पिएर बुरदिअ या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने सामाजिक जाळ्याचे महत्त्व विशद करणारे सामाजिक भांडवल, शिक्षण आणि सांस्कृतिक ज्ञान मिळवून देणारे सांस्कृतिक भांडवल आणि सामाजिक सन्मान आणि अधीमान्यता मिळवून देणारे प्रतीकात्मक भांडवल या विषयी मांडणी केली आहे. बुरदिअ हा स्वतः दक्षिण फ्रान्समधील ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे त्याला शहरी फ्रान्समध्ये भाषा, संस्कृती, समाज याविषयी वेगवेगळे अनुभव आले होते. त्याच्या अनुभवातून त्याची सैद्धांतिक मांडणी आणि समाजचिंतन हे मर्मभेदी बनले आहे. त्याच्यापूर्वीची समाजशास्त्रीय मांडणी आणि त्याने केलेली समाजशास्त्रीय मांडणी यामध्ये आमूलाग्र फरक दिसतो.
महाराष्ट्रात तसेच भारतातही विशिष्ट सामाजिक - आर्थिक स्तरातील आणि विशिष्ट भौगोलिक स्थानातील किंवा शहरातील लोकच बराच काळ प्रामुख्याने अभ्यासक, विद्वान आणि बुद्धिवंतच बनत होते. त्यामुळे, त्यांचे अनुभव, समाजचिंतन हे एकसाची, साचेबद्ध, एकरंगी तसेच, मर्यादित स्वरूपाचे होते. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील भाषिक, सामाजिक, धार्मिक, प्रादेशिक, भौगोलिक वैविध्य समाजचिंतनात समाविष्ट झाले नाही. काही अपवाद आहेत. पण ते खूपच कमी आहेत.
महाराष्ट्रात आणि भारतात वेगवेगळ्या सामाजिक - आर्थिक स्तरातून आणि राज्याच्या आणि देशाच्या सगळ्या भागांमधून अभ्यासक, विद्वान आणि बुद्धिवंत निर्माण होवू शकले नाही. तसे वातावरण राज्यात आणि देशात निर्माण होवू शकले नाही किंवा करता आले नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे आणि हे आपले सामाजिक आणि राष्ट्रीय अपयशही आहे. महाराष्ट्राचे अभ्यासक, विद्वान आणि बुद्धिवंत म्हणून वऱ्हाड, खानदेश, कोंकण, मराठवाडा या भागातील लोकांना खूपच कमी वेळा मान्यता मिळते. त्यामुळे पुणे - मुंबईकेंद्रीच चर्चा अधिक होते. तसेच, ब्राह्मण, मराठा आणि बौद्ध याच तीन समूहांचे सांस्कृतिक आणि वैचारिक चर्चाविश्वावर वर्चस्व दिसते. अपवाद म्हणून काही वेगळी मंडळी दिसतात. पण, ती व्यक्ती म्हणून समाजगट म्हणून नव्हे. वेगवेगळ्या समाजगटातील अनेक लोक लिहिते आणि बोलते झाले पाहिजे.
देशातही काही विशिष्ट भागातील लोकांचे राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व दिसते. बंगाली, तमिळ लोकांचे ( त्यातही प्रामुख्याने भद्रलोकांच्या) सामाजिक भांडवल, सांस्कृतिक भांडवल कार्य करत असते. देशातील वेगवेगळ्या भागातील अभ्यासक, विद्वान, बुद्धिवंत खूपच कमी दिसतात. एकेकाळी, काही प्रमाणात गुजरात, राजस्थान, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र आणि इतर राज्यामधील लोक देशाच्या चिंतनात भर घालत होते. त्यामुळे सामाजिक विविधता होते. पण, हेही काही प्रमाणात मर्यादित स्वरूपाचेच होते.
अभ्यास, चर्चा, चिंतन आणि विचारमंथन केल्याशिवाय कोणत्याही देशाची आणि समाजाची प्रगती होत नाही. म्हणून, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक - आर्थिक स्तरातील आणि वेगवेगळ्या प्रदेशातील व भौगोलिक स्थानातील लोक सहभागी झाले पाहिजे. ते सहभागी होतील अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. कारण, वेगवेगळी लोक वेगवेगळे अनुभव घेवून येतात. त्यातून सामाजिक चिंतनाला वेगळा अर्थ दिला जावू शकतो. तसेच, बऱ्याच गोष्टी, प्रश्न आणि समस्या वेगळ्या पद्धतीने समजून घेता येतात.
म्हणूनच, आपल्या अनुभवांचे नुसते अनुभव कथन चालणार नाही तर त्यांची सैद्धांतिक मांडणीही केली पाहिजे.
टीप - बरेच दिवस मी पिरे बोर्द्यू असाच उल्लेख करत होतो. पण फ्रेंच साहित्य आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक शरद बाविस्कर यांनी पिएर बुरदिअ असा उल्लेख केला म्हणून तोच मला योग्य वाटत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा