बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

स्वातंत्र्याविषयी काही मुद्दे


     आपल्या आजूबाजूला अनेकवेळा ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!’ असे म्हटले जाते. यातून एक गोष्ट स्पष्टपणे बिंबवली जाते की, स्वातंत्र्य म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि स्वैराचार म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे. परंतु, कोणीही स्वैराचार म्हणजे नेमकं आणि नक्की काय हे मात्र स्पष्ट करत नाही. अलीकडच्या काळात अनेकजण असेही म्हणतांना दिसतात की, सरकारला विरोध म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराने वागणे, लिहिणे आणि बोलणे याचा अखंड प्रवास चालू आहे. तसेच, स्त्रियांच्या जीवनमार्गाचा ज्यावेळी प्रश्न येतो. त्यावेळीही, अनेकजण फुकटचे सल्ले देत म्हणतात की, ‘आम्ही स्वातंत्र्याला विरोध करत नसून आम्ही स्वैराचाराला विरोध करतो.’ मात्र, स्वैराचार म्हणजे काय हे मात्र स्पष्टपणे त्यांना सांगता येत नाही.

      आतापर्यंत स्वातंत्र्याची चर्चा राजकीय अर्थाने अनेकवेळा झालेली आहे. परकीय दास्यापासून मुक्तीची स्थिती म्हणजे स्वातंत्र्य. परंतु स्वातंत्र्याची राजकीय अर्थाची चर्चा संकुचित आहे. कारण, त्यातून व्यापक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानसिक, वैचारिक मुद्यांची चर्चा होत नाही. स्वातंत्र्य म्हणजे अशी स्थिती की, ज्यामध्ये व्यक्ती कोणत्याही नियंत्रण किंवा मर्यादांच्याऐवजी बोलणे, कृती आणि विचार करण्यास सक्षम असतो. असे जर असेल तर मग इंग्रजी साम्राज्यवादाची सत्ता संपुष्टात येवूनही अजूनही आपल्याकडे व्यक्ती कोणतेही नियंत्रण आणि धोक्याची काळजी न बाळगता बोलू शकतो का? त्यानुसार कृती करू शकतो का? आपल्याला पटलेले विचार मांडू शकतो का? असेही प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच, राजकीय स्वातंत्र्याला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल जेंव्हा लोकांना सामाजिक, मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्य उपभोगता येईल असे मला वाटते.

स्वातंत्र्याच्या विभिन्न आणि बहुरंगी कल्पना!

      स्वातंत्र्याची चर्चा करतांना काहींनी स्वातंत्र्य दोन प्रकारचे असते असेही म्हटले आहे. जसेकी, ‘सकारात्मक स्वातंत्र्य’ आणि ‘नकारात्मक स्वातंत्र्य. सकारात्मक स्वातंत्र्य हे कशासाठीचे म्हणजेच भविष्याला केंद्रस्थानी ठेवून मांडलेले स्वातंत्र्य असते आणि नकारात्मक स्वातंत्र्य हे कशापासूनचे म्हणजेच भूतकाळाला केंद्रस्थानी ठेवून मांडलेले स्वातंत्र्य असते. उदा. काहींना  जातीव्यवस्थेच्या किंवा धर्मव्यवस्थेच्या शोषणापासून किंवा आर्थिक लुटीपासून स्वातंत्र्य पाहिजे असू शकते. तसेच, काहींना आवडीचे कपडे घालण्याचे, लग्न न करण्याचे किंवा आवडेल त्या व्यक्तीशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे असू शकते. इथे मात्र, स्वातंत्र्य म्हणजे काय हे अधिकपणे स्पष्ट करण्याचे गरजेचे आहे. कारण विविध प्रकारची विषमता (जातीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लैंगिक) असलेल्या समाजात काहींनी स्वातंत्र्य मागणे किंवा मिळवणे हे इतरांना मान्य नसते. इतरांना ते चालीरीती, संस्कृती, संस्कार, परंपरा, कुटुंब यांच्याविरोधी वाटते. म्हणूनच, आपण असेही म्हणू शकतो की, सन्मानासाठी जातिव्यवस्थेच्या भेदभावापासून स्वातंत्र्य मिळवणे हे दलित-बहुजनांसाठी मुक्तिदायी असू शकते. मात्र हीच गोष्ट जातीयवादी मंडळींसाठी त्रासदायक आणि संतापजनक ठरू शकते. लैंगिक समानतेसाठी जातीपितृसत्तेपासून स्वातंत्र्य मिळवणे हे स्त्रियांना, पारलिंगी मंडळींना मुक्तिदायी असू शकते. मात्र हीच गोष्ट पुरुषांना, पुरुषी मंडळींसाठी संस्कृती, परंपराविरोधी वाटू शकते. म्हणूनच, प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची कल्पना वेगवेगळी आहे असे दिसते. शोषक आणि शोषित, दलित आणि सवर्ण, स्त्रिया आणि पुरुष, मालक आणि मजूर, समलिंगी आणि भिन्नलिंगी लोकांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. स्वातंत्र्याची एकच एक कल्पना असू शकत नाही. राजकीय स्वातंत्र्य जरी सगळ्यांना असले तरी सगळ्यांना सामाजिक, मानसिक, वैचारिक आणि आर्थिक स्वातंत्र्य असेलच असे नाही.

स्वातंत्र्याला एकसुरी करण्याचे प्रयत्न!

       सगळे व्यक्ती हे जन्मत: स्वतंत्र आहेत असे आपण तत्वत: मानत असलो तरी व्यवहारात ते पाळतोच असे नाही. कारण अजूनही कोणी काय खायचे? कोणी काय घालायचे? कोणी कोणासोबत लग्न करायचे आणि कोणासोबत करायचे नाही? हेही ठरवले जाते असे आपल्याला आजूबाजूला दिसते. आपल्या सोईची स्वातंत्र्याची कल्पना इतरांवर लादत इतरांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला स्वैराचार ठरवण्याचा प्रयत्नही केला जातो. कधी कधी असेही दिसते की, काही मंडळींचा मुळात स्वातंत्र्य या मूल्याच विरोध असतो परंतू संविधानामुळे त्यांना ते करता येत नाही म्हणून ते ‘स्वातंत्र्य आणि ‘स्वैराचार यामध्ये शाब्दिक खेळ करून आम्ही स्वातंत्र्याच्या विरोधी नाहीत परंतु स्वैराचाराच्या विरोधी आहोत असे म्हणतात. स्वैराचार हा समाजविरोधी आहे, संस्कृतीविरोधी आहे, परंपराविरोधी आहे, नैतिकताविरोधी आहे असे एक ना अनेक आरोप करतात. मात्र, हे सगळे आरोप करतांना हे विसरले जाते की, समाज, संस्कृती, परंपरा आणि नैतिकता ही सर्वांना समान सन्मान, समान न्याय देतच नाही. त्यामुळेच काहींना समाज, संस्कृती, परंपरा, नैतिकता विरोधी जाऊन स्वातंत्र्य मिळवणे आणि उपभोगणे इतरांना स्वैराचारी वाटू शकते. कारण, स्वैराचार कशाला म्हणायचे आणि कशाला नाही म्हणायचे हे खूपच व्यक्तीगत बाब आहे. प्रत्येकाची व्यक्तीगत बाब ही वेगवेगळी असू शकते. कारण प्रत्येकाचे सामाजिक, लैंगिक, आर्थिक संदर्भ आणि स्थान वेगवेगळे असते. एक मात्र अगदी खरे आहे की, विशिष्टांच्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य म्हणून इतरांच्या स्वातंत्र्याला ‘स्वैराचार ठरवत स्वातंत्र्याला एकसुरी करण्याचा प्रयत्न नेहमीच सत्ताधारी, अभिजन, शासक आणि हितसंबंधी गटांकडून होत असतो.

आर्थिक स्वातंत्र्यापासून ते मानसिक स्वातंत्र्यापर्यंत

      स्त्रीवादी चळवळीने स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय अनेक प्रकारचे निर्णय स्त्रियांना घेता येत नाहीत म्हणून स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या असे आग्रहीपणे म्हटले आहे. कारण, दीर्घकाळापासून कुटुंबातील श्रमविभाजनात स्त्रियांच्या घरगुती कामाला कोणताही अर्थ आणि मोबदला नव्हता. त्या तुलनेत पुरुषांच्या बाहेरच्या कामाला अर्थ होता. मोबदला मिळत होता आणि सन्मानही होता. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होवू लागल्यापासून स्त्रियांनी अनेक क्षेत्रांमध्ये भरारी घेतली. सार्वजनिक अवकाश पादाक्रांत केले. स्वतः कमावलेल्या पैश्यांच्या बळावर हवे तसे निर्णय घेवू लागल्या. हवे ते करूही लागल्या. परंतु, अजूनही स्त्रियांना पितृसत्तेपासून पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवता आलेले नाही. अलीकडच्या काळात तर अनेक सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या स्त्रिया आणि मुली कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक हिंसाचाराला बळी गेलेल्या दिसतात. म्हणूनच, आर्थिक स्वातंत्र्याने मोकळीक मिळवून दिली हे मान्य करत असतांनाही स्त्रिया अजूनही संपूर्ण लिंगभेद आणि स्त्रीपुरुष विषमतेवर आधारित पितृसत्ताकव्यवस्था नाकारू का शकल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो.

      याठिकाणी राहुल सांकृत्यायन आणि दादा धर्माधिकारी यांनी केलेल्या मांडणीचा उपयोग होतो. दोघांनीही मानसिक क्रांती केल्याशिवाय स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य मिळवता येणार नाही असे म्हटले आहे. त्यासाठी नुसते आर्थिक स्वातंत्र्य पुरेसे नाही तर बौद्धिक आणि वैचारिक स्वातंत्र्यही पाहिजे. तेव्हाच मानसिक क्रांती करता येवू शकते. दादा धर्माधिकारी यांनी लिहिले आहे की, ‘स्त्री ही जशी नैसर्गिक आहे. तसेच ती संस्कारितही आहे.’ निसर्गाने जशी तीला बनविली आहे तशीच ती सामाजिक, धार्मिक, लैंगिक संस्कारांनी ही ती घडवलेली आहे असेही दिसते. त्यामुळेच  संस्कृती, धर्म, परंपरा, लैंगिकता यांच्या संस्कारांचे ओझे जोपर्यंत ती फेकून देत नाही तोपर्यंत तीला स्वातंत्र्य उपभोगता येवू शकत नाही. तिच्या स्वातंत्र्य उपभोगाण्याला नेहमीच स्वैराचार म्हटले गेले आहे आणि अजूनही जात आहे. म्हणूनच, तीला आर्थिक स्वातंत्र्यासोबतच मानसिक स्वातंत्र्यही पाहिजे आणि जोपर्यंत आपण मानसिक गुलामगिरीच्या सगळ्या रूढी, परंपरारुपी  बेड्या एकामागून एक तोडून टाकत नाही, तोपर्यत मानसिक क्रांती होणार नाही.

बंदिस्त मनाकडून सर्जनशील मनाकडे

    मानसिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठी वैचारिक आणि ज्ञानशास्त्रीय मेहनतही घ्यावी लागते. सामाजिकीकरणामुळे, मानसिक कंडीशनिंगमुळे व्यक्तीची एक सामाजिक, राजकीय आणि लिंगभावी जडणघडण होते. वसाहतवादी राजवटीमध्ये तर पद्धतशीरपणे लोकांना राजकीयदृष्ट्या गुलाम बनविण्यासोबत मानसिकदृष्ट्याही गुलाम बनविण्यात आले होते. म्हणूनच, फ्रांत्झ फेनन याने नोंदवले आहे की, वसाहतवादाने नुसते राजकीय, आर्थिक शोषण केले नाही तर मानसशास्त्रीय आणि संज्ञानात्मक शोषणही केले. त्यामुळे संपूर्ण जगभरात वसाहतवादीमुळे ज्ञानात्मक राजकारणाचे बळी अनेकजण ठरलेले दिसत आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळवूनही अजूनही अनेकांना ज्ञानात्मक, वैचारिक आणि मानसिक स्वातंत्र्य मिळवता आलेले नाही. म्हणूनच, जगभरात मनाच्या निर्वासाहतीकरणाची प्रक्रिया जोरदार चालू आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या खंडांमधील वेगवेगळ्या देशांमध्ये अलीकडच्या काळात वसाहतवादाचे ज्ञानात्मक आणि मानसशास्त्रीय परिणाम काय झाले आहेत? याची चर्चा करत आहेत. तसेच, त्यावर मार्ग काढून बाहेर कसे पाडता येईल याचेही चिंतन केले जात आहे.

      सय्यद हुसेन अलातास या इंडोनेशियन समाजशास्त्रज्ञाने ‘बंदिस्त मन ( Captive Mind) ही संकल्पना मांडली आहे. वसाहतवादी ज्ञानरचनेमुळे आणि ज्ञानाच्या राजकारणामुळे संपूर्ण वासाहतिक समाजात बंदिस्त मन निर्माण झाले आहे. त्यामुळे आंधळेपणाने युरोपीय ज्ञान, सिद्धांत आत्मसात केले जाते. त्याच्या समोर शरणागती स्वीकारली जाते असे अलातास यांचे म्हणणे आहे. तसेच, या सगळ्या प्रकारामुळेच ‘वैचारिक आणि अकादमिक साम्राज्यवाद’ही  निर्माण झालेला आहे असेही त्यांनी नोंदवलेले आहे. तुमचे मन बंदिस्त असेल तर ते कोणतेही मानसिक क्रांती करू शकत नाही. त्यामुळे वैचारिक आणि अकादमिक स्वातंत्र्यही मिळू शकत नाही. म्हणूनच सर्जनशील मनाची (Creative Mind) कल्पना त्यांनी मांडली आहे. मानसिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला पाहिल्यांदा मानसिक गुलामगिरी नाकारावी लागेल. ती नष्ट करावी लागेल. तरच आ. ह. साळुंखे म्हणतात तसे ‘आपल्या धडावर आपलेच डोके’ राहील. अन्यथा, आपल्या धडावर डोके जरी आपले असले तरी त्याचे नियंत्रण बाहेरून केले जाईल. अशा स्थिती कोणत्याही प्रकारचे मानसिक स्वातंत्र्य प्राप्त करता येवू शकत नाही.

स्वातंत्र्याचे भय आणि स्वातंत्र्याची उर्मी

      दीर्घकाळापासून आणि वेगवेगळ्या कारणामुळे माणसाला स्वातंत्र्य नाकारले गेलेले आहे. म्हणूनच, काहीवेळा लोकांना पारतंत्र्यात किंवा गुलामीत रहायची सवयही बनून जाते. त्यामुळे एका चौकटीच्या बाहेरचा विचार, वर्तन आणि व्यवहारही केला जात नाही. तसेच, विषम समाजात राहत असल्यामुळे स्वातंत्र्य उपभोगण्याची इच्छाही अनेकांना होत नाही. कारण इरिक फ्रॉम म्हणतो तसे त्यांना स्वातंत्र्याचे भय असते. पण सोबतच हेही तेवढेच खरे आहे की, व्यक्ती सातत्याने आणि वेगवेगळ्या मार्गांनी स्वातंत्र्यासाठी झगडतही असतो. व्यक्ती म्हणूनही आपल्याला मनासारख्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत असेही वाटत असते पण त्यासोबतच त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्तीही नसते. अशावेळी, व्यक्तीची स्वातंत्र्याचे भय आणि स्वातंत्र्याची उर्मी या दोन्ही गोष्टींमध्ये कोंडी होते. काहीवेळा लोक सामाजिक आणि राजकीय दडपण, दबाव आणि प्रभावामुळे आपले व्यक्तीगत स्वातंत्र्य हरवून बसतात. काहीवेळा धर्म, संस्कृती आणि हुकुमशाहीच्या प्रभावाखाली येवून स्वातंत्र्य बहालही करून टाकतात. कारण, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी किमंत चुकवावी लागते आणि ती किमंत कोणत्याही स्वरुपाची असू शकते. म्हणूनच, मला नेहमी वाटते की, स्वातंत्र्य हे फुकटच मिळत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कष्ट करावे लागतात. वेळप्रसंगी एकटेपणा स्वीकारावा लागतो. शेवटी, स्वातंत्र्य जर उपभोगायचे असेल तर किमंत चुकावीच लागेल आणि त्याची तयारी मानसिक स्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्य असल्याशिवाय करतात येत नाही. म्हणूनच, चर्चा, संवाद, वादविवाद, मतभेद यांना स्वातंत्र्याच्या चर्चेमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे.


पूर्वप्रसिद्धी - परिवर्तनाचा वाटसरू, १६ - ३१ ऑगस्ट २०२३ 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दख्खनचे दंगे आणि सहकार चळवळीची निर्मितीची पार्श्वभूमी

         “ इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाष करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर...