शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

सकल इस्लामवाद, समाजवाद आणि भारतीय राष्ट्रवादातील संपर्कबिंदू क्रांतिकारी मौलाना बरकतुल्ला

 

           मौलवी बरकतुल्ला हे साम्राज्यवादविरोधासाठी सकल इस्लामवाद, साम्यवाद आणि भारतीय स्वातंत्र्य लढयांमध्ये संवाद ठेवण्याचे काम करत होते. त्यांनी या संवाद्प्रक्रीयेत खूपच महत्वाची भूमिका निभावली आहे. भारतीय लोकांनी भारताबाहेर चालवलेल्या क्रांतिकारी चळवळीतील महत्वाच्या नेत्यांपैकी महत्वाचे क्रांतिकारक म्हणून बरकतुल्ल्ला ओळखले जातात.

बालपण आणि शिक्षण :

           ७ जुलाई १८५४ रोजी त्यांचा भोपळ येथे जन्म झाला. तेथीलच सुलेमानिया या मदरसामध्ये त्यांचे आरंभीचे शिक्षण झाले. भोपाळमध्येच त्यांनी अरेबिक, पर्शियन भाषांचा आणि धार्मिक शस्त्रांचा अभ्यास केला. विद्यार्थी असतांना त्यांना साम्राज्यवाद विरोधी आणि सकल इस्लामवादी नेते जमालुद्दीन अफगाणी यांना भेटण्याची संधी मिळाली होती. जमालुद्दीन अफगाणी यांचा साम्राज्यवाद विरोधी लढ्याचा प्रभाव बरकतुल्ला यांच्यावर आयुष्यभर राहिलेला दिसतो. मदरसामधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना तेथेच शिक्षकाची नोकरी मिळाली. परंतु, काही काळातच सुलेमानिया मदरसामध्ये संपूर्ण शिक्षण मिळत नाहीये याची जाणीव झाली म्हणून त्यांनी जबलपूर येथील ख्रिस्ती मिशनरी लोकांच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला.

           ख्रिस्ती मिशनरींसोबत ते मुंबईला गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी इंग्रजी भाषेच्या ज्ञानात कौशल्य मिळवले. पुढील काही वर्षांनी ते इंग्लंडमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले.  ‘ओरीएंटल युनिव्हरसिटी ऑफ लिव्हरफूल’मध्ये त्यांनी शिक्षण घेतले आणि तेथेच काही वर्ष ते प्राध्यापक होते. इंग्लंडमधून ते अमेरिका आणि नंतर जपानमध्ये गेले. तेथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केली. जपानच्या वास्तव्यात त्यांनी जपानी भाषा शिकून घेतली आणि टोकियो विद्यापीठामधील परकीय भाषा विभागात ते शिकवत होते. मौलाना बरकतुल्ला यांना अरेबिक, पर्शियन, उर्दू, तुर्किश, इंग्रजी, जर्मन, आणि जापनीज अशा भाषा येत होत्या.

परदेशांतून भारतमुक्तीचा लढा !

         जमालुद्दीन अफगानींच्या भेटीमुळे साम्राज्यवाद विरोध आणि सकल इस्लामवादाची दीक्षा त्यांनी घेतली होती. पण, त्यांच्या राजकीय कृतींची खरी सुरुवात इंग्लंडमधील आठ वर्षांच्या वास्तव्यात झाली. त्यावेळी लंडन हे भारतीय राष्ट्रवादी लोकांचे केंद्र बनले होते. गोपाल कृष्ण गोखले आणि इतर कॉंग्रेसच्या लोकांचे भाषणे त्यांनी त्यावेळी ऐकली परंतु त्यांच्या मवाळ मांडणीमुळे बरकतुल्लांचा भ्रमनिरास झाला. लंडनमध्येच त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा भेटले. त्याकाळात श्यामजी कृष्ण वर्मा हे भारतीय स्वातंत्र्याची चळवळ लंडनमधून चालवत होते. भारतातील अनेक तरुणांना शिष्यवृत्त्या देवून लंडनला बोलवत असत.

        १८९५ मध्ये लिव्हरपूलमध्ये येथेच काबूलचा राजपूत्र नसरुल्ला याची भेट झाली. पुढे या भेटीचा खूपच फायदा झाला आहे. इंग्लंडच्या तुर्कस्थान धोरणावर बरकतुल्लांनी टीका केल्यामुळे त्यांना इंग्लंड सोडावे लागले. ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. भारतीय लोकांना जागृत करण्याचे आणि ब्रिटीश धोरणांची चिकित्सा करण्याचे काम ते करत होते. पाच वर्ष अमेरिकेत राहिले. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात भारतातील मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी चळवळीचा आणि सकल इस्लामवादी चळवळीचा प्रसार होत असतांना त्यांनी हसरत मोहानींना लिहिले होते की, “There are two duties of the Muslims residing in India. One is the duty for the country and the other of their religion. The love for the country demands that one should not shirk in serving the country with wealth and his own life. The history of mankind stands witness that he who has no love for the country is devoid of humanity... The religious duty demands that the Indian Muslims on account of Islamic brotherhood are friends to the Muslims of the world. And whenever there is a challenge they should extend all possible support. The fulfilment of these religious and country's duty depends upon only one action, the complete unity between the Hindus and Indian Muslims.”

            बरकतुल्लांचे विचार तत्कालीन मुस्लीम विद्वानांना पटत होती. त्यामुळेच १९१० मध्ये चीनला पाठवण्यात आलेल्या कमिटीमध्ये बरकतुल्लांची निवड मकबूर रहेमान सरहिंदी यांनी केली. चीन मधील राष्ट्रवादी घडामोडींचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही कमिटी केली होती. परंतु, कमिटी चीनला पोहचू शकली नाही आणि बरकतुल्ला जपानला पोहचले. जपानमध्ये त्यांची भेट इजिप्तशीयन क्रांतिकारी फजली यांच्यासोबत झाली. फजली त्यावेळी ‘इस्लामिक बंधुत्व’ (Islamic Fraternity) चे संपादक होते. फजलींच्या निधनानंतर बरकतुल्ला त्याचे संपादक झाले आणि त्यांनी ब्रिटीश विरोधी प्रचार आणि सकल इस्लामवाद याविषयी लिखाण करायला सुरुवात केली. त्यामुळे जपानमधील ब्रिटीश राजदूताच्या दबावामुळे ‘इस्लामिक बंधुत्व’ बंद करावे लागले. याकाळात बरकतुल्ला जापनीज भाषा शिकले आणि टोकियो विद्यापीठात प्राध्यापक झाले. भगवान सिंह, मथुरा सिंह आणि इतरांसोबत बरकतुल्ला जपानमध्ये एक  क्रांतीकारांकांचा गुप्त गटाचाही भाग होते. १९१३ मध्ये ‘ऐलान – ए- आझादी’ हा त्यांनी लिहिला. त्यामध्ये तलवारीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे ब्रिटिशांनी जपान सरकारवर दबाव आणून त्यांना जपानमधून बाहेर काढले.

            १९१३ मध्येच अमेरीकेत लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वाखाली गदर पार्टीची स्थापना झाली होती. त्यांनी जगभरात त्यांचा संदेश पाठवला होता. त्यामुळे जपानमधून काढल्या गेल्यावर मौलाना बरकतुल्ला अमेरिकेत आले.  गदर पक्षाच्या हालचालींवर ब्रिटीश सरकारचे लक्ष होते. ब्रिटीशांच्या सांगण्यावरून अमेरिकन सरकारने लाला हरदयाळ यांना अमेरिकेतून बाहेर काढले. त्यावेळी हरदयाळ यांनी गदरच्या मुखपत्राची जबाबदारी बरकतुल्ला यांच्यावर सोपवली होती. पहिल्या महायुद्धाच्या काळात (१९१४-१९१९) ब्रिटीश विरोधी प्रपोगंडा गदर चळवळीने सुरु केला. त्यावेळी इंग्लंडचा शत्रू जर्मनी होता. त्यामुळे बहुतेक भारतीय क्रांतिकारी जर्मनीमध्ये स्थायिक झाले होते कारण, जर्मनीच्या साहय्याने ब्रिटीश सत्तेचा पराभव करण्याचे ते स्वप्ने पाहत होते. १९१४ मध्येच ‘ बर्लिन इंडियन नॅशनल पार्टी’ची स्थापना झाली. तिचे रुपांतर पुढील काळात ‘युरोपातील भारतीय स्वातंत्र्याची बर्लिन कमिटी’ असे झाले. कमिटीच्या स्थापनेत बरकतुल्ला यांच्यासोबत राजा महेंद्र वर्मा, सी. एन. पिल्लाई, डॉ. हाफिज मन्सूर, अब्दुल वाहिद, डी. के. सरकार, भूपेंद्रनाथ दत्त  आणि इतरांचा सहभाग होता.

          पाहिल्या महायुद्धाचा फायदा घेवून गदर क्रांतिकारींनी काबुल येथे भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली. राजा महेंद्र वर्मा हे अध्यक्ष झाले तर मौलवी बरकतुल्ला आणि मौलवी ओबुदुल्ला सिंधी हे अनुक्रमे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री झाले. परंतु फितुरीमुळे सशस्त्र क्रांतीची योजना फसली आणि गदर पक्षाचे अनेक क्रांतिकारक पकडले गेले. काहींना फाशी झाली तर काहींना अंदमानमध्ये जन्मठेप भोगावी लागली. अफगाणीस्थानातील हंगामी सरकारचा प्रयत्न फसल्यानंतर बरकतुल्लांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे चालवलेले प्रयत्न थांबविले नाहीत.. दरम्यानच्या काळात त्यांनी तुर्कस्थान, इजिप्त, अरेबिया इकडे जावून साम्राज्यवाद विरोधी प्रचार केला आणि सकल इस्लामवादाची मांडणी केली. १९१७ मध्ये रशियामध्ये क्रांती झाल्यामुळे जगभर क्रांतिकारी मंडळींसाठी महत्वाचा संदेश गेला. बरकतुल्ला, राजा महेंद्र वर्मा आणि इतरांसोबत मास्कोमध्ये रशियन क्रांतीचा नेता लेनिन यांना भेटले. त्या भेटीत बरकतुल्ला लेनिनच्या विचारांनी प्रभावित झाले असे म्हटले जाते. कारण, बरकतुल्ला यांनी तुर्किश भाषेत ‘बोल्शेव्हीझम’ चा मुस्लिमांमध्ये प्रसार व्हावा म्हणून एक पत्रक काढले होते.

       १९२२ मध्ये बरकतुल्ला गंभीर आजारी पडले. त्यामुळे राजा महेंद्र वर्मा त्यांना घेवून जर्मनीला गेले. तेथे त्यांची प्रकृती सुधारली. १९२३ मध्ये स्वित्झरलँडमध्ये पाहिल्या महायुद्धातील विजेत्या राष्ट्रांची बैठक होती. त्यावेळी तुर्की आणि अरब लोकांमध्ये मैत्री व्हावी यासाठी तिकडे गेले होते. त्यांनी अरब राष्ट्रांतील लोकांच्या काही बैठका त्यावेळी आयोजित केल्या होत्या. १९२८ मध्ये त्यांनी मुस्लीम जगात संदेश पाठवला की, तुम्ही तुमचे प्रतिनिधी मक्का आणि मदिना इकडे पाठवा असा संदेश दिला आणि खलिफा ची निवड करा असेही म्हटले. बरकतुल्ला यांचा खलिफा पदाचा पुनरुज्जीवनाचा प्रयत्न हा ब्रिटीश सत्ताधारी लोकांना साम्राज्यविरोधी वाटत होता.  पॅरीसमध्ये बसून त्यांनी हे कार्य चालवले होते. त्यामुळे ब्रिटीश सरकारने फ्रेंच सरकारला सांगून त्यांना फ्रांस बाहेर काढले.  याकाळात राष्ट्राच्या विकासाठी काय केले पाहिजे याविषयी त्यांनी लिखाण केले. भारताच्या दयनीय स्थितीवर भाष्य करतांना ते लिहितात की, “"Nations and peoples physical development and spiritual advancement depends upon their economic condition. In countries where bread is available to eat, clothes to wear and houses to people complete the work which they take up. But the people who day and night search for their livelihood had hardly time to think of acquisition of high learning and great arts and sciences. India is the only country where most of its inhabitants are paupers. They have neither access to a full meal nor sufficient clothes to cover themselves, nor a suitable house to live in. There are more than three hundred nawabs and rajas over 300 million people. Apparently they possess every pomp and show, but internally they are hollow. The same is the condition of the Zamindars and traders. After all what expectation can be had of their living together with hungry, naked, homeless people who are unaccountable like ants and insects. They have hardly any moments of respite to think of setting right the condition of their own and their nation.”

            १९२६-२७ याकाळात मौलाना बरकतुल्ला हे जिनेव्हा मध्ये हिंदुस्थान गदर पार्टीचे काम करत होते. १९२७ मध्ये ब्रुसेल येथे झालेल्या ‘ आंतरराष्ट्रीय साम्राज्यवाद विरोधी परिषदे’ला ते उपस्थित होते. ब्रुसेलवरून ते जर्मनीला गेले. गदर पार्टीच्या निमंत्रणामुळे ते जर्मनीवरून सनफ्रान्सिस्को ( अमेरिका) येथे गेले. मौलाना बरकतुल्ला यांची तब्येत खूपच खराब झाल्यामुळे १२ सप्टेंबर १९२७ रोजी अमेरिकेतील सनफ्रान्सिस्को येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या दफनविधीला हिंदू, मुस्लीम आणि शीख असे सर्व धर्मीय मंडळी होती आणि त्या सगळ्यांनी आपापल्या धर्माच्या प्रार्थना म्हटल्या. ऑक्टोबर १९२७ च्या हिंदुस्थान गदर पक्षाच्या मुखपत्राच्या संपादकीय मध्ये म्हटले की, “ The loss will not easily be forgotten nor will the gap created soon be filled. Hero’s like Baraktullah are not born every day.” बरकतुल्लांच्या राजकीय कामाची दखल घेत संपादक पुढे लिहितात की, “For thirty five long years – the period of his exile from India – he wandered from place to place as a political refugee, with a price on his head.”  याच लेखात बरकतुल्लांच्या योगदानाची चर्चा करतांना म्हटले गेले की, “ He lived for India; he died for India.” अंजूप एस. धिल्लन यांनी “MAULANA HAS COME AND GONE”  या लेखात बरकतुल्ला यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्यात ते म्हणतात की, “ In the eyes of British government Maulana was a rebel, “ a dangerous person,” but for Indians, he is a national hero, a martyr, whose glory will grow when Indians learn more about the life of this hoary Indian sage.”

          इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी, अफनिस्थान, रशिया, तुर्कस्थान, इजिप्त, अरेबिया  फ्रान्स, स्वित्झरलँड अशा देशांमध्ये सातत्याने साम्राज्यवाद विरोधी कारवाया करण्यासाठी मौलाना बरकतुल्ला भटकंती करत राहिले. सकल इस्लामवाद, समाजवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यांचा मिश्रण असलेली त्यांची दृष्टी आजकालच्या झापडबंद लोकांना कळणे सोपी नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साम्राज्यवाद विरोधासाठी धार्मिक, प्रादेशिक आणि वैचारिक क्षेत्रात अनेक घुसळणी झाल्या होत्या आणि त्यामुळे एकाचवेळी वेगवेगळ्या विचारधारांचा प्रभाव लोकांवर दिसतो.

 

 

            

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...