न्यायमूर्ती रानडेंची पत्नी म्हणून रमाबाई रानडे प्रसिद्ध आहेत. मात्र त्यापेक्षा त्यांची अत्यंत महत्वाची ओळख ही स्त्री शिक्षण, स्त्री आरोग्य आणि स्त्री हक्क यांच्यासाठी सतत प्रयत्नरत असणाऱ्या सर्जनशील आणि लढाऊ कार्यकर्त्या अशी आहे.
२५ जानेवारी १८६२ रोजी
देवराष्ट्रे या सातारा जिह्यातील आणि खानापूर तालुक्यातील गावात त्यांचा जन्म
इनामदार कुटुंबात झाला होता. त्याकाळी, स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी होती. त्यामुळे न्या.
रानडे यांच्यासोबत लग्न होईपर्यंत त्यांना शिक्षण घेता आले नाही. १८७३ मध्ये लग्न झाल्यावर न्या. रानडे हे जरी
रमाबाईंच्या शिक्षणाच्या बाजूने असले तरी त्यांच्या घरातील मंडळी मात्र त्यांच्या
शिक्षणाच्या विरोधात होती. स्त्रियांनी शिकू नये आणि शिकलेच तर पोथ्या – पुराणे
वाचण्यापुरते शिकावे अशी त्या काळाची धारणा होती. रमाबाई रानडे मात्र या पलीकडे
जावू पाहत होत्या. न्या. रानडे हे पुणे शहरातील सार्वजनिक जीवनात अग्रभागी होते.
त्यामुळे रमाबाईही सार्वजनिक कार्यात सहभागी होवू लागल्या.
आर्य महिला समाज ते सेवा सदन
पुण्यामध्ये १८७१ मध्येच स्त्री विचारती सभा
स्थापन झाली होती आणि तिच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा घडवून
आणली जात होती. रामबाई रानडे लग्नानंतर पुण्यात आल्यावर या संस्थेशी जोडल्या
गेल्या होत्या. १८८२ मध्ये पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली
होती. समाजाच्या वतीने दर शनिवारी पंडिता रमाबाई यांची व्याख्याने आयोजित केली जात
होती. तसेच, काहीवेळा इतर स्त्रियांची निबंधही वाचली जात होती. रमाबाई रानडे यांनी
‘ स्त्रियांना आवश्य विद्या कोणती?’ आणि ‘ स्त्रियांचे सांसारिक कर्तव्ये’ अशी दोन
निबंध वाचले होते. आर्य महिला समाजामुळे रमाबाई रानडे स्त्रियांच्या समस्या, प्रश्न या मुद्द्यांशी
जोडल्या गेल्या होत्या. पुढे, १८९५ मध्ये रमाबाई रानडे यांनी ‘ हिंदू लेडीज
सोशल अंड लिटररी क्लब’ ची स्थापना केली. स्त्रियांनी सुशिक्षित व्हावे सामाजिक बाबतीत
परोपकाराच्या बुद्धीने इतर देश भगिनींच्या उपयोगी पडावे असा या क्लब स्थापणेमागील
उद्देश होता. या क्लबच्या माध्यमातून
त्यांनी स्त्रियांमध्ये ज्ञानप्रसार व्हावा म्हणून प्रौढ स्त्रियांना शिक्षण द्यायला
सुरुवात केली. त्यामध्ये शिवणकाम, भरतकाम,
लिहिणे, वाचणे, हिशोब करणे – असा गोष्टींच्या स्त्रियांच्या शिक्षणात समावेश होता.
१९०८ मध्ये मुंबई आणि १९०९ मध्ये पुण्यात सेवा
सदनची स्थापना झाली. रमाबाई रानडे या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षा होत्या. पुण्यामध्ये
रमाबाई रानडेंनी सेवा सदनच्या माध्यमातून मुलींसाठी, विधवा स्त्रियांसाठी अत्यंत
भरीव कामे केली आहेत. शाळा, वसतिगृह यांची निर्मिती करून स्त्रियांना शैक्षणिक
प्रवाहात आणले. तसेच, त्याकाळात वैद्यकीय सेवांचा अभाव कमतरता होती म्हणून १९१०
मध्ये रमाबाईंनी ससून हॉस्पिटलचे डॉ. स्मिथ यांच्या साह्याने सेवासदन मधील
मुलींसाठी नर्सिंगचा कोर्स सुरु केला. १९१७-१८ मध्ये ज्यावेळी एनफ्लुन्झाची साथ
पुणे शहरात पसरली होती. त्यावेळी, सेवा सदनमधील नर्सेसनी वैद्यकीय मदत पुण्यातील
जनतेला केली.
महिला हक्क, सक्तीचे शिक्षण आणि
मताधिकार
राष्ट्राची प्रगती करायची असेल तर स्त्रियांचे कल्याण करावेच लागेल ही जाणीव एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी निर्माण झाली. तत्पूर्वी, स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रामुख्याने पुरुषांचाच सहभाग होता. १९०४ मध्ये मुंबई मध्ये भारतीय महिला परिषद भरली. ही देशभरातील स्त्रियांची पहिलीच परिषद होती. रमाबाई रानडे यांची सर्वानुमते परिषदेच्या अध्यक्षस्थानी निवड झाली. या परिषदेमध्ये स्त्रियांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्या. स्त्रीशिक्षण या कामासाठी १९१३ मध्ये ब्रिटीश सरकारने ‘कैसर- ए- हिंद’ हा पुरस्काराने रमाबाईंना सन्मानित केले. १९१७ मध्ये ब्रिटीश सरकार जनतेला राजकीय हक्क देणार होते. स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे म्हणून काही तरतुदी सरकारने केल्या पाहिजे यासाठी त्याचवर्षी रमाबाई रानडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ विमेन इंडिया असोशिएशन’ या संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या वतीने जे निवेदन सरकारला दिले होते. त्या म्हटले आहे कि, “मुलींना सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे, स्त्रियांकरिता ट्रेनिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज व नर्सिंगच्या शिक्षणाची व्यवस्था केली जावी. तसेच, विधीमंडळाच्या निवडणुकीमध्ये मताधिकार मिळविण्याकरिता अपात्र न समजता त्यांनाही प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात यावी.'’स्त्रियांच्या मताधिकाराचा पाठपुरावा करण्यासाठी विमेन फेंचाइज कमिटी स्थापन झाली. पुण्यामध्ये रमाबाई रानडे या कमिटीच्या अध्यक्ष होत्या. १९२० मध्ये पुणे शहरात मुलींच्या प्राथमिक शिक्षण सक्तीच्या मुद्यावर रमाबाई रानडेंनी आंदोलन घडवून आणले. त्यावेळी, पुण्यातील सनातनी मंडळी ही मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात होती म्हणून रमाबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता.
रमाबाई रानडे यांनी महिला परिषद, स्त्री
मताधिकार यासाठी जी मेहनत घेतली त्याची फळे पुढील काळात मिळाली. उदा. १९२७ मध्ये
पहिल्यांदा डॉ. मुथ्थूलक्ष्मी अय्यर या
स्त्री कायदे मंडळावर सरकारने नियुक्त केले. तसेच, याच वर्षी पुण्यामध्ये ‘अखिल
भारतीय महिला परिषदे’ची स्थापना झाली. परंतु, हे सगळे पाहण्यासाठी रमाबाई रानडे
जिवंत नव्हत्या. २६ एप्रिल १९२४ रोजी त्यांचा हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला
होता. त्या जर जिवंत असत्या तर कदाचित त्याच पहिल्या कायदे मंडळावर सरकार नियुक्त सदस्य
आणि अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्ष झाल्या असत्या. इतके महत्वाचे काम
त्यांनी स्त्री हक्क, आरोग्य आणि मताधिकार या क्षेत्रात केले होते.
पूर्वप्रसिद्धी - लोकमत २५ एप्रिल २०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा