गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

जे. सी. कुमारप्पा : गाव, पर्यावरण, लोकशाही आणि विकेंद्रित विकासाचा पथदर्शक अभ्यासक!


         स्वातंत्र्योत्तर भारतात गांधीचा वैचारिक आणि राजकीय वारस्यावर अधिकार सांगणारी अनेक मंडळी होती. आम्हीच गांधीच्या स्वप्नातील भारत घडवू अशीही चर्चा घडवली जात होती. त्यातून वेगवेगळ्या वैचारिक – राजकीय चळवळी, संस्था, संघटना आणि पक्षांमध्ये तुंबळ वैचारिक हल्ले सुद्धा केले जात होते. परंतू, स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गांधींच्या स्वप्नातील भारत काही घडलेला दिसत नाही आणि समकालीन स्थिती पाहता भविष्यात घडेल की, नाही याची शाश्वती नाही असेच म्हणावे लागते. गांधी विचारांची स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने सरकारी पद्धतीने मांडणी केली. सर्वोदयवाद्यांनी विनोबांच्या नेतृत्वाखाली अराजकीय, धार्मिक पद्धतीने मांडणी केली आणि समाजवाद्यांनी लोहीया-जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली जनचळवळींच्या पद्धतीने मांडणी केली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी, मठी आणि रस्त्यावरील गांधी अशी प्रतिमा निर्माण झाली. परंतू, त्यामुळे शेती, पर्यावरण, लोकशाही आणि विकेंद्रित विकास अशी समग्रपणे मांडणी करून भौतिक विरुद्ध संस्कृती, विकास विरुद्ध पर्यावरण आणि भांडवलशाही विरुद्ध समाजवाद अशा द्वैती विचारांना नाकारत गांधी विचारांना विकसित करणारी जे. सी. कुमारप्पा यांची वैचारिक परंपरा मागे पडली, दुर्लक्षित राहील. म्हणूनच, आजही गांधींच्या वैचारिक वारसदारांची चर्चा सुरु झाल्यावर नेहरू, विनोबा आणि लोहिया आणि त्यांचे अनुयायी यांची नावे पुढे येतात.

             अशा सर्व परिस्थितीमुळे भारताचे वैचारिक, राजकीय, पर्यावरणीय, सामाजिक आणि शेतीबाबतीत मोठे नुकसान झाले आहे. जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या समस्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अनेक ताणेबाणे आणि समस्या उद्भवत आहेत. समाजवादी रशियन प्रयोगाच्या अपयशानंतर अनेकांनी अनेकांनी भांडवलशाहीच्या पर्यायांची चर्चा करणेच सोडले आहे कारण, विचार आणि कल्पनांचा खूपच अभाव आहे.सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळींवर भांडवलशाहीत्तोर समाजाची कल्पनाच न करता येणे. ही  खूपच मोठी वैचारिक वानवा आणि दार्शनिक अभावाचे लक्षण आहे.  समकालीन पेचातून बाहेर पाडण्यासाठी आणि नवी दिशा देण्यासाठी अजूनही जे. सी. कुमारप्पा यांचे विचारविश्व आणि चिंतन आपण उपयोगी पडू शकते म्हणून आजच्या लेखात आपण त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत.

कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी-

         जे. सी. कुमारप्पांचे पूर्ण नाव जोसेफ चेल्लदुराई कोर्निलीस असे होते. पुढे, त्यांनी कोर्निलीस बदलून कुमारप्पा करून घेतले म्हणून त्यांना जे. सी. कुमारप्पा असे म्हणतात. त्यांचा जन्म ४ जानेवारी १८९२ रोजी मद्रास प्रांतातील तंजावर येथील कर्मठ ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मद्रास प्रांत आणि उच्च शिक्षण ब्रिटनमध्ये अर्थशास्त्र आणि चार्टर्ड अकाऊंट या विषयामध्ये घेतले. ब्रिटनमधून परत आल्यावर त्यांनी ‘कोर्निलीस अँड दावर’ ही फर्म सुरु केली. १९२८ मध्ये अमेरिकेला ‘इकोनोमिक्स आणि बिझनेस अॅडमिनीस्त्रेशन’चे शिक्षण घ्यायला गेले. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी सदरील विषयाचे शिक्षण घेतले. त्यावेळी एडविन सेलीग्मन हे त्यांचे शिक्षक होते. सेलीग्मन हे डॉ. आंबेडकर यांचेही शिक्षक होते. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्यावर राष्ट्रीय शिक्षणासाठी स्थापन झालेल्या गुजरात विद्यापीठात त्यांची अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

          १९२९ मध्ये कुमारप्पा गांधींना भेटले. गाधींनी कुमारप्पांना ‘ग्रामीण गुजरातचा आर्थिक सर्व्हे’ करायला सांगितला. त्यावेळी ते गुजरात विद्यापीठात होते म्हणून गुजरात विद्यापीठाने सरदार पटेल आणि जे. सी. कुमारप्पा यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमली. त्यात विद्यापीठाचे नऊ विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक घेतले. डिसेंबर १९२९ ते मार्च १९२०, दरम्यान ५४ गावांचा अभ्यास करण्यात आला. जे. सी. कुमारप्पांनी क्षेत्रभेटी दिल्या. गावागावांमधून माहिती गोळा केली.  नंतर १८ महिन्यांमध्ये संपूर्ण माहितीचे विश्लेषण करून अहवाल सप्टेंबर १९३१ मध्ये प्रकाशित केला. ब्रिटीशांच्या महसूल, जलनियोजन आणि शेती विभागांमुळे गुजरातच्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी जनता दारिद्र्यात आणि विपन्न अवस्थेत आहे असे जे. सी. कुमारप्पांनी सांख्यकी आणि आर्थिक विश्लेषणातून दाखवून दिले. तसेच, ग्रामीण आणि शेती भागात कशा पद्धतीने बदल घडवून सुधारणा घडवून आणता येईल असे सल्ले आणि शिफारशी सुद्धा त्यांनी अहवालात केल्या होत्या.

स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग -

         ‘ब्रिटीशांचे कर धोरण आणि त्यामुळे होणारे भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण’ ह्या लेखामुळे कुमारप्पा मध्यवर्ती राजकारणात आले. गांधींशी संबंध आल्यावर कुमारप्पा राष्ट्रीय शिक्षण चळवळीत सहभागी झाले. गुजरात विद्यापीठात ते एकीकडे अर्थशास्त्र शिकवत होते तर दुसरीकडे ‘यंग इंडिया’चे संपादक म्हणून राजकीय कामही करत होते. गांधीच्या चळवळीमुळे आणि विचारांमुळे मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य जनता कॉंग्रेसमध्ये आली. त्यामुळे राजकीय स्वातंत्र्यासोबतच व्यापक समाजपरिवर्तनाची आणि पुनर्रचनेची विविधांगी चळवळ गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी चालवली. त्यामध्ये जे. सी. कुमारप्पांचा महत्वाचा हिस्सा आहे. तसेच, अर्थाशास्त्र अभ्यासक असल्यामुळे त्यांचीही पर्यायी अर्थदृष्टी होती. त्यामुळे त्यांनी १९३५ मध्ये ‘अखिल भारतीय ग्राम उद्योग संघ’ स्थापन केला.  १९४२ च्या छोडो भारत चळवळीत महत्वाच्या कॉंग्रेसनेत्यांना ब्रिटिशांनी पकडले होते. त्यामध्ये जे. सी. कुमारप्पासुद्धा होते. कारागृहात असतांना त्यांनी पुढील पुस्तके लिहिली-  Economy of Permanence, The Practice and Precepts of Jesus (1945) and Christianity: Its Economy and Way of Life (1945).

 वैचारिक बैठक आणि चिंतन :

          बहुतेकदा काही मंडळी जे. सी. कुमारप्पांना गांधीवादी किंवा गांधी अनुयायी म्हणून संकुचित करून टाकतात. कुमारप्पांवर गांधींचा प्रभाव होता. पण ते स्वतंत्र चिंतक, विचारक आणि अभ्यासक होते. युरोप – अमेरिकेत अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला असल्यामुळे त्यांची अर्थशास्त्रविषयी मूलगामी चिंतन केले होते. भांडवलशाही आणि समाजवादातील अंतर्विरोधांचा आणि केंद्रीकरणाचा त्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास केला होता. त्यामुळे त्यावरील पर्याय ते सुचवू शकले. कुमारप्पा यांनी ख्रिस्ती आणि गांधीयन मूल्यांना एकत्र करून ‘ ट्रस्टीशीप’, अहिंसा, मानवी मूल्य आणि विकास च्या संकल्पनेवर अर्थशास्त्रात काम केले. समाजवादातील ‘वर्ग संघर्ष’ आणि बळाचा वापर’ आणि भांडवलशाहीतील ‘ भौतिक प्रगती, स्पर्धा यांना नाकारत मानवी गरजाकेंद्री अर्थव्यवस्थेचा विचार मांडला. त्यामध्ये त्यांनी बेकारी, दारिद्र्य आणि मागलेपणामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक- आर्थिक संघर्षांची सुद्धा चर्चा केली.

            काही इतिहासकार कुमारप्पांना ‘हिरवे गांधी (ग्रीन गांधी)’ असेही म्हणतात. त्यांचे आर्थिक विकासाचे सिद्धांत आणि शेती, गाव आणि पर्यावरणकेंद्री विचार करणारे असल्यामुळे त्यांना तसे म्हटले जाते. आर्थिक विकेंद्रीकरण, ग्रामीण विकास, शेती, नैसर्गिक साधन संपत्ती, मातीची उत्पादकता, गरिबी अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथ निर्मिती केली आहे.

केंद्रीकरणवादी नेहरू युगाची जे. सी. कुमारप्पाकृत चिकित्सा  

            स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसला बहुमत मिळून नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले. स्वातंत्र्य चळवळीत लोकांना अनेक स्वप्ने दाखवली होती. तसेच, भारताला नव्याने घडवायचे होते. स्वातंत्र्याचा आनंदोत्सव काही महिन्यांच संपला आणि दंगे, गांधी हत्या, तेलंगणाचा उठाव आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत यादवी अशा अनेक प्रकारच्या घडामोडीमुळे देशाला कोणत्या मार्गाने पुढे घेवून जायचे यावरून अनेक वादविवाद होवू लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जग दोन महासत्तांमध्ये विभागले गेल्यामुळे सुद्धा भारतासारख्या नव स्वतंत्र देशांची मोठी कोंडी झाली. नेहरूंनी त्यावर मार्ग म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला आणि एकीकडे भांडवलदारांच्या ‘बॉम्बे योजने’ला मान्यता दिली आणि दुसरीकडे समाजवादी नियोजनाचा पुरस्कार केला. या सर्व स्थितीमुळे अनेक गोंधळ झाले. भांडवलशाही आणि समाजवाद दोन्ही अतिरेकी केंद्रीकरण करतात त्यामुळे जे. सी. कुमारप्पा नेहरूंच्या धोरणांच्या विरोधात होते. समाजवादी नियोजनच्या केंद्रीकरणामुळे भांडवलदार वर्गालाच फायदा झाला. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट करण्यात आली. मोठमोठे धरणे बांधण्यात आली. त्यामुळे आदिवासी लोकांना, शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागले.

             मोठे धरणे हे अनावश्यक आणि विध्वंसक आहेत अशी भूमिका कुमारप्पांची होती. लहान धरणे आणि जलनियोजनाच्या माध्यमातून आपली पाण्याची गरज भागवली जावू शकते. रासायनिक खते आणि बियाणे यांच्यापेक्षा सेंद्रिय खते आणि बियाणे जास्त उपयोगाची आणि कमी नुकसानीची असतात. तसेच, जंगल संपत्ती ही नैसर्गिक संपत्ती आहे त्यामुळे त्याचा विध्वंस न करता संवर्धनच केले पाहिजे. परंतु, तत्कालीन नेहरू सरकारने त्यांच्या सगळ्या सूचना आणि सल्ले दुर्लक्षित केल्या. नेहरूंचे सरकार ज्यावेळी मोठमोठे उद्योगांना पाठींबा देत होते. त्यावेळी, जे. सी. कुमारप्पा ‘लहान आणि मध्यम उद्योग आणि शेतीचा विचार करत ग्रामीण विकासाची भूमिका मांडत होते. चीन, पूर्व युरोप आणि जपान या देशांमधील ग्रामीण आर्थिक रचनेचा अभ्यास करण्यासाठी सरकारी दौरा केला. मीराबेनांच्या सोबत कुमारप्पांनी मोठ्या धरणांना विरोध केला होता.

 

 

वैचारिक वारसा आणि आजचा काळ !

            नेहरूंच्या सरकारी धोरणांना विरोध आणि चिकित्सा केल्यामुळे नेहरूवादी, काँग्रेसी मंडळीनी जे. सी. कुमारप्पांच्या महत्वपूर्ण सल्ल्यांकडे  आणि मांडणीकडे दुर्लक्ष केले. चीनी क्रांतीनंतर झालेल्या महत्वाच्या जमीन आणि ग्रामीण सुधारणांची दखल घेतल्यामुळे विनोबाप्रणीत सर्वोदयवाद्यांना जे. सी. कुमारप्पा मार्क्सवादी झाले असे वाटले म्हणून तेही वेगळे झाले आणि समाजवादी मंडळींचा एकीकडे मार्क्सवादविरोध आणि दुसरीकडे रचनात्मक कामांचा अभाव अशा गोष्टींमुळे ते गांधीवादी समाजवादी मंडळीमध्येही राहू शकले नाही. म्हणूनही, स्वातंत्र्योत्तर भारताच्या काही दशकांनंतर जे. सी. कुमारप्पा खूपच मर्यादित लोकांना माहिती आहेत. परंतू, एकविसाव्या शतकात भारतात आणि जगभरात सांस्कृतिक, भौतिक आणि पर्यावरणीय असे सगळ्याच प्रकारचे प्रश्न आणि समस्या तीव्र झाल्यामुळे या सगळ्यांचा समग्रपणे विचार करणाऱ्या जे. सी. कुमारप्पांचे विचारविश्व मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरत आहे. सर्व प्रकारच्या सत्तेचे विकेंद्रीकरण केल्याशिवाय लोकशाही व्यवस्था ठीकू शकत नाही, ग्रामीण विकास, दारिद्र्य निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धन होवू शकत नाही असे इतिहासाच्या मागील काही दशकांचा विचार केल्यावर आपण म्हणून शकतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...