बुधवार, ८ एप्रिल, २०२०

माझी ओळख मला कशी होत गेली! अर्थात माझ्या ' स्व 'ला मी दिलेला आकार आणि इतरांनी लावलेला अर्थ



( १. सदरील पोस्ट ३ एप्रिल २०१६ च्याच पोस्टीची विस्तृत भाग आहे. त्यावेळी एका चर्चेत आपली स्वतःला ओळख कशी होत गेली अशी चर्चा चालू होती. त्यावरील माझी ही प्रतिक्रिया होती.
२. आपण सर्वांनी आपल्याला स्वतः ची ओळख कशी झाली. हे लिहावे. यातून आपण कसे घडत, बिघडत गेलो हे आपणास आणि इतरांनाही कळते. )

बऱ्याच पातळीवर गोची आणि गोंधळ आहे म्हणून सविस्तर जातीचा उल्लेख करतो. बाकी तुम्ही ठरवा की, मला कुठल्या अस्मितेत, झापडबंद आणि साचेबद्ध प्रतिमेत अडकावयाचे. त्याचे मला काहीही देणे घेणे नसले तरी त्या माझ्या अस्मितेंमुळे आलेल्या अनुभवांचा वागण्यावर परिणाम होतो हेही मान्य.माझा महाराष्ट्रातील ' महार ' म्हणून ओळखल्या गेलेल्या जातीत जन्म झाला. थोडे मोठ झाल्यावर कळाले की, आपण 'नवबौद्ध' आहोत. तरीही सवलती मिळतात म्हणून आजीने शाळेत नाव टाकतांना महारच टाकावे असा आग्रह धरला आणि सरांनीही महार टाकले अशी दुहेरी कथा आहे. गावातील काही लोक 'हरिजन' कधीकधी म्हटलेले आठवते. आमचे कुलदैवत ' पिरबाबा' असल्यामुळे दरवर्षी पिराच्या उरुसात आम्ही लहानपणी उत्साहाने सहभाग घेत होतो. आमचे मामा हे पूर्वीपासून 'पान देवाची' साधना करतात.

शहाणा झाल्यावर आम्ही 'जय भीम वाले' आहोत असे सांगत होतो. 12 वी ला ' भारतीय ' आणि पदवीला फक्त ' माणूस ' म्हणून सांगू लागलो. आंबेडकरांच्या जातीत जन्माला आलो म्हणून ' रक्तातच आंबेडकरवाद ' आहे असं वाटू लागले. आंबेडकरांचे लिखाण न वाचताही आपण कधीकधी गांधीला मायबहीनीवरून शिव्या सुध्दा ठोकल्यात आहेत. गांधीं वाचायच शहाणपण काहींच्या सांगण्यातून सुचले. त्यामुळे गांधी बाबा ही थोडाफार समजला. त्यामुळे गांधीला समजून घ्यायला हवे मर्यादेसह असे सांगू लागल्यावर ' गांधीवादी ' सुद्धा म्हटले गेले.

लहानपापासूनच गरिबी आणि दारिद्र्याची लाज वाटत होती. आठवी- नववीत असताना आपण गरीब म्हणून जन्माला आलो ह्याचे खूप वाईट वाटायचे. कारण, वर्गात सगळ्यात पहिला- दुसरा येणारा मी, शनिवारी - रविवारी वर्गातील ' ढ ' वर्गमित्रांच्या शेतात काम करण्यासाठी रोजंदारीवर जात असे. याकाळात आई- वडील गरीब आहेत म्हणून कधी त्यांच्या समोर तर कधी पाठीमागे खूपच शिव्या दिल्या आहेत. अशा पार्श्वभूमीमुळे बारावीत आणि विशेषत: पदवीला असतांना मार्क्सबाबाचे म्हणणे पटू लागले. म्हणूनच, संपूर्ण मार्क्स न वाचता ' मार्क्सवादी ' म्हणून घेवू लागलो. जगण्यातून मार्क्सवादी झाल्यामुळे आंबेडकर आणि गांधी ह्यांच्या सोबतच संवाद होतो.

एकदा एका सेमिनारला एक जतिअंत कार्यकर्ता, माझी चेहरेपट्टी पाहून मला म्हणाला की, तू ' आदिवासी ' वाटतो. औंगाबाद मध्ये अहिराणी भाषेत बोलत होतो, ते ऐकून एक विदर्भातील मित्र म्हणाला तुम्ही आदिवासी का? मी दोन्ही वेळी हो म्हणालो. पुण्यात आल्यावर बहुतेक जन माझ्या आडनावामुले ' मराठा ' समजतात. असे कळाले. कारण, पुण्याच्या जवळपासच्या लोकांना नाशिकचे अहिरे, आहिर आणि आहिरराव माहिती आहेत. एकाने आडनावामुळे तर 'धनगर' समजून माझ्या मामा- मावशींच्या आडनावांची पडताळणी केली. ते बिचारे 'घोरपडे आणि 'शेजवळ' असल्यामुळे माझा अनोळखी धनगर मित्र मला मराठा म्हणून निघून गेला.

आजकाल कोणी ' आंबेडकरवादी ' , ' गांधीवादी ' आणि ' मार्क्सवादी ' सुध्दा म्हणतात. मला त्याचे काही वाटत नाही. कारण जातीव्यवस्थेविरुध्द, धर्मांधतेविरुध्द, भांडवलशाहीविरुध्द लढणे आणि निसर्ग माणुसकेंद्री समताधिष्टीत समाजासाठी लढणे म्हणजे मार्क्सवादी,गांधीवादी आणि आंबेडकरवादी असणे असे असेल तर मी वरील पैकी तिन्ही आहे आणि सगळ्यांनी तसे असावेच. नसेल तर वरील पैकी काहीच नाही.
तसेही, एकविसाव्या शतकात नवीन वैचारिक समज आपण विकसित केली पाहिजे. आपली बौध्दिक क्षमता नवे स्वप्ने पाहण्यासाठी तयार केली पाहिजे. यासाठी जुन्या लोकांची, विचारांची आणि तत्वज्ञानांची गरज पडली तर घ्यावी. नाहीत तर त्यांना अभ्यासविषय म्हणून जतन करून ठेवावे आणि आपला आपण शोध घ्यावा. असा शोध घेणाऱ्या घुम्मकड मंडळींच्या वर्तुळाचा भाग व्हावे.

माणूस कुठल्याही प्रकारचे शुद्ध वर्तन, भाषण, आचरण, आहार, धर्म आणि समाज ह्यात बसत नाही. काही लोक शुद्ध असण्याचा अट्टाहास करतात आणि निरर्थक बडबड करतात असे माझे निरिक्षण आहे. आपण झापडबंदातून आणि कंपूकरणातून बाहेर येऊन आपला अवकाश आणि सामाजिक परिघ वाढवला पाहिजे. वेगवेगळ्या जातीधर्मातील, प्रांतातील आणि देशांमधील मित्र-मैत्रिणी कराव्यात आणि त्यांचा अनुभव समजून घेवून आपणास स्वतः ला संपन्न करावे म्हणजे आपलीच आपणास खरी ओळख होईल एवढे शहाणपण अनुभवातून आणि छोट्या चिंतनातून मला उत्पन्न झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दख्खनचे दंगे आणि सहकार चळवळीची निर्मितीची पार्श्वभूमी

         “ इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाष करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर...