गुंतागुतीच्या स्थिती/वास्तवाच्या बुडाच्या गोष्टी न समजून घेतल्यामुळे चर्चाविश्वात/संभाषितात संकल्पनात्मक आणि वैचारिक घोळ खूपच झाला आणि सोबतच काहीबाबातीत खूपच सामान्यीकरण झाले आहे. विसाव्या शतकात सनातनी आहिताग्नी राजवाडे आणि सनातनी गांधी आपापल्या 'सनातनी असण्याचा अर्थ लावत होते. महादेवशास्त्री दिवेकर,कोकजेशास्त्री, चित्राव शास्त्री हे हिंदुत्ववादी पंडित फडकेशास्त्री, धारूरकर शास्त्री आणि इतर सनातनी शास्त्रींच्या तुलनेत परिवर्तनवादी म्हणून घेत होते आणि कधी कधी पुरोगामी आणि प्रागतिक सुद्धा म्हणून घेत होते. हिंदू आणि हिंदुत्व या शब्दांचा 'संदर्भानुसार' चर्चा करायला हवी अन्यथा खूपच घोळ होतात. हिंदू या शब्दाचे राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक अशा अनेक अर्थानी वसाहतीक काळात चर्चा झाली आहे.
एकोणिसाव्या शतकात 'हिंदुत्व' हा शब्द खूपच संधीग्ध अर्थाने वापरला गेला आहे. कधी संस्कृती, कधी समाज तर कधी धर्म या अर्थाने. पण विसाव्या शतकात सावरकर त्याला 'विशिष्ट' अर्थ प्राप्त करून देतात. म्हणून वसाहतीक धर्मचिंतन, समाजचिंतन समजून घेतल्याशिवाय त्यातील तात्विक विचारव्यूह समजणार नाही. साक्षरता, मुद्रणक्रांती, भांडवलशाही आणि राष्ट्रवाद याने आपले वर्तन आणि विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. त्यामुळे या गोष्टींचा सुद्धा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
हल्ली, अनेक उदारमतवाद्यांना, पुरोगामी लोकांना हिंदुत्ववाद्यांच्या तावडीतून 'हिंदू धर्म' सोडवायची घाई झालेली आहे म्हणून ते खूपच प्रयत्न करतांना दिसत आहे. आधी दुर्लक्ष केले आणि आता सर्व गुणदोष आत्मसात करायचे असे झाले आहे. फक्त हिंदू आणि हिंदुत्वाच्या संदर्भात अशी चर्चा करून चालणार नाही तर इस्लाम, सकल इस्लाम ( Pan Islam) यांच्या संदर्भात सुद्धा खोलात जावून / बुडाशी जावून चर्चा करावी लागेल. ख्रिस्ती धर्माचे देशीकरण / ब्राह्मणीकरण कसे झाले. आधुनिकीकरण हे जन्मात: हे एका बाजूने पाश्चिमात्यकरण आणि दुसऱ्या बाजूने ब्राह्मणीकरण कसे होते हेही समजून घेतल्याशिवाय समकालीन पेचप्रसंग सुटणारे नाहीत.
एक मात्र खरे की, पुरोगामी- प्रतिगामी, डावे-उजवे, आधुनिक-पारंपारिक, देशीवादी- वसाहतवादी, हिंदुत्ववादी- गैरहिंदुत्ववादी याच्यापलीकडे जावून चर्चा झाली पाहिजे. बायनरीत चर्चा केल्याने गैरसमज तुटत नाहीत तर पक्के होतात. एकाचवेळी सुटसुट आणि सम्रग बघता यायला हवे मग तो हिंदुचा प्रश्न असो की, मग मुसलमानाचा असो किंवा मग कुठलाही असो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा