मंगळवार, २० जून, २०१७

राजारामशास्त्री भागवतांचे मराठा इतिहास लेखनातील योगदान



       राजारामशास्त्री भागवतांचे मराठा इतिहास लेखनातील योगदान 

                                                                                                                  
                                                                                                                      देवकुमार अहिरे 





प्रस्तावना:
           ‘No Documents, No History’ असे म्हटल्यामुळे इतिहासलेखन शास्त्रात प्रत्याक्षार्थवादी संशोधनपद्धतीचा प्रभाव वाढत गेला. काळानुसार आणि संदर्भानुसार इतिहासाची व्याप्ती वाढत गेली. त्यामुळे No Documents, No History’ असे म्हणण्याला आपोआपच मर्यादा पडू लागल्या. प्रत्याक्षार्थवादी लेखनामध्ये ‘घटीततां’ना अनन्य साधारण महत्व असते परंतू कोणतेही ‘घटीत’ स्वतःहून बोलत नाही तर त्याला इतिहासकार बोलते करत असतो किंबहुना त्याला अर्थच देत असतो म्हणून इतिहास म्हणजे दुसरे काही नसून इतिहासकारांची मानसिक प्रक्रिया आहे असेही म्हटले जाते. इथपर्यंत इतिहासाची व्याप्ती ‘वृद्धिंगत’ झाली आहे. भारतीय इतिहासलेखनामध्ये ‘मराठा इतिहासाला’ एक वेगळे आणि अनन्यसाधारण महत्व आहे. वसाहतवादी कालखंडामध्ये पहिल्यांदा शास्त्रीय इतिहास लेखनास प्रारंभ झाला. डफ सारख्यांना शिवाजीविषयी आकर्षण जरी असले तरी त्यांचे लिखाण हे व्यापक वसाहतवादी प्रकल्पाचा भाग असल्यामुळे ते मराठ्यांना न्याय्य नव्हते. त्यामुळे त्याला प्रतिक्रिया म्हणून कीर्तने, चिपळूणकर, रानडे, राजवाडे यांनी राष्ट्रवादी इतिहासलेखनला प्रारंभ केला. वसाहतवाद्यांचे आरोप खोडून काढत असतांना त्यांनी नकळत मराठ्यांचे उद्धातीकरण केले, त्यामुळे मराठ्यांची सम्यक चिकित्सा झाली नाही.
           वसाहतवादी ज्ञानाला नाकारत व राष्ट्रवादी न होता काहींनी इतिहासविषयक मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये राजारामशास्त्री भागवतांचे नाव अग्रक्रमावर आहे. मराठा इतिहासलेखन शास्त्रावर मुलभूत व गंभीर  प्रश्न उपस्थित करणारे राजा दीक्षित यांचेसुद्धा राजारामशास्त्रींकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. मुकुंदराव जयकर, शास्त्रीबुवांविषयी म्हणतात की, ‘शास्त्रीबुवानां मी हिंदी गृहस्थ मानतो कारण, जास्त कसोशीने त्यांचे वर्णन करावे हेच मला समजत नाही. चिकित्सक संशोधनात निमग्न झालेला गाढा विद्वान, मिथ्याचारांबद्द्ल तिटकारा असणारा सत्यशोधक, सर्वप्रकारच्या दलितांचा कैवारी, ज्वाजल्य सुधारक, हिंदुधर्मावर त्वेषाने प्रहर करणारा आणि इतके असूनसुद्धा दिखाऊपणा न ठेवता ईश्वरावर अचल श्रद्धा ठेवणारा नम्र सेवक, कळकळीचा मित्र आणि तेवढाच दुर्दमनीय प्रतिस्पर्धी या सर्वांचे मिश्रण म्हणजे शास्त्रीबुवा.’ डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘राजाराम शास्त्री भागवत हे आपले हितचिंतक आहेत याची अस्पृश्यांना चांगलीच जाणीव होती...त्यांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.’  परांजपे म्हणतात कि, ‘सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात शास्त्रीबुवांना आवश्यक स्थान मिळेल परंतू तसे न झाल्यामुळे शेवटी महर्षी वि. रा. शिंदे म्हणतात की, अखेर महाराष्ट्रात शास्त्रीबुवांची उपेक्षा झाली ही गोष्ट खरी.’ 
           वरील विचारवंत लोकांचे शास्त्रीबुवांविषयी विचार वाचून आणि शास्त्रीबुवांचे लेखन वाचल्यामुळे ‘राजारामशास्त्री भागवत यांचे मराठा इतिहासलेखनातील योगदान’  यावर प्रस्तुत संशोधन लेखात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
राजारामशास्त्री भागवतांचे वैचारिक लिखाण:
           महाराष्ट्रातील राजकारण, अभ्यासकारण हे गाभ्यातच जातकारण आहेत्यामुळे जातीच्या पलीकडे जावून ज्या लोकांनी वैचारिक लेखन केले आहे. त्या लोकांना महाराष्ट्राच्या जनमानसाने जाणीपूर्वक दुर्लक्षित केले आहे. जोपर्यंत आपल्या हितसंबधांना अनुकूल व पूरक असे काही सांगत आहे तोपर्यंत त्याचा व त्या सांगण्याचा उपयोग करून घ्यायचा व हा हेतू साधत नसल्याने लक्षात आले की, त्याची जात काढायची हा इथला सर्वसाधारण शिरस्ता आहे.शास्त्रीबुवांनी स्वजातीच्या चुका दाखवून आपली भूमिका मांडली व वेळप्रसंगी त्यांनी इतरांनाही इशारा देण्यास मागेपुढे पहिले नाही. भागवतांना कर्मवीर, तटस्थ विचारवंत, संस्कृत पंडित, नवजागृतीचे एक जनक, सत्यशोधक समाजाचे हितचिंतक, दीनबंधू, संस्कृत भाषेचे कैवारी, निबंधाचार्य, झुंझार लेखक, भाषाशास्त्रज्ञअशाप्रकारचे गौरवौद्गर काढून रा.ना.चव्हाणांनी शास्त्रीबुवांची दखल घेतली आहे. मराठी, हिंदी, गुजराथी, संस्कृत, प्राकृत (पाली सोडून) अरबी, अवेस्था, फारशी, लाटिन, ग्रीक, फ्रेंच, इंग्रजी या ‘विविध भाषांची’ माहिती असल्यामुळे ते प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करतांना आणि अर्थ लावतांना अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवू शकले. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात वैचारिक लेखन केले.
           राजारामशास्त्रींचे संशोधनकार्य मोठे होते . भारताचा इतिहास, वैदिक वांग्मय, धर्मश्रद्धेचा उदय याबाबत खोल असे संशोधन केलेले आहे. हिंदुधर्म विवेचन, वार्ताहर, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, नेटिव ओपिनियन, दीनबंधू, सुधारक, ज्ञानप्रकाश, विविधज्ञानविस्तार या वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने शास्त्रीबुवा लिहित होते. आज बरेचसे शास्त्रीबुवांचे साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी मांडणी करतांना त्या सर्व साधनांची कमतरता जाणवते.

राजारामशास्त्रींचे मराठा इतिहासविषयक लेखन:
          राजारामशास्त्री भागवतांचे मराठ्यांसंबंधीचे लेखन सलग आणि राजकीय घडामोडींना केंद्रस्थानी ठेवून न झाल्यामुळे दुर्लक्षित राहिल्याचे आपणास दिसून येते.  ‘विविधज्ञानविस्तार’ या मासिकामध्ये ‘मराठेशाही’ याशिर्षकाखाली त्यांनी लेखमाला लिहिलेली आहे, त्यामध्ये शिवचरित्र, संभाजी-राजाराम चरित्रे आणि इतर विषयांसंबंधी मांडणी केली होती. तसेच ‘मऱ्हाठ्यासंबंधाने चार उद्गार’ नावाचा महत्वाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून मराठा इतिहासाविषयी शास्त्रीबुवांनी आपली भुमिका स्पष्ट केल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती आणि मराठा शब्दाची व्याप्ती:
           राजारामशास्त्रीबुवा हे भाषाशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचा संस्कृत, प्राकृत, पैशाची, अर्वाचीन मराठी या भाषांची चांगली जाण असल्यामुळे भाषा ही त्यांच्या इतिहास लेखनाची एक महत्वाची साधनसामग्री होती. त्याआधारे त्यांनी ‘महाराष्ट्र’ शब्दाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. ‘महारथ’ शब्दाचा पहिल्याने ‘महारठ्ठ’ व ‘मरहठ्ठ’ असा अपभ्रंश होवून कालांतराने या अपभ्रंशाचे पुन्हा ‘महाराष्ट्र’ असे संस्कृतरूप झाले. ‘मराठा’ या शब्दाविषयीची मांडणी करतांना शास्त्रीबुवा म्हणतात की, ‘मऱ्हाठ्यामध्ये जसे ब्राह्मण, शिंपी तसेच अतिशूद्र व अविंध ही येतात’अशाप्रकारे राजारामशास्त्रींनी ‘मराठा’ शब्दाची व्याप्ती जाती-धर्मापेक्षा व्यापक स्वरुपात मांडली.

महाराष्ट्र धर्माची मांडणी:
            भागवतांना महाराष्ट्रमंडळात जन्मला आल्याचा सार्थ अभिमान होता. सन १८८३ मध्ये ‘विविधज्ञानविस्तार’ मध्ये एक मराठा या टोपणनावाने भागवतांनी लेखमाला चालविली होती. ब्राह्मणत्वचा अभिमान आम्हांस काही कमी आहे असे नाही, पण ब्राह्मणत्वापेक्षा सत्याचा आणि महाराष्ट्रपणाचा अभिमान अधिक आहे. हे कोणासही कळविण्यात आम्हांस तिळमात्र संकोच वाटत नाही असे शास्त्रीबुवा जाहीरपणे बोलत असत. महाराष्ट्रापणाचा अभिमान असल्यामुळे महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास या संतांच्या कार्याची मराठेशाहीच्या स्थापनेत ‘सेंद्रिय’ भूमिका होती. हे शास्त्रीबुवा जाणून असल्यामुळे ते संताना राजवाडे यांच्यासारखे ‘टाळकुटे’ व  ‘संताळेले’ किंवा रानड्यांसारखे संतांना ‘प्रोटेस्टंट सुधारणावादी’ ठरवत नाहीत. महाराष्ट्र धर्माची मांडणी करतांना शास्त्रीबुवा म्हणतात की, ‘मराठी संतांची जी समत्वाची, शुचीत्वाची भेदाभेद अमंगळ मांडण्याची, भूतांचे परस्परात मैत्र जडवण्याची, दुसऱ्याचे अंतर जाणून त्यानुसार वर्तन करण्याची व समस्त विश्वास आपल्याजवळ घेण्याची शिकवण म्हणजे महाराष्ट्र धर्म होय.’महाराष्ट्र धर्म या अत्यंत प्रसिद्ध निबंधात महाराष्ट्र धर्माचे मर्म संतांच्या सर्वात्मकतेत व शिवाजीच्या निस्पृह छात्रधर्मात शोधले. त्यांच्यामते, ‘ शहाजीने व शिवाजीने केलेली स्पृहनिह राज्यक्रांती संतांनी सुरु केलेल्या सामाजिक चळवळीतूनच निर्माण झाली. वरील प्रकारच्या मांडणीमुळे राजारामशास्त्रींनी मांडलेला ‘महाराष्ट्र धर्म’ राजवाडेप्रमाणे वर्णधर्माश्रम समर्थक व परधर्मद्वेषी आणि रानडेप्रमाणे युरोपीय प्रोटेस्टंटरुपी ठरत नाही.
   
शिवशाही संदर्भात केलेली मांडणी:
            शास्त्रीबुवांनी शिवशाहीसंदर्भात शिवाजी चरित्र, संभाजी चरित्र, राजाराम चरित्र अशा प्रकारे तुटक-तुटक स्वरुपात मांडणी केलेली दिसून येते. भाषाशास्त्राच्या आधारे शास्त्रीबुवांनी मराठ्यांच्या संदर्भात मुलभूत सिद्धांत मांडले आहेत. ‘मोर्य’ हे ‘मोरे’ या मराठी नावाचे संस्कृतरूप. याच रीतीने ‘कदम’ हे ‘कदंब’ झाले तर ‘पवार’हे परमार झाले आणि चालुक्य हे शिर्के किंवा सालके या मराठी वंशविशेष वाचक नावाचे संस्कृत रूप दिसते. तेंव्हा ही कुळे मुळची मराठ्यांची असून त्यांनी नर्मदेच्या उत्तरेस अतिप्राचीन वसाहत केलेली दिसते. असे जर आहे तर मऱ्हाठे राजपूतातून निघाले म्हणण्यापेक्षा रजपूत हेच मराठ्यांचे वंशज आहेत असे म्हणणे संयुक्तिक ठरते. अशाप्रकारची मांडणी करून शास्त्रीबुवांनी उत्तरेपेक्षा मराठ्यांचे स्वातंत्र्य अस्तित्व आणि प्राचीनत्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
           अल्लाऊद्दिन खिलजीच्या पाठी महाराष्ट्रमंडळावर अविंधांची लाट मोठ्याप्रमाणात कोसळली...पण पुढे निझामशाही व आदिलशाही स्थापन झाल्या आणि मराठीत सर्व व्यवहार चालू लागले त्यामुळे मराठीवर जरी फारासीची छाया पडली तरी मराठीचे मराठपण आणि मऱ्हाठ्यांचे  मऱ्हाठापण कायम राहिले.अशाप्रकारे शिवपूर्वकाळासंदर्भातील दक्षिणी सुलातानांच्या सकारात्मक बाजूचीही शास्त्रीबुवा दखल घेतात. मराठेशाहीची स्थापना जरी शिवाजीने केली असली तरी त्याची पार्श्वभूमी शहाजीराजांनी निर्माण केली होती असे नोंदवतांना शास्त्रीबुवा म्हणतात की, ‘शहाजीपासून सर्व चिन्हे एकाकी पालटली मऱ्हाठ्यांमध्ये एकप्रकारचा हट्ट स्वाभाविक असतो तो दाखवून शहाजी प्रचंड दिल्लीपतीवर लढला व जसा आकाशावर चित्र काढण्यास निष्फळ यत्न करावा तसा अजिबात बुडालेली निझामशाही अंकुरित व्हावी म्हणून त्याने स्वामीभक्तीने भगीरथ यत्न केले.१० असे म्हणत शहाजीचे मराठेशाही स्थापनेच्या पार्श्वभूमीतील महत्व विशद करतात. जिजाबाईंचे ही शिवाजीला घडविण्यात अनन्यसाधारण महत्व आहे हे स्पष्ट करण्यासाठी ते जिजाबाई वरील लेखात म्हणतात की, जिजाबाईंचे सर्व लोकोत्तर गुण शिवाजीच्या अंगी उतरले होते... जिजाबाईंनी लावलेल्या वळणामुळे शिवाजी मराठेशाहीची स्थापना करू शकला.११
              शिवाजीने स्वकष्टाने स्वराज्य निर्माण केले. त्यासाठी राजकीय डावपेच म्हणून शत्रूंच्या बाजारपेठ लुटल्या. याला अति महत्व देत काही युरोपियन इतिहासकारांनी शिवाजीला लुटारू म्हटले आहे. त्याला प्रतिक्रिया म्हणून शास्त्रीबुवा म्हणतात की, मराठे काही मूळचे लुटारू नव्हते...शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा लुटारूपणा केला पण तो तसा केला नसता तर मऱ्हाठेशाहीची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. शिवाजी शत्रूंच्या मोठ्या मोठ्या पेठ लुटत असतो. पेठेंमध्ये देखील पूर्वी शिवाजीचे जासूद जात व सावकारांच्या यादी करून ठेवीत. पुढे शिवाजी लुटीच्या वेळी आपण खुद्द जाई व गोरगरिबांवर, बायकांवर किंवा फकीर-बैराग्यावर काडीभर देखील जुलूम होऊ नये म्हणून सक्त बंदोबस्ताने राही.१२  यामुळे शिवाजीस लुटारू संबोधणे कसे चूक आहे हे शास्त्रीबुवा स्पष्टपणे मांडतात. शिवाजीच्या व्यवहार चातुर्याबद्दल शास्त्रीबुवा म्हणतात की, शिवाजीने महाराष्ट्रमंडळ प्रबळ बनविले कारण शिवाजी जितका देशाभिमानी होता धर्माभिमानी किंवा जातीभिमानी नव्हता...जर शिवाजीस धर्माभिमान जास्त असता व देशाभिमान तितका नसता तर शिवाजीने हिंदू छत्रसालास  आश्रय दिला असता व मुसलमानांच्या पथकास आश्रय दिला नसता.१३ यामुळे आपणास असे दिसून येते कि, शिवाजीचे राजकारण हे जातीधर्माच्या पलीकडेच होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्यावर सबनीस- ब्राह्मण, कारखानीस-प्रभू, किल्लेदार क्षत्रिय (मराठा) नेमण्याचा जारीने चालवून महारांसारख्या अतिशुद्रांची ही न विसरता गडाच्या खात्यावर नेमणूक केली.१४ यावरून शिवाजीच्या राज्याची व्यापकता आणि सर्वसमावेशकता दिसून येते म्हणून महाराष्ट्र्मंडळ शिवाजीच्या काळात प्रबळ होते.
         संभाजी व राजाराम यांच्या विषयी शास्त्रीबुवांनी थोड्याप्रमाणात लेखन केले आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे साधनांच्या कमतरतेमुळे व अनुपलब्धतेमुळे योग्य ठरणार नाही.

पेशवाई संदर्भात केलेली मांडणी:
          संभाजीच्या खुनानंतर प्रत्यक्षात औरंगजेबच मराठ्यांचा शेवट करण्यासाठी दक्षिणेत तळ ठोकून होता. दरम्यानच्या काळात राजारामाचे निधन झाले आणि मराठ्यांना तोंड देता देता औरंगजेबाचेही निधन झाले. दिल्लीची सत्ता कमजोर होऊ लागली म्हणून संभाजीपुत्र शाहूला मोघलांनी महाराष्ट्रमंडळात पाठविले. शास्त्रीबुवांच्या मते, ‘मराठ्यांचा खरा वारसदार ताराबाईचा मुलगा दुसरा शिवाजीच होता’. ते म्हणतात की, शहूस अभिषेक झाला तेंव्हापासून शिवाजीच्या मराठेशाहीस ग्रहण लागले...पेशव्यास स्वतंत्ररीतीने पुण्यास राहू दिले ही शाहूची मोठी चूक.  छत्रपतींच्या अष्टप्रधानांनी राजधानीतच राहावे. साताऱ्यास पेशव्यास ठेवले असते म्हणजे त्यास इतके स्वातंत्र्य मिळाले नसते.१५  पेशव्यांना अतिरिक्त स्वातंत्र्य मिळाल्यामुळे छत्रपतींचे महत्व कमी होवू लागले. शास्त्रीबुवा म्हणतात की, बाजीरावाने तीनदा शाहूंचा उघड उपमर्द केला. शाहूस न कळविता बाजीरावाने दिल्लीपतीपासून खिल्लत व सुभेदारी घेतली. औरंगजेबापासून खरोखरीच मोठ्या आणीबाणीच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारची लाच न घेणारा रामचंद्र नीलकंठ कोठे व कोठे शुद्र खिल्लत व सुभेदारी आपल्या धन्यास न कळविता घेणारा पहिला रावबाजी१६ असे म्हणतांना शास्त्रीबुवा रामचंद्र नीलकंठ यांची मराठा स्वातंत्र्य युद्धातील कामगिरी व स्वामिभक्ती याची योग्य दखल घेतात. पेशव्यांचे अवाजवी महत्व वाढल्यामुळे जुन्या माणसांपैकी शाहुच्या पदरी कोणीही राहिले नाही. एक श्रीपतराव प्रतिनिधी होता. तो मात्र बराच दूरदृष्टी दिसतो. वऱ्हाडप्रांत निझामाकडून घ्यावा व शिवाजीच्या स्वराज्यात व्यवस्था लावून नंतर हवे असल्यास नर्मदेच्या उत्तरेकडेस घोटाळा चालला होता त्यात हात घालावा असे त्याचे म्हणणे होते. यावर शास्त्रीबुवा म्हणतात की, ‘दक्षिणेत व्यवस्था नीट लावून मग जर मऱ्हाठे नर्मदेच्या उत्तरेस उतरते तर सगळे हिंदुस्थान त्यास पुर्वजाप्रमाणे सहज अकुतोमय व्यापून टाकायास मिळते. पण श्रीपतरावांच्या उपदेशाप्रमाणे जर शाहू चालता तर बाजीरावांचा मतलब न साधता.’१७               
         पेशवे आपणास मऱ्हाठे म्हणवीत,पण मऱ्हाठ्यांची सातारची गादी होती तिचा अपमान करीत. कुलीन व जातिवंत मऱ्हाठे यास व मावळ्यास ते मुळीच पदरी ठेवीत नसत; का तर त्यांचा ओढा सातारकडेच असायचा. जाधव, घोरपडे, मोहिते वगैरे अस्सल मराठ्यांची कुळे पेशव्यांची नोकरी फारसी पत्करीत ना व पेशवे ही त्यास ठेवण्यास फारसे राजी नसत.१८ त्यामुळे शास्त्रीबुवा म्हणतात की, पेशव्यांनी शिवाजीची शिस्तप्रिय राज्यबांधणीची पद्धत सोडली व अस्थाव्यस्थ राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे समाजाची योग्य बांधणी झाली नाही. न्याय, नीती व आत्मसंयम याचा विचार करता फक्त माधवराव पेशवा हा सर्व पेशव्यात अपवाद होता. त्यामुळे शिवाजीचे राज्य पेशव्यांना सांभाळता आले नाही. जातीभेद, अहंमन्यता, फुटीरपणा, स्वार्थ, अनैतिकता, अन्याय हे दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीतील लक्षणे होती. आपल्या अंगातील दुर्गुणांमुळेच मराठ्यांचे राज्य गेले.१९ पेशव्यांवर कठोर टीका करीत असतांना व पानिपतच्या लढाई संबधाने सर्व अपयश पेशव्यांवर व त्यांच्या जातीवर, अर्थात दरोबस्त महाराष्ट्र ब्राह्मणांवर येतो२० असे म्हणत असतांना शास्त्रीबुवांनी शिंदे-होळकरांनासुद्धा सोडले नाही. ते म्हणतात की, ‘शिंदे- होळकर या दोघांनीही परदेशी यांची पलटणे ठेवून त्यांचे कामगार ही परदेशी ठेवले हे बिलकुल शहाणपणाचे काम नाही...परदेशी  जर केवळ त्यांच्या अपूर्व गोष्टी शिकण्यासाठी म्हणून ठेवली  असती तर आमचे काही बोलणे नव्हते...पण महादजीसारखे मराठे केवळ परदेशी यांवरच अवलंबून राहिले व त्यांच्यावर इतका भरवसा ठेवत गेली. ही राजकारणदृष्ट्या आम्ही मोठी अनावर व अक्षम्य चूक समजतो.२१
               नाना फडणीसांना ब्राह्मणांचे वर्चस्व कायम राहायचे वाटत होते. तेंव्हा अर्थातच मराठ्यांचे व त्यांचे  घोडे एकत्र पाणी पेईना. शिंदे- होळकर हे आपले मुलुख राखण्यात दंग झाले. तेंव्हा इ.स. १८१८ मध्ये खडकीचे लढाई झाली व पेशवाई लागलीच आपटली. त्याच आश्चर्य मानण्यासारखे मुळीच कारण नाही.२२ अशा प्रकारची मांडणी करून जातिभेदाला थारा न देता शिवाजीने स्थापन केलेली मराठेशाही जातीभेद वाढल्यामुळे जणू संपलीच असे गंभीर मत शास्त्रीबुवा नोंदवतात.

राजारामशास्त्रींची मराठेशाहीची मीमांसा:
          राजा दीक्षित म्हणतात की, मराठ्यांच्या इतिहासावरील आम्ही उदंड केले, पण त्याच्यावरील चिंतन मात्र आम्ही चिंताजनकरित्या कमी केले.२३ त्यामुळे मराठ्यांच्या राजकीय व लष्करी कारवायांच्या इतिहासाची चर्चा करतांना मराठेशाहीच्या ऱ्हासासंबधी मराठ्यांच्या सामाजिक इतिहासासंबधी ज्यांनी महत्वपूर्ण चिंतन केले. अशा राजारामशास्त्रींना आपण कधीच न्याय दिलेला नाही. मराठ्यांचे इतिहासकार ‘घटना धुंद’ व ‘तपशील धुंद’ म्हणावे लागतील. तपशीलात रमण्याच्या बाबतीतील एक आत्मवृत्ती आमच्यात आढळून येते. तपशिलांच्या तळ्यात ढूबण्यात आम्ही समाधान मानतो, पण अन्वयार्थांच्या समुद्रात पोहण्यात नव्हे.२४  आपल्या भाषाशास्त्राच्या आणि व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे अनेक महत्वपूर्ण सिद्धांत मांडण्याचे काम शास्त्रीबुवांनी केले. उदा. मराठे मूळचे उत्तर की दक्षिणचे. राजारामशास्त्रींनी मराठ्यांसंबंधीचे लिखाण वादग्रस्त ठरले कारण त्यांनी प्रस्थापित इतिहासशास्त्राला आव्हान दिले व स्वतंत्रबुद्धीने विचार मांडले.२५
मराठेशाही संबधित असलेला भाग तेवढा उचलला व तो अधिक व्यवस्थितपणे मांडला.२६ भागवतांची महाराष्ट्रेतिहास मीमांसा ही यांच्या एकूण भारताच्या व्यापक इतिहास लेखन मिमांसेचा भाग आहे. शेजवलकर येथपर्यंत पोहचू शकले नाहीत. भागवतांची भूमिका संस्कृत विरुद्ध प्राकृत या वादात प्राकृतला महत्व देणारी, उत्तरेपेक्षा दक्षिणेला प्राधान्य देणारी ...ब्राह्मणांपेक्षा क्षत्रियांचे महत्व अधिक असल्याचे त्यांचे विवेचन चिपळूणकर-राजवाडे संप्रदायाची इतिहास मीमांसा डोक्यावर उभी करणारी होती.२७ शास्त्रीबुवांच्या समकालीन अभ्यास संशोधनाच्या क्षितिजावर तळपनाऱ्या इतिहासाचार्य राजवाडे सारख्यांनी भागवतांची संभवना ‘अतिशोयक्ती निष्णात’ किंवा मुरारीप्रमाणे तृतीय पंथाचे अशी करून त्यांच्या मांडणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.२८  तत्पूर्वी  राजवाड्यांनी इतिहास लेखनाची सुरुवात भागवतांच्या महाराष्ट्र धर्मविषयक मांडणीला आव्हान देऊन झाली होती. अशाप्रकारे शास्त्रीबुवांच्या इतिहासमिमांसेने इतरांसही इतिहास लेखनास मार्ग निर्माण केले.

निष्कर्ष:
          दिवसेंदिवस इतिहासाची व्याप्ती वाढत असून नवनवीन गोष्टींचा अन्वयार्थ लावण्यासाठी इतिहासलेखनशास्त्रामध्ये नवीन गोष्टींचा गांभीर्याने विचार केला जात आहेत. राजकीय इतिहासाच्या पलीकडे सामाजिक, आर्थिक, मौखिक, लिंगभावाचा, शोषितांचा इतिहास या सर्वांच्या अभ्यास होत आहे परंतू आजही मराठा इतिहासामध्ये मराठा इतिहासलेखनकार याचा विचार तेवढा गांभीर्याने करतांना दिसत नाहीत. परंतू बर्याच वर्षापूर्वी राजारामशास्त्रींनी या सर्वगोष्टींची अस्पष्टपणे का होईना याची दखल घेतली आहे त्यामुळे राजारामशास्त्री प्रचलित व प्रस्थापित इतिहासापेक्षा वेगळा ठसा उमटवू शकले असे असले तरी शास्त्रीबुवांच्या इतिहासलेखनाला काही मर्यादा होत्या हे मात्र तेवढेच खरे.

















तळटीपा:
१) मोरे, सदानंद- परामर्श, महाराष्ट्रातील उपेक्षित मानकरी; राजारामशास्त्री भागवत: एक दर्शन, रा.ना.चव्हाण, रमेश चव्हाण (सं), अक्षर श्रद्धांजली प्रकाशन, प्रथमावृत्ती, २०११, पान क्र. २७
२)  कित्ता- पा. क्र. २७
३)  कित्ता- संपादकीय, पान क्र. ७
४) सुमंत/पुंडे (सं)- राजारामशास्त्री भागवत, रवींद्र लोणकर, महाराष्ट्रातील जातीविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, प्रथमावृत्ती,१९८८, पान क्र. ५९
५)  पूर्वोक्त- महाराष्ट्रातील उपेक्षित मानकरी, पान क्र. २९
६) भागवत दुर्गा (सं)- राजारामशास्त्री यांचे निवडक साहित्य- खंड १, मऱ्हाठ्यांसंबधाने चार उद्गार, राजारामशास्त्री भागवत, वरदा बुक्स,पुणे,दुसरी आवृत्ती, १९७९, पान क्र. १८४
७)  पूर्वोक्त- प्रस्तावना, महाराष्ट्रातील उपेक्षित मानकरी, पान क्र. १९
८)  पूर्वोक्त-  मऱ्हाठ्यांसंबधाने चार उद्गार, पान क्र. ३४
९)  कित्ता-  पान क्र. 97
१०) कित्ता – पान क्र. ११०
११) भागवत दुर्गा(सं)- कै. राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक लेख, अभिनव प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती, १९५०, पान क्र. ११९
१२) पूर्वोक्त- मऱ्हाठ्यांसंबधाने चार उद्गार, पान क्र. ५०
१३) पूर्वोक्त- कै. राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक लेख, पान क्र. १२७
१४) पूर्वोक्त- मऱ्हाठ्यांसंबधाने चार उद्गार, पान क्र. १८५
१५) कित्ता- पान क्र. ४८
१६) कित्ता- पान क्र. ५२
१७) कित्ता- पान क्र. ४९
१८) कित्ता- पान क्र. ५३
१९) पूर्वोक्त- महाराष्ट्रातील उपेक्षित मानकरी, पान क्र. २०
२०) पूर्वोक्त- मऱ्हाठ्यांसंबधाने चार उद्गार, पान क्र. २०
२१) कित्ता- पान क्र. ७०
२२) कित्ता पान क्र. ५८
२३) दिक्षित राजा- मराठा इतिहासलेखन: परंपरा –आशय  आणि संदर्भ, इतिहास शिक्षक, त्रैमासिक, एप्रिल-मे-जून, २००२, पान क्र. २२
२४) कित्ता- पान क्र. १९
२५) पूर्वोक्त- महाराष्ट्रातील उपेक्षित मानकरी, पान क्र. १९
२६) कित्ता- पान क्र. ३३
२७) कित्ता- पान क्र. ३४
२८) कित्ता- पान क्र. ३२
२९) कित्ता- पान क्र. ३४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...