१९४७ साली ब्रिटीश साम्राज्यवाद्यांची सत्ता जाऊन दक्षिण आशियामध्ये एकीकडे
स्वातंत्र्य आणि दुसरीकडे फाळणी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्यामुळे अनेक प्रश्न
निर्माण झाले. फाळणीच्या माध्यमातून हिंदू, मुस्लीम आणि शीख यांनी एकमेकांचे केलेले शिरकाण आणि
हत्याकांड, आणि स्वातंत्र्यानंतर तेलंगणा आंदोलन, जम्मू –
काश्मीर संस्थान विलीनीकरण आणि हैद्राबाद पोलीस अक्शन, या सगळ्या घटनांमुळे खूप
मोठी हिंसाचार झाला. त्यामध्ये अनेक लोक मारली गेली. अनेकांचे संसार उद्धवस्त
झाले. अनेकांना परागंदा व्हावे लागले. स्त्रिया आणि लहान मुले ही हिंसाचाराची
सगळ्यात जास्त बळी ठरली. नव्याने जन्माला आलेल्या भारत,
पाकिस्तान आणि बांग्लादेश (पूर्वीचा पूर्व पाकिस्तान) यांच्या आधुनिक
राष्ट्रबांधणीची इमारत ही वरील सगळ्या हत्याकांडांच्या आणि हिंसाचारांच्या
रक्ताच्या चिखलाने बांधलेली आहे. म्हणून, भविष्याची चिंतेचा
आणि चर्चेचा डोलारा उभा करतांना नेहमी इतिहासाचा धडा घेणे गरजेचे आहे. परंतु मागील
काही वर्षांपासून दक्षिण आशियामध्ये हिंसेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची
शक्यता निर्माण झालेली दिसते. कारण, १. कश्मीरचा विशेष दर्जा
काढून घेतल्यापासून कश्मीरमध्ये भारतीय सरकार विरोधातील असंतोष वाढला आहे. २. मुथ्थय्या मुरलीधरनच्या बयोपिकच्या
निमित्ताने तामिळनाडूमध्ये पुन्हा तमिळ राष्ट्रवादी लोकांनी मोर्चा बांधणी सुरु
केली आहे. ३. खलीस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या आणि शौर्य चक्र मिळवणाऱ्या
कॉम्रेड बलविंदरसिंह संधू यांची दिवसाढवळ्या खलीस्तानी दहशतवाद्यांनी हत्या केली
आहे. वरील तिन्ही घटना जरी भारतातील असल्या तरी त्यांचा परिणाम हा दक्षिण आशिया आणि
संपूर्ण जगावर होणार आहे. कारण, जगभरात कश्मीर, तमिळ आणि
खलिस्तानी चळवळ यांचे समर्थक आणि विरोधक मंडळींचे जाळे आहे.
पाकिस्तानपासून ते ब्रह्मदेश आणि भारत, श्रीलंकापासून ते बांग्लादेश ही सगळी भूमी ब्रिटीश
साम्राज्याची भाग होती. त्यामुळे ब्रिटीश साम्राज्याच्या अनेक गरजांसाठी मजुरांचे
स्थलांतर होत होते. तसेच, व्यापार आणि व्यवसायाच्या
निमित्तानेही लोक स्थलांतरित होत होती. म्हणूनच अनेक पंजाबी शीख लोक आसाम राज्यात
दिसतात. तमिळ लोक श्रीलंका आणि इतर देशांमध्ये दिसतात. बंगाली लोक ब्रह्मदेशात आणि
आसामात दिसतात. अशी अनेक उदाहरणे दक्षिण आशियामधील वेगवेगळ्या देशांमध्ये आणि
त्यांच्यातील राज्यांमध्ये होते आणि आहेत. परंतु, दक्षिण
आशियामध्ये धार्मिक आधारावर फाळणी झाल्यामुळे तसेच, धर्मांध,
राष्ट्रवादी आणि वांशिक ध्रुवीकरणाचे राजकारण वाढल्यामुळे अनेक भयानक गोष्टी मागील
साठ – सत्तर वर्षात घडल्या आणि घडवल्या गेल्या आहेत. भारतातील प्रधानमंत्र्यांचे
खून झाले आहेत. पाकिस्तानात लष्करी राजवट लावल्या गेल्या आणि सगळ्या दक्षिण
आशियामध्ये भाषिक, वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना अनेक
समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यातूनच पूर्व पाकिस्तानमधून भाषा आणि
संस्कृतीच्या मुद्द्यावर वेगळे होत बांग्लादेशाची निर्मिती झाली. तशीच चर्चा
भारतात स्वतंत्र तामिळनाडूची आणि
खलिस्तानची होती. स्वतंत्र तमिळ आणि स्वतंत्र खलिस्तान चळवळीतून तमिळ राष्ट्रवाद
आणि पंजाबी/शीख राष्ट्रवादाची चर्चाही झाली. काहींनी त्याला तमिळ दहशतवाद आणि
खलीस्थानी दहशतवाद असेही म्हटले आहे. पाकीस्तानात अहमदिया मुस्लिमांचे प्रश्न
आहेत. तसेच, सिंध आणि बलुची लोकांचेही अनेक प्रश्न आहेत.
ब्रह्मदेशात रोहिंग्य मुस्लिमांना अमानवी वागणूक दिली जात आहे आणि भारतात कश्मीर
प्रश्नांचा गुंता पुन्हा जटील बनत आहेत. त्यामुळे दक्षिण आशियातील नेत्यांनी आणि
देशांनी भविष्याकडे आगेकूच करायची असेल तर नव्याने आपला इतिहास पुन्हा समजून घेतला
पाहिजे.
भारतात काही दिवसांपासून हिंदुत्ववादी
राजकारणाचा जोर वाढल्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न आणि समस्या उद्भवत आहेत. झपाट्याने
वाढणारे सत्तेचे केंद्रीकरण हे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. कारण, भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा
अतिरेकी केंद्रीकरण झाले आहे. त्यावेळी प्रादेशिक, भाषिक आणि
वांशिक समूहांनी, गटांनी प्रतिरोध करत आपआपली स्वायत्तता आणि
स्वतंत्रता जपलेली आहे. म्हणूनच, उत्तर भारतीय सांस्कृतिक आणि भाषिक रेटा दक्षिण
भारतावर लादणे हे घातक सिद्ध होवू शकते. जलीकट्टू, हिंदी भाषेच्या मुद्यावरून
तामिळनाडूमध्ये मोठी प्रतिक्रिया तमिळ अस्मितावादी लोकांकडून आली होती. तशीच
काहीशी चर्चा ‘भारतीय संस्कृती’च्या अभ्यासासाठी नेमलेल्या कमिटीच्या निमित्ताने
आली आहे. तमिळनाडूतील या सगळ्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे स्पष्टपणे
दिसून येईल की, जरी लिट्टेचा खात्मा झालेला असला तरी
अजूनही तमिळ राष्ट्रवाद हा तमिळनाडूमध्ये
प्रभावी आहे. मुथ्थय्या मुरलीधरनच्या
बायोपिकच्या निमित्ताने तमिळ राजकीय वर्तुळात, तमिळ कलेच्या वर्तुळात जी
प्रतिक्रिया आली आहे. ती त्याचेच लक्षण आहे.
श्रीलंकेत झालेल्या तामिळांच्या हत्याकांडाविरुद्ध श्रीलंकन तमिळ असलेल्या मुरलीधरनने काहीही
भूमिका घेतली नाही म्हणून त्यावर निघणाऱ्या चित्रपटात काम करू नये म्हणून दबाव
आणला जात आहे . तसेच, मुरलीधरन हा देशद्रोही ठरवला जात आहे.
कॉम्रेड बलविंदरसिंह संधू यांची झालेली हत्या ही पंजाबात खलीस्तानी कारवाया
पुन्हा जोर पकडत आहेत याचे लक्षण आहे. माघील काही वर्षांमध्ये युरोपात
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काढलेल्या निर्देशन मोर्चांमध्ये खलीस्तानी
गटांचा सहभाग दिसून आलेला आहे. भारतात भाजपचा आणि हिंदुत्वाचा चढताक्रम पाहता
पंजाबात खलिस्तानी गटांनी आक्रमक होणे ही त्याचीच प्रतिक्रिया आहे. कारण, १९८०
च्या दशकांमध्ये झालेल्या शिखविरोधी हिंसाचारात अजूनही न्याय मिळालेला नाही अशी
भावना असलेली दिसून येते. पंजाबात सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलायला सुरुवात
झालेली आहे. अकाली दलाची सत्ता जावून कॉंग्रेसची सत्ता येणे आणि शेतकऱ्यांची
आंदोलने तीव्र होणे ही पंजाबातील सामाजिक पृष्ठभूमिखाली घडणाऱ्या बदलांची लक्षणे
आहेत असे दिसते. त्यामुळेच अकाली दलाने शेतकरी प्रश्नांवर भाजपविरोधी भूमिका घेतली
आहे.
भारतीय
लोकांना इतिहासात रमायला आवडते पण इतिहासाकडून ते काही शिकत नाही असेच दिसते. कारण, आपण नेहमी सारख्याच चुका काही दशकानंतर
परत करत असतो. आपल्या समाजात लोकांना
इतिहास रंजकता खूपच आहे पण इतिहास साक्षरता आणि शिक्षण नसल्यामुळे इतिहासातून
कोणताही धडा घेतला जात नाही. इतिहासातील महापुरुष, घटना, संस्था, विचारसरणी यांचा अभ्यास करून आणि त्याची
साधक बाधक चिकित्सा करून प्रश्न सोडवणे अपेक्षित असते पण,
इतिहासातून धडा न घेतलेली मंडळी प्रश्न सोडवत नाहीत तर तो वाढवत असतात.
त्याच्यामध्ये अनेकांचे आर्थिक, राजकीय हितसंबंधही असतात. तमिळ
अस्मितेचा मुद्दा, खलिस्तानी दहशतवाद आणि कश्मीर प्रश्नामुळे
भारताचे अनेक पातळींवर नुकसान झालेले आहे. तरीही आपण या मुद्यांवर काही मार्ग
काढलेले नाहीत आणि समकालीन परिस्थितीत काही मार्ग काढले जातील असे काही दिसत नाही.
त्यामुळेच या मुद्यांना घेवून इतिहासात झालेल्या हिंसाचार आणि हत्याकांड
यांच्यातून आपण काहीच धडा घेतलेला नाही असेच म्हणावे लागते.
-
देवकुमार अहिरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा