गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

घरे बाहेरे : स्त्रीप्रश्न, राष्ट्रवाद आणि सार्वजनिक चर्चाविश्व


     समकालीन  नवउदारमतवादी काळात आणि अर्थ-तांत्रिक वातावरणात सामाजिक शास्त्रांना अव्यवहार्य ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्रास सामाजिक शास्त्रांची काही गरज नाही असे बर्याच टिकाणी बोलले जात आहे. जे.एन.यु.च्या प्रकरणानंतर अनेक जनांनी सामाजिक शास्त्र बंद करून टाकावेत किंवा सामाजिक शास्त्राचीच विद्यार्थी अश्या देशविरोधी घोषणा देतात त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी धढे शिकवायला पाहिजे असे म्हणायला सुरुवात केली. “राष्ट्रवाद आणि देशभक्ती” राजकीय अजेंड्यामुळे देशभरातील चर्चाविश्व या विषयाच्या अवतीभोवती फिरत होते. “भारत माता कि जय” कि “जय हिंद” या वादानेही पुन्हा उचल खाल्यामुळे स्वतंत्रानंतर ८० वर्षानंतर जन्माला आलेल्या पिढीलाही आपला इतिहास या अनुषंगाने काहीप्रमाणात समजून घ्यावा लागला. नवउदारमतवादी धोरणामुळे पुन्हा नव्याने आर्थिक साम्राज्यवाद येवू पाहत आहे. यातून निर्माण झालेल्या जागतिक वर्गाने “जग एक खेडे” किंवा “ग्लोबल विलेज” हा भ्रम निर्माण करून दिला आहे. या ग्लोबल खेड्यात मोठ मोठ्या भांडवलदारांना एका दिवसात एका देश्यातून दुसर्या देश्यात सहज जाता येते परंतु सर्व सामान्य माणूस जावू शकत नाही. जाण्याचा प्रयत्न केला कि दुसर्या देश्यातील लोक त्याला घुसखोर म्हणून पकडतात. जागतिकीकरण आणि जग एक खेडे हे सर्व सामान्य लोकांसाठी एक भ्रमच आहे.

        पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत यादवीमुळे अनेकांनी युरोपात स्थलांतर केले. युद्ध आणि भूख यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपला देश सोडून निघाले आहे. स्थलांतरामुळे युरोपात नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. काही युरोपियन लोकांनी वसाहतीक काळात आपण केलेल्या अन्यायाची परतफेड करण्याची संधी म्हणून याकडे पहिले तर काहींनी या लोकांना आपल्यातील वाटेकरी म्हणून पहिले त्यामुळे अनेक प्रश्नांना युरोपला आता सामोरे जावे लागणार आहे. काही देश्यांमध्ये स्थलांतरविरोधी भुमिका घेणाऱ्या संकुचित राष्ट्रवादाला पुन्हा उभारी येतांना दिसत आहे. संकुचित राष्ट्रवाद हा आर्थिक संकटातून निर्माण होतो हे राष्ट्रवादाचा इतिहास पाहिल्यास आपणास दिसून येईल. जागतिकीकरणाच्या नवउदारमतवादी धोरणांमुळे जगभर सांस्कृतिक मोडतोड (Cultural Dislocation) होत असल्यामुळे उजव्या विचारांचा उदय संकुचित राष्ट्रावादासोबत होतांना दिसून येत आहे. सगळ्या देश्यातील अल्पसंख्याकांची भीती बहुसंख्याकांच्या मनात निर्माण केली जाते. उदा. श्रीलंकेत सिंहली बौध्द राष्ट्रवाद तेथील हिंदू,मुस्लीम यांना निशाना करतो, म्यानमार मधील बौध्द राष्ट्रवाद रोहिंग्य मुस्लिमांना निशाना करतो, पाकीस्थान मधील पंजाबी सुन्नीमुस्लीम राष्ट्रवाद हिंदू, ख्रिचन, अहमदिया मुस्लीम यांना निशाना करतो, भारतातील हिंदू राष्ट्रवाद मुस्लीम,ख्रिचन, दलित यांना निशाना करतो, युरोप-अमेरिकेतील कॅथोलिक आणि प्रोटेस्तंठ ख्रिचन राष्ट्रवाद हा मुस्लीम, आफ्रो-अमेरिकन,आशियाई लोकांना विरोध करतो.

       एवढे सविस्तर लिहिण्याचे कारण कि,घरे बाहेरे या बंगाली चित्रपटातून आपणास राष्ट्र, स्त्री,वसाहतवाद,मुस्लीम यासंदर्भात भाष्य करायचे आहे त्यामुळे आपणास या सर्व चर्चेचा परीघ किती विस्थारता येतो. याची कल्पना यावी म्हणून जागतिक समकालीन संदर्भांचा विचार मी प्रस्तवानेत केला आहे.   

चित्रपटाचे महत्व:

         घरे बाहेरे  हा चित्रपट अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. “चित्रपट अभ्यास” हि नवीन अभ्यास शाखाच जन्माला आलेली आहे. भारतातील चित्रपटाचा इतिहास पहिला तर आपणास जाणवेल कि अनेक अपत्यांपैकी चित्रपट हे सुद्धा वसाहतवादाचे अपत्य आहे. भारतातील राष्ट्रवाद हा प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद आहे कारण त्याचा जन्म वसाहतवादाच्या विरोधातून झाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटावरही राष्ट्रवादाचा प्रभाव पडलेला आपणास दिसतो. भारतीय राष्ट्रावादामध्ये ज्याप्रमाणे बंगाली स्कूलचा प्रभाव आपणास दिसून येतो त्याचप्रमाणे भारतीय चित्रपटावरही बंगाली स्कूलचा प्रभाव आहे. याच प्रवाहातील लोकांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटांचे ऐतिहासिक आणि काल्पनिक ढोबळमानाने असे दोन प्रकार केले जातात.घरे बाहेरे हा ऐतिहासिक चित्रपट नाही त्याचप्रमाणे तो निव्वळ काल्पनिक चित्रपटही नाही. दिग्दर्शकाने इतिहासाच्या पटलावर काल्पनिक पात्र उभे करून वसाहतीक काळात काय घडले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

        येथे असा प्रश्न उपस्थित होतो कि, चित्रपट खरच वास्तवात काय घडले हे सांगू शकतो का? चित्रपटात दाखवलेला इतिहास हा“वस्तुनिष्ठ इतिहास” आहे का? अश्यावेळी आपण इतिहासलेखनशास्त्र (Historiography) आणि इतिहासचित्रणशास्त्र (Historiophoty) यांच्या मर्यादा आणि महत्व समजून घ्यायला हवे. इतिहासलेखनशास्त्राचा विचार करतांना आपणास साधनांचा विचार करावा लागतो. पूर्वग्रहांचा विचार करावा लागतो. इतिहासचित्रणशास्त्राचा विचार करतांना प्रेक्षकांचा, दृकश्राव्य साधनाचा अश्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो त्यामुळे दोहोंच्याही काही मर्यादा असतात. तरीही इतिहासाचा आशय घेवून निर्माण करण्यात आलेली चित्रपट तत्कालीन समाजाचे दृकश्राव्य चित्रण आपणासमोर करतात त्यामुळे अनेक गोष्टींची आपणास उकल होते त्या अर्थाने घरे बाहेरे हा चित्रपट उत्तम कलाकृती आहे.

चित्रपटातील स्त्रीप्रश्नाचे द्वंद्व:

           एकोणिसाव्या शतकामध्ये प्रथम भारतामध्ये स्त्री सुधारणेला सुरुवात झालेली आपणास दिसते. त्यामध्ये इंग्रजी शिक्षण,पाश्यात्य शरीरविज्ञान,वासाहतिक आधुनिकता, राजकीय-सामाजिक जागृती व व्हिक्टोरियन नैतिकता याचा मोठा प्रभाव आपणास दिसुन येतो. एकोणिसाव्या शतकात इग्लंड विक्टोरिया राणीची सत्ता असल्यामुळे ‘विक्टोरियन काळ’ म्हणून हा कालखंड युरोपात ओळखला जातो.या  काळात लैंगिकतेला, नैतिकतेला,धर्माला आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांला घेवून खूप चर्चा झाली व काही प्रमाणात कायदेही झाले.याच काळात John Stuart Mill सारखा माणूस ‘Subjection of Women’ लिहितो. याच काळात दिझरेलीच्या म्हणण्यानुसार असे दिसून येते कि, श्रीमंत आणि गरीब अशा दोन राष्ट्रांमध्ये इंग्लंड विभाजित झालेले आहे...निश्चितपणे असे दिसते कि,विक्टोरियन काळात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्याप्रमाणात श्रीमंतामध्ये व गरीबांमध्ये आर्थिक विषमता वाढली.मध्यम वर्गाच्या व्यापारी यशाबरोबर शुभवर्तनवादी चळवळ मोठ्याप्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली,तिने मागच्या शतकातील मुक्त  असलेली लैंगिकता संपवून टाकली.युरोपात घडत असलेल्या या सर्व गोष्टींचा भारतीय समाजावर मोटा परिणाम पडत होता. याच काळात स्त्रीविषयक अनेक कायदे भारतात करण्यात आले. अनेक प्रथांना बंदी घालण्यात आली, स्त्रियांना शिक्षण मिळू लागले,परंतु हे काही सहजासहजी झाले नाही. स्त्रीप्रश्नाचे द्वंद्व समजून घेण्यासाठी सुद्धा बहुप्रवाही अन्यथा  आपणास ते समजून गेता येणार नाही.

        चित्रपटातील कालखंड हा १९०० ते १९३० च्या जवळपासचा आहे कारण चित्रपटात बंगालच्या फाळणीवरही भाष्य करण्यात आले आहे.देशात विषेत: १९१० नंतर स्वदेशी चळवळीचा उदय झालेला आहे आणि १९२० -३०  या दशकात मोठ्या प्रमाणात देशभर दंगली भडकल्या होत्या. चित्रपटचा शेवटही दंगलीने झालेला आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या पहिल्या तीन दशतकात या घटना घडलेल्या आहेत. इतिहास समग्रतेत समजून घ्यायचा असतो. चित्रपट जरी १९००-१९३० च्या दरम्याच्या कालखंडावर असला तरी या कालखंडाची पार्श्वभूमी १९ व्या शतकात झालेली आहे. थोड्या प्रमाणात हाच मुद्दा वर आलेला आहे.

          इंग्रजी शिक्षण, वसाहतीक आधुनिकता, ख्रिचन मिशनरींची हिंदूधर्मावरील टीका, कायद्याचे राज्य, अमानुष प्रथांना बंदी या सर्व गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपणास वसाहतीक काळातील स्त्री घडण्याची प्रक्रिया समजून घेता येणार नाही. पौर्वात्य-पाश्चिमात्य,आत्मटीका-आत्मागौरव, आधुनिकता-परंपरा, अभिजन-बहुजन अश्या बहुप्रवाही द्वंद्वात तत्कालीन समाज सापडला असल्यामुळे काय भुमिका घ्यावी यावरून वैचारिक कोंडी अनेकांची झालेली आपणास दिसते. याबहुप्रवाही द्वंद्वाच्या प्रक्रियेत वसाहतीक काळात “नवी स्त्री” घडविली जात होती. आधुनिकेतेला विरोध करण्यासाठी “नवीन परंपरा” निर्माण करण्यात आल्यात. या परंपरांनी नवीन स्त्रीचे प्रारूप निर्माण केले. व्यापक पातळीवर विचार केला तर आपणास दिसेल कि, वसाहतीक ज्ञानातून निर्मित हिंदूधर्माच्या (Not Dharma, Religion) प्रक्रियेने स्त्री घडण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकला आहे. दरम्यानच्या काळातच वसाहतवादाला विरोध म्हणून उभ्या राहिलेल्या वसाहतीक ज्ञाननिर्मित राष्ट्रवादाने “स्व” निर्माण करतांना “इतर” ची हि निर्मिती केली. त्याचा स्त्रीच्या ‘स्व’निर्मितीवरही प्रभाव पडला त्यामुळे वसाहतीक काळात ती इतारच्या विरोधात बोलतांना दिसते. या प्रक्रियेत ज्या स्वरूपात स्त्री घडवली गेली. ते स्वरूप “उच्जातीय हिंदू ब्राह्मण” स्त्रीचे होते. त्यालाच बंगालमध्ये “भद्र महिला” म्हटले गेले. चित्रपटात बिमला चे रूप भद्र महिलेचे आहे. मुस्लीम विरोधाची किनार त्या स्त्री घडवण्याच्या प्रक्रियेला आहे. चित्रपट निखील आणि बिमला यांचा एक संवाद आहे. त्यामध्ये निखील हा स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला मुस्लीम जबाबदार असल्याचे बोलतो. हाच निखील बिमला या आपल्या बायकोला इंग्रजी शिकवण्यासाठी इंग्रज बाईला आपल्या घरी शिकवणूकीसाठी बोलावत असतो. यामुळे इंग्रजी गाणे शिकलेली बिमला एका दिवशी माजघरात इंग्रजी गाणे म्हणत असते त्यावेळी निखील तिला इंग्रजी गाणे बंद करून बंगाली गायला सांगतो. या प्रसंगातून उच्चजातीय हिंदू भद्रलोकांची काय वैचारिक आणि नैतिक कोंडी त्याकाळात झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो.

        आधुनिकता आणि परंपरांच्या ओझ्याखाली असणाऱ्या या समाजात स्त्रियांच्या दोन परस्पर विरोधी प्रतिमा आपणास दिसतात. चित्रपटातही बिमला आणि तिची नणंद\भावजय दोन वेगवेगळे स्थान असलेल्या स्त्रिया आपणास दिसतात. लैगिकता, संस्कार आणि नैतिकता यासंदर्भात या दोन स्त्रियांमध्ये ताणताणाव निर्माण झालेला दिसतो. चित्रपटाच्या सुरुवातीला बिमलाचे संबंध तिच्या नणंदेशी\भावजयीशी चांगले असतात. परंतु बिमलाचा संदीपशी आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादी चळवळीशी संबंध आल्याने दोघींमधील नाते दुरावते. येथे आपणास खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचा आणि राष्ट्रीय चळवळीचा संबंध दिसतो. बिमलाची विधवा असलेली नणंद हि खाजगी क्षेत्रात असली तरी तिला ज्या पद्धतीने राहावे लागते आहे त्यावरून तिचे दुख आपणास दिसते. त्याचवेळी राष्ट्रवादी चळवळीच्या निमित्ताने खाजगी क्षेत्राची पायरी ओलांडून बाहेर सार्वजनिक क्षेत्रात येणाऱ्या बिमलाचाही देशभक्तीच्या नावाखाली कसे शोषण होते. हे तिलाही कळत नाही. चित्रपटात सातत्याने वंदे मातरम ची घोषणा दिली जाते. वंदे मातरम च्या निमित्ताने सार्वजनिक आणि खाजगी पातळीवर स्त्री प्रश्न चर्चिला जातो. स्त्री एक आदर्श माता, आदर्श नारी, आदर्श पत्नी  या स्वरुपात स्त्री प्रश्नाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झालेली आपणास दिसते.

         स्त्री प्रश्न आणि राष्ट्रवाद याची मोठ्या प्रमाणात गुंतागुंत चित्रपट झालेली आहे. चित्रपटात राष्ट्रवादी चळवळी संबधित असणाऱ्या (तथाकथित?) क्रांतिकारी संदीप ह्याला एकूण सर्व भद्र्लोकांमध्ये आदरपूर्ण स्थान असते. सर्व त्याग करून देश्याच्या स्वातंत्रासाठी लढतोय म्हणून अनेक जन त्याला मदत करत असतात. निखील हा संदीपचा वर्गमित्र असतो. निखिलच बिमलाची ओळख संदीपशी करून देतो. त्यातून संदीपची व बिमलाची मैत्री वाढत जाते. मैत्री वाढण्यामागे एक आदरयुक्त भाव बिमलाच्या मनात असतो त्या भावाचे रुपांतर हळू हळू लैंगिक आकर्षणात होते. चित्रपटात एक संवाद आहे त्यामध्ये बिमला संदीपला म्हणते कि “माझा नवरा खूप थंड आहे”. नवऱ्याच्या तुलनेने संदीप हा शौर्यवान आणि हिम्मतवान आहे त्यामुळे कळत नकळत ती संदीपकडे जाते. संदीपची बिमलाला आपल्या राजकारणासाठी वापरायचे हि योजना असतेच त्यातून दोघांमध्ये लैंगिक संबंध येतात. येथे राष्ट्रवाद आणि आक्रमकता यांचा संबंध दिग्दर्शकाने अप्रत्यक्ष्यपणे दाखविला आहे. राष्ट्रवादाच्या एकूणच चर्चाविश्वात आक्रमता केंद्रस्थानी राहिली आहे त्यामुळे राष्ट्रवाद हा खूप पुरुषी आणि हिंसक आहे हि त्यावरील टीका मला योग्य वाटते.

        चित्रपट बघितल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अनेक गोष्टींचे आंतरसंबंध कसे निर्माण होतात यासंदर्भात चित्रपट चांगल्याप्रकारे भाष्य करतो.      


टीप - २०१६ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रांतीजोती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रात 'certificate course' साठी लिहिलेले चित्रपट परीक्षण. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...