गुरुवार, ८ जून, २०२३

निसर्ग आणि माणूस

 

 

      माणूस हा जैविक, मानसिक, सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे असे म्हटले जाते. सोबतच, माणूस हा परिस्थितीकिय (ईकॉलोजीकल) प्राणीही आहे असेही म्हटले जावू लागले आहे. कारण, आजूबाजूला बदलणाऱ्या हवामान बदलामुळे मानवी जीवनावर अनेक परिणाम होत आहेत. ऊन, हवा, पाणी, नदी, डोंगर, जमीन, माती या सगळ्या नैसर्गिक घटकांचा मानवाच्या जैविक आणि भावनिक गोष्टींशी अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळेच हल्लीच्या काळात मानसिक आरोग्याच्या काही समस्यांवर निसर्गोपचार (नेचर थेरपी) सांगितली जाते. तसेच, ज्या भागात खूपच झाडे, जंगल, नदी आणि डोंगर आहेत आणि ज्या भागात हे काहीच नाही अशा दोन्ही भागातील अनुभव घेतले तर बहुतेक मंडळींचे पहिल्या भागातील अनुभव चांगले असतात. कारण, झाडे, जंगल, नदी आणि डोंगरांचे नुसते अस्तित्वही बरेच काही सांगत असते.

      आपल्या समाजात बालपणाचा सामाजिक आणि मानसशास्त्रीय पद्धतीने बराच अभ्यास होत आहे. त्यामध्ये पर्यावरण आणि निसर्ग या दोन गोष्टी समाविष्ट केल्या तर अजून बऱ्याच गोष्टी समजून घेता येवू शकतात. झाडे, नदी, जंगल आणि डोंगर यांच्या सानिध्यात मुले मोठी होत असतांना काही गुणात्मक बदल होता का? याविषयी वैज्ञानिक अभ्यास झाले पाहिजेत. कारण, अनेक लोकांच्या बाल भावविश्वात झाडे, नदी, जंगल आणि डोंगर यांना खूपच स्थान असते असे दिसते. पण, आपल्या समकालीन परिस्थिती नदी, जंगल, झाडे आणि डोंगर सगळेच कमी होतांना दिसत आहेत. त्याचा सामाजिक, मानसशास्त्रीय काय परिणाम होतो. याचाही काहीसा लेखाजोखा घेतला पाहिजे.

       हवामानबदल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि परिस्थितीकिय समस्यांचे एक मोठे राजकीय अर्थशास्त्र आहे. त्यामुळे दरवर्षी देशोदेशी पर्यावरण आणि हवामानसंबंधी जागतिक परिषदा होवूनही अजून प्रदूषण करणे थांबवले जात नाही. लोकांमध्ये जागृती केली जात नाही. कारण, काहींना या राजकीय अर्थशास्त्रातून नफा मिळतो. परंतु, सामाजिक, पर्यावरणीय आणि मानसिक नुकसान किती होते याची काहीही नोंद घेतली जात नाही. म्हणूनच असेही म्हटले जाते की, पर्यावरणाचा, हवामान बदलाचा प्रश्न हा अराजकीय नाही. युरोपातील अनेक देशांमध्ये हिरवे राजकारण(ग्रीन पॉलिटीक्स) अनेक पर्यावरणवादी पक्ष उदयाला आलेले आहेत. तेथील जनताही पर्यावरण आणि हवामान बदलाच्या प्रश्नांना गांभीर्याने घेते आहे असे दिसते. आपल्याकडे धर्म-जातकेंद्री राजकारणाची पक्षीय राजकारणात चलती आहे की, तिथे निसर्गकेंद्री राजकारणाला काडीमात्र स्थान नाही.

     सामाजिक चळवळींच्या पातळीवर मात्र निसर्गकेंद्री राजकारण आणि पर्यावरण, हवामान बदल यांना भारतात काहीसे महत्व येवू लागले आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण, हवामान बदलाच्या संकटाला दक्षिण आशियातील (म्हणजे भारत, पाकीस्थान, बांगलादेश आणि श्रीलंका) लोकांना गंभीरपणे सामोरे जावे लागणार आहे असे काही हवामान बदलाचे अभ्यासक म्हणत आहेत. भारतातील वेगवेगळ्या राज्यात पर्यावरण आणि हवामान बदल या प्रश्नांवर अनेक छोट्या- मोठ्या संघटना आणि संस्था कामे करत आहेत. त्यामध्ये निसर्गमानवकेंद्री लोक चळवळ (नेचर ह्युमनसेंट्रिक पीपल्स मुव्हमेंट) आणि दक्षिण आशियाई लोकांची हवामान बदलविरोधी कृती ( साउथ एशियन पीपल्स अक्शन ऑन क्लायमेट चेंज) या संघटना जागृती, प्रबोधन आणि लोकसंघटनसंबंधी अत्यंत महत्वाचे कार्य करीत आहेत. यासारख्या अनेक संस्था, संघटना वाढल्या पाहिजे तर आपण येवू घातलेल्या समस्येला समजावून घेवू शकू.

     मुंबईतील आरे जंगल आंदोलन हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे. कारण, असा समज होता की, प्रामुख्याने आदिवासी आणि ग्रामीण लोकच पर्यावरण आणि निसर्गसंबंधी आंदोलन करतात आणि शहरी लोक त्याचे विध्वंसन करतात. पण आरे आंदोलनाने ही समज काही चुकीची आहे असे दाखवून दिले. कारण, शहरातील सुखवस्तू, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत मंडळींनाही पर्यावरणाचे आणि हवामान बदलाचे प्रश्न समजू लागले आहे. विशेषत: नवीन पिढीला या प्रश्नांची समस्या अधिक जाणवू लागली आहे. म्हणूनच, आपल्याला असे दिसून येईल की, आरे आंदोलनात समाजातील वेगवेगळ्या स्तरातील तरुण सहभागी झाले होते. ग्रेटा थनबर्ग या मुलीमुळे ही जगभरातील शाळकरी, महाविद्यालयीन मुले आणि तरुणमंडळी पर्यावरणाच्या आणि हवामान बदलाच्या प्रश्नावर काम करू लागली आहे. सत्तेला प्रश्न विचारू लागली आहे. स्वतःच्या पर्यावरणीय भविष्याचा विचार करू लागली आहे. ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. पण, सोबतच हेही अजून लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, जगभरातील सत्ताधारी, नफेखोर कंपन्या निसर्गाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात सामाजिक न्यायासोबत, परिस्थितीकिय/पर्यावरणीय न्यायाची चळवळ गतिमान करावी लागेल असे दिसत आहे.

      नैराश्य आणि तुटलेपणा हे मानसिक आजार समाजात झपाट्याने वाढत आहेत. प्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांनी तुटलेपणा हा व्यक्तीने व्यक्तीपासून, समाजापासून आणि निसर्गापासून दूर गेल्यामुळे येतो असे म्हटले आहे. म्हणूनच, आपण निसर्गाचा विध्वंस करून आपले भविष्य रंगवू नये तर निसर्गाशी मैत्री करणारे भविष्य चिंतावे. कारण, निसर्गाचे आपण अविभाज्य घटक आहोत. आपण ठरवूनही बाजूला होवू शकत नाही. 

 

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...