गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

जातीव्यवस्था आणि पितृसत्ता



    जातीव्यवस्था आणि पितृसत्ता
                                          
                                                                             


             “सांस्कृतिक बदल आणि नवे पुरुषभान” या परिषदेसाठी आपण मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथम आयोजकांच्या ऋणात राहू इच्छितो. माझ्या मूळ विषयाकडे जाण्यापूर्वी मला दोन गोष्टींची चर्चा करणे अगत्याचे वाटते. एक म्हणजे ‘सांस्कृतिक बदल’ आणि दुसरे म्हणजे ‘नवे पुरुषभान’ ह्या दोन्ही गोष्टींमध्ये ‘सातत्य’ आणि ‘बदल’ या इतिहास नियमाचा गतीक्रम स्पष्टपणे दिसतो. सांस्कृतिक बदल ही अविरत चालत आलेली प्रक्रिया आहे. तसेच पुरुषभान सुद्धा समाजेतीहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांव आपणास अभ्यासता आणि पाहता येते म्हणून समकालीन सांस्कृतिक बदलात जर आपणास नवे पुरुषभान घडवायचे असेल किंवा समजून घ्यायचे असेल तर आपल्याला सांस्कृतिक बदलांचा आणि पुरुषभानाचा प्रवास इतिहास संशोधकाच्या तटस्थयोगाने समजून घ्यावा लागेल आणि हे समजून घेत असतांना पितृसत्ता आणि जातीव्यवस्था यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.           
                भारतीय समाजाचा इतिहास हा ‘अनेकवचनी’ असल्यामुळे अनेक मोठ्या- छोट्या सांस्कृतिक-दर्शनपरंपरा कधी ‘एकमेकांच्या  पूरक’ तर कधी ‘एकमेकांच्या विरोधात’ आणि कधी कधी तर ‘एकमेकांच्या समांतर’ चालतांना दिसतात त्यामुळे भारतीय उपखंडाचा इतिहास हा बहुमुखी, बहुपेडी  वर्चस्वाचा, दमनाचा, शोषणाचा आणि पिडनाचा इतिहास आहे. हे आपण गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे. जातीव्यवस्था आणि पितृसत्ता यांचा समकालीन अर्थ समजून घेण्यासाठी त्यांचा ऐतिहासिक विकासक्रम समजून घ्यावा लागतो. जातीव्यवस्था आणि पितृसत्तेचा इतिहास समजून घेतांना भारताच्या अनेकवचनी आणि बहुमुखी दमन, शोषण आणि पिडन यांचा संदर्भ नेहमी लक्षात ठेवायला हवा. हल्ली आपल्या आजूबाजूची  समकालीन जातीव्यवस्था आणि पितृसत्ता पाहूनच आपण त्याचे रूप निश्चित करण्याचा प्रयत्न करत असतो पण, त्यामध्ये थोडासा गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यामुळे जातीव्यवस्था आणि पितृसत्ता यांच्यात ‘बदल’ आणि ‘सातत्य’ या नियमानुसार कोणते बदल घडून आलेत याकडे दुर्लक्ष होते. जातीव्यवस्था आणि पितृसत्ता या दोन गोष्टी सुट्यापणे आणि स्वतंत्रपणे क्रियान्वित होत नाहीत त्यामुळे जातीव्यवस्था आणि पितृसत्ता या दोन्ही संस्था-रचनांचा एकत्रच विचार केला पाहिजे असे मला वाटते त्यामुळे येथून पुढील लेखनात मी जातीपितृसत्ता असाच शब्द वापरेन.

  • जातीपितृसत्तेच्या निर्मूलनासाठी इतिहासाचा शोध!

                 चार पाऊले पुढे टाकायची असतील तर चार पाऊले मागे चालायला पाहिजे असे म्हटले जाते. भविष्याला गवसणी घालण्यासाठी भूतकाळाचा धांडोळा घ्यावाच लागतो. त्यामध्ये ‘ नवं ’ विरुद्ध ‘ जुनं ’ हा वादच मुळात चुकीचा आहे.  इतिहासाचा विकासक्रम हा द्वंद्वात्मक पद्धतीने होत असतो त्यामुळे नवं हे तसे नवं नसतंच त्यामध्ये जुन्याचे अनेक अंश असतात. त्यामुळे नवे पुरुषभान हे काही आकाशातून जन्माला येणार नाहीये तर ते आपल्याच समाजातून जन्माला येईल म्हणून समाजेतिहास समजून घेणे खूपच महत्वाचे ठरते. इतिहास लेखनाची जगात आणि प्रमुखत: भारतात अजूनही खूपच पठडीबाज पद्धत असल्यामुळे (काही लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नाचा अपवाद वगळता) अजूनही ‘सकल आणि समग्र जातीपितृसत्ते’चा इतिहास लिहिला गेलेला नाही. इतिहासलेखन करण्यासाठी संशोधनपद्धतींची मर्यादा, उणीवा यांच्यासोबतच संस्थात्मक पातळीवरचा निरुत्साह, सांघिक संशोधन प्रकल्पांचा अभाव, राजकीय-सामजिक इच्छाशक्तीचा अभाव आणि अर्थसाह्याची कमतरता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे साधनांची कमतरता, अनुपलब्धता अशा अनेक कारणांमुळे जातीपितृसत्तेचा इतिहास लिहिला गेला नाही असे आपण म्हणू शकतो.  जातीपितृसत्तेच्या स्पष्ट इतिहासाचे चित्र आपल्या समोर नसल्यामुळे अनेक लोकांनी तर्क, कल्पना लावून जातीपितृसत्तेचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी कट-कारस्थान सिद्धांत मांडून आणि भ्रमजाल निर्माण करून सुद्धा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. जातीपितृसत्तेचा इतिहास ज्या पद्धतीने द्वंद्वात्मक पद्धतीने घडतो त्याच पद्धतीने जातीपितृसत्तेचे इतिहासलेखन किंवा समाजशास्त्रीय लेखन सुद्धा द्वंद्वात्मक पद्धतीने घडून येते.  त्यामुळे जातीपितृसत्तेच्या संदर्भात केलेले लिखाण खरे किंवा खोटे, चांगले किंवा वाईट म्हणून न पाहता कोण लिहितो-लिहिते, कोणत्या काळात आणि कुठल्या संदर्भात लिहितो-लिहिते हे पाहणे मला अधिक महत्वाचे वाटते. जरी आपण जातीपितृसत्ता ही संयुक्त संकल्पना वापरत असलो तरी जातीव्यवस्था आणि पितृसत्ता यांचा उगम-उदय मात्र इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेला दिसतो. इतिहासाच्या विकासक्रमात पुढे या दोन्हींचा जैविक संबंध प्रस्थापित झालेला दिसतो म्हणूनच मी  जातीपितृसत्ता ही संकल्पनाच वापरणे अधिक योग्य समजतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘स्त्री हे जातीव्यवस्थेचे प्रवेशद्वार आहे’ हा महत्वाचा सिद्धांत मांडून जातीव्यवस्था आणि पितृसत्ता यांचा जवळचा संबंध आहे स्पष्टच केले आहे. जातिव्यवस्थेचा विचार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन खूपच महत्वाच्या संकल्पना  सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिली म्हणजे ‘जात ही श्रेणीबद्ध विषमता आहे’ आणि दुसरी म्हणजे ‘जात ही श्रेणीबद्ध सार्वभौमत्व आहे.’ पहिल्या गोष्टीची अनेकांनी चर्चा केली आहे त्यामुळे येथे त्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही वाटत. दुसरी गोष्टीची चर्चा करणे जास्त महत्वाचे वाटते. ज्यावेळी आंबेडकर जात ही श्रेणीबद्ध सार्वभौमत्व आहे असे म्हणतात तर त्याचा नेमका काय अर्थ होतो आणि ‘जातीचे सार्वभौमत्व’ कोणत्या गोष्टीमुळे सिद्ध होते? या गोष्टींचा विचार करणे क्रमप्राप्त बनते. जातीचे नियमन, जातीचा वर्तन-आचरण व्यवहार, आणि जातीच्या उत्पादनामधून जातीची ‘सामाजिक, भौतिक आणि मानसिक’ रचना आकाराला येथे आणि त्यातून ‘जातीचे सार्वभौमत्व’ टिकवले किंवा जपले जाते. आपणाकडे जातीची चर्चा खूपच संकुचित अर्थाने केली जाते त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या रोबोटच्या जगात सुद्धा जातीचे सार्वभौमत्व कसे ठीकून आहे याचे उत्तर आपणाला देता येत नाही. आजच्या संसदीय राजकारणात ज्याप्रमाणे ‘जात’ एक राजकीय साधन म्हणून वापरले जाते त्याचप्रमाणे वसाहतीक- वसाहतपूर्व काळात सुद्धा ‘जात’ ही राज्यसंस्थेचा आधार होती. जात एक उत्पादन व्यवस्था, समाजरचना आणि मनोविश्व यांचा एकदाच भाग असल्यामुळे ही रचना आधीच्या राजे- महाराज यांना तोडणे आवश्यक वाटत नव्हती आणि आताच्या सत्ताधारी वर्गाला वाटत नाही. याचा आपण गंभीरपणे विचार करायला हवा. जात ही उत्पादन संबंध, सामजिक संबंध आणि मानसिक संबंध जन्माला घालत असल्यामुळे त्यामध्ये वगळणे, पिळवणूक, पिडीन, दमन आणि शोषण करणे या सगळ्याच गोष्टी येतात. त्यामुळे ह्या संस्थेचं- रचनेचं निर्मूलन-निर्दालन झाले पाहिजे असा म्हणणारा प्रवाह ‘वसाहतीक छत्रछायेखाली जन्माला आलेला दिसून येतो. हा विचार वसाहतपूर्व काळात विकसित होणे शक्य होते का? असेल तर का? आणि नसेल तर का नाही? याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. यामुळे दोन गोष्टी होतील. एक म्हणजे वसाहतपूर्व काळातील संत, राजे, लोक यांच्याकडून आपण नको ती अपेक्षा न बाळगता त्यांचा संदर्भ आणि त्यांचे स्थान समजून घेवू शकतो. दोन म्हणजे  आधुनिक-पारंपारिक, भौतिक- आध्यात्मिक, नवे-जुने, वसाहतीक- देशीवादी अशा महत्वाच्या पण ‘अर्धसत्य’ सांगणाऱ्या चाकोरीत आपण अडकणार नाहीत. ‘ब्राह्मणांचे कारस्थान’ आणि ‘दलितांचे शोषण’ याच्यापलीकडे जावून जातिव्यवस्थेचा ‘उभा-आडवा, खालून-वरून’ धांडोळा घेतल्याशिवाय ‘जातिनिर्मूलनाच्या चळवळीला आणि समतावादी चळवळीला दिशा नाही असे वाटते.  आर. के. क्षीरसागर यांनी ७० च्या दशकामध्ये ‘दलित जाहीरनामा’ काढला होता. तसाच ‘दलित जाहीरनामा’ सुखदेव थोरात यांनी माघील तीन वर्षांपूर्वी काढला आहे. दोन्ही जाहीरनामे विशेषत: दलितांना केंदस्थानी ठेवून काढलेले आहेत. अभ्यासपूर्णता ही दोन्ही जाहीरनाम्यांची विशेष बाब आहे. परंतू आजही परिस्थिती खूप काही बदलेली नाही. हेच यावरून स्पष्ट होते.  एक विशेष वेगळेपणा आणि सोबतच साम्यपणा या दोन्ही जाहिरनाम्यामध्ये तो म्हणजे क्षीरसागर दलितांना खेडे सोडा असे सांगत आहेत आणि त्यासाठी डॉ. आंबेडकरांचा आधार घेत आहेत. तर थोरात शहरात आल्यावर सुद्धा दलितांना वेगळेपणा, मानखंडना, भेदभाव, पिळवणूक आणि शोषण यांना सामोरे जावे लागतच आहे असे आपल्या अभ्यासानुसार दाखवून देतात. यापार्श्वभूमीवर जातीच्या संदर्भात ‘गांधी-आंबेडकर’ आणि ‘गाव-शहर’ या वादाची आज पुनर्तपासणी झाली पाहिजे असे मला वाटते. गांधी ज्या पद्धतीने जाती आणि गावाकडे पाहत आहेत आणि आंबेडकर ज्याप्रमाणे जाती आणि शहराकडे पाहत आहेत याचा संदर्भ आणि विचार समजून घ्यायला हवा. इतिहासकार सुमित गुहांनी या संदर्भात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्यामते गांधी आणि आंबेडकर हे दोघेही पश्चिम भारतातील आणि त्यातही बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील होते. तरीही त्यांच्या एवढा वैचारिक वेगळेपणा कसा निर्माण झाला. यासाठी ते दोन्हीचे ‘सामाजिक स्थान’ काय होते यावर विशेष भर देतात. गांधीची ‘जातीचिकित्सा ही वरून खाली’ (Critics from Above ) असे होते तर आंबेडकरांची ‘जातीचिकित्सा खालून वर’ (Critics from Below) अशी होती अशी महत्वाची नोंद सुमित गुहांनी केली आहे. एलिनोर झेलीयट यांनी सुद्धा १९७५ सालीच ‘गांधी-आंबेडकर नेतृत्वाचा अभ्यास’ हा लेख लिहून केली होती पण, त्याची म्हणावी तशी चर्चा आंबेडकरवादी आणि गांधीवादी वर्तुळात झालेली दिसत नाही. झेलीयट तशा आंबेडकरी चळवळीत आणि समाजात प्रसिद्ध होत्या पण, त्यांच्या वर उल्लेखित निबंधाकडे कोणाचेही म्हणावे तसे लक्ष गेलेले दिसत नाही. माघील तीन-चार वर्षापूर्वी सुगावाने त्याचे मराठीकरण प्रकाशित केले आहे. सर्वांनी ते वाचले पाहिजे असे मला तीव्र वाटते.
             जातीव्यवस्था ही मानवनिर्मित आहे हे अभ्यासाच्या पातळीवर सिद्ध झाले आहे परंतू, जातिव्यवस्था कधी निर्माण झाली याचा अजूनही तसा ठोस पुरावा नाहीये. कोणी म्हणते ब्राह्मणांनी निर्माण केली? कोणी म्हणते आर्यांनी निर्माण केली? कोणी म्हणते बुद्धाने निर्माण केली ? कोणी म्हणते मुसलमानांनी निर्माण केली आणि सर्वात मोठा कळस म्हणजे कोणी म्हणते ब्रिटिशांनी निर्माण केली.  जातीच्या निर्मितीची चर्चा करतांना अनेकवेळा घोळ होतात. बहुतेक वेळा चर्चा खूपच भावनिक होते तर कधी अतार्किक होते. भारतीय उपखंड हा प्रादेशिक, भाषिक, भौगोलिकदृष्ट्या एवढा वेगळा आणि विस्तीर्ण आहे की, यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला जातीनिर्मिती करणे वास्तवात तर सोडा पण कल्पनेत सुद्धा शक्य दिसत नाही. जातींमध्ये प्रादेशिक वेगळेपणा खूपच स्पष्टपणे दिसून येतो. अमेरिकेतील काळ्या-गोऱ्यासारखा ‘नैसर्गिक रंगभेद’ जातींमध्ये दिसून येत नाही. हल्ली, उत्तरप्रदेश आणि बिहार प्रांतातील मजूर मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात येतात. त्या लोकांना महाराष्ट्रात त्यांच्या जातीनुसार नव्हे तर त्यांच्या प्रदेशानुसार ओळखले जाते. ‘भैया’ या एका ओळखीखाली त्या सगळ्यांच्या जाती झाकल्या जातात. तसेच बंगाली, तमिळ, महाराष्ट्रीयन यांचे सुद्धा आहे. पण हे असतांना सुद्धा जातीचा भारतीय उपखंडात ‘अस्तित्व’ आणि ‘वावर’ आजही टिकून आहेच म्हणून तीला क्रियान्वित करणारी रचना आणि विचारधारा आहे हे स्पष्ट होते.  जातीनिर्मिती कोणी केली यापेक्षा कशी आणि कधी झाली यावर जास्त चर्चा झाली पाहिजे असे मला वाटते. त्या ऐकून प्रक्रियेची चर्चा करण्याची माझी वैयक्तिक कुवत आणि पात्रता नाही त्यामुळे आपण सगळे लोक पुढील काळात ही चर्चा वृद्धिंगत करूयात.
            जातीव्यवस्थेप्रमाणेच पितृसत्तेचा इतिहास किंवा निर्मिती काळ लिहिला गेलेला नाही. जागतिक पातळीवरील अभ्यासाच्या आधाराने मानवाच्या प्रारंभिक आयुष्याचा काळ मातृसत्ताक असावा असा काहींचा तर्क आहे. काहींनी आदिवासी समाजांचा मानवशास्त्रीय अभ्यास करून तर काहींनी स्त्री-पुरुष यांच्या नैसर्गिक लिंगभेद आणि  देहधर्माचा अभ्यास करून प्रारंभिक मानवी समाज मातृसत्ताक असावा असा तर्क केला आहे. अभ्यासकांमध्ये त्या समाजाचे नेमके स्वरूप काय असावे यावरून सुद्धा मतभेद आहेत. प्रारंभिक मानवी समाजाला कोणी मातृसत्ताक, तर कोणी मातृवंशक सुद्धा म्हणते. यावरून एकमात्र स्पष्ट होते कि, या सर्व समाजात स्त्रीला महत्वाचे स्थान होते. आज अस्तित्वात नसलेले धर्म आणि त्यांच्या रचना त्या काळात नव्हत्या. म्हणून त्याकाळातील मनोविश्वात जादू, माया यांना खूपच स्थान असावे असा आपण तर्क लावू शकतो किंबहुना जादू, माया हाच त्यांचा धर्म असावा. कॉ. शरद पाटील यांनी यासंदर्भात खूपच महत्वाचे काम करून ठेवले आहे.  कॉ. शरद पाटलांनी मार्क्सवाद्यांचा पारंपारिक ‘समाजविकासाचा सिद्धांत’ नाकारण्यापेक्षा दुरुस्त केला असे मला म्हणावेसे वाटते कारण प्राचीन साम्यवादाच्या जागी मातृसत्ता होती हे जर सोडले तर गुलामगिरी, सामंतशाही आणि भांडवलशाही व समाजवाद हा सिद्धांत त्यांना मान्यच दिसतो. फक्त भारतीय संदर्भात मातृसत्तेनंतरचे टप्पे ते दास-शुद्रांची गुलामगिरी, जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व, जातीअंतक भांडवली लोकशाहीक्रांती अशी चर्चा त्यांनी त्यांच्या लिखाणात केली आहे.  पितृसत्तेची चर्चा करतांना जातीव्यवस्थेला खूपच महत्वाचे स्थान दिले आहे. त्यातून ब्राह्मणी पितृसत्ता ह्या संकल्पनेचे सिद्धांकन त्यांनी केले आहे. गेल आम्वेट, उमा चक्रवर्ती यांनी सुद्धा ब्राह्मणी पितृसत्तेच्या सिद्धांकनात भर घातली आहे. या तिन्ही अभ्यासकांचे सुद्धा जातीव्यवस्था, पितृसत्ता, मातृसत्ता यासंबधात मतभेद आहेतच त्यामुळे पाटील, आम्वेट आणि चक्रवर्ती यांच्याशी मतभेद राखत ब्राह्मणी पितृसत्ता अशी  ‘एकच –एक पितृसत्ता’ नसून ‘बहुविध पितृसत्ता’ आहेत असे म्हणण्याचा सुद्धा अनेकांना हक्क आहे. जगभरात वर्ण, वंश, धर्म यांच्या आधारावर ‘बहुविध पितृसत्ता’ असल्याचा अभ्यास झालेला आहेच म्हणून भारतीय संदर्भात ‘ब्राह्मणी पितृसत्ता’ व ‘बहुविध पितृसत्ता’ यांचा नेमका संबंध शोधणे महत्वाचे आहे.  ब्राह्मणी पितृसत्ता ही संकल्पना मांडणाऱ्या काही लोकांच्या व्यवहारामुळे किंवा कदाचित स्वतःच्या पूर्वग्रहांमुळे काही लोकांना ही संकल्पना ‘जातीवाचक’ वाटते. ( ब्राह्मणी –अब्राह्मणी हे जातीवाचक नसून प्रवृत्तीवाचक आहे असे प्राचीन ते आधुनिक असे अनेक संदर्भ आहेत. अब्राह्मणी हे सुद्धा जैन, बौद्ध, लिंगायत, शाक्त यांच्या अंतर्गत झगड्यामुळे काही एकसाची नव्हते. हे सुद्धा लक्षात असू द्यावे.) ब्राह्मणी पितृसत्ता या संकल्पनेला विरोध म्हणून मग ‘दलित पितृसत्ता’, ‘बौद्ध पितृसत्ता’ अशा अनेक संकल्पना बहुविध पितृसत्तेच्या नावाखाली जन्माला येतांना दिसतात.  बहुविध पितृसत्ता ही संकल्पना महत्वाची आहे पण तिचे जर सुलभीकरण करून टाकले तर मग जातीनुसार मराठा पितृसत्ता, मांग पितृसत्ता, धनगर पितृसत्ता अशी आणि पुढे पोटजातीनुसार शेगर पितृसत्ता, व्हटकर पितृसत्ता आणि हटकर पितृसत्ता अशी सुद्धा चर्चा ताणता येईल आणि  सर्वच जाती वेगवेगळ्या आणि स्वायत्त आहेत म्हणून सर्वच जातीतील पितृसत्ता ह्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत आणि स्वायत्त आहे असे म्हटले जाईल. प्रथमदर्शनी हे बरोबर जरी वाटत असले तरी यातून खूपच मोठा धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तो म्हणजे नाकारण्याचा सिद्धांत. स्त्रीशोषणाचे, दमनाचे, पिडनाचे वैश्विक सत्य आणि सोबतच जातीशोषणाचे, दमनाचे आणि पिडनाचे भारतीय विशिष्ट सत्य नाकारले जाण्याची शक्यता आहे.  जात ही एक एकटी अस्तित्वात कधीच नसते. जाती या एकमेकांचे मोल जाणून मान्यता देत अस्तित्वात येत असतात. जातींमध्ये एक मर्यादित, संकुचित ‘पठडीबाज संवादाचा अवकाश’ निर्माण सुद्धा होत असतो त्यामुळेच ही संस्था आजपर्यंत ठीकून आहे. स्त्रीची लैंगिकता आणि स्त्रीचे लैंगिक श्रम जातीची पवित्रता, शुद्धता आणि वेगळेपणा टिकवून ठेवत असतात त्यामुळे प्रत्येक जातीत स्त्रियांवर लैंगिक, सामाजिक, शारीरिक नियमन असतात. यातूनच जातीपितृसत्ता आकाराला येते. ‘विवाहसंस्था’ आणि ‘कुटुंबसंस्था’ ह्या दोन संस्था जातीपितृसत्तेचे पुनरुत्पादन आणि नियमन करण्यात महत्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे या दोन्ही संस्थांचा ऐतिहासिक विकासक्रम समजून घेतला पाहिजे म्हणून विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था यांचा इतिहास शोधतांना सातत्य आणि बदल याचा शोध घेतला पाहिजे असे मला वाटते. संधी, इच्छा आणि कल्पना यांची चर्चा करत दोन्ही संस्थाचा विचार झाला पाहिजे. विस्तारभयास्तव ही चर्चा येथे थांबवतो.  पुढे काही उदाहरणाच्या आधाराने हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.  

  • पद्मिनीच्या निमित्ताने मीराची चर्चा

                पद्मिनी च्या निमितान्ने ची चर्चा टीवी, वर्तमानपत्रे, सोशल मिडियामध्ये चालू आहे. त्यातून तुम्हाला वादाचा मुद्दा काय आहे हे कळले असेल अशी आशा मी करतो.  चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे त्यामुळे चित्रपटात नेमकं काय आहे याची मला कल्पना नाही परंतू या सिनेमाच्या निमित्ताने जो वाद झाला त्याने समाजात जातीपितृसत्ता खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणी कशा पद्धतीने क्रियान्वित होते हे चांगलेच स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी ‘पद्मिनी ही राष्ट्रमाता आहे’ असे म्हणत सिनेमाला राष्ट्रवादी चर्चाविश्वात घेवून गेलेत. एकदा राष्ट्राचा प्रश्न म्हंटला की मग भावनिक होवून भारतमातेचे रक्षण करण्यासारखे ‘पद्मिनी मातेचे’ रक्षण करायला लागलेले दिसून येतात. एकीकडे देशभरातील राजपूत समाजाने मोर्चे, निषेध सभा या निमित्ताने घेतलेल्या दिसतात. दुसरीकडे, हिंदुत्ववादी पक्ष, संस्था आणि संघटनांनी  ‘मुस्लीम आक्रमकांपासून हिंदू शीलाचे रक्षण करणारी आदर्श हिंदू नारीचे चरित्रहनन’ संबंधित चित्रपट करत असल्यामुळे चित्रपटाला विरोध केला आहे. राज्यस्थान, हरियाना आणि गुजराथ या राज्यांमध्ये तर स्वत: भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिनेमाला विरोध केला आहे. दीपिका, भंसाली यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकत्यांनी दिल्या तरीही, सरकार यावर काहीही ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. याला दोन कारणे आहे. एक म्हणजे काही राज्यांमध्ये चालू असलेल्या निवडणुका आणि दुसरे म्हणजे पक्षाची विचारधारा. राजपूत आणि हिंदू लोकांचे ‘मत’ आपल्याला मिळावे म्हणून त्यांच्या अस्मितेच्या प्रश्नांना बगल देवून चालणार नाही हा शुद्ध ‘संसदीय व्यापार’ आणि हिंदुत्वाचा व्यवहार हा असल्यामुळे सत्ताधारी पक्ष काहीही निश्चित भूमिका घेतांना दिसत नाही. कर्णीसेनेच्या प्रमुखांनी अनेक ठिकाणी ज्या मुलाखती दिल्या आहेत. ‘राजपूतांना आणि हिंदुत्व’ यांचा अपमान करणारा हा चित्रपट आहे अशी त्यांनी भूमिका घेतलेली दिसते. पद्मिनीला ज्या प्रमाणे शिवराजसिंह यांनी ‘राष्ट्रमाता’ संबोधले त्याचप्रमणे कर्णीसेनावाले पद्मिनीला ‘सती माता’ म्हणून संबोधतात. पद्मिनी हे मोहमद जायसी या ‘मुस्लीम सुफी’ ची कल्पना असल्यामुळे ते ऐतिहासिक चरित्र नाहीये. परंतू राजस्थान, चितोड ला इतिहास आहे त्यामुळे पद्मिनीची ‘लोकानुरंजनवादी सांस्कृतिक स्मृती’ हा इतिहास म्हणून राजपुतांची अस्मिता निर्मिती साठी वापरली गेलेली दिसते.  चित्रपटाला विरोध करण्यासाठी मोठ्याप्रमाणात स्त्रिया सुद्धा ‘जातीची अस्मिता’ ठीकविण्यासाठी ‘पारंपारिक पोशाखा’त  रस्त्यावर उतरलेल्या दिसतात. याचप्रकारे रूप कंवरच्या वेळी ‘सती हमारी माता है’ म्हणत मोठा जनसमूह ‘सती प्रथेचे समर्थन’ करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. पद्मिनी प्रमाणेच मीरा ही सुद्धा राजस्थानात आणि संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे पण तरीही मीरा ही राजपूत अस्मितेची प्रतिक बनत नाही. विवाह संस्था आणि लैंगिकता येथे खूपच महत्वाची ठरते. पद्मिनी ही काल्पनिक असूनही राजपूत अस्मितेची प्रतिक बनते कारण जातीचे शील शुद्ध ठेवण्यासाठी तिने जोहार केला. आपले तोंड सुद्धा परपुरुषाला दाखविले नाही. याउलट मीरा ही ‘विवाहसंस्था’ तोडून भक्ती मार्गात येते. रोहिदासासारख्या चर्मकार जातीच्या आणि परपुरुषाची शिष्या होते. जातीच्या शिलाची रक्षा करतांना जोहर करणे हे जातीपितृसत्तेचे संवर्धन करणारी गोष्ट ठरते तर विवाह बंधन तोडून सार्वजिक ठिकाणी ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होणे हे जातीपितृसत्तेला आव्हान वाटते म्हणून तर पद्मिनी या सतीमातेच्या रक्षणासाठी तिचे आधुनिक सुपुत्र दीपिकाचे मुंडके तोडायला आणि जाळपोळ करायची धमकी द्यायला सुद्धा घाबरत नाहीत. स्त्रीची लैगिकता, योनीची शुद्धी टिकवली तरच आपली जात शुद्ध राहू शकते आणि त्यातून ‘आपली अस्मिता’ टिकू शकते असा समज जोरदारपणे यातून पुढे येतांना दिसतो. नवऱ्याला सोडून राहणारी, परपुरुषाच्या संपर्कात येणारी मीराबाई सारख्या स्त्रीचा विद्रोह, प्रतिरोध ‘संत स्त्री’ म्हणून संकुचित केला जातो तर परपुरुषापासून आपल्या नवऱ्याची अमानत म्हणजे स्वत:चे शील वाचविण्यासाठी जोहर करणारी, पद्मिनी राष्ट्रमाता म्हणून गौरवीत केली जाते कारण राष्ट्राला जातीपितृसत्ता टिकवणे हे महत्वाचे वाटते.

  • जिजाऊच्या लेकी ताराबाईशी संवाद साधणार का ?                                                                                       

               माघील वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील छकुली या मराठा जातीतील मुलीवर दलित जातीतील तीन पुरुषांनी बलात्कार केला. त्या तिन्ही पुरुषांना काही दिवसांपूर्वीच शिक्षा सुद्धा झाली. जातीपितृसत्तेचा विचार करतांना माघील वर्षभरात जे ‘मराठा मूक मोर्चे’ निघालेत त्यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे असे मला वाटते. मराठ्यांच्या बायका ‘पडद्या आड असतात’ म्हणून खाजगी पितृसत्तेची चर्चा करता येत होती. कुटुंबाच्या अंतर्गत होणारे शोषण, दमन असूनही जातीमुळे असणारी प्रतिष्ठा, मान हा मराठा बायकांना एक वेगळा अवकाश देतच होता. संध्या नरे- पवारांनी ‘तिची भाकरी कोणी चोरली’ मध्ये एक छान प्रसंग दिला आहे. त्यात गावातील दलित, ओबीसी वर्गात बायका आधीच बैठकीला येवून बसतात. नंतर गावाच्या मराठा स्त्रिया आल्या कि उठून मागे जावून बसतात. ह्या प्रसंगातून स्त्रियांमधील जातीय संबंध स्पष्ट होतात. महाराष्ट्राच्या बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आणि बऱ्याच तालुक्यांमध्ये ‘मराठा मूक मोर्चे’ निघालेत. मोठ्या संख्येने पहिल्यांना मराठा स्त्रियांनी सार्वजनिक मोर्चांमध्ये सहभाग घेतला असेही काहींनी म्हटले. शेतकरी कुणबी- मराठा स्त्रीपासून ते कारखान्याच्या चेअरमन देशमुख- मराठा स्त्रीपर्यंत सगळ्यांनी मोर्चात सहभाग घेतला.  मोर्च्याची नियोजनबद्धता, स्त्री दाक्षन्य, गर्दी, मुलींचे भाषण याची टीवी, वर्तमानपत्र आणि सोशल मिडीयावर खूप चर्चा सुद्धा झाली. सार्वजनिक जातीपितृसत्तेच्या अभिनान्यता देण्याचे काम या मोर्चांनी केलेली दिसते. या आधीही मराठा जातीच्या मुलींवर अत्याचार, बलात्कार झाले आहेत पण मग याचवेळी एवढ्या मोठ्याप्रमणात मराठा स्त्री-पुरुष रस्त्यावर का आलेत असा प्रश्न पडतो. शेतीचे संकट, बेरोजगारी, दुष्काळ अशा अनेक समस्यांना इतर जातींसोबत मराठा जात सुद्धा सामोरे जात आहे. त्यामुळे मुद्द्यांची चर्चा सुद्धा मोर्चात झाली सोबतच मराठा आरक्षण सुद्धा यात आले.
            आपल्या जातीच्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून सुद्धा मोठ्याप्रमाणात लोक या मोर्चात सहभागी झाली.  खालच्या जातीच्या पुरुषांनी आपल्या जातीच्या मुलीचा बलात्कार केला ही भावना अधिक तीव्र दिसून आली म्हणून तर अ. जा. अ. ज. अत्याचार निवारण कायद्यात बदल करा येथपासून तर कायदा रद्द करा येथपर्यंत चर्चा झाली.  महाराष्ट्रात वेगवेगळ्या जातीच्या मुलींवर-स्त्रियांवर भयानक अत्याचार आणि हिंसा झाल्या आहेत पण त्यापैकी कुठल्याही घटनेची चर्चा मोर्च्यात सहभागी झालेल्या स्त्रियांनी केलेली दिसत नाही. त्यामुळे मुलीवर बलात्कार झाला यापेक्षा आपल्या जातीच्या मुलीवर बलात्कार झाला हीच भावना अधिक तीव्रपणे दिसते. प्रत्येक मोर्चात मुलींनीच का निवेदने दिलीत ? जातीच्या राजकारणाने मुलींना वापरले की मुलींना जातीची अस्मिता महत्वाची वाटू लागली असे सुद्धा याकडे पाहता येईल. दोन्ही गोष्टी होण्याची शक्यता आहे. ‘जिजाऊच्या लेकी’ ( जिजाऊच्या लेकी येथे मराठा जातीतील कारण जिजाऊ मराठा होत्या.) वर दलीतांकडून बलात्कार होतोय ही कल्पनाच खूप भयानक आहे. याचा राग म्हणूनच नाशिक येथे ‘दलित वस्ती’वर मोठा हल्ला झाला त्यातून लोकांचे शारीरिक, मानसिक आणि वित्तहानी सुद्धा घडून आली. ‘जिजाऊच्या लेकी’ हा शब्दप्रयोग सातत्याने महाराष्ट्रात होतो. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता शिवाजीला जन्माला घालणारी जिजाऊ म्हणजे ‘आदर्श माता’, ‘आदर्श पत्नी’ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे जेम्स लेन या अभ्यासकाने ‘कथितदृष्ट्या’ जिजाऊना बदनाम करण्याचे काम केले म्हणून त्याला आणि भांडारकर संस्थेला मोठी किमत चुकवावी लागली.  जिजाऊची ‘आदर्श माता’, ‘राष्ट्र माता’ ही प्रतिमा निर्माण करण्याचे काम मराठा जाती संघटनानी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.  मराठा जातीसंघटनाची जिजाऊ बिग्रेड ही महिला आघाडी आहे. त्यामध्ये ‘जय जिजाऊ’ असे अभिवादनपर बोलले जाते. राष्ट्राच्या रक्षणासाठी आदर्श माता बनून शिवाजी सारख्या ‘राष्ट्रभक्ता’ला जन्माला घालणे हीच राष्ट्रसेवा आहे असे ‘राष्ट्र सेविका समिती’ शिकवते. त्यांमुळे मराठी नव्या वर्षाच्या निमित्ताने अनेकजणी ‘ पारंपारिक कपडे, नथ घालून आधुनिक वाहना’वर मराठी दिवस साजरा करतांना दिसतात. यातून आधुनिकता – परंपरा यांच्या अर्ध संयोगातून जन्माला आलेली ‘संकरीतता’ स्पष्ट दिसते.
                मराठा जातीच्या मुलींना मराठा मुक्क मोर्चात जिजाऊच्या लेकी म्हणून घेण्यापेक्षा ताराबाई (शिंदे) च्या लेकी म्हणत ताराबाईसारखी जातीपितृसत्तेवर हल्ला का केला नाही ? याची दोन उत्तरे असण्याची शक्यता आहेत. एक म्हणजे आम्ही जिजाऊच्या लेकी असे पुरुषांची ठरवले आणि त्यासाठी जातीच्या स्त्रियांचा वापर केला आणि दोन म्हणजे स्वतंत्र स्त्रीपेक्षा आम्हाला आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श मुलगी हे महत्वाचे आहे असे मराठा स्त्रियांचे-मुलींचे मत असावे असा तर्क आपण करू शकतो. असे असले तरी ‘महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण सुद्धा मराठा जातीतील मुलींमध्ये दिसते. (यासाठी २०१५ (पुणे) आणि २०१६ (धुळे) येथे झालेल्या नोंदणीकृत आंतरजातीय विवाहांची यादी पहावी.)    ताराबाईपेक्षा जिजाऊ ह्या कधीही जातीपितृसत्तेचे संवर्धन करण्यासाठी फायद्याच्याच  आहेत त्यामुळे संस्कार, चित्रपट, मालिका, गाणी, कार्यक्रमाच्या माध्यमातून जिजाऊ लोकांपर्यंत जाव्यात असे जातीला, पितृसत्तेला आणि सरकारसुद्धा वाटते म्हणून तर ताराबाईचा ठावठिकाणा सुद्धा मराठा मुलींच्या/स्त्रियांच्या गावी नाहीये.  

  • रमाबाईचा अर्धा मानही सविता कबिरांना मिळाला का ?

                  वेगवेगळ्या काळात अस्तित्वात असलेल्या व्यक्तींची तुलना करणे योग्य नसते पण, काहीवेळा लोक करतात हे वास्तव आहे. महारांच्या ( बौद्ध ही जात नाही. सरकारी धोरणांच्या घोळामुळे शब्दांचे काहीही अर्थ लावले जातात.) घरात लहानपणीच बाबासाहेबांना ब्राह्मणीन बाईने विष पाजून मारले याचे शिक्षण होत असते असे मी पहिले आहे. त्यामुळे महार जातीच्या अक्षर ओळख नसलेल्या आणि काही अर्ध शिक्षित लोकांचा अजूनही तसा घोळ होतोच. माघील काही दिवसांपासून तथाकथित ‘राष्ट्रीय’ आणि ‘मूलनिवासी’ चे संघटन तर याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. माझ्या मते याच्या मागे जातीपितृसत्तेचा विचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशेत्वाने दलित, अस्पृश्य आणि मागास लोकांच्या ‘मुक्तीचा मार्ग’ दाखवला त्यामुळे बाबासाहेबांची मुक्तिदाता अशी प्रतिमा बनली आहे. बाबासाहेबांची जातीअंताची  चळवळ ही काहींना जाती मुक्तीची चळवळ वाटली त्यामुळे त्यांच्यासाठी बाबासाहेब ‘जाती उद्धारक’ सुद्धा बनले आहेत. आंबेडकरांच्या आरंभीच्या काळात रमाबाई आंबेडकर या त्यांच्या पहिल्या पत्नीने अनेक कष्ट सोसले. आंबेडकरांच्या यशात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. रमाबाईच्या आयुष्यात त्यांना याची पावती जरी मिळाली नसली तरी आज मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर कथा, कादंबरी, गाणी, नाटके लिहिली जात आहे आणि त्यांना बाबासाहेबांच्या जीवनसाथी म्हणून मान दिला जात आहे.  हा मान मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात सविता कबीर यांना मिळतांना दिसत नाही. सविता कबीर या बाबासाहेबांच्या दुसऱ्या जीवनसाथी. बाबासाहेबांच्या आजारपणात त्यांनीही अनेक कष्ट घेवून बाबासाहेबांना साथ दिली मग त्यांना त्यांचा मान का मिळत नाही.  त्याचे कारण त्यांच्या ब्राह्मण जातीत जन्माला येणे हे असावे असे मला वाटते म्हणून तर बाबासाहेबांना ब्राह्मणीनीने विष देवून मारले अशी जनमानसात अफवा पसरवली.
                 रमाबाई या महार जातीच्या होत्या आणि सविता कबीर या ब्राह्मण जातीच्या होत्या म्हणून तर हा फरक केला जात नाही ना. याचा धांडोळा घेतला गेला पाहिजे. आंबेडकरोत्तर दलित चळवळीचे आणि रिपब्लिकन पक्षाचे राजकारण जातीचे- पोटजातीचे राजकारण होते असे अनेक अभ्यासक म्हणतात. दुरुस्त-नादुरुस्त रिपब्लिकन पक्षांनी टीका करतांना कोणती पातळी गाठली होती हे सुद्धा आपणास माहितच असेल अशा काळात सविता कबिरांविषयीसुद्धा दलित चळवळीच्या नेत्यांना असूया असावी असे वाटते कारण बाबासाहेबांची पत्नी म्हणून त्यांचा एक मोठा अधिकार होता. समजा, सविता कबीर या ब्राह्मण जातीच्या नसत्या तर काय झाले असते? त्या महार जातीच्याच असत्या तर त्यांना रमाबाई आंबेडकरांसारखा मान मिळाला असता का? यावर नक्कीच मिळाला असता असे वाटते कारण, जातीपितृसत्तेला या पासून काहीच धोका नव्हता. जर तर ला इतिहासात महत्व नसते पण समाजाच्या विकासक्रमाचे चित्र कसे असू शकते याचा आपण जर तर ने विचार करू शकतो. त्या विचारला नक्कीच मर्यादा सुद्धा असते. मुंबई विद्यापीठात दलित चळवळीवरच्या सेमिनार मध्ये ‘दलित तरुणांनी जर उच्चजातीय मुलींसोबतच लग्न केले तर आमच्यासोबत कोण लग्न करेल’ असा प्रश्न काही वर्षांपूर्वी एका उच्च शिक्षित दलित मुलीने विचारला होता असे माझ्या ऐकण्यात आहे.  ह्या प्रश्नाची चर्चा अनेक अंगांनी करता येवू शकते. अशा विवाहांमुळे जातीपितृसत्ता टिकवणे हा हेतू असू शकतो त्याचप्रमाणे आपल्या जातीच्या मुलांना ‘इतर’ मुली मिळतात पण, आपल्याला ‘इतर’ मुले मिळत नाही म्हणून सुद्धा तो प्रश्न असू शकतो.
            वरील तिन्ही उदाहरणांमध्ये जातीपितृसत्ता टिकवण्यासाठी राजकारणाचा आधार आणि उपयोग केला गेलेला दिसतो. यातून जातीपितृसत्ता  टिकवून ठेवण्याचे काम राज्यसत्ता करत असते असा निष्कर्ष आपण काढू शकतो. अक्कामहादेवी, महादाईसा, मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, ललेश्वरी या वसाहतपूर्व स्त्रियांसोबतच एकोणिसाव्या शतकातील पंडिता रमाबाई, रखमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, इ. आणि विसाव्या शतकातील सावित्रीवाई रोडे, मालिनी पाणंदीकर, अनुसयाबाई काळे , इ. स्त्रियांचे उदाहरणे घेवून आपण जातीपितृसत्तेचा स्वरूप कसे होते हे समजून घेवू शकतो.
थोडे आजूबाजूच्या जातपितृसत्तेविषयी !
            माघील सहा महिन्यांच्या काळात भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात तीन खूपच महत्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेतील मिटू च्या चळवळीनंतर राया सरकार या तरुणीने लैंगिक छळ-पिळवणूक करणाऱ्या अनेक अभ्यासकांची यादी प्रसिद्ध केली. दोन म्हणजे महाराष्ट्रात तथाकथित ‘सवर्ण’ स्त्रीवादी आणि दलित पुरुष यांच्यात झालेला फेसबुक वाद आणि न्यायालयीन कारवाई आणि तीन म्हणजे काही दिवसांपूर्वी नवरात्रीमध्ये दुर्गा विरुद्ध महिषासुराच्या माध्यमातून झालेला सांस्कृतिक संघर्ष.  पहिल्या प्रकरात अमेरिकेत हॉलीवूड मध्ये स्त्री नट्यांचा दिग्दर्शकाडून लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना बाहेर आल्या. त्यातून अनेकींचे असेच अनुभव होते त्यातून ‘मीसुद्धा’ अशी चळवळ सोशल मिडीयावर सुरु झाली त्यातून फक्त मीसुद्धा असे म्हणून प्रश्न सुटणार नाहीत तर त्याचे नाव सांगा आणि त्याचा निषेध करा (नेम इट अंड शेम इट ) असे म्हटले गेले. या चळवळीचा प्रसार भारतातही झाला. त्यातून राया सरकार नावाच्या मुलीने लैंगिक शोषण, छळ आणि पिळवणूक केलेल्या ७२ लोकांची यादी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली. त्या ७२ जणांमध्ये मोठ मोठे सामाजिक शास्त्रज्ञ आहेत. ह्या घटनेची सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात आणि इतर ठिकाणी काही प्रमाणात खूपच चर्चा झाली. ७२ जणांच्या यादीतील बहुतेक लोक ‘सवर्ण’ आहेत आणि ते ‘दलित-बहुजन’ स्त्रियांचे शोषण करतात येथपासून तर राया सरकार ही दलित आहे, ती जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी करत आह येथपर्यंत लोकांनी काहीही आरोप केलेत. खूपच कमी स्त्रीवादी लोकांनी, अभ्यासकांनी यावर गंभीरपणे भाष्य केले आहे. शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषणाचे प्रकार होत असतात हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. लैंगिक शोषणात जातीचा वापर सर्रास होतांना दिसतो, फक्त ‘सवर्ण’च करतात किंवा फक्त ‘दलित-बहुजन’च करतात असे मात्र आपण म्हणू शकत नाही. दुसऱ्या प्रकारात महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्रीवादी साहित्यिक महिला आणि नाटक-संगीत क्षेत्रात काम करणारा पुरुष यांच्यात खूपच सोशल मिडीयावर वादविवाद झाला. ह्या वादामध्ये अनेक लोक दोन्ही बाजूंनी घुसलेत आणि वादाचे रुपांतर आधी ऑनलाईन भांडणात झाले आणि नंतर प्रकरण कोर्टात गेले. दोन्ही बाजूनी एकमेकांवर ‘मर्यादासोडून’ आरोप-टीका केल्या गेल्या. एकमेकांचे ‘गुपित’ खाजगी आयुष्य सोशल मिडीयावर ‘सर्वांसाठी सार्वजनिक’ करून देण्यात आले. या प्रकरणाला पुढे ‘सवर्ण’ स्त्रीवादी आणि दलित पुरुष असे रूप देण्यात आले. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध ‘स्त्रीवादी’ बायकांचा आणि काही ‘परिवर्तनवादी’ दलित पुरुषांचा यात सहभाग होता. या प्रकरणात दैनंदिन जीवनात ज्याप्रमाणे लोक लैंगिक कुचाळक्या करतात त्याचप्रकारच्या लैंगीक कुचाळक्या केल्या गेल्या आणि त्याला जातीचा आणि वर्गाचा मुलामा देण्यात आलेला दिसून येतो.  तिसऱ्या प्रकारात नवरात्र मध्ये महिषासुराला मारण्याच्या घटनेचा उत्सव काही लोक म्हणवतात. यावेळी तर दहशतवाद, आतंकवाद रुपी महिषासुराला मारण्यासाठी दुर्गेची आराधना सुद्धा करण्यात आली. उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे नेहमी ‘सांस्कृतिक वर्चस्व’ निर्माण करण्यासाठी आणि आपली अस्मिता घडविण्यासाठी वापरले गेले आहेत आणि अजूनही वापरले जातांना दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार नवरात्रीत सुद्धा झाला. भारतात असेही काही जनसमूह आहेत की, जे रावणाप्रमाणेच महिषासुराला सुद्धा आपला आदर्श, कल्याणकारी राजा मानतात. अशावेळी ‘स्पर्धक स्मृतीचे’ सांस्कृतिक राजकारण होतांना दिसते. एकीकडे काहींना महिषासुर हा पितृसत्ताक समाजाचे प्रतिक वाटते आणि दुर्गा ही स्त्रीवादी वाटते तर काहींना अधर्मी महिषासुराला मारणारी दुर्गा ही धर्मरक्षिनी वाटते.  दुसरीकडे काहींना दलित-बहुजनांच्या कल्याणकारी राज्याला मारणारी दुर्गा ही ब्राह्मणी संस्कृतीची प्रतिनिधी वाटते तर काहींना आदिवासी राजा महिषासुराला मारणारी दुर्गा ही नागर संस्कृतीचे आक्रमण वाटते. असे ‘अनेक कथानक’ असलेली महिषासुरमर्दिनी ही दलित पुरुषांना टार्गेट करणारी सवर्ण स्त्रीवादी आहे असेही म्हटले गेले. याप्रकारचे लिखाण केल्यामुळे काही लोकांना शिक्षा सुद्धा झाली.  या तिन्ही घटनांचा आढावा घेतला तर आपणास जातीपितृसत्तेचे राजकारण किती खोलवर रुजले आहे हे स्पष्ट होईल म्हणून सर्वंकष समज बनवून जातीपितृसत्तेविरोधात लढणे खूपच महत्वाचे बनले आहे. 

                                                                                                               - देवकुमार अहिरे

टीप- संबंधित लेख लिहितांना दीपक कसाळे, मुफिद मुजावर, धनश्री जगताप, डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांच्यासोबत कळत- नकळत झालेल्या चर्चेचा उपयोग झाला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...