गुरुवार, ८ जून, २०२३

निसर्गाचे खाजगीकरण

      संपूर्ण जगभर आज पर्यावरणाचे आणि परिस्थितीकिय (इकॉलोजीकल) प्रश्न कधी नव्हे एवढे चर्चेचे प्रश्न बनले आहेत. विविध कंपन्या, देशोदेशी सरकार आणि सामाजिक चळवळी पर्यावरण आणि परिस्थितीकिय प्रश्नांवर जागरूक होतांना दिसत आहेत. कारण, संपूर्ण जगालाच या प्रश्नाने भेडसावले आहे. या संपूर्ण प्रश्नांची गुंतागुंत आणि वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण समजावून सांगण्याचे कार्य ‘प्रायव्हटायझिंग नेचर- पॉलिटीकल स्ट्रगल फॉर द ग्लोबल कॉमन्स हे मिखाईल गोल्डमन संपादित पुस्तक करते.

      जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये निसर्गाचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न कसे चालू आहेत हे एकीकडे पुस्तक सांगते तर दुसरीकडे याच खाजगीकरणाच्या प्रयत्नांना आडकाठी घालण्याचे काम स्थानिक – आदिवासी लोक कसे करत आहेत याचीही चर्चा पुस्तकात आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीच्या भागातच भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाच्या चळवळींनी कोणते प्रश्न उपस्थित केले याची चर्चा आहे. मध्यभारतात नर्मदा नदीवर उभारला जाणाऱ्या धरणाच्या विरोधात शेतकरी आणि आदिवासी लढले, उत्तर भारतात तेहरी गढवाल स्त्रियांनी आपल्या डोंगरांची लुट होण्याच्या विरोधात लढा उभारला, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या ‘बौद्धिक मालमत्ता अधिकारा’मुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना नफा होतो म्हणून दक्षिण भारतात शेतकऱ्यांनी मोर्चे काढले. मच्छीमारांनीही मशिनीच्या वापरला विरोध केला. म्हणूनच, भारतात असे दिसते की, वेगवेगळे सामाजिक घटक परिस्थितीकी, राजकारण आणि सामाजिक न्याय यांच्या व्यापाला वृद्धिंगत करत आहेत.

     पारंपारिक सामाजिक चळवळी, कंपन्या आणि सरकार सगळ्यांच्या चर्चेचा समान मुद्दा आहे . तो म्हणजे मालमत्तेच्या अधिकाराचा प्रश्न. जमीन, जंगल, दफनभूमी, बियाणे, बौद्धिक अधिकार, जमिनीच्या आतील आणि वरील पाणी, खाणी, शहरी जागा, कुरण, गाव इत्यादींवर ज्याचे नियंत्रण असेल तो नैसर्गिक संसाधनांची लुट आणि पर्यावरणीय बदलाच्या प्रक्रियेवर नियंत्रण असेल. म्हणूनच मालमत्ताकेंद्री अधिकारांची चर्चा ही एकतर परीस्थितीकिय अधोगतीला कारणीभूत ठरते. समाजातील वेगवेगळे घटक वेगवेगळ्या मुद्यांसाठी भांडत आहेत. संसाधनावरआधारित समूह आपला उदरनिर्वाह आणि सांस्कृतिक व्यवहारासाठी, बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या वस्तू आणि नफ्यासाठी आणि सरकारे आपल्या करासाठी आणि अधिकार विस्तारासाठी झगडत आहेत. कारण, यावर समाजातील या घटकांची सत्ता उभारलेली आहे. पर्यावरणीय – परीस्थितीकिय  समस्या म्हणाव्या तशा सोप्या नाहीत कारण, वेगवेगळ्या समाज घटकांचे हितसंबंध त्यामध्ये गुंतलेले आहेत असा पुस्तकाचा मुख्य आशय आहे.

    वारसा, इतिहास आणि हितसंबंध हे खरंच सामाईक असतात का? वैश्विक असतात का? असा प्रश्न उपस्थित करत अभिजन वैज्ञानिक, धोरणकर्ते, शहरी मध्यमवर्गीय पर्यावरणवादी मंडळींची चिकित्सा करण्यात आली आहे. १९८० च्या दशकात अमेझॉन हे सगळ्या विश्वाचे फुफ्फुस आहे असे जाहीर करण्यात आले पण त्यामाध्यमातून तेथील आदिवासींचे अधिकार नाकारण्यात आले आणि जगभरातील शहरी मंडळींचा दररोज ऑक्सिजनचा डोस मिळावा हा अधिकार स्थापित करण्यात आला. अमेझॉनच्या बाहेरच्या वैज्ञानिक, कार्यकर्ते, धोरणकर्ते अशा सगळ्यांनी अमेझॉनमधील शेतकरी, आदिवासी हे अविवेकी आहेत. अभिजन – शहरकेंद्री पर्यावरणवादी गृप आणि वर्ल्ड बँक अशा जागतिक संघटना अमेझॉनमध्ये घुसले आहे. त्यांना वाटते की, अमेझॉनमधील आदिवासी आणि शेतकऱ्यांनी तथाकथित जागतिक व्यवस्थापकीय शाश्वत पर्यावरणाचे कौशल्य शिकले पाहिजे. या सगळ्या प्रक्रीयेमध्ये स्थानिक लोकांचे ज्ञान नाकारले जाते, त्यांचे कौशल्ये नाकारले जाते. पुस्तकात पर्यायी विचार मांडतांना म्हटले आहे की, पर्यायी विकासाची चर्चा करतांना शीतयुद्धकालीन मानसिकता नाकारावी लागेल. म्हणूनच, नवसामाजिक चळवळी या फक्त भांडवलशाहीविरोधी नाहीत तर एकाधिकारसमर्थक राज्य समाजवादाच्याही विरोधात आहेत. सगळ्या गोष्टी या काळ्या- पांढऱ्यात विभागलेल्या नसतात अशी भूमिका घेत जहाल पर्यावरण- परिस्थितिकिय राजकारण उभे राहत आहे असे मिखाईल गोल्डमन यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.

      पुस्तकात एकूण आठ लेख आहे. प्रत्येक लेख आपल्याला नवीन माहिती सांगणारा, प्रश्न विचारण्यास भाग पडणारा आणि प्रबुद्ध करणारा आहे. पहिल्या लेखात ‘सामाईक’ या संकल्पनेची ऐतिहासिक मांडणी करण्यात आली आहे. दुसऱ्या लेखात ब्राझीलमधील अमेझॉन नव्याने उभ्या राहणाऱ्या सामाजिक चळवळीविषयी चर्चा आहे. तिसऱ्या लेखात मेक्सिको देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या समर्थक सरकार आणि क्रांतिकारी लोकांच्या चळवळ यांच्यावर आहे. दोन्ही गट मेक्सिकोच्या संसाधनावर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी काय करत आहे आपणास दिसते. चौथ्या लेखात कॅमेरूनमधील जंगल हे अनेक सामाजिक घटकांच्या झगड्याचे क्षेत्र कसे बनले हे दाखवण्यात आले. भटके, आदिवासी, शेतकरी, कंपन्या, सरकार, आंतरराष्ट्रीय मंडळी हे सगळेच भांडत आहेत. पाचव्या लेखात अमेरिकेतील शहरातील प्रश्नांची चर्चा करत पर्यावरणाचा प्रश्न हा वर्गीय, वांशिक प्रश्नांची कसा संबंधित आहे हे दाखविले आहे. सहाव्या लेखात जैवविविधतेसंदर्भात चिकित्सक मांडणी करण्यात आली आहे. सातव्या आणि आठव्या लेखात सामाईक संस्था कशा आणि का कार्य करतात. या प्रश्नाची चर्चा आहे. सामाजिक भांडवल, सामुहिक कृती पासून ते सांस्कृतिक सिद्धांत अशा वेगवेगळ्या संदर्भात ही चर्चा आहे.

आपल्या समकालीन जगात पर्यावरण – परिस्थितीकिय प्रश्न भयानक स्वरूप धारण करत आहेत. त्यामुळे सगळीच मंडळी याविषयी कृती केली पाहिजे असे एकीकडे म्हणत आहे. पण, दुसरीकडे बरीच मंडळी आपल्या धोरणात, दृष्टीकोनात आणि विचारात अजूनही बदलत करत नाही. त्यामुळे प्रश्न आणि समस्या अजूनही तीव्र स्वरूप बनत आहे. गुंतागुंत वाढत आहे. म्हणून हे पुस्तक वाचले पाहिजे. पुस्तक आपल्याला दिशादर्शक ठरेल अशी मला खात्री आहे. 

 

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...