विसाव्या शतकात जागतिक सत्तास्पर्धा वाढल्यामुळे जागतिक महायुद्धे उद्भवली.
त्याचे सामाजिक, राजकीय, वैचारिक, आर्थिक,
कौटुंबिक आणि लैंगिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल झाले. त्यामुळेच
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच वेगवेगळ्या वैचारिक चळवळी, स्वातंत्र्य
लढे आणि विचार, आचार आणि व्यवहार प्रक्रियांची घडणघडण जगभरात वैश्विक
पातळीवर होत होती. तशीच प्रक्रिया वेगवेगळ्या देशांमध्ये स्थानिक पातळीवर सुद्धा
आकारास येत होती. वैश्विक आणि स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घटनांचा द्वंद्वात्मक
प्रभाव एकमेकांवर पडत होता असे आपणास दिसते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर १९०५ चे
जपान- रशियायुद्ध, १९१७ ची रशियन क्रांती अशा अनेक घडामोडींचा
प्रभाव झाला. १९०५ नंतर ‘सकल आशियावाद’ जपानच्या
नेतृत्वाखाली आकारास येत होता. तसेच, रशियाच्या
नेतृत्वाखाली समाजवाद आणि टर्कीच्या नेतृत्वाखाली सकल इस्लामवादाचा विस्तार होत
होता. म्हणूनच असे म्हणतात येते की, वासाहतिक भारतीय
स्वातंत्र्याची चळवळ ही फक्त स्थानिक चळवळच
नव्हती तर ती वैश्विक वैचारिक- राजकीय प्रक्रिया सुद्धा होती.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा भाग असलेल्या अनेक व्यक्ती (स्त्री- पुरुष) या
वेगवेगळ्या वैचारिक परंपरेच्या होत्या. तसेच, एकाचवेळी वेगवेगळ्या
वैचारिक चळवळी आणि प्रक्रीयेंच्या सुद्धा भाग होत्या. त्यामुळेच स्थानिक पातळीवर
आणि वैश्विक पातळीवर त्यांची नाळ जोडलेली आणि संपर्कजाळ विस्तारलेले होते. अशा
व्यक्तींमध्ये कमलादेवी चटोपाध्याय हे एक अत्यंत महत्वाचे नाव आहे. कमलादेवी ह्या
वासाहतिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि लैंगिक
स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राष्ट्रवाद, समाजवादाशी वैचारीक
नाळ असलेल्या स्त्रीवादी कार्यकर्त्या, नेत्या होत्या. तसेच, त्यांचा आफ्रिकन, आशियन, दक्षिण
अमेरिकन नागरी जनचळवळीशी नाते होते.
आंतरराष्ट्रीय स्त्रीवादी चळवळीमध्येही त्यांचा सहभाग होता.
आरंभिक आणि कौटुंबिक
आयुष्य!
कमलादेवींचा जन्म मंगलोरमधील सारस्वत जातीच्या कुटुंबामध्ये ३ एप्रिल १९०३
मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक सेंट अँन्स कॉन्व्हेंट शाळेमध्ये
झाले. त्यांचा बालविवाह झाला होता. १४ व्या वर्षी त्या विधवा झाल्या. पुढे, त्यांचेही
वडीलही वारले. त्यामुळे त्यांना त्यांच्या आईसोबत आजोबांकडे रहावे लागले. आजोबा
आणि मामा दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या घरी गोपलकृष्ण
गोखले, श्रीनिवास शास्त्री, पंडिता रमाबाई, तेज
बहादूर सप्रू, आणि बेझंटबाईसारखे राजकीय आणि सामाजिक सुधारक पुढारी
येत होते. त्यामुळे लहानवयात कमलादेवींची राजकारणाशी आणि समाजकारणाशी ओळख झाली
होती.
उच्च शिक्षण घेण्यासाठी कमलादेवींनी क्वीन मेरी कॉलेज, मद्रासमध्ये प्रवेश
घेतला. त्यावेळी कमलादेवींचा चटोपाध्याय या बंगाली कुटुंबातील तीन बहिणीशी ओळख
झाली. त्यापैकी एक पुढील काळात सरोजिनी नायडू म्हणून भारतीय राजकारणात प्रसिद्ध
झाल्या. सरोजिनी नायडूंचा भाऊ हरीन्द्रनाथ यांच्याशी कमलादेवींची ओळख झाली आणि
त्यांनी पुढे लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी कमलादेवी विधवा असल्यामुळे त्याला
विरोध झाला होता पण दोघांनी लग्न केले. लग्नाच्या वर्षांनतर कमलादेवी या लंडनला
हरीन्द्रनाथ यांच्यासोबत गेल्या. तिथे त्यांनी बेडफोर्ड कॉलेज आणि लंडन स्कूल ऑफ
इकोनोमिस्क मध्ये समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यासाठी
प्रवेश घेतला. काही वर्षांनी दोघांनी भारतात येवून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग
घ्यायचे ठरवले म्हणून त्यांनी तिकडचे शिक्षण अर्ध्यावर सोडले.
भारतात येत असतांना त्यांनी जर्मनीत काही दिवस मुक्काम केला. त्यावेळी
हरीन्द्रनाथांचे भाऊ वीरेंद्रनाथ चटोपाध्याय हे त्यावेळी भारताबाहेरून भारतीय
स्वातंत्र्याचा लढा लढत होते. या भेटीमध्ये, कमलादेवी
वीरेंद्रनाथांच्या अनेक मित्रांना भेटले. त्यामध्ये अनेक स्त्रीवादी
कार्यकर्त्याही होत्या. युरोपियन स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या स्त्रियांचे
जीवन तत्वज्ञान आणि जीवन जगण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी कमलादेवींना या भेटीत
पाहता आल्या. १९२२ मध्ये दोन्ही भारतात परतले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग
घेतला. हरीन्द्रनाथ आणि कमलादेवींनी देशभरात नाटके केली. पुढे, १९३३ मध्ये
हरीन्द्रनाथ आणि कमलादेवी यांचे कौटुंबिक नाते संपुष्टात आले आणि त्यांनी
कायदेशीरपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
राजकीय प्रवासाचा आरंभ!
लंडनवरून परत आल्यावर स्वातंत्र्याच्या चळवळीत कमलादेवींनी सहभाग जरी घेतला
असला तरी त्यांचा राजकीय प्रवास मात्र त्या आधीच सुरु झालेला होता. लहनपणीच
त्यांच्या घरी कॉंग्रेसचे राजकीय पुढारी येत होते. त्यांच्या विचारांशी
कमलादेवींची आधीच ओळख झालेली होती. १९२३ मध्ये कमलादेवी कॉंग्रेसच्या सदस्य
झाल्या. गांधींच्या मार्गावर पाऊले ठेवून त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत
स्वतःला झोकून दिले होते. परंतु, त्याकाळी ब्रिटीश वर्चस्वापासून भारताला
स्वतंत्र करणारी राजकीय चळवळ आणि कॉंग्रेस संघटना ही पुरुष वर्चस्वाखाली उभी होती.
त्यामुळे स्त्रियांचा म्हणावा तसा सहभाग कॉंग्रेसमध्ये नव्हता. गांधीनीही
सत्याग्रह चळवळीतून स्त्रियांना वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी
गांधींजींशी मतभेद व्यक्त करून स्त्रियांचा सत्याग्रह चळवळीतील सहभागाचा मार्ग
त्यांनी मोकळा केला. सत्याग्रह चळवळीत स्वत: कारावासही पत्करला.
अखिल भारतीय महिला
परिषद!
१९२६ मध्ये आयरिश-भारतीय मार्गारेट कजींस यांची भेट झाली. त्यावेळी
मार्गारेट या अखिल भारतीय महिला शैक्षणीक परिषद भरवत होत्या. त्यापासून प्रेरणा
घेवून १९२७ मध्ये कमलादेवी आणि त्यांच्या मैत्रिणीनी ‘अखिल भारतीय महिला परिषदे’ची
स्थापना केली. या परिषदेच्या माध्यमातून स्त्रियांच्या राजकीय, आर्थिक, लैंगिक, सामाजिक,
कौटुंबिक प्रश्नांची चर्चा देशभरात घडवून आणली. तसेच, राजकारणातील
स्त्रियांचा सहभाग, प्रतिनिधित्व आणि मतदानाचा अधिकार अशा अनेक
मुद्द्यांची चर्चा कॉंग्रेसच्या अंतर्गत आणि वासाहतिक सत्ताधीशांसोबत केली.
त्यामुळे स्त्रियांना जाचक ठरणाऱ्या अनेक परंपरा, रूढी आणि प्रथा कायद्याने नाकारण्यात आल्या. १९२६ मध्ये
कमलादेवींनी मद्रास प्रांताची प्रांतिक निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यावेळी
त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे कर्मठ आणि पारंपरिक विचारांचा उमेदवार होता. त्याने
कमलादेवींचा पराभव केला पण, एकूणच निवडणुकीच्या वातावरणामुळे
कमलादेवींना उत्साह आला. पुढे, १९२७ मध्ये त्यांची कॉंग्रेसच्या अखिल
भारतीय कमिटीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली. याच काळात कमलादेवींचा वैचारिक
कल समाजवादाकडे झुकू लागला होता. त्यांना गांधींच्या नेतृत्वामधील अंतर्विरोध
स्पष्टपणे दिसू लागले होते.
वैश्विक संपर्कजाळ!
१९२० च्या दशकामध्ये पहिल्यांदा १९२२ मध्ये कमलादेवींचा वीरेंद्रनाथांच्या
भेटीत युरोपियन स्त्रीवादी चळवळीतील अनेक स्त्रियांशी संपर्क आला होता. पुढे, दुसऱ्यांदा
१९२९ मध्ये ‘इंटरनॅशनल अलायन्स ऑफ विमेन’ ची परिषद बर्लिनमध्ये
झाली होती. त्यामध्ये कमलादेवींनी सहभाग घेतला होता. याच प्रवासदौऱ्यात त्यांनी फँकफर्ट
येथील ‘लीग अगेन्स्ट इम्पिरिलिझम’ च्या परिषद आणि
प्राग येथील ‘विमेन्स इंटरनॅशनल लीग ऑफ पीस अँड फ्रीडम’ च्या
परिषदेमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना वंशवाद, साम्राज्यवाद, भांडवलशाही,
फॅसिझम अशा अनेक वैश्विक समस्या समजून घेता आल्या. सोबतच, पश्चिम
आफ्रिका, उत्तर आफ्रिका, इंडो-चायना, दक्षिण
अमेरिका येथील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क झाला. या देशांच्या समस्यांची
आणि प्रश्नांची चर्चा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेवून एका प्लेटफोर्म (व्यासपीठ/
मंच)ची स्थापना केली. या दौऱ्यात त्यांनी
युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि
आशियामधील अनेक स्त्रीवादी, आंतरराष्ट्रीयवादी, समाज सुधारक, राजकीय
क्रांतिकारी आणि समाजवादी लोकांशी मैत्री प्रस्थापित केली. तसेच, या
दौऱ्यामुळे त्यांची वैश्विक प्रश्नांचे भान आणि जाणही विकसित झाली.
कॉंग्रेस समाजवादी
पक्ष!
स्वातंत्र्य चळवळीत १९३० च्या दशकानंतर झपाट्याने बदल झालेले दिसतात. तसेच, कॉंग्रेस
अंतर्गत कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस समाजवादी गटांसोबत वेगवेगळे गट आकारास
येत होते आणि त्यापैकी प्रत्येक गट आपले वैचारिक वर्चस्व कॉंग्रेसवर लादू पाहत
होते. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ‘वॉर ऑफ पोझिशन’ ची स्थिती होती.
रशियन क्रांतीनंतर समाजवादाची चर्चा जगभरातील वासाहतिक देशांमध्ये प्रभावी बनत
होती. त्यामुळे जगभरात स्वतंत्रपणे त्या त्या देशांच्या कम्युनिस्ट पार्ट्या
स्थापन होत होत्या. पण, त्यासोबतच, काही मंडळी अशीही
होती की, स्वतंत्र कम्युनिस्ट पार्टी स्थापन न करता राष्ट्रवादी
लढा लढवणाऱ्या पार्टीतच सहभागी होवून समाजवादाचा विस्तार करू पाहत होते. त्याचे
उदाहरण म्हणजे कॉंग्रेस समाजवादी पार्टी! कॉंग्रेस समाजवादी पार्टीमध्ये
मार्क्सवादी समाजवादी, फेबियन समाजवादी आणि गांधीयन समाजवादी अशा
तीन वैचारिक परंपरा मानणारी मंडळी होती. कमलादेवी १९२० च्या दशकानंतर समाजवादी
झाल्या होत्या. जगभरातील समाजवादी चळवळीतील मंडळींशी त्यांचा संपर्क होता. तसेच, लीग अगेन्स्ट
इम्पिरिलिझमशी संबंध आल्यामुळे त्यांना समाजवादाचे महत्व पटले होते. साम्राज्यवाद आणि वसाहतवाद ही भांडवलशाहीचेच
अपत्य आहे असे समजले होते. तसेच, त्या काळात वाढणारी आर्थिक विषमता, दारिद्य्र,
गरिबी आणि शोषण ह्या गोष्टी निर्मुलनासाठी समाजवाद हाच पर्याय वाटत होता.
दुसरे महायुद्ध आणि
वैश्विक मैत्रीभाव
दुसरे महायुद्ध सुरु झाल्यामुळे संपूर्ण जगभर अनेक प्रश्न निर्माण झाले
होते. युरोपात ‘लीग अगेन्स्ट इम्पिरिलिझम’शी संबंधित कार्यकर्त्यांनी ‘अलायन्स
अगेन्स्ट फॅसिझम अँड वार’ मंच स्थापन केला होता. याच काळात कमलादेवींनी अमेरिकेला
भेट दिली. या काळात त्यांनी अमेरिकेतील आफ्रिकन अमेरिकन (काळे) नेत्यांच्या आणि
कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना भारतातील अहिंसक स्वातंत्र्य लढयाचे
तत्व सांगितले. तसेच, या काळात त्यांनी अमेरिकेत अनेक ठिकाणच्या
सभांमध्ये आणि बैठकींमध्ये ब्रिटीश सत्तेविरोधात आपली राष्ट्रवादी-समाजवादी भूमिका
जाहीरपणे मांडली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या भारतात परतण्याच्या निर्णयावर
बंदी घातली. त्यामुळे त्यांनी दक्षिण आफ्रिका, चीन, जपान आणि
व्हियतनाम या देशांचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी अमेरिकेच्या
साम्राज्यावर टीका केली. तसेच, फ्रेंच वसाहतवाद आणि ब्रिटीश वसाहतवादावर
टीका केली आणि युरोपातील समाजवादी आणि डाव्या चळवळींची मर्यादाही स्पष्ट केली.
जपानचा वाढता आक्रमण राष्ट्रवादाचा धोकाही सांगितला आणि चीन, व्हियतनाम
येथील स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक- राजकीय चळवळींशी सकारात्मक दखल
सुद्धा घेतली.
फाळणी आणि विस्थापन!
भारताच्या स्वातंत्र्याचा जन्म फाळणी हे जुळे भावंड घेवून झाला. त्यामुळे
हिंसा, विस्थापन आणि जमातवादी विद्वेषाने तत्कालीन दक्षिण
आशियाचे वातावरण गढूळ झाले होते. वातावरण निर्मळ करतांना गांधीची हत्या झाली.
समाजवादी मंडळीनी भारताच्या फाळणीला कसून विरोध केला होता पण, जमातवादी
राजकारण आणि वासाहतिक धोरण त्यांना थांबवता आले नाही. स्त्रिया, लहान मुले
यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अशा काळात अनेक स्त्रीवादी, समाजवादी आणि
गांधीवादी संस्था, संघटना आणि व्यक्तींनी फाळणीच्या विस्थापनात
लोकांना सुरक्षा देण्याचे कामे केले. कमलादेवींनी वायव्य प्रांतातील पठाणांना फरीदाबादमध्ये
पुनरुस्थापित केले. वायव्य प्रांतातील पठाणांनी सरहद गांधींच्या नेतृत्वाखाली
फाळणीला विरोध केला होता. त्यामुळे अनेक पठाण फाळणी झाल्यावर भारतात आले. त्यांना
रोजगार आणि घरे मिळवून देण्यात कमलादेवींचा मोठा वाटा आहे. तसेच, स्त्रिया आणि
मुलांच्या बाबतीत त्यांनी कार्य केले.
स्वातंत्र्योत्तर
भारतात कमलादेवींचे योगदान !
स्वातंत्र्योत्तर भारतात कमलादेवींचे योगदान हे संस्थात्मक आहे. त्यांनी
अनेक संस्था स्थापन केल्या. भारतातील मृतप्राय हस्तउद्योगाला पुनरुज्जीवित
करण्यासाठी कमलादेवी चटोपाध्यायांनी प्रयत्न केले. तसेच, नाटक, संगीत, कला अशा अनेक
गोष्टींचा प्रसार करण्यासाठी आणि
प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. त्यांनी नॅशनल स्कूल ड्रामा, भारतीय नाट्य
संघ, लेडी इर्विन कॉलेज, संगीत नाटक अकादेमी, सेन्ट्रल
कॉटेज इंडस्ट्री इम्पोरींम, वर्ल्ड क्राप्ट कौन्सिल, क्राप्ट
कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली क्राप्ट कौन्सिल, इत्यादी
संस्था स्थापन केल्या.
कमलादेवींनी कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणूनही काम केले
आहे. त्याकाळी उच्चजातीतील स्त्रियांनी नाटकात आणि सिनेमात कामे करू नये असा संकेत
होता. परंतु, कमलादेवी या सगळ्या प्रकारांच्या पारंपरिक संकेतांना ध्वस्त
करणाऱ्या आणि जगभरातील आणि देशातील शोषितांच्या बाजूच्या होत्या. त्यामुळे त्यांनी
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक संकेतांना तिलांजली दिली. कमलादेवी
चटोपाध्यायांचे निधन २९ ऑक्टोबर १९८८ रोजी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा