दोन वर्षांपूर्वी दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या भीमा-कोरेगाव येथील जयस्तंभावरील कार्यक्रमाच्या निमित्ताने एक घटना घडली आणि भीमा कोरेगावचे नाव संपूर्ण जगभर चर्चिले गेले आणि अजूनही जात आहे. त्यामुळेच असे म्हटले जाते की, भीमा- कोरेगाव येथील जयस्तंभाच्या इतिहासाला वर्तमान आणि वर्तमानाला इतिहास आहे. गुगलवर आपण मराठीत ‘कोरेगाव भीमा’ किंवा ‘भीमा कोरेगाव’ आणि इंग्रजीत ‘Koregaon Bhima किंवा Bhima Koregaon असे सर्च केले तर लाखो नोंदी सापडतात. अनेक ब्लॉग्स, फेसबुक पेजेस, पोर्टल, युटूब व्हिडीओ, वेवसाईट्स भीमा-कोरेगाव संदर्भात लिखाण करतात. यापैकी अनेक संकेतस्थळे वेगवेगळ्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रपोगंडा चालवतांना दिसतात आणि अनैतिहासिक माहितीचे उत्पादन आणि वितरण करतात.
१ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या लढाईचे वर्णने आणि अर्थ वेगवेगळी लोक आपआपल्या सोईने लावतात. तसेच, ती घटनाही अशी काही की, त्याविषयी वेगवेगळे अन्वयार्थ लावण्यासाठी बऱ्याच फटी आहेत. त्यामुळे इतिहासकारांमध्ये, स्मृती अभ्यासकांमध्ये आणि सांस्कृतिक राजकरण करणाऱ्या संस्था, चळवळींमध्ये त्यावरून हितसंबंधात्मक आणि वैचारिक झगडे होण्याची शक्यता होती. त्या शक्यतेतूनच, भीमा कोरेगावचा स्तंभ हा एक युद्धभूमी बनला आहे. काहींना ते राष्ट्रीय स्मारक वाटते, काहींना ते मुक्तीस्मारक वाटते, काहींना ते वासाहतिक स्मृती वाटते आणि काहींना तो जयस्तंभ न वाटता पराजयस्तंभ वाटतो. अशी सगळी परिस्थिती असल्यामुळेच, २०१८ मध्ये पद्धतशीर तणाव निर्मिती झाली आणि त्यामुळे हिंसा घडली, काहींना जीव गमवावा लागला, काहींना आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि काहींना जेलमध्ये जावे लागले.
१ जानेवारी २०१८ नंतर अनेकांनी याविषयी लिहिले आहे. अजूनही बरेच जन लिहित असतात आणि भविष्यातही काही लोक याविषयी लिहितीलच अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे आपण ते पुढील काळात पाहूच. आता, मी इतिहासात दलित चळवळीत आणि राष्ट्रीय चळवळीत याकडे कसे पाहिले गेले याचे एक – एक उदाहरण देणार आहे.
जनतामधील चित्रण !
१९२० च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भीमा-कोरेगाव येथे गेले अशी माहिती आपण सर्वांना असते. पण, त्यांनतर दरवर्षी भीमा कोरेगावमध्ये जयस्तंभाजवळ काय होत होते याची तशी सर्वांना माहिती नसते. म्हणून १५ एप्रिल १९३३ मधील जनता या डॉ. आंबेडकरांच्या पाक्षिकामध्ये आलेली बातमी खाली देत आहे.
“ता. २८ रोजी पुणे जिल्हा ग्रामस्थ संघाच्या विद्यमाने कोरेगाव जयस्तंभोत्सव साजरा करण्यात आला. रात्री १० वाजता महार चावडीपासून लेजीम, दिंडी, छडीपत्ता वगैरेसह मिरवणूक काढली होती. जयस्तंभाजवळ गेल्यावर पूजा होऊन श्री. एच. गायकवाड यांनी प्रार्थना केली. नंतर तेथून मिरवणूक परत आली. दुसऱ्या दिवशी गाणी, भजन वगैरे होऊन सर्व मंडळींना जेवण देण्यात आले. जेवणोत्तर श्री. आर. के. कदम माजी. जि. स्कूल. बो. मेंबर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. सभेनंतर निरनिराळ्या प्रकारचे खेळ व कुस्त्या झाल्या. सभेत डॉ. साहेबांचे अभिनंदन, उच्छिट व मृताहार न करणे वगैरे अर्थाचे निरनिराळे चार ठराव पास झाले. नंतर बाहेरगावाहून आलेली मंडळी गावोगाव गेली. असे हरिश्चंद्र ज्ञा. गायकवाड, मुंढवेकर कळवितात.”
वरील बातमीमधून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. २०१८ च्या घटनेनंतर काहींनी असे म्हटले की, मागील काही म्हणजे पाच- दहा वर्षांपासूनच येथे महाराष्ट्रातील दलित लोक येतात. तत्पूर्वी येत नव्हती. जनतेमधील बातमीतून असे दिसून येते कि, दलित लोक पूर्वीपासूनच भीमा-कोरेगावच्या जयस्तंभाला नुसत्या भेटी देत नव्हते तर तेथे मिरवणूक काढत होते आणि कुस्त्यांसारखे प्रसिद्ध खेळ खेळत होते.
काकासाहेब गाडगीळांची आठवण!
काकासाहेब गाडगीळ म्हणजेच पुण्याचे माजी केंद्रीय मंत्री न. वि. गाडगीळ होय. गाडगीळ टिळकवादी कार्यकर्ता म्हणून राजकारणात भाग घेतला आणि पुढे, गांधींच्या उदयाबरोबर ते काहीसे गांधीवादी काँग्रेसी नेते बनले. जेधे- गाडगीळ ही जोडी महाराष्ट्राच्या राजकरणात आणि समाजकारणात प्रसिद्ध आहे. १९५५ साली प्रसिद्ध झालेल्या ‘अनगड मोती’ या पुस्तकात गाडगीळांचा ‘कोरेगावचा जयस्तंभ’ असा लेख आहे. सदरील लेख त्यांनी १९४६-४७ च्या जवळपास लिहिलेला आहे. त्यामध्ये ते लिहितात की,
“...आम्ही गाडीतून उतरून जयस्तंभाकडे चालू लागलो. प्रशस्त मैदान व चारी बाजूंना लोखंडी गजांचे कुंपण घातलेले असा प्रकार होता. दरवाजा उघडण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण जमले नाही म्हणून कसलेल्या मराठी वीराप्रमाणे कुंपणावर चढून आम्ही पलीकडे प्रवेश केला. सुमारे २५ x २५ व ६ फुट उंचीच्या चौकोनी चौथरयावर तितकाच उंचीचा, साधारणपणे पायाशी ६ फुट रुंद असलेला – वरती निमूळता होत गेलेला जयस्तंभ आम्ही पाहिला. आणि माझ्या स्नेह्याला मी म्हणालो, “मधल्या स्फटिकावर काय लिहिले आहे ते वाचा.” “ १ जानेवारी १८१८ रोजी ह्या ठिकाणी झालेल्या लढाईत ज्यांनी ब्रिटीश सरकारसाठी धारातीर्थी पतन केले, व पतन करून देशाच्या शत्रूचा नाश केला- त्यांच्या स्मरणार्थ हा जयस्तंभ आहे! आणि त्याखाली प्रमुख वीरांची नामावळी होती. आणि त्या नामावळीत एक दोन इंग्रज सोडून बाकी सर्व या देशांतील संतानांची नावे होती. कोणी सुभेदार होते, कोणी डफेदार होते, कुणी जमादार तर कोणी हवालदार होते. त्यांत हिंदू होते, महार हते, मराठे होते, आणि मुसलमान होते. या सर्वांनी देशाच्या शत्रूचा पराभव करण्यासाठी कंपनी सरकारच्या वतीने लढतांना सद्-गती प्राप्त करून घेतली होती. १ जानेवारी १८१८ – ख्रिस्ती वर्षाचा प्रथम दिवस. दक्षिणेत ब्रिटीश अंमलाचा पहिला दिवसच ठरला. खडकीला पराभूत होऊन, किंबहुना न लढता पळून येऊन मराठी सैन्याने कोरेगावनजीक आडव्या आलेल्या कंपनी सरकारच्या सैन्यावर हल्ला केला होता. रावबाजीने धीर धरला असता, व लढाईचा निर्णय लागण्यापूर्वीच रणांगण सोडले नसते, - तर हा विजयस्तंभ येथे दिसला नसता. कोरेगावहून पळून अष्टीच्याहि रणक्षेत्रांतहि रावबाजीने तेंच केले; आणि शेवटी बऱ्हाणपूर मुक्कामी फिरंग्यांच्या हातांत एखादी खाजगी मालमत्ता द्यावी त्याचप्रमाणे मराठ्यांचे राज्य दिले....”
गाडगीळांसोबत त्यांचा एक स्नेही होता. दोघांनी स्तंभ पाहिला. त्यावरील नावे वाचली. आणि गाडगीळांनी त्यांच्या स्नेह्याला जयस्तंभाची कहाणी आणि भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास असे दोन्ही सांगितले. त्याविषयी ते लिहितात की, “आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो व आलटून पालटून जयस्तंभाकडे पहात होतो. पुन्हा पुन्हा तेहि नावे वाचीत होते व मीहि नावे वाचीत होतो. भावनेने त्यांच्या वाणीला गोठून टाकले. माझीहि तशीच स्थिती झाली. आम्ही जयस्तंभाला प्रदक्षिणा घातली.” प्रदक्षिणा घातल्यावर दोन्हींमध्ये काहीसा संवाद झाला. तो, भीमा कोरेगावचा इतिहास आणि स्मृती असे दोन्ही समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ते लिहितात की,
“माझे स्नेही म्हणाले, “ आमच्या हिंदी संस्कृतीतील त्याज्य वृत्तीचा हा जयस्तंभच नव्हे का?” मी म्हटले, “ निराळ्या अर्थाने ते खरे आहे. ज्यांना आम्ही सामाजिकदृष्ट्या जवळ केले नाही, ज्यांच्या स्पर्शाने आम्ही अपुनीत होतो असे मानले, ज्यांना आम्ही साध्या माणुसकीचे हक्क देण्यास तयार नव्हतो, त्यांना ज्यांनी स्वार्थाने कां होईना जवळ केले, व त्यांच्यातील माणुसकी व पराक्रम प्रदीप्त केले, त्यांची योजकता तर आपण मान्य केलीच पाहिजे. विद्यमान हिंदू संस्कृतीला व हिंदी राष्ट्रीय वृत्तीला हा जयस्तंभ एक आव्हान आहे. भविष्यातील मार्ग काढतांना अचूक वाट दाखविण्यासाठी व संकटे टाळण्यासाठी हा दीपस्तंभ आहे. काय करावे व काय करू नये असे अन्वय व्यतिरेकाने सांगणारा राष्ट्रीय स्मृतीग्रंथच नव्हे काय?”
ब्राह्मण- ब्राह्मणेत्तर सामाजिक दरी बुजविण्यासाठी केशवराव जेध्यांसोबत झटणाऱ्या काकासाहेब गाडगीळांना भीमा-कोरेगावचा स्तंभ एकदाच त्याज्य जयस्तंभही वाटला आणि सोबतच, हिंदू संस्कृतीला आणि हिंदी राष्ट्रीय वृत्तीला आव्हान आणि भविष्यातील संकटे टाळण्यासाठीचा दीपस्तंभही वाटला. म्हणूनच त्यांनी त्याला राष्ट्रीय स्मृतीग्रंथ म्हटले आहे.
शेवटी, राष्ट्रीय स्मृतीग्रंथापासून आपण काहीच प्रेरणा न घेतल्यामुळे आपण आजही तणाव आणि टकराव यांना सामोरे जात आहोत. जातीय भेदभाव, धार्मिक कर्मकांडे आणि समतेच्या अभावामुळे सामाजिक विषमता निर्माण झाली होती. त्यामुळेच गतकाळात भारतीय लोक एकमेकांच्याविरोधात लढली आणि त्याचाच साक्षीदार भीमा-कोरेगावचा स्तंभ आहे.
२ टिप्पण्या:
नमस्कार देवकुमार. आजच्या लोकसत्ता बुकमार्कमधला तुमचा लेख वाचला, लेखाची मांडणी अत्यंत आवडली. परीक्षणाच्या निमित्ताने तुम्ही मतभेद, समन्वय आणि विरोध-विकासाबद्दलची निवडलेली उदाहरणं वाचताना तुमचं आणखी लिखाण आंतरजालावर आहे का हे शोधलं, तेव्हा हा ब्लॉग सापडला. समाजमाध्यमांमध्ये आक्रस्ताळेपणे स्वत:ला ’या’ बाजूचे किंवा ’त्या बाजूचे’ असं सिद्ध करा, यांच्या किंवा त्यांच्या गोटात जा याखेरीज अन्य प्रकारचं लेखन खूप कमी वाचायला मिळतं. तुमचं लिखाण दोन्ही बाजूंच्या भावना मांडत ’यातून स्वत:च्या वागण्या-बोलण्या-करण्यात काय चांगला बदल घडवता येईल’ असं सुचवणारं वाटलं. मी इतिहासाची विद्यार्थी नाही, पण तुमच्या लेखांतील संदर्भांतून दिलेली काही पुस्तकं तरी वाचायचा प्रयत्न करेन.
--गायत्री नातू
नमस्कार देवकुमार. आजच्या लोकसत्ता बुकमार्कमधला तुमचा लेख वाचला, अत्यंत आवडला - म्हणून तुमचं आणखी लिखाण आंतरजालावर शोधत इथे आले. समाजमाध्यमांवर व्यक्त होणार्यांचे आपसूकच ’या बाजूचा’ आणि ’त्या बाजूचा’ असे कंपू होत जातात, आणि भिन्न / विरोधी चष्मे अगत्यानं चढवून एखादी घटना वेगवेगळ्या परिस्थितींतल्या लोकांना कशी दिसत असेल शी मांडणी फारच क्वचित आढळते. तुमच्या ब्लॉगवरचं लिखाण या धाटणीचं वाटलं. वाचत राहीन.
--गायत्री नातू
टिप्पणी पोस्ट करा