गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

घरे बाहेरे : स्त्रीप्रश्न, राष्ट्रवाद आणि सार्वजनिक चर्चाविश्व


     समकालीन  नवउदारमतवादी काळात आणि अर्थ-तांत्रिक वातावरणात सामाजिक शास्त्रांना अव्यवहार्य ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्रास सामाजिक शास्त्रांची काही गरज नाही असे बर्याच टिकाणी बोलले जात आहे. जे.एन.यु.च्या प्रकरणानंतर अनेक जनांनी सामाजिक शास्त्र बंद करून टाकावेत किंवा सामाजिक शास्त्राचीच विद्यार्थी अश्या देशविरोधी घोषणा देतात त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी धढे शिकवायला पाहिजे असे म्हणायला सुरुवात केली. “राष्ट्रवाद आणि देशभक्ती” राजकीय अजेंड्यामुळे देशभरातील चर्चाविश्व या विषयाच्या अवतीभोवती फिरत होते. “भारत माता कि जय” कि “जय हिंद” या वादानेही पुन्हा उचल खाल्यामुळे स्वतंत्रानंतर ८० वर्षानंतर जन्माला आलेल्या पिढीलाही आपला इतिहास या अनुषंगाने काहीप्रमाणात समजून घ्यावा लागला. नवउदारमतवादी धोरणामुळे पुन्हा नव्याने आर्थिक साम्राज्यवाद येवू पाहत आहे. यातून निर्माण झालेल्या जागतिक वर्गाने “जग एक खेडे” किंवा “ग्लोबल विलेज” हा भ्रम निर्माण करून दिला आहे. या ग्लोबल खेड्यात मोठ मोठ्या भांडवलदारांना एका दिवसात एका देश्यातून दुसर्या देश्यात सहज जाता येते परंतु सर्व सामान्य माणूस जावू शकत नाही. जाण्याचा प्रयत्न केला कि दुसर्या देश्यातील लोक त्याला घुसखोर म्हणून पकडतात. जागतिकीकरण आणि जग एक खेडे हे सर्व सामान्य लोकांसाठी एक भ्रमच आहे.

        पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत यादवीमुळे अनेकांनी युरोपात स्थलांतर केले. युद्ध आणि भूख यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपला देश सोडून निघाले आहे. स्थलांतरामुळे युरोपात नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. काही युरोपियन लोकांनी वसाहतीक काळात आपण केलेल्या अन्यायाची परतफेड करण्याची संधी म्हणून याकडे पहिले तर काहींनी या लोकांना आपल्यातील वाटेकरी म्हणून पहिले त्यामुळे अनेक प्रश्नांना युरोपला आता सामोरे जावे लागणार आहे. काही देश्यांमध्ये स्थलांतरविरोधी भुमिका घेणाऱ्या संकुचित राष्ट्रवादाला पुन्हा उभारी येतांना दिसत आहे. संकुचित राष्ट्रवाद हा आर्थिक संकटातून निर्माण होतो हे राष्ट्रवादाचा इतिहास पाहिल्यास आपणास दिसून येईल. जागतिकीकरणाच्या नवउदारमतवादी धोरणांमुळे जगभर सांस्कृतिक मोडतोड (Cultural Dislocation) होत असल्यामुळे उजव्या विचारांचा उदय संकुचित राष्ट्रावादासोबत होतांना दिसून येत आहे. सगळ्या देश्यातील अल्पसंख्याकांची भीती बहुसंख्याकांच्या मनात निर्माण केली जाते. उदा. श्रीलंकेत सिंहली बौध्द राष्ट्रवाद तेथील हिंदू,मुस्लीम यांना निशाना करतो, म्यानमार मधील बौध्द राष्ट्रवाद रोहिंग्य मुस्लिमांना निशाना करतो, पाकीस्थान मधील पंजाबी सुन्नीमुस्लीम राष्ट्रवाद हिंदू, ख्रिचन, अहमदिया मुस्लीम यांना निशाना करतो, भारतातील हिंदू राष्ट्रवाद मुस्लीम,ख्रिचन, दलित यांना निशाना करतो, युरोप-अमेरिकेतील कॅथोलिक आणि प्रोटेस्तंठ ख्रिचन राष्ट्रवाद हा मुस्लीम, आफ्रो-अमेरिकन,आशियाई लोकांना विरोध करतो.

       एवढे सविस्तर लिहिण्याचे कारण कि,घरे बाहेरे या बंगाली चित्रपटातून आपणास राष्ट्र, स्त्री,वसाहतवाद,मुस्लीम यासंदर्भात भाष्य करायचे आहे त्यामुळे आपणास या सर्व चर्चेचा परीघ किती विस्थारता येतो. याची कल्पना यावी म्हणून जागतिक समकालीन संदर्भांचा विचार मी प्रस्तवानेत केला आहे.   

चित्रपटाचे महत्व:

         घरे बाहेरे  हा चित्रपट अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. “चित्रपट अभ्यास” हि नवीन अभ्यास शाखाच जन्माला आलेली आहे. भारतातील चित्रपटाचा इतिहास पहिला तर आपणास जाणवेल कि अनेक अपत्यांपैकी चित्रपट हे सुद्धा वसाहतवादाचे अपत्य आहे. भारतातील राष्ट्रवाद हा प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद आहे कारण त्याचा जन्म वसाहतवादाच्या विरोधातून झाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटावरही राष्ट्रवादाचा प्रभाव पडलेला आपणास दिसतो. भारतीय राष्ट्रावादामध्ये ज्याप्रमाणे बंगाली स्कूलचा प्रभाव आपणास दिसून येतो त्याचप्रमाणे भारतीय चित्रपटावरही बंगाली स्कूलचा प्रभाव आहे. याच प्रवाहातील लोकांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटांचे ऐतिहासिक आणि काल्पनिक ढोबळमानाने असे दोन प्रकार केले जातात.घरे बाहेरे हा ऐतिहासिक चित्रपट नाही त्याचप्रमाणे तो निव्वळ काल्पनिक चित्रपटही नाही. दिग्दर्शकाने इतिहासाच्या पटलावर काल्पनिक पात्र उभे करून वसाहतीक काळात काय घडले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

        येथे असा प्रश्न उपस्थित होतो कि, चित्रपट खरच वास्तवात काय घडले हे सांगू शकतो का? चित्रपटात दाखवलेला इतिहास हा“वस्तुनिष्ठ इतिहास” आहे का? अश्यावेळी आपण इतिहासलेखनशास्त्र (Historiography) आणि इतिहासचित्रणशास्त्र (Historiophoty) यांच्या मर्यादा आणि महत्व समजून घ्यायला हवे. इतिहासलेखनशास्त्राचा विचार करतांना आपणास साधनांचा विचार करावा लागतो. पूर्वग्रहांचा विचार करावा लागतो. इतिहासचित्रणशास्त्राचा विचार करतांना प्रेक्षकांचा, दृकश्राव्य साधनाचा अश्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो त्यामुळे दोहोंच्याही काही मर्यादा असतात. तरीही इतिहासाचा आशय घेवून निर्माण करण्यात आलेली चित्रपट तत्कालीन समाजाचे दृकश्राव्य चित्रण आपणासमोर करतात त्यामुळे अनेक गोष्टींची आपणास उकल होते त्या अर्थाने घरे बाहेरे हा चित्रपट उत्तम कलाकृती आहे.

चित्रपटातील स्त्रीप्रश्नाचे द्वंद्व:

           एकोणिसाव्या शतकामध्ये प्रथम भारतामध्ये स्त्री सुधारणेला सुरुवात झालेली आपणास दिसते. त्यामध्ये इंग्रजी शिक्षण,पाश्यात्य शरीरविज्ञान,वासाहतिक आधुनिकता, राजकीय-सामाजिक जागृती व व्हिक्टोरियन नैतिकता याचा मोठा प्रभाव आपणास दिसुन येतो. एकोणिसाव्या शतकात इग्लंड विक्टोरिया राणीची सत्ता असल्यामुळे ‘विक्टोरियन काळ’ म्हणून हा कालखंड युरोपात ओळखला जातो.या  काळात लैंगिकतेला, नैतिकतेला,धर्माला आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांला घेवून खूप चर्चा झाली व काही प्रमाणात कायदेही झाले.याच काळात John Stuart Mill सारखा माणूस ‘Subjection of Women’ लिहितो. याच काळात दिझरेलीच्या म्हणण्यानुसार असे दिसून येते कि, श्रीमंत आणि गरीब अशा दोन राष्ट्रांमध्ये इंग्लंड विभाजित झालेले आहे...निश्चितपणे असे दिसते कि,विक्टोरियन काळात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्याप्रमाणात श्रीमंतामध्ये व गरीबांमध्ये आर्थिक विषमता वाढली.मध्यम वर्गाच्या व्यापारी यशाबरोबर शुभवर्तनवादी चळवळ मोठ्याप्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली,तिने मागच्या शतकातील मुक्त  असलेली लैंगिकता संपवून टाकली.युरोपात घडत असलेल्या या सर्व गोष्टींचा भारतीय समाजावर मोटा परिणाम पडत होता. याच काळात स्त्रीविषयक अनेक कायदे भारतात करण्यात आले. अनेक प्रथांना बंदी घालण्यात आली, स्त्रियांना शिक्षण मिळू लागले,परंतु हे काही सहजासहजी झाले नाही. स्त्रीप्रश्नाचे द्वंद्व समजून घेण्यासाठी सुद्धा बहुप्रवाही अन्यथा  आपणास ते समजून गेता येणार नाही.

        चित्रपटातील कालखंड हा १९०० ते १९३० च्या जवळपासचा आहे कारण चित्रपटात बंगालच्या फाळणीवरही भाष्य करण्यात आले आहे.देशात विषेत: १९१० नंतर स्वदेशी चळवळीचा उदय झालेला आहे आणि १९२० -३०  या दशकात मोठ्या प्रमाणात देशभर दंगली भडकल्या होत्या. चित्रपटचा शेवटही दंगलीने झालेला आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या पहिल्या तीन दशतकात या घटना घडलेल्या आहेत. इतिहास समग्रतेत समजून घ्यायचा असतो. चित्रपट जरी १९००-१९३० च्या दरम्याच्या कालखंडावर असला तरी या कालखंडाची पार्श्वभूमी १९ व्या शतकात झालेली आहे. थोड्या प्रमाणात हाच मुद्दा वर आलेला आहे.

          इंग्रजी शिक्षण, वसाहतीक आधुनिकता, ख्रिचन मिशनरींची हिंदूधर्मावरील टीका, कायद्याचे राज्य, अमानुष प्रथांना बंदी या सर्व गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपणास वसाहतीक काळातील स्त्री घडण्याची प्रक्रिया समजून घेता येणार नाही. पौर्वात्य-पाश्चिमात्य,आत्मटीका-आत्मागौरव, आधुनिकता-परंपरा, अभिजन-बहुजन अश्या बहुप्रवाही द्वंद्वात तत्कालीन समाज सापडला असल्यामुळे काय भुमिका घ्यावी यावरून वैचारिक कोंडी अनेकांची झालेली आपणास दिसते. याबहुप्रवाही द्वंद्वाच्या प्रक्रियेत वसाहतीक काळात “नवी स्त्री” घडविली जात होती. आधुनिकेतेला विरोध करण्यासाठी “नवीन परंपरा” निर्माण करण्यात आल्यात. या परंपरांनी नवीन स्त्रीचे प्रारूप निर्माण केले. व्यापक पातळीवर विचार केला तर आपणास दिसेल कि, वसाहतीक ज्ञानातून निर्मित हिंदूधर्माच्या (Not Dharma, Religion) प्रक्रियेने स्त्री घडण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकला आहे. दरम्यानच्या काळातच वसाहतवादाला विरोध म्हणून उभ्या राहिलेल्या वसाहतीक ज्ञाननिर्मित राष्ट्रवादाने “स्व” निर्माण करतांना “इतर” ची हि निर्मिती केली. त्याचा स्त्रीच्या ‘स्व’निर्मितीवरही प्रभाव पडला त्यामुळे वसाहतीक काळात ती इतारच्या विरोधात बोलतांना दिसते. या प्रक्रियेत ज्या स्वरूपात स्त्री घडवली गेली. ते स्वरूप “उच्जातीय हिंदू ब्राह्मण” स्त्रीचे होते. त्यालाच बंगालमध्ये “भद्र महिला” म्हटले गेले. चित्रपटात बिमला चे रूप भद्र महिलेचे आहे. मुस्लीम विरोधाची किनार त्या स्त्री घडवण्याच्या प्रक्रियेला आहे. चित्रपट निखील आणि बिमला यांचा एक संवाद आहे. त्यामध्ये निखील हा स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला मुस्लीम जबाबदार असल्याचे बोलतो. हाच निखील बिमला या आपल्या बायकोला इंग्रजी शिकवण्यासाठी इंग्रज बाईला आपल्या घरी शिकवणूकीसाठी बोलावत असतो. यामुळे इंग्रजी गाणे शिकलेली बिमला एका दिवशी माजघरात इंग्रजी गाणे म्हणत असते त्यावेळी निखील तिला इंग्रजी गाणे बंद करून बंगाली गायला सांगतो. या प्रसंगातून उच्चजातीय हिंदू भद्रलोकांची काय वैचारिक आणि नैतिक कोंडी त्याकाळात झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो.

        आधुनिकता आणि परंपरांच्या ओझ्याखाली असणाऱ्या या समाजात स्त्रियांच्या दोन परस्पर विरोधी प्रतिमा आपणास दिसतात. चित्रपटातही बिमला आणि तिची नणंद\भावजय दोन वेगवेगळे स्थान असलेल्या स्त्रिया आपणास दिसतात. लैगिकता, संस्कार आणि नैतिकता यासंदर्भात या दोन स्त्रियांमध्ये ताणताणाव निर्माण झालेला दिसतो. चित्रपटाच्या सुरुवातीला बिमलाचे संबंध तिच्या नणंदेशी\भावजयीशी चांगले असतात. परंतु बिमलाचा संदीपशी आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादी चळवळीशी संबंध आल्याने दोघींमधील नाते दुरावते. येथे आपणास खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचा आणि राष्ट्रीय चळवळीचा संबंध दिसतो. बिमलाची विधवा असलेली नणंद हि खाजगी क्षेत्रात असली तरी तिला ज्या पद्धतीने राहावे लागते आहे त्यावरून तिचे दुख आपणास दिसते. त्याचवेळी राष्ट्रवादी चळवळीच्या निमित्ताने खाजगी क्षेत्राची पायरी ओलांडून बाहेर सार्वजनिक क्षेत्रात येणाऱ्या बिमलाचाही देशभक्तीच्या नावाखाली कसे शोषण होते. हे तिलाही कळत नाही. चित्रपटात सातत्याने वंदे मातरम ची घोषणा दिली जाते. वंदे मातरम च्या निमित्ताने सार्वजनिक आणि खाजगी पातळीवर स्त्री प्रश्न चर्चिला जातो. स्त्री एक आदर्श माता, आदर्श नारी, आदर्श पत्नी  या स्वरुपात स्त्री प्रश्नाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झालेली आपणास दिसते.

         स्त्री प्रश्न आणि राष्ट्रवाद याची मोठ्या प्रमाणात गुंतागुंत चित्रपट झालेली आहे. चित्रपटात राष्ट्रवादी चळवळी संबधित असणाऱ्या (तथाकथित?) क्रांतिकारी संदीप ह्याला एकूण सर्व भद्र्लोकांमध्ये आदरपूर्ण स्थान असते. सर्व त्याग करून देश्याच्या स्वातंत्रासाठी लढतोय म्हणून अनेक जन त्याला मदत करत असतात. निखील हा संदीपचा वर्गमित्र असतो. निखिलच बिमलाची ओळख संदीपशी करून देतो. त्यातून संदीपची व बिमलाची मैत्री वाढत जाते. मैत्री वाढण्यामागे एक आदरयुक्त भाव बिमलाच्या मनात असतो त्या भावाचे रुपांतर हळू हळू लैंगिक आकर्षणात होते. चित्रपटात एक संवाद आहे त्यामध्ये बिमला संदीपला म्हणते कि “माझा नवरा खूप थंड आहे”. नवऱ्याच्या तुलनेने संदीप हा शौर्यवान आणि हिम्मतवान आहे त्यामुळे कळत नकळत ती संदीपकडे जाते. संदीपची बिमलाला आपल्या राजकारणासाठी वापरायचे हि योजना असतेच त्यातून दोघांमध्ये लैंगिक संबंध येतात. येथे राष्ट्रवाद आणि आक्रमकता यांचा संबंध दिग्दर्शकाने अप्रत्यक्ष्यपणे दाखविला आहे. राष्ट्रवादाच्या एकूणच चर्चाविश्वात आक्रमता केंद्रस्थानी राहिली आहे त्यामुळे राष्ट्रवाद हा खूप पुरुषी आणि हिंसक आहे हि त्यावरील टीका मला योग्य वाटते.

        चित्रपट बघितल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अनेक गोष्टींचे आंतरसंबंध कसे निर्माण होतात यासंदर्भात चित्रपट चांगल्याप्रकारे भाष्य करतो.      


टीप - २०१६ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रांतीजोती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रात 'certificate course' साठी लिहिलेले चित्रपट परीक्षण. 

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

डॉ. आंबेडकर आणि त्यांचे तीन प्रतिक्रिया-पत्र!

 

१.   देविदासराव नामदेवराव कांबळे, १३-०६-१९४१, जनता  

 

“ रा. रा. देविदासराव नामदेवराव कांबळे यांस अनेक.....

आपणास काय मायना लिहावा याबद्दल मी बुचकळ्यात पडलो आहे. नमस्कार म्हणावा तर आपण दोघेही ब्राह्मण नाही, जोहार म्हणावा तर आपण मांग, फुरमान म्हणावे तर मी महार, आशीर्वाद म्हणावा तर मांगाला आशीर्वाद देणारा महार श्रेष्ठ कोण असा अपवाद यायचा, म्हणून काहीच न लिहिता चांगदेवासारखी कोरी जागा ठेवून, आपल्या पत्राचे उत्तर देत आहे. महार समाज आणि महार पुढारी मातंग जातीवर अन्याय करीत आहेत त्याबद्दल आपले मनातील “खुडखुडी” (मला वाटते, खुमखुमी या मराठी शब्दाचा हा निझामशाही अपभ्रंश असावा) काढून टाकण्याकरिता व एकदाचा “सोक्षमोक्ष” करून घेण्याकरिता पत्र लिहिण्याचे योजिले. यात आपण काहीच वावगे केले नाही. आपण मला ‘परमपूज्य या शब्दसमुच्चयाने संबोधिले आहे. त्याबद्दल मी आपला फारच ऋणी आहे. महार लोक नेहमीच ‘परमपूज्य हे विशेषण लावून मला संबोधितात. पण त्यात विशेष असे काही नाही. महारांनी महाराची स्तुति केली, याला काय किंमत? आपण मांग आणि मी महार असूनही आपण मला ‘परमपूज्य बाबासाहेब’ म्हणालात यातले प्रेम आणि त्याचे स्वारस्य काही और आहे, इतके कि, ते सांगता नये.

        माझ्या पत्राचे उत्तर न दिल्यामुळे मी गांधींचा तिरस्कार करतो, हा आपला गैरसमज कोणी करून दिला. ते मला समजत नाही. गांधीचा मी तिरस्कार करीत असलो, तरी त्याची करणे दुसरी आहेत. माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही हे नव्हे. मला आपल्याप्रमाणे अनेक लोक पत्र लिहितात. पण त्यांना कधी उत्तर देण्याचा क्रम मी ठेवलेला नाही. याबद्दल पुष्कळ लोकांस वाईट वाटते., पण ते त्यामुळे माझा तिरस्कार करीत नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, मी रात्रंदिवस कामात असतो. मला छानशौक, ऐषआराम माहित नाहीत, नाटक सिनेमांत मी वेळ घालवीत नाही. माझा धंदा, वाचन किंवा सार्वजनिक कार्य  या व्यवसायात मी सतत गुंतलो आहे. मला गांधीसारखे सेक्रेटरी नाहीत. माझे काम मलाच करावे लागते. हे जाणूनच पत्र लिहिणारे माझे मित्र, माझे सहकारी मला क्षमा करतात; माझा तिरस्कार करीत नाहीत. ‘उत्तर न दिल्यास मी तुमचा तिरस्कार करीन असे आपण जे म्हटले आहे, ते मनुष्य स्वभावास धरूनच आहे. आपली योग्यता काय आहे, हे मला माहिती नाही. ‘मी  निझाम इलाख्यातील मराठवाडा विभागातील मातंग समाजातील शिकलेला, सर्वात पहिला विद्यार्थी आहे’, असे आपले वर्णन आपण केले आहे.  तिरस्कार करण्याची पाळी यावी हे वाईटच आहे पण आपण केवळ विद्यार्थीच असता तर आपल्या तिरस्काराची फारशी मातब्बरी वाटली नसती. पण आपण बजावले आहे की, ‘ मातंग समाजाच्या सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे.’ मी आपणास सामान्य विद्यार्थी या नात्याने पत्र पाठवीत नसून निजाम स्टेटच्या मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून पत्र पाठवीत आहे. म्हणून आपण उत्तर देण्यास अनमान करू नये. ज्यू लोकांमध्ये जसा मोझेस तसे मातंग समाजात आपण आहात. हे आपल्या भाषेवरून उघड आहे. आपल्या पत्राला कोण उत्तर देणार नाही! आपल्या मनात माझ्याविषयी तिरस्कार उत्पन्न झाला, तर सर्व मातंग समाज माझा तिरस्कार करू लागेल. तो टाळला नाही तर तो माझ्या अनर्थाला कारणीभूत होणार नाही, असे कोण म्हणेल? मला तरी म्हणता येणार नाही, तो टाळण्याकरिता माझा शिरस्ता मोडून मी आपल्या पत्राचे उत्तर देत आहे.

        पहिल्या प्रथम दोन गोष्टीबद्दल आपले आभार मानल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. महार लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा समज करून घेतात, यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे, तो आपण कृतीत आणावा, अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे, मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही, असे सांगून थकलो. पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. आपण मांग लोकांना माझ्या फोटोची पूजा करू देणार नाही, हे तर चांगलेच आहे. मांग लोकांची अवस, पुनव, ग्रहण मानण्यापेक्षा माझ्या फोटोचे पूजन करणे वाईट आहे, याबद्दल मला काही संदेह नाही. आपण आपली दृष्टी संकुचित केली आहे, याबद्दल मला वाईट वाटते. आपण महार लोकांतूनही हे माझ्या फोटोपूजनाचे खूळ नाहीसे करण्याचे व्रत पत्करले पाहिजे, असे आपल्याला सांगणे मला आवश्यक वाटते. हा आपला मोठाच पराक्रम होईल यात काही शंका नाही. कदाचित एवढा पराक्रम केल्यावर, मातंग समाज आपल्या फोटोची पूजा करू लागेल अशी आपल्याला भीती वाटत असेल, तरी भीती बाळगू नये. आपल्या फोटोची पूजा करण्याची प्रथा माझ्या फोटोची पूजा करण्याच्या प्रथेइतकी कधीच वाईट दुष्परिणामी होणार नाही.

        दुसऱ्या एका अभिवाचनासाठी मी आपला आभारी आहे. मी मेल्यावर कसे होईल. अशी चिंता मी अनेकवेळा प्रसिद्ध केली आहे, हे खरे आहे. महारापैकी एकाही तरुणाला सांगावयाला हिंमत झाली नाही की, “ काही हरकत नाही, तुम्ही मरा, आम्ही चालवू,” आपले अभिवचन वाचून आमचे समाधान झाले. द्रोणाने कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवल्यानंतर “मला गुरुदक्षिणा कोण देईल?” असा प्रश्न केला. त्याला कोणीच उत्तर देईना. गुरु काय मागतो, कोण जाणे ? प्राण मागतो की काय अशा भयाने सगळेच गप्प बसले. एकट्या अर्जुनाला धैर्य झाले. तो म्हणाला, “ मागा काय मागावयाचे आहे ते, मी देतो.” द्रोणाच्या ठायी मी व अर्जुनाच्या ठायी आपण आहात असे वाटून माझ्या मागून कोणीतरी आहे, या विश्वासाने मला शांती वाटते, द्रोणाने पण केला होता की, राजा द्रुपदाला शिष्यहाती धरून आणीन म्हणून तसे ब्राह्मण्य नष्ट करणे हा माझा पण आहे. तो माझ्या आयुष्यात माझ्या हातून पुरा होणे शक्य नाही. आपण तो पुरा करण्यास सिद्ध आहात, हे माझे मी मोठे भाग्य समजतो व त्याबद्दल मी आपले आभार मानतो. ही गोष्ट जर आपल्याला करता आली तर मांग जातीला इतिहासात मोठे स्थान प्राप्त होईल. नमनाला फारच तेल गेले! आता आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपले आरोप दोन प्रकारचे आहेत. काही माझ्यावर व्यक्तिगत लागू असणारे असे आहेत. बाकीचे महार समाजाला लागू असे आहेत.

       माझ्यावरचा प्रत्यक्ष आरोप काय आहे, हे मला अजूनही समजले नाही. मी फक्त महारांचाच पुढारी आहे, असा मध्यप्रांतातील मांग लोकांनी ठराव रूपाने केलेला माझ्यावरचा आरोप मी वृत्तपत्रांतून वाचला आहे. त्यांतील विधानासंबंधाने मी ता. ४ जानेवारी १९४१ च्या जनतेत लिहिले आहे ते आपण अवश्य वाचून पहावे. मी महारांचाच पुढारी ही कॉंग्रेसची ओरड, त्याचीच री मांगांनी ओढली. असे किती पोटार्थी मांग-महार आहेत की, जे पैशासाठी वाटेल ते करतील. ‘ पुणे करार झाला, त्यावेळी कॉंग्रेस मला ‘सर्व हिंदुस्थानातील अस्पृश्यांचा पुढारी म्हणून मान्य करीत असे. त्यांनतर मी नुसता मुंबई इलाख्यातील अस्पृश्य लोकांचा पुढारी आहे असे म्हणू लागली, त्यांनतर नुसत्या महारांचा पुढारी आहे, असे म्हणू लागली. माझी खात्री आहे की, काही दिवसांनी मी कोकणस्थ महारांचाच पुढारी आहे व त्यानंतर मी दापोली तालुक्यातील महारांचा पुढारी, असा प्रचार कॉंग्रेस करील व त्याला महारांतूनच माणसे सापडतील असे म्हणावयास हरकत नाही. कोणीही कॉंग्रेसला विरोध करून पहावा, म्हणजे मी म्हणतो त्याची सत्यता कळेल. चांभारातील एखादा पुढारी कॉंग्रेसला विरोध करायला निघू द्या, म्हणजे हाच मासला दिसून येईल. तो दाभोळ्या जातीचा असला, तर तो चांभार जातीचा पुढारी नसून दाभोळ्या जातीचा पुढारी आहे, असे ते म्हणतील. हरळ्या जातीचा असला तर हरळ्य़ाचा पुढारी म्हणतील; आणि चेवल्यांच्या जातीचा असला तर चेवल्यांचा पुढारी म्हणतील. मांगामध्ये १२ पोटजाती आहेत, असे मला समजते. मांगामध्ये कॉंग्रेसला विरोध करणारा कोणी पुढारी निघाला तरी त्याची देखील तीच गत होणार. तो ज्या जातीचा, त्या जातीचा पुढारी, असा गिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती मला माहिती असल्यामुळे महारांचा पुढारी म्हटल्याने मला काही नवल वाटत नाही. शिवाय, बाकीच्यांनी माझे पुढारीपण सोडले आणि नुसते महारांनी मानले, तर त्यात काही खेद करण्यासारखे आहे असे मला वाटत नाही, कोठे तरी कार्य करण्यास संधी असल्यास पुरे. महारांची दुर्दशा काही कमी नाही. नुकत्याच महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टात “सर्वांत महारांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे”, असे कबूल केले आहे. त्यांची दु:स्थिती नाहीशी करण्याची मला संधी राहिली तरी पुरे आहे, असे मानून काम करण्याची माझी तयारी आहे. ‘नामके वास्ते आणि कामके वास्ते असे दोन प्रकारचे पुढारी आहेत. मी नामके वास्ते असलेल्या पुढाऱ्यातला नाही. मला काम पाहिजे.

      मी पुढारी आहे, मी समाजसेवक नाही. पुढारी या नात्याने चालना देणे, लोकमत तयार करणे, येवढेच माझे काम आहे, त्यांत मी जातीभेदाला जागा दिली असे कोणीही – माझा शत्रूदेखील म्हणणार नाही. मी अस्पृश्य जातीतील सर्वांघरी जेवलो आहे. अस्पृश्यांत सहभोजन व्हावे. सहविवाह व्हावा याचा पुरस्कार मी केला आहे. आणि सहविवाह जरी जारी झाला नसला, तरी चांभार लोक सहभोजनाला तयार नाहीत. पण महारमांगात, महार भंग्यात सरसहा सहभोजन सुरु आहे. हा माझ्या शिकवणुकीचा परिणाम आहे, असे मी निर्भयपणे म्हणून शकतो. माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभांमधून महारांपुरते ठराव कधीच पास झालेले नाहीत, मी महार जातीचे भांडण भांडलो नाही, आणि या भांडणांतून जो लाभ झाला त्यांतला मोठा भाग महारेत्तर जातींनी घेतला हेही सिद्ध करून देता येईल. मी जी बोर्डिंगे काढली त्यांत जातीभेद कधीच ठेवला नाही, इतर महारांनी जी काढली त्यांत त्यांनीही जातीभेद ठेवलेला माझ्या कानावर आलेला नाही.

       स्वतंत्र मजूर पक्ष हा महारांचा पक्ष आहे, असे म्हणण्यात येते. परंतु ते खोटे आहे. स्वतंत्र मजूर पक्षात महार- महारेत्तर असा भेद नाही. स्वतंत्र मजूर पक्ष जात पाहत नाही, गुण पाहतो. गुणाला उतरला तर त्याला त्याच्या लायकीची जागा स्वतंत्र मजूर पक्षात मिळू शकते. राजकारण हे काही पंक्तीभोजन नव्हे. मांग कोणी नाही म्हणून मांग घ्या, भंगी कोणी नाही म्हणून भंगी घ्या, असा नियम स्वतंत्र मजूर पक्ष ,मानीत नाही. कोणताही राजकीय पक्ष माणू शकणार नाही नुसत्या शिक्षणाला राजकारणात काही महत्व नाही. “ मी ग्रॅज्युएट आहे, मला कौन्सिलात घ्या”, हा नियम स्वतंत्र मजूर पक्षाला कबूल नाही, कोणाही राजकीय पक्षाला तो नियम मान्य होऊ शकणार नाही. राजकारणात शिक्षण पाहिजे पण शिक्षणापैकी शीलाची जास्त जरुरी आहे. स्वतंत्र मजूर पक्ष जात, शिक्षण, शील या तिन्ही गोष्टी पाहून कौन्सिलचे उमेदवार ठरवतो. अस्पृश्यांचे भांडण भांडण्याकरिता स्वतंत्र मजूर पक्ष उभा केला आहे. त्यात एखाद्या मांगाला जागा मिळाली नसेल. तशी अस्पृश्यांतील नाशिक जिल्ह्यातील एक सधन व कार्यकर्त्या अमृतराव रणखांभ्यांसारख्या माणसाला व सातारा जिल्ह्यातील एका सधन गृहस्थाच्या मुलांस स्वतंत्र मजूर पक्षात जागा मिळाली नाही. यावरून स्वतंत्र मजूर पक्ष मांगांच्या व चांभाराच्या विरुद्ध आहे, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. स्वतंत्र मजूर पक्ष नालायकांच्या विरुद्ध आहे. मग ते कोणत्याही जातीचे असोत. मांग- चांभार स्वतंत्र मजूर पक्षात नसले म्हणून मांग जातीचे किंवा चांभार जातीचे काही नुकसान झाले आहे, असे मला दिसत नाही. स्वतंत्र मजूर पक्ष महारांचा असला तरी तो महारांकरता भांडत नाही, तो भांडतो साऱ्या अस्पृश्यांकरता, भांडणामुळे जो लाभ होतो त्याचे वाटप करणे हे त्यांच्या हाती नाही, ते हाती आहे कॉंग्रेसच्या, महारांच्या पदरात शून्य, असे वाटप जर कॉंग्रेसने केले नाही, तर ती कॉंग्रेस कसली! स्वतंत्र मजूर पक्षाने हानि केली असेल ती महारांचीच. आपण, महार लोक मांगांवर जुलूम करतात असे लिहिले आहे. तो प्रकार आमच्याकडे नाही, आमच्याकडे उलट प्रकार आहे. चांभारांनी, मांगांनी काही खोडी काढली तरी महार गप्प असतात. त्यांना ठाऊक आहे की, मी या बाबतीत त्यांचा पक्ष घेणार नाही. आणि आपण बहुसंख्याक आहोत तेव्हा सोसले पाहिजे; अशी जबाबदारी त्यांना वाटते. आपल्याकडे उलट प्रकार आहे, याबद्दल खेद वाटतो. महारांविरुद्ध निजाम सरकारकडे दाद मागावी अगर आपण सत्याग्रह करावा. त्याला माझा पाठींबा राहील.

         शेवटी येव करा, त्येंव करा नाहीतर तुमचे मार्ग भिन्न अशी आपण जी निकराची भाषा वापरली आहे, तिच्यासंबंधी दोन शब्द लिहिणे आवश्यक आहे. अशी भाषा आपण वापरली नसती तर बरे झाले असते. गोवेकरीण जशी वाटेल तेंव्हा अडते, किंवा बेगुमान झालेली बायको उल्या, पुल्या करून, ‘घे मेल्या तुझे मंगळसूत्र (असे म्हणून) तोडावयास तयार होते मग कंटाळून ‘जाव जहन्नममे अशी म्हणण्याची पाळी (नवऱ्यावर) येते, तसा प्रकार होऊ देणे बरे नाही. भिन्न मार्गाने जावयाचे असेल तर जावे. त्याला मी हरकत करू शकणार नाही, किंवा त्याबद्दल मी काही उदास होऊन मला जे करावयाचे ते बंदही करणार नाही. मात्र भिन्न मार्ग कोणता याचा विचार करून मग तो पत्करावा, मांगाची उन्नति करून त्यांचा स्वाभिमान जागृत करणे, हा या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर तो स्तुत्य आहे. पण महारांशी काडीमोड करून, केवळ सनातनी हिंदू किंवा कॉंग्रेस यांची गुलामगिरी करणे, हाच जर या भिन्न मार्गाचा उद्देश असेल, तर त्यांत काही मांग व्यक्तींचा लाभ होईल, पण त्यात मांग जातीचा अनर्थ आहे, यात मला तरी काही शंका नाही, तरी मर्जीनुसार मार्ग चोखाळणे. पत्र बरेच लांबले, पण आपले उत्तर सविस्तर आले पाहिजे, असे फर्माविल्यामुळे संक्षिप्त लिहिता आले नाही.   

 

२.   यशवंत नरसिंह केळकर,  ६-७-१९३६, केसरी

रा. रा. केसरीकर्ते यांस-

       वि. वि. आपल्या तारीख ५ जून १९३६ च्या अंकात श्री. यशवंत नरसिंह केळकर यांचे पत्र छापण्यात आले आहे. त्यात पेशवाईच्या अंमलात अस्पृश्यांच्या गळ्यात थुंकण्याकरिता मडकी बांधली जात असत वगैरे जी विधाने मी माझ्या ‘जातपात तोडक मंडळा’च्या परिषदेकरिता तयार केलेल्या भाषणामध्ये केलेली आहेत त्यांना आधार दाखवा, असा प्रश्न त्यांनी मला केला आहे. वृत्तपत्रातील टीकेला उत्तर देण्याचा माझा शिरस्ता नाही व त्याप्रमाणे या पत्रालाही उत्तर देण्याची माझी इच्छा नव्हती. परंतु परवा माटे मास्तरांनी जी माझ्या भाषणावर तीन व्याख्याने दिली त्यांत त्या पत्राचा उल्लेख करून करून त्याला मी उत्तर देऊ शकलो नाही असे सखेदाश्चर्य विधान केलेले माझ्या पाहण्यात आले. आधार नाही म्हणून उत्तर नाही असा कदाचित माटे मास्तरांप्रमाणे इतर लोकांचा गैरसमज होण्याचा संभव आहे. म्हणून उत्तर देणे आवश्यक आहे असा काही मित्रांचा आग्रह असल्यामुळे मी. रा. केळकर यांच्या पत्राला उत्तर देत आहे.

       पेशव्यांच्या काळात हातात काळा दोरा, गळ्यात मडके व कंबरेला कुंचा वागवण्याची अस्पृश्य लोकांवर सक्ती केली जात असे ही कथा अस्पृश्य लोकांमध्ये कितीतरी दिवसांपासून प्रसृत झालेली आहे. ‘यत्र धूमस्तत्र वह्नि:’ या न्यायाने पाहता ही जी दंतकथा सर्व अस्पृश्य लोकांत पसरलेली आहे व जिचा अनुवाद (उल्लेख) अस्पृश्य लोकांतील वयोवृद्ध लोकांनी केलेला मी स्वत: ऐकला आहे, त्या दंतकथेला सत्याचा आधार काहीच नसेल असे मला तरी निदान म्हणता येणार नाही, दंतकथा ही इतिहासाच्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे असे सर्व इतिहासज्ञ मान्य करतात, ही गोष्ट रा. केळकर यांना नाकबूल करता यावयाची नाही. सर्वच गोष्टीला इतिहासाचा पुरावा देणे शक्य होणार नाही. निदान हिंदुस्थानात तरी ते अशक्य आहे. हिंदुस्थानातील लोकांना घडलेल्या गोष्टींची नोंद करून ठेवण्याची सवय नाही आणि म्हणून बऱ्याचशा घडलेल्या गोष्टी घडल्या असल्या तरी त्याला लेखी पुरावा देता येत नाही. शिवाय हल्ली जे इतिहाससंशोधक आहेत ते सर्वच सद्सदविवेकबुद्धीला जागून खरा इतिहास बाहेर पाडतील अशी फारशी आशा मला तरी वाटत नाही. आपल्या जातीचा इतिहास उज्ज्वल राहावा या हेतूने पुष्कळ इतिहाससंशोधकांनी हिंदू समाजातील अंतरव्यवस्थेवर प्रकाश पाडणाऱ्या काही महत्वाच्या कागदपत्रांची जाळपोळ केल्याचे मी ऐकले आहे.

      तसेच काहीजण आपल्याजवळ असलेले कागदपत्र प्रसिद्ध करण्यास तयार नसल्याचेही मी ऐकले आहे. पुण्यात पेशवाईत काही सोनार लोकांनी आपण दैवज्ञ ब्राह्मण आहोत असा आग्रह धरून आपली धर्मकृत्ये वेदोक्त रीतीने केली. ही गोष्ट पेशव्यांना कळल्यानंतर त्यांनी ज्या दैवज्ञ ब्राह्मणांनी वेदोक्त रीतीने धर्मकृत्ये केली त्यांच्या जीभा कापण्याचा हुकूम केला व ही सजा अंमलात आणण्याचा अधिकार कराड येथील ब्राह्मणांवर सोपविला. या हुकुमान्वये कराड येथील ब्राह्मणांनी दैवज्ञ ब्राह्मणांच्या जिभा कापल्या व त्याप्रमाणे पेशव्यांना कळविले. या प्रकरणाचे कागदपत्र एका ब्राह्मणाजवळ असल्याचे व आपण वाचल्याचे मला माझ्या एका मित्राकडून कळले आहे. परंतु ज्याच्याजवळ ते कागद आहेत तो गृहस्थ ते प्रसिद्ध करण्यास तयार नाही. अशी परिस्थितीत प्रत्यक्ष कागदपत्राचा पुरावा कोणास कसा देता येईल? व मला जर माझ्या विधानांना प्रत्यक्ष कागदपत्रांचा पुरावा देता आला नाही तर त्यात नवल काय? तथापि माझ्या विधानाच्या समर्थनार्थ मला जरी प्रत्यक्ष पुरावा देता आला नाही तरी एका मोठ्या सन्माननीय विद्वान व्यक्तीचा हवाला देता येण्यासारखा आहे. रा. यशवंत नरसिंह केळकर यांनी ‘मराठ्यांच्या संबंधाने उद्गार’ या कै. राजाराम रामकृष्ण भागवत यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या पान १०८ वर नजर फेकली तर मी केलेली विधाने काही भरमसाट लिहिण्याच्या हेतूने केलेली नसून त्यांना कै. राजाराम रामकृष्ण भागवत यांचा आधार आहे असे दिसून येईल.   

३.   श्रीपाद दामोदर सातवळेकर, पुरुषार्थ, जानेवारी १९३६

   रा. रा. श्रीपाद दामोदर सातवळेकर, संपादक पुरुषार्थ, यांस अनेक जोहर. आपल्या पुरुषार्थ मासिकाचा नोव्हेंबर महिन्याचा अंक मला पोहोचला. त्यातील ‘आंबेडकरांचे कर्तव्य या शीर्षकाखाली लिहिलेला आपला लेख मी वाचून पाहिला. त्याच्यानंतर दोन दिवसांनी आपले ता. २. १२ चे पत्र आले. आपल्याप्रमाणे इतर हिंदू लोकांनीही माझ्या धर्मांतरासंबंधाने बरेवाईट विचार प्रसिद्ध केलेले माझ्या वाचनात आलेले आहेत. परंतु त्यापैकी कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. इतर लेखकांनी जे लिहिलेले आहे. त्यापेक्षा आपल्या लेखात विशेष असे मला काही दिसून आले नाही आणि म्हणूनच आपले पत्र येईपर्यंत आपल्या लेखाला उत्तर देण्याचे कधीच माझ्या मनात आले नव्हते. तथापि ज्याअर्थी उत्तर यावे अशी मागणी केली आहे व त्यास प्रत्युत्तर देण्याची आपण जी उत्कंठा व्यक्त केली आहे, त्याअर्थी आपली निराशा करू नये एवढ्या कारणाकरिता आपल्या लेखासंबंधाने मला काय वाटते, ते मी आपणास लिहून कळवीत आहे.

     मी धर्माकरिता धर्मांतर करीत नसून व्यावहारिक फायद्याकरिता ते करीत आहे, असा माझ्यावर जे लोक आक्षेप करतात, त्यांपैकी आपण एक नाही, हे वाचून मला आनंद वाटतो. नफातोटा पाहून धर्मांतर करायचे ते करा, असा आपला सल्ला आहे. त्याची यथार्थता मला पटते. मी ते विसरलो नव्हतोच. पण आपण आठवण दिली, हे बरे केलेत. या धर्मांतराच्या सौद्यामध्ये जमाखर्चाचा जो तक्ता माझ्या समजुतीप्रमाणे मी तयार केला आहे. त्यात तोट्यापेक्षा नफा मला जास्त दिसतो. परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे नफ्यापेक्षा तोटाच जास्त आहे हे जरी खरे धरले, तरी ज्या कारणांमुळे मी धर्मांतर करू नये असे आपण म्हटले आहे ते खरे आहे. परंतु माझे महारपण नाहीसे झाल्यानंतर माझे मोठेपण लयास जाईल असे जे मत आपण व्यक्त केले आहे, ते एक तर माझ्या विद्वत्तेसंबंधी आपल्या अज्ञानाचे द्योतक असावे किंवा ब्राह्मणेत्तरांच्या विद्वतेसंबंधाने ब्राह्मणांच्या मनात वसत असलेल्या क्षुद्र बुद्धीचे द्योतक असावे. माझे महारपण गेले तरी माझी विद्वत्ता कायम मजजवळ राहणार आहे व ती काही लहानसहान नाही. ब्राह्मण जातीच्या विद्वानांच्याबरोबर मला तागडीत घातले असताना माझे पारडे कमी भरेल ही आपली भीती निरर्थक आहे. त्या विषयात पारंगत असलेल्या ब्राह्मण जातीतील कोणत्याही व्यक्तीशी मी बरोबरी  करू शकेन अशी माझी खात्री आहे. केवळ महार म्हणून राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये मला जागा मिळाली हे खरे असू शकेल. परंतु त्यातून काय सिद्ध झाले याचा पुरावा तपास आपण केला असता तर असे खुळे व वेडगळ विचार आपण पुढे मांडले नसते. म्हणून राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये हिंदूमधल्या गाजलेल्या व्यक्ती होत्या. त्यांत पुण्यातील ब्राह्मण जातीचे शिरोमणी तात्यासाहेब केळकर हेही होते. मांडीला मांडी लावून बसण्याचा योग सुदैवाने उभयतांस लाभला होता. त्याप्रसंगी मला त्यांची विद्वत्ता आणि त्यांना माझी विद्वत्ता ताडून पाहण्याची वेळ आली होती. त्यावेळच्या अनुभवावरून त्यांच्यापेक्षा विद्वत्तेने किंवा बुद्धिमत्तेने कमी आहे असे माझ्या स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. तेव्हा केवळ माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मला जे स्थान मिळेल ते मोठेच मिळेल, याच्याबद्दल मला काही शंका नाही. आडपडदा न ठेवता एवढे स्पष्ट लिहिण्याचे काही प्रयोजन नव्हते. परंतु आपल्यासारख्या ब्राह्मणाशिवाय दुसऱ्या कोणाही जातीच्या लोकांत बुद्धिमत्ता, विद्वत्ता नाही अशा दुर्मदाने माखलेल्या लोकांचा भ्रम नाहीसा करण्याकरिता तसे लिहिणे आवश्यक झाले, याबद्दल खेद वाटतो. माझे मोठेपण कायम राखण्याकरिता आपण जी चिंता प्रगट केली त्याबद्दल आपला मी आभारी आहे. मी कोठेही गेलो तरी माझ्या विद्वत्तेनुरूप व बुद्धीमत्तेनुरूप जे मोठेपण मला प्राप्त व्हावयाचे ते होईलच, याबद्दल आपण कसलीच चिंता बाळगू नये. परंतु अस्पृश्यांत राहिल्याशिवाय माझे मोठेपण राहणार नाही, हे जरी खरे धरले तरी माझे मोठेपण कायम राहण्याकरिता अस्पृश्य लोकांनी अस्पृश्यच राहावे, ही विचारसरणी अत्यंत विलक्षण, नव्हे वेडसरपणाची आहे, असे मला वाटते. आपल्या जातीचा व आपला मोठेपणा रहावा, याकरिता बाकीच्या लोकांना खाली कायमचे दडपून ठेवणे हा ब्राह्मणादी तत्सम जातींचा शिरस्ता होऊन बसला आहे. तसे जर नसते तर ब्राह्मणादी तत्सम जातींनी इतर जातींचा उद्धार करण्याकरिता त्या जाती आपल्या बरोबरीच्या होऊन आपला दर्जा कमी होईल अशा भीतीने केव्हाही कच खाल्ली नसती. परंतु आपले महत्व राखण्याकरिता दुसऱ्यांना नरकात डांबून ठेवणाऱ्या लोकांना मी नीच कोटीतील लोक समजतो. तशा नीचांपैकी मी नाही याची आपल्याला जाणीव नाही, असे वाटते. माझे महत्व जरी बुडाले तर बुडो, परंतु आमचे लोक वर यावेत हीच माझी एक भावना आहे, याशिवाय दुसरी भावना नाही याची आपण खात्री बाळगावी.

     ‘स्पृश्य लोक जाती लवकर मोडतील, पण अस्पृश्यच जाती सोडावयास तयार होणार नाहीत हे आपले म्हणणे खरेही असू शकेल. परंतु ‘ अस्पृश्यांतील जातिभेद मोडा, मग सर्व जाती मोडण्याचा प्रश्न हिंदूमहासभेपुढे मांडा असे जे आव्हान मला केले आहे, ते आव्हान स्वीकारण्यास मी राजी आहे. अस्पृश्यांतील जातिभेद मोडण्यास मी माझी पराकाष्टा करण्यास तयार आहे. परंतु जोपर्यंत अस्पृश्य समाज हिंदू समाजातील जातिभेदाच्या तांगडातांगडीत जखडून गेला आहे, तोपर्यंत त्या कार्याला कधीही यश येणे शक्य नाही. अस्पृश्यांतील जातिभेद मोडण्याला त्यांनी हिंदू धर्मातून फुटून निघणे हाच एक मार्ग आहे. महारांत जातिभेदाचे खूळ आहे हे दाखविण्याकरिता आपण महारणीशी संबंध असलेल्या ब्राह्मणाचे जे सातारा जिल्ह्यातील उदाहरण दिले त्याचा अर्थ मला काही समजत नाही.  महारणीशी लग्न करून तो ब्राह्मण राहिला असताना जर त्याला महारांनी घेतले नसते, तर महारांकडे दोष आहे असे मी मानले असते. परंतु जारकर्मी ब्राह्मणाला महारांनी अपंक्त ठरविला, त्यात त्यांनी वाईट काय केले, हे मला समजत नाही. ‘ब्राह्मण झाला भ्रष्ट तरि तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ह्या ब्राह्मण उक्तीप्रमाणे त्या जारकर्मी ब्राह्मणाला श्रेष्ठच मानावयास पाहिजे होते, असे आपले म्हणणे असल्यास ते कोणाही नीतिमान पुरुषास पटणार नाही असे मला वाटते.

       ‘आम्ही हिंदू आहो, हिंदूबरोबरच जगणार व हिंदूबरोबरच मरणार. हिंदू लोक आम्हांस जसे ठेवणार असतील तसे ठेवोत, पण आम्ही हिंदूंची, हिंदू धर्माची, हिंदू देवतांची अब्रू राखण्यासाठीच आपले सर्वस्व अर्पण करणार अशी घोषणा अस्पृश्यांनी करीत राहावी, म्हणजे हिंदूंच्या मनाला द्रव फुटून हिंदू लोक अस्पृश्यांकरिता पुष्कळसे काही करतील असा जो आपण पोक्तपणाचा सल्ला दिला आहे, तो दुसऱ्या कोणातरी अस्पृश्य पुढाऱ्याला पटेल, पण मी तो पत्करू शकणार नाही. एक तर आपला अनुभव माझ्या अनुभवाशी जुळता नाही. दाढीला हात लावून हिंदूंनी मोठेसे औदार्य दाखविले आहे असे एखादेदेखील उदाहरण मला आढळत नाही. पण त्यांची शेंडी धरून त्यांच्याकडून बरेचसे करवून घेतल्याची अनेक उदाहरणे माझ्या अनुभवावरून सांगता येतील. शिवाय हिंदू धर्म हा माझ्या मते धर्म नसून लोकांना वेडे करण्याची ही एक जडी आहे. हिंदू समाज हा वेडसर लोकांचा समाज आहे. असा वेडसर लोकांत राहण्याचा माझा इरादा नाही. अर्थात त्यांची मनधरणी करण्याची मला जरुरी नाही.  

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...