मंगळवार, ६ जून, २०२३

लेनिन आणि भारताचा काय संबंध?

आधुनिक भारत आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक इतिहासाचा थोडासाही अभ्यास असला तर वरील प्रश्न कोणालाही पडणार नाही. असे असले तरी, आज रवींद्र साठेंना असा प्रश्न लोकसत्ता वृत्तपत्रात पडलेला दिसतो. 

त्यासंदर्भात काही मुद्दे. 
१. लोकमान्य टिळकांना ज्यावेळी ब्रिटिश सरकारने अटक केली. त्यावेळी मुंबईतील कामगारांनी निषेध नोंदवला होता. त्याची दखल लेनिनने घेतली आणि आपले समर्थन जाहीर केले. 

२. लोकमान्य टिळकांनी केसरीत मार्क्सवाद संबंधी लेखन केले असे प्रसिध्द इतिहासकार जे. वी. नाईक लिहिले आहे. 

३. टिळकांचे शिष्य पांडुरंग खानखोजे आणि सरोजिनी नायडू यांचे बंधू वीरेंद्र चट्टोपाध्याय हे कम्युनिस्ट इंटरनेशनलचे सदस्य होते. टिळक आणि त्यांच्यात १९१९ मध्ये पत्रव्यवहार झाला होता. हे प्रसिध्द इतिहासकार य. दि. फडके यांनी. लिहिले आहे. कम्युनिस्ट इंटरनेशनल हे लेनिनच्या सोव्हिएत रशियाचे आंतरराष्ट्रीय संघटना होते. याच्या माध्यमातूनच १९२० ते १९३० च्या दशकात आशियापासून ते दक्षिण अमेरिका आणि युरोपपासून ते आफ्रिकेपर्यंत वेगवेगळ्या देशात कम्युनिस्ट पक्षांची स्थापना झाली. 

४. सरदार पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली ज्यावेळी गुजरातमधील बर्डोलीत शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होते. त्यावेळी, त्याचा धसका घेवून ब्रिटिश सरकारच्या गुप्तचर खात्याने ' बर्डोलीत लेनिन, बर्डोलीत बोलशेव्हीझम' अशा आशयाच्या बातम्या दिल्या. 

५. महाराष्ट्रात १९२० आणि १९३० च्या दशकात महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी शेतकरी परिषदा घेतल्या. त्यामध्ये भांडवलशाही, जमीनदारी आणि शेतकऱ्यांच्या स्थितीविषयी चर्चा झाल्या. त्यावेळीही, ब्रिटिश गुप्तचरांनी त्यांना बोलशेव्हिक म्हटले. त्यावर शिंदेंनी ' बोलशेव्हीझमचा बागुलबुवा' असा लेख लिहिला आहे. 

६. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता वृत्तपत्रात रशियन क्रांती, लेनिन यांची बऱ्याचवेळा साधकबाधक चर्चा येते. बाबासाहेबांनी तर एका ठिकाणी असेही म्हटले आहे की, लेनिन जर भारतात जन्माला आला असता तर त्याने आधी जाती निर्मूलनाची चळवळ सुरू केली असती. दुसऱ्या एका ठिकाणी असेही म्हटले आहे की, फ्रेंच राज्य क्रांतीपेक्षा रशियन राज्यक्रांती मला जास्त महत्त्वाची वाटते कारण, तीने आर्थिक समता आणली.

७. प्रसिध्द क्रांतिकारी भगतसिंहने तर जाहीरपणे लेनिनचा प्रभाव कसा होता हे स्पष्टपणे आपल्या जेल डायरीमध्ये लिहिले आहे. 

८. हिंदुत्ववादी विचारक सावरकर यांनीही ' रशियातील घटस्फोट' या आपल्या लेखात ' रशियन क्रांती ही नुसती राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक क्रांती नव्हती तर संपूर्ण जीवन क्रांती होती असे म्हटले आहे. रशियन क्रांतीचा नेता लेनिन होता. 

९. आर्य समाजातील तरुणांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मार्क्सवाद आणि रशियन क्रांतीने प्रभावित केले होते. त्यामुळेच लाला हरद्याळ यांनी मार्क्स आणि मार्क्सवाद पुस्तके लिहिले. त्यातूनच पुढे हिंदू साम्यवाद मंडळ निर्माण झाले. डॉ. आंबेडकरांच्या बहिष्कृत भारतमध्ये हिंदू साम्यवाद मंडळावर लेख आहे. 

१०. काँग्रेसमधील अनेक मंडळींवर लेनिन आणि सोव्हिएत रशिया प्रभाव होता. त्यामुळेच काँगेस मार्क्सवादी असा गटही स्थापन झाला होता.

११. कॉ. डांगेंनी ' गांधी विरुद्ध लेनिन ' असा ग्रंथ लिहून गांधींपेक्षा लेनिनचा मार्ग भारतासाठी अधिक योग्य आहे असे म्हटले होते. 

१२. दिनकरराव जवळकर, माधवराव बागल या सत्यशोधक विचारवंताच्या लिखाणात लेनिन आणि सोवहिएत रशिया अनेक ठिकाणी भेटतो. 

१३. तामिळनाडूत पेरियार यांच्याही लिखाणात लेनिन आहे. 

अशा अनेक गोष्टी सांगायला आहेत. म्हणून, ज्यावेळी कोणाकडून लेनिन आणि भारताचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यावेळी, त्यांना एकच सांगावेसे वाटते. अभ्यास करा आणि भारताचा इतिहास समजून घ्या. नुसते राष्ट्रीय दृष्टिकोनातून इतिहासाचे पुनर्लेखन हवे असे म्हणून चालत नाही. 

जिथे जिथे साम्राज्यवाद, वसाहतवाद होता,
तिथे तिथे लेनिन होता. म्हणूनच, लेनिन हा भारतातच नव्हे जगात सगळीकडे दिसतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...