बुधवार, १ जानेवारी, २०२०

महात्मा जोतीबा फुले




            विद्या हे मानवविकासाचे धन आहे म्हणून आजच्या आर्थिक विकासासोबत मानवविकासाची चर्चा प्रामुख्याने झाली पाहिजे. विद्या आणि मानव विकास यांचा जैविक संबंध आधुनिक महाराष्ट्रात पहिल्यांदा महात्मा जोतीबा फुल्यांनी उलगडून दाखवला त्यामुळेच, महाराष्ट्राची बहुतेक सगळ्याच समाजांमध्ये हळूहळू ज्ञानाची गंगा पसरू लागली. पण, त्याकाळी ब्रिटीशांचे राज्य होते म्हणून ह्या प्रयोगाला अनेक मर्यादा होत्या. आज आपल्या देशात आणि महाराष्ट्रात आपल्याच लोकांचे लोकराज्य असल्यामुळे अजूनही ज्यांच्या दारी ज्ञानाची गंगा गेली नाही अशा सगळ्या जनतेच्या दारी ज्ञान गंगा जावू शकते. फक्त त्यासाठी महात्मा फुलेंसारखी वैचारिक स्पष्टता आणि जिद्द हवी.
             महात्मा फुल्यांच्या सोबत आणि आधीही समाजसुधारक आणि समाजचिंतक होवू गेले. पण, त्यातील बहुतेकांच्या सुधारणा आणि चिंतनाने कधीच आपल्या जातीचे सिम्मोलंघन केले नाही. याचा अर्थ त्यांचे कार्य काहीच नव्हते असे अजिबात नाही. त्यांचे कार्य महत्वाचे होतेच फक्त, ते संपूर्ण महाराष्ट्रीयन समाजाचे कार्य होवू शकले नाही. त्याला दुसरे कारण असेही होते की, महात्मा फुल्यांपुर्वीचे आणि सोबतचे बहुतेक लोक हे शहरी होते. त्यांची ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ नव्हती. यासर्व पार्श्वभूमीवर महात्मा फुल्यांचे कार्य ठळकपणे उठून दिसते.
          महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत की, ज्यांनी स्त्रिया, अस्पृश्य, शेतकरी, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सगळ्याच लोकांमध्ये एकदाच कार्य केले आणि या सगळ्यासमाजांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. त्यातूनच मुक्ता साळवे सारखी मातंग जातीतील चौथी मुलगी अत्यंत चिकित्सक आणि मूलगामी विचार करणारा निबंध लिहू शकली. तसेच, समाजाच्या परीघावर असलेल्या रामोशी समाजातील सावित्रीबाई रोडे ह्या ‘विद्यादेवी’ होवू शकल्या आणि कुंभार समाजाचे धोंडीराम कुंभार हे काशीजावून पंडित होवू शकले. हे स्थित्यंतर आणि मन्वंतर घडण्याच्या मागे फक्त आणि फक्त महात्मा जोतीबा फुले नावाची ज्ञानउर्जाच कारणीभूत होती.
          ‘ख्रिस्त, महमद, मांग ब्राह्मणांशी| धरावे पोटाशी बंधूपरी’ हा जातीधर्मापलीकडे जाणारा मानवतेचा विचार जोतिबांनी मांडला त्यामुळेच, महाराष्ट्राच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक अशा जीवनाच्या सर्वांगांना बदलून टाकणारी समतेची, न्यायाची, बंधुतेची आणि मानवतेची चळवळ महाराष्ट्रात निर्माण होवू शकली. त्यातूनच, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, बापुजी साळुंखे यांनी शिक्षण संस्था स्थापन करून महात्मा जोतीबा फुल्यांचे स्वप्न महाराष्ट्राच्या खेडोपाडी, दारोदारी नेले आणि त्यातूनच १९६० नंतरचा महाराष्ट्र घडला आहे. ग्रामीण शेतकरी आणि कष्टकरी समाजात तसेच, शहरातील मोलमजुरी करणारा कामगार वर्ग सुखी असेल तर आपण सुखी असू शकतो म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सत्यशोधक अनुययांनी शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी अत्यंत भरीव दर्ज्याचे काम केले. महात्मा जोतिबांनी स्वत: बांधकाम क्षेत्रात भरारी घेत नाव कमावले होते.
         त्यामुळेच, महाराष्ट्राच्या सर्वांगाला स्पर्शणारा, ग्रामीण आणि शहर यांची सारखी काळजी वाहणारा तसेच, समाजातील जाती-धर्माच्या पलीकडे जावून सर्वच स्थरांचा आणि समूहांचा विचार करणारा म्हणजे समाजाशी जैविक नाळ असलेला द्रष्टा सुधारक म्हणून महात्मा जोतीबा फुल्यांच्या नावानेच शैक्षणिक किंवा मानवविकासाच्या योजना बनवल्या जाव्यात. 


देवकुमार अहिरे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...