शनिवार, १ जुलै, २०२३

लव जिहादची चर्चा आणि सत्यशोधकांची भूमिका- हिंदुत्ववाद, आंतरधर्मीयप्रेम आणि सर्वधर्मीय कुटुंब याविषयी काही मुद्दे

 

                  सत्यशोधक समाजाच्या इतिहासात एक गमतीदार गोष्ट आहे. ती म्हणजे सत्यशोधक चळवळीत, समाजात काही महत्वाचा टप्पा असला की, लोक सत्यशोधक चळवळीची आणि समाजाची परखड चिकित्सा करतात . त्यासोबतच, वर्तमान भविष्यातील आव्हानांची चर्चा  करतात. जसेही, भाई माधवराव बगलांनी ‘सत्यशोधकांना इशारा दिला होता. तसेच, नागेश चौधरींनी  ‘सत्यशोधक समाजाची वाट लावू नका अशी कानउघडणी केली होती. तशीच काहीशी  शतकोत्तर सुवर्ण महोत्सवात निमित्ताने झाली पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.  सत्यशोधक समाजाचा विचार आणि वारसा काय याविषयी दोन- तीन उदाराहणे देतो आणि मग माझ्या मुख्य वळतो.   १. १८९३ मध्ये मुंबई शहरात हिंदू- मुस्लीम दंग्यामुळे मोठी वित्तहानी आणि मानवहानी झाली होती. सोबतच, हिंदू मुस्लिमांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. त्यावेळी दंगा शमवण्यामध्ये आणि दंग्यानंतर लोकांची मने जुळवण्यासाठी सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे, पंडित धोंडीराम नामदेव आणि इतर मंडळीनी हिंदू- मुस्लिमांचा प्रीती मेळावा भरवला होता. त्यात ६०,००० हजारांवर मनुष्ये हजर झाली होती.(८ ऑक्टो. १८९३, दीनबंधू, ) प्रीती मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांची मने जुळवण्याचे आणि जोडण्याचे प्रयत्न सत्यशोधकांनी मुंबई शहरात त्यावेळी केले होते.  २. ४ ऑगस्ट १८९५ च्या दीनबंधूमधून सत्यशोधकांची धर्मविषयक भूमिका नेमकी कशी होती हे स्पष्ट होते. ‘ख्रिस्ती व हिंदू लोकांतील चर्चमिशन व आर्यधर्म रक्षक वाद’ या लेखामध्ये दीनबंधूकारांनी म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडेंनी म्हटले आहे की, “ह्या संबंधाने पूर्वी अनेक वेळा विद्वान लोकांत चांगले कडाक्याचे वादविवाद झाले आहेत. आमच्या धर्मातील देव अमूक होते व तमक्या धर्मातील देव तमुक होते अशा बद्दल सध्या अनमान करण्याचे काहीच प्रयोजन नाही. जो धर्म मनुष्यास मनुष्यपण देतो किंवा ज्या धर्माचे लोक किंवा धर्मगुरू आपल्या एकंदर स्वधर्मीय बांधवांच्या हितास्तव काळजी बाळगतात तोच धर्म चांगला आहे आणि हेच आंता दाखविण्या करिता प्रत्येक धर्माच्या मनुष्याने व धर्मगुरूने झटले पाहिजे. निरर्थक बाचा बाच करण्यात व कोटिक्रम लढविण्यात काही एक फायदा नाही. धर्म चांगला आहे परंतु त्या धर्माचे स्वरूप खरे रहस्य काय आहे हे जर त्या त्या धर्मातील लोकांस समजत नाही तर त्या धर्माच्या चांगलेपणाचा उपयोग काहीच नाही. (२६ मे १८९५, दीनबंधू) या दोन्ही उदाहरणांमधून सत्यशोधकांची मानवधर्माची भूमिका स्पष्ट होते.

            महाराष्ट्राला प्रागतिक आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते होते. कारण, देशात सर्वात पहिल्यांदा अत्यंत प्रागतिक कायदे आणि धोरणे महाराष्ट्राने केलेली होती. तसेच, महाराष्ट्राला समाजसुधारणा, धर्मसुधारणा आणि स्त्रीसुधारणेचा दीर्घ इतिहास आहे म्हणूनही महाराष्ट्राला प्रागतिक आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राला प्रागतिक आणि पुरोगामी राज्य म्हणावे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जातीय अत्याचार, पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दंगली आणि सामाजिक वातावरण प्रदूषित करणारा विखारी राजकीय-धार्मिक प्रपोगंडा याने मराठी लोकांचे आणि महाराष्ट्रीयन समाजाचे वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक आरोग्य बिघडत आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील लोक युपी, बिहारमधील लोकांना नावे ठेवत होती कारण तिकडची राजकीय आणि सामाजिक संस्कृती ही गुन्हेगारीची आहे असे समजले जात होते. महाराष्ट्रातील राजकारणी लोक हे सुसंस्कृत आहे असेही मानले जात होते. परंतु, मागच्या दहा वर्षांचा आलेख पाहिला तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ होत आहे असे दिसत आहे. राजकीय धृवीकरणासाठी जाणीवपूर्वक धर्माचा वापर केला जात आहे. धार्मिक द्वेष पसरवला जात आहे. धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. भावनेचे राजकारण करून लोकांना वेठीस धरले जात आहे.

हिंदुत्ववादी राजकारण आणि आंतरधर्मीय प्रेम !

           लव जिहादच्या नावाखाली तर स्त्रियांना एकीकडे नियंत्रित केले जात आणि दुसरीकडे धार्मिक धृवीकरण केले जात आहे. देशभरात आंतरधर्मीय विवाहांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा असेल तर त्याला जास्त विरोध केला जात आहे. मागील सहा- सात वर्षांपासून महाराष्ट्रातही हे लोण पसरले आहे. नाशिक येथे होवू घातलेल्या आंतरधर्मीय विवाहामध्ये धर्मांध लोकांनी अडथळे निर्माण केले. जात पंचायतीकडून दबाव आणला होता. असा प्रकार, मात्र कोल्हापुरात झाला नाही. कारण, त्या आंतरधर्मीय विवाहामध्ये वर (नवरा) हा हिंदू होता आणि वधू (नवरी) ही मुस्लीम होती. हिंदुत्व चळवळीत आंतरधर्मीय विवाहांना विरोध आहे पण त्यांना असे विवाह आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही म्हणून त्यांनी हिंदू मुलांनी मुस्लीम मुलींशी केलेले लग्न काहीसे मान्य केलेले आहेत.  पण, हिंदू मुलींनी मुस्लीम मुलांशी केलेले लग्न मान्य नाही. कारण, मुलगी ज्या मुलाशी लग्न करते. त्याच्या धर्माशी होते अशी त्यांची समज आहे. तसेच, मुस्लीम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न केले की, त्यांचे हिंदूकरण सहज करता येवू शकते अशी त्यांची समज आहे. स्वतः सावरकरांनी १९२० च्या दशकामध्ये हिंदू मुलींवर हिंदूचाच हक्क आहे अशी भूमिका घेतली होती. तसेच, हिंदू मुलांनी मुस्लीम मुलींशी लग्न केले तर चालेल पण हिंदू मुलींनी मुस्लीम मुलांशी लग्न करू नये असेही त्यांनी जाहीर केले होते. सावरकरांचाच कित्ता आजही गिरवला जात आहे.

            हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि हिंदुत्ववादी लोक हे सगळेच सनातनी आणि तथाकथित उच्चजातीय असतात. त्यामुळे ते आंतरजातीय विवाहांना विरोध करतात असा काहीसा समज होता आणि अजूनही आहे. परंतु, समकालीन स्थिती पाहिली तर परिस्थिती काहीशी वेगळी दिसते. कारण, जरी हिंदुत्व चळवळीची सुरुवात ब्राह्मण-मारवाडी मंडळींनी केली असली तर मागील सत्तर- ऐंशी वर्षात वेगवेगळ्या टप्प्यावर दलित, भटके विमुक्त, आदिवासी, ओबीसी अशा  बहुजन समाजाचा हिंदुत्व चळवळीत आणि संस्था – संघटनेमध्ये प्रवेश झालेला आहे. याबाबतीत हिंदुत्व चळवळीत लोकांनी आखलेले सामाजिक धोरण आणि राजकीय डावपेच यशस्वी झालेले आहेत. म्हणूनच, आजचे हिंदुत्व चळवळीचे समाजशास्त्र काहीसे बदलले आहे. त्यामुळेच विविध स्तरातील लोकांचा आणि समूहांचा त्यांच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे कधीकाळी आंतरजातीय विवाहांना विरोध करणारा हा वैचारिक प्रवाह आज तसा विरोध करत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने ‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नां’ची पाळतखोरी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने थोडी टीका आणि चिकित्सा झाल्यावर ‘आंतरजातीय हा शब्द काढून टाकला.  कारण, . आपण सगळे हिंदू आहोत. त्यामुळे हिंदूंच्याअंतर्गत वेगवेगळ्या जातींमध्ये विवाह झालेच पाहिजे अशी भूमिका हिंदुत्ववादी चळवळीतील एक गट घेतच होता. याचा अर्थ असा मात्र नव्हे की, संपूर्ण हिंदुत्ववादी चळवळीतील लोक आंतरजातीय विवाहांचे समर्थन करतात.

आंतरजातीय विवाह विरुद्ध आंतरधर्मीय विवाह ?

         ‘हिंदुत्व’ चळवळीवर भाष्य करतांना प्रा. रणजीत परदेशी म्हणतात की, हिंदुत्वाचे बहिरंग हे हिंदूकरणाचे आहे आणि अंतरंग हे ब्राह्मणीकरणाचे आहे. जे ब्राह्मणेत्तर लोक हिंदुत्ववादी होतात त्यांचे अंतरंग हे ब्राह्मणीकरणाने ग्रासले जाते. त्यामुळेच आंतरजातीय विवाह करणारे अनेक ब्राह्मणेत्तर हिंदुत्ववादी हे आंतरधर्मीय विवाहांना विरोध करतात. आंतरजातीय विवाह करतांना जातीची चौकट नाकारायची पण धर्माची चौकट स्वीकारायची अशी काहीशी त्यांची भूमिका दिसते. यामध्ये व्यक्तीगत स्वातंत्र्य, व्यक्तीचा निवडीचा अधिकार, व्यक्तीचे खाजगी जीवनाचा प्रश्न यांना कुठेही स्थान राहत नाही. यामुळे स्त्रियांचा (सर्वधर्मीय) निवडीचा, स्वातंत्र्याचा, खाजगीपणाचा असे सगळेच अधिकार नाकारले जातात.

       आंतरजातीय विवाह करणे आणि त्यांना पाठींबा देणे हे प्रागतिक आणि पुरोगामीपणाचे लक्षण मानले जात होते. परंतु, सगळेच आंतरजातीय विवाह करणारे आणि त्यांना पाठींबा देणारे लोक हे पुरोगामी आणि प्रागतिक असतीलच असे काही नाही. मागच्या आठवड्यात लव जिहादच्या मुद्यावरून गोंधळ निर्माण करणाऱ्या आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी धार्मिक धृवीकरण करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनीही आंतरजातीय – प्रेमविवाह केला आहे. पण, लव जिहादच्या मुद्यावरून त्यांनी जो गोंधळ निर्माण केला त्यामुळे अनेक आंतरधर्मीय प्रेम करणाऱ्या लोकांच्या नजीकच्या काळात हिंसेला, दडपणाला सामोरे जावे लागू शकते अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. राज्यात आणि देशात आंतरधर्मीय विवाहविरोधी कायदा करण्याची चर्चाही काहींनी सुरु केली आहे. 

        प्रागतिक आणि पुरोगामी म्हणून घेणारा महाराष्ट्र आणि फुले- शाहू- आंबेडकरांचा वारसा सांगणारे लोक, संस्था, चळवळी आणि पक्ष या संदर्भात काय भूमिका घेतील यावरून अनेक गोष्टी ठरणार आहेत. महाराष्टात मागील दोनशे वर्षात जे समाजचिंतन आणि धर्मचिंतन झाले त्यामुळे अशी परिस्थिती आधी कधी उद्भवली नव्हती पण आज महाराष्ट्र वेगळ्या टप्यावर आला आहे. म्हणूनच, महाराष्ट्राने आपला वैचारिक आणि सामाजिक वारसा काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राला प्रागतिक, पुरोगामी आणि आधुनिक बनवण्यात अत्यंत मोठे वैचारिक योगदान दिले आहे. त्यांनी महाराष्ट्राला वैश्विक दृष्टी दिली. तसेच, जातीधर्माच्या भिंती ओलांडून सर्वांमध्ये बंधू-भगिनीभाव आणि मैत्रभाव स्थापित झाला पाहिजे अशी त्यांची मनोभूमिका होती. त्यासाठीच त्यांनी भेदभाव निर्माण करणाऱ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे. सर्व मनुष्य प्राण्यामध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये समता निर्माण झाली पाहिजे अशी त्यांची धारणा होती आणि म्हणूनच त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठींबा, प्रोत्साहन दिले. आपल्याला आंतरजातीय विवाहांविषयी माहिती असते. फुले-शाहू-आंबेडकर अशा तिघांनी आंतरधर्मीय विवाहही झाले पाहिजेत असेही म्हटले होते हे मात्र विसरून जातो. म्हणूनच, पुढे त्याची चर्चा करण्यात येणार आहे.

फुले, शाहू आणि आंबेडकर आणि आंतरधर्मीय कुटुंब

      महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांची, विचारांची आणि चळवळींची बरीच चर्चा होते. त्यांचे सामाजिक विचार, आर्थिक चिंतन आणि धार्मिक चिकित्सा याविषयी पण अनेकवेळा चर्चा होते. पण, त्यांनी आंतरधर्मीय कुटुंब आणि आंतरधर्मीय विवाह यासंबंधी जे विचार मांडले होते. त्याची मात्र खूपच त्रोटक चर्चा होते. आजच्या धार्मिक धृवीकरणाच्या, धार्मिक द्वेषाच्या आणि धर्मांध राजकारणाच्या काळात मात्र त्यांचे विचार खूपच दिशादर्शक आहेत.

१.     महात्मा फुले आणि सर्वधर्मीय कुटुंब

‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथामध्ये महात्मा फुल्यांनी एक संवाद कल्पिलेला आहे. त्यामध्ये गणपतराव नामक व्यक्ती जोतीरावांना प्रश्न करतो आणि त्यावर जोतीराव उत्तर देतात. ते पुढील प्रमाणे-

जोतीराव. उ.- स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व गावच्या, प्रांतांच्या, देशाच्या व खंडांच्या संबंधाने अथवा कोणत्याहि धर्मातील मताच्या संबंधाने, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा सर्व पुरुषांनी, एकमेकांत एकमेकांची कोणत्याच प्रकारची आवडनिवड न करिता या सर्व स्त्री-पुरुषांनी, या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने एकमेकांशी सत्यवर्तन करून आपण सर्वांच्या निर्मिकास संतोष देऊन आपण त्याची आवडती लेकरे होतात; त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत; परंतु या सदरच्या नियमास अनुसरून एकंदर सर्व स्त्री-पुरुषांनी जर सत्य आचरण केले असते तर एकंदर सर्व जगातील देवबापा परशुरामादि शिपायांस; पोलिसास, न्यायाधीशास व तुरुंगातील शिपायास अजिबाद फांटा द्यावा लागला नसता.

गणपतराव. प्र. – तर मग एकंदर सर्व जगातील स्त्रीपुरुष मानवांनी कोणत्या धर्माचा स्वीकार करावा, याविषयी आपण निकाल कराल, तर बरे होईल.

जोतीराव. उ.- अहो बाबा, या भूमंडळावर महासत्पुरुषांनी जेवढी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत, त्या सर्वांत त्या वेळेस अनुसरून त्यांच्या समजुतीप्रमाणे काहींना काही सत्य आहे, यास्तव कोणत्याहि कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौध्द धर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तीने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्यांच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिनं महमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्या पुत्राने सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे; आणि या सर्व मातापित्यासह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत असतां प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून व्देष करू नये आणि त्या सर्वांनी आपण सर्व निर्माणकर्त्याने निर्माण केलेली लेकरे असून त्याच्याच (निर्मिकाच्या) कुटुंबातील आहोत, असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकाशी वर्तन करावे, म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यांत धन्य होतील.

२.     शाहू महाराज आणि बहुधर्मीय नातेसंबंध  

छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाज आणि आर्य समाज दोघांना पाठींबा दिला. तसेच, आर्थिक बळही पुरवले. मात्र, समाज म्हणून छ. शाहू महाराजांनी आर्य समाजाचा पुरस्कार केला होता. त्यासंबंधी जयसिंगराव पवार यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ज्या आर्य समाजाचा पुरस्कार शाहू महाराजांनी केला होता, त्या आर्य समाजाच्या कार्याची वाखाणणी करीत असता त्यांनी म्हटले आहे की, तो हिंदुस्थानांतील सर्व जातीपातींना, सर्व पंथीयांना एवढेच नव्हे तर जे आर्यवंशीय नाहीत त्यांनाही, समतेच्या तत्वाने सामावून घेतो आणि आर्यांचे सर्व अधिकार रोटीबेटी व्यवहारांसह त्यांना बहाल करतो. तथापि आर्य समाजाने एवढ्यावरच न थांबता आपली दृष्टी विश्वव्यापी बनवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती...आर्यधर्म संग्राहक आहे. याच्या योगाने भिन्न भिन्न जातींचा, पंथांचा व धर्मांचा एकोपा होण्यास मदत होणार आहे. तसेच, युरोपात, अमेरिकेत व जपानात समानतेचे तत्व प्रचारात असल्याने, एकाच कुटुंबात भाऊ- भाऊ, नवराबायको वगैरे भिन्न भिन्न धर्माचे आढळतात. तसाच प्रकार नवरा आर्य समाजी तर बायको इतर धर्माची किंवा बायको आर्य समाजी तर नवरा इतर पंथाचा असेही एका कुटुंबात सापडणे अशक्य नाही. कुटुंबातील भाऊ भाऊ निराळ्या पंथाचे किंवा धर्माचे राहतील. प्रत्येकास आचार व विचार स्वातंत्र्य पाहिजे  असेही महाराजांनी म्हटले आहे.

३.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंतरधर्मीयविवाह

                १९२७ मध्ये मालिनीबाई पाणंदीकर आणि गुलाब खान यांनी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यावेळी, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात या लग्नाच्या विरोधात सनातनी आणि हिंदुत्ववादी मंडळीनी विरोध दर्शविला होता. वृत्तपत्रांमध्ये चर्चा झाल्या. निषेधाच्या सभा आयोजित केल्या गेल्या होत्या. अशावेळी काही मोजक्या लोकांनी या लग्नाला जाहीर पाठींबा दिला होता. तसेच, त्याच्या समर्थनात जाहीर वृत्तपत्रीय लेख लिहिले होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ‘हिंदू मुसलमानांच्या ऐक्याचा उपाय (१ जुलै १९२७, बहिष्कृत भारत) या लेखामध्ये डॉ. आंबेडकर लिहितात की, “हिंदू व मुसलमान यांच्यातील नात्यागोत्यास कोणी कसल्याही नावाने संबोधिले तरी तो सबंध एक प्रकारचा जातिभेदच आहे असे आमचे मत आहे. रोटीबंद, बेटीबंद ही जातीभेदाची मुख्य लक्षणे आहेत...ब्राह्मण मराठा हा जर जातीभेद आहे तर हिंदू व मुसलमान हा देखील जातीभेद आहे असेच मानिले पाहिजे. हा मुद्दा एकादा मान्य झाला म्हणजे हिंदू मुसलमानांची तेढ मिटवण्यास कोणता उपाय योजावा याविषयी पंचाईत पडणार नाही. कारण हिंदुतील जातीभेद मोडण्यास जो उपाय सांगितला जातो तोच उपाय हिंदू मुसलमानांतील भेद मोडण्यास अमलांत आणला पाहिजे.जातीभेद मोडण्यास जसा मिश्रविवाह होणे अवश्य आहे तसा हिंदू मुसलमानांतील जातीभेद मोडण्यास त्यांच्यातही मिश्रविवाह झालेच पाहिजे.”

           सत्यशोधक तत्वज्ञानाची, फुले, शाहू आणि आंबेडकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य धर्मांध आणि जमातवादी राजकारणामुळे खराब करण्याचे काम चालू आहे. अशा स्थिती त्यांनी सांगितलेला प्रेमाचा, प्रीतीचा आणि मैत्रीचा प्रचार आणि प्रसार करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या काळात प्रेमात पडणे किंवा कोणावर प्रेम करणे हाच गुन्हा झाला आहे. त्यात तुम्ही आंतरजातीय प्रेम करत असाल तर पाप आहे आणि आंतरधर्मीय लग्न करत असाल तर महापाप ठरवले जात आहे. ते थांबविण्यासाठी कायदे करण्याची भाषा वापरली जात आहे. काही ठिकाणी तर असे कायदेही केले गेले आहेत. पुन्हा एकदा लोकांना पुन्हा जातीधर्माच्या बंधनात कायद्याच्या माध्यमातून जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्त्रियांच्या दृष्टीने तर ही बाब अत्यंत घातक आहे.  या सगळ्या गोष्टी सत्यशोधक विचारांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत. म्हणूनच, फुले-शाहू-आंबेडकरांच्या वारसा सांगणाऱ्या मंडळींनी जाहीरपणे आंतरधर्मीय प्रेमाला, विवाहाला जाहीर पाठींबा दिला पाहिजे. प्रीती आणि मैत्री मेळाव्यांचे आयोजन केले पाहिजे. तसेच, प्रेमाचा उत्सव साजरा केला पाहिजे. तरच आपण सार्वजनिक आणि राजकीय पातळीवर लव जिहादच्या नावाने जे धार्मिक धृवीकरण आणि जमातवादी राजकारण खेळले जात आहे. त्याला प्रतिक्रिया आणि पर्याय असे दोन्ही देवू शकू. सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये सामाजिक जीवनात उतरवू शकू आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सत्यशोधक विचार, तत्वज्ञान आणि वारसा हा महाराष्ट्राच्या भूमीत टिकवून ठेवू.   

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...