रविवार, २४ जानेवारी, २०२१

आधुनिक काळातील बौध्द विचारविश्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन


                  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून 'पुन्हा एकदा' बुद्धाला या मातीतील तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम केले. परंतू बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या मागे  हिंदुत्ववादी म्हणतात त्याप्रमाणे 'राष्ट्रांतर होवू नये म्हणून बौध्द धर्म स्वीकारला असे  कारण नसून तर त्यांच्या व्यापक धर्मचिंतनाची व्यापक दार्शनिक बैठक होती.  बौध्द धर्म भारतातून नष्ट झाला असे सहज म्हटले जाते. वरलक्षणी हे काहीप्रमाणात सत्य दिसत असले तरी पूर्णसत्य नाहीये कारण सिद्ध, नाथ, भक्ती, वारकरी या सगळ्या प्रवाहांमध्ये बुद्धदर्शन आपणास दिसते. कधी त्याचे सांस्कृतिक संमिलीकरण झालेले दिसते तर कधी याचे सांस्कृतिक अपहरण झालेले दिसते. कोणत्यही मार्गाने का होईना पण बुद्ध दर्शन आपणास भारतात नेहमीच अस्तित्वात असलेले दिसते.  बौध्द दार्शनिक अश्वघोषाची जातीविरोधी 'वज्रासुची' कधी नाथांच्या मांडणीत, तर कधी शक्तांच्या तंत्रात, तर कधी वारकरी तुकोबाच्या अभंगात तर कधी निर्गुण कबीराच्या दोह्यात सापडते. वसाहतीक काळात ती फुल्यांच्या अखंडातसुद्धा येते. 

                 डॉ. आंबेडकरांच्या आधी अनेकांनी अनेक विद्वानांनी वैयक्तिक पातळीवर बौद्धधर्म स्वीकारला, परंतू तमिळनाडूतील अयोथिदास त्यांचा अपवाद वगळता कोणीही त्याला सामाजिक चळवळीचे रूप दिले नाही. आंबेडकरांच्या किमान ५०-६० वर्ष आधी पंडित आयोथिदास या तत्कालीन अस्पृश्य समाजातील व्यक्तीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि तामिळनाडूच्या अस्पृश्यांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. श्रीलंकेसारख्या बौद्ध बहुसंख्याक देशातील महाबोधी समितीची त्यांचा संबध होता. महाराष्ट्रात आधुनिक काळात अनेकांना तुकारामाप्रमाणेच बुद्धविषयी सुद्धा एक कुतूहल असल्याचे दिसून येते. वसाहतीक महाराष्ट्रातील बुद्ध दर्शन आणि चिंतन (डॉ. आंबेडकरपूर्व) यावर संशोधनाची खूपच गरज आहे.   

                आचार्य धर्मानंद कोसंबी आणि  महापंडित राहुल सांकृत्यायन या दोन्हीचे नाव घेतल्याशिवाय आधुनिक काळातील बौध्द विचारविश्व पूर्णच होवू शकत नाही. या चर्चेत आपणास महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंना सुद्धा घ्यावे लागेल.  महाराष्ट्रातील नवबौद्ध चळवळीने धर्मांतराची पन्नाशी उलटल्यामुळे वरील तिन्ही लोकांना आत्ता थोर गंभीरपणे घ्यायला हवे. बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे बौद्ध धर्माचा सामाजिक वारसा पुढे चालवण्यासाठीची दिशा दिली त्याचप्रमाणे आचार्य  धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन संशोधन आणि दार्शनिक मांडणीत बौद्ध दर्शनाला आधुनिक काळात लोकांपर्यंत आणले. 

                बाबासाहेबांच्या नवयानी बौध्द मांडणीचा सध्याच्या महाराष्ट्रीय बौद्ध  समाजावर मोठा प्रभाव दिसून येतो. त्याला आजकाल Socially engaged Buddhism  असेही म्हटले जाते. ही संकल्पना व्हियतनामी भिक्खू  तिक न्यात हन यांनी विकसित केली आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणी जातीवर्चस्वाचा आणि धुरीणत्वचा इतिहास मोठा राहिला आहे. त्यामुळे त्याचा विरोध करता करता एक ब्राह्मण विरोधाची भूमिकासुद्धा सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेत्तर चळवळ ते दलित चळवळ यातील काही गटांमध्ये प्रभावी राहिलेली आहे. त्याचा  कधी कधी किबहुना बर्याचवेळा सुद्धा नवबौद्ध चळवळीवर सुद्धा काहीवेळा प्रभाव पडलेला दिसतो त्यातूनच आचार्य धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन यांची पूर्वाश्रमीची जात काढली जाते.  दोघांची जात काढण्याचे अजून काही कारणे आहेत १) म्हणजे त्यांची वैचारिक बांधिलकी आणि २) त्यांचा बाबासाहेबांशी असलेले सबंध.

                 आचार्य धर्मानंद कोसंबी हे गांधीवादी होते नंतर त्यांचा प्रवास गांधी-मार्क्सवादी असा झाला. परंतू शेवटपर्यंत त्यांनी आपले आयुष्य बौद्धधर्माच्या आणि दर्शनाच्या संशोधनातच घालविले कारण ते स्वतः बौद्धधर्मभिमानी होते.  महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा प्रवास आर्य समाज कडून बौध्द धर्म असा झाला त्यातून पुढे त्यांचा प्रवास मार्क्सवादाकडे झाला. याचा अर्थ जे अधार्मिक झाले असे नव्हे कारण ते शेवटपर्यंत बौध्दच होते.  आचार्य कोसंबी आणि महापंडित सांकृत्यायन या दोघांना 'मार्क्स दर्शन' महत्वाचे वाटत असले तरी गांधीविषयी मात्र ते दोन्ही धृवांना दिसतात. गांधीवरूनच नव्हे तर बौद्ध धर्म-दर्शनातील काही मुद्द्यांना घेवून सुद्धा आचार्य कोसंबी आणि महापंडित सांकृत्यायन काहीबाबातीत वेगळे दिसतात. त्यांच्या द्वंद्वातूनच बौध्द धर्म-दर्शनाचा अभ्यास विकसित झाला आहे. कारण दोघांनी खूपच मेहनत घेवून बौद्ध साहित्य अनेक देशांतून मिळवले, त्यासाठी दोघांनी श्रीलंका, नेपाल, ब्रम्हदेश, तिबेट या देशांच्या यात्रा केल्या. तसेच अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशामध्ये जावून दोघांनी काही काळ बौद्ध दर्शन आणि साहित्य लोकांना शिकवले.

                      आचार्य कोसंबी यांचा जास्त भर हीनयान (अर्ली बुद्धिझम) यावर दिसतो तर महापंडित यांचा जास्त भर महायान (लेटर बुद्धिझम) यावर दिसतो. परंतू दोघांना ऐवढे मर्यादितसुद्धा करू नये असे मला वाटते. दोघांच्या संशोधनातून आणि बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीतून बौद्ध धर्माचे 'धर्म चक्र' पुन्हा जोरदारपणे गतिमान झाले आहे. अशा काळात आचार्य धर्मानंद कोसंबींचा आणि महापंडित राहुल संकृत्यायानांचा संशोधनाचा आणि वैचारिकतेचा वारसा आपलासा मानला पाहिजे कारण आज देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्यासाठी हे खूपच आवश्यक झाले आहे. बुद्ध म्हणतो माझेही म्हणणे सत्य मानू नकोस, तुझ्या सदविवेकबुद्धीला पटले आणि त्याचा कार्यकारणभाव स्पष्ट झाला तर स्वीकार.

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

मतभेदांनी घडलेली संस्कृती

 


 

               इतिहासकार एस. पी. मुखर्जींनी ‘व्यावसायिक इतिहासकारां’ची मर्यादा सांगत ‘नागरिक इतिहासकार’ अशी संकल्पना मांडून इतिहासकाराची तीन कार्य सांगितले आहेत. पहिले असे की, इतिहासकार मानवी समूहाला मुक्ती मिळवून देण्यात मदत करू शकतो. यामध्ये युद्ध, हिंसा यांच्याविरोधात मोर्चे काढणे आणि विद्यापीठांचे लोकशाहीकरण करण्यासाठी विद्यापीठीय राजकारणात सहभागी होणे यांचा समावेश होतो. दुसरे म्हणजे इतिहासकार आपल्या लेखणीचा वापर स्वातंत्र्याची उर्मी वाढवण्यासाठी मदत करू शकतो. तिसरे आणि शेवटचे कार्य म्हणजे इतिहासकार आपले संशोधनाचे काम चालू ठेवू शकतो. तसेच, संशोधन कौशल्ये सुधारून इतिहासाच्या माध्यमातून अर्थपूर्ण प्रश्न विचारू शकतो. प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्या लिखाणाचा विकासक्रम आणि शैली पाहिली तर त्यांचा विकास हा व्यवसायिक इतिहासकार ते नागरिक इतिहासकार असा झालेला दिसतो. रोमिला थापर इतिहास संशोधनासोबतच नागरी, लोकशाही आणि मानवी हक्कांच्या प्रश्नांवर सातत्याने जाहीर भूमिका घेतात. त्यामुळेच नेहमीच चर्चेत राहतात. माघील काही दिवसांपासून त्यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चेत आहेत.

           काही दिवसांपूर्वी रोमिला थापारांचे ‘व्हाईसेस ऑफ डिसेंट’ हे १६४ पानी (किंमत – ४९९) पुस्तक सेअगुल बुक्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले. सदरील पुस्तकाला २०१९ मधील जन आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. सध्या विरोधकांना शत्रू म्हणूनच पाहण्याचा पायंडा खोलवर रुजत आहे. तसेच, मतभेद व्यक्त करणारे, वेगळे मत मांडणारे आणि भिन्न पद्धतीने विचार करणाऱ्या मंडळींना बिरुदांच्या जुलूमशाहीने देशद्रोही, अर्बन नक्सल, खलिस्तानी ठरवले जात आहे. वेगळी बाजू, भूमिका आणि विचार करणाऱ्या नागरिकांना विरोधक म्हणून न पाहता शत्रू म्हणून पाहिले जात आहे आणि म्हणूनच नैतिक, इहवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. लोकशाहीमध्ये मतभेदांचे, वेगवेगळ्या भूमिकांचे आणि विरोधकांचे अत्यंत महत्वाचे स्थान असते. त्यांच्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया पूर्णच होवू शकत नाही. लोकशाहीप्रमाणेच भारतीय दर्शन, संस्कृती आणि इतिहासामध्येही मतभेद, विविधांगी विचार आणि वैचारिक प्रतिरोध यांना अत्यंत महत्वाची भूमिका आहे. तसेच. त्यांची चर्चा केल्याशिवाय संस्कृती, दर्शन आणि इतिहासाचे समग्र आकलन होवूच शकत नाही. भारतीय संस्कृतीची अनेकवचनी जडणघडण, दार्शनिक–धार्मिक विकासक्रमाचा चढउतार आणि सामाजिक- आर्थिक स्थित्यंतरे, ही सातत्याने प्रश्न विचारण्याच्या आणि मतभेद व्यक्त करण्याच्या द्वंद्वात्मक विरोधविकासवादी पद्धतीने घडलेली आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती, दर्शन आणि इतिहासात मतभेदांची दीर्घकालीन प्रक्रिया आणि परंपरा राहिलेली आहे. गतकाळातील मतभेदाच्या परंपरांचा वर्तमानकाळातील मतभेदांच्या व्यवहाराशी सांधेबांधणी करण्याचा प्रयत्न इतिहासकार रोमिला थापर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

            २०१९ सालच्या उत्तरार्धात दिलेल्या ‘इतर ची उपस्थिती- आरंभकालीन भारतातील धर्म आणि समाज’ (ऑगस्ट- २०१९) आणि ‘सर्वसंगपरित्याग, मतभेद आणि सत्याग्रह’ (डिसेंबर- २०१९), या दोन भाषणांचे एकत्रीकरण करून सदरील पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरील पुस्तक हे निबंधात्मक स्वरूपाचे आहे. त्यामुळे सदरील पुस्तकात प्रकरणे नसून प्रस्तावना आणि उपसंहारासोबत ९ विभाग आहेत. मतभेद आवश्यक आहेत का? असा प्रश्न प्रस्तावनेच्या शीर्षकात उपस्थित करत रोमिला थापरांनी समाजजीवनामध्ये, लोकशाहीमध्ये आणि भारतीय संस्कृती, दर्शन आणि इतिहासामध्ये मतभेदांचे महत्व कसे आहे आणि होते हे दाखवून दिले आहे. व्यक्तीचा व्यक्तीशी किंवा व्यक्तीचा सार्वजनिक स्तरावर काही संस्थांशी असलेल्या असहमतीचा अर्क म्हणजे मतभेद आहे असे थापर म्हणतात. तसेच, मतभेद ही आधुनिक आणि पाश्यात्य, अशा दोन्ही प्रकारची संकल्पना नाही.परंतु, मतभेद व्यक्त करण्याला अधिकाराचे स्वरूप देवून मान्यता देणे ही मात्र आधुनिक आहे. इहवादी लोकशाही समाजामध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती दाबून टाकली जात नाही तर चर्चांच्या माध्यमातून प्रोत्साहित आणि विस्तारित केली जाते. आधुनिक समाजांमध्ये मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार हा लोकांच्या भाषण स्वातंत्र्याचा भाग आहे.

           इतर समाजाप्रमाणेच भारतीय समाजही सुसंवादी आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारा नव्हता आणि नाहीये. आपल्यालाही असहिष्णुता, हिंसा आणि विचारांचा झगड्यांचा इतिहास वारसा व्यवहार आहे आणि म्हणूनच इतिहासात मतभेदांचे अनेक आणि विविधांगी आवाज दिसतात. प्रत्येकांची वेगवेगळी अभिव्यक्ती आहे. ऐतिहासिक स्थित्यंतरामुळे राजा- प्रजा, मालक- गुलाम हे सत्तासंबंध बदलून लोकशाहीचा विकास झाला आणि त्यातून संविधानाच्या माध्यमातून राज्य आणि नागरिक यांचा हितसंबंधी करार अस्तित्वात आला.  लोकशाहीमध्ये सर्व नागरिकांना समान हक्क असल्यामुळे मतभेदांना मान्यता मिळते आणि त्यामुळेच समाजातील ‘इतरां’चे उपस्थिती स्वीकारली जाते. भारतीय संस्कृती ही अभिजात संस्कृती होती. त्यामध्ये कोणताही संघर्ष नव्हता असे म्हणणारे लोक गुप्तपणे लोकशाहीला विरोध करतात आणि मतभेद ही पाश्चात्य समाजातून आयात केलेली गोष्ट आहे असे म्हणतात. परंतु, कोणतीही अभिजात संस्कृती ही काही नवीन शोध नसते तर ती वैचारिक – सांस्कृतिक घुसळण प्रक्रियेचा कळस असतो. कारण, सत्ता असणारे आणि मतभेद करणारे यांच्यतील संवादातूनच ती घडत असते असे म्हणत प्रस्तावनेत भारतीय दर्शनातील पूर्वपक्ष, उत्तरपक्ष आणि सिद्धांत आणि इतिहासातील संप्रदाय आणि सामाजिक स्तरांचे उदाहरण घेवून रोमिला थापर दाखवून देतात  की, धर्माचा किंवा समाजाचा इतिहास कधीही एकसाची, स्थिर आणि एकरंगी नव्हता. आधुनिकपूर्व कालखंडात धार्मिक विचार, कल्पनेच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातूनच सत्तेला प्रश्नांकित केले जात होते आणि म्हणूनच आधुनिकपूर्व काळात आपणास संप्रदायांच्या माध्यमातून ‘अनेक स्व’ आणि ‘अनेक इतर’ दिसतात.

          पुस्तकातील मुख्य आशयाची ९ भागात विभागणी केली. वैदिक काळापासून ते वर्तमानकाळापर्यंतच्या मतभेदांची, वेगळेपणाची आणि इतरेपणाची चर्चा या विभागांमध्ये करण्यात आली आहे. वैदिक साहित्यातील दासीपुत्र ब्राह्मणाच्या उदाहरणावरून वैदिक काळातील सामाजिक स्तर आणि स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, दस्यू, असुर आणि व्रात्यांची नकारात्मक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्यात आलेली दिसते पण, तरीही आपणास त्यांच्या संस्कृतीचा, सामाजिक स्तरांचा आणि धर्माचा वैदिक साहित्यातून उकल होत नाही. दासीपुत्रांना वैदिक समाज रचनेत सामावून घेतले गेले असले तरी त्यांना समान स्थान मिळालेले दिसत नाही. महाभारतात महत्वाची भूमिका निभावणारा विदुर अनेक घटनांवर महत्वाचे मतभेदाचे मुद्दे नोंदवतो. पण, त्याला उच्च दर्जा मिळालेला दिसत नाही. वैदिक साहित्यात दासीपुत्राची उपस्थिती ही ‘स्व’ आणि ‘इतर’ यांच्यातील संवाद आणि मतभेदांना काही प्रमाणात सामावून घेण्याच्या प्रक्रियेचे उदाहरण आहे असे रोमिला थापर लिहिता. 

          संस्कृत व्याकरणकार पतंजलीने ब्राह्मण- समन या दोन्हींमधील झगड्याला साप-मुंगुसाच्या शत्रुत्वाची उपमा दिली आहे. सुरुवातीचे पुराण सुद्धा समन (बौध्द, जैन, आजीविक आणि काहीवेळा चार्वाक) परंपरेच्या एकदम विरोधी वाटतात. यावरून आपणास दोन्ही परंपरामध्ये किती हाडवैर असेल याची कल्पना येते. राजतरंगिणी ग्रंथात गांधार प्रांतात बौद्ध भिक्षु आणि विहारांवर हल्ले झाले असे नोंदवले आहे. तसेच, काश्मीर आणि तामिळनाडूमध्ये शैवांनी बौद्धांचा विरोध केला आहे. जैनांनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. समनांनी वैदिक ब्राह्मणी धर्माच्या कर्मकांडावर टीका केली. तसेच, त्यांच्या रूढी आणि कर्मकांडावर टीका केली. समनांना वैदिक ब्राह्मण धर्माने ‘नास्तिक’ म्हणून एकसाची चित्रित केले असले तरी समनांमध्येही मतभेद होते. चार्वाक परंपरेविषयी बौद्धांनी आणि जैनांनी मतभेद व्यक्त केले असले तरी चाणक्याने त्याच्या अर्थशास्त्रात चार्वाकाची उपस्थिती नोंदवली आहे. तसेच, महाभारताने ही राक्षस म्हणून चार्वाकाला चित्रित केले आहे. सलग अशी चार्वाक मताची उपस्थिती भारतीय इतिहासात नसली तरी मुघल काळापर्यंत अधूनमधून आपणास चार्वाकाच्या लोकायत मताची उपस्थिती दिसते. समनांनी मतभेदाचा भूप्रदेश विस्तारल्यामुळे वैदिक ब्राह्मणीधर्माला पुराणिक हिंदुधर्म होवून स्वतःला बदलून घ्यावे लागलेले दिसते. पुराणिक हिंदूधर्माला वेगवेगळ्या संप्रदायांच्या, पंथांच्या माध्यमातून प्रादेशिक अभिव्यक्ती निर्माण झाल्यामुळे धार्मिक व्यवहारांचे आणि विचारांचे प्रादेशिकीकरण झाले आणि त्यामुळे धर्माची पकड बसली. समनांच्या विचारांचा आणि संस्थांचा  प्रभाव पुराणिक हिंदू धर्मावर पडला. त्यातूनच बौद्धांच्या विहाराप्रमाणे ब्राह्मणांचे मठ निर्माण झाले.

             काहींचा इतरेपणा नेहमी व्यक्तींच्या किंवा गटांच्या  ‘स्व’च्या अभिव्यक्तीने निर्माण होत नाही तर एक गट दुसऱ्यावर इतरेपणा बहिष्कृतीच्या माध्यमातून लादतो आणि पुढे त्याचेच रुपांतर सामाजिक दुय्यमीकरणात होते. अनेक समाजांमध्ये श्रमजीवी समूहांना दुय्यम लेखले जाते. परंतु त्या समाजांची संपूर्ण पायाभरणी श्रमजीवी लोकांच्या मेहनातीनेच होते. म्हणूनच असे म्हटले जाते की, संस्कृतींचा संपूर्ण डोलारा हा गुलामांच्या आणि कुळांच्या श्रमावर उभा आहे. ज्यांच्यावर इतरेपणा लादला आहे अशी मंडळी म्हणजे अवर्ण, अस्पृश्य आणि आदिवासी, त्यांना सामाजिक उतरंडीच्या तळाकडे ढकलेले आहे. चांडाळ हे सामाजिक उतरंडीत अगदी खालच्या स्तराचे समजले होते. एखाद्या व्यक्तीने जर प्रस्थापित समाजनियमनांचे पालन केले नाही तर पुढच्या जन्मी सदरील व्यक्ती, कुत्रा किंवा डुक्कर किंवा चांडाळ म्हणून जन्म घेवू शकतो. अवर्णांना मतभेदाचा हक्क आणि संधीही नाही. तरीही, इतिहासात काही अवर्ण मतभेद नोंदवतांना दिसतात आणि जनमनावर पकड बसवतात. त्यामुळेच त्यांना समावून घेतलेले दिसते. कृषीच्या विस्तारासोबत आणि जंगलतोडीमुळे आदिवासींना दूरवर रेटले गेले किंवा काहींवर दुय्यमत्व लादले गेले. परंतु, आपल्या पराक्रमामुळे काही आदिवासी महत्वाचा दर्जा मिळवतात. उदा. राजपूत दरबारात भिल्ल प्रमुखांचे महत्व. 

              मध्ययुगात भक्तीकेंद्री पंथ, मत आणि संप्रदायांनी पुराणिक हिंदूधर्म आणि इस्लामपासून फारकत घेवून वेगवेगळ्या प्रकारच्या ‘स्व’ आणि ‘इतर’ची निर्मिती केली. त्या सगळ्यांना ‘हिंदू’ आणि ‘मुस्लीम’ या चौकटीमध्ये अडकवणे हे अनैतिहासिक ठरेल. तसेच, तत्कालीन समाजातील बारकावे, संधीग्धता आणि शीर्षकांचे विश्व आपल्याकडून दुर्लक्षित होईल. वारकरी, महानुभाव, लिंगायत, खोजा, मोपला, आणि कबीरपंथी अशा सर्वांच्या ‘इतरां’चे अनेक ‘स्व’ हिंदू- मुस्लीम बिरुदावलीमुळे नाकारले जातात. म्हणूनच, शब्द, संकल्पना आणि बिरूद ची चर्चा करतांना ऐतिहासिक संदर्भ, काळ आणि स्थिती लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. म्लेच्छ, यवन, शक, तुर्क या शब्दांची बरीच चर्चा रोमिला थापरांनी पुस्तकात केली आहे. तसेच, महम्मद तुघलकविषयीचे काकतीय चित्रण आणि राजपूत चित्रण वेगवेगळे कसे आहे हेही दाखवले. अठराव्या शतकात बंगाली महाराष्ट्रपुराणात मराठ्यांना गाई-ब्राह्मणांची हत्या करणारे असे म्हटले आहे अशी नोंद थापरांनी केली आहे.

            सामंतशाहीच्या अंतामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे वासाहतिक काळखंडात नागरिक ही संकल्पना विकसित झाली असली तरी नागरिकांना आवश्यक असलेल्या स्वातंत्र्याची उणीव होती. ब्रिटीशांचे राज्य हे कायद्याचे राज्य आहे असे म्हणत नैतिक सत्ता गाजवण्याचे काम केले जात होते. अशा पार्श्वभूमीत असहकार आणि सविनय कायदेभंग अशा शब्दांचे राजकीय ग्रंथालय सत्याग्रहासाठी गांधींनी उभे केले. गांधींचा खादीचा आग्रह हा नुसता आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न नव्हता तर तो नैतिक विरोध निर्माण करण्याचा मुद्दा होता. समन परंपरा, भक्ती आणि वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद अशा व्यापक चौकटीत गांधींच्या सत्याग्रहाला समजून घेण्याचा अतिशय उत्तम प्रयोग रोमिला थापरांनी केला आहे. पुस्तकाच्या शेवटी म्हणजे उपसंहारात इतिहासातील मतभेदांचे वेगवेगळे आवाजांची आठवण आजच्या संदर्भात करायला हवी का? असा प्रश्न रोमिला थापर उभ्या करतात. नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रतीरोधाचे प्रतिक म्हणून प्रसिद्धीस आलेल्या शाहीनबागला रोमिला थापरांनी भेट दिल्यावर तेथील तरुणांचा उत्साह पाहून त्यांना त्यांच्या १९४० दशकातील वसाहतवादविरोधी राष्ट्रवादी चळवळीची आठवण झाली आहे. सविनय कायदेभंग हा एक मतभेदाचा नुसता वसाहतवादविरोधी प्रकार नव्हता तर ती एक असहकाराची कृती आहे. वसाहतपूर्व काळात मतभेदांचे महत्व माहिती होते आणि अजूनही ते ठीकून आहे. आपण, सरकार आणि नागरिक म्हणून त्याच्याशी बोलू शकतो. इतिहासकार होराल्ड जीन म्हणतात की, ‘जगात युद्धे, जनसंहार आणि गुलामी यांच्यासारख्या भयानक गोष्टी असहकारातून नव्हे तर लोकांच्या सहकारातून निर्माण झाल्या आहेत.’ म्हणूनच सर्वांनी रोमिला थापरांनी मांडलेल्या मतभेदांच्या वंशावळीचा इतिहास आपण आवर्जून वाचला पाहिजे.

                                                                                           


पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता, २ जानेवारी २०२१ 

बाबा सोहनसिंह भाकना- वसाहतवादीविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते!

 


         

        पंजाबच्या भूमीने इंग्रजविरोधी लढ्यात मोठी किंमत चुकवली आहे. हिंदू, मुस्लीम आणि शिखांची एकत्र बहुधार्मिक वास्तव असलेल्या या प्रांतात एकोणिसाव्या शतकात आर्य समाज, सिंग सभा आणि अहमदिया पंथ यांच्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक तणाव – टकराव निर्माण झाले. त्यांच्यातील जमातवादी स्पर्धेमुळे दंगे झाले आणि हिंसाही झाली. म्हणून, विसाव्या शतकाच्या सुरुवातील धार्मिक झापडबंदवृत्तीतून मुक्त होऊन  पंजाबी तरुणांनी राष्ट्रवादी, समाजवादी आणि मार्क्सवादी विचारांची दीक्षा घेतली. पंजाब प्रांतातील अनेक तरुण शिक्षणासाठी युरोपात आणि अमेरिकेत गेले. त्यांचा तिकडच्या साम्राज्यवाद, वसाहतवाद आणि भांडवलशाहीविरोधी  क्रांतिकारी चळवळींशी, अराज्यवादी, समाजवादी, सकल आशियावादी, सकल-इस्लामवादी चळवळींशी ओळख झाली. शिक्षित तरुणांप्रमाणेच पंजाब प्रांतातून नेक मजूर स्थलांतरित झाले होते. त्यांना तिकडे भेदभावात्मक वागणूक मिळत होती. त्यामुळे त्यांनी त्याविरोधात राजकीय चळवळी चालवल्या होत्या. सुशिक्षित बुद्धीजीवी क्रांतिकारक आणि स्थलांतरित मजूर यांच्या राजकीय चळवळींच्या एकत्रीकरणातून गदर पार्टीचा जन्म झाला आणि त्या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते – बाबा सोहनसिंह भाकना!

कौटुंबिक पार्श्वभूमी-

         ब्रिटीश भारतातील पंजाब प्रांतामधील अमृतसर जिल्ह्यातील गावात २२ जानेवारी १८७० रोजी बाबा सोहनसिंह भाकना यांचा शेतकरी जाट कुटुंबात आणि शीख धर्मात जन्म झाला. भाई करमसिंह हे त्यांचे वडील तर रामकौर ह्या त्यांच्या आई होत्या. सोहनसिंह एका वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईनेच त्यांचे संगोपन केले. तरुण असतांना त्यांनी आपली सर्व संपत्ती दारू आणि इतर व्यसनांमध्ये विकून टाकली. पुढे, बाबा केशवसिंह यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी व्यसनमुक्ती केली. बिशनकौर त्यांच्या पत्नी होत्या. गुरुद्वारा आणि आर्य समाज शाळेत प्राथमिक शिक्षण, पंजाबी, उर्दू आणि पर्शियन भाषा येत होत्या.

 शेतकरी लढ्यात सहभाग-

          १९०० पासूनच पंजाबमधील राष्ट्रवादी चळवळीमध्ये प्रामुख्याने ब्रिटीश शेतकी कायद्यांविरोधात सहभाग सोहनसिंह घेत होते. १९०६-०७ मध्ये शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात पंजाबमध्ये उभ्या राहिलेल्या शेतकरी लढ्यात ब्रिटीशांच्या विरोधात बाबा सोहनसिंह यांनी सहभाग घेतला होता.  उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्थलांतर केले आणि अमेरिकेत गेले.

 

 

गदर पार्टीची स्थापना आणि सोहनसिंहांचे नेतृत्व –

           १९०९ मध्ये सोहनसिंह अमेरिके स्थलांतरित झाल्यावर सेटल शहरात लाकडी वस्तूंच्या कारखान्यात कामाला लागले. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर भारतीयांचे १९१० च्या पहिल्या दशकात बरेच स्थलांतर होत होते. ब्रिटीश भारतातील पंजाब प्रांतामध्ये मोठ्याप्रमाणात शेती संकट निर्माण झाल्यामुळे लोक स्थलांतर करायला लागले होते. स्थलांतरितांची संख्या वाढल्यामुळे कॅनडामध्ये स्थलांतरितांवर बंधने घालण्यात आली. तसेच, त्यांचे राजकीय अधिकार मर्यादित करण्यात आले. पंजाबी लोक हे ब्रिटीश साम्राज्याचे भाग होते आणि कॅनडासुद्धा भाग होता त्यामुळे पंजाबी लोकांनी सन्मान, अधिकार आणि समान संधीसंबंधी राजकीय चळवळ सुरु केली. कॅनडा सरकारने सक्तीने धोरण राबविल्यामुळे बहुसंख्य लोकांनी कॅनडा सोडला आणि अमेरिकेत स्थलांतरित झाले. पण तेथेही त्यांना समान समस्यांना सामोरे जावे लागले.

           दरम्यानच्या काळातच अमेरिकेत पांडुरंग खानखोजे, पंडित कांशीराम, तारकनाथ दास आणि भाई भगवान सिंह राजकीय संघटन आणि चळवळ करत होते. खानखोजेंनी पोर्टलँड येथे इंडियन इंडिपेंडंन्स लीगची स्थापना केलेली होती.  भारतीय स्थलांतरीतांमध्ये आकारास येत असलेल्या राजकीय चळवळीमध्ये सोहनसिंह भाकनांनी सहभाग घेतला होता आणि त्यामुळे अमेरिकेतील भारतीय राष्ट्रवादी लोकांची त्यांचा संबंध आला. १९१० च्या जवळपास लंडनमधील इंडिया हाउसमधील चळवळींवर बंधने आल्यामुळे अनेक क्रांतिकारी अमेरिकेतील सन फ्रान्ससिस्कोमध्ये संघटीत होत होते. लंडनमधील प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारी हर दयाळ अमेरिकेत आल्यामुळे बुद्धीजीवी क्रांतिकारी आणि पंजाबी मजूर आणि स्थलांतरित यांच्यात बैठका झाल्या आणि त्यातून गदर चळवळीचा जन्म झाला.

          १९१३ च्या उन्हाळ्यात स्टोकटोन येथे कॅनडा आणि अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय प्रतिनिधी भेटले आणि त्यांनी तेथे ‘ द पॅसिपिक कोस्ट हिंदुस्तान असोशिएशन’ ची स्थापना हर दयाळ, पांडुरंग खानखोजे आणि सोहनसिंह भाकना यांच्या नेतृत्वाखाली झाली. सोहन सिंह भाकना हे संस्थापक अध्यक्ष बनले. सदरील संघटनेमध्ये पंजाबमधून स्थलांतरित झालेले पंजाबी मजूर, कॅलीफोर्निया विद्यापीठातील हर दयाळ, तारकनाथ दास, कर्तारसिंह सराभा, वी. जी. पिंगळे यांच्या सारखे तरुण होते. सन फ्रान्ससिस्कोमध्ये गदर पार्टीच्या क्रांतिकारींनी युगांतर आश्रम स्थापन केला आणि आपल्या चळवळीची भूमिका लोकांपर्यंत जावी म्हणून ‘हिंदुस्तान गदर’ नामक पार्टीचे मुखपत्र काढले. पंजाबी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये आपली भूमिका गदर पार्टीचे लोक प्रसारित करत होते.

           १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या छायेत भारतीय स्थलांतरितांच्या जहाजाला कॅनडात उतरू दिले नाही. अनेक दिवस जहाजाला समुद्रावरच लटकत राहावे लागले आणि त्यामुळे २० लोकांचा मृत्यू झाला. प्रवास्यांमध्ये हिंदू, मुस्लीम आणि शीख होते. ही घटना कोमागाटा मारू प्रकरण म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे. सदरील घटनेमुळे लोकांच्या मनात  ब्रिटीश सत्तेविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचा राजकीय उपयोग सोहनसिंह भाकना, तारकनाथ आणि मौ. बरकतुल्ला यांनी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी उपयोग करून घेतला आणि म्हणूनच, गदर पार्टीची सदस्यसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली. जर्मनीच्या मदतीने भारतातील ब्रिटीशांची सत्ता काही भारतीय क्रांतिकारक उलथवून टाकण्याची योजना आखत होते. त्यालाच हिंदू- जर्मन कारस्थान असेही म्हटले गेले. गदर पार्टीच्या क्रांतीकारकांचा सुद्धा यामध्ये सहभाग होता. त्यानुसारच बाबा सोहनसिंह भाकना काही क्रांतीकारकांना घेवून जहाजाने कलकत्तामार्गे भारतात येण्यासाठी निघाले आणि अफगाणीस्तानात राजा महेंद्र वर्मा, मौ. बरकतुल्ला आणि मौ. ओबेदुल्ला सिंधी यांनी गदर पार्टीच्या वतीने हंगामी सरकार स्थापन केले होते.

         ब्रिटीश सरकार गदर क्रांतीकारकांवर पाळत ठेवून होते. त्यामुळे त्यांच्या गुप्तचर विभागाला उठावाची वार्ता कळाली आणि त्यांनी सोहनसिंह भाकना यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सगळ्या क्रांतीकारकांना १३ ऑक्टोबर १९१४ रोजी कलकत्तामध्ये अटक करण्यात आली आणि मुलतानच्या केंद्रीय कारागृहात पाठवण्यात आले. ब्रिटीश सरकारविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली म्हणून सगळ्यांना त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली. यालाच लाहोर कारस्थान प्रकरण म्हटले गेले. १० डिसेंबर १९१५ मध्ये त्यांना अंदमान पाठवण्यात आले.

कारागृहातील उपोषणे आणि भगतसिहांची भेट-

          १९१५ ते १९२१ ही सहा वर्ष सोहन सिहांनी अंदमानातील काळ्या  पाण्याच्या कारागृहात काढली. १९२१ मध्ये सोहन सिहांना कोईम्बतूर कारागृहात पाठविण्यात आले आणि तेथून पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले. या काळात शीख कैद्यांना पगडी बांधण्याची परवानगी द्यावी यासाठी उपोषण केले. पुढे, १९२७ मध्ये त्यांना लाहोरच्या केंद्रीय कारागृहात हलविण्यात आले. कारागृहात  तथाकथित उच्चजातीय शीख आणि तथाकथित कनिष्ठ जातीय मजहबी शिखांना वेगवेगळे जेवण देण्यात येत होते म्हणून सोहन सिहांनी पुन्हा उपोषण केले. १९२८ मध्ये सोहनसिंह भाकना आणि भगत सिंह यांची भेट झाली. त्यावेळी सोहनसिहांनी भगतसिहांना प्रश्न विचारला की, “ एवढ्या लहान वयात तू कारागृहात का आला.” त्यावेळी, भगतसिंह म्हणाला की, “ यात माझी काहीही चूक नसून तुमची चूक आहे.  कर्तारसिंह सराभा आणि इतरांनी हसत हसत मृत्यूला जवळ केले नसते आणि तुमच्यासारखे लोक नरकयातना भोगूनही येथे उभे राहिले नसते, तर मी इकडे कधीही आलो नसतो.”  १९२९ मध्ये भगतसिहांच्या समर्थनात त्यांनी उपोषण केले होते.

कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेत सहभाग-

            १९३० मध्ये कारागृहातून बाहेर आल्यावर इतर बहुसंख्य क्रांतीकारकांप्रमाणे बाबा सोहन सिंह भाकना सुद्धा कम्युनिस्ट पार्टीत सहभागी झाले. १९१७ मध्ये रशियन राज्यक्रांती झाल्यामुळे आफ्रिका आणि आशियाई देशांमध्ये मार्क्सवादाचा मोठा प्रसार झाला. जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये कम्युनिस्ट पार्ट्या स्थापन झाल्या. काही भारतही स्वतंत्र कम्युनिस्ट पार्टी स्थापन झाली होती. तसेच, १९३० च्या दशकात कॉंग्रेस पक्षाच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांवर मार्क्सवाद आणि समाजवादाचा प्रभाव पडला होता. अशा काळात कारागृहातून बाहेर आलेली क्रांतीकारी मंडळी मार्क्सवादी बनत होती. सोहन सिंह त्यापैकी एक होते. शेतकरी पार्श्वभूमी असल्यामुळे सोहन सिंह किसान सभेच्या कामात सक्रीय झाले आणि त्यांनी १९४३ मध्ये आपल्या भाकना गावात ‘ अखिल भारतीय किसान सभे’चे आयोजन केले. ब्रिटीश राज्यात कम्युनिस्ट पार्टीवर बंदी होती. तसेच, सगळ्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर ब्रिटीशांची पाळत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दुसऱ्यांदा बाबा सोहन सिहांना कारागृहात टाकण्यात आले. कारागृहात तीन वर्ष घालून सोहन सिंह बाहेर आले. तोपर्यंत, देशात वासाहतिक धोरणांनी आणि जमातवादी राजकारणाने धर्मांधतेचा द्वेषाणूने दंगली घडवल्या आणि देशाची फाळणी केली. सोहन सिहांच्या कम्युनिस्ट पार्टीने जमातवादी हिंसा थांबविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण. शेवटी देशाची आणि पंजाबची फाळणी झालीच!

स्वातंत्र्योत्तर भारत, श्रमिकांचा युटोपिया आणि सोहन सिंह भाकना -  

        १९४७ मध्येच फाळणी आणि स्वातंत्र्य एकदाच मिळाले. फाळणी, जमातवादी दंगे आणि हिंसा यामुळे श्रमिक जनता देशोधडीला लागत होती आणि भारतातील सत्ताधारी वर्ग आनंदोत्सव साजरा करत होता.  अशी ही विरोधाभासी स्थितीमुळे तत्कालीन भारतात बरीच मंडळी होती की, त्यांना ब्रिटीश गेल्यामुळे आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले असे वाटत नव्हते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही असे म्हणणारी मंडळी प्रामुख्याने मार्क्सवादी आणि समाजवादी होती. कॉंग्रेसप्रणीत सरकारवर भांडवलदार वर्गाचा प्रभाव वाढत आहे म्हणून त्यांनी कॉंग्रेसविरोधी आघाडी उघडली. काही ठिकाणी सशस्त्र लढा सुरु झाला तर काही ठिकाणी जनआंदोलने सुरु झाली. त्यामुळे स्वातंत्र्य भारतात पुन्हा बाबा सोहन सिंह आणि त्यांच्या कॉम्रेड साथींना कारागृहात जावे लागले. त्यासंदर्भात बाबा सोहन सिंह म्हणतात की, “अंग्रेजी हुकुमत सानू झुका ना सकी, पर अपनी सरकार ने कंबर कुबी कर दी. ( इंग्रजांचे सरकार आम्हाला वाकवू शकली नाही पण आपल्याच सरकारने आमचे कंबर मोडून टाकले)”

         सगळ्यांना नोकरी, शिक्षण आणि आरोग्याची उपलब्धी असेल आणि सर्व समान असतील अशा समाजाची स्वप्ने बाबा सोहन सिंह भाकनांनी पाहिले होते. २१ डिसेंबर १९६५ मध्ये त्यांचे निधन झाले. परंतु, त्यांच्या स्वप्नातील भारत अजूनही साकार झालेला नाही. सामाजिक- आर्थिक विषमता वाढत आहे. धार्मिक- जातीय द्वेष पसरवला जात आहे. लोकांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात आहेत आणि देशातील आणि पंजाबातील शेतकरी अजूनही सन्मान आणि अधिकारासाठी लढत आहे. अशावेळी, आपण सर्वांनी बाबा सोहनसिंहांच्या स्वप्नपूर्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने झटले पाहिजे.

 

पूर्वप्रसिद्धी - असंतोष वेबपोर्टल 

 

 

             

 

शनिवार, २ जानेवारी, २०२१

भीमा-कोरेगाव: भूत, वर्तमान आणि भविष्य!

 

             दोन वर्षांपूर्वी दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या भीमा-कोरेगाव येथील जयस्तंभावरील कार्यक्रमाच्या निमित्ताने एक घटना घडली आणि भीमा कोरेगावचे नाव संपूर्ण जगभर चर्चिले गेले आणि अजूनही जात आहे. त्यामुळेच असे म्हटले जाते की, भीमा- कोरेगाव येथील जयस्तंभाच्या इतिहासाला वर्तमान आणि वर्तमानाला इतिहास आहे. गुगलवर आपण मराठीत  ‘कोरेगाव भीमा’ किंवा ‘भीमा कोरेगाव’ आणि इंग्रजीत ‘Koregaon Bhima किंवा Bhima Koregaon असे सर्च केले तर लाखो नोंदी सापडतात. अनेक ब्लॉग्स, फेसबुक पेजेस, पोर्टल, युटूब व्हिडीओ, वेवसाईट्स भीमा-कोरेगाव संदर्भात लिखाण करतात. यापैकी अनेक संकेतस्थळे वेगवेगळ्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रपोगंडा चालवतांना दिसतात आणि अनैतिहासिक माहितीचे उत्पादन आणि वितरण करतात. 

            १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या लढाईचे वर्णने आणि अर्थ वेगवेगळी लोक आपआपल्या सोईने लावतात. तसेच, ती घटनाही अशी काही की, त्याविषयी वेगवेगळे अन्वयार्थ लावण्यासाठी बऱ्याच फटी आहेत. त्यामुळे इतिहासकारांमध्ये, स्मृती अभ्यासकांमध्ये आणि सांस्कृतिक राजकरण करणाऱ्या संस्था, चळवळींमध्ये त्यावरून हितसंबंधात्मक आणि वैचारिक झगडे होण्याची शक्यता होती. त्या शक्यतेतूनच,  भीमा कोरेगावचा स्तंभ हा एक युद्धभूमी बनला आहे. काहींना ते राष्ट्रीय स्मारक वाटते, काहींना ते मुक्तीस्मारक वाटते, काहींना ते वासाहतिक स्मृती वाटते आणि काहींना तो जयस्तंभ न वाटता पराजयस्तंभ वाटतो. अशी सगळी परिस्थिती असल्यामुळेच, २०१८ मध्ये पद्धतशीर तणाव निर्मिती झाली आणि त्यामुळे हिंसा घडली, काहींना जीव गमवावा लागला, काहींना आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि काहींना जेलमध्ये जावे लागले.

           १ जानेवारी २०१८ नंतर अनेकांनी याविषयी लिहिले आहे.  अजूनही बरेच जन लिहित असतात आणि भविष्यातही काही लोक याविषयी लिहितीलच अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे आपण ते पुढील काळात पाहूच. आता, मी इतिहासात दलित चळवळीत आणि राष्ट्रीय चळवळीत याकडे कसे पाहिले गेले याचे एक – एक उदाहरण देणार आहे.

जनतामधील चित्रण !

            १९२० च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भीमा-कोरेगाव येथे गेले अशी माहिती आपण सर्वांना असते. पण, त्यांनतर दरवर्षी भीमा कोरेगावमध्ये जयस्तंभाजवळ काय होत होते याची तशी सर्वांना माहिती नसते. म्हणून १५ एप्रिल १९३३ मधील जनता या डॉ. आंबेडकरांच्या पाक्षिकामध्ये आलेली बातमी खाली देत आहे.

   “ता. २८ रोजी पुणे जिल्हा ग्रामस्थ संघाच्या विद्यमाने कोरेगाव जयस्तंभोत्सव साजरा करण्यात आला. रात्री १० वाजता महार चावडीपासून लेजीम, दिंडी, छडीपत्ता वगैरेसह मिरवणूक काढली होती. जयस्तंभाजवळ गेल्यावर पूजा होऊन श्री. एच. गायकवाड यांनी प्रार्थना केली. नंतर तेथून मिरवणूक परत आली. दुसऱ्या दिवशी गाणी, भजन वगैरे होऊन सर्व मंडळींना जेवण देण्यात आले. जेवणोत्तर श्री. आर. के. कदम माजी. जि. स्कूल. बो. मेंबर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. सभेनंतर निरनिराळ्या प्रकारचे खेळ व कुस्त्या झाल्या. सभेत डॉ. साहेबांचे अभिनंदन, उच्छिट व मृताहार न करणे वगैरे अर्थाचे निरनिराळे चार ठराव पास झाले. नंतर बाहेरगावाहून आलेली मंडळी गावोगाव गेली. असे हरिश्चंद्र ज्ञा. गायकवाड, मुंढवेकर कळवितात.”

वरील बातमीमधून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. २०१८ च्या घटनेनंतर काहींनी असे म्हटले की, मागील काही म्हणजे पाच- दहा वर्षांपासूनच येथे महाराष्ट्रातील दलित लोक येतात. तत्पूर्वी येत नव्हती. जनतेमधील बातमीतून असे दिसून येते कि, दलित लोक पूर्वीपासूनच भीमा-कोरेगावच्या जयस्तंभाला नुसत्या भेटी देत नव्हते तर तेथे मिरवणूक काढत होते आणि कुस्त्यांसारखे प्रसिद्ध खेळ खेळत होते.

काकासाहेब गाडगीळांची आठवण!

        काकासाहेब गाडगीळ म्हणजेच पुण्याचे माजी केंद्रीय मंत्री न. वि. गाडगीळ होय. गाडगीळ टिळकवादी कार्यकर्ता म्हणून राजकारणात भाग घेतला आणि पुढे, गांधींच्या उदयाबरोबर ते काहीसे गांधीवादी काँग्रेसी नेते बनले. जेधे- गाडगीळ ही जोडी महाराष्ट्राच्या राजकरणात आणि समाजकारणात प्रसिद्ध आहे. १९५५ साली प्रसिद्ध झालेल्या ‘अनगड मोती’ या पुस्तकात गाडगीळांचा ‘कोरेगावचा जयस्तंभ’ असा लेख आहे. सदरील लेख त्यांनी १९४६-४७ च्या जवळपास लिहिलेला आहे. त्यामध्ये ते लिहितात की,

“...आम्ही गाडीतून उतरून जयस्तंभाकडे चालू लागलो. प्रशस्त मैदान व चारी बाजूंना लोखंडी गजांचे कुंपण घातलेले असा प्रकार होता. दरवाजा उघडण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण जमले नाही म्हणून कसलेल्या मराठी वीराप्रमाणे कुंपणावर चढून आम्ही पलीकडे प्रवेश केला. सुमारे २५ x २५ व ६ फुट उंचीच्या चौकोनी चौथरयावर तितकाच उंचीचा, साधारणपणे पायाशी ६ फुट रुंद असलेला – वरती निमूळता होत गेलेला जयस्तंभ आम्ही पाहिला. आणि माझ्या स्नेह्याला मी म्हणालो, “मधल्या स्फटिकावर काय लिहिले आहे ते वाचा.” “ १ जानेवारी १८१८ रोजी ह्या ठिकाणी झालेल्या लढाईत ज्यांनी ब्रिटीश सरकारसाठी धारातीर्थी पतन केले, व पतन करून देशाच्या शत्रूचा नाश केला- त्यांच्या स्मरणार्थ हा जयस्तंभ आहे! आणि त्याखाली प्रमुख वीरांची नामावळी होती. आणि त्या नामावळीत एक दोन इंग्रज सोडून बाकी सर्व या देशांतील संतानांची नावे होती. कोणी सुभेदार होते, कोणी डफेदार होते, कुणी जमादार तर कोणी हवालदार होते. त्यांत हिंदू होते, महार हते, मराठे होते, आणि मुसलमान होते. या सर्वांनी देशाच्या शत्रूचा पराभव करण्यासाठी कंपनी सरकारच्या वतीने लढतांना सद्-गती प्राप्त करून घेतली होती. १ जानेवारी १८१८ – ख्रिस्ती वर्षाचा प्रथम दिवस. दक्षिणेत ब्रिटीश अंमलाचा पहिला दिवसच ठरला. खडकीला पराभूत होऊन, किंबहुना न लढता पळून येऊन मराठी सैन्याने कोरेगावनजीक आडव्या आलेल्या कंपनी सरकारच्या सैन्यावर हल्ला केला होता. रावबाजीने धीर धरला असता, व लढाईचा निर्णय लागण्यापूर्वीच रणांगण सोडले नसते, - तर हा विजयस्तंभ येथे दिसला नसता. कोरेगावहून पळून अष्टीच्याहि रणक्षेत्रांतहि रावबाजीने तेंच केले; आणि शेवटी बऱ्हाणपूर मुक्कामी फिरंग्यांच्या हातांत एखादी खाजगी मालमत्ता द्यावी त्याचप्रमाणे मराठ्यांचे राज्य दिले....”

गाडगीळांसोबत त्यांचा एक स्नेही होता. दोघांनी स्तंभ पाहिला. त्यावरील नावे वाचली. आणि गाडगीळांनी त्यांच्या स्नेह्याला जयस्तंभाची कहाणी आणि भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास असे दोन्ही सांगितले. त्याविषयी ते लिहितात की, “आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो व आलटून पालटून जयस्तंभाकडे पहात होतो. पुन्हा पुन्हा तेहि नावे वाचीत होते व मीहि नावे वाचीत होतो. भावनेने त्यांच्या वाणीला गोठून टाकले. माझीहि तशीच स्थिती झाली. आम्ही जयस्तंभाला प्रदक्षिणा घातली.” प्रदक्षिणा घातल्यावर दोन्हींमध्ये काहीसा संवाद झाला. तो, भीमा कोरेगावचा इतिहास आणि स्मृती असे दोन्ही समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ते लिहितात की,

“माझे स्नेही म्हणाले, “ आमच्या हिंदी संस्कृतीतील त्याज्य वृत्तीचा हा जयस्तंभच नव्हे का?” मी म्हटले, “ निराळ्या अर्थाने ते खरे आहे. ज्यांना आम्ही सामाजिकदृष्ट्या जवळ केले नाही, ज्यांच्या स्पर्शाने आम्ही अपुनीत होतो असे मानले, ज्यांना आम्ही साध्या माणुसकीचे हक्क देण्यास तयार नव्हतो, त्यांना ज्यांनी स्वार्थाने कां होईना जवळ केले, व त्यांच्यातील माणुसकी व पराक्रम प्रदीप्त केले, त्यांची योजकता तर आपण मान्य केलीच पाहिजे. विद्यमान हिंदू संस्कृतीला व हिंदी राष्ट्रीय वृत्तीला हा जयस्तंभ एक आव्हान आहे. भविष्यातील मार्ग काढतांना अचूक वाट दाखविण्यासाठी व संकटे टाळण्यासाठी हा दीपस्तंभ आहे. काय करावे व काय करू नये असे अन्वय व्यतिरेकाने सांगणारा राष्ट्रीय स्मृतीग्रंथच नव्हे काय?” 

ब्राह्मण- ब्राह्मणेत्तर सामाजिक दरी बुजविण्यासाठी केशवराव जेध्यांसोबत झटणाऱ्या काकासाहेब गाडगीळांना भीमा-कोरेगावचा स्तंभ एकदाच त्याज्य जयस्तंभही वाटला आणि सोबतच, हिंदू संस्कृतीला आणि हिंदी राष्ट्रीय वृत्तीला आव्हान आणि भविष्यातील संकटे टाळण्यासाठीचा दीपस्तंभही वाटला. म्हणूनच त्यांनी त्याला राष्ट्रीय स्मृतीग्रंथ म्हटले आहे.

शेवटी, राष्ट्रीय स्मृतीग्रंथापासून आपण काहीच प्रेरणा न घेतल्यामुळे आपण आजही तणाव आणि टकराव यांना सामोरे जात आहोत. जातीय भेदभाव, धार्मिक कर्मकांडे आणि समतेच्या अभावामुळे सामाजिक विषमता निर्माण झाली होती. त्यामुळेच गतकाळात भारतीय लोक एकमेकांच्याविरोधात लढली आणि त्याचाच साक्षीदार भीमा-कोरेगावचा स्तंभ आहे. 

                      

 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...