महर्षी वि.रा.शिंदेची इतिहासमीमांसा
देवकुमार अहिरे
प्रस्तावना:
भारतामध्ये खऱ्या अर्थाने इतिहासलेखनाला
प्रारंभ वसाहतीक कालखंडात झाला.वसाहतवादी कालखंड हा
भारतीय समाज, संस्कृती, धर्म, इतिहास यांच्यावर मूलगामी परिणाम करणारा होता. आपल्या सत्तेला बळकटी यावी म्हणून वसाहतीक प्रकल्पानुसार वसाहतीक ज्ञानाची
निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये सर्वप्रथम 'फोडा आणि राज्य करा' या तत्वाचा अवलंब करून वसाहतीक इतिहासकारांनी
भारतासंबंधित इतिहास लेखन केले. या लेखनामध्ये 'युरोपियन
श्रेष्ठत्व' आणि 'रानटी भारत' अशा संदर्भाची मांडणी करण्यात आली. रानटी भारतीयांना सुसंस्कृत करण्यासाठी वसाहतीक सत्ता इथे आली आहे. अशाप्रकारचे वसाहतीक ज्ञान युरोपियन अभ्यासकांनी निर्माण केले. वसाहतीक ज्ञानाला आणि वसाहतवादाला विरोध म्हणून भारतात राष्ट्रवादाचा उदय
झाला. वसाहतवाद विरोधी आंदोलनात आणि वसाहतीक
ज्ञानाच्या विरोधात राष्ट्रवादी प्रेरणा घेवून राष्ट्रवादी ज्ञानाची-संस्कृतीची मांडणी करण्याचा प्रयत्न झाला. इतिहास, धर्म, संस्कृती, समाज, भाषा या सर्वांची राष्ट्रवादी विचारांनी
पुनर्मांडणी करण्यात आली. या प्रकारच्या राष्ट्रवादी मांडणीमध्ये
'ब्राह्मणी सुधारक राष्ट्रवादी प्रवाह', 'ब्राह्मणी सनातनी
राष्ट्रवादी प्रवाह' आणि 'ब्राह्मणी संशोधक राष्ट्रवादी प्रवाह' यासारख्या तीन
प्रवाहांचा समावेश होता. वसाहतवादी प्रवाह आणि येथील राष्ट्रवादी प्रवाह
या दोहोंना विरोध करत येथे एक क्रांतिकारी सुधारणावादी प्रवाह निर्माण झाला. या प्रवाहाने वसाहतवादी ज्ञानाला आणि राष्ट्रवादी विवेचनाला छेद देत पर्यायी
ज्ञाननिर्मिती केली. वरील तीन प्रकारच्या प्रवाहांच्या क्रिया-प्रतिक्रिया, संघर्ष-संवाद घडून भारताच्या इतिहास
संदर्भात सैद्धांतिक मांडणी करण्याचा प्रयत्न झाला. ही सर्व पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय महर्षी वि.रा.शिंदे यांची इतिहासदृष्टी समजून घेता येवू शकत
नाही.
वि.रा.शिंदेचा अल्पपरिचय:
महर्षी शिंदेंचा जन्म वारकरी (मराठा) कुटुंबात १८७३ साली झाला. कुटुंबाची वारकरी पार्श्वभूमी असल्यामुळे वि.रा.शिंदेचा आध्यात्मिक आणि धार्मिकतेकडे काळ होता. प्रार्थना समाजाचे आणि नंतर ब्राह्मो समाजाचे सभासद म्हणून त्यांनी कार्यास
प्रारंभ केला. ब्राह्मो समाजाने वि.रा.शिंदेना तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास
करण्यासाठी इंग्लंडला पाठविले. इंग्लंडवरून परतल्यावर
त्यांनी ब्राह्मो समाजाचे प्रचारक म्हणून कार्य केले. बहुजन जातीत जन्मले असल्यामुळे शिंदेंना महात्मा फुल्यांच्या कर्तुत्वाची आणि
कार्याची जाण होती. त्यामुळे ते सत्यशोधक समाजाचे सभासद नसतांनाही
खऱ्या अर्थाने 'सत्यशोधक सत्यधर्मी' होते असे रा.ना.चव्हाण म्हणतात. मराठा जातीत आणि वारकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे, प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाजाचे प्रचारक आणि सत्यशोधक समाजाची
स्त्रीशूद्रातिशूद्रांची कण्व असल्यामुळे, तौलनिक धर्मशास्त्राचा
अभ्यास आणि भाषांचा अभ्यास असल्यामुळे, सातत्याने अस्पृश्यता
निवारण्याच्या कार्यात आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्यामुळे महर्षी शिंदेचे
इतिहासविषयक दृष्टी कधीही एकांगी धर्म, जातद्वेषी व समर्थक न
बनता खऱ्याअर्थाने सकलजनवादी (सर्वजणवादी किंवा
समन्वयवादी नव्हे) व तटस्थ बनते.
वि.रा.शिंदेंची इतिहासमीमांसा :
महर्षी
शिंदेंची इतिहासविषयक मीमांसा समजून घेण्यासाठी प्रथम त्यांची इतिहासदृष्टी कशी
विकसित झाली हे पाहणे महत्वाचे ठरते. महर्षींची इतिहासदृष्टी
ही आंतरविद्याशाखीय असल्याचे आपणास त्यांनी संशोधनामध्ये वापरलेल्या साधनांवरून
स्पष्ट होते. तौलनिक धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, मिथक आणि चालीरीती या सर्वांचा शिंदेंनी त्यांच्या इतिहासविषयक मांडणीत उपयोग
केला आहे.
भारतीय
अस्पृश्यतेचा प्रश्न, बहिष्कृत भारत, भागवत धर्माचा इतिहास, पश्चिम हिंदुस्थानातील
मुरळी, हिंदू देवदेवळातील अनितीमुलक व बीभत्स प्रकार, कान्नडी मराठी भाषा आणि इतर वर्तमानपत्रातील लेख व त्यांच्या काही प्रतिक्रिया
पाहिल्यावर आपणास त्यांच्या आंतरविद्याशाखीय दृष्टीचे व इतिहासविषयक केलेल्या तटस्थपूर्ण संशोधनाचे
महत्व कळते. विविध ज्ञानशाखांच्या आधारे त्यांनी
इतिहासमीमांसा कशी केली हे पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेवूयात.
तौलनिक धर्मशास्त्राच्या साह्याने इतिहाससंशोधन:
भागवतधर्माचा इतिहास लिहित असतांना महर्षी
शिंदे यांनी भारतीय इतिहासासंदर्भात मूलगामी मांडणी केली आहे. ते म्हणतात कि, “भारताच्या कोणत्याही इतिहासाची सुरुवात
वेदकाळापासून करावी लागते. पण याचे कारण वेद हे
सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत व भारतीय संस्कृतीचा उगम वेदांपासून झाला हे नसून
आपणाजवळ वेदांव्यतीरिक्त इतर प्राचीन पुरावे उपलब्ध नाहीत हे आहे. कारण भारतीय संस्कृती वेदांपेक्षा जास्त प्राचीन आहे. तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे महर्षी शिंदे हे सर्व धर्मांचे महत्व
जाणून होते. त्यामुळे त्यांच्या इतिहासविषयक लेखनांमध्ये एकांगीपणा दिसून येत
नाही. वि.का. राजवाडे हे त्याकाळातील महत्तम इतिहास संशोधक होते. परंतू त्यांच्या लेखी बौध्द आणि जैन धर्म हे पाखंडी आणि या धर्मांच्या भाषा
आणि साहित्य हे हलक्या दर्जाचे होते. यातून राजवाडेंचा स्वधर्म
समर्थन आणि परधर्मद्वेष दिसून येतो. तौलनिक धर्मशास्त्राचे
अभ्यासक असल्यामुळे शिंदे बौद्ध आणि जैन धर्मांकडे व्यापक दृष्टीने पाहतात. जैन-बौद्धांचा धर्म आणि संस्कृती ब्राह्मणांइतकी
जुनी आणि महत्वपूर्ण आहे असे दाखवून देतात. व्यवहारात धर्माच्या
नावाने जितक्या चुका झाल्या आहेत व होत आहेत. इतक्या कशाने झाल्या नसतील अशी मांडणी करत असतांना महर्षी शिंदे म्हणतात कि, “ खरे पाहू जाता धर्म एकाच आहे आणि हिंदू,
मुसलमानी, ख्रिस्ती इत्यादी केवळ त्यांचे पंथ होत असे
असता हे सर्व पंथ निरनिराळे धर्म मनात
आल्यामुळे परस्परातील तेढ अत्यंत त्रीव झाली आहेत. मनुष्यप्राण्याला स्वभावसिद्ध असलेली धर्मप्रवृत्ती या सर्वच पंथात
निरनिराळ्या रूपाने व कमीअधिक शुद्धस्थितीत प्रकट होत आहे.” अशाप्रकारचे तौलनिक आकलन महर्षींचे असल्यामुळे
त्यांचे धार्मिक इतिहासासंदर्भातील संशोधन तटस्थ ठरते.
उत्पत्तीशास्त्र आणि भाषाशास्त्राच्या साह्याने
इतिहाससंशोधन:
महर्षी शिंदे भाषाशास्त्रज्ञ
असल्यामुळे त्यांच्या इतिहास संशोधनात भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषत: मराठी
आणि कान्नडी या भाषेंचा अभ्यास करतांना त्यांनी तौलनिक भाषाशास्त्राचा
उपयोग केला आहे. शब्दकोश, व्याकरण, वाक्यव्यवस्था,लकबा आणि वांग्मयवृद्धी इत्यादी भाषेच्या निरनिराळ्या
अंगाच्या दृष्टीने मराठी आणि कान्नडी या दोन भाषांमध्ये किती व कसे साम्य आहे. ह्या संबंधीची मांडणी ‘कान्नडी मराठी’ या निबंधात त्यांनी केली. मराठ्यांच्या पूर्वइतिहाससंदर्भात वि.रा.शिंदेंनी भाषाशास्त्राचा वापर करून मांडणी
केल्याचे दिसून येते.
अस्पृश्यतेचा
इतिहास आणि मराठ्यांचा इतिहासासंबंधी मांडणी करत असतांना उत्पात्तीशास्त्राचा आधार
घेवून महर्षींनी मांडणी केली आहे. उदा. मलबारात मलईगिरीवर पुलया(पुलकस) नावाच्या अस्पृश्य वर्गीयांचे काही जुने किल्ले आढळले. त्यांच्या देवांना ‘चाटण’ म्हणजे ‘शास्ता’ ह्या बौद्धनावाचा प्रचार काही ठिकाणी आढळला. ‘चाटण’ हा शब्द ‘शास्ता’ या संस्कृत शब्दाचे अपभ्रंश रूप आहे. तसेच महाराष्ट्रातील महार मराठे हे एकाच होय. या निष्कर्षापर्यंत महर्षी शिंदे येवून पोहचतात. कारण मराठ्यांची अस्सल ९६ कुळांची नावे ही महार जातीत आढळून येतात. महारांची भाषा पाहिली असता त्यांचे उच्चार, स्वर व एकंदर बोलण्याची ढब महाराष्ट्रातील कुणब्यांसारखीच दिसून येते.
मराठी
भाषेचा भाषाशास्त्रानुसार विचार करतांना शिंदे म्हणतात कि, “खरी मराठी भाषा ज्ञानेश्वरापासून
तुकारामपर्यंतच होती. ती प्रथम मोरोपंतानी बिघडवली. बिघडता बिघडता लोकहितवादी व जोतीबा फुले यांच्यापर्यंत ती कशीबशी जीवधरून होती
पण चिपळूणकरांनी आणि आगरकरांनी तिचा गळाच घोटला. टिळकांनी आणि हरिभाऊ आपट्यांनी तिच्या तोंडात शेवटचे दोन पाण्याचे घोट सोडले. आजकाल चिपळूणकरांचा इंग्रजी, संस्कृत कित्ताच आम्ही सर्वजण
आधाशासारखे गिरवीत आहोत. आमचे शब्द जरी मराठी असले तरी विचार इंग्रजी
किंवा संस्कृत असल्यामुळे आमची एकंदर वाक्यरचना व संप्रदाय केवळ परकीय व अबलबोध
असतात.
चालीरीती आणि मिथकांच्या साह्याने इतिहाससंशोधन:
आंतरविद्याशाखीय
वैचारिक बैठक असल्यामुळे प्रत्यक्षार्थवाद आणि उपयुक्ततावाद यांच्या मर्यादांची
जाण असल्यामुळे आणि कृतीशील कार्यकर्ता असल्यामुळे महर्षी शिंदे चालीरीती आणि
मिथकांचा इतिहास समजून घेण्यासाठी कसा उपयोग करावा हे चांगलेच ठाऊक होते. महर्षी शिंदे म्हणतात कि, “लेखीपुराव्याशिवाय कोणत्या
गोष्टीला आम्ही सत्य म्हणणार नाही असा येथे आग्रह धरून चालायचे नाही. लेखीपुरावा म्हणजेच केवक बिनतोड पुरावा व इतर अनुमाने म्हणजे टाकाऊ असे कोणी
सुज्ञ म्हणणार नाही. इतकेच नव्हे तर, एखाद्या गोष्टीविषयी स्पष्ट लेख मिळाला म्हणून त्या गोष्टीविषयी प्रत्यक्ष पुरावा
मिळाला असेही म्हणता येणार नाही. नुसत्या पोशाखावरून सभ्य
गृहस्थाला ओळखता येत नाही. तसेच नुसत्या लेखावरून
त्यातील गर्भित विषय सत्य आहे असेही म्हणता येत नाही.” अशा प्रकारची मांडणी करून महर्षी शिंदे
भारतातील आधुनिक मौखिक इतिहासाचे जनक ठरतात.
पश्चिम
हिंदुस्थानातील हिंदू देवळातील अनितीमुलक आणि बीभत्स (मुरळी) प्रकार आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न व
अस्पृश्तेचा इतिहास अशाप्रकारच्या निबंधातून चालीरीती व मिथकांच्या साह्याने सामाजिक इतिहासाची मांडणी केलेली
दिसून येते.
मानववंशशास्त्र व समाजशास्त्र साह्याने
इतिहाससंशोधन:
महर्षींनी आपल्या संशोधनात धर्मशास्त्र, प्राचीन वास्तुकला, तुलनात्मक भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र इतकेच नव्हे तर
भूगर्भाशास्त्राचा ही उपयोग त्यांनी केला आहे. परंतू या अंतरशाखेय विद्येचा पाया
समाजशास्त्र आहे. पाश्च्यात्य आणि पौर्वात्य पुर्वसुरीप्रमाणे व
समकालीनप्रमाणे शिंद्यांच समाजशास्त्र हे वेगळे होते. शिंद्यांच्या समाजशास्त्रीय विचारांना ऐतिहासिकतेची बैठक होती. त्यामुळे तत्कालीन संरचानावादी व सक्रायवादी समाजशास्त्र आणि
आर्याप्रधान्यवादी व हिंदुकेंद्री समाजशास्त्रातील विचारवंतांना ते अनाकलनीय होते. शिंदे विशेषत: समाजशास्त्राच्या अंगाने स्पष्टीकरण करत
असल्याने देवके, दैवते, सोयरसुतक, स्मशानविधी, पाचवी, सट, बारशे तत्संबंधी पुरातन चालीरीती इत्यादी सामाजशास्त्राने महत्वाच्या
मानलेल्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून अस्पृश्यतेचा माग काढतात. अशाप्रकारे समाजशास्त्राच्या साह्याने इतिहास संशोधन करतात.
आर्यसंदर्भात मुद्दा घेवून अनेकांनी इतिहासलेखन केले आहे. बहुतांश अभ्यासकांनी हिंदुधर्मशास्त्र आणि इतिहास यांचा वापर करून मांडणी केली
आहे. आर्यांविषयी मांडणी करतांना महर्षी
शिंद्यांचा भर मानववंशशास्त्रावर आहे. ते म्हणतात की, "रक्ताने आर्य कुणास
म्हणता येईल हे ठरविणे ज्यांना हल्लीचे मानववंशशास्त्र माहित नाही त्यांना सोपे
जाईल. तसेच मानववंशविषयी सिद्धांत ठोकून देणे. दिवसेंदिवस इतके कठीण होत चालले असताही आमच्या देशातील विशेषता महाराष्ट्रातील
काही इतिहास संशोधक कित्येक जातीच्या उगमाविषयक बिनधोक सिद्धांत प्रसिद्ध करत आहेत." शिंदे यांच्यामते, ‘अमुक एक वंश अमुक एका वंशापेक्षा श्रेष्ठ असे
विधानच अशक्य मानीत असल्यामुळे मराठे आर्य नसले तरी त्यामुळे काही बिघडत नाही असे
समजत होते’. आर्यवंश भारतातील अनेक मानववंशांपैकी एक आहे
त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये इतर वंशाच्या योगदानाकडे आपल्याला
दुर्लक्ष करता येणार नाही. अशाप्रकारची
मानववंशशास्त्रीय भूमिका महर्षींनी आपल्या लेखनात सातत्याने मांडली. वरीलप्रकारच्या विविध ज्ञानशाखांच्या साह्याने वि.रा. शिंदे यांचे इतिहासविषयक आकलन सम्यक आणि
समग्रपणे विकसित झाले होते त्यातूनच त्यांनी संशोधकाचा तटस्थयोग मांडला.
महर्षींचा संशोधन तटस्थयोग:
‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथाच्या साठपानी प्रस्तावनेत इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेवर
आक्षेप घेत ‘विजयी मराठा’ या पत्रामध्ये शिंदेनी आपल्या ताटस्थयोगाची मांडणी केली. ते म्हणतात कि, "इतिहासकार किंवा संशोधक याने आपल्या स्वतःच्या
लाडक्या भावना, पक्षपात, धर्मसमजुती, सामाजिक अथवा वैयक्तिक लकबी यांच्यापासून स्वतास निदान इतिहास हा विषय हाती
असेपर्यंत तरी अलग ठेवावे. ज्यांना हा ताटस्थयोग
साधत नाही. त्यांनी इतिहासाचा नाद सोडवा नाहीतर नदीच्या
उगमातच विष कालविण्याच्या पातकाचे धनी त्यांना व्हावे लागेल. संशोधनामधील ताटस्थयोग असे म्हणता तो, अभ्यासकाच्या मनोवृतीचा
भाग असतो. खरे तर त्याला याशिवाय हरकत नाही. अर्थात अचूक संशोधनासाठी नितीमत्ता आवश्यक असली तरी पुरेशी ठरत नाही. संशोधकाची तात्विक भूमिका कोणती आहे आणि त्याने कोणत्या शोधपद्धतीचा अवलंब
केलेला आहे. यावरही बरेच अवलंबून असते. नदीच्या मुळाहून माणसाचे कुळ शोधणे अत्यंत कठीण आहे तरी ते सशाचे शिंग शोधण्याप्रमाणे
अशक्य आणि मूर्खपणाचे नाही. निदान त्यात घोरपाप तरी
नाही मात्र शोधकाने निर्भीड असले पाहिजे. शक आणि द्रविड कुणीतरी
हीनजात आणि आर्य व मुघल म्हणजे कोणीतरी मिर्मय उच्चजात अशा भावना ज्यांच्या मनाशी
तळाशी तळ देवून बसलेले असतात अशांना इतिहासशास्त्रात गतीच नाही."
अशाप्रकारच्या संशोधन ताटस्थयोगाची मांडणी करून वि.रा.शिंदे यांनी बर्याचवर्षापूर्वी शास्त्रीय
इतिहास संशोधनाचा पाया भारतात घालून दिला. याची दाखल प्रस्थापित
इतिहासकारांनी आणि विद्यापीठीय अभ्यासमंडळांनी घेतली नाही हे एक मोठे दुर्दैवच होय. शिंदेच्या सांप्रतकाळामध्ये इतिहास लेखनाला जातीय आशयप्राप्त झाल्यमुळे बहुजन
समाजाच्या इतिहासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. तसेच भारत इतिहास संशोधन मंडळात महर्षींनी ब्राह्मणी नीतीचा आणि पक्षपाताचा
अनुभव आला म्हणून त्यांनी वेगळा मराठा वांग्मय-इतिहास मंडळ काढले आणि बहुजन समाजाने स्वतःचा इतिहास लिहिण्यासाठी संस्थात्मक
निर्मिती करावी असे महत्वपूर्ण आशयसूत्र दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा