मंगळवार, २० जून, २०१७

पाटीदार अनामत आंदोलन – मराठा क्रांती मोर्चा : काही निरीक्षणे



पाटीदार अनामत आंदोलन मराठा क्रांती मोर्चा : काही निरीक्षणे

                                                        
                                                                                                    - देवकुमार प्रकाश अहिरे




        मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्रातील चर्चेची,राजकारणाची आणि चळवळींची दिशाच बदलून टाकली आहे हे आपण प्रथम मान्य करायला हवे. मराठा क्रांती मोर्चाने आगामी काळातील राजकारण सेट करून टाकले आहे सोबतच पुढील काळात कशाप्रकारे मोर्चे आणि आंदोलने करायला पाहिजे याचेही प्रारूप आखून दिले आहे. अनेक कारणांमुळे मराठा समाजाची प्रतिमाविशिष्ट प्रकारे समाजात रंगवलेली असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने त्या प्रतिमेचे भंजनच केले आहे. मराठा समाजाने मूक मोर्चा जरी काढला असला तरी तो खूपच बोलका होता. मोर्च्यात वापरलेली चिन्हे, मोर्च्यातील मागण्या, मोर्च्यात सहभागी होणारे समूह यातून एकाचवेळा मराठा क्रांती मोर्चा अनेक बाबींवर अर्थ-राजकीय भाष्य करत होता. अनेकांना मराठा समाजाने मूक मोर्चा काढणे हेच आश्यर्यकारक वाटत होते. परंतू माघील २-३ वर्षातील भारतातील आणि जगातील आंदोलनाची दिशा आणि स्वरूप पहिले तर आपणास यात नवल वाटणार नाही. माघील २०-२५ वर्षात व्यवस्थापन, पर्यावरण चळवळ आणि स्त्री प्रश्न याची चर्चा सातत्याने होत असल्याने त्याचा मानवाच्या दैनदिन जीवनात सहभाग प्रवेश झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची तात्कालिक पार्श्वभूमी ही कोपर्डी येथील मराठा जातीतील मुलीवर झालेल्या बलात्काराने निर्माण करून दिली हे जरी खरे असले तरी हा एक व्यापक राजकारणाचा भाग होता हेही कोल्हापुरात झालेल्या मराठा गोलमेज परिषदेने स्पष्ट केले आहे. मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक आलेत त्यालोकांचे व्यवस्थापन  खूपच चांगले करण्यात आले. मुली आणि महिलांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना शॉक बसला आहे कारण पारंपारिकपणे मराठा समाज हा घरंदाजपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मराठ्यांच्या बायका घराच्या बाहेर येत नाही हीच धारणा लोकांची होती. लाखोंच्या संख्येने लोक जमणार आणि त्याचा लोकांना त्रास होवू नये म्हणून स्वच्छता मोहीमसुद्धा मोर्च्याच्या आयोजकांनी राबवलेली.
          कोपर्डीच्या आधीही अनेक बलात्कार महाराष्ट्रात स्त्रियांवर, मुलींवर आणि लहान बालिकांवर झालेले आहेत. त्यामध्ये सर्व जाती-धर्मातील स्त्रियांचा समावेश आहे. मराठा समाजातील मुलीवर बलात्कार होण्याची ही पहिली वेळ नाही मग याचवेळी येवढे मोठे मोर्चे का निघालेत याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. मराठा क्रांती मोर्चा निघाल्यावर अनेकांनी हा संघपुरुस्कृत आहे, राष्ट्रवादी पुरुस्कृत आहे असेही म्हटले होते. प्रारंभीच्या एकदोन मोर्चात असे असण्याची शक्यता असूही शकते परंतू महाराष्ट्रभरात निर्माण झालेली मराठा क्रांती मोर्च्याची ही लाट संघ आणि राष्ट्रवादीच्या आकलनाच्या पलीकडची आहे असे मला वाटते. कारण देशभरात शेतकरी जाती सर्वच आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आलेल्या आहेत. म्हणून मराठा क्रांती मोर्चा हा नुसता महाराष्ट्राच्या संदर्भात समजून घेता येणार नाहीये तर त्यासाठी आपणास संपूर्ण पश्चिम भारतात शेतकरी जातींच्या आंदोलनाची चर्चा करावी लागेल.
          माघील २-३ वर्षात गुज्जर, जाट,पाटीदार, वक्कलीगा, कापू आणि महारष्ट्रात मराठा या शेतकरी जातींचे आरक्षणासाठीचे आंदोलन चालू आहेत. जाट आणि गुज्जरांनी हिंसक आंदोलनही केलीत. पतीदारांच्या आंदोलनालाही हिंसक वळण लागले होते त्यामुळे राज्याला ते आंदोलन सैनिकी बळाच्या माध्यमातून लवकरच कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली थांबवता आली. मराठा क्रांती मोर्च्याच्या आयोजकांनी इतर आंदोलानांपासून धडा शिकलेला दिसतो. मराठा क्रांती मोर्च्याच्या आधी गुजराथमध्ये पाटीदार समाजाचे मोठे आंदोलन उभे राहिले त्या आंदोलनाची मागणी सुद्धा पाटीदारांना आरक्षण मिळावे हीच होती. पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या आंदोलनांनी गुजरातचे वेगळेच रूप बाहेर आणले. नरेंद्र मोदींसारखा एकछत्री अंमल असलेला मुख्यमंत्री जातातच दाबून असलेले जात समूह रस्त्यावर आलेत. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. नरेंद्र मोदींनी पाटीदारांचा असंतोष दाबून ठेवला होता असेही म्हणता येते. महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन राज्य नेहमी विकासाची चर्चा करण्यात अग्रेसर राहिलेली आहेत. वसाहतीक काळात ह्या दोन्ही राज्यातील बराच मोठा भाग हा बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून या प्रशासकीय विभागात येत होता. हल्लीचे विदर्भ (महाराष्ट्र) आणि सौराष्ट्र (गुजरात) हे त्याचा भाग नव्हते. सध्या विदर्भाला स्वतंत्र राज्य करावी ही मागणी जोर धरत आहे त्याचप्रकारची मागणी सौराष्ट्राबाबतसुद्धा नेहमी केली जाते. विदर्भ आणि सौराष्ट्र यामध्ये अजून काही साम्य आहेत. शेतीचे संकट हे विदर्भ आणि सौराष्ट्रावर बर्याचप्रमाणात सारखे आहे. या दोन्ही प्रांतात दलित चळवळीत बौद्ध धर्मांतराचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात मधील आंदोलनाविषयी माझे काही निरीक्षणे नोंदवणार आहे.

          पाटीदारांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीत आणि मराठ्यांच्या मराठा क्रांती मोर्च्यात मोठ्या प्रमाणात साम्यता आणि काही प्रमाणात फरक आहे. त्यालाच आपण ९० टक्के सारखेपणा आणि १० टक्के वेगळेपणा असेही म्हणू शकतो. साम्य आणि वेगळेपणा का आहे? याचा ज्यावेळी आपण विचार करायला जातो त्यावेळी आपणास तेथील राजकीय वातावरण, राजकीय पद्धती, पोटजातींचे प्रकार आणि राजकारण, स्थानिक इतिहास, शेतीची संकट, खाजगीकरण, वाढत जाणारी आर्थिक विषमता,बाजारू संस्कृती, बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, आरक्षणाची मागणी, ओबीसींचा विरोध, Atrocity Act विरोध या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.  
पाटीदार आणि मराठा आंदोलनाची साम्यता:
         मराठा क्रांती मोर्चाच्या आरंभी जसे संघपुरुस्कृत आंदोलन असल्याचा आरोप अनेक लोकांनी केला होता तसाच आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीवरही केला होता त्यात तथ्ये जरी नसले तरी  दोन्ही आंदोलनांच्या प्रवासात संघाच्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदने घुसून आंदोलनाला वेगळा प्रकार देण्याचा छोटेखानी प्रयत्न करून पहिला पण त्यांना त्यात यश आले नाही कारण आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाचे केंद्रस्थान पाटीदारआणि मराठाजात ठेवली होती. दोन्ही आंदोलन जरी तात्कालिक कारणांमुळे निर्माण झाले असले तरी त्यात अनेक वर्षांचा असंतोष भरलेला होता हे दिसून आले. कोपर्डीच्या घटनेचे तात्कालिक कारण ठरून मराठा क्रांती मोर्चा अख्या महाराष्ट्रात वेगाने पसरला तसेच गुजरातमधील बीजेपीच्या अंतर्गत राजकारणातून पाटीदार आंदोलनाची सुरुवात झाली आणि सगळा गुजरात आंदोलनाने व्यापून टाकला. दोन्ही आंदोलने काही काळानंतर तात्कालिक कारणापासून पुढे निघून गेलेत आणि मुख्य प्रश्न म्हणजे आरक्षणाचा तोच महत्वाचा बनत गेला. ओबीसीत आमचा समावेश करावा आणि ओबीसींचा दर्जा द्यावा ह्या प्रकारच्या दोन्ही मागण्या आंदोलनात वापरण्यात आल्या. ओबीसी आरक्षणाची मागणी येताच महाराष्ट्र आणि गुजरात मधील ओबीसींनी या मागणीला विरोध दर्शवला. नाशिकमधील मोर्च्याने मराठ्यांच्च्या ओबीसीतील प्रवेशाला आक्षेप घेतला तर अहमदाबादाच्या मोर्च्याने पाटीदारांच्या ओबीसीतील प्रवेशाला विरोध केला. दोन्हीही ठिकाणी ओबीसी नेत्यांनी मराठा आणि पाटीदार यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केला नाही परंतू त्यांना ओबीसीत घेवू नये असे ठणकावून सांगितले.
        ज्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चात हा जातीचा प्रश्न नसून मातीचा प्रश्न आहे असे सांगितले जात आहे त्याचप्रकारे पाटीदार आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे असे सांगितले गेले होते. यातून दोन महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे जर हे मातीचे म्हणजेच शेतीचे आणि शेतकऱ्यांचे आंदोलन असेल तर मग जात म्हणून का ही लोक संघटीत होत आहेत? दुसरा प्रश्न असा निर्माण होतो कि, शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेण्यात शेतकरी चळवळ कमी पडली का? कि, शेतकरी चळवळ जिवंत नसल्यामुळे शेतकरी लोक शेतकरी म्हणून संघटीत न होता जात म्हणून संघटीत होत आहेत. वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर शोधतांना आपणास पारंपारिक शेतकरी चळवळीची चिकित्सा करावी लागेल सोबतच ती का संपली याचाही शोध घ्यावा लागेल. मराठा आणि पाटीदार हे दोन्ही समाज मुळात शेतकरी समाज म्हणून ओळखले जातात. त्याच्यातही सामाजिक-आर्थिक स्थर आहेत. त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. प्रामुख्याने कुणबी या प्रवर्गात मोडणाऱ्या या जातीतील मोठी लोकसंख्या ही शेतीशी निघडीत आहे. शेतीचे संकट माघील काही वर्षांपासून दिवसेंदिवस गडद होत जात आहे. शेतीतून मिळनाऱ्या उत्पादनातून गावातील पत, मानसन्मान आणि सुरक्षितता संपत आहे त्यामुळे अस्मिताआणि अस्तित्वया दुहेरी संकटात शेतकरी शेती संकटामुळे सापडला आहे. व्यापक शेतकरी चळवळ अस्तित्वात नसल्यामुळे आणि डाव्या पक्षांनी सर्व शेतकऱ्यांना जमीनदार म्हणून रंगविल्यामुळे या समूहांना जात म्हणून संघटीत होण्याशिवाय पर्याय नव्हता. यासोबतच आरक्षणाच्या निमित्ताने जातीसमूहांचा जात म्हणून विकास होण्याची प्रक्रिया सुद्धा माघील काही काळापासून जोर पकडत आहे. महाराष्ट्रातीलमराठ्यांच्या राजकिय वर्चस्वाला धक्का देण्यासाठी माधव (माळी-धनगर-वंजारी) हे धोरण जसे राबविण्यात आले याचसारखे गुजरातमध्ये पाटीदारांच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी खाम (क्षत्रिय-आदिवासी-हरिजन-मुस्लीम) धोरण राबविण्यात आले. मराठा आणि पाटीदार यांची लोकसंख्या राज्यांच्या एकूण लोकसंख्येत अधिक असल्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात या समाजाचा फायदा होत असे त्यामुळे याप्रकारचे धोरण राबवलेली दिसतात. या धोरणांचा राजकीय परिणाम म्हणून जातींतर्गत पोटजातींचे भेद मिटवण्याची प्रक्रिया सुद्धा जोरदारपणे सुरु झालेली सध्याच्या काळात दिसते. परंतू इतिहासाचा आढावा घेतला तर जातींतर्गत विवाह सुद्धा होत नव्हते. एकमेकांना कमी लेखण्याची भावना दिसून येथे. महाराष्ट्रात देशमुख, मराठा, कुणबी हे मोठे फरक आहेत. तसेच गुजरातमध्ये लेवा,केड्वा आणि अंजना पटेल यांच्यात फरक आहेत. दोन्ही राज्यातील या जातसमूहांचा समाजेतिहासिक अभ्यास केला पाहिजे. वसाहतपूर्व काळातील जातीवास्तव, वसाहतीक काळात झालेले अभ्यास, जनगणना,संहितीकरण आणि वसाहतोत्तर काळांमध्ये आलेल्या आरक्षण, सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे खूपच बदलले आहे. सध्या महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात कुणब्यांना ओबीसीत आरक्षण मिळते तर मराठवाडा आणि इतर टिकाणी मराठा म्हनून मिळत नाही. कुणबी-मराठा एकच आहे असे मराठा लोकांचे म्हणणे असते तर कुनब्यांचा त्याला विरोध आहे. गुजरातमध्ये लेवा आणि केडवा यांना आरक्षण मिळत नाही तर अंजना पटेल यांना आरक्षण मिळते. यातून एका विभागात एका जातीच्या पोटजातीला आरक्षण मिळते तर दुसऱ्या टिकाणी मिळत नाही त्यामुळे जातींतर्गत पोटभेद मिटवून सकल मराठ्यांना आणि सर्व पाटीदारांना आरक्षण मिळावे ही मागणी उभी राहत आहे. त्यातून जातीचे पुनरुत्पादन होत आहे. महाराष्ट्रात धनगर आरक्षणाच्या आंदोलनाच्या काळात हीच प्रक्रिया आपण पाहत होतो. उदाहरणार्थ- ना हटकर ना व्हटकर, आम्ही फक्त धनगर.

               Atrocity Act च्या कायद्याविरोधी सुरसुद्धा या दोन्ही आंदोलनांच्या प्रारंभी त्रीव्रपणे लावण्यात आला होता परंतू आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ही मागणी संबंधित कायदाचा दुरुपयोग होवू नये येथपर्यंत येवून ठेपली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मराठ्यांच्या आरक्षणाला दलित चळवळीचा पाठींबा आहे त्याचप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा दलित चळवळीने पाठींबा दिला आहे. सध्या महाराष्ट्रात मराठ्यांकडून आणि गुजरातमध्ये पाटीदारांकडून ओबीसीच दलितांवर जास्त अत्याचार करतात असे सांगण्यात येते.
माघील काही दिवसांपासून ओबीसी समूहांकडून दलितांवर अत्याचार होत आहेत हे आपणास देशभरात सगळीच कडे मोठ्याप्रमाणात दिसत आहे. म्हणून दलित-ओबीसी आघाडी या राजकीय डावपेचांचा सध्याच्या काळात मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्च्याच्या दरम्यानच्या काळात जसे मराठा समाजातील काहींनी ओबीसींच्या आरक्षणाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. सोबतच अनेक टिकाणी ओबीसींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तरी त्यांना आरक्षण मिळते मग आम्हाला का ओबीसीचे आरक्षण मिळत नाही असा प्रश्न निर्माण केला आहे. याच प्रकारचा विचार गुजरातमध्ये पाटीदारांनी केलेला आहे. ओबीसींच्या यादीतून काही जातींना वगळावे अशी सुद्धा मागणी काहीवेळा करण्यात आली आहे.
पाटीदार आणि मराठा आंदोलनातील वेगळेपणा :
         साम्यता मोठ्याप्रमाणात असली तरी या दोन्ही आंदोलनाचे काही वेगळेपण आहे. वेगळेपणाची चर्चा केल्यावर आपणास आंदोलनातील राजकारण, एक्स्प्रेशन हे कळून येईल. सगळ्यात महत्वाचे वेगळेपण ऐतिहासिक वारसा हा होय. महाराष्ट्रात मराठ्यांच्या आंदोलनात शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मराठा इतिहासचे एक वेगळेच चित्रण उभे करण्यात आले. शाहू-सयाजीराव-शिंदे यांच्यापासून ते पानसरे-शरद पाटील यांच्याही नावाचा विचार करण्यात आला. गुजरातमध्ये सरदार पटेल यांच्यापलीकडे पाटीदार आंदोलनाला कोणाची प्रतिमा वापरण्यात आली नाही. महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये ब्राह्मणेत्तर आणि शेकाप चळवळीचा वारसा असणे हे सुद्धा महत्वाचे ठरते. त्याउलट गुजरातमध्ये याचा प्रभाव जास्त जाणवत नाही.
         राजकीय पातळीवरील वेगळेपणा असणे हा महाराष्ट्र आणि गुजरातमधील सगळ्यात महत्वाचा फरक आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेस आणि बीजेपी हे दोनच पक्ष राज्याच्या राजकारणात महत्वाची भुमिका निभावतात त्यामुळे धृवीकरण समाजामध्ये मोठ्याप्रमाणात आणता येते. आधी सलग कॉंग्रेसची सत्ता होती तर आता सलग बीजेपीची सत्ता आहे त्यामुळे पाटीदार आंदोलनात जाहीरपणे सरकारविरोधी सूर आहे. माघील ३-४ पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पाटीदारांचे मोठ्याप्रमाणात बीजेपी मतदान घेवूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही हे पाटीदारांना कळून चुकले आहे.गुजरातमध्ये विकासाचा ढोल वाजवून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष सरकार करत आहे सोबतच बदलेल्या अर्थ-राजकीय परिस्थितीत शेतीला चांगले दिवस येणार नाही अशी सुद्धा त्याची धारणा बनत आहे त्यामुळे आरक्षणाची मागणी विशेषत: तरुणांमध्ये जोर पकडत आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती खूपच वेगळी आहे. या वेगळेपणाचा प्रत्यक्ष मराठा क्रांती मोर्चावर प्रभाव पडलेला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,मनसे,बीजेपी,रासप,भारिप आणि शेतकरी संघटना सोबतच डावे पक्ष अशा व्यापक राजकीय पातळीवर महाराष्ट्रातील मराठा विभागला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जरी आपण मराठ्यांचा प्रभाव असलेले पक्ष म्हणत असलो तरी हे पूर्णत: खरे नाहीये. हिंदुत्वाचे राजकारण करणारे दोन पक्ष असणे, प्रादेशिक भुमिका घेवून त्रिवपणे राजकारण करणे आणि सोबतच संसदीय आणि गैरसंसदीय डावे राजकारण असणे हे गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचे वेगळेपण ठरवते. पाटीदारांप्रमाणे मराठ्यांनी जाहीर सरकारला विरोध का केला नाही? याचेही उत्तर वरील वेगळेपणात आहे.
         महाराष्ट्रात आलटून-पालटून वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येत असल्यामुळे आणि प्रत्येक पक्षात मराठ्यांची संख्या विभागली गेल्यामुळे मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. सलगपणे सत्ता हातात नसणे आणि आघाड्यांचे सरकार असणे असे कारणे महाराष्ट्रातील नेते मंडळी सांगतही असतात म्हणून मराठा क्रांती मोर्चाला जाहीरपणे सरकार विरोधी भुमिका घेता आली नाही कारण, सध्याचे सरकार येवून 2 वर्ष झालीत. माघील १० वर्षात आमचे सरकारच नव्हते असे म्हणून हे सरकार हात वर झटकू शकते. गुजरातमध्ये मात्र असे तेथील सरकारला करता येणार नाही कारण माघील ३-४ पंचवार्षिक काळात एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार आहे.
        या दोन्ही आंदोलनातील सगळ्यात मोठा वेगळेपणा म्हणजे नेतृत्वाचा आहे. पाटीदारांच्या आंदोलनातून हार्दिक पटेल या तरुणाचे नेतृत्व पुढे आले परंतू मराठ्यांच्या आंदोलनातून त्या प्रकारे काही झालेले नाही. महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजकीय चरित्रात वरील परिस्थिती का निर्माण झाली? या प्रश्नाची उत्तरे आहेत. गुजरातमध्ये दोनच पक्ष असल्यामुळे आणि डाव्या पक्षांची अनुपस्थिती असल्यामुळे येणाऱ्या काळात हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली पाटीदारांचा किंवा शेतकऱ्यांचा, गरीबांचा तिसरा पक्ष निर्माण होवून गुजरातच्या राजकरणात काहीतरी राजकीय भूकंप आणू शकतो परंतू महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्च्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण होतात कारण, गुजरातमध्ये जी संधी पाटीदार आंदोलनाला आहे ती महाराष्ट्रात क्रांती मोर्चाला नाहीये. मराठा क्रांती मोर्चा एक गोष्ट मात्र महत्वाची करत आहे ती म्हणजे सामुहिक नेतृत्व निर्माण करण्याची. सध्या तरी कोणत्याही मोर्च्यात एक सर्वमान्य नेतृत्व निर्माण झालेले नाही आणि कोणत्याही प्रस्थापित मराठा नेतृत्वाविषयी जाहीर भाष्य केलेले नाही. माघील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या बैठका आणि अभ्यास कार्यशाळा होत आहेत त्यातून मराठा क्रांती मोर्चाला एकछत्री सर्वमान्य नेतृत्व किंवा सामुहिक नेतृत्व निर्माण झाल्यास पाटीदार आंदोलनाप्रमाणेच महाराष्ट्रातील चर्चाविश्वाला आणि चळवळीला एक वेगळीच दिशा येणाऱ्या काळात मिळणार आहे. हे मात्र निश्चित आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...