सोमवार, ५ जून, २०२३

धर्मानंद कोसंबी स्मृतीदिन!

गोव्यातील साखवळ मध्ये ९ ऑक्टोबर १८७६ रोजी धर्मानंद कोसंबी यांचा जन्म झाला. इच्छा नसतांना बालविवाह झाला. त्यामुळे त्यांचा विवाहात जीव रमत नव्हता. कारण, वडिलांनी बळजबरीने तो लावला होता. याच काळात संत तुकाराम यांचा कोसंबीवर प्रभाव होता. पुढे १८९७ मध्ये बाळबोध मासिकात बुध्दचरीत्र वाचले आणि बुध्दाने कायमस्वरूपीसाठी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. संस्कृत भाषा शिकण्यासाठी आणि बौध्द धर्म समजून घेण्यासाठी गोव्याहून पुणे मग पुढे उज्जैन, ग्वाल्हेर, बनारस प्रवास केला. यादरम्यान संस्कृत भाषा शिकली. मग बौध्द धर्म आणि बुद्ध विचार समजून घेण्यासाठी हिमालय मार्गे नेपाळमध्ये गेले. तेथील चित्र पाहून नाराज झाले परत भारतात बौध्दगयेला आले. तेथे कळाले की, बौध्द धर्म समजून घ्यायचा असेल तर पाली भाषा आली पाहिजे म्हणून पालीभाषा शिकण्यासाठी आधी कलकत्ता मग मद्रास वरून श्रीलंकेला गेले. तेथे बौध्द धर्माची प्रवज्या घेतली. दरम्यानच्या, काळात इंग्रजी, तमिळ आणि सिंहली भाषा येत नसल्यामुळे सगळं काम देहबोली आणि हातवारे यांनी केले. 

श्रीलंकेवरून भारतात परत आले पण मद्रास मध्ये काही ब्रह्मी विद्यार्थी मिळाले. त्यांच्यासोबत ब्रह्मदेशात गेले. तेथे तिबेटी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पण लिपीच शिकू शकले. कलकत्याला परत आले. तेथून मुंबई आणि मग पुन्हा कुशिनार, बौध्द गया आणि राजगृह या बौध्द तीर्थस्थळांना भेटी दिल्या. आता पर्यंत त्यांनी संस्कृत, पाली भाषा आणि बौध्द धर्माचा अभ्यास केला होता. पुढे त्यांना साधना करायची होती म्हणून पुन्हा कलकत्ता मार्गे ब्रह्मदेशात गेले. 

१९०६ नंतर अध्यापन आणि प्रबोधन करायचे ठरवले. कलकत्त्यात प्रेसिडेन्सी कॉलेज, नॅशनल कॉलेज आणि कलकत्ता विद्यापिठात पाली विषय तीन वर्ष शिकवला. नंतर अडीचशे रुपयाची नोकरी सोडून पन्नास रुपयाची बडोदा सरकारची मदत स्वीकारली आणि मुंबईत स्थायिक झाले. १९०९ - १० मध्ये अमेरिकेतील हार्वड विद्यापिठात विसुद्धिमग्ग या ग्रंथाच्या संपादनाचे काम मिळाले. म्हणून, इंग्लंडमार्गे अमेरिकेचा प्रवास केला. प्रवासात डच व्यक्तीमुळे पहिल्यांदा मार्क्स आणि समाजवादविषयी कळाले. अमेरिकेत बऱ्याच संस्थांची व्याख्याने ऐकली. समाजवादविषयी साहित्य वाचले. संपादनाच्या कामात मदभेद झाले म्हणून परत भारतात आले. १९१२ मध्ये पुण्यात वसंत व्याख्यान मालेत " कार्ल मार्क्स - चरीत्र आणि मते" या विषयवार व्याख्यान दिले. तसेच, १९१२ ते १९१८ पर्यंत फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली शिकवले. १९१८ मध्ये पुन्हा हार्वड विद्यापीठात दुसऱ्यांदा चार वर्षासाठी गेले. १९२२ मध्ये परत आले. १९२५ मध्ये गुजरात विद्यापिठात पाली शिकवायला सुरुवात केली. १९२७ मध्ये नेहरू सोव्हिएत रशियावरून परत आले होते. त्यांनी लिहिले होते की, सोव्हिएत मध्ये बौध्द धर्माचा अभ्यास करण्यासाठी संस्था स्थापन झाली म्हणून शेरोबात्सकी यांच्याशी संपर्क करून धर्मानंद १९२९ मध्ये सोव्हिएत रशियात गेले. तेथे एक वर्ष पाली आणि बौध्द धर्म शिकवला. १९३० मध्ये परत आले. 

१९३० मध्ये सविनय कायदेभंगात सहभाग घेतला. ब्रिटिश विरोधासोबत जातीभेद आणि आर्थिक विषमता विरोधात ही लढले पाहिजे असे म्हणू लागले. १९३६-३७ मध्ये कामगारांसाठी बहुजन विहार काढले. तसेच, बनारस हिंदू विद्यापीठ आणि काशी विद्यापीठ येथे मोफत शिकवले. १९४५ मध्ये गोरखपूरमधील गांधी आश्रम येथे स्थिरावले आणि नंतर सेवाग्राम आश्रम, वर्ध्याला आले. तेथेच त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांची समाधी ही वर्ध्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक बौध्द चिंतनावर धर्मानंद कोसंबी यांच्या चिंतनाचा प्रभाव आहे. धर्मानंद कोसंबी यांचे चिरंजीव दामोधर कोसंबी यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...