प्राच्यविद्यापंडीत
मौ. बरकतुल्ला;
भारतीय
स्वातंत्र्यासाठी जागतिक पातळीवर लढणारा एक महान क्रांतिकारक
मौलवी बरकतुल्ला[१]
हे साम्राज्यवादविरोधासाठी अखिल इस्लामवाद, साम्यवाद आणि भारतीय मुक्ती चळवळींमध्ये संवाद ठेवण्याचे[२]
काम करत होते. त्यांनी या संवाद्प्रक्रीयेत खूपच महत्वाची भूमिका निभावली आहे. १९०६ मध्ये टिळकांना अटक
झाल्यावर बहुतेक टिळक अनुयायांना काही दिवसांसाठी भारत देश सोडण्याचा संदेश मिळाला
होता त्यामुळे रामभाऊ मंडलीक हे जपानला गेले. “...टोकियोत प्रो. बरकतुल्लांचे मला
सहाय्य लाभले. भोपाळच्या बेगमने त्यांना तेथे पाठवले होते. ते टोकियो विद्यापीठात
प्राच्यविद्येचे प्राध्यापक होते व भारतातील राष्ट्रीय चळवळीशी एकरूप झाले
होते...पं. श्यामजी कृष्णवर्मा यांच्या विश्वासातील मंडळींपैकी ते एक असल्याने
श्यामजींची पत्रे प्रो. बरकतुल्लांकडे येत.” [३]असे
लिहिणाऱ्या रामभाऊ मंडलीकांनी पुढे आपल्या ‘माझा जपानचा प्रवास’ या प्रवासवर्णनात
बरकतुल्लांची एका ओळीत सुद्धा चर्चा केलेली नाही. “बरकतुल्ला हे प्रथम राष्ट्रवादी
होते आणि नंतर मुस्लीम होते.”[४]
अशी ओळख त्यांची होती. भोपाळ आणि बॉम्बे
येथील शिक्षण संपवल्यावर इंग्लंडमध्ये लिवरफुल विद्यापीठात शिकवण्यासाठी गेले.
इंग्लंडमध्ये असतांनाच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.[५]
टोकियो विद्यापीठात निवड झाल्यावर मो. बरकतुल्लांनी जपानमध्ये आपल्या राजकीय
कृतिकार्यक्रम चालू ठेवला त्यामुळे १९१४ मध्ये ब्रिटीश सरकारच्या दबावामुळे जपान
सरकारने बरकतुल्लानां विद्यापीठातून काढून टाकले. जपान सोडण्यापूर्वीच बरकतुल्ला
आणि कॅलिफोर्नियातील क्रांतिकारी यांचे संबध आले होते. कॅलिफोर्नियात पोहचल्यावर
बरकतुल्ला गदर पक्षाचे काम करू लागले. पहिले महायुद्ध सुरु झाल्यावर पहिले जर्मनी
आणि नंतर इस्तंबूल येथून इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये ब्रिटीश सत्तेच्याविरोधी
प्रचार अभियान सुरु केले होते.[६]
अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर संघटनेच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरोधी सशस्त्र
क्रांतीची योजना आखली होती. त्यासाठी १ डिसेंबर १९१५ रोजी अफगाणीस्थानात काबूलला
हंगामी सरकार बनविले गेले होते. राजा महिंद्र वर्मा हे हंगामी सरकारचे अध्यक्ष तर
मौलवी बरकतुल्ला आणि मौलवी ओबेद्दुल्ला सिंधी हे अनुक्रमे प्रधानमंत्री आणि
गृहमंत्री होते.[७]
परंतु फितुरीमुळे सशस्त्र क्रांतीची योजना फसली आणि गदर पक्षाचे अनेक क्रांतिकारक
पकडले गेले. काहींना फाशी झाली तर काहींना अंदमानमध्ये जन्मठेप भोगावी लागली. अफगाणीस्थानातील हंगामी सरकारचा प्रयत्न फसल्यानंतर बरकतुल्लांनी
भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे चालवलेले प्रयत्न थांबविले नाहीत. १९१७ साली
रशियन क्रांतीनंतर तेथे सत्तेवर आलेल्या लेनिनच्या सरकारशी त्यांनी संधान बांधिले.[८] १९२२ पर्यंत बरकतुल्ला रशियात होते.[९] पुढे अफगाणिस्थानचा अमीर हा ब्रिटिशांसोबत
गेल्यामुळे बरकतुल्ला बर्लिन येथे गेले. तेथे त्यांनी १९२२-२३ मध्ये बोल्शेविकांच्या
मदतीने ‘इंडिअन इंडीपेंडेन्स पार्टी’ नावाची संघटना काढली होती.[१०]
फ्रांसने बंदी घातलेली असतांना आणि इंग्लंडने आरोपी म्हणून घोषित केले असतांनाही
१९२५-२६ साली बरकतुल्ला जिनेव्हा मध्ये हिंदुस्थान गदर पार्टीचे काम करत होते.[११]
१२ सप्टेंबर १९२७ रोजी अमेरिकेतील सनफ्रान्सिस्को येथे त्यांचे निधन झाले.[१२]
ऑक्टोबर १९२७ च्या हिंदुस्थान गदर
पक्षाच्या मुखपत्राच्या संपादकीय मध्ये म्हटले की, “ The loss will
not easily be forgotten nor will the gap created soon be filled. Heros like
Barakullah are not born every day.” बरकतुल्लांच्या
राजकीय कामाची दखल घेत संपादक पुढे लिहितात की, “For thirty five long years – the
period of his exile from India – he wandered from place to place as a political
refugee, with a price on his head.” याच लेखात बरकतुल्लांच्या योगदानाची चर्चा
करतांना म्हटले गेले की, “ He lived for India; he died for India.” अंजूप एस. धिल्लन यांनी “MAULANA HAS COME AND GONE” या लेखात बरकतुल्ला यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे.
त्यात ते म्हणतात की, “ In the eyes of British government Mualana was a rebel, “
a dangerous person,” but for Indians, he is a national hero, a martyr, whose
glory will grow when Indians learn more about the life of this hoary Indian
sage.”[१३]
- देवकुमार अहिरे
- देवकुमार अहिरे
[१] मौलवी बरकतुल्ला हे भोपाळ संस्थानातील होते. टोकियो विद्यापीठात (जपान)
प्राच्यविद्येचे प्राध्यापक होते. जपानमध्ये असतांना आशियायी देशातील
क्रांतीकारकांना साम्राज्यवादविरोधी लढ्यात एकत्र करीत होते. पुढे अमेरिका, अफगानीस्थान,
रशिया, तुर्कस्थान, जर्मनी आणि पुन्हा अमेरिका असा प्रवास त्यांनी भारतीय क्रांतिकारी चळवळीसाठी केला.
गदर पक्षाचे महत्वाचे नेते होते. भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात लेनिनशी
त्यांनी चर्चा केली होती. १९२७ मध्ये सनफ्रान्सिस्को मध्ये त्यांचे निधन झाले.
[२] Maina Ramnath, The Haj to Utopia:
Anti- Colonial Radicalism in South Asian Diaspora -1905-1930, Unpublished PhD Thesis, University of
California, Santa Cruz, पृ. ५१३
[४] Letter, von Hentig to A.C. Bose,
7 April 1956 (Bose 305) उद्धृत Maina Ramnath, The Haj to Utopia:
Anti- Colonial Radicalism in South Asian Diaspora...’ पृ. ५१४
[६] कित्ता, पृ. ५१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा