जंगलमे भालू, सब्जीमें आलू सौर पॉलिटिक्स मे लालू तो होनाही चाहिये!
मी तिसरी - चौथीला असेल तेंव्हा माझे एक चुलत चुलत काका भोपाळ वरून आले होते. त्यावेळी चर्चेत त्यांनी वरील गोष्ट सांगितली होती. तेंव्हा पहिल्यांदा माझी लालू यादव यांची ओळख झाली.
नंतर हळू हळू समज आणि दृष्टी विकसित होत गेल्यावर लालू यादव कसले व्यक्तिमत्व आहे याचा उलगडा झाला.
लालू यादव यांना बिहार आणि बिहारच्या जाती आणि जमिनीचा इतिहास समजून घेतल्याशिवाय समजून घेता येत नाही.
लालू यादव सारखा दिल खुल्लास राजकारणी भारतीय राजकारणात विरळाच आहे. त्यामुळेच विनोद, काव्य आणि हास्य ह्या विषयांचा आशय लालू यादव बनू शकले आहेत. अनेकांनी त्यांच्या समोर त्यांची नकल आणी मिमिक्री केली आहे. त्यांच्या खाजगी जीवनावर भाष्य केले आहे. पण, लालूंनी नेहमी कसलेला रसिक म्हणूनच त्याला दाद दिली. आजकाल अनेक राजकरणी मंडळी हास्य, विनोद आणि नकलाकार लोकांना राजकीय विरोधकच समजतात.
गोरक्षेच्या नावाखाली जमातवादी राजकारण करणाऱ्या गायगुंडापेक्षा लालू यादव जास्त गोपालक आहेत. तसेही, त्यांचा गोपालन हा पिढीजात सामाजिक धंदा आहे. लालूंनी अनेक पत्रकारांना दुध, शेण काढतांना मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे गरिबीतून आताच कोणीतरी मोठे राजकारणी बनले आहे असे नाही. लालूंच्या बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यांच्या सारखा अत्यंत गरिब घरातील आणि न्हावी समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री आधीच बनला आहे.
आजकाल, इंग्रजीत फाड फाड बोलणाऱ्या आणि तरीही स्वदेशीचा टेंभा मिरवणाऱ्या लोकांना लालू यादव म्हणजे मागास, जातीवादी आणि खेडवळ भारताचे प्रतीक वाटतात. खरे, तर ही प्रतिमा येथील अभिजनवादी डाव्या- उजव्या मंडळींनी बनवलेली आहे.
इंग्रजी पत्रकारालाही स्वाभिमानाने भौजपूरीत लालू यादव उत्तर देतात. अस्खलित इंग्रजी येत नाहीत म्हणून त्यांच्यांत कणभरही न्युनभाव नसतो कारण, त्यांना लोहियांच्या भाषिक चिंतनाचे मोल माहिती आहे. सामाजिक न्यायाचे राजकारण करतांना अनेकांनी ज्यावेळी त्यांच्यावर जातीवादाचे आरोप केले त्यावेळी त्यांनी कशी उत्तरे दिली हे खरंच पाहण्यासारखे आहे. ह्या संबंधी अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत.
काही लोक म्हणतात की, लालूंना विकासाचे राजकारण करता आले नाही. मला वाटते ह्या विषयावर थोडा जास्त खल झालाच पाहिजे. विकास कशाला म्हणायचे इथपासून ते विकास कोणासाठी आणि कसा करायचा इथपर्यंत चर्चा झाली म्हणजे लालूंच्या दृष्टीची चर्चा करता येईल. बाय द वे, २००७-०८ च्या जवळपास लालूंची चर्चा जगभर झाली. हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्येही त्यांना व्याख्यान देण्यासाठी बोलवण्यात आले होते. भारतीय रेल्वेत सर्वात चांगला रेल्वेमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्यात यशस्वी ठरली.
लालू नंतर रामविलास पासवान, नितीन कुमार, ममता दिली पासून ते आताच्या सर्वपक्षीय रेल्वेमंत्र्यांपैकी कोणालाही लालूंसारखे कामे करता आली नाहीत. स्वतः चा वेगळा ठसा उमवटण्यात यशस्वी होता आले नाही.
युवक चळवळीत असतांना मुसाहार लोकांसोबत उंदीर खाणारे लालू यादव, सर्वात तरुण मुख्यमंत्री लालू यादव, सरकारला सगळ्यात मोठा अडथळा वाटणारे लालू यादव आणि सध्या जेलमध्ये असणारे लालू यादव अशी लालू यादवांची अनेक रुपे आणि विश्व आहेत.
भारतीय राजकारणाचे लोकशाहीकरण करणाऱ्या व्यवहारात लालूंचे मोठे काम आहे. भारतीय राजकारणातील जमातवादाला रस्त्यावर येऊन त्यांनी विरोध केला. हे सगळे खरे असले तरी, व्यवस्थात्मक रचनेतून येणाऱ्या भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाही ह्या आजारांपासून त्यांना स्वतः ला बाजूला ठेवता आलेले नाही. भारतीय राजकारणात भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाही ह्याशिवाय यशस्वी होताच येत नाही. त्यामुळेच, भारतीय राजकारणातील सर्व यशस्वी पुरुषांकडे ( स्त्रिंयाकडे) याशिवाय पाहता येत नाही.
सगळ्यांवर भ्रष्टाचार, गुन्हेगारी किंवा घराणेशाहीचा आरोप कधींना कधी झालेलाच असतो. हा व्यवस्थात्मक सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहे.
सगळे समजून घेतल्यावर लालूंशिवाय भारतीय राजकारणाला मजा नाही असेच म्हणावे लागते.
( काल लालू यादवांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा