्रवादी
चळवळीवर असलेल्या अल्पसंख्याक उच्चवर्गीय
लोकांच्या मक्तेदारीला प्रश्नांकित केले.
म्हणूनच, पुढील काळात म्हणजे १९२० च्या दशकानंतर
कॉंग्रेसचे आणि एकूणच भारतीय राजकारणाचे समाजशास्त्रही अमुलाग्र पद्धतीने बदलले.
ब्राह्मणेत्तरांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे, अस्पृश्यांचे आणि स्त्रियांचे प्रश्न हे
नुसते सामाजिक राहिले नाहीत तर ते राजकीयही झाले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये छ.
शाहू महाराजांच्या भूमिकेचे आणि कृतीचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. म्हणूनच,
सामाजिक लोकशाही आणि पर्यायाने राजकीय लोकशाहीची मुहूर्तमेढ करणारा दृष्टा नेता
म्हणून छ. शाहू महाराजांची स्मरण करणे अगदी योग्य ठरते.
[1]
रमेश
जाधव, शाहू छत्रपती आणि सत्यशोधक चळवळ, रमेश जाधव
(संपा.), राजर्षी शाहू गौरव ग्रंथ,
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, मुंबई,
२०१६, पृ.
९११
[2]
य. दि.
फडके, विसाव्या शतकातील महाराष्ट्र- खंड – २, श्रीविद्या, १९८९,
पुणे, पृ. २५४
[3]
जयसिंगराव पवार,
मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, २०१९, कोल्हापूर, पृ. १६५
[4]
पु.
ग. सहस्त्रबुद्धे, भारतीय लोकसत्ता, मेसर्स जोशी आणि लोखंडे प्रकाशन,
पुणे, १९५४, पृ. ३२९
[5]
ए. के. घोरपडे,
कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती- चरित्र व कार्य, डी. वाय. पाटील
शैक्षणिक प्रतिष्ठाण, पुणे, व्दितीय आवृत्ती, १९९८, पृ. १०९-१०
[6]
रमेश जाधव (संपा.), राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, मुंबई, २०१६, पृ. ११०९-१०
[7]
सदानंद
मोरे, द्वितीयावृत्ती प्रस्तावना, ब्राह्मणेत्तर चळवळीतील धडाडीचे
कार्यकर्ते दिनकरराव जवळकर समग्र वाङमय, नाग नालंदा प्रकाशन,
इस्लामपूर, २०१३, पृ. १६
[8]
प्रवीण चव्हाण,
राष्ट्रवाद आणि सातारा जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळ, अप्रकाशित एम.
फिल लघुप्रबंध, इतिहास विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे, २००१,
पृ. ९७
[9]
गेल
ओम्व्हेट, वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड, पी. डी. दिघे
(अनु,), पुणे, १९९५, पृ. २२७
[10]
लेजिस्लेटिव्ह
कौन्सिल डिबेट, १९२१, पृ. ५६२-६८
गेल ऑमव्हेट,
कित्ता, पृ. २२९ आणि प्रवीण चव्हाण, कित्ता, पृ. ९७-९८ वर उद्धृत
[11]
जयसिंगराव
पवार(संपा.), राष्ट्रवीर शामराव देसाई- जीवन आणि कार्य, महाराष्ट्र
इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर, २०१६, पृ. ३१- ३३
[12]
उत्तमराव
मोहिते, जागतिक कृषकक्रांतींचा विधाता- लोकनेता डॉ. पंजाबराव देशमुख,
भाग्यरेखा देशमुख, अमरावती, १९८३ पृ. १६९
[13]
पूर्वोक्त,
शाहू छत्रपती आणि सत्यशोधक चळवळ, पृ. ९०४
[14]
श्रीपतराव
शिंदे, राजर्षी श्रीशाहू छत्रपती यांचे संक्षिप्त जीवन- चरित्र,
जयसिंगराव पवार, विजयराव मा. शिंदे (संपा.), राजर्षी शाहू दर्शन,
विजयी मराठा प्रकाशन, कोल्हापूर, २०११, पृ. ९०
[15]
जयसिंगराव
पवार, राजर्षी शाहू महाराज, मुस्लीम समाज आणि उत्क्रमणशील
धर्मविचार, रमेश जाधव (संपा.), राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र
राज्य शिक्षण विभाग, मुंबई, २०१६, पृ. ७४४
[16]
जयसिंगराव
पवार, लोकोत्तर राजा!, लोकरंग पुरवणी, लोकसत्ता, १
मे २०२२
[17] पूर्वोक्त, जयसिंगराव पवार, मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू
छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, पृ. १४८
[18]
कित्ता,
पृ. १५२
[19]
काशीनाथ कावळेकर,
श्री शाहू महाराज आणि ब्राह्मणेत्तर चळवळ, जयसिंगराव पवार,
मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू छत्रपती: लेखसंग्रह, खंड- २,
महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, २०१९, कोल्हापूर, पृ. ४६२
[21]
पूर्वोक्त,
प्रवीण चव्हाण, राष्ट्रवाद आणि सातारा जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळ, पृ. ९१
[22]
पूर्वोक्त, जयसिंगराव पवार, मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू
छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, पृ. ४४५
[23]
कित्ता, पृ. २३१
[24]
पूर्वोक्त, ए.
के. घोरपडे,
कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती- चरित्र व कार्य, पृ. ९३
[25]
य.
दि. फडके, ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रांचे अर्थकारण, पुरोगामी
सत्यशोधक, ऑक्टो-डिसेंबर, १९९६, पृ. ५९
[26]
पूर्वोक्त, जयसिंगराव पवार, मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू
छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, पृ. २३९
[27]
राजेंद्र व्होरा,
ब्राह्मणेत्तर चळवळ (१९१६-१९२२), मृणालिनी शहा,
जयंत वष्ट, श. वि. राशिनकर (संपा.), प्रभातकार वा. रा. कोठारी: विचार आणि कार्य,
वा. रा. कोठारी जन्मशताब्दी समिती, पुणे, १९९३,
पृ. १६५
[28]
पूर्वोक्त, जयसिंगराव पवार, मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू
छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, पृ. १६७
[29]
कित्ता,
पृ. १६७
[30]
पूर्वोक्त, राजेंद्र
व्होरा, ब्राह्मणेत्तर चळवळ (१९१६-१९२२), पृ. १७१
[31]
पूर्वोक्त, जयसिंगराव पवार, मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू
छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, पृ. १६८
[32]
रमेश
जाधव (संपा.), राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग,
मुंबई, २०१६, पृ. १११३-१११४
[33]
पूर्वोक्त, जयसिंगराव
पवार, मंजुश्री पवार
(संपा.), राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, पृ. १६९
[34] डी. व्ही. आठल्ये, द लाइफ ऑफ लोकमान्य टिळक, जगदधीतेशु प्रेस, पुना, १९२१, पृ. २६४
[35]
पूर्वोक्त,
ए. के. घोरपडे,
कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती- चरित्र व कार्य, पृ. ९४
[36]
पूर्वोक्त, जयसिंगराव
पवार, मंजुश्री पवार
(संपा.), राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य- खंड- १, पृ.
१७२
[37]
पूर्वोक्त, ए. के. घोरपडे, कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती-
चरित्र व कार्य, पृ. ९४-९५
[38]
पूर्वोक्त, जयसिंगराव
पवार, मंजुश्री पवार (संपा.), राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य- खंड-
१, पृ. १६९
[39]
पूर्वोक्त, ए.
के. घोरपडे, कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती- चरित्र व कार्य, पृ. १०९
[40]
पूर्वोक्त,
काशीनाथ कावळेकर, श्री शाहू महाराज आणि ब्राह्मणेत्तर चळवळ, पृ. ४५७
पूर्वप्रसिद्धी - समाज प्रबोधन पत्रिका, जुलै-सप्टेंबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा