हिटलर आणि नाझीवादाच्या विरुद्ध लढणारा
फॅसिझमविरोधी नेता, पाश्चिमात्य देशांच्या वर्चस्वाच्या साखळदंडातून आशियाई
देशांना मुक्त करण्याचे स्वप्ने पाहणारा सकल आशियावादी कार्यकर्ता, भारतीय
स्वातंत्र्यासाठी झटणारा राष्ट्रवादी हिरो, चीन आणि कोरियामधील जपानच्या आक्रमणाला
विरोध करणारा अराज्यवादी चिंतक आणि
जगाच्या शोषणमुक्तीसाठी झटणारा अव्वल
भारतीय साम्यवादी म्हणजे विरेंद्रनाथ चटोपाध्याय उर्फ चॅटो! साम्राज्यवादविरोधी राष्ट्रवाद,
अराज्यवाद आणि साम्यवाद यांची संमिश्र वैचारिक परंपरेचे मेरुमणी म्हणजे विरेंद्रनाथ
चटोपाध्याय.
कौटुंबिक
पार्श्वभूमी, शिक्षण आणि लेखन !
निझामाची राजधानी हैद्राबादमध्ये
प्राध्यापक असलेल्या बंगाली डॉ. अघोरीनाथ चटोपाध्यायांचा मुलगा म्हणजे विरेंद्रनाथ.
डॉ. अघोरीनाथांना एकूण आठ अपत्य होते. त्यामध्ये विरेंद्रनाथ सर्वात मोठे होते.
भूपेंद्रनाथ, रनेन्द्रनाथ, हरीन्द्रनाथ ( भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रसिद्ध
स्त्रीवादी – समाजवादी नेत्या असलेल्या कमलादेवी चटोपाध्यायांचा नवरा), सरोजिनी
नायडू ( स्त्रीवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीच्या नेत्या), मृणालिनी, सुभाषिणी
नांबियार ( ए. सी. नंबियार यांची बायको), सुनालिनी आणि रुखमिनी, ही विरेंद्रनाथांची
भावंडे होती.
३१ ऑक्टोबर१८८० रोजी विरेंद्रनाथांचा
हैद्राबादमध्ये जन्म झाला. मद्रास
विद्यापीठात मॅट्रीक्युलेशन झाल्यांनतर बंगालमधील कलकत्ता विद्यापीठात कलाशाखेत पदविचे
शिक्षण घेतले. त्यानंतर १९०२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करण्यासाठी
ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. दोनदा प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत अपयश
आले. त्यामुळे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी १९०९ मध्ये मिडल टेम्पल येथे
प्रवेश घेतला. विरेंद्रनाथ हे बहुभाषी होते. त्यांना अनेक भारतीय भाषा उदाहरणार्थ
तेलगु, तमिळ, बंगाली, उर्दू, पर्शियन, अरेबिक, हिंदी, इंग्रजी
आणि परदेशी भाषांमध्ये फ्रेंच, इटालियन, जर्मन, डच, रशियन आणि
स्कॅंडीनेव्हीयन भाषा – स्वीडिश, डॅनिश आणि नॉर्वजीयन अस्खलितपणे बोलता येत
होत्या. १९२० नंतर जर्मनीमध्ये भाषाशास्त्राचे विद्यार्थी म्हणूनही त्यांनी काम
केले. पुढे, १९३३ मध्ये सोविएत रशियामध्ये स्थाईक झाल्यावर त्यांनी मानवशास्त्र
विभागामध्ये काम केले.
ब्रिटीश साम्राज्यविरुद्ध अनेक प्रचारकी
लेखन त्यांनी केले. कम्युनिस्ट इंटरनॅशनल म्हणजे कॉमिटर्नमध्ये भारतीय
क्रांतीविषयक सैद्धांतिक लिखाणही केले. तसेच, राजकारणासोबत इथ्नोग्रपी,
भाषाशास्त्रावर त्यांनी अकादेमिक लेखनही त्यांनी केले आहे.
क्रांतीकारी
चळवळीत सहभाग!
शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेलेल्या विरेंद्रनाथांवर
बंगाली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते बिपीनचंद्र पाल यांचा प्रभाव पडला होता.
विसाव्या शतकातील पहिली काही दशके युरोपच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा काळ आहे.
या काळातच पहिले महायुद्ध झाले. रशियन
क्रांती झाली आणि राष्ट्र संघाची स्थापनाही झाली. या सगळ्या घडामोडींनी आणि
घटनांनी संपूर्ण विसाव्या शतकाच्या जागतिक, वैचारिक, राजकीय आणि आर्थिक अशा समग्र
बाबींवर प्रभाव टाकला आहे. कारण, या काळात अनेक वैचारिक चळवळींची जडणघडण युरोपात
होत होती. साम्राज्यवादामुळे जगभरातील वसाहतींमधील विद्यार्थी (उदाहरणार्थ- चीन,
जपान, आफ्रिका, इंडिया, इंडोनेशिया इत्यादी)
युरोपातील अनेक शहरांमध्ये शिकत होती आणि सोबतच, वैचारिक आणि राजकीय
चळवळींमध्ये सहभागी होत होती.
इंडिया हाउस आणि
चॅटो !
लंडनमधील श्यामजी कृष्ण वर्मांनी सुरु
केलेले ‘इंडिया हाउस’ भारतीय आणि आशियाई क्रांतिकारकांच्या चळवळींचा प्रसिद्ध
अड्डा बनले होते. वेलेटाईन चिरोल ( संपादक टाइम्स न्यूजपेपर) यांनी भारताबाहेरील
सर्वात खतरनाक संस्था म्हणून इंडिया हाउसचे वर्णन केलेले आहे. इंडिया हाउसमध्ये अनेक क्रांतिकारी मंडळी होती.
त्यामधील वीर वि. दा. सावरकरांचा प्रभाव विरेंद्रनाथ
चटोपाध्यायांवर पडला. १९०८ पासून विरेंद्रनाथ
चटोपाध्याय हे बिपीनचंद्र पाल यांच्या ‘स्वराज’ या राष्ट्रवादी मासिकाचे सहसंपादक
म्हणून काम करत होते. तसेच, त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मांच्या ‘इंडियन
सोसिओलोजीस्ट’ पत्रात लिखाण करायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात
क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी कर्जनची हत्या केली. कर्जनच्या हत्येनंतर
लंडनमधील वातावरण भारतीय क्रांतिकारी लोकांसाठी सोयीचे नव्हते. अशा काळात सावरकरांनी
मदनलाल धिंग्रांच्या कृतीचे समर्थन करणारा ठराव लंडनमधील बैठकीत मांडला. त्यावर
टाईम्स वृत्तपत्राने कठोर टीका केली. त्यावेळी टाईम्स वृत्तपत्राला दिनांक ६ जुलै
१९०९ रोजी विरेंद्रनाथांनी पत्र पाठवून सावरकरांच्या कृतीचे समर्थन केले. त्यामुळे
मिडल टेंपलने त्यांना काढून टाकले. सावरकरांच्या अटकेनंतर लंडनमधील ‘फ्री इंडिया
सोसायटी’चे उपाध्यक्ष म्हणून विरेंद्रनाथांची नेमणूक झाली. लॉर्ड कर्जनच्या
हत्येमुळे ब्रिटीश गुप्तचर पोलीसांचा ससेमिरा भारतीय क्रांतीकारांच्या मागे लागला
होता. म्हणून १९१० मध्ये त्यांनी लंडन सोडून पॅरीसमध्ये आले. पॅरीसमध्ये आल्यावर
त्यांनी ‘तलवार’ आणि मादाम भिकाजी कामा यांच्या ‘वंदे मातरम’ या वृत्तपत्रांचे
संपादकत्व घेतले. तसेच, कामाबाईंची ‘पॅरीस
इंडिया सोसायटी’चे भाग बनले. याकाळात विरेंद्रनाथांचा
संबंध फ्रेंच अराज्यवादी आणि समाजवादी चळवळींशी आला. तसेच त्यांनी फ्रेंच समाजवादी
पार्टीचे सभासदस्व घेतले.
पहिले महायुद्ध
आणि चॅटो!
सावरकरांच्या भारतीय रवानगीनंतर
पॅरीसमध्येही ब्रिटीशांची ‘नजर’ भारतीय क्रांतिकारकांवर वाढल्यावर विरेंद्रनाथांनी
पॅरीस सोडले. थोड्या काळासाठी ते
स्वित्झर्लंड गेले आणि तेथून ते अमेरिकेत गेले. याच काळात अमेरिकेत लाला हरदयाळ
आणि इतर मंडळी ‘गदर पार्टी’ची बांधणी करत होते. या दरम्यानच्या काळात विरेंद्रनाथांनी
मिस रेनोल्ड यांच्याशी विवाह केला होता. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात
झाली. त्यावेळी भारतीय क्रांतीकारींनी जर्मनीची मदत घेवून भारतातील ब्रिटीश सत्ता
उलथवून टाकायचे ठरवले होते. त्यासाठी त्यांना बर्लिनला जायचे होते. त्यामुळे मिस
रेनोल्ड आणि विरेंद्रनाथ वेगळे झाले. बर्लिनमध्ये येवून त्यांनी ब्रिटीशविरोधी
प्रचार चालवला होता. विरेंद्रनाथांची सर्व
राजकीय कारवाया ह्या गुप्त पद्धतीने चालत असत कारण त्यावेळी त्यांच्यावर ब्रिटीश
गुप्तचरांची नजर होती म्हणून ते पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्लिन मध्ये
‘तुलनात्मक भाषाशास्त्रा’चे विद्यार्थी म्हणून वावरत असत. जर्मनीमधील ३१ विद्यापीठातील
भारतीय विद्यार्थ्यांशी विरेंद्रनाथांनी संबंध स्थापित केला होता. १९१४ च्या
सप्टेंबरमध्ये ‘भारतीयांचे जर्मन मित्र’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली.
त्यामध्ये वरील सर्व विद्यापीठातील विद्यार्थी होते. त्यामध्ये स्वतः चॅटो, डॉ.
मोरेश्वर गोविंदराव प्रभाकर, डॉ. अब्दुल हाफिज, सी. पद्मनाभन, डॉ. ज्ञानेंद्र
दासगुप्ता, धीरेन सरकार, नरेन मराठे, विष्णू सुकटणकर,गोपाल परांजपे, करंदीकर,
शिरीष चंद्र सेन इत्यादी जर्मन
विद्यापीठातील विद्यार्थी होते. त्यामध्ये हरदयाळ, तारकनाथ, मोहमद बरकतुल्ला, ए. आर. पिल्लई, विष्णू गणेश
पिंगळे आणि इतरांचा नंतर समावेश झाला. हिंद-जर्मनी
मैत्रीकरार म्हणून भारतीय क्रांतिकारक आणि जर्मन सरकारमधील कराराला ओळखले जाते. त्यालाच पुढे ‘इंडो-जर्मन कारस्थान’ असे
ब्रिटिशांनी म्हटले. गदर पार्टीच्या उठावाला पूर्ण मदत ‘भारतीयांचे जर्मन मित्र’
ही संस्था करत होती. १९१४ मध्ये कर्तारसिंह आणि सत्येन सेन आणि पिंगळे यांना विरेंद्रनाथांनी
कलकत्याला पाठविले. तेथे जतीन मुखर्जी यांच्याशी आणि रासबिहारी बोस यांच्याशी
चर्चा करून लष्करी उठावाची तयारी करण्याचे नियोजन केले. स्वित्झर्लंडमध्ये राजा महेंद्र वर्मांना भेटले
आणि त्यांना जर्मन राजा कैसर विल्यम दुसरा याचे निमंत्रण दिले. यावेळी ब्रिटीश
गुप्तचर विरेंद्रनाथांवर पाळत आणि नजर ठेवून होते. डोनाल्ड गुलिक या गुप्तचराने
त्यांचा खून करण्याचा डाव आखला होता असे त्या गुप्तचाराच्या लिखाणावरून समोर आले
आहे. पुढे, गदर पार्टीच्या या उठावाला अपयश आले.
महायुद्धाचा
काळ, रशियन क्रांती आणि साम्यवाद !
गदर पार्टीच्या उठावाला अपयश आले तसेच
इंडो-जर्मन नियोजनसुद्धा अपयशी ठरले होते. त्यामुळे १९१७ मध्ये विरेंद्रनाथांनी ‘बर्लिन
कमिटी’ स्टॉकहोम येथे हलवली. दरम्यानच्या काळात रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली
कम्युनिस्टांनी क्रांती केली होती. १९१८
मध्ये विरेंद्रनाथांचा कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे पहिले सचिव अन्जेलिका बालाबानोवा
यांच्याशी संपर्क झाला. याकाळात डॉ. पांडुरंग खानखोजे आणि विरेंद्रनाथ भारतीय
क्रांतीसंदर्भात रशियन क्रांतीकारांसोबत चर्चा करत होते असे संदर्भ मिळतात. तसेच,
याकाळातच विरेंद्रनाथांचा आणि लोकमान्य टिळकांचा पत्रव्यवहार झाला होता असे य. दि.
फडकेंच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसते. १९१९ मध्ये भारतीय क्रांतीकारकांची गुप्त
सभा घेतली. १९२० मध्ये एम. एन. रॉय यांच्या माध्यमातून सोविएत कडून भारतीय
क्रांतीकारकांना आर्थिक आणि राजकीय मदत झाली पाहिजे अशी चर्चा विरेंद्रनाथ करत
होते. त्यासाठी त्यांनी सोविएतला भेट दिली. तिसऱ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या कॉंग्रेसमध्ये
लेनिनसोबत त्यांची भेट झाली.
महायुद्धोत्तर
काळ, अराज्यवादी प्रभाव आणि साम्राज्यवाद विरोधी लीगची स्थापना!
महायुद्धोत्तर काळात विरेंद्रनाथांच्या जीवनात अनेक बदल झाले कारण १९२१ ते
१९२७ च्या काळात बर्लिनमध्ये अनेक बदल झाले. १९२१ मध्ये त्यांनी अग्नेस स्मेडली या
अमेरिकन समाजवादी पत्रकार मैत्रिणीशी त्यांनी सहजीवन सुरु केले होते. १९२८ मध्ये
दोघे वेगवेगळे झाले. विरेंद्रनाथांविषयी अग्नेस लिहिते की, “ His mind was modern, but his emotional roots were in
Hinduism and Islam. Everyone understood and loved Viren, few understood me”. दरम्यानच्या काळातच इमा गोल्डमन या अराज्यवादी विचारवंत
कार्यकर्तीशी त्यांची मैत्री झाली. तिच्या अराज्यवादी विचारांचा प्रभाव
त्यांच्यावर बराच पडला होता. त्या संदर्भात इमा गोल्डमन लिहिते की, “He
called himself an anarchist, though it was evident that it was Hindu
nationalism to which he had devoted himself entirely”. अग्नेस आणि इमा दोन्ही मैत्रिणी
होत्या.
१९२१ मध्ये त्यांनी ‘ इंडियन न्यूज अँड
इन्फोर्मेशन ब्युरो’ सुरु केले. या ब्युरोशी अमेरिका, अफगानिस्तान आणि जपानमधील
भारतीय क्रांतिकारी लोक जोडले गेले होते. १९२१ मध्येच त्यांनी इंडियन असोशिएशन ऑफ
सेन्ट्रल युरोप फॉर स्टुडंट अँड युथ’ ची स्थापना केली. १९२३ (काहींच्या मते १९२६)
मध्ये त्यांनी जर्मन कम्युनिस्ट पार्टीशी जोडून घेतले. याकाळात जर्मनीमध्ये
‘जर्मनी अगेन्स्ट वार आणि फॅसिझम’ आणि ‘असोशिएशन ऑफ रिव्होल्युशनरी एशिएन्स’ अशा दोन संघटना स्थापन
झाल्या होत्या दोन्हींमध्ये विरेंद्रनाथांचा सक्रीय सहभाग होता. भारताच्या
स्वातंत्र्याची चळवळ, चीनी क्रांतीची चळवळ आणि जपानमधील युद्ध विरोधी चळवळीला वरील
दोन्ही संस्थांचा पाठींबा होता. बर्लिनमध्येच ‘साम्राज्यवाद विरोधी लीग’ची स्थापना
झाली आणि तिचे सचिव म्हणून विरेंद्रनाथ चटोपाध्याय यांची निवड झाली. १९२७ मध्ये
साम्राज्यवाद विरोधी लीगची पहिली परिषद भरली होती. त्यामध्ये जगभरातील
साम्राज्यवादविरोधी अराज्यवादी, राष्ट्रवादी, साम्यवादी मंडळींनी सहभाग घेतला
होता. भारतातून पंडित जवाहरलाल नेहरू सहभागी झाले होते.
१९२९ मध्ये जवाहरलाल नेहरू कॉंग्रेसचे अध्यक्ष
झाल्यावर विरेंद्रनाथांनी त्यांना काही पत्रे पाठवली होती. त्यामध्ये त्यांनी
कॉंग्रेसमध्ये ब्रिटीश साम्राज्यवाद विरोधी भारतीय संपूर्ण स्वातंत्र्याचा
क्रांतिकारी कार्यक्रम राबवावा अशी भूमिका घेतली होती. १९३० ते १९३२ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीने घेतलेल्या
भूमिकांवर भाष्य करणारी जवळपास २८ लेख विरेंद्रनाथांनी कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या मुखपत्रात लिहिले आहेत.
जर्मनीतील
सत्तास्पर्धा, हिटलर आणि चॅटोचा फॅसिझमविरोधी लढा !
साम्राज्यवादविरोधी लीगमुळे विरेंद्रनाथांना
बहुतेकदा भारतीय स्वातंत्र्य चळवळ, जपानी युद्ध विरोधी चळवळ, चीनी क्रांती यांच्या
संदर्भात सक्रीय असलेला कार्यकर्ता आणि नेता म्हणून पाहिले जाते. परंतू याकाळात
त्यांनी फॅसिझमविरोधी लढलेल्या लढ्याची
तेवढी चर्चा होत नाही. जर्मनीमध्ये हिटलर आणि नाझीवादाचा उदय आणि विस्तार होत
असतांना विरेंद्रनाथ त्यावेळी जर्मन कम्युनिस्ट पार्टीमध्ये होते. नाझींनी
जोरदारपणे कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. इटलीमध्येही
मुसोलिनीचा उदय झाला होता. संपूर्ण युरोपमध्ये फॅसिझमचा धोका वाढत होता म्हणून
संपूर्ण युरोपातील फॅसिझमविरोधी कार्यकर्त्यांना घेवून १९३० पासूनच विरेंद्रनाथ
आणि त्यांचे सहकारी फॅसिझमविरोधी जाळे निर्माण करत होते. त्याचाच भाग म्हणून १९३२
मध्ये त्यांनी अॅमस्टरडॅममध्ये युद्धविरोधी परिषद घेतली. त्यातूनच पुढे ‘फॅसिझम
आणि युद्ध विरोधी संयुक्त आघाडी’ स्थापन करण्यात आली. एवढे सर्व प्रयत्न करूनही
युद्ध आणि फॅसिझमचा विस्तार विरेंद्रनाथ आणि त्यांचे सहकारी थांबवू शकले नाही.
१९३३ मध्ये हिटलर सत्तेवर आला. सत्तेवर येताच हिटलरने राजकीय विरोधकांना
संपवण्याचा कार्यक्रम सुरु केल्यामुळे १९३३ मध्ये विरेंद्रनाथांना जर्मनीतून पळून
जावे लागले.
स्टॅलीनच्या
एकाधिकारशाहीचा बळी !
जर्मनीमध्ये नाझीवाद्यांनी सत्ता हस्तगत
करताच कम्युनिस्टविरोधी कारवाया सुरु केल्यामुळे जर्मनीमध्ये वास्तव्य असलेल्या
भारतीय, चीनी आणि जपानी क्रांतीकराकांना जर्मनी सोडावी लागली. बहुतेकजण कम्युनिस्ट
होते आणि त्यांचा संबंध कम्युनिस्ट
इंटरनॅशनलशी असल्यामुळे अनेकांनी सोविएत मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणेच विरेंद्रनाथही सोविएतमध्ये गेले. तेथे त्यांनी डॉ. लिडिया
कारुनोस्काया या सहकारी कॉम्रेडशी सहजीवनाला सुरुवात केली आणि लेनिनग्राडच्या
अकॅडेमी ऑफ सायन्समधील ‘इंस्टीट्यूट ऑफ इथ्नोग्रफी’ मध्ये काम केले. १९३० च्या
दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांनी अनेक लेख, पुस्तके आणि मोनोग्राप
लिहिले आहेत पण सोविएतमधील विरेंद्रनाथांच्या शेवटच्या आयुष्याविषयी जास्त माहिती
मिळत नाही. १९३४ मध्ये लेनिनच्या बायकोची त्यांचा पत्रव्यवहार झाला होता आणि
त्यानंतर कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे सचिव ग्रोगरी दिमित्रोव यांना पत्र लिहून कळवले
होते की, ‘माघील तीन वर्षांपासून कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या कामापासून वेगळे केले
आहे.’ विरेंद्रनाथ चटोपाध्याय यांचा शेवट कसा झाला. याविषयी अनेक वेगवेगळ्या कथा
आहेत. स्टॅलीन जिवंत असेपर्यंत आणि नंतर स्टॅलीनवादाचे प्रभुत्व असल्यामुळे
विरेंद्रनाथ चटोपाध्याय यांच्यासोबत काय झाले हे स्पष्टपणे सांगण्यात आले नाही.
काहींनी ते १९३७ मध्ये वारले असे लिहिले आहे. काहींनी १९४०, काहींनी १९४१ मध्ये
आजारपणामुळे वारले असे लिहिले आहे. आणि काहींनी ते १९६० मध्ये वारले असेही लिहिले
आहे.
भारतातील वेगवेगळ्या कम्युनिस्ट मंडळीनी
त्यांच्याविषयी लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांनीही त्यांच्यावर लिहिले
आहे तसेच ब्रिटीश गुप्तचरांनी त्यांच्याविषयी नोंदी केल्या आहेत. त्या
सगळ्यांमध्ये संदिग्धता आहे. शेवटी, सोविएत रशियाचे विघटन झाल्यावर अनेक रशियन
कागदपत्रे खुली झाली आहेत. त्यानुसार चॅटो हे स्टॅलीनवादाचे बळी आहेत हेच स्पष्ट
होते. कारण, १९३७ मध्ये त्यांना आणि जपानी कम्युनिस्टांना अटक करण्यात आली होती. विरेंद्रनाथ
आणि जपानी कम्युनिस्ट हे बर्लिनपासून सोबतच वेगवेगळ्या राजकीय चळवळींमध्ये सक्रीय
होते. जपानी कम्युनिस्ट हे जपान चे गुप्तचर आहेत असा आरोप ठेवून मारून टाकण्यात
आले. विरेंद्रनाथांना कोणत्या आरोपाखाली मारण्यात आले हे माहिती नाही. विरेंद्रनाथांचे
एम. एन. किरोव यांच्याशी जवळकीचे संबंध होते. १९३० च्या दशकात किरोव हे स्टॅलीननंतर
कम्युनिस्ट पार्टीत दुसरे प्रसिद्ध नेते
होते. तसेच, दुष्काळ आणि शेतीच्या सहकारीकारणामुळे स्टॅलीनची प्रसिद्धी उतरंडीला
लागली होती. त्यामुळे पक्षातील स्वतःची सत्ता बळकट आणि दृढ करण्यासाठी पक्षांतर्गत
विरोधकांना संपवणे क्रमप्राप्त बनले होते म्हणून १९३४ मध्ये किरोव यांची हत्या
करण्यात आली. किरोव यांच्याशी विरेंद्रनाथांची जवळीक होती म्हणूनच त्यांची हत्या
करण्यात आली असावि असाही काहींचा तर्क आहे. अटक केल्यापासून काही दिवसातच म्हणजे २
सप्टेंबर १९३७ रोजी मारण्यात आले. परंतू त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या रशियन
बायकोला तीन वर्षांनी सांगण्यात आली.
समकालीन जग आणि
चॅटोचा वैचारिक वारसा!
विरेंद्रनाथ चटोपाध्यायांनी संपूर्ण
आयुष्य साम्राज्यवादविरोधी लढाईत घालवले सोबतच, वेगवेगळ्या वैचारिक परंपरेशी संवाद
ठेवला. त्यामुळेच अराज्यवादी, राष्ट्रवादी आणि साम्यवादी लोकांना घेऊन ते
फॅसिझमविरोधी संयुक्त आघाडी उघडू शकले. स्वातंत्र्याच्या चळवळींशी बांधिलकी
असल्यामुळे त्यांनी कोरिया आणि चीनवरआक्रमण केलेल्या जपानी कारवायांचा निषेध केला.
तसेच, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद विरुद्ध सकल एशियातील क्रांतिकारी लोकांची मोट
बांधली. आज, जग पुन्हा युद्ध, धर्मांधता, दहशतवाद आणि फॅसिझमकडे जात आहे अशावेळी
चॅटोची आठवण काढणे आणि त्याचा सतत संघर्षाचा आणि कृतीशील असण्याचा वारसा जपणे
अत्यंत जिकरीचे बनले आहे.