गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

मलेशियन चित्रपटातील ब्रिटिश वसाहतवाद, भारतीय शिख सैनिक, चिनी लोक आणि इस्लामी राजकारण!

परवा, २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ' मत किलाऊ ' हा मलेशियन चित्रपट पाहिला. इंग्रजी चित्रपट पाहतांना आपण बऱ्याचवेळा अमेरिकन चित्रपटच प्रामुख्याने पाहतो. अमेरिकन चित्रपटातून पसरलेले सांस्कृतिक आणि राजकीय पूर्वग्रहांचे आणि प्रपोगंडाचेही बऱ्याचवेळा बळी ठरतो. म्हणूनच, वेगवेगळ्या देशांतील सिनेमे पाहिले की, वेगळी सांस्कृतिक, राजकीय सृष्टीही दिसते. म्हणूनच, मलेशियन सिनेमा पाहण्याचे ठरवले. चित्रपट पाहिल्यावर चित्रपट पाहून बरीच वेगळी बाजू आणि इतर गोष्टीही कळल्या. 

भारतावर ब्रिटिशांची जशी राजवट होती. तशीच जगातील वेगवेगळ्या खंडातही त्यांची राजवट होती. त्याचा खर तर आपण तुलनात्मक अभ्यासही केला पाहिजे. काय वेगळेपण होते आणि काय साम्य होते हेही तपासून पाहिले पाहिजे. तसेच, ब्रिटिश वसाहतवादांतर्गत या देशांमधील लोकांमध्ये काही संपर्क होता हेही पाहिले पाहिजे. चित्रपटाच्या सुरुवातीला एका शेतातील काही लोकांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिख सैनिकांची तुकडी मारून टाकते आणि त्यांना मदत ब्रिटिशांकडून आर्थिक मदत मिळवणारे चिनी लोक करतात. इथे आपणास, ब्रिटिश अधिकारी, भारतीय शिख सैनिक आणि चिनी मंडळी हे मलेशियन लोकांचे शोषण करत असतात. भारतीय शिख सैनिक हे ब्रिटिश लष्कराचे भाग असल्यामुळे ते आपले कर्तव्य बजावत असतात तर चिनी मंडळी आपल्याला ब्रिटिशांकडून आर्थिक लाभ मिळतो म्हणून मलेशियन लोकांना मारत असतात. 

चित्रपटात मलेशियन लोकांची संस्कृती, धर्म, वांशिकता ही कशी मागासलेली आहे हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तोंडातून वारंवार दिसते. असेच चित्रण ब्रिटिशांनी भारतीय आणि चिनी लोकांचेही केले होते. या चित्रपटात मात्र भारतीय आणि चिनी लोक हे ब्रिटिश वसाहतवादाचे वाहक दाखवले गेले आहेत. चित्रपटात भारतीय शिख सैनिकांच्या तोंडी पंजाबी आणि हिंदी संवाद आहेत. तर मलेशियन लोक आपल्याच भाषेत एकमेकांशी संवाद साधतात. चिनी लोक आणि मलेशियन हे एकमेकांशी भाषा समजत असावेत असे चित्रपट पाहताना वाटते. 

मलेशियन राष्ट्रवाद हा एकीकडे मलया राष्ट्र आणि दुसरीकडे इस्लाम यांच्या एकत्रीत संयोगातून निर्माण झालेला ( चित्रपटात) तरी दिसतो. राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी आपल्याला लढायचे आहे असे चित्रपटात मलेशियन लोक वारंवार म्हणतांना दिसतात. तसेच, आपल्यातील बेकीमुळे ब्रिटिश लोक आपल्यावर राज्य करत होते असे भारतात जसे म्हटले जाते तसेच चित्रपटातील मलेशियन मंडळी म्हणतात. 

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गैर - मुस्लीम लोकांचे साचेबद्ध चित्रण केले आहे असे भारतीय आणि चिनी मंडळींनी म्हटले होते. तसेच, मलेशियन राष्ट्रवादाला धार्मिकतेत पूर्णपणे सामावून टाकले आहे असेही म्हटले गेले. तसेच, इस्लामचा प्रचार करण्यासाठी सदरील चित्रपट बनवला गेला आहे असेही म्हटले गेले होते. अलीकडच्या काळात अनेक पूर्वीच्या वसाहतिक देशांमध्ये इतिहासावर चित्रपट काढले जात आहे. ते गल्लाभरू व्यवसायही करतात आणि सोबतच इतिहासाची काहीशी मोडतोडही करतात. हे जसे भारतात होत आहे तसेच जगभरात होत आहे म्हणूनच चित्रपट गंभीरपणे पाहून त्यावर इतिहासाच्या दृष्टीने चिकीत्सक भाष्यही केली पाहिजेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दख्खनचे दंगे आणि सहकार चळवळीची निर्मितीची पार्श्वभूमी

         “ इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाष करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर...