शुक्रवार, १२ मार्च, २०२१

अर्धा फिजिकल, अर्धा डिजिटल



              बऱ्याच दिवसांपासून ‘हल्ली माणुसकी राहीलच नाही’ असे सातत्याने आपल्या आजूबाजूला बोलले जात होते. त्यात भर म्हणून आता ‘समाजाचे मानसिक आरोग्य खालावले आहे’ असे बोलले जात आहे. वास्तवात नेमकं काय होत आहे? आणि कशामुळे होत आहे ? याची चर्चा मात्र होतांना दिसत नाही. युलाल हरारी, या इतिहासकाराच्या मते, ‘ जगाला झपाट्याने बदलवणारी तिसरी क्रांती येवू घातली आहे. मानवी इतिहासात प्रथम शेतीच्या क्रांतीने (Agricultural Revolution) आमुलाग्र बदल घडवून आणला. शेतीच्या क्रांतीने रानटी अवस्थेचे असणाऱ्या माणसाचे ‘स्थिर’ आणि ‘टोळी’ समाजात रुपांतर घडवून आणले. त्यातून कुटुंब संस्था, विवाह संस्था, संस्कृती, धर्म, तत्वज्ञान आणि नातेसंबंध जन्माला आली. त्या स्थिर आणि टोळी समाजातून पुढे ‘राज्य संस्था’ निर्माण झाली. ‘टोळी शाही’ कडून ‘निरंकुश राजेशाही’ कडे याकाळात मानवाने प्रवास केला. सगळ्या जगभर कमी अधिक प्रमाणात आणि मागे-पुढे शेतीच्या क्रांतीने मानवी जगणे सुकर केले. रानटी अवस्थेतून टोळी अवस्थेत येतांना मानवाला शेतीच्या क्रांतीने मदत केली.

            पुढे, वैज्ञानिक क्रांती (Scientific Revolution)  झाली. वैज्ञानिक क्रांतीने शेतीच्या क्रांतीप्रमाणेच ‘मानवी जीवन’ आमुलाग्र बदलून टाकले. जगाचा आणि विश्वाचा पुनर्शोध या क्रांतीने लावला. विश्वाचे  केंद्रस्थान ‘देवा’कडून ‘माणसा’कडे सरकले. शेतीच्या क्रांतीने जन्माला घातलेली कुटुंब संस्था, विवाह संस्था, संस्कृती, धर्म, तत्वज्ञान आणि नाते संबध वैज्ञानिक क्रांतीने अप्रासंगिक ठरले. त्यातील बहुतेक गोष्टींनी स्वत:ला बदलून घेतले. काही गोष्टी नामशेष झाल्या. त्या जागी नवीन गोष्टींनी जन्म घेतला.  वैज्ञानिक क्रांतीने अनेक शोध लावले. तंत्रज्ञान विकसित केले. जगाला रेल्वे, तार, विमान आणि भांडवलशाहीतून जन्माला आलेल्या वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या माध्यमातून जोडले. जैविक, रासायनिक, आण्विक शस्त्रे जन्माला घालून हजारो लोक मारले. नैसर्गिक सीमांची जागा कृत्रिम बोर्डर नी घेतली त्यातून राष्ट्रवाद जन्माला आला. वैज्ञानिक क्रांतीने कृत्रिम सीमांना ‘पासपोर्ट’ हा निकष ठरवून जगाला ‘ग्लोबल खेडे’ बनविणारे आभासी ‘जागतिकीकरण’ आणले. पृथ्वीच्या गर्भात आणि अंतराळात अनेक ‘यान’ सोडून माणसाने खूप काही शोध लावले. विश्वाचे केंद्रस्थान देव, पृथ्वी, सूर्य अशी चर्चा करत करत अनेक अनेक ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांचा शोध माणसाने लावला.  विश्वाची उत्पत्ती कोण्या देवाने केली नसून बिग बँग थेरीने झाली असेही स्पष्ट केले गेले. आजूबाजूला असेल नसेल अशा सगळ्याच गोष्टींचे शोध वैज्ञानिक क्रांतीने घेतला.

            आता, आपल्या मानवी समाजात तिसरी क्रांती येवू घातली आहे. शेतीच्या क्रांतीने जन्माला घातलेल्या आणि वैज्ञानिक क्रांतीने शोधलेल्या सगळ्याच गोष्टींच्या शक्तीस्थळे आणि मर्मस्थळे या क्रांतीला माहिती आहे. त्यामुळे या क्रांतीला कसे सामोरे जावे आणि तीला आत्मसाथ कसे करावे हा यक्षप्रश्न मानवी समाजापुढे निर्माण झाला आहे. समाजात झपाट्याने वाढत जाणारी हिंसा, डिप्रेशन, एकाकीपणा, संशय, ताणतणाव, गोंधळ, अस्थिरता, संधीग्धता, अनिश्चितता हे सगळे त्या येवू घातलेल्या क्रांतीचे लक्षणे आहेत. माणसाने जगाचा, विश्वाचा शोध घेवून झाल्यानंतर आपली शोधकबुद्धी शांत बसत नाही म्हणून ‘स्व’ चा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मी कोण ? हा माणसाला अनंत काळापासून पडलेला प्रश्न आहे पण माणसाकडे ते शोधण्याचे तंत्र, शास्त्र नसल्यामुळे एवढे दिवस त्याने हा प्रश्न बाजूला ठेवला होता. मी कोण ? याचा शोध घेण्यासाठी ‘मेंदू’ आणि ‘मन’ याचा शोध घेणे क्रमप्राप्तच नव्हे तर अनिवार्य ठरते. मेंदू आणि मनाच्या या सगळ्या विश्वातूनच तिसरी क्रांती येत आहे. तीला मानसिक क्रांती (Cognitive Revolution) म्हटले जात आहे. आजपर्यंत मानवी मेंदूचा खूपच कमी भागाचा वापर झाला आहे आणि मन म्हणजे नेमकं काय याचा तर अजूनही शोध नाही, त्यामुळे जगभरातील संशोधक मेंदूचा आणि मनाचा शोध घेत आहेत. जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबरनेटीक्स यांच्या माध्यामातून येणाऱ्या काळात कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, नातेसंबंध, संस्कृती, धर्म, तत्वज्ञान यांच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहेत. कालपरवाच (टाइम्स ऑफ इंडिया, १५ सप्टेंबर २०१७) चीनमधील एक बातमी होती. चीनमध्ये स्त्री-पुरुषांचे लिंग गुणोत्तर कमी आहे. त्यामुळे अधिकच्या पुरुषांच्या लैंगिक भूक भागवण्यासाठी हुबेहूब स्त्री सारखा दिसणारा ‘स्त्री रोबोट’ तयार करण्यात आला आहे. जपानमध्ये तर ४२ % पुरुष आणि ४५% स्त्रीया ह्या ‘वर्जिन’ आहेत (टाइम्स ऑफ इंडिया, २० सप्टेंबर २०१७) असे सरकारी सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. चीन आणि जपान मध्येच या गोष्टी होत नाहीत तर जगभर या गोष्टी होतांना दिसत आहेत.

          नवी येवू घातलेली क्रांती तीच्या सोबत अनेक बदल घेवून येणार आहे. ते पचवायला आणि जिरवायला लागणारी वैचारिक आणि मानसिक पातळीवरील समज आणि पात्रता माणसांनी अजून विकसित केलेली दिसत नाही. कधीकाळी माणसाला सुखकर बनवणारे तंत्रज्ञान माणसाला मशीन बनवते कि काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईल, फेसबुक, वाटस अप, ट्विटर, इंटरनेट यांच्यामुळे हल्लीचा माणूस ‘अर्धा फिजिकल’-‘अर्धा डिजिटल’ बनला आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या अशा अर्ध फिजिकल- अर्ध डिजिटल माणसाचे मेंदू-मनोविश्व काय आहे? याचा अजूनही नीटसा अभ्यास झालेला नाही. पण, हल्ली सगळीच कडेच ‘मानसिक आरोग्य’ ह्या शब्दाविषयी बोलले जात आहे म्हणून भारत सरकारने सुद्धा या संबंधित ‘मानसिक आरोग्य विधेयक’ मंजूर करून घेतले. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास करायचा आणि मग पर्यावरण शिक्षण शिकवायचे, एकीकडे सगळी मुल्ये पायदळी तुडवायची आणि मुल्ये शिक्षणाची गोष्ट करायची तशीच काहीशी गत मानसिक आरोग्याची झाली आहे. मानसिक आरोग्य हा तर सध्या जोरदार चालणारा धंदाच झाला आहे. समाजात झपाट्याने बदलत जाणाऱ्या सामाजिक-आर्थिक-तांत्रिक घडामोडींचा व्यक्तींच्या आणि समूहांच्या मानसिक आरोग्यवर झपाट्याने प्रभाव पडत आहे. त्यामुळे व्यक्तींचे आणि समूहांचे मानसिक संतुलन बिघडतांना दिसते. या सगळ्या प्रकारामुळे ‘मानसोपचार तज्ञ’ आणि ‘आध्यात्मिक गुरु’ यांची यांना चांगले दिवस आले आहेत. मानसोपचार हा खर्चिक, महाग, वेळ खाऊ असल्यामुळे समाजातील अभिजन वर्गाला हे उपचार सहजपणे उपलब्ध होतात आणि घेता सुद्धा येतात. मोठ्या जनसमूहाला आणि मध्यम वर्गाला सुद्धा हे सहज उपलब्ध नसतात त्यामुळे त्यांच्यातील बहुतेक लोक मनशांती साठी ‘आध्यात्मिक बाजारा’च्या आहारी जातांना दिसतात. असे अनेक प्रकारचे मेंदू-मनोविश्वाचे गोंधळ निर्माण झालेले आपल्या आजूबाजूला दिसत आहेत.

               या सगळ्या पार्श्वभूमीवर माणसाचे माणूसपण शोधण्याचे काम मोठे जिकरीचे बनते. ‘माणसाचा स्व:ताचा तुटलेपणा नष्ट करून मानवाने खऱ्या माणूसपणा कडे जाने म्हणजे समाजवाद’  असे म्हणणारा कार्ल मार्क्स माणसाचे यंत्र आणि वस्तू होण्याच्या काळात आजही मार्गदर्शक वाटतो. मार्क्सने माणसाच्या तुटलेपणाची, एकाकीपणाची, यांत्रिकीकरणाची आणि वस्तूकरणाची चर्चा एकोणिसाव्या शतकात केली होती. एकविसाव्या शतकात जग आणि मानव खूप काही बदलला आहे पण, आजही मार्क्सच्या चिंतनातील मूळगाभा घेत आजची परिस्थिती समजून घेता येते. हल्लीच्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतून अगणित मेंदू-मनोविकार जन्माला येत आहेत, त्यामुळे निरुत्साही होणे, नेहमी थकल्यासारखे जाणवणे, स्वत:विषयीच संधिग्ध राहणे, आत्मविश्वास हरवणे, कल्पक आणि रोमांचकारी स्वप्न सुद्धा न पडणे, सातत्याने भीती आणि दडपण वाटणे अशा अनेक गोष्टी होतात. याच प्रक्रियेला माणसाचे ‘अमानवीकरण’ होणे असे म्हणतात. सर्जनशीलता, निर्मितीक्षमता, स्वातंत्र्याची ओढ, नव्याचा शोध घेण्याची धडपड, प्रश्न विचारण्याची ताकत आणि आभाळाला गवसणी घालण्याची धमक हे माणूसपणाचे सर्व लक्षणे अमानवीकरणाच्या आर्थिक-लैंगिक-भावनिक आणि सामाजिक पिळवणूक तंत्राने संपविले जात आहे. माणसाच्या भाव-भावनांचे, नातेसंबंधाचे, प्रेमाचे रुपांतर नफा- तोट्यात होत असेल तर मग माणसाच्या जगण्याची नैसर्गिकता हरवली जाते. सौंदर्य, सेक्स, आनंद, मैत्री, विश्वास, श्रद्धा आणि प्रेम या सगळ्यांचेच यांत्रिकीकरण आणि वस्तूकरण होवून त्याचा बाजार भरतांना दिसतोय म्हणूनच ब्युटी मार्केट, सेक्स मार्केट, कॉमेडी शो, स्पिरिच्युअल मार्केट सध्या झपाट्याने वृद्धिंगत होतांना दिसतात. माणसाचे यांत्रिकीकरण आणि वस्तूकरण होत जाणे म्हणजे  माणसाचे माणूसपण हरवणे. अशा मानसिक क्रांतीच्या काळात ‘मानव आणि निसर्ग तसेच मानव आणि मानव यांच्यातील शत्रुत्व/द्वेष/विरोध संपवून मांगल्याचा आणि साकल्याचा प्रदेश म्हणजेच माणुसकेंद्री जग निर्माण करता येवू शकते’ असा विश्वास देणारा मार्क्स आजही दिशादर्शक ठरतो.   

 

पूर्वप्रसिद्धी - रसिक, दिव्यमराठी 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...