बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

डॉ. आंबेडकर आणि धर्म

डॉ. आंबेडकर आणि धर्म


     धर्मांधता आणि धार्मिकता यामध्ये फरक केला पाहिजे अशी चर्चा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु झालेली दिसते. सोबतच, दीर्घ इहवादी/ धर्मनिरपेक्षतावादी राजकारणाच्या प्रभावामुळे धर्माची मानव कल्याणाची बाजू दुर्लक्षिली गेली होती आणि त्यामुळेच धर्मांधतेचे राजकारण आव्हान म्हणून उभे राहिलेले आहे असेही काहीसे म्हटले जात आहे. यातून बाहेर पाडायचे असेल तर धर्माचा सकारात्मक उपयोग करून धर्मांध राजकारणाला आव्हान देता येवू शकते असेही काहींचे मत आहे. हिंदुत्व, हिंदूराष्ट्र, सनातन यांच्या माध्यमातून जे धर्मांधतेचे राजकारण खेळले जात आहे. त्यामुळे भारताचे सामाजिक, बौध्दिक, मानसिक आरोग्य खालावत आहे. धार्मिक भावना एवढ्या नाजूक झाल्या आहेत की, त्या व्यंगचित्र, सोशलमिडिया पोस्ट, कॉमेडी, भाषण यासारख्या कोणत्याही गोष्टींमुळे दुखावल्या जात आहेत. भारताप्रमाणेच जगभरात धर्माचा आधार घेवून उजव्या शक्ती लोकशाही, मानवी हक्क, समता आणि उदारमतवाद या सगळ्यांना उधवस्त करतांना दिसत आहे. अशा काळात धर्माचा साकल्यांना विचार करण्याची अत्यंत गरज आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात भारतात आणि महाराष्ट्रात गंभीर धर्मचिकित्सा आणि धर्मचर्चा झाली आहे. आज मात्र, धर्मचर्चा आणि धर्मचिकित्सेचा प्रांत काहीसा शांत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राच्या समाजचिंतन, धर्मचिकित्सेच्या प्रक्रियेचे अपत्य आहेत. सोबतच, त्यांनीही धर्मचिकित्सेचा भूप्रदेश विस्तारलाही आहे. त्यांचे विचार आजही आपणास या बाबतीत दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणून, प्रस्तुत लेखात डॉ. आंबेडकरांच्या धर्मविषयक मतांची चर्चा करण्यात येणार आहे. 

डॉ. आंबेडकरांचा धर्मविषयक दृष्टीकोन! 

     डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात धर्माला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. मात्र, त्यांचा धर्मविषयक दृष्टीकोन समजून घेण्यासाठी काही गोष्टी स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजेत. डॉ. प्रदीप गोखलेंच्या मते, डॉ. आंबेडकर व्यापक अर्थाने धार्मिक होते. व्यक्तीचे आणि एकूण समाजाचे कल्याण ज्यात सामावलेले आहे. अशी जीवनपद्धती म्हणजे धर्म. या व्यापक अर्थाने ते धार्मिक होते. मात्र, धर्म म्हणजे जीवनपद्धतीत विशिष्ट श्रद्धांचा, समजुतींचा, कर्मकांडाचा अटळ म्हणून समावेश केला की, धर्माची संकुचित, सांप्रदायिक कल्पना तयार होते. अशा संकुचित अर्थाने ते धार्मिक नव्हते. कारण त्यांनी बुद्धीची आणि विवेकाची दारे खुली ठेवली होती. डॉ. आंबेडकरांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सामाजिक आणि व्यावहारिक होता. मात्र, त्यांना धर्माशिवाय माणूस राहू शकत नाही याचीही जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक समाजाला धर्माची गरज असते हे एडमंड बर्क यांचे मत स्वीकारले होते. परंतु यासोबतच त्यांना धर्माच्या आधारे लोकांचे शोषण, पिडण आणि दमन केले जाते. त्यांच्यावर गुलामगिरी लादली जाते याचीही जाणीव होती. 

       ‘जातीव्यवस्थेचे निर्मूलन’ या पुस्तकामध्ये डॉ. आंबेडकरांनी जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर धर्म नष्ट करायला हवा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आणि सोबतच धर्म नष्ट करायचे म्हणजे काय हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील पुस्तकात डॉ. आंबेडकर लिहितात की, “जात म्हणजे हिंदूंना मुक्तपणे मिसळण्यास अडथळा निर्माण करणारी, पाडून टाकता येण्यासारखी विटांची भिंत किंवा काटेरी तारेसारखी भौतिक वस्तू नाही. जात ही जाणीव आहे, एक मानसिक अवस्था आहे. म्हणूनच जातीचे निर्मूलन म्हणजे भौतिक अडथळ्यांचे निर्मूलन नव्हे. जातीनिर्मूलनाचा अर्थ जाणिवांमध्ये बदल असा आहे. जात वाईट असू शकेल. जात, माणसाचे माणसाशी अमानुष म्हणावे असे, पशुतुल्य वर्तन करण्याच्या दिशेने नेऊ शकते. तरीपण हे मान्य केले पाहिजे की, हिंदू लोक जात पाळतात याचे कारण ते अमानुष आहेत किंवा त्यांच्या डोक्यात बिघाड आहे. हे नव्हे. ते जात पाळतात कारण ते धार्मिक आहेत. जात पाळण्यात लोकांची चूक नाही. चूक जातीची भावना त्यांच्या मनावर ठसविणाऱ्या धर्माची आहे असे माझे मत आहे.” पुढे त्यांनी असेही नोंदवले आहे की, शत्रू जात पाळणारे लोक नसून त्यांना जातीचा धर्म शिकवणारी धर्मशास्त्रे आहेत. आंतरजातीय भोजने किंवा आंतरजातीय विवाह करीत नाहीत म्हणून लोकांवर टीका करणे, त्यांचा उपहास करणे ही कुचकामी पद्धत आहे. धर्मशास्त्रांच्या पवित्र्यावरचा विश्वास ध्वस्त करणे हा त्यावरचा खरा उपाय आहे.

       जातीव्यवस्था नष्ट करायची असेल धर्म नष्ट करायला पाहिजे या डॉ. आंबेडकरांच्या मताचा वर उल्लेख आला आहे. डॉ. आंबेडकरांनी लिहिले आहे की, “ त्या व्यवस्थेला खिंडार पडण्याची इच्छा असेल तर विवेकाला नकार देणाऱ्या वेद आणि धर्मशास्त्रांना, नैतिकतेला नकार देणाऱ्या वेद आणि धर्मशास्त्रांना सुरुंग लावलाच पाहिजे...श्रुती आणि स्मृतींचा धर्म नष्ट करावाच लागेल.” इथे एक मुद्दा स्पष्टपणे नोंदविला पाहिजे. तो म्हणजे डॉ. आंबेडकर वेद आणि धर्मशास्त्र हे विवेव आणि नैतिकता विरोधी आहेत असे नोंदवत आहेत. त्यांच्यामते वेद आणि धर्मशास्त्रांमध्ये विवेक आणि नैतिकता नाही. त्यामध्ये पक्षपात आणि भेदभाव आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की, त्यांना नष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. सोबतच, धर्माचा विनाश या माझ्या संकल्पनेचा अर्थ कदाचित काहींना कळणार नाही. काहींना ती कल्पना क्षोभजनक वाटेल तर काहींना ती क्रांतिकारी वाटेल. म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट करतो. असे म्हणत डॉ. आंबेडकर तत्व आणि नियम यामधील फरक सांगतात. धर्म हा नियम बनल्यामुळे कोणते अडथळे येतात आणि धर्माला तत्व म्हणून समजून घेतल्यावर कोणते मार्ग सापडतात याची चर्चा त्यांनी केली आहे. नियम हे व्यावहारिक असतात; वहिवाटीप्रमाणे कृती करण्याची ती उपयुक्त पद्धत आहे. परंतु तत्वे बौद्धिक असतात; गोष्टीचे परीक्षण करण्यासाठी ती उपयुक्त पद्धत आहे. वेद, धर्मशास्त्र यात सांगितलेला धर्म हा यज्ञविषयक, सामाजिक, राजकीय, शुध्दी -अशुध्दी नियम आणि कायद्याची सरमिसळ आहे. त्यालाच हिंदू लोक धर्म म्हणतात असे डॉ. आंबेडकरांनी नोंदविले आहे आणि यामध्ये वैश्विक असलेला, सर्व वंशांना, देशांना, सर्वकाळात लागू होण्यासारखी अध्यात्मिक तत्वे या अर्थाचा धर्म दिसत नाही असेही स्पष्टपणे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच, जेव्हा डॉ. आंबेडकर धर्माच्या विनाशाची चर्चा करतात तेव्हा धर्माची गरज नाही गरज नाही असे त्यांना म्हणायचे नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे. नियम आणि कायद्याने लादलेल्या धर्माचा विनाश त्यांना अभिप्रेत होता आणि तत्वांना केंद्रस्थानी ठेवणारा धर्म त्यांना पाहिजे होता. 

डॉ. आंबेडकरांची धर्मचिकित्सा 

        डॉ. आंबेडकरांनी हिंदूधर्माची सुरुवातीला धर्मसुधारणेसाठी आणि नंतर धर्मांतरासाठी कठोर चिकित्सा केली हे सर्वश्रुत आहे. परंतु यासोबतच हेही आवर्जून लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे की, डॉ. आंबेडकरांनी हिंदूधर्मासोबत ख्रिस्तीधर्म, इस्लामधर्म, शीखधर्म आणि बौद्धधर्माचीही चिकित्सा केली आहे. या अर्थाने ‘सर्वधर्मचिकित्सावादी’ होते.  म्हणूनच, डॉ. आंबेडकरांची धर्मचिकित्सा व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. धर्माचे प्रत्यक्ष व्यवहारात कार्य कसे घडते हा डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. या दृष्टीकोनातून जी धर्मचिकित्सा केली तीला उपयुक्ततावादी धर्मचिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून जी धर्मचिकित्सा डॉ. आंबेडकरांनी केली तीला बुध्दीप्रामाण्यवादी धर्मचिकित्सा असे प्रदीप गोखले म्हणतात. हिंदू धर्माची आंबेडकरकृत धर्मचिकित्सा ही उपयुक्ततावादी धर्मचिकित्सा आहे.  कारण त्यामध्ये प्रामुख्याने हिंदूधर्मियांच्या समाज व्यवहारातील अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, जातिभेद तत्सम गोष्टींची चिकित्सा आहे.  दुसरीकडे, बौद्धधर्मचिकित्सा ही बुध्दीप्रामाण्यवादी चिकित्सा आहे कारण त्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म आणि बुध्द चरित्राचे निर्गुढीकरण आणि निर्मिथकीकरण केले आहे. बौध्द धर्मातील पारंपारिक समजुतींना त्यांनी नाकारले आहे. अवैज्ञानिक गोष्टी नाकारल्या आहेत आणि बौध्द धर्माचे आधुनिक, विवेकवादी पध्दतीने विश्लेषण केले आहे.  

        डॉ. आंबेडकर धर्मचिकित्सावादी असल्यामुळे त्यांचा सर्वधर्मसमभावाला विरोध होता. कारण सर्वधर्मसमभाव या तत्वामध्ये सर्व धर्मांचा कर्ता एकच आहे फक्त मार्ग वेगवेगळे आहेत अशी मान्यता आहे. त्यामुळे सर्व धर्म समान आहेत. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे नीट आचरण करावे. म्हणजेच माणसाने इतर धर्मांबद्दल आदर बाळगावा पण स्वतःचा धर्म सोडू नये अशी भूमिका सर्वधर्मसमभाव या तत्वामागे आहे. डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांचा सर्वधर्म सारखे आहेत आणि ईश्वरनिर्मित आहे यावर विश्वास नव्हता. तसेच, धर्म हा ईश्वरनिर्मित नसून तर मानवनिर्मित आहे अशी त्यांची भूमिका होती. सर्वधर्मसमभाव हे तत्व नाकारल्यावर धर्मांमध्ये तरतमभाव करता येतो. त्याआधारेच एखाद्या धर्माचा त्याग, धर्मांतर आणि नव्या धर्माची स्थापना या साऱ्यांचे समर्थन शक्य होते असे प्रदीप गोखले यांनी म्हटले आहे. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतरवादी भूमिका घेवून हेच सिध्द केली ही धर्मचिकित्सेच्या माध्यमातून कोणता धर्म मानवाला सन्मान देवू शकतो आणि कोणता धर्म गुलामी लादतो याचीही चर्चा केली. ‘धर्म’ आणि ‘धम्म’ यांच्या संदर्भात केलेली डॉ. आंबेडकरांची धर्मचिकित्सा  अत्यंत महत्वाची आहे. तसेच, बुध्द आणि त्याच्या धर्माचे भवितव्य’ या निबंधात डॉ. आंबेडकरांनी ‘प्रचलित धर्म’ आणि ‘आदर्श धर्म’ या कल्पना मांडल्या आहेत. डॉ. आंबेडकरांच्या प्रचलित धर्म कल्पनेत ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक या कल्पना आहेत. पोथीनिष्ठा आहे. कर्मकांड आहे. श्रद्धेचे प्राबल्य आहे. माणसाचा ईश्वराशी असलेला संबंध मुख्य मानला आहे व त्या तुलनेत माणसामाणसांमधील संबंध व त्याला व्यापणारी निती गौण किंवा उपरी ठरवलेली आहे आणि दुसरीकडे आदर्श धर्म कल्पनेत अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वर, आत्मा यांसारख्या बुध्दीच्या कसोटीवर न टिकणाऱ्या कल्पनांना मुळीच स्थान नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाशी जे सुसंगत असेल आणि नितीमूल्यांना ज्यात स्वयंभू आणि मध्यवर्ती स्थान असेल, ज्यात सामाजिक दु:खावर तोडगा आहे असे विश्लेषण प्रदीप गोखलेंनी डॉ. आंबेडकरांच्या प्रचलित धर्म आणि आदर्श धर्माचे केले आहे. 

      डॉ. आंबेडकरांनी आदर्श धर्माच्या संदर्भात तीन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. १. धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. २. धर्माने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुलभूत सिध्दांतांना मान्यता दिली पाहिजे आणि ३. धर्माने दारिद्र्याचे उदात्तीकरण करता कामा नये. बौध्द धर्माच्या अभ्यासाने डॉ. आंबेडकरांना बौध्द तत्वज्ञानात आदर्श धर्माची तत्वे दिसली म्हणून त्यांनी जाहीरपणे सार्वजनिक पातळीवर आपल्या अनुयायांसह बौध्द धर्माशी दीक्षा घेतली आणि बौध्द धर्माचा नवा अर्थ लावला. त्यालाच अलीकडच्या काळात ‘ नवयान बौध्दधर्म/ आंबेडकरी बौध्दधर्म’ असेही म्हणतात. बौध्द राष्ट्रांमधील काही सनातनी बौध्द भिखूंनी ‘बुध्द आणि त्याचा धम्म’ या डॉ. आंबेडकरकृत ग्रंथाच्या प्रती जाळल्या होत्या. हिंदू धर्म आणि बौध्द धर्म यांची तुलना करतांना डॉ. आंबेडकर धर्म आणि धम्म यामध्ये फरक करतात आणि बुद्धाने सांगितलेला धर्म नसून धम्म असे एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे बौध्द धर्म हा प्रचलित धर्म नसून आदर्श धर्म आहे असेही म्हणतात. तसेच, बौध्द धम्म आणि मार्क्सवाद यांची तुलना करतांनाही त्यांनी बौध्द धम्माला त्यांनी धर्मच म्हटले आहे.  ही एक त्यांची विचारातील विसंगती दिसते. 

समारोप

      डॉ. आंबेडकरांच्या धर्मविषयक दृष्टीकोन आणि धर्मचिकित्सा याचा बारकाईने अभ्यास केल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, त्यांनी धर्माची सामाजिक, व्यावहारिक, वैज्ञानिक अशा वेगवेगळ्या पातळीवर चिकित्सा केली ती मानवी जीवन समृध्द करण्यासाठी. धर्माच्या नावावर होणारे शोषण, दमण यांना त्यांनी विरोध केला आहे. तसेच, नियम आणि कायद्यांनी लादलेला धर्म हा मानवी जीवनात अडथळे उत्पन्न करत आहे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नांदू देत नाही अशी त्यांनी टीका केली आहे. म्हणूनच, आदर्श धर्माची त्यांनी कल्पना मांडली आणि बौध्द धर्म स्वीकाराच्या माध्यमातून ती कृतीतही आणली आहे.  धर्माच्या नावाने शोषण केले जात असेल तर धर्माच्या माध्यमातूनच पर्याय देता येवू शकतो आणि मानवी जीवन उन्नत करता येवू शकते असा संदेश डॉ. आंबेडकरांनी दिला आहे. धर्माला मानवकेंद्री आणि समाजाभिमुख करण्याचे काम त्यांनी केले आहे. यालाच आपण मुक्तीवादी धर्मशास्त्र (Liberation Theology) म्हणू शकतो. काही दशकांपूर्वी दक्षिण अमेरिकेत धर्मांध राजसत्ता उलथवून टाकण्यामध्ये तिकडच्या मुक्तीवादी धर्मशास्त्र चळवळींचा मोठा वाटा होता. त्याचीच गरज आज संपूर्ण जगाला आहे. कारण जगभरात धर्माच्या नावाखाली धर्मांध हिंसाचार चालू आहे अशावेळी धार्मिक मानवतावाद आपणास काहीसा मार्ग दाखवू शकतो. डॉ. आंबेडकरांच्या धर्मविषयक दृष्टीकोन आणि धार्मिक चिकित्सा म्हणूनच आजही प्रासंगिक आहे. 

संदर्भ-

  1. आंबेडकर बी. आर., अनु. प्रकाश सिरसट, जातीव्यवस्थेचे निर्मूलन, डॉ. बा. आं. च. सा. प्र. समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, द्वितीय आवृत्ती, २०१८

  2. गोखले प्रदीप, डॉ. आंबेडकरांचे धम्मचक्रप्रवर्तन, क्रांतिसिंह नाना पाटील अकादमी, प्रकाशन वर्ष नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...